पुजारी यांचा वालुग हा कथासंग्रह संपत चाललेल्या एकात्मिक पशुपालन आणि कषी संस्कृतीचा दस्तावेज आहे. प्रमाण मराठीपेक्षा वेगळी असलेली भाषा आणि संबोधने या कथासंग्रहाचे बलस्थान आहे. येथे जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी भेटते. प्रत्येक कथा समाजाचा एक कोन दाखवताना दिसते. त्यामुळे छोटा असला तरी वाङ्मयीन आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने 'वालुग' या कथासंग्रहाचे मोल खूप मोठे आहे.'
‘कातरबोणं' या कादंबरीचे लेखक रावसाहेब पुजारी यांचा 'वालुग' नावाचा नवा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ, हातकणंगले भागातल्या अत्यंत गरीब धनगर समाजाचे वास्तव चितारणाऱ्या दहा कथा या संग्रहात आहेत. कथांची शीर्षके जमिनीचा तुकडा, वालुग, लाल बिर्जा आणि काळा सुरा, हजारे मास्तर, टाचरी सुंदरा, पेटता डोंगुर, हाजातम, वनग्या, सावज, आणि पेरणी अशी आहेत. त्यापैकी काही कथा व्यक्तिचित्रणात्मक आहेत. काही व्यक्तिरेखाही वास्तवातल्या आहेत. पारंपरिक, सांस्कृतिक वारसा जपणं आणि प्रगती यांच्या मध्ये कुठेतरी अडकलेल्या लोकांच्या या कथा आहेत. त्यांचे चित्रण लेखकाने ताकदीने केलेले आहे.
मनोगतात रावसाहेब पुजारी म्हणतात, “यातील 'वालुग' ही कथा अनेक व्यासपीठांनी गौरवलेली, त्यामुळे तेच नाव धारण करून निवडलेल्या वाटेवरचा वाटसरू व्हावं, असं मनोमन वाटलं आणि हा कथासंग्रह आकाराला आला. यातील पात्रं कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात माझ्याशी जोडली गेली होती आणि आहेत. त्यांचं शब्दबद्ध कथास्वरूप करणं तसं माझ्यासाठी नवीनच होतं. संवाद, निरीक्षण आणि ग्रामीण वातावरण यांचा अंतर्भाव असला तरी त्यात पुन्हा माझ्या अवती-भवतीच्या माणसांचाच सगळा गोतावळा. अशी अनेक माणसं असतात की जी कायमस्वरूपी मनचक्षुवर कोरलेली. मनात खोलवर रुतून बसलेली. ती पिच्छा सोडत नाहीत. कुठच्या ना कुठच्या चर्चेत त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा मिळत राहतो. तीच पुढे लेखनाला विषय देऊन जातात. कथासंग्रहाच्या माध्यमातून तीच माणसं शब्दांत उभी करण्याचं ठरवलं आणि ते साधत गेलं. याबाबतीतही मी नवखाच. त्यामुळं त्याची नस मला पकडता येईल की नाही, याची मनात धुगधुगी. पण लिहित गेलो. काही ठिकाणी त्या प्रसिद्ध झाल्या. काही स्पर्धांमध्येही त्यांची नोंद घेतली गेल्याने आत्मविश्वास दुणावला. वाचणारे, भेटणारे बरेच काही सुचवत होते, त्यातूनच माझ्या लेखनाला प्रेरणा मिळत गेली आहे.”
धनगरांच्या समुदायात ढोल वाजवण्याच्या कलेला मोठे महत्त्व आहे. त्यांच्या विविध विधींमध्ये ढोल वाजवला जातोअशा. कार्यक्रमाला ‘वालुग’ म्हणतात. कुशल वादकांना विशेष मान असतो. त्यांच्या कलेचं खूप कौतुक होतं. ‘वालुग’ ही अशाच एका हुन्नरी ढोलवादकाची, शिवाण्णाची कथा आहे. ढोल वाजवण्यात पारंगत असलेला शिवाण्णा धनगर समाजात ‘वालग्या’ म्हणून प्रसिद्ध असतो. विविध विधींनुसार बदलणारे ताल साधण्यात तो निष्णात असल्याने पंचक्रोशीत कुठेही वालुग असला की त्याला निमंत्रण असायचंच. गळ्यात ढोल अडकवून त्यावर कुडापण्यानं आवाज देताच सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जायचं. त्याच्या हातातला ढोल घेऊन राजीव गांधींनी वाजवला होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी त्याला प्रेमानं शाल दिली होती.
मात्र एकदा शिवाण्णाला एका वालुगाचं निमंत्रण येतच नाही. तो प्रचंड अस्वस्थ होतो. आपण वाजवू शकलो नाही तर आपली परंपरा कोण जपणार? ही धनगरी कला नव्या पिढीकडं हस्तांतरित करण्यासाठी त्याला आयुष्य वेचायचं होतं, ते कसं होणार? याची त्याला विवंचना वाटते.
अशात बिरुबाच्या देवळात त्याला कोथळीच्या मंगरायाच्या वालुगाची पत्रिका दिसते आणि तो तेथे जाण्याचा निश्चय करतो. वालुगाच्या दिवशी ढोलाची तयारी करून तो कार्यक्रमात सहभागी होतो. देहभान हरपून वादनात रंगून जातो. त्याच्या वादनाने तो सर्वांची मने जिंकतो. लोक त्याच्यावर नोटा उधळतात. वालुग, वालग्ये आणि धनगरी संस्कृतीभोवतीच त्याचं मन अखेरपर्यंत फिरत राहिलं.
'लाल बिर्जा, काळ्या सुऱ्या' ही कथा दोन कुस्तीगीरांची आहे. दोघेही एकाच गावातले. आण्णू चिरगोळ्याकडंच तयार झालेले. अण्णू त्यांना सांगायचा, कुस्ती म्हणजे नुसता ताकीचा खेळ नसतो. बुद्धिमान आणि चपळ, त्याचं नाव पैलवान. आत्मबल, मनोबल आणि शक्तीबलानं पैलवान तयार होतो. प्रख्यात कुस्तीगीरांच्या हकीकती सांगे. दसऱ्याच्या निमित्तानं तो गावात कुस्तीचं मैदान भरवण्याची खुमखुमी त्याला येते. त्यााठी आवश्यक तयारी केली जाते. कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाची कुस्ती लाल बिर्जा आणि काळा सुऱ्या यांची ठरते. दोघंही मेंढकच. पण कुस्तीला इरसाल. दोघांचेही समर्थक असतात व ते आपलाच मल्ल विजयी होणार असं सांगत असतात. बिर्जूला आपणच विजयी होणार असा विश्वास असला, तरी त्यानं सराव कमी केला नव्हता. खुराकही सुरू होता. सुऱ्याप्पा. त्याला वाटत होतं आपण लढायचं. खेळात हार जीत असायचीच. बिर्ज्याला मात्र आपण लीलया चारीमुंड्या चीत करू. नंतर कुस्तीच्या मैदानाचं वर्णन लेखक करतो. शेवटी सुऱ्या पोकळ घिस्सा डावावर बिर्ज्याला आसमान दाखवतो. शेवटी लेखक म्हणतोः कुस्तीनं दोन तरुण मेंढकं एका गावात, एका बगयात राहून दोन टोकाला पोहोचले होते. आता त्यांच्या मनाला वेगळीच पीळ पडलेली होती.
'हजारे मास्तर' हे व्यक्तिचित्र आहे आणि ते सुयोग्यपणे उभं केलेलं आहे. जन्मतःच धनगरी बाळकडू. पुढं शिकून टक्के टोणपे खात ते मास्तर झालेले. नाळ मात्र धनगरी संस्कृतीशी जोडलेली. शाळेत पोरं सांभाळता सांभाळताच आपल्या जातभाईंना न्याय मिळवून देण्यासाठी मास्तर धडपडत. न्यायाच्या आशेनं धनगर मास्तरांकडं येत. मास्तरांवर त्यांचा जीव. मास्तर म्हणतील तीच त्यांची पूर्व दिशा असे. डंगे धनगर, मेंढे धनगर आलेल्या नाना अडचणी मास्तरांनासांगून त्यावर इलाज करायला सांगत. त्यांच्या प्रमाणेच खुटेकरी, बोडके, कोळेकर, हजारे, पुजारी, पालखे, बंडगर, हणबर, हुलवान, वाघमोडे, लिंगाडे, शिांगाडे, हाके, पाखरे, मेटकर, हटकर अशी मंडळीही येत. अशा सगळ्याच जिल्ह्याचं पुढारी हजरे मास्तर. पायाला भिंगरी लावल्यागत ते गावागाव फिरतवाड्या वस्त्यांवर प्रबोधन करतशाळा सांभाळून धनगऱ्यांच्या सगळ्या समस्या सोडवत. त्यामुळं त्यांचं घर जिल्ह्यातल्या धनगरांसाठी गाऱ्हाण मांडण्याचं ठिकाण झालं होतं. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला. लेखक मास्तरांची कामाची पद्धतही सविस्तर वर्णन करतो. समस्या समजावून घेऊन तें निवेदन तयार करतटिपण तयार करत. धनगरांना संरक्षणाची शिफारसपत्र देत. त्यांच्याकडं चांगलं संघटन कौशल्य होतं. पण धनगरांचं संघटन करणं महाकठीण, हा मास्तरांचा अनुभव. धनगरांना एकत्र राहण्याचा संदेश ते देत. धनगरांना ते पटत होतं. एकदा ते मोठ्या बकरी मोर्चाचं आयोजन करतात. धनगरांना चराऊ कुरणाचं परमिट मिळतं मेंढक्यांना मोठा आनंद होतो. त्यांचं अवसान दुप्पट होतं. मास्तर पाठीशी आहेत म्हणून आणखी चेव चढतो. या चराऊ कुरणाच्या परवान्यानं मेंढक्यांना त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होते.
'टाचरी सुंदरा' ही कथाही व्यक्तिचित्रणासारखीच आहे. तिच्या माळावर तिचं जिवापाड प्रेम. सगळा जीव रानाच्या कड्या कोपऱ्यात गुंतलेला. कल्लू तिचा मुलगा. तो तालुक्याचा मोठा अधिकारी झाला. पण सुंदराला गाव सोडवत नव्हतं. गावाच्या एका टोकाला घर आणि दुसऱ्या टोकाला शेत. ती रोज तिथं जायची. पण वय झालं तसं सुंदराचं शेताकडं जाणं मंदावलं. तिच्या ढेंगाळपणामुळं चालताना ती एक पाय ओढू लागली. तसंच ती येजा करत होती. तिच्या रानात अतिक्रमण केलं. लोक तिचं पीक कापून नेऊ लागले. हळूहळू सारा गावाच तिला 'टाचरी सुंदरा' म्हणायला लागतो. तिचं शेताकडं येणं मंदावताच शेजाऱ्यांनी तिचा बांध फोडायला सुरुवात केली होती. ती शेजाऱ्यांना शिव्याशाप घालायची.
कल्लूच्या सेवेपेक्षा तिला शेतापर्यंत जाणं महत्त्वाचं वाटत होतं. पण त्याला नियमित शेताकडं जाणं शक्य नव्हतं. म्हणून ती त्याच्यावर रागवत होती. 'मी मेल्यावर माझं थडगं रानातच बांध.' असं त्याला सांगायची. कल्लूच्या डोळ्यात पाणी यायचं. म्हातारी हेकेखोर म्हणून सुनेला तो गावी ठेवू शकत नव्हता. 'तुझ्या माघारी मी शेतीवाडीचं सारं बघेन,' असं सांगायचा. पण त्यानं तिचं समाधान व्हायचं नाही. निराशेनं ती म्हणायची, 'मोठ्या कष्टानं मिळवलंय सगळं अशानं एक दिवस आई बापाचं नाव घालवून बसशील.' गावाला शहाणपण शिकवणारी सुंदरा पायानं अधू झाली. तिला टाचरपण आलं. याचं दुःख सुंदराइतकं कल्लूलाही होतं. नाना उपचार करूनही तिचा पाय दुरुस्त झाला नाही. सुंदराचा जीव रानाभोवती घुटमळत होता. 'टाचरी सुंदरा' या नावानं गाव तिला संबोधत होतं, याचं दुःख दोघांनाही बोचत होतं. तिचं जगणंच अधू झालं होतं या वाक्यानं गोष्ट संपते.
'पेटता डोंगुर' ही कथा आपल्या हातून चुकून वणवा लागल्याची हळहळ वाटणाऱ्या दादबा म्हाताऱ्याची आहे. पर्यावरणाचं महत्त्व ती नकळत सांगून जाते. दादबाला आपल्या चुकीचं दुःख वाटत असतं. ते काही कमी होत नाही. वणवा कसा लागला हे गावकरी शोधतात. दादबाला दंड होतो. पण पुढच्या वर्षी संपूर्ण डोंगराभावती जाळरेषा करायची शपथ गावकरी घेतात. पेटत्या डोंगराचा गावानं धडा घेतलेला असतो. पुढच्यास ठेच मागचा शहाणा असं घडलं होतं. त्यांना जनावरांच्यां चारापाण्याविना होणाऱ्या हालांची काळजी होती.
'हाजामत' ही कथा बदलत्या काळानं माणसांनाही कसं बदलणं भाग पडलं हे सांगते. 'बनग्या' ही कथा शेरडांची आहे. आणि म्हातारपणामुळं वाईट दिवस आलेल्या मोकराणीची आहे. एकेकाळी घराची दात्री तिला भरल्या कणसाचा घास भरवत होती पण आता तिला बनग्यातील चार दाणे मिळायची मारामार होती. ती मूकपणानं आसवं गाळत होती. 'सावज' ही कथा नको त्या मोहात पडून एक चांगला जीव आपली दैना कशी करून घेतो, हे सांगणारी आहे. 'पेरणी' या कथेत मोठ्या मालकानंतर धाकटा मालक कारभार करू लागल्यावर नोकरमाणसांचे कसे हालहाल होतात ते सांगते.
'जमिनीचा तुकडा' ही दीर्घ म्हणावी अशी कथा आहे. 'जमिनीचा तुकडा' ही एका म्हातारीच्या जमिनीच्या स्वप्नाची कथा आहे. ‘त्वांड ग्वाड तर सारं ग्वाड’ हे तिचं परवलीचं वाक्य. तिचा चुलत भाऊ बाळकू तिच्यावर सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम करणारा. म्हातारीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पुढाकार घेतो. भाच्यांनाही सोबत घेत जमीन शोधण्याची धडपड सुरू होते. अखेर पंडितकाकांची जमीन विक्रीस असल्याचं समजतं. मात्र तिची किंमत मोठी असते. बाळकू ती थोडी कमी करण्यात यशस्वी होतो, तरीही पैशांची कमतरता, कागदपत्रांचा खर्च आणि कृष्णाप्पाचं कमिशन यांची जुळवाजुळव करावी लागते. बँकेचं कर्ज काढण्यासाठीही खूप खटपट करावी लागते. अखेर सर्व प्रयत्नांना यश येतं आणि जमीन म्हातारीच्या मुलांच्या नावावर होते.
जमीन मिळाल्यावर म्हातारी तिची पूजा करते. भिजाणे आणि आंबील वाहते. सारा गोतावळा जमा होतो. म्हादू बैलं जुंपतो आणि नांगर जमिनीला लागतो. नवं रान, नवं शिवार आणि नव्या स्वप्नांचा तो आनंददायी क्षण लेखकाने प्रभावीपणे रंगवला आहे. या कथेत म्हातारीबद्दल सहानुभूती वाटते, तर नुसतं कमिशन खाणाऱ्या कृष्णाप्पाचा राग येतो. जमीन मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड पाहून शेतकऱ्यांचा जमिनीशी असलेला जिव्हाळा अधोरेखित होतो. पैशानं सारंच काही विकत घेता येत नाही, हे सत्यही ही कथा ठसवून सांगते.
कथांचा आशय जितका संपन्न आहे, तितकीच त्यांची भाषादेखील उल्लेखनीय आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक बोली ऐकायला मिळतात. कोकणच्या परिसरातील कोल्हापूरची आणि नद्यांच्या खोऱ्यामध्ये वाढलेल्या कोल्हापूरची, याबरोबरच कानडी मुलखाशी सीमा असणाऱ्या कोल्हापूरची भाषा असे भाषांचे विविध प्रकार अशा वैविध्याचा प्रत्यय कोल्हापुरी लेखकांच्या लेखनात आढळतात. पुजारी यांच्या या कथांमध्ये पूर्व कोल्हापूर जिल्ह्यातील भाषा आणि तिचे वेगळेपण जाणवते. ही भाषा शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यामधील सपाट प्रदेशात बोलली जाते. तिच्यावरील कानडी संस्कृतीचा प्रभाव सहज जाणवतो. लेखक ज्या मेंढपाळ समूहाचे प्रतिनिधित्व करतो, त्या मेंढपाळ समूहाची भाषा स्वतंत्र आहे. त्यातील अनेक शब्द या कथासंग्रहात लेखकाने वापरले आहेत. प्रस्तावनेत डॉ. गोमटेश पाटील म्हणतात, 'या कथासंग्रहाचा एक स्वतंत्र शब्दसंग्रह तयार करता येईल'.
वालुग कथासंग्रहाला एक विशेष सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य आहे. यातल्या कथा पूर्णपणे काल्पनिक नाहीत, त्या वास्तवात रुजलेल्या आहेत. धनगर समाजाचा पिढीजात वारसा आणि बदलत्या जगाबरोबर चालण्याची, स्वतःची आर्थिक प्रगती करण्याची, शिकून मोठे होण्याची नव्या पिढीची महत्त्वाकांक्षा यांचा समतोल साधता येत नसल्यामुळे थोडी रागावलेली, रूसलेली एक पिढी आहे. प्राचार्य राजेंद्र कुंभार म्हणतातः 'नवी पिढी सत्त्व हरवून बसली आहे. पुजारी यांचा वालुग हा कथासंग्रह संपत चाललेल्या एकात्मिक पशुपालन आणि कषी संस्कृतीचा दस्तावेज आहे. प्रमाण मराठीपेक्षा वेगळी असलेली भाषा आणि संबोधने या कथासंग्रहाचे बलस्थान आहे. येथे जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी भेटते. प्रत्येक कथा समाजाचा एक कोन दाखवताना दिसते. त्यामुळे छोटा असला तरी वाङ्मयीन आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने 'वालुग' या कथासंग्रहाचे मोल खूप मोठे आहे.'
शहरांत राहणाऱ्या गाववाल्यांना हा कथासंग्रह काही काळ त्यांच्या गावातच घेऊन जाईल हे निश्चित !
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)
वालुग
लेखकः रावसाहेब पुजारी
प्रकाशकः अजयकुमार पुजारी, तेजस प्रकाशन, कोल्हापूर
पानेः 124
किंमतः 225 रुपये
Tags: वालुग धनगर धनगर समाज कथासंग्रह रावसाहेब पुजारी कातरबोणं कादंबरी सामाजिक कादंबरी कोल्हापूर ढोल valug ravsaheb pujari Load More Tags
Add Comment