आता या शंकरार्यांना काय म्हणावे?

पोस्टरवर असलेल्या चित्रांतही रामाचे आणि विश्वगुरूचे चित्र पाहिल्यावर कथित भक्ताने देवालाही कसे खुजे करून टाकले आहे, हे दिसतेच आहे.

काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी आमंत्रण नाकारल्यावर त्यांना हिंदूंविरोधी म्हणणे तसे सोपे होते. पण आता साक्षात बहुतेक शंकराचार्यांनीच ‘आपण सोहळ्यात सामील होणार नाही’ असे सांगितले आहे. काहीही म्हटले तरी त्यांना अद्यापही जनमानसात स्थान आणि मानही आहे. त्यामुळे धर्मपीठाच्या प्रमुखांनाच धर्मद्रोही, हिंदुविरोधी म्हणता येत नाही. कारण सध्या धर्माच्याच नावाने सारे राजकारण - खरे तर निवडणूककारण - चालले आहे. या सर्व शंकराचार्यांनीदेखील या इव्हेंटचा संबंध धर्माशी नाही, तर केवळ आगामी लोकसभा निवडणुकीतील मतांशी आहे हे बहुधा ओळखले असावे.

सध्या देशात, नव्हे जगात सगळीकडे चर्चा आहे ती, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीची आणि 22 जानेवारीला तेथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या उत्सवाची. आपल्या देशापुढे आता केवळ हा एकच प्रश्न आहे, असे जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाला पूर्णपणे राजकीय रूप देणाऱ्या सत्तारूढ भाजपने चालवला आहे. आणि तो काही प्रमाणात यशस्वीही होत आहे. तसेच पाहिले, तर नेहमीप्रमाणे भारतीय लोकांची मनोवृत्ती ही बहुतांशी हे मानण्यासाठी तयार असेल. कारण गेली काही दशके आणि विशेषत्वेकरून गेल्या दशकात, सातत्याने त्यांच्या मनावर तेच बिंबवण्यात येत आहे. स्वार्थासाठी अगदी देवालाही वेठीला धरण्याचा हा प्रकार असला, तरी त्याचे हे छुपे रूप श्रद्धाळू लोकांच्या ध्यानात येत नाही वा येऊ दिले जात नाही. हे सारे केवळ आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा आपल्या पक्षाला बहुमत मिळावे आणि त्यामुळे आपली अघोषित एकधिकारशाही कायम राहून आपले महत्त्व आणखीच वाढावे यासाठी आहे, हे उघड आहे, आणि अनेकांना ते ठाऊकही आहे. पण तसे म्हटले तर आपले काय होईल, हा विचारच त्यांना अस्वथ करतो आहे. कारण असे काही स्पष्टपणे बोललो तर ताबडतोब आपल्याला देशद्रोही, धर्मद्रोही ठरवले जाईल अशी भीती त्यांना वाटते.

पण आता एक वेगळे संकट - खरे तर धर्मसंकटच - आयोजक भाजपसमोर उभे ठाकले आहे. कारण या धार्मिक सोहळ्याला धर्मप्रमुख, चारही पीठांचे शंकराचार्य उपस्थित नसणार, त्यांनी तसे जाहीरपणे सांगितले आहे. मंदिराचे बांधकाम अर्धवट असताना अशाप्रकारे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हे याबाबतच्या धर्म, रूढीच्या नियमांना धरून नाही, म्हणूनच अशा अधार्मिक सोहळ्याला आपण तेथे जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन शंकराचार्यांनी स्पष्ट नकार दिला आहे, तर बाकीच्यांनी आपली हरकत नाही असे सांगितले असले, तरी ते स्वतः अयोध्येला जाणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे. शंकराचार्यांचे हिंदू धर्मातील सर्वोच्च स्थान सर्वज्ञात आहे आणि त्यांनीच विरोध केल्याने आयोजकांत नाही म्हटले तरी थोडी चलबिचल नक्कीच झाली असणार. पण काहीही झाले तरी, साक्षात विश्वगुरूचाच हा संकल्प असल्याने तो रहित केला जाण्याची शक्यता दूरान्वयानेही नाही. कारण त्यांनी स्वतःच जागतिक पातळीवरचा हा इव्हेंट योजलेला आहे. प्रश्न एवढाच आहे की, विज्ञान संमेलनात आपल्या परंपरेचा वारंवार उल्लेख करणारे हे धर्मप्रेमी याबाबतची रूढी-परंपरा मात्र का पाळत नाहीयेत? कदाचित बघा, आम्ही कसे सुधारक आहोत, असे दाखवण्याचाही हा प्रयत्न असेल. अर्थात, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, ही बाब वेगळी.

काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी आमंत्रण नाकारल्यावर त्यांना हिंदूंविरोधी म्हणणे तसे सोपे होते. पण आता साक्षात बहुतेक शंकराचार्यांनीच ‘आपण सोहळ्यात सामील होणार नाही’ असे सांगितले आहे. काहीही म्हटले तरी त्यांना अद्यापही जनमानसात स्थान आणि मानही आहे. त्यामुळे धर्मपीठाच्या प्रमुखांनाच धर्मद्रोही, हिंदुविरोधी म्हणता येत नाही. कारण सध्या धर्माच्याच नावाने सारे राजकारण - खरे तर निवडणूककारण - चालले आहे. या सर्व शंकराचार्यांनीदेखील या इव्हेंटचा संबंध धर्माशी नाही, तर केवळ आगामी लोकसभा निवडणुकीतील मतांशी आहे हे बहुधा ओळखले असावे. आणि अशा या अधार्मिक कृत्यात सहभागी व्हायला नकार दिला असावा. खरे तर हे भाजपपुढील धर्मसंकटच म्हणावे लागेल, पण बारा महिने चोवीस तास ‘निवडणूक आणि फक्त निवडणूक’ हाच ज्यांचा एकमेव धर्म आहे, त्यांना नक्कीच तसे वाटण्याची शक्यता नाही. त्यामुळेच असेल, याबाबत इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्यांपैकी कुणाही जबाबदार व्यक्तीने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भले आता त्यांच्यात अलिकडेच सामील झालेला कुणी एकजण, “शंकराचार्यांनी धर्मासाठी काय केले?” असे विचारत असला, तरी त्याचे म्हणणे कुणीही गंभीरपणे घेण्याची शक्यता नाही. कारण तो प्रश्नकर्ता हे आदि शंकराचार्यांबद्दल म्हणाला की चार पीठांवर सध्या विराजमान असलेल्या शंकराचार्यांबद्दल, हे त्यालाही माहीत नसेल. अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यामुळे, त्याचे हसे होईल असे त्याला स्वतःलाही कदाचित जाणवले असले, तरीही कुणीतरी सर्वोच्च पदस्थ यामुळे आपल्यावर नक्कीच खूष होईल, आणि यथावकाश आपली दखल घेतली जाईल, महत्त्व वाढेल आणि कुणी सांगावे, आणखी कोणतेतरी मोठे पद मिळेल अशा समजुतीने किंवा आशेने वा भरवशाने, त्याने हे विधान केलेले असणार. आणि त्यामुळेच तर त्याच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलेच चांगले, असे कोणतीही सूज्ञ व्यक्ती म्हणेल.

आणि या इव्हेंटच्या आयोजकांचे जे अंधभक्त आहेत, ते स्वतः विचार करण्याचे कधीच विसरून गेले आहेत. त्यांना तर शंकराचार्य काय म्हणतात याच्याशी काहीच देणेघेणे असणार नाही. पण जे कुणी खरेखुरे सश्रद्ध धार्मिक आणि धर्माभिमानी असतील, ते मात्र यावर विचार करतील. त्यांना वाटेल की, हा जर खरोखरच धार्मिक सोहळा असेल; तर मग देवाच्या या उत्सवाला एवढे व्यापारी - खरे तर बाजारु - रूप का दिले जात आहे, त्यासाठी देशभर एवढी प्रचंड जाहिरातबाजी का केली जात आहे, त्यावरील अमाप खर्च कोण करत आहे, मुख्य म्हणजे हे सरकारचे काम आहे का? या मोठ्या इव्हेंटला जास्तीत जास्त लोकांनी यावे, म्हणून देशातील भक्तांच्यासाठी - अर्थातच विश्वगुरुंच्या भक्तांसाठी - मोफत रेल्वे प्रवासाची सोयही करून दिली जाणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या भक्तांच्या संख्येत वाढ होईल असा त्यांचा विश्वास असेल. त्यांच्यासाठी हे चांगलेच आहे. पण या साऱ्या खर्चाचा भुर्दंड अखेर - लोकांना भाववाढीच्या रुपाने आणि करदात्यांना वाढीव कर किंवा अधिभाराच्या नावाने - द्यावा लागणार असल्याने बसणार, हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही. म्हणजे नाव धर्माचे आणि बेगमी मतांची. शिवाय बोनस म्हणून त्यामुळे विश्वगुरुची प्रतिमाही आणखीच उंचावणार! खरे तर पोस्टरवर असलेल्या चित्रांतही बघा, राम केवढा आणि विश्वगुरूचे चित्र केवढे मोठे दिसते... हे पाहिल्यावर कथित भक्ताने देवालाही कसे खुजे करून टाकले आहे, हे दिसतेच आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट विसरून चालणार नाही. ती म्हणजे या भव्य, दिव्य मंदिराच्या उभारणीसाठी आजूबाजूची वर्षानुवर्षे तेथे अस्तित्वात असलेली शेकडो लहानमोठी मंदिरे, प्रार्थनास्थळे तसेच दुकाने, निवासस्थानेही नाहीशी केली गेली आहेत. अर्थात, तीन दशकांपूर्वीचा मशिदीची वास्तू पाडण्याचा बहुमूल्य अनुभव गाठीला होताच! पण प्रश्न पडतो की, ही मंदिरे काही वादग्रस्त नव्हती, कोणतीही जागा बळकावून बांधली गेली नव्हती. ती त्यांच्याच धर्माची होती. मग पूर्वी याच प्रकारे मशीद बांधणाऱ्या तत्कालीन सत्ताधीशाला, नावे ठेवण्यात काय अर्थ आहे! राणी माशीला जगवण्यासाठी बाकी मुंग्या प्राणत्यागही करतात, तसाच हा प्रकार समजायचा का? की हिंदीत म्हणतात त्याप्रमाणे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है? हे त्या सारे काहीही गमवावे लागणाऱ्या अभाग्यांना सांगितले गेले असेल आणि त्यांना ते पटले असेल, वा पटवून देण्यात आले असेल आणि ते पटवून घेऊन त्यांना मान्य करावे लागले असेल.


हेही वाचा : आराखड्यांचे आडाखे - आ. श्री. केतकर


कारण निसर्ग काय आणि सत्ताधाऱ्यांच्या बुलडोझरबाबत तक्रार करून काहीच उपयोग नसतो. आणि तक्रार करणार तरी कुणाकडे हाही महत्त्वाचा प्रश्नच कारण, (गुन्हा करणाराच निवाडाही करणार असल्याने) तक्रार केली तर जे काही गमवावे लागले त्याच्याबरोबर आपला जीवही गमवावा लागेल, हे गेल्या दहा वर्षांत त्यांना माहीत झाले असणार. कारण खुनासकट अनेक गुन्हे ज्याच्या नावावर आहेत, त्याच्या राज्यात चाललेले सारे काही त्यांच्या डोळ्यांसमोरच घडले असल्याने त्यांनी ते पाहिले असणार. पण आता त्यांच्यापुढे मुख्य प्रश्न असेल, तो चरितार्थ चालवायचा कसा हा. तरुण कदाचित स्थलांतर करतील तेथे जम बसवण्याचा प्रयत्न करतील, नव्हे त्यांना तो करावाच लागेल. पण प्रौढ आणि वय झालेल्यांना काही हे शक्य होणार नाही. त्यांनी काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर कदाचित त्यांना मदत द्यायची आणि नंतर नेहमी लाभार्थी असे म्हणून ते मिंधे आहेत ही जाण करून देत राहायचे, हे असू शकेल. कारण त्यातही मोठेपण मिळतेच की! कारण येता जाता आम्ही ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्न देतो, असे सांगितले जात असते, (पण शेतकऱ्यांना तुमचे उत्पन्न दुप्पट होईल, या आश्वासनाचे, किंवा प्रचलित भाषेमध्ये सांगायचे तर, गॅरंटीचे काय झाले, असे मात्र विचारायचे नाही. विचारलेत तर अर्थातच तुमच्यावर देशद्रोही असा शिक्का बसण्याची खात्री), हे आपल्याला माहीत आहेच.

अर्थात यावरही एक तोडगा आहे.

तो म्हणजे शंकराचार्य आम्हाला विरोध करतात म्हणजे काय, आता त्यांची जागा आम्ही आमच्या विश्वगुरूंनाच देऊ. अर्थात केवळ ते आणि तेच अगदी आद्य शंकराचार्यांप्रमाणे एकमेव शंकराचार्य असतील. तेच त्यांची पीठे स्थापन करतील आणि अर्थातच त्यांच्या मर्जीतील लोकांनाच तेथे नेमतील. मग कसला विरोध, कुठला विरोध, कुणाचा विरोध असणार? हाच खरा धर्म अशी ग्वाहीदेखील ते देतीलच.

म्हणतातच ना, असे काम करण्यासाठी तेथे पाहिजे जातीचे! बघाना, आम्ही जातीपातीच्या पलीकडे आहोत असे सांगून स्वतः ओबीसी असल्याची वारंवार ओळख करून देत होतो आणि आता ती अवघड जाईल असे वाटताच, गरीब हीच आमची जात असे नाही का सांगत?

सूज्ञांसी अधिक सांगणे नलगे...

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: ram temple narendra modi a s ketkar आ. श्री. केतकर राम मंदिर अयोध्या शंकराचार्य भाजप प्रचार निवडणूक Load More Tags

Comments:

Awdhoot Parelkar

देशातील सत्तर टक्के हिंदूत्ववादी नागरिक विश्व गुरूंच्या या चाळ्यांवर निहायत खूष आहे हो. यात तथाकथित सुशिक्षित, उच्चशिक्षित धर्मवादी लोक आहेत. आपण अल्पसंख्य नागरिक , आपण लोकशाही मानत असू तर याचा शाब्दिक निषेध करण्यापलीकडे काय करणार.

प्राक्तन पाटील

खरं तर गरज आहे यांना लायकी दाखवण्याची... मतदार म्हणा किंवा धार्मिक नागरिक म्हणा... येडा बनवायची ही कोणती पद्धत?

विश्वास पेंडसे

मोदीसरकारच्या किळसवाण्या राजकारणाचा बरेचजणाना वीट आलेला आहे.तोंड दाबून बुक्याचा मार किती वेळ सहन करणार? मतदार याना त्यांची जागा नक्की दाखवणार.

Add Comment