राजमोहन गांधींनी लिहिलेलं पटेलचरित्र

पटेल - गांधी - नेहरू : संघर्षापेक्षा सहकार्य मोठे

गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहांच्या आयोजनात, तसंच भारतभरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक क्षमता बळकट करण्यात पटेलांची भूमिका मोलाची राहिली. 1930 च्या दशकाअखेरीला नेहरू आणि पटेल हे काँग्रेसचे दोन मुख्य नेते म्हणून उदयाला आले. राजकीय व्यूहरचनेशी संबंधित काही मुद्द्यांवर दोघांमध्ये मतभिन्‍नता होती, पण “आधी देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं आणि गांधी सर्व प्रक्रियेतील अविभाज्य घटक आहेत, या दोन मूलभूत मुद्द्यांवर मात्र वल्लभभाई आणि जवाहरलाल यांच्यात सहमती होती,” असं राजमोहन नोंदवतात. नेहरूंनी पटेलांसोबतच्या त्यांच्या संबंधांविषयी असं म्हटलं आहे : “आमच्यातील राजकीय मतभिन्‍नतांपेक्षा आमच्यातील सहमतीचे मुद्दे कितीतरी पटींनी जास्त होते.”

राजमोहन गांधी यांनी लिहिलेला ‘पटेल : अ लाइफ’ हा चरित्रग्रंथ 1991 साली प्रकाशित झाला. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत राजमोहन लिहितात, “स्वतंत्र भारताच्या स्थापनेला वैधता आणि बळ मिळालं, यामागे ढोबळमानाने गांधी, नेहरू आणि पटेल या तीन माणसांची मेहनत होती. त्यांच्या या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करताना नेहरूंबाबत अतिशयोक्ती केली जाते, गांधींबाबत कर्तव्यभावनेतून बोललं जातं, आणि पटेलांच्याबाबतीत कृतज्ञता व्यक्त करताना मात्र कंजूषपणा केला जातो.”

नेहरूंचे नातू राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नेहरूंची जन्मशताब्दी भपकेबाजपणे आणि भव्यदिव्यपणे साजरी केली, त्यानंतर लगेचच (एप्रिल 1990) ही प्रस्तावना लिहिली गेली. राजीव यांच्या आधी त्यांची आई इंदिरा यांनी दीड दशक पंतप्रधान म्हणून काम केलं. या काळातही नेहरूंची मरणोत्तर प्रतिमेला तकाकी देण्यासाठी बरीच खटपट झाली. या पार्श्‍वभूमीवर राजमोहन यांचं वल्लभभाई पटेलांवरचं पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं. पस्तीस वर्षांनी या पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रकाशित होते आहे. आता राजकीय वातावरण पूर्णतः भिन्‍न आहे. नरेन्द्र मोदी मे 2014मध्ये पंतप्रधान झाले, तेव्हापासून त्यांच्या सरकारने एकीकडे पटेलांचं गौरवीकरण करून त्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि दुसरीकडे नेहरूंचं खलचित्रण करून त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत.

मी राजमोहन गांधींचं हे पुस्तक 2000च्या दशकारंभी वाचलं. आता मी ते दुसऱ्यांदा वाचलं. दोन्ही वेळा मला त्यातलं संशोधन लक्षवेधी वाटलं. वल्लभभाई पटेलांचा पत्रव्यवहार, त्यांची मुलगी मणीबेन यांच्या रोजनिश्या, संस्मरणं, जुनी वृत्तपत्रं, आणि पटेलांच्या परिचयातल्या वा त्यांच्यासोबत काम केलेल्या लोकांच्या स्वतः घेतलेल्या मुलाखती, यांच्या आधारे राजमोहन यांनी हे चरित्र लिहिलं. ते पटेलांचं साकल्यपूर्ण चित्रण करतात. लहानपणीचा काळ, लांबलेलं शिक्षण, कौटुंबिक जीवन, वकील म्हणून यशस्वीरीत्या केलेला व्यवसाय, स्वातंत्र्य चळवळीमधील सहभाग, दीर्घ तुरुंगवास, आणि अर्थातच गृह मंत्री म्हणून संस्थानांना भारतात विलीन करून घेण्याचं कार्य, हे पटेलांच्या आयुष्यातले सर्व टप्पे राजमोहन यांनी काळजीपूर्वक आणि वस्तुनिष्ठ रीतीने मांडले आहेत.

पटेल एका शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झाले. त्यांच्या भवतालामध्ये जवाहरलाल नेहरू, मोहनदास गांधी व सुभाषचंद्र बोस या इतर स्वातंत्र्यसेनानींच्या तुलनेत विशेषाधिकाराचा कितीतरी अभाव होता. वल्लभभाईंना राष्ट्रीय पातळीवर ठळक स्थान लाभल्यानंतरही त्यांना “त्यांच्या ग्रामीण मुळांविषयी अभिमान वाटत असे”, असं राजमोहन लिहितात. वल्लभभाईंनी 1920च्या दशकाअखेरीला बार्डोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलं, तेव्हा त्यांचं “शेतकऱ्यांच्या बोलीवर नि वाक्प्रयोगांवर प्रभुत्व असल्याचं” दिसून आलं आणि त्यांचा “या शेतकऱ्यांवर चांगलाच प्रभाव पडला.”

वल्लभभाईंचे त्यांचे थोरले बंधू विठ्ठलभाई यांच्यासोबत, मुलगी मणीसोबत आणि त्यांच्यासारखेच गुजरातमधून आलेले देशभक्त महादेव देसाई यांच्यासोबत संबंध कसे होते, याचं राजमोहन गांधींनी केलेलं विवेचन पुस्तकाचं खास वैशिष्ट्य ठरतं. पण पटेलांचे गांधी आणि नेहरू यांच्याशी असणारे संबंध सर्वांत महत्त्वाचे होते, आणि त्यावर राजमोहन यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं आहे.

महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची पहिली भेट झाली तेव्हा दोघंही चाळिशीत होते. “माझी त्यांच्याशी अधिकाधिक ओळख होत गेली, तेव्हा मी त्यांची मदत घ्यायलाच हवी याची जाणीवही प्रबळ झाली,” अशी आठवण गांधींनी नोंदवली आहे. तर पटेलांनी या काळासंदर्भात लिहिलं आहे की, “मी गांधींजींसोबत काम करायला लागलो तेव्हा मी थोडं सरपण गोळा केलं, ठिणगी पेटवली आणि माझं कुटुंब, माझी कारकीर्द, माझी प्रतिष्ठा आणि सगळं काही आगीत भस्मसात करून टाकलं.” राजमोहन गांधी लिहितात त्यानुसार, “वल्लभभाईंना गांधींमध्ये संत, योद्‍धा आणि मार्गदर्शक अशा तीन व्यक्तिमत्वांचा मिलाफ झाल्याचं वाटत होतं. या माणसावर आपण विश्‍वास ठेवू शकतो, त्याला अनुसरत जाऊ शकतो, अशी त्यांची धारणा झाली.” 1930च्या दशकात गांधी व पटेल सोळा महिने एकाच तुरुंगात होते, तेव्हा वल्लभभाईंचं “महात्माजींबद्दलचं ममत्व अनेक प्रकारच्या सेवेतून व्यक्त झालं : ते दररोज गांधींना दात घासण्यासाठी कडुनिंबाची काडी तयार करून ठेवत, त्यांच्यासोबत पिण्यासाठी लिंबाचा रस काढून ठेवत, महात्माजींची पत्र ते सांगतील तशी लिहून घेणं किंवा नकलून काढणं, इत्यादी कामांचा यात समावेश होता.”

गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहांच्या आयोजनात, तसंच भारतभरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक क्षमता बळकट करण्यात पटेलांची भूमिका मोलाची राहिली. 1930 च्या दशकाअखेरीला नेहरू आणि पटेल हे काँग्रेसचे दोन मुख्य नेते म्हणून उदयाला आले. राजकीय व्यूहरचनेशी संबंधित काही मुद्द्यांवर दोघांमध्ये मतभिन्‍नता होती, पण “आधी देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं आणि गांधी सर्व प्रक्रियेतील अविभाज्य घटक आहेत, या दोन मूलभूत मुद्द्यांवर मात्र वल्लभभाई आणि जवाहरलाल यांच्यात सहमती होती,” असं राजमोहन नोंदवतात. नेहरूंनी पटेलांसोबतच्या त्यांच्या संबंधांविषयी असं म्हटलं आहे : “आमच्यातील राजकीय मतभिन्‍नतांपेक्षा आमच्यातील सहमतीचे मुद्दे कितीतरी पटींनी जास्त होते.”

दशकभराने, गांधींचा मृत्यू झाल्यावर, नेहरू व पटेल यांनी त्यांच्यातील मतभेद पूर्णपणे गाडून टाकले. गांधींच्या हत्येनंतर तीन दिवसांनी नेहरूंनी पटेलांना पत्र पाठवून कळवलं, “बापूंच्या निधनामुळे सगळं काही बदललं आहे. आता आपल्याला वेगळ्या आणि अधिक अवघड जगाला सामोरं जावं लागेल. जुन्या वादांना आता फारसा काही अर्थ उरलेला नाही. आपण सर्वांनी शक्य तितकं खांद्याला खांदा लावून काम करायला हवं, ही आत्ताची तातडीची गरज आहे.” नेहरूंनी पुढे लिहिलं, “आपण पंचवीस वर्षांहून अधिक काळ एकमेकांसोबत जवळून काम करत आलो आहोत. आपण अनेक वादळांना आणि संकटांना एकत्रच सामोरे गेलो. या काळात तुमच्याविषयी मला वाटणारं ममत्व आणि आदरभाव वाढतच गेला आहे, हे मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो. काहीही झालं तरी या भावना उणावणार नाहीत, असं मला वाटतं.”

पटेलांनी या पत्राला उत्तर देताना लिहिलं, “तुम्ही इतक्या हळवेपणाने नमूद केलेल्या भावनाच तितक्याच उत्कटपणे माझ्याही मनात आहेत. अलीकडच्या घटनांनी मी व्यथित होऊन मी बापूंना पत्रही पाठवलं होतं. त्यांनी मला या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंतीही मी केली. पण त्यांच्या मृत्यूमुळे सर्व काही बदललं आहे. आपल्यावर ओढवलेल्या या संकटामुळे आता काही गोष्टींची नव्याने जाणीव होणं आवश्यक आहे. आपण एकत्र काम करून किती गोष्टी साध्य केल्या, हे लक्षात ठेवायला हवं. आपल्या शोकाकुल देशाच्या हितासाठी आपण पुढेही एकत्रित प्रयत्न करत राहणं ही काळाजी गरज आहे.”


हेही वाचा : कालपरवा सदरातील रामचंद्र गुहा यांचे कर्तव्यवर प्रसिद्ध झालेले सर्व लेख येथे वाचा


राजकीय सहकाऱ्यांनी परस्परांना पाठवलेल्या अत्यंत हळव्या पत्रांमध्ये या पत्रव्यवहाराचा समावेश करता येईल. याचा प्रभावही तितकाच दीर्घकालीन होता. नेहरू व पटेल यांनी परस्परांमधील मतभेद पूर्णपणे बाजूला सारले आणि तुकड्या-तुकड्यांमधून एका राष्ट्राची निर्मिती करण्याच्या कामात ते एकमेकांना साथ देत सहभागी झाले. ते दोघं गृह मंत्री आणि पंतप्रधान म्हणून एकत्र काम करत असताना पटेलांना “नेहरूंचं प्रमुख स्थान आणि त्यांची लोकप्रियता” यांची स्पष्ट जाणीव होती, असं राजमोहन लिहितात. पंतप्रधान नेहरूंचा एकोणसत्तरावा वाढदिवस 14 नोव्हेंबर 1948 रोजी झाला, तेव्हा पटेलांनी लिहिलं की, “महात्मा गांधींनी पंडित नेहरूंना त्यांचा वारसदार व उत्तराधिकारी म्हणून नेमलं. गांधीजींच्या निधनानंतर त्यांची निवड किती अचूक होती, हे आपल्याला कळलंच आहे.”

प्रस्तुत लेख वल्लभभाई पटेलांच्या एकशे एक्कावन्‍नाव्या जयंतीनिमित्त प्रकाशित होतो आहे. गांधी व नेहरू यांच्याशी पटेलांचे संबंध कसे होते, हे जाणून घ्यायचं असेल; किंबहुना पटेलांच्या जीवन-कार्याशी संबंधित इतर सर्व पैलू समजून घ्यायचे असतील, तर राजमोहन यांचं पुस्तक वाचावं. थोर स्वातंत्र्यसेनानी आणि राष्ट्रनिर्माते राहिलेल्या पटेलांच्या आयुष्यावरचा हा सर्वांत सखोल आणि तपशीलवार अभ्यासग्रंथ आहे. आता त्याची अधिक वाचनसुलभ नवीन आवृत्ती आली आहे.

मी या लेखाच्या सुरुवातीला ‘पटेल : अ लाइफ’च्या 1991मधील आवृत्तीला राजमोहन गांधी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतली विधानं उद्‍धृत केली. आता या लेखाच्या शेवटाकडे मी 2026 सालच्या आवृत्तीला त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील विधानं उद्‍धृत करणार आहे. त्यांनी हे पुस्तक का लिहिलं आणि त्यातील मध्यवर्ती आशयसूत्रं कोणती आहे, याबद्दल ते म्हणतात, “राजकीय उद्देशाने पटेलांचा गैरवापर करण्याचा किंवा त्यातून फायदा उपटण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे, त्यावर आपण काय करू शकतो? हिंदू वर्चस्ववादाचं आणि मुस्लिमांच्या खच्चीकरणाचं राजकारण पुढे नेण्यासाठी सरदार पटेलांचा वापर होणं क्लेशकारक आहे.” सध्या भारतासमोर अनेक आव्हानं आहेत, अशा वेळी “पटेल विरुद्‍ध नेहरू वादाची अतिशयोक्तीने उजळणी करणं म्हणजे सोयीस्कररीत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करणं आहे,” असं सूचक निरीक्षण राजमोहन नोंदवतात.

आता नव्याने लोकांसमोर येणाऱ्या या पुस्तकाबद्दल राजमोहन गांधी लिहितात : “पटेल आणि नेहरू अनेकदा एकमेकांशी वाद घालत, हे या पुस्तकातून लक्षात येईलच. त्यांच्यातले मतभेद तीव्र होते. त्यांची पार्श्‍वभूमी, सुरुवातीचा प्रवास आणि दृष्टिकोन परस्परांहून भिन्‍न होते. या मतभेदांविषयी ते खाजगीत कायमच आणि काही वेळा जाहीररीत्यासुद्‍धा मोकळेपणाने बोलत. पण त्यांच्यातील प्रत्येक वादाची अखेर एकजुटीमध्ये होत असे, हेसुद्‍धा या पुस्तकातून स्पष्ट होतं.” पटेल-नेहरू यांच्या संयुक्त प्रशासकीय जबाबदारीला दिशा देण्यातील महात्माजींची भूमिका नोंदवल्यावर राजमोहन म्हणतात : “गांधी-पटेल-नेहरू त्रिकुटाचं विलक्षण स्वरूप वाचकही लक्षात घेतील, आणि प्रत्येक वादळी संकटाच्या अखेरीस एकत्र येण्याची या तिघांनी दाखवलेली क्षमता आणि इच्छाशक्ती वाचक समजून घेतील, अशी मला आशा वाटते.”

- रामचंद्र गुहा
(लेखक विख्यात इतिहासकार आणि राजकीय  - सामाजिक विश्लेषक आहेत.)
भाषांतर- प्रभाकर पानवलकर
kartavyasadhana@gmail.com

Tags: कालपरवा रामचंद्र गुहा अनुवाद सरदार पटेल गांधी नेहरू राजमोहण गांधी पटेल : अ लाइफ हिंदू वर्चस्ववाद Load More Tags

Add Comment