रणजी क्रिकेट स्पर्धेत 'काश्मीर विलो' तळपली!

जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाचा पहिला रणजी करंडक विजय

सर्वांचे लक्ष सध्या सुरू असलेल्या क्रिकेटच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेकडे लागले असताना, त्या खेळातच भारताच्या रणजी करंडक या मानाच्या स्पर्धेचे विजेतेपद जम्मू-काश्मीरने मिळवले आहे. तेही बलाढ्य कर्नाटक संघाच्या घरच्याच मैदानावर पराभव करून! पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवून तिच्या जोरावर त्यांनी अंतिम सामना जिंकला. यातही विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत ते प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले होते. या आधी तीन वेळा त्यांनी या स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश मिळवला होता, पण त्यांना उपान्त्य फेरीही गाठता आली नव्हती. एकदा गेल्या वर्षी तर उपान्त्यपूर्व सामन्यात ते केवळ एका धावेच्या फरकाने पराभूत झाले होते. त्यामुळेच त्यांचे हे यश लक्षणीय ठरते. या विजयाने त्यांचे दीर्घकाळचे स्वप्न पुरे झाले. त्यामुळेच पारस डोग्राने आपल्या सहकाऱ्यांसमवेत हा करंडक उंचावला तेव्हा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लाही खेळाडूचे कौतुक करण्यासाठी तेथे उपस्थित होते.

रणजी करंडक स्पर्धेत जम्मू-काश्मीरने पदार्पण केले ते 1959-60 या हंगामात. पण त्यानंतर बरीच वर्षे त्यांना लिंबूटिंबूच समजले जात होते कारण ते जिद्दीने प्रयत्न करत असले, तरी प्रगती होत नव्हती. पण प्रयत्नांचे फळ कधी ना कधी मिळतेच, असे म्हणतात. तसेच झाले. 2012-13 हंगामापासून त्यांच्यात चांगलीच सुधारणा होत आहे. त्यानंतर 2013-14, 2019-20 आणि 2024-25 या हंगामांमध्ये त्यांनी उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. यंदा मात्र त्यांनी कोठेही कच न खाता बाद फेरीतील प्रत्येक सामना जिंकला. रणजी करंडक स्पर्धेत गेल्या दशकात मुंबई, दिल्ली, हरयाणा, कर्नाटक, इ. पारंपरिक विजेत्यांपेक्षा अन्य संघ करंडक जिंकत आहेत. विदर्भ, मध्य प्रदेश, सौराष्ट्र यांच्यानंतर आता जम्मू-काश्मीर संघही विजेता बनला आहे. गेल्यावर्षी केरळ संघही उपविजेता होता. तर उत्तराखंडनेही बाद फेरीत प्रवेश मिळवला होता. खेळाच्या बाबतीत आता हलके हलके अशा मागे राहिलेल्या संघांचा दर्जाही उंचावत आहे, ही बाब समाधानकारकच आहे. कारण आता कुणाची मक्तेदारी चालणार नाही, असे चित्र दिसते.

काश्मीर विलो या झाडापासून बनणाऱ्या क्रिकेट बॅट जगभरात प्रसिद्ध आहेत. देशातीलच नव्हे, तर परदेशातील अनेक नामांकित क्रिकेटपटूही या बॅटचा वापर करतात. मात्र या बॅट ज्या जम्मू-काश्मीरमध्ये बनते, त्या भूमीतच क्रिकेटला फारसा उठाव नव्हता. सततचा दहशतवाद, सीमेवरील कुरबुरी आणि भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या समाजात क्रीडा नाही म्हटले तरी उपेक्षितच राहिली. खेळाडूंना दर्जेदार मैदाने, नियमित प्रशिक्षण, योग्य किट आणि खेळाडूंचे कौशल्य विकसित करणाऱ्या स्पर्धा यांचा अभाव होता. अशा प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने उभा राहिलेला हा संघ खरंच कौतुकास पात्र आहे. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून खेळाडू, राज्य क्रिकेट असोसिएशन, निवड समिती, तसेच मार्गदर्शक म्हणून लाभलेले इरफान पठाण आणि प्रशिक्षक अजय शर्मा यांच्या परिश्रमांनी या संघाला आकार दिला. जम्मू आणि काश्मीर या दोन्ही विभागांचे प्रतिनिधित्व या संघात आहे. खऱ्या अर्थाने टीमवर्क जपत हा संघ घडला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दीर्घकाळ अस्थैर्य होते त्यामुळे तरुण खेळाडूंनाही त्याचे परिणाम सोसावे लागले. त्यांना केवळ आश्वासने दिली जात होती, पण शेवटी ती मृगजळच ठरत होती. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या संघाची सूत्रे मिथुन मन्हास यांच्याकडे 2013 मध्ये सोपविली, (सध्या ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत.) तेव्हापासून खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाची प्रगती होत गेली आणि जय शहा हे जनरल सेक्रेटरी असताना तर या संघाला चांगलाच आधार मिळाला. आता स्पर्धेच्या तयारीकरता साधारण 30 चांगल्या खेळाडूंची निवड करण्यात येऊन त्यांच्याकडे खास लक्ष पुरवले जाते. शिवाय एखादा खेळाडू प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत नसेल आणि तो 23 वर्षांखालील असेल तर त्याला त्या म्हणजे 23 वर्षांखालील विभागात पाठवून सामने खेळून सुधारण्याची संधी दिली जाते. या प्रकारे प्रत्येक खेळाडूकडे चांगले लक्ष पुरवले जाते. त्याचा चांगलाच फायदा दिसून येत आहे. कारण आता तर ते मानाच्या रणजी करंडक विजेते बनले आहेत. त्यांच्या शुभम् पुंडर याला सामन्यचा मानकरी, तर अकिब नबी दार याला स्पर्धेचा मानकरी म्हणून गौरवण्यात आले.

या हंगामात सुरुवातीलाच जम्मू-काश्मीर संघाला मुंबईकडून 35 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पण खचून न जाता, त्यापासून ते धडा शिकले. नंतरच्या सामन्यात त्यांनी राजस्थानवर डावाने विजय मिळवला आणि आपण काहीही करू शकतो हा विश्वास त्यांच्यात आला. पुढचे तीनही सामने अनिर्णित राहिले आणि ड गटात दुसरे स्थान मिळवून ते उपान्त्यपूर्व फेरीत दाखल झाले. तेथे माजी विजेत्या मध्य प्रदेशचा पराभव केल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला. परिणामी त्यांनी उपान्त्य फेरीत बंगाल संघावरही मात केली. बंगालकडे महमद शमीसारखा अव्वल गोलंदाज असतानाही जम्मू-काश्मीर संघाने हे यश मिळवले आणि ते अंतिम फेरीत दाखल झाले. आणि जणू काही आपली सर्वोत्तम कामगिरी त्यांनी अंतिम सामन्यासाठीच राखून ठेवली होती असे वाटावे असा खेळ त्यांनी या सामन्यात केला. या सामन्यासाठी दुसऱ्या डावात शतक करणाऱ्या कामरान इक्बालला तर सामन्याच्या आदल्याच दिवशी बोलावून घ्यावे लागले होते. त्याने चांगले पदलालित्य दाखवले हा डावपेचाचा भाग होता की त्याचा आत्मविश्वास होता या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला की, “दोन्हीही. कारण चेंडू नवा होता आणि तो सामन्याचा पहिलाच दिवस होता. अजय शर्मा सर तर कोणतीही गोष्ट गंभीरपणेच घेतात त्यामुळे आम्हीही तसेच खेळतो. पारस आल्यामुळे आम्हाला चांगले स्थैर्य आले कारण त्याचा अनुभव आणि शांत स्वभाव. दुसऱ्या डावात 160 धावा करणारा कामरान इक्बाल आणि नाबाद 101 धावा करणाऱ्या साहिल लोथ्रालाही काहीजण जखमी झाल्याने संधी मिळाली आणि त्यांनी त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. यंदा उत्तराखंड सारख्या संघांनीही चांगली कामगिरी केली.

याबरोबरच प्रशिक्षक अजय शर्मा यांचाही संघाला मोठा उपयोग झाला. ते सतत खेळाडूंकडे नजर ठेवतातच पण त्यांचे मनोधैर्य कसे उंचावलेले राहील याची खबरदारी घेतात. त्यांना त्यांच्या उणिवा दाखवून सुधारणा करून घेतात, त्यांच्याकडून मेहनत करून घेतात. शर्मा यांना क्रिकेटमधील तीनही प्रकारच्या जागतिक स्पर्धांचा अनुभव आहे आणि त्याचा खेळाडूंना लाभमिळेल या दृष्टीने ते प्रशिक्षण देतात. हिमाचल प्रदेशकडून खेळणाऱ्या पारस डोग्राने जम्मू-काश्मीरकडून खेळायचे ठरवले. तो कर्णधारपदी आला. त्याला येथे चांगला वाव मिळाला आणि असोसिएशनचे संपूर्ण सहकार्यही लाभले. तो या खेळाडूंत असा मिसळून गेला, की तो दुसरीकडून आल्याची भावनाच नाहीशी झाली. शर्मा आणिा डोग्रा कायम विचार विनिमय करत असतात. त्यामुळे खेळाडूंना जबाबदारीची जाणीव होते आणि ते खेळात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात असतात. अशा खेळाडूंबरोबर खेळण्याचा आनंद वेगळाच आहे असे पारसने सांगितले.

पारस पुढे म्हणाला, “गेल्या वर्षी उपान्त्यपूर्व फेरीत आम्ही केवळ एका धावेमुळे हरलो होतो. त्या एका धावेनेच आम्हाला बरेच काही शिकवले. त्यामुळे त्यावेळच्या चुकांची पुनरावृत्ती करायची नाही असा निश्चय आम्ही केला होता. अखेरपर्यंत प्रयत्न करायला हवेत हा धडा मिळाला होता त्यामुळे कधीच बेसावध राहायचे नाही आणि प्रत्येकाने शंभर टक्के प्रयत्न करायला हवेत हे आम्ही शिकलो होतो. नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी घ्यायची हा निर्णय अजय शर्मा यांच्याशी बोलणे झाल्यावर घेतला होता. कारण तेव्हा खेळपट्टी अगदी शुष्क दिसत होती. त्यामुळे नंतर ती फिरकी गोलंदाजांना मदत देईल अशी शक्यता दिसत होती.”


हेही वाचा : 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन' सह अनुभवलेला काश्मीर (डॉ. ऐश्वर्या रेवडकर)


प्रत्यक्षात खेळपट्टी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ठणठणीत राहिली. मात्र ठरवल्याप्रमाणे फलंदाजी घेतल्यावर त्यांनी टिच्चून खेळ केला आणि तिसऱ्या दिवशी जवळजवळ उपाहारापर्यंत फलंदाजी करून 584 धावांचा डोंगर रचला. कर्नाटकला मात्र 293 धावांची मजलच गाठता आली आणि जम्मू-काश्मीरला 281 धावांची मोठी आघाडी मिळाली. सामन्याचा दीड दिवसच उरला असल्याने त्यांनी दुसऱ्या डावात फलंदाजी करून अखेरच्या पाचव्या दिवशी उपाहारानंतर 4 बाद 342 अशी मजल मारली होती. तेव्हा सामन्याचा निकाल लागणे शक्य नव्हते म्हणून दोन्ही कर्णधारांनी सामना संपवण्याचा निर्णय घेतला आणि जम्मू-काश्मीर संघाचे स्वप्न पूर्ण झाले.

रणजी स्पर्धेतला यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू या पुरस्काराचा मानकरी अकिब नबी दार या मोसमात चांगलाच बहरात होता. या हंगामात त्याने एकूण 60 गडी बाद केले. त्याने म्हटले, "माझे स्वप्न कायमच रणजी करंडक मिळवण्याचे होते आणि आता मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या कसोशीने केलेल्या प्रयत्नांनी ते साकार झाले आहे. आम्ही एकदिलाने, संघभावनेने प्रयत्न केले. त्याचाही लाभ आम्हाला मिळाला. त्यासाठी आम्हाला दीर्घकाळ परिश्रम करावे लागले. कोणत्याही सामन्यात खेळताना हा महत्त्वाचा, हा कमी महत्त्वाचा असा विचार करत नाही. प्रत्येक सामन्यात सर्वस्व पणाला लावतो. काय होणार याची फिकीर करत नाही. माझा प्रयत्न कायमच योग्य जागी चेंडू टाकण्याचा असतो. निकालाकडे न बघता गोलंदाजी करत राहतो. त्यामुळे माझ्यावर दबाव येत नाही आणि समोरच्या फलंदाजाला बाद कसे करता येईल यादृष्टीने गोलंदाजीकडे संपूर्ण ध्यान देता येते. आम्हाला आधार आणि प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे, विशेष करून जम्मू-काश्मीरच्या लोकांचे मी आभार मानतो. आमच्याकडे खेळाडूंसाठी खास सुविधा नाहीत. तरीही आम्ही समर्पण भावनेने खेळतो," असे नबी म्हणाला.

सामन्याचा मानकरी ठरलेला फलंदाज शुभम पुंडर म्हणाला, "माझा तर विश्वासच बसत नाहीय. पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला तेव्हाच आम्ही ठरवले होते की 500 ते 600 पर्यंत धावा करायच्या. तसे आम्हाला जवळपास करता आले. मात्र धावा करण्याला अधिक महत्त्व न देता खेळपट्टीवर जास्तीत जास्त काळ उभे राहायचे हे मुख्य उद्दिष्ट होते आणि आम्ही त्याप्रमाणे खेळत होतो. कारण सामना पाच दिवसांचा होता. माझ्याबद्दल सांगायचे तर चेंडू नवा असेपर्यंत खेळून काढायचा असे मी ठरवले होते. त्यामुळे शक्यतोवर सरळ बॅटने खेळत होतो. नंतर फिरकी गोलंदाज आल्यावर आक्रमण करायचे असा बेत होता. कारण खेळपट्टीही तशीच दिसत होती. मला फलंदाजी करणे आवडते. त्यात यावर आणि समाद यांची साथ असली की यावरच्या विनोदी स्वभावामुळे मजा येते. तो काहीतरी मजेशीर करतो, त्यामुळे दडपण कमी होते. माझ्यातील कमकुवतपणा म्हणजे उजव्या यष्टीबाहेरील चेंडू मला नीट खेळता येत नाही. त्यावर आता मेहनत घेणार आहे. पुढल्या वर्षी त्यात सुधारणा होईल असा विश्वास आहे. तुम्ही ते बघालच !

कर्नाटकचा कर्णधार देवदत्त पडिक्कल म्हणाला, “आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो याचा अभिमान आहे कारण ते काही सोपे काम नाही. त्यामुळे मला आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे. पण खरे कौतुक जम्मू-काश्मीर संघाचे आहे. त्यांनी आधीच्या सामन्यांत आणि येथेही चांगला खेळ केला. नबीबाबत तर बोलायलाच नको. या मोसमात त्याने 60 बळी मिळवले आहेत. हे काही साधेसुधे काम नाही. तो निष्ठेने प्रयत्न करत राहिला. त्यांचे सर्वच खेळाडू पुढच्या हंगामापर्यंत चांगली प्रगती करतील असे मला खातरीने वाटते.”

या विजयाने जम्मू आणि काश्मीर यांच्यातील दरी कमी होऊन सलोखा निर्माण व्हावा, अशी आशा आहे. कारण त्यांचा संघ सर्वसमावेशक आहे आणि दोन्हीकडे विजयोत्सव साजरा होत आहे.

धावफलकः जम्मू- काश्मीर पहिला डाव 584: कामरान इक्बाल 6, यावर हसन 88, शुभम पुंडीर 121, पारस डोग्रा 70, अब्दुल समाद 61, कन्हैय्या वधवान 70, साहिल लोथ्रा 72, अबीद मुश्ताक 28, अकीब नाब दार 2, युधवीर सिंग 30, सुनील कुमार नाबाद 1, अवांतर 35; विद्याधर पाटील 1 बळी, विजयकुमार व्याशक 1 बर्षे, प्रसिध कृष्णा 5 बळी, श्रेयस गोपाळ 1 बळी, शिखर शेट्टी 1 बळी, एक फलंदाज धावचीत.

कर्नाटक पहिला डाव 293 के. एल. राहुल 13, मयांक अगरवाल नाबाद 160, पडिक्कल 11, करुण नायर 0, रविचंद्रनस्मरान 0, कृतिक कृष्णा 36, विद्याधर पाटील 16, विजयकीमार व्याशक नाबाद 17, शिखर शेट्टी 0, प्रसिध कृष्णा 4; अवांतर 22, नबी 5 बळी, सुनील कुमार 2 बळी, युधवीर सिंग 2 बळी, लोथ्रा 1 बळी.

जम्मू-काश्मीर दुसरा डाव 4 बाद 342, कामरान इक्बाल नाबाद 160, यावर हसन 1, शुभम पुंडीर 4, पारस डोग्रा 15, अब्दुल समाद 32, साहिल लोथ्रा नाबाद 101, अवांतर 28. विजयकुमार व्याशंक 1 बळी, प्रसिध कृष्णा 2 बळी श्रेयस गोपाळ 1 बळी.

या पहिल्यावहिल्या विजयाबद्दल जम्मू-काश्मीर संघाचे अभिनंदन.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)

Tags: क्रिकेट रणजी ट्रॉफी जम्मू-काश्मीर क्रीडा सलोखा उमर अब्दुल्ला नवा विजेता Load More Tags

Add Comment