अलविदा एनडीटीव्ही!

एनडीटीव्ही हे नाव राहील, एनडीटीव्ही ही कंपनीही राहील परंतु जे काही उरेल त्यामध्ये एनडीटीव्ही नसेल.

caravanmagazine.in

कर्जाची दहा वर्षांची मुदत 2019 मध्ये संपली. त्यानंतर केव्हाही व्हिपीसीएल त्यांच्याकडील कर्जरोख्यांचं रुपांतर शेयरमध्ये करायला मोकळी होती. या दरम्यान अदानी समूहाने व्हीपीसीएल ही कंपनी 114 कोटी रुपयांना विकत घेतली. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार हा व्यवहार अदानी समूहाने ‘सिक्युरीटीज अ‍ॅण्ड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (सेबी) ला कळवला. व्हीपीसीएलकडील एनडीटीव्हीच्या कर्जरोख्याचं रुपांतर शेयर्समध्ये करण्याचा अदानी समूहाचा मार्ग मोकळा झाला. आरआरपीआरएच, अर्थात राधिका रॉय आणि प्रणोय रॉय यांच्याशी सल्लामसलत न करता एनडीटीव्हीचे 29.18 टक्के शेयर्स अदानी समूहाच्या मालकीचे झाले. कंपनीच्या मूळ मालकाची अनुमती न घेता हे घडलं म्हणून या व्यवहाराला ‘होस्टाइल टेकओव्हर’ म्हणतात.

भारतात टेलिव्हिजन पत्रकारितेची पायाभरणी करणार्‍या प्रणोय रॉय यांनी वयाच्या 74 वर्षी पुनःश्च हरिओम करून ‘एनडीटीव्ही’ ही माध्यम कंपनी ताब्यात ठेवावी वा नवीन माध्यम कंपनीची सुरुवात करावी; अन्यथा गोदी मिडिया जनमताची ससेहोलपट करेल अशी चिंता अनेकांना वाटते. रविश कुमारने एनडीटीव्हीचा राजीनामा दिल्यानंतर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर इत्यादी समाजमाध्यमांवर हा सूर ऐकू येत होता.

‘न्यूज लाँड्री’ या स्वतंत्र माध्यम कंपनीने देशातील काही प्रमुख वृत्तवाहिन्यांवरील लोकप्रिय टॉक शो, अर्थात चर्चा-कार्यक्रमांचा अभ्यास केला. हिंदू-मुस्लीम या विषयावर सर्वाधिक चर्चा घडवून मुसलमानांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं जातं आणि समाजकल्याण, सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, महागाई, पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती या प्रश्नांना फारसं स्थान मिळत नाही. या चर्चा-कार्यक्रमांमध्ये सत्ताधार्‍यांपेक्षा विरोधी पक्षांची समीक्षा करण्यालाच प्राधान्य दिलं जातं असं या अभ्यासात दिसून आलं. भय, तिरस्कार, द्वेष, तुच्छता या कमालीच्या प्रखर भावनांना गोदी मिडिया साद घालतो आणि जनमताला कह्यात घेतो. यामध्ये एनडीटीव्हीचं, विशेषतः रविश कुमारचं वेगळेपण ठळकपणे दिसतं. हिंदू-मुस्लीम वा अन्य कोणत्याही विषयाची हाताळणी करताना रविश कुमार सामाजिक ध्रुवीकरण टाळतो. सहानुभूती, उदारता, सहिष्णू वृत्ती यांना आवाहन करतो.

कालावधी : 1 मार्च ते 19 जून 2022
(संशोधन—सोहीनी बानर्जी, मानन शिवहरे, न्यूज लाँड्री, 29 जून 2022)

भय, द्वेष, तिरस्कार, तुच्छता या प्रखर भावनांना हात घालणारी वक्तव्यं करून मतदारांना कह्यात घेण्याचं काम अनेक राजकारणी करतात. त्यामुळे प्रातिनिधिक लोकशाही नेहमीच बहुसंख्यांकवाद आणि एकाधिकारशाहीच्या सावटाखाली असते. फेक न्यूज वा खोट्या बातम्या भय, द्वेष, तिरस्कार, तुच्छता या भावनांच्या लाटेवर स्वार झालेल्या असतात. अशा परिस्थितीत सहानुभूती, सहिष्णुता, उदारता या मूल्यांचा पुरस्कार लोंढा प्रसारमाध्यमांनी करणं गरजेचं असतं. बातमी ताजी हवी, सत्य हवी, पूर्ण हवी आणि निःपक्षपाती हवी ही पत्रकारितेची मूल्यं अँग्लो-सॅक्सन पत्रकारितेत विकसित झाली. त्यामुळे माध्यम कंपनी स्वतंत्र असली पाहिजे, कंपनीच्या मालकाच्या विरोधातही बातमी देण्याचं स्वातंत्र्य पत्रकाराला असलं पाहिजे या धारणेतून ‘ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ची उभारणी झाली. ही कंपनी ब्रिटीश सरकारच्या मालकीची आहे परंतु ब्रिटीश सरकारच्या विरोधात बातम्या देण्यात ‘बीबीसी’ कधीही कुचराई करत नाही. अशा प्रकारच्या स्वतंत्र माध्यम कंपनीची उभारणी करण्याची गरज प्रणोय रॉय यांना 1980 च्या दशकात वाटू लागली.

कालावधी : 1 जुलै ते 31 जुलै 2022
(न्यूज लाँड्री, दिनांक 13 ऑगस्ट 2022)

ऐंशीच्या दशकात भारतातील टेलिव्हीजन हे माध्यम वयात येऊ लागलं होतं. मात्र वर्तमानपत्रं असोत की टेलिव्हीजन, जगात काय घडतंय याचं साक्षात दर्शन भारतीयांना होत नव्हतं. प्रणोय रॉय यांचं उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये झालं. शेती अर्थशास्त्रात त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्यानंतर इंग्लडमधील चार्टर्ड अकौंटंटची परिक्षाही दिली. ते अर्थशास्त्री होतेच परंतु उत्तम संघटक आणि उद्योजकही होते. म्हणून तर ‘वर्ल्ड धिस विक’ या कार्यक्रमाची संकल्पना त्यांनी मांडली, दूरदर्शनकडून त्याला मंजूरीही मिळवली आणि प्रॉडक्शन हाऊस स्थापन करून या कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी सुरु केली. त्यावेळी भारतात दूरदर्शनशिवाय अन्य कोणतीही उपग्रह वाहिनी नव्हती. 1984 च्या सार्वत्रिक निवडणूक निकालांच्या चर्चेत त्यांनी ‘सेफॉलॉजी’चा परिचय भारताला करून दिला. त्यांनी वर्तवलेले अंदाज कमालीचे अचूक निघाले. निवडणुक निकालांच्या विश्लेषणाचा त्यांचा कार्यक्रम त्यावेळी कमालीचा गाजला. त्यामध्ये चर्चा होत्या आणि विविध मतदारसंघांतील उमेदवार, राजकीय नेते यांच्या मुलाखती वा बाईट्सही होते. त्याशिवाय वार्ताहर तेथील मतदारांच्या प्रतिक्रियाही घेत असे. भारतीय टेलिव्हिजनवर हे प्रथमच घडलं. बातमी वा माहिती मिळवण्यासाठी वार्ताहराने प्रत्यक्ष घटनास्थळी जायचं असतं, तिथलं चित्रण करायचं असतं, संबंधितांशी बोलून माहिती व प्रतिक्रिया घ्यायच्या असतात आणि विविध दृष्टिकोनांना बातमीत स्थान द्यायचं असतं, ही मूल्यं भारतीय पत्रकारितेत रुजवण्यात प्रणोय रॉय यांचा सिंहाचा वाटा आहे. टेलिव्हिजन पत्रकारितेच्या उदयानंतर विद्वान संपादकांच्या युगाचा अस्त झाला. ‘विचार’ व ‘मतं’ नाहीत, तर ‘बातमी’ व ‘माहिती’ हा पत्रकारितेचा आत्मा असतो ही धारणा रुजू लागली. त्यामुळे टेलिव्हिजन माध्यमात बातमीदार-संपादक ही संकल्पना रुजली. विनोद दुआ, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, श्रीनिवास जैन, रविश कुमार अशा किमान दोन पिढ्या प्रणोय रॉय यांनी घडवल्या.

या काळातच एनडीटीव्ही या प्रॉडक्शन हाऊसतर्फे दूरदर्शनवर रोज एक राष्ट्रीय बातमीपत्र सादर होऊ लागलं. देशातील सर्व प्रमुख राज्यांमध्ये एनडीटीव्हीने प्रशिक्षित वार्ताहर नेमले. दूरदर्शनचे सर्व निकष व नियम पाळूनही या बातमीपत्राचा दर्जा उत्तम होता आणि ते कमालीचं लोकप्रियही झालं. त्यामुळेच ‘स्टार इंडिया’ या कंपनीने वृत्तवाहिनी चालवण्याचं कंत्राट एनडीटीव्हीला दिलं. साहजिकच दूरदर्शनसोबतचं कंत्राट रितसर नोटीस देऊन एनडीटीव्हीने गुंडाळलं. त्यामुळे नोकरशहा नाराज झाले. त्यांनी एनडीटीव्हीवर कंत्राटातील अटींचा भंग केल्याची केस केली. ही केस खूप वर्षं चालली होती. सर्वोच्च न्यायालयाने एनडीटीव्हीला निर्दोष ठरवलं. असो. स्टार इंडियासाठी वृत्तवाहिनी चालवायची तर एनडीटीव्हीने प्रॉडक्शन हाऊस म्हणून काम करण्यापेक्षा माध्यम कंपनीच सुरु करावी असा विचार सुरु झाला. प्रशिक्षित मनुष्यबळ होतं, तंत्रज्ञान होतं, बाजारपेठीची जाण होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एनडीटीव्ही हा ब्रँण्ड अर्थातच विश्वासार्हता स्थापन झाली होती. 2003 साली एनडीटीव्ही स्वतंत्र माध्यम कंपनी बनली. इंग्रजी आणि हिंदी अशा दोन वृत्तवाहिन्या सुरु झाल्या.

एनडीटीव्ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. एनडीटीव्हीची प्रमोटर कंपनी होती, ‘आरआरपीआर होल्डिंग प्रा. लि.’ (आरआरपीआरएच) ही कंपनी राधिका रॉय आणि प्रणोय रॉय यांचीच होती. या कंपनीकडे एनडीटीव्हीचे 29.18 टक्के शेयर्स होते. एनडीटीव्ही चालवण्यासाठी या कंपनीने ‘विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड’ (व्हीसीपीएल) या कंपनीकडून 403.85 कोटी रुपये कर्ज घेतलं. त्यासाठी प्रमोटर इक्विटी म्हणजे एनडीटीव्हीचे 29.18 टक्के शेयर्स गहाण ठेवले. कर्जाची मुदत होती 10 वर्षं. या काळात कर्जफेड नाही झाली तर सदर व्हाऊचर्सचं रुपांतर शेयर्समध्ये होईल, म्हणजे व्हिसीपीएलला एनडीटीव्हीमध्ये 29.17 टक्के मालकी हक्क मिळेल ही अट आरआरपीआरएच या कंपनीने मान्य केली. व्हीसीपीएल ही कंपनी स्थापन होऊन 14 वर्षं झाली परंतु या कंपनीकडे स्वतःची काहीही मालमत्ता नाही. या कंपनीकडे एनडीटीव्हीच्या कर्जरोख्यांशिवाय काहीही नाही. म्हणजे कॉर्पोरेट फायनान्स करणं हा काही या कंपनीचा व्यवसाय नव्हता. एनडीटीव्हीला 403.85 कोटी रुपये देण्याएवढी रक्कम व्हीपीसीएलकडे आली कुठून? तर हे पैसे अंबानी समूहाच्या कंपनीकडून एका साखळीद्वारे आले. या कर्जाच्या अटी-शर्ती अंबानी समूहानेच निश्चित केल्या होत्या. त्यानुसार भांडवल उभारणीसाठी अन्य कोणती कंपनी स्थापन करायची तर एनडीटीव्हीला व्हीपीसीएलची मान्यता घेणं बंधनकारक होतं.

कर्जाची दहा वर्षांची मुदत 2019 मध्ये संपली. त्यानंतर केव्हाही व्हिपीसीएल त्यांच्याकडील कर्जरोख्यांचं रुपांतर शेयरमध्ये करायला मोकळी होती. या दरम्यान अदानी समूहाने व्हीपीसीएल ही कंपनी 114 कोटी रुपयांना विकत घेतली. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार हा व्यवहार अदानी समूहाने ‘सिक्युरीटीज अ‍ॅण्ड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (सेबी) ला कळवला. व्हीपीसीएलकडील एनडीटीव्हीच्या कर्जरोख्याचं रुपांतर शेयर्समध्ये करण्याचा अदानी समूहाचा मार्ग मोकळा झाला. आरआरपीआरएच, अर्थात राधिका रॉय आणि प्रणोय रॉय यांच्याशी सल्लामसलत न करता एनडीटीव्हीचे 29.18 टक्के शेयर्स अदानी समूहाच्या मालकीचे झाले. कंपनीच्या मूळ मालकाची अनुमती न घेता हे घडलं म्हणून या व्यवहाराला ‘होस्टाइल टेकओव्हर’ म्हणतात.

विमानतळ, बंदर, पायाभूत सुविधांचे प्रकल्प अशा नानाविध क्षेत्रांत हातपाय पसरलेल्या अदानी समूहाला मिडिया वा प्रसारमाध्यमांमध्ये गुंतवणूक करायची आहे. ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेचा ‘क्विंट’ हा फलाट अडानी समूहाने या वर्षीच विकत घेतला. गौतम अडानी यांनी ‘फायनान्शिअल टाइम्स’ या वर्तमानपत्राला सांगितलं की, त्यांना ग्लोबल फूटप्रिंट असणारी वृत्तवाहिनी सुरु करायची आहे. त्यासाठी त्यांनी प्रणोय रॉय यांनाच त्याचं प्रमुखपद देऊ केलं होतं. परंतु ती बोलणी पूर्ण झालेली नाहीत. ऑगस्ट महिन्यात अदानी समूहाने एनडीटीव्हीचे 29.18 टक्के शेयर्स स्वतःच्या नावावर केले आणि आरआरपीआरएच ही कंपनी ताब्यात घेतली. प्रणोय रॉय आणि राधिका रॉय यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. एनडीटीव्हीची प्रमोटर कंपनी अदानी समूहाच्या मालकीची झाली. 29 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रणोय रॉय आणि राधिका रॉय यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल चेंगलवारायण यांची अदानी समूहाने या कंपनीचे संचालक म्हणून नियुक्ती केली. ‘सेबी’च्या नियमानुसार अदानी समूह एनडीटीव्हीचे 26 टक्के शेयर्स विकत घेण्यासाठी ओपन ऑफर आणू शकतो. त्यानुसार अदानी समूहाने 1 कोटी 67 लाख शेयर्स खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर दिली आहे. त्यासाठी एका शेयरची किंमत 294 रुपये निश्चित केली आहे. ‘बीएसई’मध्ये आज एनडीटीव्हीच्या शेयरची किंमत 300 रुपयांपेक्षा अधिक असताना अदानी समूहाला कोण आपल्याकडचे शेयर्स विकेल? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.

एनडीटीव्हीचे 15.94 टक्के शेयर्स प्रणोय रॉय यांच्याकडे आहेत. 16.32 टक्के शेयर्स राधिका रॉय यांच्याकडे आहेत. अदानी समूहाकडे 29.18 टक्के शेअर्स आहेत. रिटेल म्हणजे वैयक्तिक भागधारकांकडे 12.57 टक्के शेयर्स आहेत. कॉर्पोरेट इन्वेस्टर्सकडे 9.61 टक्के शेयर्स आहेत, फॉरीन पोर्टफोलियो इन्वेस्टर्सकडे 14.7 टक्के शेयर्स आहेत, इतरांकडे 1.67 टक्के शेयर्स आहेत. ‘बिझनेस लाईन’ या वर्तमानपत्राच्या बातमीनुसार फॉरीन पोर्टफोलियो इन्वेस्टर्सकडील शेअर्स अदानी समूहाकडे येऊ शकतात. कारण या गुंतवणूकदारांमधील चार कंपन्यांनी सर्वाधिक गुंतवणूक अदानी समूहातच केली आहे. त्यामुळे आजघडीला जरी रॉय दंपतीकडे एनडीटीव्हीचे सर्वाधिक, म्हणजे 31.96 टक्के शेयर्स असले तरीही पाच डिसेंबर रोजी अदानी समूहाने कॉर्पोरेट वा फॉरिन पोर्टफोलियो इन्वेस्टर्सकडून दहा टक्के शेयर्स जरी विकत घेतले, तरी एनडीटीव्हीच्या मालकीतला अदानी समूहाचा हिस्सा रॉय दंपतीपेक्षा अधिक होईल. तीच सर्वाधिक शक्यता आहे.

अशा परिस्थितीत प्रणोय रॉय यांच्यापुढे काय मार्ग आहेत? पहिला मार्ग, अदानी समूहापेक्षा अधिक किंमतीने शेयर्स विकत घेणे. परंतु त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. अन्यथा त्यांनी कर्जफेड केली असती की! दुसरा मार्ग म्हणजे, अन्य कोणत्या तरी बड्या उद्योगपतीला एनडीटीव्हीत गुंतवणूक करण्यासाठी आणणं, जेणेकरून अदानीपेक्षा अधिक किंमत मोजून एनडीटीव्हीचे शेयर्स विकत घेणं शक्य होईल. तिसरा मार्ग असा की, 32.26 टक्के मालकी हिश्श्याद्वारे अदानी समूहाच्या आकांक्षांचे फुगे फोडणं. म्हणजे एनडीटीव्हीच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करणं. गौतम अदानी यांची ऑफर स्वीकारून ‘ग्लोबल न्यूज चॅनेल’चं प्रमुखपद स्वीकारणं, हा चौथा मार्ग असू शकतो. मात्र कोणत्याही मार्गाने गेलात तरी स्वतंत्र माध्यम कंपनीचं स्वप्न हुलकावणीच देणार. एनडीटीव्ही हे नाव राहील, एनडीटीव्ही ही कंपनीही राहील परंतु जे काही उरेल त्यामध्ये एनडीटीव्ही नसेल.

- सुनील तांबे
suniltambe07@gmail.com

Tags: NDTV Adani Group Ambani Pranay Roy Journalism Ravish Load More Tags

Add Comment