अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराझने गतसालच्या विजेत्या आणि पहिले मानांकन मिळालेल्या यानिक सिनर चा चार सेटमध्ये पराभव करून दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. ग्राँ-प्री मालिकेतील त्याचे हे सहावे विजेतेपद. याआधी त्याने येथील स्पर्धेत 2022 मध्ये जेतेपद मिळवले होते. महिलांच्या एकेरीत मात्र दुसरे मानांकन मिळालेल्या अरीना सबालेंकाने अमांडा अनिसिमोवाला सरळ सेटमध्ये 6-3, 7-6 (7-3) असे पराभूत करून आपले गतसालचे विजेतेपद आपल्याकडेच राखले.
कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिनर ही जोडी आता फेडरर-नदाल या जोडीप्रमाणे टेनिस जगतात स्थिरावत आहे. ग्रँड स्लॅम मालिकेतील कोणत्याही स्पर्धेत गेली दोन वर्षे या दोघांचेच नाव विजेतेपदासाठी घेतले जात आहे. कारण या दोन वर्षांत या ग्रँड स्लॅम मालिकेतील आठही विजेतीपदे या दोघांनीच मिळवली आहेत. त्यामुळे या जोडीला ‘सिनकाराझ’ असे म्हटले जाऊ लागले आहे. या वर्षी तर या मालिकेतील चारपैकी तीन स्पर्धांत हे दोघेच अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले होते. शिवाय यंदाच्या ग्रँड स्लॅम मालिकेतली चारही जेतेपदे त्यांनीच प्रत्येकी दोन अशी वाटून घेतली आहेत. अल्काराझने फ्रेंच आणि अमेरिकन स्पर्धेत वर्चस्व गाजवले, तर सिनरने ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन स्पर्धेत. यावर्षी या मालिकेत लागोपाठ तिसऱ्यांदा ते विजेतेपदासाठी झुंजत होते. दोघांचे सध्याच्या टेनिस विश्वावरचे वर्चस्व यापेक्षा वेगळे काय असू शकेल. अल्काराझने या विजेतेपदाबरोबरच जागतिक क्रमवारीत पुन्हा अग्रक्रम मिळवला आहे. त्यामुळे सिनर एक पायरी खाली गेला आहे. दुसरे म्हणजे तिन्ही प्रकारच्या पृष्ठभागांच्या कोर्टवर, म्हणजे क्ले, ग्रास आणि हार्डकोर्टवर प्रत्येकी दोन अजिंक्यपदे मिळवणारा अल्काराझ हा सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला आहे. त्याप्रमाणेच या मालिकेत कमी काळात सहा जेतेपदे मिळवण्याच्या बियाँ बोर्गच्या विक्रमाची बरोबरी त्याने केली आहे.
‘बिग थ्री’ गणल्या गेलेल्यांतील फेडरर आणि नदाल निवृत्त झाले आहेत आणि नोवाक जोकोविचदेखील उतरणीला लागला आहे, हे त्याला स्वतःलाही मान्य आहे. तरी तो अजूनही या मालिकेतील स्पर्धेत पंचविसावे वे विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. दोन वर्षात या मालिकेतील एकही विजेतेपद त्याला मिळवता आलेले नाही. असे असले तरी जवळजवळ प्रत्येक वेळी तो उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचला आहे, कदाचित त्यामुळेच तो निवृत्त होण्याची भाषा करत नाही. मात्र आता पाच सेटपर्यंत सामना चालला, तर मला तो नकोसा वाटतो, दमल्यासारखे वाटायला लागते, असे सांगतो. अर्थात प्रेक्षक त्याला जोरदार उत्तेजन देतातच, पण जबर इच्छा असली तरी त्याचे शरीर आता साथ देत नाही. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत दुखापतीमुळे त्याने उपन्त्य फेरीचा सामना अर्ध्यावर सोडला होता. फ्रेंच आणि विम्बल्डन स्पर्धेत सिनर ने उपान्त्य फेरीतच त्याला हरवले होते आणि येथेही उपान्त्य फेरीत अल्काराझने त्याचा सरळ सेटमध्ये (6-4, 7-6 (7-4) 6-2) पराभव केला. विशेष म्हणजे या करामतीमुळे अल्काराझने अंतिम फेरीतर्यंत एकही सेट गमावला नव्हता. जोकोविचच्या दृष्टीने जमेची एक बाजू आहे. तो क्रमवारीमध्ये पुन्हा पहिल्या पाचांत आला आहे. ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा तो सातव्या क्रमांकावर होता.
अल्काराझने स्वतःच सांगितल्याप्रमाणे ही स्पर्धा त्याच्यासाठी महत्त्वाची होती. गेल्या वर्षी दुसऱ्या फेरीतच पराभवाला सामोरे जायला लागल्यामुळे त्याने यंदा हे विजेतेपद मिळवण्यासाठी खेळात खूपच बदल केला. कच्चे दुवे सुधारण्याचाही, यत्न केला होता. त्याने डोक्यावरील केसदेखील अगदी कमी केले होते. हे वेगळे काहीतरी होते. त्याबाबत तो म्हणाला होता, की विम्बल्डनची अंतिम फेरी गमावल्याने आणि येथे तर गतसाली दुसऱ्याच फेरीत अनपेक्षितपणे पराभूत झाल्यामुळे, मला काहीतरी विशेष करून दाखवायचे आहे. आणि त्याप्रमाणे त्याने विशेष करून दाखवले.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच त्याच्या खेळातील सुधारणा दिसून आली होती. त्याचे त्याच्या फटक्यांत अधिक ताकद होती आणि त्याच्या सर्व्हिसमध्येही खूपच सुधारणा झाली होती. तिचा वेग वाढला होता, त्याबरोबरच अचूकताही दिसत होती. चेंडू तो योग्य जागी मारत होता आणि त्याच्याकडून चुकाही कमी होत होत्या. त्याच्यातील या बदलाचे प्रतिस्पर्ध्यांना आश्चर्य वाटत होते. पहिल्या सर्व्हिसमध्ये खूपच अचूकपणा आला होता. वेगही वाढला होता. त्यामुळे त्याचा जोमही वाढला होता आणि त्याबरोबर आत्मविश्वासही. दोन महिन्यांपूर्वीच्या विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवाची फेडही अल्काराझला करायची होती. आणि त्याने बरीच मेहनत घेतली होती. ती कारणी लागली आणि त्याने ठरवल्याप्रमाणे सारेकाही या स्पर्धेत झाले. अंतिम फेरीपर्यंत त्याला काहीच अडथळा आला नाही. या स्पर्धा मालिकेत अगदी विक्रमी 24 विजेतीपदे मिळवणाऱ्या जोकोविचचाही. अंतिम सामन्यात दाखल हाइंपर्यंत त्याची सर्विस फक्त तीन वेळा भेदली गेली होती, तसे हे आश्चर्यकारकच होते. आणि केवळ 10 ब्रेक पॉइंटसना सामोरे जावे लागले होते. 1991 मध्ये याच स्पर्धेत पीट सँप्रसला 11 ब्रेक पॉइंटसना सामोरे जावे लागले होते. त्याला अल्काराझने मागे टाकले.
अंतिम सामना सुरू झाला आणि पहिल्याच गेममध्ये त्याने सिनरची सर्व्हिस भेदून आघाडी घेतली आणि ती वाढवतच नेली. त्याचे फटके अचूक होते आणि त्यांत वेग होता. त्यामुळे ते परतवणे सिनर ला अवघड जात होते. हा सुरुवातीचा सेट सिनर ची सव्हिस दोनदा भेदून अल्काराझने 6-2 असा जिंकला. सामन्यानंतर सिनर म्हणाला की त्याच्या खेळात झालेल्या या बदलामुळे मी ठरवलेले डावपेच निरुपयोगी ठरले. अल्काराझच्या खेळात झालेल्या या बदलामुळे सिनरप्रमाणेच संपूर्ण भरलेल्या प्रेक्षागृहातील प्रेक्षकही थक्क झाले होते. खरोखरच हा खेळाडू दर्जेदार पूर्वसूरींच्या पंक्तीत शोभेल असा आहे, असे त्यांना वाटायला लागले. आधीच्या फेऱ्यांप्रमाणे हा सामनाही अल्काराझ सेट न गमावताच जिंकणार असे वाटायला लागले होते.
दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिनरने अनपेक्षितरीत्या वर्चस्व राखले. आता त्याचा जम चांगला बसला आहे, त्याला त्याच्या खेळाची लय सापडली आहे, असे दिसत होते. खेळाडूमध्ये चांगल्या रॅली होत होत्या पण अल्काराझचे फटके चुकल्याने सिनरचा सेटवरील ताबा कायम होता. आणि त्याने तो 6-3 असा जिंकला. त्यावेळी सामना चुरशीचा होणार अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. कारण आता प्रत्येकी एक सेट अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे आता सामना फ्रेंच स्पर्धेच्या साडेपाच तास चाललेल्या सामन्याप्रमाणे अटीतटीचा होणार असे वाटायला लागले होते.
पण अल्काराझने तसे काही होऊ दिले नाही. त्याने आपल्या खेळाने पुन्हा सामन्यावर ताबा मिळवला. त्याच्याकडून चुका होण्याचे प्रमाण खूप कमी झाले होते आणि त्याचे भेदक फटके परतवताना सिनर कडून चुका होत होत्या. एक सेट गमावल्याया धक्क्याने तो सावध होऊन सावरला होता. पाहिल्या सेटमध्ये तो खेळला तसाच त्याचा खेळ आता होत होता. यंदा या स्पर्धेत त्याने पहिल्यांदाच सेट गमावला होता. पण नंतर त्याच्याकडून ती चूक झाली नाही. आता अल्काराझने आक्रमक धोरण स्वीकारले होते. तसा एरवीही त्याचा खेळ आक्रमकच असतो, पण आता त्याला अधिक धार आली होती. तिसऱ्या सेटमध्ये त्याने सिनरची सर्व्हिस दोनदा भेदून 5-0 अशी आघाडी घेतली होती. पण सिनरने सहावा गेम जिंकून सेटमध्ये एकही गेम न जिंकण्याची नामुष्की टाळली. 5-1. सर्व्हिस गेम जिंकून अल्काराझने सेटही जिंकला. अल्काराझ 6 सिनर 1. अल्काराझला आता 2-1 आघाडी मिळाली होती. अल्काराझला सामना जिंकण्यासाठी आता एक सेट जिंकायला हवा होता. काय हाते याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते.
चौथ्या सेटमध्ये सुरुवातीला सिनरचा जम बसणार असे दिसत होते. त्यालाच प्रथम सर्व्हिस करायची होती. त्याने खेळाचा दर्जा उंचावला होता. त्याने पहिला गेम जिंकला, तरी नंतर त्याला अल्काराझची सर्व्हिस भेदता आली नाही. मात्र नंतरचा सर्व्हिस गेम जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली. नंतर मात्र सिनरचे परतीचे फटके चुकत होते, त्याचा फायदा घेऊन अल्काराझने त्याच्यावर दडपण ठेवले होते. चौथ्या गेममध्ये त्याने एका सुंदर ड्रॉप शॉटने आघाडी घेतली. पण नंतर त्याचा परतीचा फोरहँड फटका चुकला. 15-15 बरोबरी झाली. एका स्मॅशने अल्काराझने पुन्हा आघाडी घेतली, नंतर त्याचा एक फटका सीमारेषेच्या अगदी जवळून गेला तो सिनर ला परतवता आला नाही. सिनर ने प्रयत्न करूनही त्याला अल्काराझची सर्व्हिस भेदता आली नाही. प्रत्येकी दोन गेम.
पाचव्या गेममध्ये मात्र अल्काराझने आश्चर्य वाटावे असे परतीचे जे फटके मारले, त्यांना सिनर उत्तर देऊ शकला नाही आणि ऐकवेळी त्याने डबल फॉल्ट म्हणजे सर्व्हिसची दुहेरी चूक केली. त्यामुळे त्याची सर्व्हिस भेदली गेली. अल्काराझ तीन, सिनर दोन. नंतरच्या गेममध्ये अल्काराझची सर्व्हिस पुन्हा प्रभावी होत होती. त्यामुळे सिनर जागच्या जागी खिळल्यासारखा होत होता. अल्काराझने गेम जिंकला. आणि 4-2 अशा आघाडीवर गेला. सातव्या गेममध्ये सिनर ने प्रभावी सर्व्हिसच्या मदतीने दोन गुण घेतले. आणि नंतर एका अचूक फटक्याने आणखी एक गुण मिळवला. अल्काराझने फोरहँड फटक्याने एक गुण मिळवला पण नंतर सिनर ने अचूक परतीचा प्रभावी फटका मारून गेम जिंकला. अल्काराझ 4 सिनर 3. आठव्या गेममध्ये अल्काराझने पाठोपाठ तीन बिनतोड सर्व्हिस (एसेस) केल्या. त्यापुढे सिनर ला काहीच करता येत नव्हते. आणि नंतरही त्याने चांगली सर्व्हिस केली आणि सिनर च्या परतीच्या फटक्यावर जोरदार स्मॅश लगावला. अल्काराझ पाच सिनर तीन. आता सिनर काय करतो याची उत्सुकता होती. कारण आता त्याची सर्व्हिस होती. सामन्यात परत येण्यासाठी त्याला गेम जिंकावाच लागणार होता. त्याला सावध राहायला हवे होते. त्याने त्या गेममध्ये एक ब्रेक पॉइंट वाचवला आणि नंतर गेमही जिंकला. अल्काराझ 5, सिनर 4. आता अल्काराझची सर्व्हिस. सामना जिंकण्यासाठी.
भारताचा टेनिसपटू युकी भांब्री पुरुष दुहेरी उपांत्य सामन्यात
पण अल्काराझला त्यासाठीही थोडे लढावे लागले. सामन्यातली प्रेक्षकांची उत्सुकता वाढली. सर्व्हिस सिन्न करणार होता. पण अल्काराझने आधीच्याच धाटणीत 30-0 अशी आघाडी मिळवली. पण त्याच्या एका चुकीचा फायदा सिनर ला मिणला. 30-15. नंतर सिनरचा एक परतीचा फटका प्रभावी ठरला. 30-30. नंतरच्या अल्काराझच्या सर्व्हिसवर एका बॅक हँड परतीच्या फटक्याने सामना 40-40 असा बरोबरीत आणला. ड्यूस. पण अल्काराझने लगेचच एक गुण मिळवला. अॅडव्हांटेज अल्काराझ आणि नंतर त्याने बिनतोड सर्व्हस करून सामना जिंकला.
महिला एकेरीचा अंतिम सामना तसा एकतर्फीच झाला. गतसालच्या विजेत्या सबालेंकाने सुरुवातच धडाक्यात केली त्यामुळे अनिसिमोवा हादरली. फारसा वेळ न घेता सबलेंकाने पहिलासेट 6-3 असा सहज जिंकला. पण दुसऱ्यासेटमध्ये अनिसिमोवाने चिकाटी दाखवली. पहिल्या मानांकनाच्या स्विआटेकला तिने हरवलेोते, हे तिला स्फूर्ती देत होते. आणि आता दोघींचा खेळ चुरस निर्माण करत होता. गेम पाठोपाठ गेम होत होते पण बरोबरी कायमहोती. 6-6 अशी बरोबरी झाल्यामुळे टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. तो जिंकला तर सबालेंका जिंकणार होती, तिने तो गमावला तर निर्णायक म्हणून तिसरा सेट खेळावा लागणार होता. पण सबालेंकाने ती वेळ येऊ दिली नाही. तिने टायब्रेकर 7-3 असा जिंकून दुसऱ्यांदा येथे विजेतेपद मिळवले.
एकेरीत बरेच अनपेक्षित निकाल लागले. मोठे खेळाडू पहिल्या काही फेऱ्यांतच बाद झाले. मेदवेदेवला पहिल्याच फेरीत बेंजामिन बोल्झाने पराभूत केले, तर दुसऱ्या फेरीत राल्फ कॉलिंगने पाच सेटमध्ये हरवले तर राल्फ कॉलिंगनेही कॅस्पर रुडला पाचसेटमध्येच पराभूत केले. होल्लार रुनला यान लेनार्ड स्ट्रफने हरवले स्टूफने तिसऱ्या फेरीत टिआफोवर सरळ सेटमध्ये मात केली तर फेलिक्स ऑगर अलियासिमने तिसऱ्या मानांकनाच्या अलेक्झांडर झ्वेरेवला धक्का दिला होता. महिलांच्या दुसऱ्या फेरीत टेलर टाऊनसेंडने येलेना ओस्टपेंकोला सरळ सेटमध्ये नमवले, तर चौथ्या फेरीत नवमी ओसाकाने कोको गॉफला खडे चारले. उपान्त्यपूर्व फेरीत अमांडा अनिसिमोवाने पहिले मानांकन असलेल्या इगा स्विआटेकला जिंकण्याची संधीच न देता सपशेल पराभूत केले.
भारतीय खेळाडूंचा प्रभाव मात्र फार दिसला नाही. एकेरीत भारताचा कोणीच खेळाडू नव्हता आणि दुहेरीत फक्त युकी भांब्रीने मार्टिन व्हीनसच्या साथीत प्रथमच उपान्त्य फेरी गाठली तेथे मात्र भांब्री आणि व्हीनसला स्क्रूप्स्की आणि सॉल्सबरी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. एन. प्रशांत आणि ए. चंद्रशेखर पहिल्या फेरीतच हरले आणि रोहन बोपण्णा आर्निओडोच्या साथीने खेळताना पहिल्याच फेरीत सरळसेटमध्ये पराभूत झाला.
इतर अंतिम निकाल :
पुरुष दुहेरी : ग्रॅनोलर्स आणि झेबॉल्लोस विजयी विरुद्ध स्कुप्स्की आण सॉल्सबरी
महिला दुहेरी : ई. गूटलिफ आणि जी. डोब्रोवस्की विजयी विरुद्ध टी टाऊनसेंड आणि सिनिआकोवा
मुले एकेरी : आय. इव्हावोव विजयी वि. ए. वासिलेव
मुली एकेरीः जे. व्हिंड्रोमे विजयी वि. एल. निल्सन
एकेरीचे अव्वल खेळाडू खेळावेत म्हणून मिश्र स्पर्धा यावेळी मुख्य स्पर्धेपूर्वीच घेण्यात आली होती. पण त्या अव्वल खेळाडूंना मिश्र स्पर्धेत फारसा प्रभाव दाखवता आला नाही. अंतिम फेरीत गतसालच्या विजत्या सारा एरानी आणि आंद्रे वावासोरीने इगा स्विआटेक आणि कॅस्पर रूड या जोडीवर मात केली. आणि विजेतेपद आपल्याकडेच राखले. या विजयाने त्यांनी दाखवून दिले की दुहेरीत प्रावीण्य असेल तरच प्रभाव दाखवता येतो, येथे एकेरीतील लौकिकाचा काहीच उपयोग नसतो.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)
Tags: us open us open 2025 frand slam tournamaent alcaraz sinner sabalenka prince prince of tennis carlos alcaraz yuki bhambri Load More Tags
Add Comment