दिव्याने 2021 मध्ये 'आंतराष्ट्रीय मास्टर' हा किताब मिळवला. 2022 च्या राष्ट्रीय स्पर्धेत महिलांचे विजेतेपद दिव्याने पटकावले होते. 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या महिलांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक भारताने जिंकले होते. त्या संघात ती होती. त्या स्पर्धेत तिने वैयक्तिक सुवर्णपदकही मिळवले होते. तर 2022 च्या ऑलिम्पियाडमध्ये तिला कांस्यपदक मिळाले होते, तर, पुढील वर्षी तिने आशियाई स्पर्धेत जेतेपद संपादन केले.
भारताच्या दिव्या देशमुखने महिलांची जागतिक बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकली आणि इतिहास घडवला. भारतात हा चषक पहिल्यांदाच येत आहे. या आधी कोनेरू हंपी हिने जागतिक बुद्धिबळ ब्लिट्झ -म्हणजे जलदगती, स्पर्धा जिंकली होती. मात्र विश्वचषक स्पर्धेत क्लासिक म्हणजे पारंपरिक दोन्ही डावांत दोघींची बरोबरी झाल्याने, दुस-या दिवशी ब्लिट्झ म्हणजे जलदगती डावांवर निकाल होणार होता. नवलाची बाब म्हणजे त्या टायब्रेकरच्या फेरीतदेखील पहिला डावात हंपीकडे पांढरे मोहरे होते, पहिला डाव बरोबरीत सुटला पण नंतरच्या डावात हंपीच्या एका चुकीने दिव्याला विजय मिळाला.आणि तिने विश्वचषकावर नव कोरले.
खरे तर अनेकांना वाटत होते की, या झटपट प्रकारातील अंतिम सामना विश्वविजेती कोनेरू हंपी सहज जिंकेल, पण दिव्याने तिच्या खेळाने सगळ्यांनाच चकित केले. हंपीला तिने 2.5-1.5 असे हरवले. या विजयाने दिव्या देशमुखला 41 लाख 60 हजार रुपयांचे बक्षिस मिळाले तर उपविजेती ठरलेल्या कोनेरू हंपी हिला 29 लाख 10 हजार रुपये मिळाले.
या यशाबरोबरच दिव्या आणि हंपी या दोघींना पुढील वर्षी होणाया कॅण्डिडेट्स स्पर्धेची पात्रताही प्राप्त झाली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे दिव्याला याआधी ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असलेला एकही नॉर्म मिळाला नव्हता. खरे तर तीन नॉर्म आवश्यक असतात. मात्र काही महत्त्वाच्या स्पर्धां जिंकल्यास खेळाडूला हा किताब थेट मिळू शकतो. त्या स्पर्धांत फिडेच्या महिला विश्वचषकाचाही समावेश आहे, त्यामुळेच ही स्पर्धा जिंकल्यावर दिव्याला ग्रँडमास्टर किताबदेखील मिळाला आहे.
"अनुकूल परिस्थितीत दिव्या वर्चस्व राखते आणि प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता डाव पालटू शकते, तिची ही क्षमता वाखाणण्यासारखी आहे", असे महिला संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे सांगतात. ते म्हणतात की, "वयाच्या केवळ १९ व्या वर्षी विश्वविजेतेपद मिळवणे ही सामान्य गोष्ट नाही. ही बाब तिच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. तिची मेहनत आणि इच्छाशक्ती यांनीच तिला हे यश मिळवून दिले आहे. अर्थात आई-वडील, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांनाही याचे श्रेय द्यायला हवे. तसेच तिला उत्तेजन देणाऱ्या मित्र परिवारालाही.”
नागपूरची दिव्या 19 वर्षांची तर हंपी 38 वर्षांची आहे्. हंपीने ग्रँडमास्टर किताब मिळवल्यानंतर दोन वर्षांनी दिव्याचा जन्म झाला. निश्चितच असे विश्वासाने म्हणता येईल की, ही नव्या पिढीच्या पराक्रमाची नांदी आहे.
भारतात आता दिव्या धरून एकूण 21 महिला ग्रँडमास्टर आहेत आणि पुरुष आणि महिला खेळाडू मिळून एकूण 88 ग्रँडमास्टर आहेत, त्यात कोनेरू हंपी, द्रोणवल्ली हारिका, वैशाली आणि दिव्या या चारजणी उल्लेखनीय आहेत.
दिव्याचा जन्म नागपूरचा, आई-वडील दोघेही डॉक्टर. पाचव्या वर्षी ती बुद्धिबळ खेळू लागली. त्यांनी तिला उत्तेजन दिले. आणि महत्त्वाचे म्हणजे त्याबरोबर तिच्या तंदुरुस्तीकडेही बारकाईने लक्ष पुरवले. नंतर वयाच्या दहाव्या वर्षापासूनच विविध स्पर्धांत तिची चमक दिसू लागली होती. 2016 साली ती 16 वर्षांखालील बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झाली होती तेव्हा ते तिचे प्रशिक्षक असलेले श्रीनाथ नारायण सांगतात, "तिची गुणवत्ता मला पहिल्या भेटीतच ओळखता आली. दिव्याने दबावाखाली तिचा खेळ उंचावला आणि इराणविरुध्द विजय मिळ्वून दिला. प्रथम ती आक्रमक खेळायची, पण नंतर तिच्या खेळात बदल होत गेला. आता ती अष्टपैलू खेळाडू बनली आहे. आक्रमण आणि बचाव अशा दोन्ही पद्धतींनी ती अव्वल दर्जाचा खेळ करू शकते. पारंपरिक, जलदगती आणि झटपट अशा तिन्ही प्रकारांत आता ती संस्मरणीय खेळ करते."
हेही वाचा - चेस ऑलिंपियाडच्या निमित्ताने... (आ. श्री. केतकर)
या केवळ आठ निवडक खेळाडूंच्या विश्वचषक स्पर्धेत तिने सलग चार ग्रँडमास्टर खेळाडूंवर मात केली. उप-उपान्त्यपूर्व फ़ेरीत चीनच्या झाऊ जिनरला, उपान्त्यपूर्व फ़ेरीत भारताच्याच द्रोणवल्ली हारिकाला, उपान्त्य फ़ेरीत चीनच्या तान झोंगीला आणि अंतिम सामन्यात भारताच्याच कोनेरू हंपीला पराभूत केले. दिव्याने 2021 मध्ये 'आंतराष्ट्रीय मास्टर' हा किताब मिळवला. 2022 च्या राष्ट्रीय स्पर्धेत महिलांचे विजेतेपद दिव्याने पटकावले होते. 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या महिलांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक भारताने जिंकले होते. त्या संघात ती होती. त्या स्पर्धेत तिने वैयक्तिक सुवर्णपदकही मिळवले होते. तर 2022 च्या ऑलिम्पियाडमध्ये तिला कांस्यपदक मिळाले होते, तर, पुढील वर्षी तिने आशियाई स्पर्धेत जेतेपद संपादन केले. त्यावेळीही तिने स्पर्धेत द्रोणवल्ली हारिका आणि कोनेरू हंपीला पराभूत केले होते, म्हणजे आत्ताच्या विश्वचषक स्पर्धेत तिला त्या दोघींशी खेळण्याचा चांगला पूर्वानुभव होता. त्या अनुभवाचा फ़ायदा तिला मिळाला असणार व त्यानुसार तिने आपल्या खेळी केल्या असतील असे वाटते. टाटा स्टील जलदगती स्पर्धाही तिने त्याच वर्षी जिंकली होती. २०२४ मध्ये दिव्याने शारजा चेलेंज स्पर्धेतही उपविजेतेपद मिळवले होते, आणि आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ संघटनेच्या, म्हणजे फ़िडेच्या, २० वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत देखील अजिंक्यपद मिळवले होते. त्यामुळे तिचा आत्मविश्वास चांगला वाढला असणार.
यंदा ब्लिट्झ जागतिक सांघिक स्पर्धेत दिव्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या हू यिफ़ानला पराभूत केले होते. हा विजय तिने 74 चालींमध्ये मिळवला होता. त्या अनुभवाचा फ़ायदाही तिला मिळाला. वयाच्या 19 व्या वर्षी तिला मिळालेले हे यश उल्लेखनीय आहे. या स्पर्धेतली चीनची मक्तेदारी आपल्या महिला खेळाडूंनी संपवली ही अभिमानाची बाब म्हणायला हवी! पुरुष गटाप्रमाणे आता आपल्या महिलांची दखलही आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणार, हे वेगळे सांगायला नकोच.
राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, नागपूरचेच नितीन गडकरी, आणि माजी खेळाडू अशा अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. भारताचा माजी जगज्जेता विश्वनाथ आनंद यानेही दिव्याचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, "संपूर्ण स्पर्धेत तिचा खेळ अव्वल.दर्जाचा होता. अंतिम फ़ेरीत तर तिने अतुलनीय धैर्य दाखवत, ती एक महान खेळाडू असल्याचे दाखवून दिले आहे. भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडूंसाठी हा गौरवास्पद क्षण आहे.”
यापुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा!
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)
Tags: बुद्धिबळ चेस chess कोनेरू हम्पी नागपूर ग्रँडमास्टर बुद्धिबळ विश्वचषक साधना डिजिटल Load More Tags
Add Comment