प्रतिभावंताची प्रशंसा

क्रिकेटच्या क्षेत्रात जसे केवळ एकमेव गॅरी सोबर्स होणं शक्य होतं, तसंच व्यंगचित्रकलेमध्ये एकमेव आर. के. लक्ष्मण होणं शक्य आहे. 

ई. पी. उन्नी यांनी आर. के. लक्ष्मण यांच्यावर लिहिलेलं पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं. लक्ष्मण यांच्यानंतर 33 वर्षांनी, 1944 साली जन्मलेले उन्नी स्वतः कुशल व यशस्वी व्यंगचित्रकार आहेत. लक्ष्मण व उन्नी यांची कधी प्रत्यक्ष भेट झाली होती का, याची मला कल्पना नाही, पण या लेखनप्रकाराची वैशिष्ट्यं उन्नी यांच्या पुस्तकात मुबलकपणे आढळतात. एक तरुण माणूस त्याच्या कलेतील ज्येष्ठ प्रतिभावंताला मानवंदना देतो आहे, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.

चरित्रलेखनाचा एक रोचक उप-प्रकार आहे- त्यामध्ये एखाद्या क्षेत्रातील व्यावसायिक त्याच क्षेत्रातील दुसऱ्या व्यक्तीबद्दल लिहितो. यातील काही दाखले (मी वाचलेल्या पुस्तकांमधूनच हे दाखले निवडले आहेत) असे: रॉय हेरॉड यांनी लिहिलेलं जॉन मेनार्ड कीन्स यांचं चरित्र; अ‍ॅश्ले मॅलेट यांनी लिहिलेलं क्लॅरी ग्रिमेट यांचं चरित्र; रिचर्ड इव्हान्स यांनी लिहिलेलं एरिक हॉब्सबॉन यांचं चरित्र आणि पॉल थेरॉक्स यांनी स्वतःवरील प्रभावाच्या आधाराने लिहिलेल्या व्ही. एस. नायपॉल यांच्या आठवणी.

आशयसूत्रं, कथनपद्धती आणि वाङ्मयीन गुणवत्ता, या दृष्टीने ही पुस्तकं अत्यंत वेगवेगळी आहेत. परंतु, त्यांच्यात तीन वैशिष्ट्यं समान आहेत. एक, प्रत्येक चरित्रलेखक त्या पुस्तकाच्या विषयव्यक्तीपेक्षा वयाने लहान आहे. (कीन्स यांच्यापेक्षा हेरॉड 18 वर्षांनी लहान होते, ग्रिमेट यांच्याहून मॅलेट 44 वर्षांनी लहान होते, हॉब्सबॉन यांच्यापेक्षा इव्हान्स 30 वर्षांनी लहान होते, तर नायपॉल यांच्याहून थेरॉक्स नऊ वर्षांनी लहान होते).

दोन, यातील प्रत्येक चरित्रकाराचा संबंधित विषयव्यक्तीशी वैयक्तिक परिचय होता. दोन पुस्तकांच्या बाबतीत (हेरॉड व कीन्स, आणि थेरॉक्स व नायपॉल) ही ओळख घनिष्ठ व उत्कट स्वरूपाची होती; तर इतर दोन पुस्तकांच्या बाबतीत (मॅलेट व ग्रिमेट, आणि इव्हान्स व हॉब्सबॉन) ओझरती ओळख होती.

तिसरं आणि सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक चरित्रकार त्याच्या क्षेत्रामध्ये पुरेसा निष्णात होता, पण तो ज्या व्यक्तीविषयी लिहीत होता त्यांच्याहून कमी ख्यातकीर्त होता. हेरॉड हे सुप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, बहुतांशाने ऑक्सफर्डमध्ये वावरले; तर, केम्ब्रिजमधील कीन्स हे विसाव्या शतकातील सर्वांत प्रभावशाली अर्थशास्त्रज्ञ होते. मॅलेट हे ऑस्ट्रेलियाचे बऱ्यापैकी यशस्वी ठरलेले ऑफस्पीन गोलंदाज होते, तर ग्रिमेट हे क्रिकेटच्या इतिहासातील पहिले महान मनगटी फिरकी गोलंदाज होते- त्यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा बिल ओ’रेइली, रिची बेनॉड आणि सर्वांत महत्त्वाचा शेन वॉर्न यांनी पुढे नेली. इव्हान्स यांचं इतिहासकार म्हणून बरंच लेखन प्रकाशित झालं आहे, विसाव्या शतकातील जर्मनीवर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, तर हॉब्सबॉन यांचं काम जागतिक व्याप्तीचं आहे, जगभरातील सर्व देशांमधील ऐतिहासिक अभ्यासक्षेत्रामध्ये त्यातून परिवर्तन झालं. थेरॉक्स हे विपुल लेखन केलेले कादंबरीकार व प्रवासवर्णनांचे लेखक आहेत, त्यांना बऱ्यापैकी व्यावसायिक व आर्थिक यश मिळालं, तर याच लेखनप्रकारांमध्ये काम करणाऱ्या नायपॉल यांना कोणत्याही लेखकासाठी बहुधा सर्वोच्च सन्मान ठरेल असा साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

या चार पुस्तकांच्याबाबतीत अव्वल दर्जाचा कसबी लेखक त्याच्या क्षेत्रातील अस्सल प्रतिभावंताला मानवंदना देत असल्याचं दिसतं.

चरित्रलेखनाच्या या प्रकारामध्ये आता भारतातून एक सन्माननीय भर पडली आहे, याचा मला आनंद होतो. ई. पी. उन्नी यांनी आर. के. लक्ष्मण यांच्यावर लिहिलेलं पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं. लक्ष्मण यांच्यानंतर 33 वर्षांनी, 1944 साली जन्मलेले उन्नी स्वतः कुशल व यशस्वी व्यंगचित्रकार आहेत. लक्ष्मण व उन्नी यांची कधी प्रत्यक्ष भेट झाली होती का, याची मला कल्पना नाही, पण या लेखनप्रकाराची वैशिष्ट्यं उन्नी यांच्या पुस्तकात मुबलकपणे आढळतात. एक तरुण माणूस त्याच्या कलेतील ज्येष्ठ प्रतिभावंताला मानवंदना देतो आहे, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.

आर. के. लक्ष्मण यांचा जन्म म्हैसूरमध्ये झाला आणि तिथेच ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील शाळामास्तर होते, आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या घराच्या जमिनीवर आपल्या वडिलांचं एक रेखाटन केलं होतं- ते त्यांचं पहिलं ज्ञात रेखाटन होतं. लक्ष्मण यांना मुंबईतील विख्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकायची इच्छा होती, पण तिथे त्यांना प्रवेश मिळवता आला नाही. मग त्यांनी म्हैसूरमध्ये बी.ए.ची पदवी घेतली, आणि फावल्या वेळात शहरातील प्रसिद्ध ठिकाणांची रेखाटनं व चित्रं काढायला सुरुवात केली. त्यांच्या घरी येणाऱ्या वृत्तपत्रांमधील व नियतकालिकांमधील रेखाटनं ते पाहत होते, आणि उपरोधिक रेखाटनांसाठी प्रसिद्ध असलेले, मूळचे न्यूझीलंडचे डेव्हिड लो यांच्याविषयी लक्ष्मण यांना विशेष आदर वाटू लागला. लो यांनी लंडनमधील ‘इव्हिनिंग स्टँडर्ड’मध्ये काढलेली व्यंगचित्रं मद्रासच्या ‘द हिंदू’मध्ये पुनर्प्रकाशित केली जात असत.

काही दशकांनी जे. जे. स्कूलमधील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित असताना लक्ष्मण म्हणाले की, त्या संस्थेत ते शिकले असते तर कदाचित तिथल्या अनेक पदवीधरांप्रमाणे तेसुद्धा एखाद्या जाहिरातसंस्थेमध्ये चांगल्या पगारावर कला संचालकाची नोकरी करत राहिले असते. जे. जे. स्कूलने आर. के. लक्ष्मण यांना प्रवेश नाकारून खरोखरच ऐतिहासिक पडसाद उमटवणारी कृती केली होती, आणि लक्ष्मण यांना कलेचा विद्यार्थी म्हणून पात्र न मानणाऱ्या परीक्षकांचं आपण ऋणी राहायला हवं.

लक्ष्मण यांना मुंबईत 1947 साली ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये पहिली नोकरी मिळाली. तेव्हा भारत स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावर होता. लवकरच लक्ष्मण ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये रुजू झाले आणि त्यांची उर्वरित कारकीर्द तिथेच घडली. उन्नी यांनी लक्ष्मण यांच्या तंत्राचं सुंदर वर्णन केलं आहे- लक्ष्मण यांच्या ‘ब्रशचे कुशल फटकारे पसरट डागांना वावच देत नसत’, त्यामुळे छपाईमध्येही चित्र सुरेख उतरत असे. लक्ष्मण यांच्यासोबतच ‘कॉमन मॅन’ हे या छोटेखानी चरित्रपुस्तकामधील दुसरं सर्वांत महत्त्वाचं पात्र आहे. धोतर आणि चौकडींचं जॅकेट घालणाऱ्या ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून, त्याच्या उपस्थितीमधून व बहुतांशवेळा निःशब्द निरीक्षणांमधून लक्ष्मण यांनी भारतातील दैनंदिन जीवनामधील गुंतागुंत व विरोधाभास टिपले.

उन्नी यांनी आर. के. लक्ष्मण व आधीच्या पिढीतील प्रख्यात भारतीय व्यंगचित्रकार के. शंकर पिल्लई यांच्यात रोचक तुलना केली आहे. लक्ष्मण व पिल्लई दोघेही पुरोगामी संस्थानांमध्ये लहानाचे मोठे झाले. दोघेही उच्चजातीय हिंदू होते, आणि त्यांना इंग्रजी शिक्षण व चांगली ग्रंथालयं या गोष्टी लहान वयातच उपलब्ध झाल्या. या दोन महान कलावंतांच्या प्रभावातून दोन भिन्न ‘व्यंगचित्रकलेचे पंथ’ निर्माण झाले, असं प्रतिपादन उन्नी करतात. ‘अतुलनीय लक्ष्मण यांचा सौम्य आवाहकता असणारा विनोद विरुद्ध शंकर यांची थेट ज्वलंत शैली’ असा हा फरक होता. स्वतः चित्रकार नसलेला, पण व्यंगचित्रकला पाहणारा माणूस म्हणून मी उन्नी यांच्या या अर्थबोधाविषयी मतभेद नोंदवू इच्छितो. उन्नी यांनीच अनेक ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे लक्ष्मण यांच्या चित्रांना तीक्ष्ण राजकीय धार असायची. यातील खरा फरक हा आहे की, शंकर स्वतःची विचारसरणी जाहीरपणे मांडत होते- ते वसाहतविरोधी राष्ट्रवादी होते आणि स्वातंत्र्योत्तर काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य चळवळीतील आदर्शांचं अधिक निक्षून पालन करायला हवं असं त्यांना वाटत असे; याउलट लक्ष्मण अत्यंत सावधपणे तटस्थ राहत होते, पण ते कधीही न-राजकीय नव्हते. किंबहुना, तेही सर्वांवर हल्ला चढवत असत, आणि कारण सापडेल तेव्हा त्यांनी सर्व विचारसरणींच्या व सर्व पक्षांच्या राजकारण्यांना डिवचलं होतं.

दोन, शंकर यांना अनुसरणाला भारतीय व्यंगचित्रकारांचा पंथ होता असेलही, पण लक्ष्मण यांचा कोणीही शिष्य अथवा अनुयायी मागे उरलेला नाही. लक्ष्मण यांना त्या अर्थी स्वतःचं घराणं निर्माण करता येणं शक्य नव्हतं अथवा त्यांनी तसं केलं नाही. त्यांचं स्थान अनन्यसाधारण होतं. त्यांच्या समकालीनांपैकी कोणीच त्यांच्याइतकं चांगलं रेखाटन करत नव्हतं; त्यांच्यासारखी एका ओळीची खुसखुशीत टिप्पणी करण्याची क्षमता इतर कोणाकडेच नव्हती (ते खरोखरच एखाद्या जाहिरतसंस्थेत गेले असते, तर रेखाटनकार होण्याऐवजी ते नक्कीच प्रसिद्ध कॉपीरायटर झाले असते); त्यांचा विक्षिप्त व स्वतंत्र धाटणीचा विनोद आणि असंगतीची जाणीव इतर कोणाकडेही नव्हती. त्यांच्या प्रतिभेचे इतरही अनेक पैलू वर्णनातीत अथवा विश्लेषणातीत आहेत. थोडक्यात- त्यांचं अथवा त्यांच्या कलेचं अनुकरण शक्य नव्हतं. क्रिकेटच्या क्षेत्रात जसे केवळ एकमेव गॅरी सोबर्स होणं शक्य होतं, तसंच व्यंगचित्रकलेमध्ये एकमेव आर. के. लक्ष्मण होणं शक्य आहे. 

लक्ष्मण कार्यरत होते तेव्हा भारतात डझनभर पंतप्रधान होऊन गेले, आणि लक्ष्मण यांनी या सर्वांची थट्टामस्करी केली होती. त्यांच्या लेखणीने व कुंचल्याने इतर राजकारण्यांनाही सोडलं नाही (उदाहरणार्थ, मृदुभाषी लालकृष्ण अडवाणी यांचं आग ओकणाऱ्या व भावना चेतवू पाहणाऱ्या पुढाऱ्यामध्ये झालेलं रूपांतर लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांमधून उत्तमरित्या पकडण्यात आलं होतं). लक्ष्मण यांचं बरंच काम शाश्वत आहे, पण इंदिरा गांधी यांच्यावर शाब्दिक अथवा रेषांच्या माध्यमातून टिप्पणी करताना लक्ष्मण यांचं बहुधा सर्वोत्तम कौशल्य समोर आलं, असं उन्नी सुचवतात. इंदिरा गांधींबद्दल लक्ष्मण यांनी काढलेल्या व्यंगचित्रांना ‘टिपा जोडल्या व त्यांचं संकलन केलं, तर त्यातून एक दमदार राजकीय चरित्र उभं राहील,’ असं उन्नी लिहितात. ‘इंदिरा यांच्यावर त्यांनी काढलेली व्यंगचित्र विडंबनाचा उत्कृष्ट नमुना होती. डोळे मोठे करणारी नवखी व्यक्ती, आर्थिक स्फोटक भूमीवर आक्रमकतेने नाचणारी व्यक्ती, पक्षातील जुन्या खोंडांवर दगडफेक करणारी रस्त्यावरील राजकारणी, न्यायदेवतेला डिवचण्यासाठी तलवार फिरवणारी महत्त्वाकांक्षी व्यक्ती, निवडणुकीतील पराभवानंतर माघार घेणारी आणि आपला मुलगा संजय याला लहान गाडीतून उपनगरांमध्ये धाडणारी- अशी इंदिरा गांधींची विविध रूपं लक्ष्मण यांनी टिपली.’

लक्ष्मण यांची कर्मभूमी ठरलेल्या शहराशी असणाऱ्या त्यांच्या संबंधांविषयीही उन्नी यांनी मार्मिकरित्या लिहिलं आहे. ‘शहरांसोबत व्यंगचित्रं वाढत गेल्याचा इतिहास आहे,’ असं उन्नी लिहितात, ‘आणि मुंबई स्वतःसाठी खास व्यंगचित्रकाराची वाट पाहत होती. लक्ष्मण यांनी ती जागा घेतली आणि दैनंदिन प्रश्नांशी झगडणारे वृत्तपत्रांचे वाचक त्यांना लाभले. अनागोंदी सगळ्यांनाच जाचते आहे; त्यात वैयक्तिक काही नाही आणि बहुतांश अनागोंदी दूर दिल्लीत बसलेल्या राज्यकर्त्यांमुळे आहे, असं लक्ष्मण यांची व्यंगचित्रं वाचकांना सांगत होती.’ लक्ष्मण यांचे वाचक स्वतःतील काहीतरी त्या व्यंगचित्रांमधील ‘कॉमन मॅन’मध्ये पाहत होते. गर्दीने भरलेल्या व संकटग्रस्त भारतीय शहरात स्वतःची अस्वस्थ जागा घेतलेला ‘कॉमन मॅन’ वाचकांना जवळचा वाटला.

उन्नी यांचं पुस्तक वाचत असताना मी समुद्रकिनारे व व्यंगचित्रकार यांच्यातील संबंधांविषयी अनुमान बांधायला लागलो. आधुनिक भारतातील अनेक प्रभावशाली व्यंगचित्रकार केरळमधून आलेले आहेत. त्यात शंकर, अबू अब्राह्म, ओ. व्ही. विजयन, मंजुळा पद्मनाभन व स्वतः उन्नी यांचा समावेश होतो. त्यानंतर गोव्यातील मारिओ मिरांडा होते. आज स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या तरुण व्यंगचित्रकारांपैकी सतीश आचार्य कर्नाटकच्या किनारी भागातून आलेले आहेत.

लक्ष्मण यांचं मूळ शहर म्हैसूर समुद्रकिनाऱ्यापासून दूर आहे, पण सुदैवाने त्यांना मुंबईला स्थलांतर करता आलं आणि तिथेच त्यांनी पुढील आयुष्य घालवलं व काम केलं. अनेक अर्थांनी त्यांची कारकीर्द त्यांचे सुरुवातीच्या काळातील आदर्श डेव्हिड लो यांच्याशी साधर्म्य सांगणारं आहे. डेव्हिड लो न्यूझीलंडच्या ग्रामीण भागातून लंडन या जगातील सर्वांत रोचक शहरामध्ये आले. डेव्हिड लो यांच्या रूपात एक ‘किवी’ माणूस लंडनला आला, त्याप्रमाणे लक्ष्मण यांच्या रूपात एक म्हैसूरनिवासी मुंबईला आला. त्यांच्या मूळ कोत्या देशी प्रदेशामध्ये त्यांना कधीच सामाजिक व आर्थिक वैविध्याविषयीची सजगता प्राप्त झाली नसती, जगभरातील प्रवाहांशी त्यांचा परिचय झाला नसता, बौद्धिक व सांस्कृतिक सर्जनशीलतेशी परिचय झाला नसता; पण किनारपट्टीवरील थोर शहरांमुळे त्यांना याबाबतीत प्रोत्साहन मिळालं व त्यांच्या कलेची जोपासना झाली.

अनुवाद - प्रभाकर पानवलकर

- रामचंद्र गुहा, बंगळूरू
ramachandraguha@yahoo.in
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Tags: Cartoonist Indian express Biography New Books E P Unny Ramchandra Guha Marathi Articles Translation Kalparva Load More Tags

Comments:

shyamrokade

लेख आवडला लक्ष्मण यांचे स्वातंत्र्य नंतरच्या काळात तील भारताच्या राजकीय परिस्थतीवर भाष्य करणारे cartoonist history चे पुस्तक पाहिले ते माझ्या कडे आहे त्या त्या राजकीय काळातील परिस्थितीचे भान लक्ष्मण आपल्याला करून देतात ते ही अचूकपणे असा व्यंगचित्रकार पुन्हा होणे नाही

Mangesh Nabar

हे व असं लेखन साधना मध्ये आलं पाहिजे. मला तुमचा हा डिजिटल उपक्रम अजिबात आवडत नाही. साधना हे छापील अंक न वाचता लोकांना हे वाचायला तुम्ही लावता त्याचा मला तिटकारा येतो. मंगेश नाबर

Add Comment