तो हसला नाही तर मामला गंभीर असतो!

सतत हसणाऱ्या टेनिसपटू कार्लोस अल्काराझचे चरित्र

खुली फ्रेंच टेनिस स्पर्धा लवकरच म्हणजे रविवार 24 मे रोजी रोलाँ गॅरो येथे सुरू होत आहे. पण गेली दोन वर्षे या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा कार्लोस अल्काराझ गार्फिया, यंदा मनगटाच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही. या दुखापतीमुळेच त्याचे या स्पर्धेत विजेतेपदाची हॅट-ट्रिक करण्याचे मनसुबे विरून गेले आहेत. पण आजवरची त्याची कारकीर्द पाहता पुढील काळात तो ते स्वप्न पुरे करीलही. कारण याआधीही बऱ्याचदा तो दुखापतीतून सावरून पुन्हा खेळला आहे, आणि विजेताही ठरला आहे. अल्काराझ हा सध्या जगातला अव्वल खेळाडू आहे, यान्त्रिक सिनरच्या साथीने. बाकी खेळाडू या दोघांच्या तुलनेत बरेच मागे आहेत.

अगदी लहान वयातच अल्काराझने हे स्थान मिळवले आहे. अगदी रॉजर फेडरर, राफा नदाल आणि नोवाक जोकोविच या तीन बड्यांनाही इतक्या लहान वयात असे यश मिळाले नव्हते. त्याने केवळ चार वर्षांत ग्रँड स्लॅम मालिकेतील सात विजेतीपदे मिळवली आहेत. यावरूनच  त्याच्या खेळाच्या दर्जाची ओळख पटते. या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकून त्याने करियर ग्रँड स्लॅमही पुरे केले आहे. योगायोग असा की त्याचे मार्क हॉजकिन्सन याने लिहिलेले चरित्र 'बीईंग कार्लोस अल्काराझ : द मॅन बिहाइंड द स्माइल' या नावाने गेल्या वर्षअखेरीस प्रकाशित झाले आहे. सर्वसाधारण खेळाडूंच्या चरित्रांपेक्षा हे चरित्र अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. अल्काराझ केवळ तेवीस वर्षाचा असताना ते बाजारात आले. (या पाच मे रोजी त्याने तेवीसावे वर्ष पूर्ण करून चोविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे.) वय लहान असले, तरी त्याची कारकीर्द देदीप्यमान आहे. त्यामुळेच लेखकाला चरित्र हे वेगळ्या प्रकारे लिहावे लागले असणार. पण त्याने ते वाचकाना खिळवून ठेवेल, असे लिहिले आहे.

सामान्यपणे खेळाडूचे चरित्र म्हटले की त्याची आणि त्याचे सामने, यांबाबत माहिती याबरोबरच त्याच्या लहानपणापासूनच्या हकीगती, सामन्यांचे निकाल वगैरे त्यात असतात. पण त्यांमध्ये सामन्यांमधील बारकाव्यांपेक्षा आकडेवारीच जास्त असते. पण या पुस्तकात मात्र लेखकाने सामन्यांची जंत्री न देता, त्यांचे वैशिष्ट्य सांगितले आहे. खेळाडूची खासियत, वैशिष्ट्ये आणि त्याचे खेळावरील प्रेम यांचे सविस्तर वर्णन केले आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवरील त्याच्या खेळाचे आणि यशापयशाचे वर्णन तर केले आहेच, पण त्याबरोबर अल्काराझप्रमाणे इतर अव्वल खेळाडूंच्या खेळाबाबतही लिहिले आहे. सध्या क्रियाशील असलेल्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या खेळाचीही ओळख लेखकाने करून दिली आहे. त्याबरोबरच आधीच्य खेळाडूंबाबतही त्यांच्या खेळाच्या वैशिष्ट्यांसह माहिती दिली आहे. सुरुवातीपासूनच्या त्याच्या प्रशिक्षकांशी आणि त्याच्या बरोबर खेळणाऱ्यांशी बोलून अल्काराझच्या खेळाप्रमाणेच त्याच्या मनाचे बारकावेही समजून घेऊन, मार्क हॉजकिन्सन याने ते तयार केले आहे. त्यामुळेच हे पुस्तक अधिक चांगले आणि वेगळेपणाने उठून दिसणारे झाले आहे.

अल्काराझ हा स्पेनमधील मुर्सिया या लहान गावातला. त्या गावाची लोकसंख्या सांगताना तो म्हणतो की, गच्च भरलेल्या आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर जेवढे प्रेक्षक असतात तेवढी. म्हणजे साधारण वीस हजार. त्याच्या गावातील आणि स्पेनमधील बहुतेकजण त्याला कार्लिंटॉस म्हणतात. त्याच्या वडलांचे नावही कार्लोस अल्काराझ हेच आहे आणि स्पेनमधील अनेक टेनिसपटू कार्लोस नावाचे आहेत, म्हणूनही असेल. पण त्याला कार्लिटॉस नाव आवडते. कुणी अल्काराझही म्हणतात. त्याला कुणीच शिष्ट वा आगाऊ म्हणू शकणार नाही, असे लेखक म्हणतो. वडलांची 1993 मध्ये सुरु केलेली टेनिस अ‍ॅकॅडमी आहे तीही आता कार्लोस अल्काराझ या पिता-पुत्राच्या नावानेच ओळखली जाते. पंधराव्या वर्षापासून युआन कार्लोस फरेरा हा त्याचा प्रशिक्षक होता. (गेल्या वर्षअखेरीपर्यंत.) तो सात-आठ वर्षाचा असताना, त्याचा खेळ पाहणारे म्हणत हा चांगला व्यावसायिक टेनिसपटु होईल. त्याचा पहिला प्रशिक्षक नवारो हा होता. नवारोला अल्काराझच्या वडलांनीच शिकवले होते. त्याला टेनिसचे तंत्रज्ञान चांगले माहीत असल्याने तो चांगला प्रशिक्षक होईल, हे त्यांनी हेरले होते. शिवाय आपण आपल्या मुलाला शिकवणे चांगले नाही, अशी त्यांची समजूत होती.

टॅटूत सध्या जगातील आघाडीचा असलेला गंगा हा अल्काराझच्याच गावातला. त्यानेच अल्काराझच्या हातावर पहिला टॅटू काढला. इंग्रजी सीसीसी या अक्षरांचा. (त्यानंतर प्रत्येक ग्रैंड स्लॅम मालिके जेतेपद मिळाल्या नंतर त्याने आयफेल टॉवर, स्ट्रॉबेरी असे टॅटू गगाकडून काढून घेतले आहेत. अल्काराझच्या आजोबांनी त्याला दिलेला काबेझा, कोराझॉन, कोजोन्स म्हणजे सीसीसी, हा हा मंत्र होता. त्याचा अर्थ डोके, हृदय आणि चेंडू असा होतो. खेळाडूसाठी हे तीनही घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. आजोबांनी त्याला बुद्धिबळही शिकवले. त्याचा उपयोग खेळताना होईल, असे त्यांचे म्हणणे होते. अजूनही अल्काराझ वेळ मिळाला की, बुद्धिबळ खेळतो.

लहान असताना त्याची उंची इतर मुलांच्या मानाने कमी होती. व्यावसायिक टेनिसपटू होण्यासाठी आवश्यक ती उंची तो गाठैल का याची काळजी होती. पण डॉक्टरांनी काळजी करू नका असे सांगितले होते. त्यानंतर खरोखरच तो बऱ्यापैकी उंच झाला. इतरांच्या तुलनेत थोडा कमी, पण सहा फूट. त्यामुळे त्याला खेळताना कोणतीही अडचण होत नाही. रोलाँ गॅराँच्या कोर्टवर फ्रेंच अजिंक्यपद मिळावणारे कार्लोस मोया, अल्बर्ट कोस्टा, फेरेरो आणि राफा नदाल असे स्पेनचे खेळाडू आहेत. त्यांच्या पंक्तीत बसण्याची अल्काराझची इच्छा होती. मानसशास्त्रज्ञ जोसेफिना कटिल्यास सांगते की आठव्या वर्षापासूनच त्याने पक्के ठरवले होते. इतक्या लहान वयात मानसोपचारतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणारा तो पहिलाच खेळाडू असावा. शाळेत तो सर्वांनाच आवडत असे आणि सगळ्याच खेळांत त्याला गती होती. त्यामुळे कोणत्याही खेळासाठी वर्गाचा संघ निवडताना त्याचे नाव पहिले असायचे. क्रीडाशिक्षकांनी त्याला बॅडमिंटनही शिकवले. ते त्याच्याबरोबर खेळतही.

शाळेत मुले खुर्च्या हलवत तेव्हा मोठा कर्कश्श आवाज होत असे. त्याचा शिक्षकांना त्रास होई. म्हणून अल्काराझ पितापुत्रांनी शाळेला अनेक वापरलेले टेनिस चेंडू भेट दिले. ते कापून खुर्थ्यांच्या पायांवर बसवण्यात आले. तो भयानक आवाज यायचा बंद झाला. कार्लोसचा मोठा भाऊ अल्वारो हाही टेनिस खेळत असे. पण त्याची कारकीर्द अल्प काळाचीच होती. आता तो वडलांबरोबर अल्काराझच्या सर्व मोठ्या स्पर्धांना उपस्थित असतो. अल्वारोबद्दल अल्काराझला खूप आदर आहे. लहानपणी अल्काराझ तापट होता पण अल्वारो त्याला समजावयाचा. तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास होतो असेही सांगायचा. त्याचा चांगला उपयोग झाला. कार्लोसने आपले लक्ष टेनिसवरच केंद्रित करावे आणि कोणत्याही सामन्यात सर्वस्व पणाला लावून खेळावे असे अल्वारो सांगे. 

टेनिसमध्ये अल्काराझला चांगली गती होती. कोणताही फटका त्याला जणू अगोदरच ठाऊक असायचा. तेव्हा त्याचे वडील कायम त्याच्याबरोबर स्पर्धांना जात. पण ते त्याला थेट काही सांगत नसत. ते त्याच्या उपस्थितीत दुसऱ्या कुणाला तरी सांगत, त्याला कळावे म्हणून. त्याला त्याचे भाऊ खेळातील चुका कशा टाळता येतील हे अजूनही सांगतात. आईवर त्याचे खूप प्रेम आहे. तिनेही आपल्याबरोबर यावे, असे त्याला वाटते. पण ती क्वचितच जाते. तिच्या हातचा स्वयंपाक हा जगात सर्वात चांगला असतो असे तो म्हणतो.

वयाच्या केवळ सातव्या वर्षी त्याला पहिला पुरस्कर्ता - स्पॉन्सर मिळाला. त्याच्या गावातीलच योगर्ट आणि केक बनवणारी एक कंपनी. साध्या कागदावरील या करारात त्याने फक्त आपल्या किटवर कंपनीचा लोगो लावावा एवढीच अपेक्षा होती. कंपनीने त्याला प्रवासखर्चासाठी पैसे दिले. त्यामुळे एक चिंता मिटली.

आजोबा, आजीही त्याला मदत करत. पण ती फार नव्हती. किको नवारो त्याचा पंधराव्या वर्षापर्यंत प्रशिक्षक होता. त्याला व्यावसायिक खेळाडू व्हायचे होते, पण अल्काराझच्या वडलांप्रमाणे पैशाअभावी तो बेत तडीस गेला नाही. चांगला खेळाडू झालास तर पुरस्कर्ते मिळतील कारण कोणत्याही पुरस्कर्त्याला खेळाडू पहिल्या पन्नासात असावा असे वाटते असेही नवारोने त्याला सांगितले होते. नंतर कार्लोस फेरेरोही प्रशिक्षक म्हणून आला. प्रशिक्षक म्हणून तो कडक स्वभावाचा होता. अल्काराझच्या खेळाबद्दल माजी अव्वल खेळाडूंचे म्हणणे त्यांच्याच शब्दांत लेखकाने सांगितले आहे.

अल्काराझचे पहिले मोठे विजेतेपद अमेरिकन खुल्या स्पर्धेचे होते. 2022 मध्ये त्याने ते मिळवले. फेरेरोने त्याला चांगली शिस्त लावली. तो आणि अल्काराझ एकमेकांना पूरक ठरले. त्यांचे व्यक्तिमत्त्व भिन्न असले तरी, असे सँप्रस, फेडरर, फ्रिटझ यांचा प्रशिक्षक पॉल अ‍ॅनेकॉन म्हणतो. जिंकणाऱ्याकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणे महत्त्वाचे. तसे झाले तर मात्र स्काय इज द लिमिट, असे पॉल म्हणतो. नंतरच्याच वर्षी अल्काराझने पहिले विम्बल्डन जेतेपद मिळवले, तर 2024 मध्ये पहिल्यांदाच फ्रेंच खुल्या स्पर्धेत तो अजिंक्य ठरला. (पण यंदा तो या दोन्ही स्पर्धांत मनगटाच्या दुखापतीमुळे उतरणार नाही.) गेल्या वर्षी तो फ्रेंच आणि अमेरिकन स्पर्धेचा विजेता होता.

अल्काराझची एक खासियत आहे. तो पॉइंट जिंकला की हसतो. पॉइंट हरल्यानंतरही हसतो. पण त्याचे हे हसणे साधे नसते. तो प्रतिस्पर्ध्याला धोक्याचा इशारा असतो. पण एरवीही तो हसतो. प्रेक्षकांकडे पाहून, सही देतानाही तो हसत असतो. त्याच्या या सवयीमुळे त्याच्या मनात नक्की काय चालले आहे, याचा अंदाज बांधणे अवघड असते. त्याच्याकडे खेळातले सर्व फटके आहेत. जोरदार फोरहँड फटक्यांवर तो गुण मिळवतो. कधी उडी मारून हवेतूनच फटका लगावतो, तर अचानक बैंक हँड फटक्याचा वापरही करतो. कित्येकदा नेटकडे पाठ असतानाही तो पायातून फटका मारतो. त्याचे हे फटके परतवणे अवघड असते. ड्रॉप त्याचा आवडता फटका आहे आणि त्याचा वापर तो चतुराईने करतो. जोरदार फटक्यांची रॅली सुरू असताना प्रतिस्पर्धी बेसलाइनपाशी असतात. पण अचानक जोरदार फटकार तो मारणार असे वाटत असतानाच अचानक तो हलकेच ड्रॉपचा उपयोग करतो. प्रतिस्पर्धी जोरदार फटक्याची वाट पाहात बेसलाइनजवळ असतो, अचानक नेटजवळ ड्रॉप आल्याने त्या तेथपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही, आणि समजा त्यात यश येऊन त्याने परतीचा फटका मारला, तरी नंतर अल्याराझ पुन्हा ड्रॉपचा वापर करणार का जोरदार फटका मारणार हा प्रश्न त्याच्यापुढे असतो.

काही गोष्टी नदालकडून समजावून घे, असे आंद्रे आगासीने पॅरिस ऑलिंपिकच्या आधी काही दिवस अल्काराझला सांगितल्यावर, अल्काराझने नदालशी बातचीत केली व नदालनेही त्याला दहा वर्षांच्या अनुभवाचे बोल सांगितले, केवळ दहा मिनिटांत. पण याचा अर्थ असा नाही की नदाल त्याचा मेंटॉर आहे. नदालचे काका आणि प्रशिक्षक टोनी यांनीही म्हटले आहे की, नदालची मदत घेण्याची अल्काराझला आवश्यकता नाही. फेरेरो त्याला सूचना देण्यास समर्थ आहेत. राफा आणि अल्काराझ एकाच ाशहरातील असते तर गोष्ट वेगळी असती, असेही टोनी म्हणाले. तरीही अल्काराझ म्हणतो की, नदालचा सल्ला हा बहुमोल होता. अल्काराझला नदालविषयी मोठा आदरभाव आहे आणि नदालमुळे त्याला स्फूर्ती मिळाली त्याचा खेळ पाहून अल्काराझ बरेच काही शिकला आहे. नदालविरुद्ध खेळताना तो हरला आणि नंतर जिंकलाही. दुसऱ्या पराभवानंतर त्याने फेरेरोला सांगितले की, आता नदालला हरवण्यासाठी मी सज्ज आहे. व ते त्याने नंतर त्या दोघांची गाठ पडली तेव्हा सिद्ध केले. ऑलिंपिकमध्ये हे दोघे दुहेरीत एकत्र खेळले, पण त्यांची मजल उपान्त्यपूर्व फेरीपर्यंतच गेली होती. एकेरीत मात्र अल्काराझने रौप्यपदक मिळवले तर जोकोविचने सुवर्णपदक.

नदालनंतर आता अल्काराझनेही अव्वल टेनिसपटू म्हणून स्थान मिळवले आहे, हे दोघेही स्पेनचे. पण फेडररनंतर स्वित्झर्लंडचा कुणी खेळाडू अव्वल ठरला नाही तसा जोकोविचनंतर सर्बियाचाही कुणी खेळाडू तेथवर पोहोचला नाही. टोनी नदाल म्हणतात की, स्पेनमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. आम्ही खेळांवर प्रेम करतो. आमच्याकडे हवाही चांगली आहे, त्यामुळे आम्ही वर्षातील जास्तीत जास्त दिवस खेळू शकतो. नदालप्रमाणेच फेडरर आणि जोकोविचचाही अल्काराझवर प्रभाव पडला आहे. फेडररबरोबर एकदाच सराव केला तरी अल्काराझने त्याच्याबरोबरचा फोटो बिछान्यामागील शेल्फवर ठेवला आहे. फेडरर संधी मिळताच आक्रमक खेळ करायचा, ते अल्काराझला आवडते. अ‍ॅनाकॉन म्हणतोः अल्काराझच्या हालचालींत मला फेडरर दिसतो.

अल्काराझला नोवाक जोकोविच लिटल टायटन म्हणतो, तर अल्काराझ त्याला बीस्ट किंवा सुपरमॅन म्हणून संबोधतो. नोवाकचा मुलगा स्टीफन याचा आवडता खेळाडू राफा नदाल आहे. पण 2022 मध्ये नदालची जागा अल्काराझने घेतली. जोकोविच आणि अल्काराझ हे चांगले मित्र आहेत. अल्काराझने 2023-24 मध्ये लागोपाठ दोनदा जोकोविचला बिम्बल्डनच्या अंतिम सामन्यात हरवले, तरी त्यांची मैत्री कायम आहे, हे 2025 च्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या वेळी दिसले. अल्काराझची एनर्जी आणि इन्टेन्सिटी जोकोविचला आवडते. त्यांच्या अटीतटीच्या सामन्यांमुळे अनेकांना टेनिस खेळावेसे वाटू लागले असेल. जोकोविचला वाटते की, त्याचे, फेडरर आणि नदालचे काही गुण अल्काराझमध्ये दिसतात. त्याची मनोवृत्ती नदालसारखीच आक्रमक आहे, तर बचावही नदालसारखा आहे. त्याचे स्लायडिंग पाहताना जोकोविचला स्वतःचीच आठवण होते. पण अल्काराझचे हास्य, त्याचे ड्रॉप शॉटस, मौजमजा आणि सर्जनशीलता hी खास त्याची ओळख आहे. तो अस्सल आहे, कुणाचीही नक्कल नाही.

अल्काराझ हा पैशासाठी नव्हे, तर खेळाचा आनंद घेण्याकरता खेळतो. हा आनंद सर्वांनाच मिळावा म्हणून तो हसतो. त्याच्या हसण्यामुळे प्रेक्षकही खुश होतात. प्रतिस्पर्धी आश्चर्याने हे सारे बघत असतात. अगदी अटीतटीच्या सामन्यातही त्याचे हास्य कायम असते. या त्याच्या मनोवृत्तीमुळेच अल्काराझ स्वतःच्या खेळाला हॅपी टेनिस असे म्हणतो. फेडररने एकदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे वर्णन हॅपी स्लॅम म्हणून केले होते. कारण जानेवारी महिन्यात मेलबोर्नमध्ये प्रत्येकजणच मजेत असतो. ही टेनिस मोसमाची सुरुवात असते. पण ती केवळ एक स्पर्धा आहे. अल्काराझने ते तेवढ्यापुरतेच मर्यादित ठेवलेले नाही, आणखी पुढे नेले आहे, प्रत्येक स्पर्धेसाठी. कारण प्रत्येक स्पर्धा त्याच्याकरता हॅपी असते. त्याचे हॅपी टेनिस तो जगभर नेतो. तो स्वतःला हॅपी पर्सन समजतो आणि त्याप्रमाणेच खेळणे त्याला आवडते. दौऱ्यांमध्ये त्याचा चांगला दोस्त अमेरिकेचा फ्रेंन्सिस टिआफो हा आहे. तो सर्वात चांगला माणूस आहे, त्याचप्रमाणे मजेशीर आणि सर्वात आवाज करणाराही आहे, असे अल्काराझ म्हणतो.


हेही वाचा : रिकामे स्टेडियम... तरीही लाखो प्रेक्षक! (आ. श्री. केतकर)


 त्याच्याआधीही हसणारे टेनिस खेळाडू होते. पण ते फक्त दोन सामन्यांदरम्यान हसत. सामना सुरू असताना नाही. अनेक खेळाडू हावभाव करतात. पण तो त्यांच्या रागाचा परिणाम असतो. मॅकेन्रोप्रमाणे. त्यामुळे ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. पण अल्काराझ त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. तो हास्याचे सामर्थ्य दाखवून देतो. त्याचा प्रशिक्षक किको नवारो म्हणतो की, अल्काराझ हा हसरा मुलगा आहे. ते त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. कोर्टबाहेरही तो बऱ्याचदा हसत असतो. त्याच्या या हास्याने जगभरच्या प्रेक्षकांना जिंकले आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात तो हास्यानेच करतो. तो खेळाची मौज लुटण्याकरताच कोर्टवर जातो, असे त्याचा पहिला प्रशिक्षक, अँटोनिओ लोपेझ सांगतो. जिंकण्या हरण्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही. अल्काराझचा सामना सुरू असताना त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले की त्याच्या डोक्यात काय चालले आहे, हे समजते. तो हसताना दिसला की, त्याचा दिवस चांगला जाणार असे समजावे.

कोर्टवर उतरताना हसण्याचा मनावर चांगला परिणाम होतो, ते माझे सर्वस्व आहे, असे अल्काराझने एका मुलाखतीत सांगितले होते. हसण्याने त्याला ऊर्जा मिळते. त्याच्यावरील ताण कमी होतो. खेळ चांगला होतो. तो खेळाचा आनंद उपभोगतो. सामन्यादरम्यान इतर खेळाडू आनंदी दिसत नाहीत. पण अल्काराझकडे ती क्षमता आहे. त्याच्यामुळे टेनिसची टवटवीत प्रतिमा निर्माण झाली आहे. हे वेगळेच आहे, यामुळे जग बदलून गेले आहे.

फेरेरो म्हणतो की, अल्काराझ हसला नाही तर ती गंभीर बाब असते. तो वेगळाच अल्काराझ असतो आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावर होतो. कधीकधी तो सावरतो आणि त्याचा खेळ सुधारायला लागतो. तो स्वतःला आठवण करून देतो की, टेनिस हा मौजेचा खेळ आहे. मग तो हसतो. तो म्हणतो की, टेनिस त्याच्यासाठी खेळापेक्षा अधिक काहीतरी आहे. कधी त्याचे चाहतेच त्याला हसवतात. आपल्या भावना नियंत्रणात राहाव्यात म्हणून तो मानसोपचारतज्ज्ञांची भेट घेतो. त्यामुळेच लहान असताना रागावून रॅकेट फेकणारा अल्काराझ आता बदलला आहे. तो अधिक चांगला खेळ करू लागला आहे. त्याने जास्त स्पर्धांत उतरू नये कारण त्यात त्याची ऊर्जा खर्च होते. त्याने आपले वेळापत्रक बदलायला हवे, असे अ‍ॅलेक्स कोरेट्या म्हणतो.

मॅटस विलँडर म्हणतो की, अल्काराझ सतत काहीतरी नवीन करत असतो. त्याचे काही फटके असे असतात की, ज्यांची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्याच्यासारखे खेळायचे तर तुमच्याकडे प्रचंड कल्पनाशक्ती असायला हवी. जसे की पाठीच्या मागून फटका मारणे. त्याचे पदलालित्य नदालसारखेच आहे, पण टोनी नदाल म्हणतो की, दोघांत थोडा फरक आहे. राफामध्ये जास्त सातत्य आहे, अल्काराझ मात्र कधी कधी फटक्यांवरचे नियंत्रण गमावतो. पण त्याच्याकडे फटक्यांचे वैविध्य आहे. तो अफलातून टेनिसपटू आहे. असे असूनही त्याच्या खेळात यांत्रिकता नाही. तो सिनरप्रमाणे रोबोटसारखा खेळत नाही. सिनरच्या खेळात यांत्रिकता आहे. पण अल्काराझ खेळताना प्रेक्ष्कांनाही गुंतवतो. अल्काराझविरुद्ध खेळणाऱ्यांना वाटते की, आता खेळ प्रेक्षकांना हवा तसा रंगेल. नदालबरोबर खेळताना कुणालाही तसे वाटत नव्हते. सिनर म्हणतो, "अल्काराझ म्हणजे बर्फ आणि आग आहे".

खरे तर पुस्तकात अल्काराझच्या व्यक्तिमत्त्वाविषयी वेगवेगळ्या अंगांनी मांडणी आहे. लिहिण्याजोगे पुष्कळ आहे. पण येथे सारे काही लिहिता येणार नाही. त्यासाठी पुस्तकच वाचायला हवे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे. ती म्हणजे यंदा रोलाँ गॅरो आणि विम्बल्डन स्पर्धा पाहताना सर्वांनाच अल्काराझची आठवण होईल.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)


बीईंग कार्लोस अलकाराझ : द मॅन बिहाइंड स्माइल
(इंग्रजी पुस्तक)
लेखक : मार्क हॉजकिन्सन,
प्रकाशक : कॅसेल, (हॅचेट, इंडिया)
पाने : २७५;
किंमतः ६९९ रुपये.

Tags: टेनिस ग्रँड स्लॅम अल्काराझ स्पेन नदाल फेडरर जोकोविच नवारो Load More Tags

Add Comment