एकदा हरवला गाव
की होत नाही पुन्हा कधीच
तुमचं पुनर्वसन
घर गाव किंवा देश-प्रदेश सुटल्यावर
'निर्वासित' नावाची चिकटवली जाते जात
उपरेपणाचीही एक स्वतंत्र संस्कृती असते
माहितीये तुम्हाला?
(~ सारिका उबाळे यांच्या 'धरणाच्या तळाला' या आगामी संग्रहातून)
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे लेंडी नदीवर बांधलेले धरण हा सिंचन व स्थानिक विकास साधण्याच्या उद्देशाने उभारलेला एक प्रकल्प आहे. परंतु 2025 च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली. लेंडी धरणाजवळील हसनाळ, रावणगाव व इतर काही गावांना पुराचा गंभीर फटका बसला. 18 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्री हसनाळ या गावात पाणी शिरले आणि सहा गावकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, जनावरे वाहून गेली, घरे कोसळली, आयुष्यभराची कमाई, घर-संसार वाहून गेले, अन्न-धान्य पाण्यात सडून, कुजून गेलं. ही अवस्था पाहता शासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून जलद आणि संवेदनशील बचावकार्य अपेक्षित होते. पण अपेक्षित तत्परता, आत्मीयता आणि सहानुभूतीचा अभाव दिसला. नांदेडच्या पालकमंत्र्यांनी विलंबाने दौरा केला, पण ती भेट फक्त औपचारिक ठरली. या घटनांमुळे आम्ही स्वतः गावाला भेट देऊन घटनेचे सत्य समजून घेऊन सत्यशोधन अहवाल तयार केला.
भेटीदरम्यान आढळले की, ही दुर्घटना पूर्णपणे नैसर्गिक नव्हती; तर शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी व अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे मानवनिर्मित संकट निर्माण झाले होते. पुनर्वसन न होता, व गावातून लोकांना सुरक्षित ठिकाणी न हलवता धरणाची मुख्य घळभरणी केली गेली. अभियंत्यांनी गावकऱ्यांना चुकीची माहिती दिली. पुढाऱ्यांनी गावकऱ्यांना गाफील ठेवले. गावकऱ्यांनी त्या भीषण रात्री मदतीसाठी अनेकांशी संपर्क करण्याचा आर्त प्रयत्न केला; तरी प्रशासन सकाळीच पोचले. स्थानिक तरुणांनी स्वतःच्या जीवावर बचावकार्य केले. शेवटी, आलेल्या सरकारी पथकाने काहींना वाचवले. या दुर्घटनेत विशेषतः महिलांचा अधिक बळी गेला आणि बचावकार्यात जाती-पातीवर आधारित भेदभाव झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. लोकप्रतिनिधींनी विरोधकांवर राजकीय सूड उगवला; हसनाळवासीयांना निकृष्ट प्लॉट देण्यात आले. अनेकांना प्लॉट दिलेही नाहीत. हसनाळमधली स्थिती हृदयद्रावक तर आहेच; परंतु सामाजिक आणि राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहू जाता ती अतिशय संतापजनकसुद्धा आहे.
मध्यरात्री गावात पाणी शिरलं. लोक झोपेत व बेसावध स्थितीत होते. मृत्यूमुखी पडलेल्या सहा जणांपैकी दोन पुरुष तर चार स्त्रिया आहेत. या स्त्रियांपैकी तीन स्त्रिया या मध्यमवयीन होत्या. त्यांना स्वतःहून एखाद्या सुरक्षित ठिकाणी पोचता आलं नाही. एक साधारण 55 वर्षे वयाच्या ललिताबाई भोसले कुणाची मदत मिळू न शकल्याने घरातच अडकल्या. घराच्या मातीच्या भिंती व छत कोसळून त्या मृत्युमुखी पडल्या. गंगाबाई गंगाराम मादाळे, वय : 65 वर्षे व भीमाबाई हिरामन मादाळे, वय : 66 वर्षे या दोघींना सुरक्षित ठिकाणी पोचवण्यासाठी यादव मादाळे हा तरुण मदत करत होता. परंतु, पूर्वानुभवावरून त्या दोघींना वाटत होते की पुराचे पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि त्यांना त्रास होणार नाही. त्यामुळे त्या दोघीही बाजेवरच बसून राहिल्या. खरं तर, त्यांची खात्री अचूक होती. ती नैसर्गिक पुरासंबंधीची खात्री होती. पण हा पूर नैसर्गिक नव्हता. इथे गावात धरणाचं पाणी शिरलं. त्यामुळे त्यांची आशा खोटी ठरली आणि वाढलेल्या पाण्याने त्यांना पोटात घेतले. चौथी स्त्री चंद्रकला विठ्ठल शिंदे, वय 45 वर्षे ही कौटुंबिक कलहामुळे एकटी राहत होती. अचानक आलेल्या पाण्याच्या वाढत्या प्रवाहात तिने स्वतःला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण पाण्याच्या प्रचंड वेगापुढे तिचा टिकाव लागला नाही. नातेवाईकांशी फोनवर बोलताबोलता ती पाण्याच्या तडाख्यात सापडली. संकटात सापडलेल्या एखाद्या स्त्रीची मानसिकता संकटात सापडलेल्या एखाद्या पुरुषाच्या मानसिकतेपेक्षा अगदीच भिन्न असते.
आपत्ती आणि पितृसत्ता किंवा लिंगभावाचा काय संबंध असतो? आपत्ती आणि लिंगभाव यांचा अभ्यास आता सुरू झाला आहे. अभ्यासक असे सांगतात की, नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीचा सामना हा अभिजन वा श्रीमंत वर्गापेक्षा गरिब वा कष्टकरी वर्गाला अधिक बाधित वा नुकसानदायी ठरतो. त्यातही स्त्रिया व लहान मुलांचा त्यात अधिक बळी जातो. जेव्हा पूर येतो आणि घरात अचानक पाणी शिरते तेव्हा घरातील लहानगे, वृद्ध आणि सामानसुमान वाचविण्याच्या चक्रात स्त्रिया घरातच घुटमळत राहतात आणि बळी पडतात.
आपत्तींनंतर स्त्रियांकडे काळजीवाहक म्हणून पहिले जाते. त्सुनामी दुर्घटनेनंतर केरळ परिसरात ज्या छावण्या तयार केल्या गेल्या होत्या त्या छावण्यांमध्ये आपले नातेवाईक मरण पावल्यानंतरदेखील दुःखाचा आवंढा गिळून ह्या स्त्रियांना छावणीतील सर्वांसाठी स्वयंपाक वगैरे कामं करावी लागली होती. अलाहाबादमध्ये पुराने थैमान घातले तेव्हा 'द हिंदुस्तान टाइम्स' या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका चित्रातील स्त्रिया पुरापासून वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधताना दिसत होत्या. पण, डोक्यावरील पदर (घुंगट) ढळू न देण्याची काळजी त्या घेताहेत. एवढ्या आपत्तीतही आपला चेहरा दिसू न देण्याची काळजी त्यांना घ्यावी लागत आहे.
हसनाळमध्ये तेच घडले. पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना आपत्तीकालीन सुरक्षेचे प्रशिक्षण मिळत नाही. विषम जडणघडणीमुळे धावणे, पळणे, पोहणे, उंचावर चढणे, उड्या मारणे अशी कौशल्ये मुलींनी आत्मसात करण्याचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. छोट्या गावात किंवा खेड्यात अजूनही स्त्रिया दुचाकी, चारचाकी वाहन चालवण्यास सक्षम नाहीत. आपत्तीच्या वेळी स्त्रियांचा जीव घरातल्या लहान-सहान गोष्टींमध्ये अडकलेला असतो. त्या वाचवण्यासाठी स्त्रिया आपात्कालीन परिस्थितीतही धडपडत असतात.पुरुषांप्रमाणे त्या चटकन जीव वाचवून पळू शकत नाहीत. कारण त्यांना त्यांचे मर्यादित विश्व आखून दिलेले असते. त्यासोबतच स्त्रियांचे नीट सामाजीकरण झालेले नसल्यामुळे त्यांची निर्णयक्षमताही अशावेळी कमी पडते.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, आपल्याकडच्या स्त्रियांचा पेहेराव आपात्कालीन परिस्थितीशी सहज लढता येईल असा सुटसुटीत नसतो. पायघोळ घागरे, मॅक्सी, लांब गाऊन, साडी, लांबलचक ओढण्या असे सांस्कृतिक पेहेराव हे महापूर, भूकंप, आग, वादळवाऱ्यात वेगाने पळण्यासाठी कुचकामी व घातकी ठरतात. याशिवाय, सामाजिक जडणघडणीतून आलेला न्यूनगंड, अपुरा आत्मविश्वास आणि संसाराच्या रहाटगाड्यात कष्टाने झिजलेल्या, मासिक पाळी, गरोदरपण, बाळंतपण अशा एकांगी जबाबदाऱ्यांनी खचलेल्या स्त्रियांचा अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीव जातो.
हसनाळमधील स्त्रिया मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहेत. धरणासारखा एखादा प्रकल्प, त्याची अंमलबजावणी, धरणग्रस्त गावाचे पुनर्वसन, त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, सरकारी योजना, नियम यांपासून ह्या स्त्रिया अनभिज्ञ होत्या. खरं तर, कौटुंबिक स्तरावर स्त्रिया अतिशय उत्तम पद्धतीने एखाद्या आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करू शकतात. पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांची सामाजिक जडणघडण ज्या पद्धतीने झालेली असते त्यानुसार स्त्रियांचा स्वभाव काटकसरी बनलेला असतो. वर्षभर पुरेल इतका अन्नधान्याचा साठा जतन करून ठेवणे, काही विशिष्ट पद्धती अनुसरून पदार्थ वाळवून, खारवून, साठवून ठेवणे, पावसाळा व दुष्काळ, महापूर अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी अन्नधान्याचे नीट नियोजन लावून ठेवणे, अशा बाबी गावखेड्यातून स्त्रिया अतिशय हिकमतीने, पारंपरिक पद्धतीने करत आलेल्या आहेत. अजूनही करतच असतात. हसनाळमधील पूर ओसरल्यानंतर पडझड झालेल्या घरातूनही स्त्रिया काहीबाही वस्तू शोधू पाहत होत्या. 1972 च्या दुष्काळात अन्नधान्य, पाण्याचा तुटवडा होता, तेव्हाचा अनुभव काही म्हाताऱ्या बायका सांगायच्या की, "दुष्काळात भांडी घासताना बायका खरकटी भांडी कोरड्या राखेने घासायच्या आणि त्या कोरड्या फडक्याने पुसून घ्यायच्या, आंघोळ केलेलं पाणी झाडाझुडासाठी, सडा-सारवणासाठी राखून ठेवायच्या. पावसाची झड, ओला दुष्काळ अशा काळात स्त्रिया रानभाज्या, अंबाडी, तरोटा अशा भाज्या, पीठातल्या वाचवून ठेवलेल्या कोंड्यासोबत उकडून घ्यायच्या; तर अन्नटंचाईच्या काळात आंबील, मुटके, कळणा कोंड्याच्या भाकरी असे पदार्थ रांधून स्त्रियांनी कुटुंब जगवल्याचे दाखले इतिहासात मिळतात.
एखादी महामारी, महापूर, दुष्काळ, भूकंप अशा विपरीत परिस्थितीत वागण्याचं भान आणि शहाणपण हे स्त्रियांना उपजतच होतं आणि आहे. पूर्वी जुन्या म्हाताऱ्या बायका गमतीने म्हणायच्या की, हे अंगावरचं मांस सांभाळून ठेव, कधी खाण्यापिण्याचा तुटवडा पडला तर हेच मांस कामी येईल'. या संदर्भात 'मांस' म्हणजे शरीरातील 'फॅट'. हे 'फॅट' उपासमारीत शरीराला तगवतं, हे वैद्यकीय ज्ञान मागच्या पिढ्यांना अनुभवातून ज्ञात होतं.
पूर्वी महामारीत किंवा संकटकाळी एखाद्या गावातून स्थलांतर करत असताना बायका घरात कुठेतरी जिवापाड जतन करून ठेवलेली छोटीशी पोटली सोबत घ्यायच्या. दुसऱ्या गावात राहायला गेल्यावर स्थिरस्थावर होऊन, एखादी जमीन बघून त्या पोटलीतलं बी मातीत पेरायच्या आणि धान्य उगवायच्या. धान्य उगवणे, शेतीचा शोध, समान अन्नधान्यवाटप हे गुण स्त्रियांमध्ये अंगभूत आहेत आणि ते मातृसत्तेतून आलेले आहेत. आजदेखील बाहेर जाताना, प्रवासात स्त्रिया घरून निगुतीने स्वयंपाक करून सोबत डब्यात घेतात. प्रवासातदेखील आपल्या पुरुष नातेवाईकांना वाढून जेऊ घालतात.
हसनाळ गावात धरण, विस्थापन, पुनर्वसन ह्या सर्व बाबी बहुतेक करून गावातील पुरुषच हाताळत होते. महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत स्त्रियांना सहभागी करून घेतले जात नाही. त्यांचे मतही विचारात घेतले जात नाही. हसनाळ भेटीदरम्यान तांत्रिक बाबी, सरकारी नियम अशा अनेक बाबींची चर्चा गावातील पुरुषच करत होते. गावात फिरून झालेल्या घटनांची माहिती देत होते. स्त्रिया मात्र जुन्या घरातल्या वस्तू शोधताना किंवा नवीन पुनर्वसित ठिकाणी आपल्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी पुन्हा बसवायचा प्रयत्न करताना दिसत होत्या. त्यांच्या बोलण्यातही झालेल्या घटना, त्रास, दुःख याचंच वर्णन जास्त होतं. स्त्रियांनाही गाव स्तरावरील नियोजनात सहभागी करून घेतले तर त्यांचा आत्मविश्वास वाढून संकटसमयी आपला व मुलांचा जीव वाचवणे त्यांना सहज शक्य होते. परंतु पुरुषसत्ताक समाजातील राजकारण हे बहुदा पुरुषांच्या हातात असते. त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि बायका या पुरुषी ताकदीवर अवलंबून राहतात. शिवाय, अशा आपत्तीत जखमी झालेल्या पुरुष व नातेवाईकांची सेवा-सुश्रूषा करणे, हे स्त्रियांना सामाजिक दुय्यमत्व असल्यामुळे त्यांच्याकडूनच अपेक्षित असते. आपत्तिग्रस्तस्त्रियांचं शारीरिक शोषणही होत असतं. हसनाळ याला अपवाद नाही.
लहान मुलं म्हणजे उद्याची सुजाण आणि भावी पिढी असते. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचा सामना कोवळ्या वयातील या मुलांनाही करावा लागतो. अपघाताचे बळी ठरलेले आई-वडील व नातेवाईक,गरिबीमुळे किंवा जातवर्गीय विषमतेमुळे होणारी कुचंबणा, आर्थिक हतबलता, अन्नटंचाईमुळे होणारे कुपोषण, वयामुळे असणारं इतरांवरचं अवलंबित्व, सहानुभूतीसाठी भेटायला येणाऱ्या राजकीय व्यक्ती, संस्था, कार्यकर्ते, बाहेरगावचे नातेवाईक या सर्वांपुढे पुन्हा-पुन्हा होत जाणारी दुःखाच्या वर्णनाची पुनरावृत्ती, अशा अनेक संकटांचा सामना ही लहान मुलं करत असतात.
किमान गरजा भागवण्यासाठीसुद्धा दयेची याचना करणारे त्यांचे आई-वडील, नातेवाईक, गावकरी असं चित्र या लहानग्या मुलांना बघावं लागत होतं. त्यासोबतच पूर ओसरल्यानंतरही दोन-तीन दिवस येणारा मुसळधार पाऊस, घरात ठेवलेलं व पाण्यामुळे कुजलेलं धान्य, मेलेली जनावरे यामुळे प्रदुषित झालेलं वातावरण, बॅक्टेरियल इन्फेक्शन यामुळे गावातील लहान मुलांना आजारपणाला सामोरे जावे लागलं. यात भरीस भर म्हणून की काय यातल्या एका पाच वर्षांच्या लहान मुलाला रात्रीत झोपेत सर्पदंश झाला. पुराच्या पाण्यात असलेले साप पूर ओसरल्यानंतर कोरड्या जागेच्या शोधात आणि निवारा शोधण्यासाठी वस्तीत शिरले होते. अशा एकापाठोपाठ एक समस्यांनी पूरग्रस्त लोकांना ग्रासले. त्यात या लहान बालकांचे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व शैक्षणिक नुकसान झाले. सत्यशोधन अहवाल समितीच्या असं लक्षात आलं की, महापुरातील पाण्यामुळे आता या लहान मुलांजवळ अंगावरील कपड्यांशिवाय काहीच नाही. ना शैक्षणिक साधनं ना खेळणी!
चीन व जपान यांसारख्या प्रगत देशात त्सुनामी, वादळं, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याचे व आपला जीव वाचवण्याचे प्रशिक्षणनागरिकांना व लहान मुलांनाही दिले जाते. अनेक प्रगत देशामध्ये लहान मुलांच्या आरोग्य व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी ही पूर्णपणे सरकारवर असते. त्यामुळे आपत्ती आल्यास पुढच्या पिढीचे नुकसान कमीतकमी होते. भारतासारख्या देशात लहान मुलांच्या बाबतीत हा विचार अभावानेच केला जातो. अशा परिस्थितीत मुलांची शाळा व अभ्यासक्रम पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्या दुःखाची दाहकता कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, खेळ, मनोरंजन व वाचन अशा बाबींची तजवीज करून त्यांचे मनोबल वाढवणे अपेक्षित होते. शासनाने तातडीने मानसोपचारतज्ज्ञ, बालशिक्षणतज्ज्ञ आणि इतर अधिकारी वगैरे नेमून या मुलांचे जीवन पूर्ववत करण्याचे काम करायला पाहिजे होते. यातले काहीही झाले नाही. उलट, आहे ती शाळा बंद पडली.
हसनाळ गावी प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ 20 आहे. प्राथमिक शाळा गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर दूर आहे. ज्या ठिकाणी गावातील लोकांचे पुनर्वसन होणे निर्धारित होते, त्या ठिकाणी शाळेची इमारत बांधलेली आहे. परंतु, त्या इमारतीत पूरग्रस्त लोकांचे सामान असल्यामुळे सध्याफक्त एकाच हॉलचा उपयोग वर्ग भरण्यासाठी होतो. महापुराच्या भीषण घटनेनंतर जवळजवळ एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही ही प्राथमिक शाळा सुरू झालेली नव्हती, कारण शाळेत फक्त पाच विद्यार्थी होते. आणि तेही पूरग्रस्त असल्यामुळे येऊ शकत नव्हते.आर्थिक परिस्थिती जरा बरी असलेले उरलेले पंधरा विद्यार्थी महापुराच्या आधीपासूनच गावापासून वीस किलोमीटर दूर असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात होते.काही सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक यांनी मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवून मदत केली; परंतु, संस्थाचालकांनी मात्र कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक संस्था या अत्यंत संवेदनाहीन आणि फक्त व्यवहारी असतात, हे पुन्हा सिद्ध झाले.
हेही वाचा - इर्शाळवाडी : निसारगाचा असंही एक धडा (नागेश टेकाळे)
प्रशासकीय नियोजन सुयोग्य नसेल तर एखादी भीषण घटना घडून गेल्यानंतर त्याची दाहकता आणखी वाढते. हसनाळ दुर्घटना घडून वीस दिवस झाल्यानंतरही गावातील चित्र अतिशय विदारक होतं. ज्या घरांमध्ये कितीतरी पिढ्या नांदल्या, अनेकांचे नवीन संसार बहरले, फुलले, त्या घरांमध्ये घराच्याच मातीचे ढिगारे, पडझड झालेल्या विटा, पुराचा गाळ, चिखलमातीत बरबटलेले कपडे, भांडीकुंडी व अन्य घरगुती सामान, इलेक्ट्रॉनिक वस्तू इतस्ततः विखुरलेल्या होत्या. गाळात फसलेल्या होत्या. भिंतींवर देवांच्या तस्वीरी भिजलेल्या अवस्थेत वाकड्यातिकड्या लोंबकळत होत्या. पाण्यासोबत वाहून गेलेल्या गाद्या, उशा, मुलांची दप्तरं, पुस्तकं, वह्या रस्त्यावरच्याचिखलात माखून, वाळून गेल्या होत्या. घरातील कपडे अर्धवट उघड्या छतांच्या कौलांवर भिजून पडले होते, काही कुटुंबं आपल्या उघड्याबोडक्या चिखलगाळ घरात काही सापडेल का, याचा शोध घेत होती. तीन-चार दिवस पाण्यात बुडालेली झाडं, शेतातील पिकं सडून गेली होती. संपूर्ण गाव वर्षानुवर्षांपासून खंडहर होऊन पडलेलं आहे की काय असं दिसत होतं.
अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा फक्त एक शहर किंवा एक गावच उध्वस्त होत नाही; तर तिथली कैक वर्षांपूर्वीची अख्खी संस्कृती नष्ट होत असते; एखादं गाव आपल्या रीती-भाती, भाषा-बोली आणि संस्कृतीनिशी वर्षानुवर्ष नांदत असतं. भौतिकरित्या त्याचं पुनर्वसन जरी झालं; तरी सांस्कृतिकदृष्ट्या त्याची पुनर्बाधणी पुन्हा होऊ शकत नाही. एखादं छोटसं रोपटं एका जागेवरून उपटून दुसरीकडे लावल्या जातं तेव्हा तिथली माती त्याला आपल्यात लवकर सामावून घेत नाही. तशीच स्थिती त्या गावाची होते. जातीपातीच्या आणि सत्तेच्या भिंती आपल्या मनात घेवून वावरणाऱ्या समाजात या स्थलांतरित कुटुंबांना कधीकधी अनेक प्रकारच्या त्रासाला व छळालाही सामोरे जावे लागते. कधी जातीपतींमुळे आलेला उपेक्षितपणा तर कधी 'उपरे' म्हणून वाट्याला आलेला मानसिक, शारीरिक, लैंगिक छळ यांना सोसावा लागतो. आपल्या मायभूमीतून निघून यावं लागल्याच्या दुःखद आठवणी आणि नव्या ठिकाणी रुजण्यासाठीचा संघर्ष याच्या वेदना सोसाव्या लागतात. हे वाटतं तितकं सोप्पं नक्कीच नाही. त्यातून एक प्रकारचा सांस्कृतिक उपरेपणा त्यांच्या वाट्याला येत असतो.
नैसर्गिक आपत्ती ही प्रत्येक वेळी 'नैसर्गिक' असतेच असे नाही. परंतु संवेदनाहीन सत्ताधारी वर्ग तसे भासवून निम्न जातवर्गीयांच्या हितसंबंधांकडे डोळेझाक करतो, असे इतिहास सांगतो. अशी डोळेझाक न करू देण्याची आठवण हसनाळ दुर्घटनेने आपल्याला करून दिली आहे .
- विनोद गोविंदवार, सारिका उबाळे, अनंत राऊत, दिलीप चव्हाण
सर्व लेखक नांदेडनिवासी असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.
प्रातिनिधिक संपर्क - sarikaubale077@gmail.com
Tags: हसनाळ मुखेड तालुका मुखेड नांदेड महापूर अतिवृष्टी धरण पुनर्वसन लेंडी नदी विस्थापित महिला जातवर्ग मुले विस्थापन Load More Tags
Add Comment