दूर असे मुक्काम परंतु संगे माझी कविताराणी...

कवी, गझलकार सुरेश भट यांच्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा

कवी सुरेश भट यांची ही उदास खोली. भट यांना जाऊन तीन दिवस झाले. त्यांना शोधताना हवाही तिथल्या तिथं घुटमळत आहे. भट यांना चालताना आधार देणारी, सवयीच्या स्पर्शाला आसुसलेली काठी, आपली आता कुणाला गरजच नाही म्हणून मुळूमुळू रडतेय कोपऱ्यात. टेबलाच्या खणात औषधाच्या गोळ्या आहेत, कॅप्सूल आहेत. कोणतं औषध केव्हा घ्यायचं, ते वेळापत्रक भटांच्या रंगीबेरंगी अक्षरांत कपाटावर लावलेलं आहे. (आता आजारच गेला; औषधाचं काय काम?) भट गेल्यापासून टेबललॅम्प बंदच आहे...


कविवर्य सुरेश भट यांचं निधन झाले, तो दिवस होता, शुक्रवार, दि. 14 मार्च 2003. मी माझ्या कार्यालयात लोकमतमध्ये होतो. रात्री नऊच्या सुमारास बातमी कळताच त्यांच्या घरी पोहचलो. अगदी दोन मिनिटांचं अंतर. रात्री दोन वाजता कार्यालयीन कामं आटोपून घरी परतताना पुन्हा एकदा गेलो.

घरी पोहचल्यावर झोप येत नव्हती...

चित्रकार अरूण मोरघडे यांच्या सोबत पहिल्यांदा सुरेश भट यांच्या घरी जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. शाळेत  असताना ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे...’ ही कविता अभ्यासाला होती. तेव्हा पुस्तकातील सर्व कवी, लेखक मुंबई-पुण्यालाच राहतात, असा समज होता. त्यामुळं सुरेश भट नागपुरातच राहतात, त्यांना आपण भेटणार आहोत, या कल्पनेनंच मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. त्या भेटीत त्यांना हातातील डायरीत त्यांची स्वाक्षरी मागितली. त्यांनी सहजच दिली. खाली तारीख लिहिली, 31 जुलै 1993. सोबत व्हिजिटिंग कार्डसुद्धा दिलं. त्यावर लिहिलं होतं,

सुरेश भट, कवी आणि पत्रकार
रामकृष्ण मठाजवळ, धनतोली, नागपूर 440012.

पुढं काही वर्षांनंतर एका भेटीत त्यांनी मराठी शुद्धलेखनाची छोटी पुस्तिका (खिसा आवृत्ती) भेट दिली. हा सारा ठेवा आजही जपून ठेवला आहे.

...रात्रभर या गोष्टी आठवत होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सातच्या सुमारास भट यांच्या घरी पोहचलो. भट यांच्या नेहमीच्या उठण्या बसण्याच्या खोलीत भयाण शांतता होती. खोलीत नेहमीचा पलंग नव्हता. त्याच जागेवर त्यांचं पार्थिव खाली ठेवलेलं होतं. पत्नी पुष्पा, कन्या गौरी आणि काही महिला बाजूलाच बसल्या होत्या. सकाळपासूनच चाहत्यांनी गर्दी केली. रोखठोक भाषेत बोलणारे भट एक शब्दही बोलत नव्हते. एवढं अबोल त्यांना कुणी बघितलंच नव्हतं. भट नेहमी ज्या पलंगावर बसत, निजत तो पलंग बाहेर अंगणात काढलेला होता. त्यावर कुणी बसलं नव्हतं. त्यावर होती, घडी न उलगडलेली पाच-सहा वर्तमानपत्रं. भट यांच्या मोठ्या छायाचित्रांसह ठळक शीर्षकं होती,

-सुरेश भट यांचे निधन.

घरी चाहत्यांची गर्दी होऊ लागली. राज्याचे मंत्री आणि सुरेश भट यांचे स्नेही अनिल देशमुख सकाळीच पोहचले होते. ते सगळी व्यवस्था पाहत होते. नियोजन करीत होते.

दुपारी साधारण बाराच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. गुलाबाच्या फुलांनी सजवलेल्या मेटाडोरमध्ये भट यांचं पार्थिव ठेवण्यात आलं. भट यांचं 1970 च्या सुमारास काढलेलं हसरी मुद्रा असलेलं कृष्णधवल छायाचित्रही तिथं ठेवण्यात आलं होतं. अंत्ययात्रेत भटांचे चाहते त्यांच्या कविता तल्लीनतेनं गात होते. त्यातील एक कविता होती,

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !

याच ओळींचं बॅनर मेटाडोरला लावलेलं होतं. मेटाडोरमध्ये भट यांचं डोकं मांडीवर घेण्यासाठी दोन भगिनी होत्या, एक सविता मेश्राम, दुसऱ्या प्रमिला नारनवरे. सविता यांना विचारलं तर त्या म्हणाल्या, भट मला वडिलांप्रमाणं होते. ते आमच्या घरी आले होते. जेवणही केलं होतं. माझ्या मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी त्यांनी पाचशेची नोट मोडली होती. प्रमिला यांच्यावर भट यांनी लेख लिहिला होता, 'तिने जिंकला जीवनसंग्राम'. त्या भट यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना आणून देत असत.

बंडू होले हा रिक्षाचालक. अधूनमधून भट यांच्याकडं यायचा. काही मदत करू लागायचा. तो जेवायचा 'आनंदाश्रम' हॉटेलमध्ये. त्याच्या जेवणाचे 900 रुपये भट देत असत. त्यांचे असे अनेक जिवलग, सगेसोयरे अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

साधीसुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी
ह्यांच्यात मी पाही तुक्या, ह्यांच्यात नाम्याची जनी...

मोक्षधाम घाट येथे अंत्ययात्रा पोहोचल्यावर सविता मेश्राम आणि प्रमिला नारनवरे यांनी बुद्धवंदना म्हटली. सुरेश भट यांचे पुत्र चित्तरंजन यांनी पित्याच्या पार्थिवाला अग्नी दिला, तेव्हा अनेकांना हुंदका अनावर झाला. 

शोकसभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत मनोहर होते. राज्य शासनाच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करताना मंत्री अनिल देशमुख म्हणाले, ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक आपल्यापासून दूर निघून गेला आहे. भट यांनी कवितेच्या माध्यमातून साऱ्या महाराष्ट्राला जिंकले. त्यांच्या शब्दांना लता, आशा यांनी अजरामर केले. मराठी गझलेचा प्रयोग भट यांनी यशस्वी करून दाखविला, माझ्या पत्नीला ते मुलीप्रमाणं मानत. तिनं दिवाळीला चकल्या आणि चिवडा पाठवला होता. दहा मिनिटांत त्यांचा फोन आला. त्यांनी स्पष्ट अभिप्राय दिला, चिवडा जमला नाही! यावरून त्यांचा स्पष्टवक्तेपणा दिसून येतो.

डॉ. मनोहर म्हणाले, आपण सर्व एका कुटुंबातील आहोत. साहित्य, संस्कृती हे आपलं कुटुंब आहे. आपल्या कुटुंबातील माणसाला अखेरचा निरोप द्यायला आपण एकत्र जमले आहोत. सुरेश भट यांच्याशी माझी अनेक वर्षांची मैत्री होती. कुमार सप्तर्षी, अनंत अहमदाबादकर आदी आम्ही रात्र न रात्र चर्चा करीत असू. भट हे गाणारं वादळ होते. गाणारं पहाड होते. 15 मार्च 1961 ला त्यांचा 'रूपगंधा' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. आजचाही दिवस तोच आहे. या संग्रहाच्या शेवटी 'स्मरण' नावाची एक कविता आहे, ती अशी-

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी
काय सांगावे तुला मी? काय मी बोलू तुझ्याशी 
राख मी झाल्यावरी, गीते तुला माझी स्मरावी...
(हे गीत महेंद्र कपूर यांच्या आवाजात प्रसिद्ध आहे.)

डॉ. मनोहर म्हणाले, गझल ही न संपणारी मैफल आहे. ती मृत्यूनं कधी संपत नसते. भट यांचा मृत्यू झालेला नाही. हा त्यांच्या शरीराचा मत्यू आहे. भट बिनधास्त जगले. गझलेला त्यांनी व्यक्तिमत्त्व प्राप्त करुन दिलं. महाराष्ट्राच्या साहित्यिक अभिरुचीच्या वतीनं मी त्यांना मानाचा मुजरा करतो.

अंत्यदर्शनासाठी मोमीनपुरा येथून आलेले प्राचार्य डॉ. अझहर हयात म्हणाले,
यूं तो आते हैं दुनिया में सभी मरने के लिए
मौत उसकी, जिसका ज़माना करे अफसोस

●●●
माझा कराल शोध, परि सापडेन का?

अता न गाइन मी रडगाणे अता न येइल नयनी पाणी,
दूर असे मुक्काम परंतु संगे माझी कविताराणी... 

सुरेश भट दूरच्या मुक्कामाला निघून गेल्यानंतर तीनच दिवसांनी (दि. 17 मार्च) भट यांच्या घरी भेट दिली. श्रीमती पुष्पा भट खिन्न बसल्या आहेत. भट बसायचे ती खोलीही खिन्न. त्यांच्या कपाटातील ध्वनिफितींचा खजिना पडून आहे तसाच, निपचित! गझलेचे शब्द न शब्द निखळून पडले आहेत, उल्केप्रमाणं. गायिका आबिदा परवीनवर ते दिल-ओ-जानसे प्यार करायचे. आशा भोसलेंवरही त्यांचा मोठा जीव. भटांचे ते हसरे छायाचित्र भिंतीला टेकून ठेवले आहे. त्याला पुष्पहार घातला आहे. फुलं वाहिली आहेत. मंद ज्योतीचा दिवा जळत आहे.

भटांना शोधताना हवाही तिथल्या तिथं घुटमळत आहे. पिंगा घालत आहे. भट यांना चालताना आधार देणारी, सवयीच्या स्पर्शाला आसुसलेली काठी आपली आता कुणाला गरजच नाही म्हणून मुळूमुळू रडतेय कोपऱ्यात. टेबलाच्या खणात औषधाच्या गोळ्या आहेत, कॅप्सूल आहेत. कोणतं औषध केव्हा घ्यायचं, ते वेळापत्रक भटांच्या रंगीबेरंगी अक्षरात कपाटावर लावलेलं आहे. (आता आजारच गेला; औषधाचं काय काम?) त्यांच्या लेखांच्या काही मूळ प्रती तिथं आहेत. भट गेल्यापासून टेबललॅम्प बंदच आहे.

टेबलाच्या आत सरकवलेली दिसते ती त्यांची आवडती खुर्ची. तिच्यावर कुणी बसलेलं त्यांना खपत नसे. कपाटात शब्दकोश तरी किती प्रकारचे. ऊर्दूचे शब्दकोश, इंग्रजीचे शब्दकोश, मराठी शब्दांचे अर्थ मराठीतूनच सांगणारा शब्दकोश. 'गझल एक सफर' नावाचा ग्रंथ, इस्लामची माहिती सांगणारा ग्रंथ, राहुल सांकृत्यायन यांच्या जीवनकार्याची माहिती सांगणारा ग्रंथ... दुसऱ्या खोलीतही बरीच पुस्तकं. किती अभ्यास करायचा हा माणूस!

भट हे संगीत आणि गझलांचे मोठे दिवाने होते. लतादीदी, आशाबाई, सुरेश वाडकर आदींच्या आवाजातील भट यांची गाणी असलेली एक ध्वनिफीत दिसली. त्यावर भट यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणं लाल, हिरव्या, काळ्या रंगांच्या शाईनं गीतांची नावं लिहिली आहेत. ध्वनिफितीला स्वतःच नाव दिलं आहे- 'गाणी सुरेश भटांची'. बाजूला स्वाक्षरीही केली आहे.

आबिदा परवीनशिवाय फरीदा खानम, मेहदी हसन, नूरजहाँ, नुसरत फतेह अली, साबरी ब्रदर्स आदींच्या आवाजातील गझला इथं आहेत. भीमराव पांचाळे यांच्या आवाजातील  मराठी गझला आहेत. ध्वनिफितीवर भटांसोबत पांचाळे यांचं छायाचित्र आहे. आशा-खय्याम नावाची ध्वनिफीत आहे. लताच्या आवाजातील कबीराच्या रचना आहेत.

भट यांना शास्त्रीय संगीताची फार आवड होती, हे किती जणांना ठाऊक आहे? पं. सी. आर. व्यास, पं. जसराज, किशोरी आमोणकर, शोभा गुर्टू, बाल मुरलीकृष्णन, अपर्णा पणशीकर, पं. राजन- साजन मिश्रा, डॉ. प्रभा अत्रे, राशीद खान, रविशंकर (सितार), सत्यशील देशपांडे, संजीव अभ्यंकर आदींच्या ध्वनिफिती आहेत.

नागपूर विद्यापीठात भट यांची गझलेवर व्याख्यानं झाली होती. त्या ध्वनिफिती आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या 'एल्गार' या कार्यक्रमाची ध्वनिफीत त्यांनी सांभाळून ठेवली आहे. त्यावर तारीख टाकली आहे- 20 मे 2000.

'गझलेची बाराखडी' लेख पाठवा!’
सुरेश भट यांचं निधन झालं दि. 14 मार्चला. प्रा. विसुभाऊ बापट यांनी दि. 10 मार्चला भट यांना लिहिलेलं पत्र घरी दि. 15 मार्चला पोहचलं. त्यात लिहिलं होतं, "मा. सुरेश भट, आपण 'गझलेची बाराखडी' या विषयावर लेख पाठवणार आहात. त्या लेखासोबत आपला एक फोटोही पाठवावा, ही विनंती. लेखाची वाट पाहत आहे."

दुसरं पत्र भुसावळ येथील महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचे अध्यक्ष अनिल इंगळे यांचं होतं. 
"मा. सुरेश भट, आपल्याला अकादमीतर्फे 11 हजार रुपयांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे." भट आधीच निघून गेले होते लांबच्या प्रवासाला. मनामनाला चटका लावून.

गेलो निघून दूर पुन्हा आढळेन का?
माझा कराल शोध, परि सापडेन का?
अशी ही माझ्या जीवाची संपली यात्रा
जिथे मी भेटलो होतो, तिथे मी थांबलो नाही...


लग्नाआधीपासूनच ‘त्यांची’ गाणी आवडत होती
'गीत तुझे मी गाईन आई' हे सुरेश भट यांनी लिहिलेलं आणि अमर शेख यांनी गायलेलं गाणं मी फार आधी ऐकलं होतं. भट यांच्याशी कधी भेट होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. दि. 21 मे 1964 चा दिवस. सुरेश भटांशी विवाह झाला. त्याक्षणी मला किती म्हणून आनंद झाला होता... 

एका भेटीत जुन्या आठवणींविषयी छेडलं असता पुष्पाताई भूतकाळात हरवून गेल्या. त्या म्हणाल्या, "मी मूळची पुण्याची. पुष्पा मेहंदळे. अमरावती जिल्ह्यातील माधान येथे 1960-61 अशी दोन वर्षं मी शिक्षिका होते. भट यांची लहान बहीण सुनंदा हीसुद्धा त्याच शाळेत शिकवायची. माझ्यापेक्षा ती थोडी लहानच होती, पण आमची गट्टी जमली. आम्ही एकाच खोलीत राहत होतो. सुरेश भट तेव्हा अमरावतीला राहत. मी पुण्याला जाताना सुनंदाकडं अमरावतीला काही क्षण थांबायचे. मात्र, सुरेश भट यांच्याशी भेटीचा प्रसंग कधी आला नव्हता. एक दिवस माझ्या आत्याचं माझ्या वडिलांना पत्र आलं, की पुष्पासाठी सुरेश भट यांचा विचार करा. एक दिवस तर खुद्द भट यांचंच पत्र आलं, 'बघायला येतो!' 

सुनंदाला काळजी वाटायची, हा कलंदर माणूस. कसं होईल! भट मला बघायला आले. पहिलीच भेट झाली. चर्चा झाल्या. मी विचारलं, ‘‘तुम्हाला काय 'सिक्युरिटी' आहे?’’ त्यांनी काही विचारच केला नव्हता. थोडेसे गोंधळले. असो. आळंदी येथे आमचा विवाह झाला. पंगतीत गमतीजमती झाल्या... ते दिवस कसे उडून गेले हवेत!

पुष्पाताई सांगू लागल्या, भट यांना फोडणीचं वरण अतिप्रिय. इतकी वर्षं वरण करतेय. तरी सूचना करायचे. झणझणीत कर! धणे, लाल मिरची नीट टाक. फोडणी नीट झाली पाहिजे... एकदा वरण जमलं नाही म्हणून ते चिडले. ‘साधं मागतो, तेही जमत नाही तुला?’ असं म्हणायचे. मला अशी सवयच झाली होती.

पुष्पाताई भटांच्या आवडीनिवडीविषयी आणखी सांगू लागल्या. त्यांना फणस, सुरण, केळफुले यांच्या भाज्या आवडायच्या. मी बाजारातून आले की विचारायचे, 'रिक्षातून आलीस का?’ मग गमतीनं म्हणायचे, ‘रिक्षावाल्यानं किती पैसे दिले?’

प्रमिला नारनवरे यांना भट मुलगी मानत. त्या म्हणाल्या, मी फोन केला, की काही विचारण्याआधी ते स्वत:च सांगत, ‘मी जेवणही केलं आणि औषधही घेतलं आहे.’

सुरेश भट यांच्या खोलीत भट दिसत नाहीत, मात्र त्यांचं अस्तित्व अवतीभवती जाणवतं. भटांच्या आठवणींमध्ये हरवताना त्यांच्याच खोलीतील मौन पण सस्मित बुद्ध बरंच काही सांगून जातो.

सैनिकाचं असंही पत्र
पुष्पाताईंनी हिमाचल प्रदेशातून आलेलं एका सैनिकाचं पत्र दाखवलं. त्यानं लिहिलं, ‘भटसाहेब, मला तुमच्या कवितांनी जगण्याचं बळ दिलं आहे. तुमचं दोन ओळींचं पत्र आलं तर आनंद होईल.’

भट गेल्यानंतर साधारण 15-20 दिवसांनी हे पत्र आलं होतं. त्या बिचाऱ्याला भट गेल्याचं ठाऊकच नाही. 4 एप्रिलचं पत्र 9 एप्रिलला मिळालं.
 
तुझेच मी गीत गात आहे!
भट यांना जाऊन तीन वर्षे झाली होती. पुष्पाताई तिथं आता एकट्याच असत. राहिली एकाकी पक्षिणी... त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. डोळ्याला पदर लावत त्या एवढंच म्हणाल्या, 'मला त्यांची सारखी आठवण येते...!'

भटांचं घर ही आता एक सुनी सुनी मैफिल झाली होती. अंगणात नाना प्रकारची लहान- मोठी झाडं. त्यावर नेहमीच पक्ष्यांची किलबिल आणि कुजबूज. पुष्पाताईंना सोबत करण्यासाठी ती अपुरीच. आवळ्याचंही एक झाड. एका पक्ष्यानं आवळा खाली पाडला. त्यांनी तो उचलून ठेवला.

भट गेल्यानंतर, त्यांच्याशी आपले कसे जवळचे संबंध होते, हे सांगणारे अनेक जण भेटत. भट यांची मी मानसकन्या आहे, असा स्वत:चा परिचय देणाऱ्या काही कवयित्री भेटत. पुष्पाताईंना  विचारलं, 'कोण कोण येतं भेटायला?'

या प्रश्नावर त्या सुन्न झाल्या. म्हणाल्या, ‘मला कशाला कोण भेटायला येणार!' योगेश- रत्ना बऱ्हाणपुरे, प्रमिला नारनवरे अशा एक-दोन नावांपलीकडं त्यांना कुणी आठवत नाही.

मुलगा चित्तरंजन नोकरीनिमित्त पुण्याला राहायचा. त्यामुळं त्या एकट्याच राहत. ‘कसा जातो दिवस?’ या प्रश्नावर त्या म्हणाल्या, काही ना काही वाचत बसते. कधी 'दासबोध' तर कधी दुसरं एखादं पुस्तक किंवा मग वर्तमानपत्र पूर्ण वाचून काढते. वेळ जात नाही. क्वचित एखादी कॅसेटही ऐकत बसते. सायंकाळचा फेरफटका रामकृष्ण मठात.

लता मंगेशकरांसोबतची भेट आठवताना त्या सांगू लागतात... चित्तू तेव्हा लहान होता. लहान म्हणजे एक वर्षाचा. हृदयनाथ-लता यांचा मुंबईत कार्यक्रम होता. त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं होतं. माझं फार काही बोलणं झालं नाही लताबाईंशी. त्यांनीच मला 'कसं काय' म्हणून विचारलं. हृदयनाथांनी आम्हाला टॅक्सीनं मुंबईत फिरण्याची व्यवस्था केली होती.

भट गेल्यानंतर हृदयनाथ किंवा लतादीदी कधी आलेत का भेटायला? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘मी कोण? त्यांनी का यावं मला भेटायला?’ भेटणं तर सोडा, भट गेल्यानंतर कुणाचा साधा फोनदेखील आला नाही. मध्यंतरी लता मंगेशकर नागपुरात येऊन गेल्या होत्या. दोन दिवस राहिल्या. व्यग्रतेमुळं त्यांना भेटायला येणं शक्य झालं नसावं.

एकदा गायक भीमराव पांचाळे हे पुष्पाताईंना भेटायला आले होते. सुरेश भटांनी पांचाळे यांना 'गझलनवाज' अशी पदवी दिली होती. पांचाळे म्हणतात, ,"माधव ज्युलियन यांनी गझलची जमीन निर्माण केली. भटांनी त्यात अमृताचं बीजारोपण केलं. त्यांची गझल गेयतेच्या दृष्टीनं परिपूर्ण आहे. त्यात कसलाही फेरफार करावा लागत नाही. ती रचनाच संगीतकाराला संगीत देण्यासाठी उद्युक्त करते. "

पांचाळे हे सुरुवातीला केवळ भटांच्याच गझलांचा कार्यक्रम सादर करीत असत. मुंबईला 11985 मध्ये एका कार्यक्रमात भट आणि पांचाळे प्रथमच मंचावर एकत्र आले. त्यावेळी भट म्हणाले, गझल कशी गावी, असं मला जर कुणी विचारलं, तर मी भीमराव पांचाळेंकडं बोट दाखवीन! पांचाळे यांनी, त्यांना मिळालेला हा सर्वांत मोठा पुरस्कार हृदयाशी जपून ठेवला आहे.

पुष्पाताईंच्या चेहऱ्यावर हसू
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पुष्पाताई दिसल्या. ढगाळ वातावरणामुळं छत्री घेऊन आल्या होत्या. कवी, गीतकार प्रवीण दवणे यांनी त्यांना पहिल्या रांगेत बसवून घेतलं. दवणेंचा कार्यक्रम चांगलाच रंगला. विनोदी किस्से ऐकून पुष्पाताईंच्याही  चेहऱ्यावर हसू फुललं. सुरेश भट गेल्यापासून त्या हसणंच विसरून गेल्या होत्या. त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले, पुष्पाताईंना खूप दिवसांनंतर हसताना बघितलं आणि समाधान वाटलं.

 

वि. सा. संघ म्हणे स्मृती जतन करणार!
विदर्भ साहित्य संघाचे तेव्हाचे कार्याध्यक्ष मनोहर म्हैसाळकर एका भेटीत म्हणाले होते, भटांनी संग्रहित केलेले विविध ज्ञानकोश, हजारो दुर्मीळ ध्वनिफितींच्या खजिन्यासाठी संस्थेच्या संदर्भ ग्रंथालयात विशेष व्यवस्था आम्ही करू. भट यांनी मराठीशिवाय हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषांमधील शब्दकोष व ज्ञानकोषांचा संग्रह केला होता. अनेक गायकांच्या ध्वनिफितींचा खजिना त्यांनी संग्रहित केला होता. तो वि. सा. संघाच्या संदर्भ ग्रंथालयात ठेवण्याची आमची तयारी आहे.

ते म्हणाले, ‘याविषयी मी सुरेश भट यांच्याशी बोललो होतो. यावर मला या दृष्टीनं काही केलं पाहिजे, असं भट म्हणाले होते.’ म्हैसाळकर यांनी श्रीमती पुष्पा भट यांच्याकडं हा विषय काढला. हा संग्रह आमच्या संस्थेसाठी सुपूर्द करू शकाल काय, अशी विचारणा त्यांनी केली होती. याविषयी पुष्पाताईंना विचारलं. त्या म्हणाल्या, यावर मी अद्याप काहीही विचार केलेला नाही. त्यामुळं आताच काही सांगू शकणार नाही.

वि. सा. संघ आणि सुरेश भट यांचा 'सलोखा' जगजाहीर होता. धनवटे रंगमंदिर पाडून त्या जागी सांस्कृतिक संकुल उभारण्याच्या कामात झालेल्या कथित गैरव्यवहाराबद्दल सर्वप्रथम सुरेश भट यांनीच आवाज उठवला होता.

एकदा दुपारी भट यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांचं पलंगावर बसून जेवण सुरू होतं. भाजी कसली होती, आठवत नाही. ती त्यांच्या मनाप्रमाणं नव्हती. त्यांनी पुष्पाताईंना आवाज दिला. त्या आल्या. काहीसं वाकून गुडघ्यावर हात ठेवून दारातूनच विचारलं, ‘काय...झालं... ?’

कुणाला कवितेत किंवा गझलेत मीटर बरोबर नाही, सुधारणा कर, असं सांगावं, त्याप्रमाणं भट म्हणाले, भाजीत तिखट- मीठ बरोबर नाही. त्यात सुधारणा कर.

मला म्हणाले, ‘उठ. ते कपाट उघड. सर्वात खालच्या कप्प्यात बघ. हं. ती निळी  फाइल घे. आण इकडं. उघड. वर असलेला कागद घे.’

वि. सा. संघानं भट यांना 2000 या वर्षी 'जीवनव्रती’ पुरस्कार देऊन गौरविलं होतं. 25 हजार रुपये आणि मानपत्र असं त्याचं स्वरूप. पुरस्कार स्वीकारताना उत्तरादाखल केलेल्या भाषणात ते म्हणाले होते, मी हा पुरस्कार का स्वीकारला? मला पैशाची गरज होती म्हणून!

जगाचा निरोप घेण्याच्या बरोबर एक महिना आधी म्हणजे दि. 13 फेब्रुवारी 2003 रोजी त्यांनी वि. सा. संघाच्या आजीव सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्या निळ्या फाइलमधील वरचा कागद म्हणजे राजीनामा पाठवलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत. ती त्यांनी मला दिली. (ती माझ्या संग्रहात आहे.) काही वेळापूर्वीच त्यांनी कुरियरनं राजीनामा रवाना केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात मी दिलेली भट यांच्या राजीनाम्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळं वि. सा. संघाला ही बातमी सकाळीच कळली. भटांचं पत्र त्यानंतर दुपारी मिळालं असावं.

एक प्रसंग आठवतो. सुरेश भट यांच्या निधनानंतर त्यांच्या विषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी काही संस्थांनी एकत्र येत त्यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाला भट यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी तुफान गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी पुष्पाताईंना सन्मानानं घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्याच घरून भट यांचं फ्रेम केलेलं मोठं छायाचित्रही सोबत घेतलं. रात्री दहाच्या सुमारास कार्यक्रम संपल्यावर आयोजकांपैकी एकानं ते छायाचित्र तिथंच त्यांच्या हातात देत सांगितलं, 'रिक्षा करून जा घरी.' खुद्द पुष्पाताईंनी दुसऱ्या दिवशी मला हा अनुभव सांगितला.

सुरेश भट मराठीतील जयदेव

एकदा ज्येष्ठ समीक्षक डॉ. द.भि. कुलकर्णी यांच्याशी बोलताना सुरेश भट यांचा विषय निघाला. त्यांच्या समीक्षकांच्या नजरेला भट यांच्यातील एक वेगळाच पैलू दिसला.
‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’, ‘मालवून टाक दीप.. चेतवून अंग अंग...’. या आणि अशाच कितीतरी गीतांमधील सुरेश भट यांची नायिका ही स्वतः पुढाकार घेणारी आहे. दुसरं म्हणजे भटांची कविता नादमधुर आहे. या बाबतीत त्यांची तुलना प्रसिद्ध संस्कृत कवी 'गीतगोविंद'कार जयदेव यांच्याशी केली जाऊ शकते. भट हे मराठी कवितेतील जयदेव आहेत, असा निष्कर्ष दभि यांनी काढला.

ते म्हणाले, जयदेव हे बाराव्या शतकात होऊन गेले. त्यांची नायिका पुढाकार घेणारी आहे. सुरेश भट यांनी जयदेव यांच्याच तोडीच्या कविता लिहिल्या आहेत. भटांच्या अनेक गीतांना पं. हृदयनाथ मंगेशकर आणि इतरांनी संगीत दिलं आहे. ती लोकप्रियही झाली आहेत. भटांची कविता ही केवळ गेय आहे, असा सर्वसाधारण समज आहे. ती नृत्यप्रधानही आहे. असा माझा निष्कर्ष आहे. 'चल उठ रे मुकुंदा’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी' ही आणि इतर गाणी उदाहरणादाखल सांगता येतील. भट यांच्या गीतांना केवळ चाल देऊन भागणार नाही. शास्त्रोक्त नृत्यातूनही ती प्रकटली तर त्यातील आशयलावण्य रसिकांना खऱ्या अर्थाने अनुभवता येईल. भट शब्दांमधून ऍक्शन फोटो टिपतात. ते मर्ढेकरांनंतर स्वतःचा संप्रदाय निर्माण करणारे दुसरे कवी आहेत.

दभि म्हणाले, भटांची नायिका पुढाकार का घेते, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. हा पुढाकार आधुनिक स्त्रीचा नाही. गौरी देशपांडे किंवा मेघना पेठे यांचा तो पुढाकार नाही. ही नायिका घरंदाज आहे, कुलीन आहे. जयदेव यांच्या कवितेत राधा ही नायिका आहे. ती कृष्णाशी बोलते. याला 'राधाभाव' म्हणतात. नेमके हेच आपल्याला भटांच्या नायिकेत दिसते. जयदेव यांच्या कविता गेय आहेत, नृत्यानुकूल आहेत. त्यांच्या कवितेतील राधा स्वतः पुढाकार घेणारी आहे. तिच्या शृंगाराचे वर्णन करताना जयदेव यांना कसलाही संकोच वाटत नाही. त्यात कुठंही अश्लीलता नाही की स्वैरपणा नाही.

दभि यांनी आणखी महत्त्वाची माहिती सांगितली. ते म्हणाले, नवीन पिढीला श्रीकृष्ण पोवळे यांचं नाव कदाचित ठाऊक नसेल. त्यांना 'अग्निसंप्रदायी' कवी म्हणत. या कवीच्या कवितेत जी धुंदी दिसते, बेदरकारपणा दिसतो, नेमका तोच भट यांच्या कवितेत दिसतो. भटांचा अनुबंध हा पोवळे यांच्या निकट जाणारा आहे. ही आणखी एक नवी बाब समोर येत आहे. भटांची कविता ही मलमली लावण्य ल्यालेली आहेच, तरी ती अग्नी फुलवणारी आहे.

दभि यांच्या निष्कर्षामुळं, समीक्षकांनी भट यांची दखल घेतली नाही, हा आरोप आता काही प्रमाणात का होईना  मागं पडला आहे.

माझ्या पोह्यांना भटांची दाद; हा मोठा पुरस्कार

‘‘पोहे खाण्यासाठी माझ्याकडं नियमित येणारे सुरेश भट कित्येक दिवसांत आलेच नाहीत. त्याआधी तब्बल आठ वर्षे ते यायचे. पोहे द्यायला थोडाही उशीर झाला तर रागवायचे; पण तो राग खरा नसायचा. त्यात प्रेम होतं, जिव्हाळा होता. त्यांच्यात घरचाच वडीलधारी माणूस दिसायचा. माझ्या पोह्यांना त्यांनी दिलेली दाद हा माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे. तो मी मनात जपून ठेवला आहे...’’ हे सांगताना आशा शरद भोयर यांचा आवाज हळवा झाला होता. 

नागपुरात सीताबर्डीवरील उड्डाणपूल सुरू होतो तिथं, म्हणजे जुन्या मॉरिस कॉलेजच्या बाजूला आशाबाईंची चहा-पोह्याची हातगाडी असायची. आजूबाजूला जुन्या पुस्तकांची दुकानं. भट तिथं साहित्य प्रसार केंद्रात यायचे. भट गेले ही खबर आशाबाईंना दुसऱ्या दिवशी सकाळी कळली होती. अंत्यसंस्काराला जाऊ शकल्या नाहीत, याची त्यांना खंत वाटायची. त्या म्हणत, स्वभावानं खूप चांगला माणूस. कधी रागावले नाहीत.

एकदा त्यांनी आशाबाईंकडील पोहे मागितले. झालं! इथूनच भटांची इथल्या पोह्यांशी गट्टी जमली. लांबच्या प्रवासाला निघायच्या आठच दिवसांआधी भट यांनी आशाबाईकडील पोहे घरी मागवले होते. भट यांच्या आठवणींनी आशाबाई भारावून जातात.

भट यांच्या गाण्यांचा विषय निघाला की, लतादीदी, आशाबाई यांची नावं घेतली जातात. पण खाण्याचा विषय निघाला की या पोहे खाऊ घालणाऱ्या आशाबाई किती लोकांना आठवतात? सामान्य वाटणाऱ्या माणसाच्या हातातील कौशल्य भट जाणत असत. त्याची कदरही करीत असत. फार कमी लोकांना भटांच्या स्वभावातील हा पैलू ठाऊक असेल. खाण्याच्या आवडीवरून त्यांना उगीच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जायचा. भट म्हणायचे, कुण्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा चहाच्या टपरीवरही स्वादिष्ट पोहे मिळू शकतात. 

संघर्ष करून जगणाऱ्या आशाबाईंची कहाणी इतरांना कळावी म्हणून भट यांनी आशाबाईंवर वर्तमानपत्रात 'हिंमतवाली माता' या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यात म्हटलं होतं, 'कष्टकरी तथाकथित महिला नेत्या, प्रोफेसरनी, मंत्रिनी किंवा एखाद्या तथाकथित साहित्यिक बाईपेक्षा ही आशाबाई जास्त सन्माननीय नाही का?'

आशाबाई सांगत, भटसाहेबांना चांगले तिखट पोहे हवे असत. ते आले की मोठ्यानं आवाज देत. रागावण्याच्या अविर्भावात म्हणत, ‘तुम्हाला दिसत नाही का मी आलो ते! चला पोहे द्या मला..’ मग मुलाला रागवायचे ‘का रे!. इकडे ये. पाणी घे लवकर.’
कांदा बारीक चिरायला सांगायचे. लिंबू मागायचे. खाताना त्यांना घाम फुटायचा. आशाबाईंच्या कामात त्यांचे बंधू खुशाल वाळके हेही मदत करायचे. त्यांनाही ते आपल्या वऱ्हाडी भाषेच्या शैलीत 'अबे..' म्हणून हाक देत. प्रेम व्यक्त करण्याची ही त्यांची खास स्टाइल होती.

आशाबाईंच्या पतीचं फार आधी निधन झालं होतं. त्या म्हणाल्या, या दुकानाच्या भरवशावरच आमचं घर चालतं. चहा, पोहे खाताना भट आमची घरची विचारपूस करीत. मुलगा अतुल. त्यानं दहावीनंतर शाळा सोडली. मुलगी विद्या तेव्हा बी. ए. च्या अंतिम वर्षाला होती. कथ्थकही शिकायची. तेव्हा  भटांनी तिला पुस्तकं घेऊन दिली होती. मुलीला चांगलं शिकव. तिच्या लग्नाची घाई करू नको. तिला नोकरी लावून देईन. असं ते म्हणत. तुझ्या मुलीला घरी घेऊन ये कधी भेटायला... असा आग्रह ते करीत.

तेव्हा विद्याला भट यांच्याविषयी विचारलं होतं. ती म्हणाली, "दुकानात गेले की भट साहेबांसोबत भेट व्हायची. त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा मी बारावीत होते. त्यांना थोडी घाबरायचे. मुलांसोबत ते मुलांसारखे वागत, एवढं मात्र मला त्यांच्याबाबतीत जाणवलं. मनमोकळा स्वभाव होता त्यांचा."
 

भट सामान्यांविषयी नुसतं लिहीतच नव्हते. सामान्य माणसं हे त्यांचे खरे सगेसोयरे होते.
 

आशाबाईंना आजही वाटतं, एकदा. फक्त एकदा भटसाहेब यावेत. पोहे मागावेत. बस्स!

 कविता उत्स्फूर्त असते हा सिध्दांत चुकीचा!
सुरेश भट यांच्या कवितांवर एसएफएस महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांनी चर्चासत्र आयोजित केलं होतं. भटांनी ‘अलविदा दोस्तहो!’ म्हणण्याच्या अगदी दोन महिन्यांआधीची ही गोष्ट. या चर्चासत्राचं वैशिष्ट्य म्हणजे खुद्द भट यांची उपस्थिती आणि सहभाग, तर उदघाटनाला  'वक्ता दशसहस्त्रेषु' म्हणून ओळखले जाणारे प्रा. राम शेवाळकर.

शेवाळकर यांनी भटांवर फुलं उधळली. ते म्हणाले, भट यांच्या काव्यगायनाचे कार्यक्रम गर्दी खेचतात. त्यांच्या कार्यक्रमासाठी लोक शंभर रुपयाचं तिकीट काढून येतात. केवढी ही लोकप्रियता!  (प्रत्यक्षात भट यांच्या कार्यक्रमासाठी पाचशे रुपयांची तिकिटं विकली गेली आहेत. नागपुरातीलच एका रसिकानं प. महाराष्ट्रात झालेल्या एका कार्यक्रमाचं जपून ठेवलेलं तिकीट मला आणून दाखवलं.) समीक्षकांनी भट यांची दखल घेतली नाही, अशी खंत शेवाळकर यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात भट यांनी आपल्या गझला गायल्या. नुसत्याच गायल्या नाही तर ते बोलले. मनमोकळं बोलले. भावनांना वाट मोकळी करून दिली.

ते म्हणाले, मी काही फार मोठी कामगिरी केली नाही. सामान्य माणूस आहे. जेवढं करायचं तेवढं मी केलं. तंबाखू-चुना खातो. मी वक्ताही नाही. रामभाऊंप्रमाणं 'वक्ता दशसहस्त्रेषु' वगैरे मी नाही. जमतं तसं बोलतो.

भट रोखठोक बोलायचे. ते म्हणाले, प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमध्ये शोधण्याची आपली खोड आहे. प्रत्येक भाषा आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. कविता ही उत्स्फूर्त असते, असं बरेचदा म्हटलं जातं. पण हा सिद्धांतच मुळात चुकीचा आहे. पाश्चात्यांचं सौंदर्यशास्त्र आपण का म्हणून मानावं?भटांनी कथन केलेला अनुभव चांगलाच लक्षात राहिला. 

आज भट नाहीत. आहेत फक्त डोळे भिजवणाऱ्या आठवणी. त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे

मी मात्र थांबुन पाहतो मागे किती जण राहिले...

संजय मेश्राम, पुणे
sanjaymeshram1@gmail.com 
(पत्रकार आणि लेखक. मलाला युसूफझाई हिच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या 'सलाम मलाला' या पुस्तकाचे लेखक)

Tags: सुरेश भट गझल कविता रंग माझा वेगळा तरुण नागपूर गझलकार Load More Tags

Add Comment