धारदार विनोदातून वर्णद्वेषाविषयीचा संताप व्यक्त करणारी कादंबरी

बुकर 2022 साठी नामांकन लाभलेल्या, पर्सीवल एवरेट यांच्या 'द ट्रीज' या कादंबरीचा परिचय

Percival Everett

कथात्म साहित्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बुकर पुरस्कारांसाठीच्या यंदाच्या नामांकन-लघुयादीमध्ये पाच राष्ट्रांमधील सहा कादंबऱ्यांचा समावेश होता. त्यातून श्रीलंकी लेखक शेहान करूणातिलक यांच्या ‘द सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’ या कादंबरीला यंदाचा बुकर पुरस्कार मिळाला. या कादंबरीव्यतिरिक्त, ब्रिटिश लेखक अ‍ॅलन गार्नर यांची ‘ट्रीकल वॉकर’, अमेरिकेच्या एलिझाबेथ स्ट्राऊट यांची ‘ओह विल्यम’, झिम्बाब्वेच्या नोव्हायोलेट बुलावायो यांची ‘ग्लोरी’, अमेरिकी लेखक पर्सिवल एवरेट यांची ‘द ट्रीज’, आणि क्लेअर कीगन या आयरिश लेखिकेची ‘स्मॉल थिंग्ज लाईक दीज’ ही पुस्तकेही यंदा पुरस्काराच्या स्पर्धेत होती. एकूण 169 पुस्तकांतून या सहा पुस्तकांची निवड समितीने केलेली होती. या पुरस्कारांच्या निमित्ताने ‘द ट्रीज’वर गणेश मतकरी यांचा आणि ‘स्मॉल थिंग्ज लाईक दीज’वर निलांबरी जोशी यांचा असे दोन लेख ‘कर्तव्यसाधना’वर प्रसिद्ध करत आहोत. 

द इमेज ऑफ द बॅाय इन हिज ओपन कास्केट अवेकन्ड द नेशन टु द हॅारर ऑफ लिन्चिंग. ॲट लीस्ट टु द व्हाईट नेशन. द हॅारर दॅट वॅाज लिन्चिंग वॅाज कॅाल्ड लाईफ बाय ब्लॅक अमेरिका.

- द ट्रीज, पर्सीवल एवरेट. 

1997 मध्ये आलेला ‘लाईफ इज ब्युटीफूल’ हा चित्रपट मला आवडला नव्हता. तेव्हा या चित्रपटाचं खूप कौतुक झालं, तो ऑस्करला अनेक विभागांत नॅामिनेट केला गेला आणि त्याला परभाषिक चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला. त्याबरोबरच इतरही अनेक सन्मान त्याला मिळाले आणि त्यातल्या सकारात्मक संदेशासाठी त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. हे सारं का झालं हे मी समजू शकतो, पण तरीही फॅशिस्ट राजवटीचा अत्याचार दाखवणारा चित्रपट ‘फील गुड’ वळणाचा असणं, त्यातल्या विनोदाला प्रेक्षक म्हणून हसणं, हे मला झेपत नाही. त्यापेक्षा हिटलरला अकाली खलास करणारा ‘इनग्लोरिअस बास्टर्ड्स’ मला अधिक पटतो. जेव्हा चित्रपट, वा साहित्यकृती इतिहासातल्या एखाद्या विदारक घटनेचा, काळाचा, पर्वाचा संदर्भ घेते, तेव्हा लोकांच्या मनात ती जागवत असलेली भावना ही त्या ऐतिहासिक घटनेच्या, काळाच्या, पर्वाच्या विदारकतेशी सुसंगत असायला हवी असं माझं वैयक्तिक मत आहे. 

हॅालोकॅास्ट हे इतिहासातलं एक भयानक पर्व आहे, पण ते एका व्यक्तीच्या पुढाकाराने आणि मर्यादीत काळात घडलेलं आहे. याउलट अमेरिकेच्या इतिहासात कृष्णवर्णीयांवर झालेले अत्याचार हे पिढ्यानपिढ्या सुरु राहिलेले, आणि आजही अंशत: टिकून राहिलेले आहेत. वर्णद्वेषातला आणखी भयानक भाग आहे तो त्याचं एका व्यक्तीने, एका हेतूने प्रेरीत नसणं. वरकरणी सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या माणसांनी केवळ आपल्या कातडीच्या रंगाच्या जोरावर केलेले अनन्वित अत्याचार हे अमेरिकेच्या इतिहासातलं रक्तरंजित प्रकरण आहे. यातल्या एका पानाचा आधार घेत त्याची वर्तमानाशी सांगड घालणारी कृष्णवर्णीय लेखक पर्सीवल एवरेट यांची कादंबरी ‘द ट्रीज’ हीदेखील विनोदाचा वापर करते. पण ‘लाईफ इज ब्युटीफूल’प्रमाणे हा विनोद मला खटकत नाही, कारण या विनोदाला धार आहे. जे झालं त्यातली हतबलता व्यक्त करुन ही थांबत नाही, तर त्याविरोधातला संताप या कादंबरीतून व्यक्त होतो. 

‘द ट्रीज’ला विशिष्ट वर्गवारीत टाकणं सोपं नाही. ‘हॅारर कॅामेडी’चं लेबल तिला लावता येईलच, पण ती त्या लेबलाला पुरुन उरते. रहस्यकथा, गुन्हेगारकथा, पुलिस प्रोसिजरल, या साहित्यप्रकारांशीही तिचं साधर्म्य आहे, पण तिच्यातून व्यक्त होणारा आकांत हा यातल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराच्या पलीकडे जाणारा आहे. तिच्यात आपल्याला अस्वस्थ करण्याची क्षमता आहे. कथानकाची मांडणी, ही कोड्याची उकल शोधणाऱ्या कादंबरीसारखी आहे, पण हे कोडं ‘गुन्हेगार कोण?’ या पद्धतीचं नाही, तर सामाजिक नैतिकतेचा संदर्भ या रहस्याला आहे. अत्याचार करणारे आणि तो सहन करणारे, सूड आणि न्याय, समाजरचनेतली उतरंड आणि तिचा वर्णीय राजकारणाशी असलेला संबंध, असे अनेक घटक पर्सीवल एवरेट आपल्या कथनामधून हाताळतात. आपण जसे वाचत जातो तसं या कथनाचं उपहासात्मक रुप आपल्यापुढे उलगडत जातं. सोशल सटायर असणारी एक अतिशय प्रभावी आणि वाचनीय कादंबरी त्यातून आकाराला येते. 

बुकरसाठी निवडलेल्या कादंबऱ्या या अपवाद वगळता कलात्मकतेच्या नादात कंटाळवाण्या होणाऱ्या असतात, असा माझा अनुभव आहे. ‘द ट्रीज’ अजिबातच तशी नाही. साहित्यशैलीतली ही लवचिकता आपल्या साहित्यकृतींमध्ये आणणं आणि कोणत्याही विशिष्ट साहित्यप्रकाराच्या लेबलाखाली न अडकणं, हा पर्सीवल एवरेट यांच्या लिखाणाचा एक विशेष म्हणावा लागेल. त्याबरोबरच कथेपेक्षा रचनेला, रचनेपेक्षा आशयाला आणि आशयापेक्षा विधानांना येणारं महत्त्व हादेखील. त्यामुळेच ओघवतं लिखाण असूनही मुख्य धारेतला ठराविक छापाचं लेखन शोधणारा वाचक, त्यांच्यापर्यंत अजून म्हणावा तसा पोचू शकलेला नाही. ‘इरेजर’, ‘टेलिफोन’, ‘वॅाटरशेड, ‘पर्सीवल एवरेट बाय वर्जिल रसेल : अ नॅाव्हेल’ अशा अनेक कादंबऱ्या साहित्यिक वर्तुळात गाजून, आणि रचनाबंधातलं नावीन्य वेळोवेळी सिद्ध करुनही अपल्याकडे हे नाव माहीत नसलेल्यांची संख्या मोठी असावी.

‘द ट्रीज’ वाचायला घेताना आणि घेतल्यावरही मला दुसरी एक कादंबरी, आणि तिच्यावर आधारीत मिनिसिरीज आठवत होती. ही कादंबरी म्हणजे मॅट रफ लिखित ‘लवक्राफ्ट कन्ट्री’. एच पी लवक्राफ्ट या प्रसिद्ध भयकथालेखकाच्या साहित्याचा आधार घेणारी ही कादंबरी अलीकडच्या काळात खूपच गाजली. गंमत म्हणजे स्वत: लवक्राफ्टवर, तो वर्णद्वेषी असल्याचा आणि हा द्वेष आपल्या लेखनातून तो सूचक स्वरुपात कागदावरही उतरवत असल्याचा आरोप झालेला आहे, पण मॅट रफने मात्र लवक्राफ्टच्या भयशैलीचा वापर टिकवून धरत कथा मांडलीय ती कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचारांचीच. या कादंबरीतही लवक्राफ्टीयन राक्षसांना जागा आहे, मात्र त्या राक्षसांना लाजवणारा मनुष्यप्राणीच इथला खरा व्हिलन आहे. 1950 च्या दशकात घडणारी ही कादंबरी ‘द ट्रीज’प्रमाणे विनोदी नाही, तर सरळच भयकादंबरी या वर्गात मोडणारी आहे. तपशीलातही दोन्ही कादंबऱ्या एकमेकांपेक्षा अगदीच वेगळ्या आहेत. मात्र दोघांमधून पुढे नेलेलं माणसाने माणसावर केलेल्या अत्याचाराचं सूत्र एकसारखं आहे. याबरोबरच आणखी एक धागा ‘द ट्रीज’ आणि ‘लवक्राफ्ट कन्ट्री’वर आधारीत मालिका, यांमध्ये दिसतो, आणि तो म्हणजे 1955 मध्ये घडलेल्या एमेट टिल या 14 वर्षांच्या कृष्णवर्णीय मुलाच्या हत्येचा दोन्ही कृतींमध्ये आलेला संदर्भ. 

एमेट टिल

एमेट टिल शिकागोमध्ये राहत असे. 1955 च्या ऑगस्टमध्ये तो मिसिसिपी राज्यातल्या ‘मनी’ या गावी आला होता, तिथे राहणाऱ्या मोझेस राईट या आपल्या काकांकडे. कॅरोलीन ब्रायन्ट ही गोरी तरुणी तिच्या दुकानात एकटीच असताना तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप एमेटवर केला गेला आणि त्याचा वचपा काढण्यासाठी कॅरोलीनचा नवरा रॅाय ब्रायन्ट आणि त्याचा सावत्र भाऊ जॅान विलम यांनी एमेटचं अपहरण केलं. पुष्कळ मारहाण करुन एमेटची हत्या करण्यात आली आणि जवळून वाहणाऱ्या टॅलाहाची नदीत त्याचा मृतदेह टाकून देण्यात आला. एमेट टिलच्या हत्येचे देशभर पडसाद उमटले आणि मरणोत्तर तो कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्क चळवळीचं प्रतीक बनला. पण त्याच्या मारेकऱ्यांवर खटला चालूनही त्यांना शिक्षा झाली नाही. एका गुन्ह्यासाठी दोनदा खटला चालवता येत नाही असा कायदा असल्याने, रॅाय आणि जॅान यांनी आपणच ही हत्या केल्याचं पुढे लुक मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगूनही त्याचा काही फायदा झाला नाही. 2007 मध्ये स्वत: कॅरोलीननेही आपण त्यावेळी खोटं बोललो, आणि एमेटने कोणतंही गैरवर्तन केलं नव्हतं, हे मान्य केलं. एमेट टिलची हत्या ही अमेरिकेच्या इतिहासातली एक गडद नोंद आहे जिचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव साऱ्या देशावर पडला आहे. 1970 पूर्वी घडलेल्या गुन्ह्यांचे बंद तपास पुन्हा सुरु करण्याची मुभा देणाऱ्या कायद्याला एमेट टिलचं नाव देण्यात आलंय. माहितीपट, गाणी, साहित्य, या सगळ्यात एमेटने हजेरी लावलेली आहे. मेमी टिल, या एमेटच्या आईने त्याच्या मृत्यूनंतर नागरी हक्क चळवळीसाठी आयुष्य समर्पित केलं. तिच्या आयुष्यावर आधारीत असलेला चित्रपट ‘टिल’ लवकरच पडद्यावर येतो आहे. 

‘लवक्राफ्ट कन्ट्री’ चित्रमालिकेमधला एमेट टिलचा संदर्भ लहानसा पण महत्त्वाचा आहे. एमेटला ‘बोबो’ म्हणत आणि मालिकेत तो भेटतो याच नावाने. कथेतलं महत्त्वाचं पात्र असणाऱ्या डायना या लहान मुलीच्या मित्रांमधला तो एक असतो. मालिकेच्या तिसऱ्या भागात आपल्याला हा बोबो प्लॅंचेट खेळणाऱ्या मुलांमध्ये दिसतो. ‘माझी ट्रिप छान होईल का?’ असा प्रश्न तो प्लॅंचेटवर विचारतो, ज्याचं ‘नाही’ असं उत्तर येतं. त्या क्षणी आपल्याला हे लक्षात येत नाही, पण त्याला मिळालेलं ‘नाही’ हे उत्तर भविष्यवेधी आहे. प्रश्नातल्या ट्रिपला संदर्भ आहे तो एमेटच्या अखेरच्या प्रवासाचा, जिथून तो परतच येणार नाही. कथानकात पुढे एमेटचा नावानिशी उल्लेख येतो, जिथे त्याच्या हत्येबद्दलही आपल्याला कळतं. हाच एमेट आपल्याला ‘द ट्रीज’मध्ये भेटतो तो एका वेगळ्या रुपात. या खेपेला त्याच्या हत्येचा बदला घेणाऱ्या एका नव्या सूडसत्राची सुरुवात होणार असते. 

‘द ट्रीज’मधे येणाऱ्या भय-गुन्हेगारी मिश्रीत वातावरणाला छेद देणारा एक शब्द पुस्तकाच्या सुरुवातीलाच येतो, आणि तो म्हणजे ‘राईज’. पहिल्या प्रकरणाआधी एका स्वतंत्र पानावर जाड टायपात तो छापण्यात आलाय. इथे तो का आहे याचं स्पष्टीकरण आपल्याला लगेच मिळत नाही, पण आपण त्याची मनाशी नोंद मात्र ठेवतो. या शब्दाचं महत्व पुढे वाढत जाणार असतं. जर तुम्ही या लेखकाचं काहीच आधी वाचलं नसेल, तर हा शब्द तुमच्यासाठी एखाद्या खुणेसारखा आहे. जे वरवर दिसतंय त्यापलीकडे या कादंबरीतल्या विचारांचा विस्तार संभवतो, याची जाणीव करुन देणारा. 

कादंबरी बरीचशी घडते, ती टिलच्या हत्येसाठी गाजलेल्या ‘मनी’ या गावात. बरीचशी अशासाठी, की घटनाचक्राला सुरुवात जरी गावात झाली, तरी एखाद्या वणव्यासारखी ही आग पसरत जाते आणि हा भडका कुठे कसा थांबेल याचा आपण अंदाज करु शकत नाही. सुरुवात होते ती थोडक्यात, फक्त दोन खुनांपासून. हे दोन्ही खून गोऱ्यांचे असतात, आणि तेदेखील दुहेरी. दुहेरी म्हणजे दरवेळी गोऱ्या व्यक्तीच्या प्रेताबरोबर आणखी एक प्रेत सापडतं, कृष्णवर्णीय व्यक्तीचं. या व्यक्तीला चिकार मारहाण झालेली दिसते, पण तीदेखील मृतावस्थेत असल्याने तिचा या गुन्ह्यात नक्की काय आणि कसा सहभाग होता हे नीटसं कळू शकत नाही. पहिल्या खुनानंतर या व्यक्तीचं प्रेत नाहीसं होतं, ते थेट दुसऱ्या खुनाच्या जागी उगवतं. आणखी एक चमत्कारीक गोष्ट म्हणजे दोन्ही खुनांच्या जागी जमलेलं रक्ताचं मोठं थारोळं. या रक्तस्त्रावाला कारणीभूत असणारी जखम असते गोऱ्यांच्या शरीरातले अंडकोश फाडून घेतल्याची. हे अंडकोश सापडतात ते त्या रहस्यमय कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मुठीतच. 


हेही वाचा : जागतिक युद्धपटांवरील 14 लेख


 गावचा शेरीफ रेड जेटी या खुनांनी हैराण होतो. आपल्या हाताखालचे दोन मठ्ठ डेप्युटी डेलरॅाय डिगबी आणि ब्रॅडन ब्रेडी या दोघांना तो कामाला लावतो, पण हा तपास त्यांच्या ‘बस की बात’च नसते. दरम्यान गायब झालेल्या प्रेताचा तपास करण्यासाठी एड मॅार्गन आणि जिम डेव्हीस हे दोन कृष्णवर्णीय डिटेक्टीव एमबीआय (मिसिसिपी ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन) मधून हजर होतात, आणि त्यांच्या मागोमाग एफबीआयची स्पेशल एजन्ट हर्बर्टा हिंड हीदेखील मनीमध्ये दाखल होते. लवकरच लक्षात येतं की, नाहीसं होणारं प्रेत हे 1955 मध्ये मारल्या गेलेल्या एमेट टिलचं आहे, आणि झालेल्या दोन हत्या या त्याच्या मारेकऱ्यांच्या वंशजांच्या आहेत. आता कोणालाच हा प्रकार काय आहे ते कळेनासं होतं. खून माणसांनी केलेत की त्यात अतिमानवी शक्तींचा हात आहे? आणि असला, तर अटक कोणाला करायची? बरं झाले प्रकार थांबत तर नाहीतच, वर आता देशात इतरत्रही असे जुळे खून घडायला लागतात. हे कोण करतंय? एखादी गुप्त संघटना यात कार्यरत आहे, का खरोखरच अन्यायाने मारलेले जीव त्यांच्या मृत्यूचा जाब मागायला पुन्हा अवतरले आहेत?

‘द ट्रीज’चा हा कथाविषय ऐकून कदाचित यात विनोदी काय असू शकेल याचा अंदाज यायचा नाही. अत्यंत गंभीर घटनाचक्र, वर्णद्वेषासारखा मुद्दा, आणि गुन्ह्याचं हे चमत्कारीक रुप, यात विनोद तयार व्हायला जागाच कुठे आहे! तर हा विनोद प्रामुख्याने तयार होतो तो ॲब्सर्डिटीमधून. लेखकाची नजर एकूण व्यवस्थेतल्या विसंगती टिपणारी आहे. काही वेळा असं वाटतं की सुशिक्षित भासणाऱ्या समाजाला इतकी काळी बाजू असेल हाच त्याच्या लेखी एक मोठा विनोद आहे. हा विनोद हसवणारा नाही, तर आपल्याला हादरवून सोडणारा आहे. एकामागून एक कथेत सामील होणारी पात्र, त्यांचं व्यक्तीचित्रण आणि संभाषण, यातूनही बरेचदा विनोद तयार होतो. शेवटाकडे तर राष्ट्राध्यक्ष ट्रंपचं भयानक विनोदी भाषणही आपण ऐकतो. इथल्या पात्रांचा वैयक्तिक विक्षिप्तपणा तसंच प्रेत गायब होण्याजोग्या घटनांची पुनरावृत्ती हेदेखील फार्सीकल मांडणीची आठवण करुन देतात. या विनोदाच्या पार्श्वभूमीवर कथेतला गंभीर आशयाचा धागा हा बळकट होत जातो. तो टिपेला पोचतो, तो आपल्यापुढे निरपराध बळींच्या हत्यांचा लेखाजोखाच सादर केला जातो त्या सुमाराला. 

‘द बिलीव्हर’ मासिकाने पर्सीवल एवरेट यांना मुलाखतीदरम्यान विचारलं होतं, की ‘तुमच्या लिखाणात संशोधनाचा भाग मोठा असतो. द ट्रीजसाठी केलेल्या संशोधनात तुम्हाला धक्कादायक वाटलेला काही भाग होता का?’ यावर एवरेट म्हणाले की, ‘या हत्यांची केवळ संख्यादेखील धक्कादायक होती, आणि नव्हतीही. कदाचित त्यामुळेच मी कथानकाची अशा पद्धतीने मांडणी करत गेलो.’ 

हे सूत्र आपल्याला या कादंबरीत जागोजागी दिसतं. कृष्णवर्णीयांचा प्रश्न नागरी हक्क चळवळीशी जोडलेला असला, तरी ‘मिसिसिपी बर्निंग’ चित्रपटाप्रमाणे इथे त्यावर भर दिला जात नाही, किंवा ‘ट्वेल्व इयर्स अ स्लेव’प्रमाणे गुलामीचा संदर्भ यात येत नाही, तर या हत्यांकडे एक प्रकारच्या हॅालोकॅास्टच्या स्वरुपातच पाहिलं जातं. कादंबरीत मामा झी, हे एका 105 वर्षांच्या कृष्णवर्णीय स्त्रीचं पात्र आहे. या पात्राने 1913 सालानंतर झालेल्या हत्यांची स्वत:कडे नोंदच ठेवलेली आहे. 1913 हे या पात्राचं जन्मवर्ष आणि याच वर्षी असलेली पहिलीच नोंद आहे ती तिच्या पित्याच्या हत्येची. सुरुवातीच्या काळात या हत्या कृष्णवर्णीयांच्याच आहेत, पण पुढे गोऱ्या समाजाला धोका वाटणारे इतर वंशही (उदा. आशियाई) यात येऊन मिसळतात. कादंबरीतलं एक प्रकरण तर निव्वळ या नावांची यादीच आपल्यापुढे मांडतं. पानांमागून पानं ही नावं समोर पाहताना आपल्याला या वर्षानुवर्ष चाललेल्या हत्याकांडाची भयानकता वेगळ्या पातळीवर जाणवते. या प्रकरणात त्या नावांना जोडून नाट्यपूर्ण निवेदन येत नाही, किंवा कसली वातावरणनिर्मिती होत नाही. काहीशा अलिप्तपणे पानावर उमटलेली ही यादी अपल्याला या भयानक वास्तवाला सामोरं जायला लावते. 

ज्यांनी वॅाशिंग्टन डीसी मधलं व्हिएतनाम वॅार मेमोरिअल पाहिलंय, त्यांना अशा यादीची ताकद लक्षात येईल. स्मृती जागृत ठेवण्यासाठी चित्र वा शिल्प असण्यापेक्षा प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख अधिक परिणामकारक आहे. इतिहास केवळ पुस्तकाच्या पानांपुरता नसून तो प्रत्यक्ष घडला, हे सांगणारी ती खूण आहे. व्हिएतनाम युद्धात प्राण गमावलेले एका परीने अधिक सुदैवी, त्यांचे मित्र, नातेवाईक त्यांच्या नावासमोर उभं राहून आपल्या स्मृतींना उजाळा देऊ शकतात. मामा झीकडली यादी आहे, ती व्यवस्थेने विस्मृतीत टाकलेल्यांची. त्यांच्याबद्दल जमेल ती माहिती गोळा करुन त्यांच्या गत अस्तित्वाची खूण शिल्लक ठेवण्याचा तिचा प्रयत्न आहे. तिच्या शोधमोहिमेत सापडलेल्या प्रत्येक मृतदेहाचं नाव तिला कळू शकलेलं नाहीत. काहींची नोंद नुसतीच ‘अननोन मेल’ अशी आहे. 

नावांची यादी तयार करण्यासाठी मदत करणारा तज्ज्ञ मामा झीला म्हणतो की, मृताच्या नावाऐवजी ‘अननोन मेल’ लिहिणं अवघड वाटतं. यावर तिने दिलेलं उत्तर लक्षात राहण्यासारखं आहे. ती म्हणते, “अननोन मेल इज अ नेम. इन अ वे, इट्स मोर ऑफ अ नेम दॅन एनी ऑफ द अदर्स. अ लिटल मोर दॅन लाईफ वॅाज टेकन फ्रॅाम देम.” या अनोळखी देहांकडून नुसतं त्यांचं आयुष्यच हिसकावून घेतलेलं नाही, तर त्यांची ओळखही हिरावून घेतली गेलीय. जर अकाली मारल्या गेलेल्यांच्या दुर्दैवाचा हिशेबच करायचा, तर मामा झीच्या लेखी, आणि पर्सीवल एवरेट यांच्या लेखीही, ही बेवारशी प्रेतं थोडी अधिकच दुर्दैवी आहेत. 

‘द ट्रीज’चा रचनाबंध वरवर रहस्यकथेसारखा वाटू शकतो, किंबहुना तसा तो आहेच. सुरुवातीला हे प्रमाण अधिक आहे, कारण आपण मोजकी पात्र आणि स्थळं, यांवर लक्ष केंद्रीत करतो. पण मूळातली एमेट टिलची हत्या हे जसं एका भूकंपाचं केंद्र होतं, आणि पुढे त्याचा परीघ विस्तारत गेला, तसाच या कादंबरीचा परीघही ‘मनी’ गावाला केंद्रस्थानी ठेवून पुढे विस्तारत जातो. हे जसं होतं, तशी ती मूळ रचनाबंधाहून दूर जाते. ठळक कारणमीमांसा, कथानकाची सलगता, सोपी स्पष्टीकरणं, यांमध्ये ‘द ट्रीज’ला फार रस नाही. कारण पुढल्या भागात घटनांचं महत्त्व कमी होत संकल्पनेला अधिक महत्त्व येतं. कथानक काही प्रमाणात तुटक होतं. सूचकता तर्काधारीत मांडणीपेक्षा अधिक महत्त्वाची ठरते. यामुळे कादंबरीची पकड सैल होते का? मला तसं वाटत नाही. इथे जे होतं तो अपघात नाही, तर ही काळजीपूर्वक आखलेली योजना आहे. कादंबरीला असलेला शोध केवळ एका व्यक्तीचा नाही, तर ऐतिहासिक तथ्याचा आहे. आणि हा शोध ती आपल्या पद्धतीने पूर्ण करुन दाखवते. 

जागतिक दर्जाचं साहित्य कोणाला म्हणावं, तर जे आपल्या प्रांतीय बांधिलकीला शाबूत ठेवूनही जगभरात कोणाशीही बोलू शकेल. त्यांच्या संवेदनांशी जुळवून घेऊ शकेल, त्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकेल, वा त्यांच्या दु:खावर फुंकर घालू शकेल. या दृष्टीकोनातून पाहायचं, तर ‘द ट्रीज’ ही कादंबरी जागतिक साहित्याचा एक अस्खलित नमुना आहे. अत्याचाराचे नाहक बळी गेलेल्या कोणत्याही देशाशी, समूहाशी, व्यक्तीशी ती बोलू शकते. आपला देशही त्याला अपवाद नाही, हे मी वेगळं सांगायला नको.

- गणेश मतकरी
ganesh.matkari@gmail.com

(लेखक, मराठीतील कथाकार व चित्रपट समीक्षक आहेत.)


 

Tags: The Trees Percival Everett Fiction Mystery Horror Crime Race Literary Fiction Historical Fiction Mystery Thriller Thriller Contemporary Booker 2022 Booker Nomination Load More Tags

Add Comment