त्यांना ओळख मिळाली ती विनोदी कथालेखक म्हणूनच. व्यंकटेश माडगूळकर आणि द. मा. मिरासदार यांच्या साथीने ते कथाकथनाचे कार्यक्रम करत. त्या कार्यक्रमांच्या ध्वनिफितीही काढल्या गेल्या होत्या. त्यामुळे कथाकथनकार म्हणून त्यांची आणखी एक ओळख निर्माण झाली. चित्रपटांचे पटकथा आणि संवादलेखक म्हणूनही त्यांनी नाव कमावले. त्यांनी पटकथा-संवाद लिहिलेले 'एक गाव बारा भानगडी', 'पिंजरा' इ. चित्रपट चांगलेच गाजले होते. तरी जास्तकरून ते कथाकार म्हणूनच प्रसिद्ध झाले. नांदेड येथे 1985 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
शंकर पाटील हे गेल्या शतकाच्या उत्तरार्धातील एक नामवंत लेखक. त्यांनी कथा, कादंबरी, वगनाट्ये, स्फुटलेखन, चित्रपट कथा असे अनेक वाङ्मयप्रकार समर्थपणे हाताळले. अनेक प्रकारच्या कथा लिहिल्या. त्यांच्या वळीव, भेटीगाठी, आभाळ, धिंड आणि ऊन या पाच कथासंग्रहांना आणि ताजमहालमध्ये सरपंच या विनोदी कथासंग्रहास राज्यशासनाची पारितोषिकेही मिळाली. त्यांनी 'टारफुला' व पाऊलवाटा या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. शंकर पाटलांची कथा म्हणजे मराठी कथेचे एक लेणे आहे. त्यांचे लेखन विलक्षण पारदर्शी. त्यांच्या कथेचा बाज केवळ रंजनार्थ नाही तर त्यामागे सामाजिक जाणीव आहे. त्यांची कथा चिंतनाच्या डोहातूनच जन्म घेते. त्यामुळे कथेतून त्यांनी फक्त ग्रामीण परंपरा नव्हे, तर ग्रामीण प्रश्न वाचकांसमोर ठेवले आहेत. खेड्यातली व सीमाभागातली माणसं, त्यांच्यातील परस्पर संबंध आणि खेड्याचं मन हे त्यांच्या कथांत उठून दिसते. त्यांचे लेखन त्यांच्या जगण्यातून उमलले आहे. ग्रामीण जीवन, ग्रामीण मन, ग्रामीण भाषा यांचा विचार करताना 'सारंच बदललं आहे', ही जाणीव त्यांना तीव्रतेने होई. कधी ते जुन्या-नव्यातील पडलेले अंतर समजून घेतात, तर कधी अवतीभवतीच्या माणसांशी गप्पा करण्यात रंगून जातात.
शंकर पाटील यांचा जन्म 8 ऑगस्ट 1926 ला झाला. (निधन 18 ऑक्टोबर 1994.) म्हणजे यंदाच्या 8 ऑगस्टला त्यांची जन्मशताब्दीपूर्ती. त्या निमित्ताने त्यांच्या 'गारवेल' या कथासंग्रहाबाबतचा हा लेख. त्यांनी अनेक प्रकारच्या कथा लिहिल्या, तरी प्रामुख्याने त्यांची ओळख विनोदी कथालेखक अशीच झाली. त्यांच्या अन्य कथाही दर्जेदार आणि खिळवून टाकणाऱ्या आहेत. 'गारवेल' या कथासंग्रहात विनोदी, गंभीर तसेच अस्वस्थ करणाऱ्या कथाही आहेत. त्यामुळे त्यांच्या धाटणीतील वैविध्याची प्रचीती येते. त्यांचा जन्म हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली येथील आणि शिक्षण हातकणंगले व कोल्हापूरला झाले. सुरुवातीला त्यांनी काही काळ रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत अध्यापन केले. त्यामुळे या कथांतील पात्रे, प्रसंग आणि भाषाही त्याच भागातील आहे. नंतर त्यांची नियुक्ती आकाशवाणी पुणे केंद्रात झाली. पुढे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात विशेष अधिकारी व विद्यासचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली. किशोर मासिकाचेही काही काळ ते संपादक होते.
त्यांना ओळख मिळाली ती विनोदी कथालेखक म्हणूनच. व्यंकटेश माडगूळकर आणि द. मा. मिरासदार यांच्या साथीने ते कथाकथनाचे कार्यक्रम करत. त्या कार्यक्रमांच्या ध्वनिफितीही काढल्या गेल्या होत्या. त्यामुळे कथाकथनकार म्हणून त्यांची आणखी एक ओळख निर्माण झाली. चित्रपटांचे पटकथा आणि संवादलेखक म्हणूनही त्यांनी नाव कमावले. त्यांनी पटकथा-संवाद लिहिलेले 'एक गाव बारा भानगडी', 'पिंजरा' इ. चित्रपट चांगलेच गाजले होते. तरी जास्तकरून ते कथाकार म्हणूनच प्रसिद्ध झाले. नांदेड येथे 1985 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
'गारवेल' या कथासंग्रहात एकूण 18 कथा आहेत. 'गारवेल', 'जाळे', 'उमाळा', 'टाकीचे घाव', 'कारवान', 'आग', 'अन्न', 'एक जोरदार कार्यकर्ता', 'धन्य धन्य हा नरदेहो!', 'रांडाव पुनव', 'मी फेडलेले एक कर्ज', 'घात', 'ष्टोरी आणीबाणीतली', 'नेमानेमी', 'दावं', 'मीटिंग', 'खड्डा' आणि शेवटची 'काढणी' ही त्या कथांची नावे आहेत.
'गारवेल' या पहिल्या कथेत दुष्काळाने पिचलेल्या शिवाची झालेली ओढाताण आहे. विहिरीजवळच्या चिंचेच्या झाडाला निम्मं झाकून टाकणाऱ्या गारवेलीचा संसार त्याने बालपणापासून पाहिलेली असतो. पण एके दिवशी अचानक दहा वाव लांब आणि दहा वाव रुंद असं जाळकांड त्या चिंचेवरनं खाली येतं आणि ती गारवेल अचानक कोसळते. त्याने त्याला फार दुःख होतं. त्याच वेळी दुष्काळामुळे त्याचं काम सुटलेलं असतं. गावातले अनेक लोक पोटासाठी शहराकडे जायला निघतात, पण शिवा गाव सोडायला तयार नसतो. कुठे काम मिळालं तर करायचं, नाहीतर हमाली करायची, असं तो ठरवतो; पण यात्रेवरून परतलेल्या देसाईअण्णांचं सामान स्टँडवरून घरी पोहोचवल्यावर त्याला मोबदला तर मिळत नाहीच, उलट अपमान करून हाकलून दिलं जातं. रात्री घरी आल्यावर तो बायकोला गारवेल कोसळल्याचं सांगतो. तिला घरात लेकरांच्या तोंडी घास नाही, याची वेगळीच विवंचना असते. त्यामुळे "पडलेल्या जाळकंडातून चांगलं एकदोन गाड्या जळण होईल. कुराडीनं खापलून ढीग करू आणि एकेक बिंडा डोस्क्यावर घेऊन तुक्याला जाऊन इकू, म्हणजे पोरांच्या तोंडात घास पडेल", असा विचार ती करते. शेवटी लेखक लिहितो, "आता मात्र त्याच्या पोटात खरंच ढवळलं. वाचा गेल्यागत तो बसून राहिला. त्याच्या डोळ्यापुढं गारवेलीची ती हिरवी जरतार, ती नक्षीची वेलबुट्टी, ती फुलं हेच चित्र उभं होतं... जे आता कधीही पुन्हा दिसणार नव्हतं."
'जाळे' या कथेत गावाकडचा इरसालपणा आला आहे. गावाच्या सारपंचच्या घरी लेखक पाहुणे म्हणून आलेले असतात. एकदा नदीवर पोहायला गेलेली असताना त्यांच्या मुलीची नदीत अंगठी पडते. कोळी ती शोधून काढतात; पण बक्षिसाच्या रकमेवरून फार वाद घालतात. वाजवीपेक्षा खूप जास्त रक्कम लेखकाकडून उकळतात. सरपंच हे सगळं लक्षात ठेवतात. लेखक गावातून निघण्याच्या दोन दिवस आधी ते नदीवर जाऊन 5 हजार रुपयांची हिऱ्याची अंगठी पडल्याचा बनाव करतात. कोळी मोठ्या आशेने तीन दिवस नदीत शोध घेत राहतात. गाव सोडताना लेखकाला त्यांची कीव येते; पण तो काही बोलू शकत नाही. शेवटी लेखक म्हणतो, "सरंच घाटावर बसूनच होते, मोठं जाळं टाकून बसले होते, जाळ्यात गावचे सगळे कोळी अडकले होते."
'उमाळा' ही गोष्ट मानवी स्वभावाचं रूप दाखवणारी आहे. अत्यवस्थ आजीला भेटायला निघालेल्या कुटुंबाची ही कथा लहान मुलाच्या नजरेतून सांगितली आहे. त्याचं पणजीवर खूप प्रेम असतं. तिथे गेल्यावर आधी तर भावनेचे कढ दाटून येत असतात आणि बोलताबोलता मालमत्तेच्या वाटणीचा विषय निघतो. आपल्या वाट्याला फक्त फोंडा माळ आला आहे हे कळल्यावर आजारी आईची लेक आपल्या कुटुंबाला घेऊन रागाने maघरी जायला निघते, वाटेतच त्यांना आजी गेल्याच निरोप मिळतो, पण तरी ते मागे फिरत नाहीत, निघून जातात, पण त्या लहान मुलाला मात्र पणजीची आठवण सहन होत नाही. शेवटी तो गाडीत बसून हुंदके देत रडत राहतो.
'टाकीचे घाव' या कथेत शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थ्याला आणि त्याच्या कुटुंबाला राबवून घेणारा मास्तर आणि त्याची बायको आहे. शिकवणीला गेलेल्या मुलाकडून अभ्यासाऐवजी घरची कामं करून घेतली जातात. दिवाळीत तर त्याच्या घरच्यांनाही कामाला जुंपलं जातं. शेवटी उपहासाने तो म्हणतो, "चौथी ते सातवी सलग चार वर्ष मी शिकवणीला जात होतो. असे कष्ट सोसले म्हणून विद्या मिळाली. शिक्षण काय फुकट मिळतं? त्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात!"
'अन्न' या कथेत उसने दिलेले पैसे परत मिळाल्याच्या आनंदात गणपत मेस्त्री कोट शिवायला हातकणंगल्याला जातो. बायको साडी मागते, पण अनंत नाही. घरी परतल्यावर बायकोने आमरसाचं जेवण केलं नाही म्हणून रुसतो. म्हणून बायको त्याला आंबे आणायला सांगते, गोडाधोडाचं करून घालते. जेवण झाल्यावर बायको सांगते की, तो बाहेर असताना त्याच्या सासरे म्हणजे तिचे वडील वारल्याचा निरोप घेऊन माणूस आला होता, पण उपाशीपोटी ती बातमी सांगू नये म्हणून तिने ती दडवून ठेवली. गणपत मेस्त्री ओशाळतो. शेवटी लेखक लिहितो, "आईचं अन्न! असं म्हणून एक हात कपाळाला लावून तो मान हलवत बसून राहिला. खाल्लेलं सगळं अन्न त्याच्या पोटात ढवळू लागलं."
'एक जोरदार कार्यकर्ता' ही राजकारणावर उपरोधिक भाष्य करणारी कथा आहे. शिवाजीराव हे बी.ए., एल.एल.बी. झालेले, समाजसेवेच्या ध्यासाने झपाटलेले कार्यकर्ते. शिक्षण समितीचे चेअरमन झाल्यावर ते जिल्ह्यातील शाळांची पाहणी सुरू करतात. एका एकशिक्षकी शाळेत मुलं असतात; पण शिक्षक नसतात. ते शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करतात. तेव्हा सभापतींच्या शेजारी बसलेलेच ते शिक्षक असल्याचं समजतं. शिवाजीराव कारवाईची भाषा करताच सभापती म्हणतात, "अहो, ते नुसते गुरुजी नाहीत. या भागातले जोरदार कार्यकर्ते आहेत. अॅक्शन-बिक्शन घेऊ नका. उद्या आम्ही निवडून कसं येणार?" आणि शेवटी लेखक लिहितो, "शिवाजीरावांची अॅक्शन तिथंच संपली."
'मी फेडलेलं एक कर्ज' ही छोटीशी पण हृदयस्पर्शी कथा आहे. शाळेत असताना हॉटेलात खाते उघडल्यामुळे निवेदकावर 3 रुपये 40 पैशांचं कर्ज होतं. मित्राकडून पैसे घेऊन तो ते कर्ज फेडतो; पण आता मित्राचं देणं फेडायचं असतं. मग तो मित्राला आपल्या थोरल्या बहिणीकडे घेऊन जातो. ती कोणतीही कुरकुर न करता त्याला पैसे देते, मित्राचं आदरातिथ्य करते. लेखक शेवटी म्हणतो, "मी कर्जफेडीतून मुक्त झालो. 3 रुपये 40 पैशाचं ते देणं अशा अजब रीतीनं फेडलं आणि त्यानंतर आजतागायत कधीही आणि कोणत्याही हॉटेलात मी खातं उघडलं नाही."
'ष्टोरी आणीबाणीतली' आणि 'मीटिंग' या निखळ विनोदी कथा आवर्जून वाचण्यासारख्या आहेत. या दोन्ही कथांचे शेवट भन्नाट आहेत. 'नेमानेमी' या कथेत एका कलेवरानं माजवलेला गोंधळ वर्णन केला आहे. जागेअभावी सर्व कथांबद्दल लिहिता येत नसले, तरी हा वेगवेगळ्या प्रकारच्या कथांचा संग्रह आहे. शंकर पाटलांची खास ओळख असलेल्या इरसाल विनोदी कथा तर यात आहेतच, पण भावनेला हात घालणाऱ्या, प्रसंगनिष्ठ कथादेखील आहेत. हा कथासंग्रह वाचल्यावर कुणी न सांगताच शंकर पाटलांचे अन्य कथासंग्रहही वाचावेसे वाटतील, हे नक्की.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
पुस्तकाचे नाव : गारवेल
लेखक : शंकर पाटील
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पाने : 158
किंमत : 130 रुपये
Tags: ग्रामीण साहित्य कथा विनोदी कथा जन्मशताब्दी मराठी कथा मराठी कथा साहित्य मराठी साहित्य साहित्य मराठी गावरान इरसाल साधना डिजिटल Load More Tags
Add Comment