सामन्यातील चौथा डाव दक्षिण आफ्रिकेला खेळायचा होता. सुदैवाने खेळपट्टी फलंदाजांसाठी काहीशी अनुकूल आहे हे स्टार्क-हेझलवूडने दाखवून दिले होते. या अनुकूल परिस्थितीचा फायदा दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज घेऊ शकतील की नाही, हा प्रश्न होता. मार्करम आणि रिकल्टन मैदानात उतरले. गोलंदाजी स्टार्क आणि हेझलवूड यांनी सुरू केली आणि तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिकल्टन झेलबाद झाला. दक्षिण आफ्रिका एक बाद नऊ.
विजयाचा घास तोंडाशी आला पण विजय चाखता आलाच नाही, असं म्हटलं की क्रिकेटविश्वात कोणालाही हटकून आठवतो तो संघ म्हणजे दक्षिण आफ्रिका! तसे पाहिले तर दक्षिण आफ्रिका झुंजार लढवय्ये आहेत, याबाबत कुणाचेही दुमत होणार नाही. परंतु नेमक्या मोक्याच्या क्षणी ते कच खातात, चोक होतात त्यामुळेच त्यांना क्रिकेट विश्वात ‘चोकर्स’ ही उपाधि जडलेली आहे. मोठ्या स्पर्धांत या संघाची कामगिरी चांगली व्हायला लागली, उपांत्यपूर्व फेरी वगैरे गाठली की ‘हे चोकर्स आहेत’ याचीच चर्चा इतकी होते की आपणही मोठी स्पर्धा जिंकू शकतो हा विश्वास खेळाडूंना आधी वाटत असला तरी डळमळीत होत असेल. परंतु कर्णधार टेंबा बावुमाच्या संघाने हा चोकर्सचा कलंक पुसून काढायला सुरुवात केली आहे. इंग्लंडच्या प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर झालेल्या चुरशीच्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय मिळवला आणि 2024-25 च्या ‘जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद’ स्पर्धेचे विजेतेपद मिळवून आपण चोकर्स नव्हे तर ‘लॉर्ड’ असल्याचे दाखवून दिले.
सध्या टी-20 क्रिकेट लीग्सच्या जमान्यात क्रिकेटच्या कौशल्यापेक्षा मनोरंजन आणि पैसा यांना अधिक महत्त्व आलेले आहे. अनेक खेळाडू कसोटी क्रिकेटचा विचारही करत नाहीत. इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये, भारतात रणजी करंडकामध्ये खेळाडूंना चांगले मानधन आणि विजेत्यांना भरघोस रकमेचे बक्षिस दिले जाते. तरीही अनेक नव्या दर्जेदार खेळाडूंना त्याचे महत्त्व वाटत नाही. खेळाडूंना टी-20 तल्या हाणामारीची सवय झाल्याने कसोटी सामनेही तीन-चार दिवसांतच संपू लागले होते. दोन्ही संघांनी टिच्चून खेळ केला आणि सामना अनिर्णित राहिला हा प्रकार दुर्मिळच होत होता. म्हणूनच आयसीसीने कसोटींसाठी जागतिक करंडक स्पर्धा सुरु केली.
दर दोन वर्षांनी साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेमध्ये त्या दोन वर्षांतल्या प्रत्येक कसोटीत प्रत्येक संघाला अनेक निकषांवर आधारित गुण देण्यात येतात, सर्वात जास्त गुण मिळवणारे दोन संघ अंतिम फेरीत दाखल होतात. 20219-20 मध्ये न्यूझीलंडने तर 2021-23 मध्ये ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते आणि दोन्ही वेळा भारत उपविजेता ठरला होता. 2023-25 च्या सत्रात मात्र 2024 मधल्या बोर्डर – गावस्कर कसोटी मालिकेतल्या दारुण पराभवासोबतच भारताचे या स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले, आणि ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ ओळीने सात कसोटी सामने जिंकून दिमाखात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. ऑस्ट्रेलिया अजिंक्यपद राखण्यासाठी आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या वहिल्या विश्वचषक विजयासाठी निकराने प्रयत्न करणार हे उघड होते.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाऊस नसल्याने खेळपट्टी ठणठणीत होती. परंतु ढगाळ हवा आणि वाहणारे वारे यामुळे कर्णधार बावुमाने हा निर्णय घेतला. या वातावरणाचा फायदा घेणारे कगीसो रबाडा, लुंगी एंगिडी, मार्को यान्सेन हे जलदगती गोलंदाज संघात होतेच. त्यांनी कर्णधाराचा निर्णय अचूक ठरवला. सामन्याच्या सहाव्या षटकातच रबाडाने उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन यांना बाद केले, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या धावा होत्या 16. मार्नुस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव काहीसा सावरला, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 46 असताना यान्सेनने सतराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लाबुशेनला बाद केले. आणि ट्रॅव्हिस हेडचा जम बसण्याआधीच यान्सेनने त्याला 11 धावांवर बाद केले. या घसरगुंडीनंतर स्मिथ आणि वेबस्टरने डाव सावरला आणि धावसंख्या शतकापार नेली. 116 कसोटी सामन्यांचा अनुभव असलेला स्मिथ जबाबदारीने, शांतपणे खेळत होता, त्याच्या फलंदाजीत सावध बचाव आणि आक्रमक फटके यांचे मिश्रण होते. दुसरीकडे वेबस्टर आत्मविश्वासाने आणि तरीही धोका न पत्करता फटकेबाजी करत होता. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मिथ 66 धावांवर झेलबाद झाला. कोणतेही दडपण न घेता वेबस्टर सहजपणे फटके लगावत होता. अॅलेक्स कॅरीने काही काळ त्याला चांगली साथ दिली. पण त्यांची भागीदारी 46 धावांची झाल्यावर केशव महाराजने कॅरीचा त्रिफळा उडवला. त्यानंतर कर्णधार आणि चतुरस्त्र खेळाडू पॅट कमिन्सही लवकर बाद झाला, लगेच पुढच्या 9 धावांत वैयक्तिक 72 धावा करून वेबस्टरही बाद झाला. बाकी फलंदाज केवळ 20 धावांची भर घालून बाद झाले. रबाडाने पाच, यान्सेनने तीन आणि मार्करम आणि महाराज यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 212 धावांवर संपला.
ही धावसंख्या मोठी नव्हती, पण वातावरण गोलंदाजांना अनुकूल असल्याने ऑस्ट्रेलियाच्या जलदगती माऱ्याला तोंड देणे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सोपे जाणार नव्हते. संघाची केवळ एक धाव असताना स्टार्कने मार्करमच्या यष्टी उदध्वस्त केल्या. रिकल्टन आणि मुल्डर यांनी जपून खेळत धावा वाढवल्या. मात्र त्यांचा चांगला जम बसण्यापूर्वीच रिकल्टनचा बळी स्टार्कने मिळवला. नंतर जेमतेम सहा धावा वाढतात तोच कमिन्सने मुल्डरला त्रिफळाचीत केले. दोनच धावांत स्टब्जचा त्रिफळा उडाला. ऑस्ट्रेलियापेक्षाही दक्षिण आफ्रिकेची अवस्था बिकट होत होती.
कर्णधार बावुमा नेटाने खेळत होता. त्याला बेडिंग्टनच्या रूपात विश्वसनीय साथीदार मिळाला आणि या जोडीने हळूहळू धावा वाढवत नेल्या. भागीदारी 64 असताना बावुमा लाबुशेनकडे झेल देऊन बाद झाला. बावुमाने चार चौकार आणि एक षटकार मारले. संपूर्ण सामन्यातील हा एकमेव षटकार ठरला. व्हेरेन्ने-बेडिंग्टन ही जोडी 32 धावांची भर घालून फुटली. कमिन्सच्याच गोलंदाजीवर यष्टीरक्षक कॅरीकडे झेल देऊन व्हेरेन्ने परतला. पुढच्या 12 धावांत चार फलंदाज बाद झाले आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव 138 धावांवर आटोपला. कर्णधार कमिन्सने सहा गडी बाद केले तर स्टार्कने दोन आणि हेझलवूडने एक बळी मिळवला. केशव महाराज धावचीत झाला. ऑस्ट्रेलियाला 74 धावांची आघाडी मिळाली.
पण या बऱ्यापैकी आघाडीचे समाधान दुसऱ्या डावात फार काळ टिकले नाही. संघाची धावसंख्या 28 असताना रबाडाने ख्वाजा (10) आणि ग्रीनला (0) पोठोपाठ बाद केले. रबाडाच्या झंझावातापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज नमत होते. यान्सेन आणि एंगिडीही त्याला चांगली साथ देत होते. लाबुशेन आणि स्मिथ यांनी काही वेळ जबाबदारीने खेळ केला. पण संघाची धावसंख्या 44 असताना लाबुशेन परतला. यान्सेनच्या गोलंदाजीवर त्याचा झेल व्हेरेन्नेने घेतला. चारच धावांनंतर स्मिथला एंगिडीने पायचीत केले. पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणारा वेबस्टरही फार काळ टिकला नाही. हेडही 9 धावांवरच परतला. मुल्डरने त्याचा त्रिफळा उडवला. कर्णधार कमिन्सही केवळ 6 धावांवर त्रिफळाचीत झाला. स्टार्क आणि कॅरी यांनी पडता डाव सावरला. या जोडीने 61 धावांची भर घातली आणि मग कॅरी पायचीत झाला. दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात 8 बाद 144. तिसऱ्या दिवशी स्टार्क-ल्योन जोडीने 4 धावांची नाममात्र भर घातली, आणि ल्योन बाद झाला. आता त्यांचा डाव झटपट संपणार असे वाटत होते, पण खेळपट्टी साथ देऊ लागली आणि गोलंदाजीची धार बोथट झाली. याचाच फायदा घेऊन स्टार्क आणि हेझलवूडने चिवटपणे धावफलक हलता ठेवला आणि दोनशेची मजल पार केली. ही जोडी फोडण्यासाठी बावुमाने चेंडू मार्करमकडे सोपवला आणि त्यानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. मार्करमच्या चेंडूवर महाराजने हेझलवूडचा झेल घेतला. स्टार्क 58 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाला तब्बल 281 धावांची आघाडी मिळाली.
सामन्यातील चौथा डाव दक्षिण आफ्रिकेला खेळायचा होता. सुदैवाने खेळपट्टी फलंदाजांसाठी काहीशी अनुकूल आहे हे स्टार्क-हेझलवूडने दाखवून दिले होते. या अनुकूल परिस्थितीचा फायदा दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज घेऊ शकतील की नाही, हा प्रश्न होता. मार्करम आणि रिकल्टन मैदानात उतरले. गोलंदाजी स्टार्क आणि हेझलवूड यांनी सुरू केली आणि तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिकल्टन झेलबाद झाला. दक्षिण आफ्रिका एक बाद नऊ. मार्करमच्या तेव्हा तीन धावा होत्या. आता त्याच्या साथीला मुल्डर आला दोघेही खंबीरपणे खेळत होते. ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याला दाद देत नव्हते. 17 व्या षटकात धावसंख्या 70 वर असताना स्टार्कने दुसरा बळी मिळवला. मुल्डर लाबुशेनकडे झेल देऊन परतला. दुसरीकडे मार्करम खंबीरपणे उभा होता. कोणत्याच गोलंदाजाला दाद देत नव्हता.
आता त्याच्या जोडीला पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बावुमा आला. या दोघांनी धावांचा ओघ सुरूच ठेवला आणि शतकापार मजल मारली. दरम्यान स्मिथच्या हाताला दुखापत होऊन त्याच्या हातून झेल सुटला आणि बावुमाला जीवदान मिळाले. स्मिथला मैदान सोडून जावे लागले. बावुमा नंतर संयमाने खेळू लागला. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. मात्र धावा घेण्याच्या संधीही सोडल्या नाहीत. त्याचा पाय दुखावला होता आणि पळताना त्रास होत होता. पण तो परत न जाता खेळत राहिला. लक्ष्य हळूहळू दृष्टिपथात येऊ लागले होते. त्याबरोबर त्यांचा निर्धारही बळावत होता. धावा वाढतच होत्या. धावसंख्या दोनशे होण्याआधीच मार्करमने शतक तर बावुमाने अर्धशतक पुरे केले होते. धावसंख्या दोनशेपार झाली, तरी मार्करम-बावुमाने उतावळेपणा केला नाही. तिसऱ्या दिवसअखेर त्यांची धावसंख्या 2 बाद 213 झाली. दक्षिण आफ्रिकेचा विजय आता जवळपास निश्चित होता.
पण चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच बावुमा बाद झाला. स्टब्ज मैदानावर आला. पण तोही फार काळ टिकला नाही. मार्करम मात्र शांतपणे खेळत होता. त्याच्या जोडीला डेव्हिड बेडिंगहॅम आला. ही जोडी संघाला विजयाप्रत नेणार असे वाटू लागले. पण मार्करमचा अखेरपर्यंत मैदानावर राहण्याचा बेत असफल झाला. विजयासाठी केवळ सहा धावा बाकी असताना मोठा टोला मारण्याच्या नादात तो बाद झाला. तो तंबूत परतत असताना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले. शेवटी व्हेरेन्नेने 84 व्या षटकाच्या पााचव्या चेंडूवर विजयी धाव घेतली. दक्षिण आफ्रिकेचे दीर्घकाळचे स्वप्न पुरे झाले. अपेक्षेनुसार मार्करम सामनावीर ठरला.
येत्या 20 जून रोजी सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपासून 2025-27 च्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपदाच्या साखळीला सुरुवात होईल. शुभमन गिलला प्रथमच कसोटी कर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व करायचे आहे, आणि ही कामगिरी फारशी सोपी नाही, हे त्यालाही माहीत आहे. कारण यावेळी भारताच्या चमूत अननुभवी खेळाडूच अधिक आहेत. पण ती पुढची गोष्ट आहे.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)
Tags: ICC WTC ICC-WTC World Test Championship जागतिक कसोटी क्रिकेट दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया भारत शुभमन गिल पॅट कमिन्स टेंबा बावुमा रबाडा एंगिडी Load More Tags
Add Comment