अल्काराझ आणि जोकोविच दोघांच्या वयात 16 वर्षांचे अंतर आहे. दोघेही उपान्त्य सामन्यात पाच सेटच्या लढतीत विजयी होऊन अंतिम फेरीत दाखल झाले होते. त्यांची तंदुरुस्ती आणि आणि स्टॅमिना किती जबरदस्त आहे, हे तेव्हा दिसून आले होते. सहज जाणवत नसले तरी 38 वर्षांचा जोकोविच अंतिम सामन्यात मात्र त्या बाबतीत थोडा कमी पडत होता. कितीही तीव्र इच्छाशक्ती असली तरी या वयात शरीर त्याला साथ देत नव्हते. उलट अल्काराझ जोकोविचचे फटके परतवण्यासाठी कोर्टवर कोठेही चटकन पोहोचत होता. शिवाय त्या फटक्यांत टॉप स्पिनचा अचूक वापर करत होता आणि त्याचा बॅक-हँड परतीचे फटकेही ही प्रभावी होते. त्यामुळे सामन्याचे पारडे हळूहळू अल्काराझकडे झुकत गेले.
यंदाच्या ऑस्ट्रेलियाच्या खुल्या टेनिस स्पर्धेत अनेकांची स्वप्ने भंगली. नोवाक जोकोविचला ग्रँड स्लॅम मालिकेतील 25 वे विक्रमी जेतेपद मिळवायचे होते. यानिक सिनरला स्पर्धेचे लागोपाठ तिसरे विजेतेपद संपादन करायचे होते. तर अलेक्झांडर झ्वेरेवला या स्पर्धेत विजयी होऊन आपला अजिंक्यपदांचा दुष्काळ संपवायचा होता. या साऱ्यांचीच निराशा झाली. 22 वर्षांच्या कार्लोस अल्काराझला मात्र त्याचे स्वप्न साकार करण्यात यश मिळाले. अंतिम सामन्यात जोकोविचवर विजय मिळवून त्याने प्रथमच या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. या विजयाने त्याने या मालिकेतील चारही स्पर्धा जिंकून कारकिर्दीतील ग्रँड स्लॅम पूर्ण केले. (या स्पर्धा मालिकेतील त्याचे हे सातवे जेतेपद.) हा पराक्रम करणारा अल्काराझ हा सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला. त्याचे वय 22 वर्षे 8 महिने 27 दिवस एवढे आहे. मुख्य म्हणजे त्याने या चार स्पर्धा एकापाठोपाठ जिंकल्या आहेत. फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या 2025 मध्ये त्याने ओळीने जिंकल्या होत्या. महिलांच्या एकेरीत विजय मिळविण्याचा अरिना सबालेंकाचा बेतही फसला. एलेना रिबाकिनाने / रायबाकिनाने तीन सेट मध्ये तिला गारद करून आपले या स्पर्धा मालिकेतील दुसरे जेतेपद मिळवले, अल्काराझने जोकोविचवर 2-6 , 6-2 , 6-3, 7-5 असा विजय मिळवला, तर रिबाकिनाने सबालेंकाला रंगलेल्या सामन्यात 6-4, 4-6, 6-4 असे पराभूत केले.
अल्काराझने या कादकीर्दीतील ग्रँड स्लॅम यशामुळे डॉन बज, फ्रेड पेरी, रॉड लेव्हर (दोनदा 1962 आणि 68 मध्ये) रॉय इमर्सन, आंद्रे आगासी, रॉजर फेडरर, राफा नदाल आणि नोवाक योंकोविच यांच्या बरोबरीने स्थान मिळवले.
पुरुष उपान्त्य फेरीचे दोन्ही सामने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे होते. ते दीर्घकाळ तर चाललेच, पण प्रत्येक खेळाडूने आपले कौशल्य पणाला लावले होते. त्यामुळे प्रेक्षकांना किती पाहू असे झाले असणार. अल्काराझ आणि झ्वेरेव यांचा सामना वेळेच्या बाबतीतही विक्रमी ठरला. तो तब्बल पाच तास सत्तावीस मिनिटे चालला. गतसाली फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अल्काराझ-सिनर यांची झुंजदेखील अशीच दीर्घकाळ चालली होती आणि तेथेही अल्काराझ विजयी झाला होता, याची आठवण झाली. जोकोविच आणि सिनर यांची उपान्त्य फेरीची लढतदेखील चार तास नऊ मिनिटे चालली होती. हे दोन्ही सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या स्मरणात ते दीर्घकाळ राहतील. खेळाच्या दर्जासकट. हे सामने प्रत्यक्ष स्टेडियममध्ये आणि दूरचित्रवाणीवर ते पाहणाऱ्यांसाठी हा आनंद देणारा अविस्मरणीय अनुभव होता.
महिला एकेरीचा अंतिम सामना 2 तास 18 मिनिटे चालला होता आणि तेथेही क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आणि या स्पर्धेत 2023 आणि 24 मध्ये अजिंक्य ठरलेल्या, अरिना सबालेंकाला रिबाकीनाकडून पराभव पत्करावा लागला. या खेळाडूंची ही लढत शारीरिक आणि मानसिक पातळीवरही आव्हानात्मक होती. रिबाकिनाचे प्रशिक्षक तिला दोन गेममधल्या वेळेत सूचना देत होते आणि ती त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करत होती. तिने पहिला सेट जिंकल्यावर दुसऱ्या सेटमध्ये सबालेंकाने जिद्दीने खेळ केला आणि ती जिंकली. नंतरच्या निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये तिने 3-0 अशी आघाडीही घेतली त्यावेळी ती आता सहज विजयी होणार असे वाटत होते कारण तिची खेळावरची पकड घट्ट होत चालली होती. पण प्रशिक्षकांनी रिबाकिनाला सांगितले की तू चांगला जोर लाव. त्यांचा चांगलाच उपयोग झाला कारण जिद्दीने तिने त्याप्रमाणे चिवटपणे खेळ केला आणि सामन्यात 3-3 अशी बरोबरी करून नंतर 5-2अशी आघाडीही घेतली. आणि सामना जिंकला. अंतिम गुण तिने बिनतोड सर्व्हिसवर मिळवला.
दीर्घ रॅलीजमध्येही तिने हलकेच फटके मारून सबालेंकाला नेटपर्यंत धावायला लावले. रशियात जन्मलेल्या आणि 2018 साली कझाकस्तानचे नागरिकत्व घेतलेल्या 26 वर्षांच्या रिबाकिनाचे हे दुसरे ग्रँड स्लॅम स्पर्धातील जेतेपद. या वर्षाच्या सुरुवातीला तिचे प्रशिक्षक स्टेफानो वुकोव्ह यांना आचारसंहितेचा भंग केल्याने निलंबित करण्यात आले होते. पण नंतर त्यांना मान्यता देण्यात आली. “आपण कोणत्याही नियमाचा भंग केलेला नाही”, असे त्यांचे म्हणणे होते. रिबाकिनानेही त्यांनी कधीही माझ्याशी गैरवर्तन केलेले नाही असे सांगितले होते. या सामन्यात रिबाकिनाने सहा तर सबालेंकाने पाच बिनतोड सर्व्हिस केल्या. सव्हिसच्या दुहेरी चुका रिबाकिनाने तीनदा तर सबालेंकाने दोनदा केल्या. पण संपूर्ण सामन्याचा विचार करता वर्चस्व रिबकिनाचेच राहिले.
अल्काराझच्या खेळाचे वैशिष्ट्य होते त्याच्या फटक्यांचा वेग आणि अचूकता. त्याने आपल्या सर्व्हिसमध्येही चांगलीच सुधारणा केली आहे. त्याच्या सर्व्हिसचा वेगही चांगला वाढला आहे आणि त्यामुळे त्याने जोकोविचला सर्व्हिसची दिशा किंचित बदलून काही वेळा चकवले. अंतिम सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये जोकोविचने धडाक्यात सुरुवात केली होती. ताकद आणि अचूकतेच्या जोरावर त्याने फटक्यांचा असा मारा केला की, या पुढे अल्काराझ काय टिकणार असे वाटायला लागले होते. पण अल्काराझ खचला नव्हता. दुसऱ्या सेटमध्ये त्याने ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिले ते थक्क करणारे होते.
अल्काराझ नव्या पिढीचा प्रतिनिधी आहे, त्यांच्यापुढे आदर्श ठेवत आहे. शिवाय 2023 मध्ये विम्बल्डन, तर 2025 मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पहिला सेट गमावल्यानंतरच मिळवले होते. विम्बल्डनला तेव्हा त्याचा प्रतिस्पर्धी जोकोविच तर खुल्या फ्रेंच स्पर्धेत सिनर. त्या आठवणीनेही त्याला जोर आला असणार. दुसऱ्या सेटमध्ये त्याला सूर सापडला आणि लयही. त्यानंतर तो सावकाश सामन्यावर पकड घेत गेला आणि ती त्याने ढिली होऊ दिली नाही. जोडीला त्याला नशिबाची साथही होती. तिसऱ्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये तो 15-30 अशा पिछाडीवर असताना त्याचा एक फटका नेटच्या वरच्या पट्टीला लागून उडाला पण कोर्टबाहेर न जाता कोर्टमध्येच पडला, जेथपर्यंत पोहोचणे जोकोविचला शक्य होणार नाही अशा जागी. आणि 30-30 बरोबरी झाली. तेथेच हा दिवस अल्काराझचा असल्याचे स्पष्ट दिसू लागले. कारण त्यानंतर जोकोविचने थोडी चमक दाखवली आणि सामन्यातील चुरस वाढवली, तरी अल्काराझने आपली पकड ढिली होऊ दिली नाही आणि तो सेट 6-3 असा जिंकला.
अल्काराझ आणि जोकोविच दोघांच्या वयात 16 वर्षांचे अंतर आहे. दोघेही उपान्त्य सामन्यात पाच सेटच्या लढतीत विजयी होऊन अंतिम फेरीत दाखल झाले होते. त्यांची तंदुरुस्ती आणि आणि स्टॅमिना किती जबरदस्त आहे, हे तेव्हा दिसून आले होते. सहज जाणवत नसले तरी 38 वर्षांचा जोकोविच अंतिम सामन्यात मात्र त्या बाबतीत थोडा कमी पडत होता. कितीही तीव्र इच्छाशक्ती असली तरी या वयात शरीर त्याला साथ देत नव्हते. उलट अल्काराझ जोकोविचचे फटके परतवण्यासाठी कोर्टवर कोठेही चटकन पोहोचत होता. शिवाय त्या फटक्यांत टॉप स्पिनचा अचूक वापर करत होता आणि त्याचा बॅक-हँड परतीचे फटकेही ही प्रभावी होते. त्यामुळे सामन्याचे पारडे हळूहळू अल्काराझकडे झुकत गेले. दीर्घकाळ चालणाऱ्या रॅलीजमध्येही बहुतांशी त्याचेच वर्चस्व होते. प्रेक्षकांमध्ये त्याचा आदर्श राफा नदाल पहिल्या रांगेत बसला होता आणि त्यामुळे प्रेक्षकांना त्याच्या खेळाची आठवण होत होती. कारण अल्काराझचा खेळही खूपसा त्याच्यासारखाच आहे. नदालच्या खेळातील प्रगल्भता त्यांना अल्काराझच्या खेळातही दिसत होती. नदालनेही 24 व्या वर्षी कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम पुरे केले होते. दोघेही स्पेनचे. अल्काराझ उंचीने नदालपेक्षा थोडा कमी आहे इतकेच.
तसे पाहिले तर येथील रॉड लेव्हर कोर्ट हे जोकोविचच्या घरचे असल्यासारखेच. (जसे विम्बल्डन हे फेडररचे होते). कारण येथे त्याने दहा विजेतीपदे मिळवली आहेत. उपान्त्य फेरीच्या सामन्यात त्याने क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिनरला हरवले होते, तेही अटीतटीच्या लढतीत. अल्काराझला उपान्य फेरीत झ्वेरेव्हविरुद्ध खेळताना दुसऱ्या सेटमध्येच मांडीतील स्नायू दुखावल्याने जोरात पळता येत नव्हते. तरीही त्याने तो सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये मात्र त्याला हा त्रास जाणवू लागला आणि त्याने मेडिकल ब्रेक मागितला त्यावर झ्वेरेव कुरकुर करत होता पण त्याच्याकडे पंचांनी लक्ष दिले नाही. तो आणि नंतरचा चौथा सेट झ्वेरेव्हने जिंकला, पण अल्काराझमध्ये सुधारणा होत होती. तो निर्णायक पाचव्या सेटमध्ये चांगला पळत होता. उलट झ्वेरेवच थकला होता. हे पाहून अल्काराझने त्याला कोर्टवर चांगले पळायला लावले आणि अखेरीस तो सेट 7-5 असा जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
हेही वाचा - ओसाका आणि जोकोविच ठरले अजिंक्य - डॉ. प्रगती पाटील
सामन्यानंतर बोलताना जोकोविच म्हणाला, “मी हरलो असलो तरी अंतिम फेरीत पोहोचल्याचे मला समाधान आहे. हरलो तरी सध्याच्या पहिल्या क्रमांकावरील खेळाडूकडून, जो आताच ‘लीजंड’ बनला आहे. दुसऱ्या क्रमांकावरील सिनर आणि अल्काराझ्ङ्घमध्येच आता प्रमुख स्पर्धांची विजेतीपदे मिळवण्यासाठी चुरस असेल.” नंतर गमतीत तो म्हणाला की “माझ्यासारखे तरुण खेळाडू त्यांचा पाठलाग करतील! त्यांच्याबरोबर खेळताना प्रतिस्पध्यर्थ्यांवर मोठे दडपण असते. पण येथे 10 जेतेपदे मिळवणाऱ्या खेळाडूबरोबर खेळताना ते विना-दडपण खेळले.” जोकोविचला उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचण्यास फारसे प्रयास पडले नाहीत. कारण एक तर काही सीडेड खेळाडू बाद झाले आणि काहींनी सामन्यात त्याला पुढे चाल दिली. आधीच्या फेऱ्यांतील विनासायस विजयांचा त्याला उपान्त्य लढतीत फायदा झाला. त्यामुळे ती पाच सेटची लढत तो जिंकू शकला. तीही यानिक सिनरसारख्या दर्जेदार खेळाडूला हरवून.
भारताबाबत बोलायचे तर दुहेरीत खेळाडू पराभूत झाले. युकी भांब्रीने त्याच्या जेडीदाराच्या साथीने तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली. एन. श्रीराम बालाजीलाही मिश्र स्पर्धेत दुसऱ्या फेरीत हार पत्करावी लागली. मुलींच्या एकेरीत माया राजेश्वरन आणि मुलांच्या एकेरीत अर्णव पापारकर यांना पहिली फेरीही पार करता आली नाही.
अंतिम निकाल:
महिला एकेरीः एलिना रिबाकिना विजयी वि. अरीना सबालेंका 6–4, 4–6, 6–4.
महिला दुहेरीः एलिस मेर्टेत्स आणि शुआई सँग वि. वि. अॅना डॅनिलीना आणि अलेक्झांड्र कृतिक 3–6, 6–4, 6–1.
मिश्र दुहेरीः ऑलीव्हिया गडेकी आणि जॉन पीर्स वि. वि. क्रिस्तीना म्लाडेनोविक आणि मॅन्युएल गुइनार्ड 4–6, 6–3, 10–8
पुरुष दुहेरीः क्रिस्तिअन हॅरिसन आणि नील स्कुप्स्की वि. वि. जेसन कब्लर आणि मार्क पोल्मन्स 7–6 (9–7), 6–4.
पुरुष एकेरीः कार्लोस अल्काराझ वि. वि. नोवाक जोकोविच 2–6, 6–2, 6–3, 7–5.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)
Tags: ग्रँड स्लॅम अल्काराझ नदाल जोकोविच रिबाकिना सबालेंका टेनिस Load More Tags
Add Comment