चाँद खुद लेने मुझे आएगा, तो जाऊँगा...

हिंदी-ऊर्दू कवी बशीर बद्र यांना आदरांजली

आत्मप्रौढी, आत्मप्रसिद्धी आणि आत्मप्रचार यांना कर्तृत्व मानणाऱ्या आणि दुसऱ्यावर येन केन प्रकारेण मात करून स्वतः पुढे जाण्याला प्रगती समजणाऱ्या आजच्या युगात, शांतपणे काम करत राहणे, कुठल्याही वादात आपल्या कोणत्याही अस्मितेची ढाल न करणे हे दुर्मीळ आहे. बशीर बद्र या पद्धतीने नव्वद वर्षांपेक्षा जास्त काळ जगले. "खुदा हमको ऐसी खुदाई न दे कि अपने सिवा कुछ दिखाई न दे" असे मागणे मागणारी त्यांची नेमस्त कविता साधी वाटायची, जवळजवळ संभाषणात्मक. पण त्या साधेपणाखाली गहन तात्विक बैठक आणि भावनिक प्रगल्भता होती. हे त्यांच्या स्वभावाचेच प्रतिबिंब आहे.

बशीर बद्र यांचा जन्म अयोध्येत झाला. तीच अयोध्या, जी भारताच्या मिश्र सांस्कृतिक जीवनाचे प्रतीक आहे! फाळणीनंतर भारतातली ऊर्दू साहित्याची परंपरा विस्कटत होती. त्या अवघड काळात बशीर बद्र यांनी भारताच्या संमिश्र सांस्कृतिक अवकाशात ऊर्दू जगवली, फुलवली. ते पाकिस्तानात गेले नाहीत, किंवा त्यामुळे ओढवलेल्या आप्तस्वकीयांच्या विरहाचे रोमँटिक दुःख त्यांनी आपल्या कवितेतून मोठे केले नाही. ते या मातीत (अलीगढ, मेरठ, भोपाळ) राहिले, आणि या मातीची भाषा बोलत राहिले. फाळणीनंतरच्या पिढीतील अनेक ऊर्दू कवींनी एक प्रकारची विस्थापिताची, निर्वासिताची भूमिका स्वीकारली. बशीर साहेबांनी ती जाणीवपूर्वक नाकारली. ते स्वतःला या अखंड देशाचे, या सगळ्या जनतेचे मानत राहिले. त्यांची कविता याचा पुरावा आहे.

बशीर बद्र यांचे शेर मुशायऱ्यांपासून वृत्तपत्रांपर्यंत, चित्रपटांपासून राजकीय भाषणांपर्यंत आणि हस्तलिखित पत्रांपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र पोहोचले, लोकप्रिय झाले. कारण त्यांनी सामान्य माणसाची नेमस्त भाषा वापरली. ही भाषा अवजड नाही, उथळही नाही, नेमकी आहे. सामान्य लोकांच्या भावनांची, विचारांची नस त्यांनी नेमकी पकडली आहे.

जौन एलियांपासून नामदेव ढसाळांपर्यंतचे कवी पारंपरिक कविसंमेलने आणि मुशायऱ्यांच्या मर्यादा ओलांडून जगाच्या पटलावर प्रसिद्ध झाले. त्यांच्या कविता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी जगभर नेल्या. या जुन्या कवींच्या ज्या काही अस्पष्ट, दुर्मिळ चित्रफिती उपलब्ध आहेत, त्या नेटिझन्सनी डोक्यावर घेतल्या. परंतु त्यामुळे जुन्या कवींचे केवळ लोकप्रिय शेरच जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकले. 

बशीर बद्र तसे जुने कवी नाहीत, पण अनेकांना ते मागच्या शतकातले शायर वाटतात. गेली किमान दोन दशकं बशीर साहेब प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जात नसत. त्यामुळे त्यांचे फारसे व्हिडिओच काय, सुस्पष्ट ऑडिओजसुद्धा उपलब्ध नाहीत. तरीही त्यांचे शेर लोकांच्या मनात घर करून बसले. जुन्या जमान्याच्या व्ही. सी. आर. च्या खरखरत्या क्लिप्समधून त्यांचे काही बोल कानावर पडतात, आणि थेट हृदयाला भिडतात. आता त्यांच्यानंतर ती कविता रसिकांच्या मनात आणखी खोलवर रुजेल. हेच त्यांचे खरे स्मारक आहे.

माणसामाणसांमधली दरी बशीर साहेबांना अस्वस्थ करत असे. तुटलेली घरे, दुरावत जाणारी नाती, एकटेपण, जातीय जखमा, शहरी जीवनामुळे माणसांच्यात निर्माण झालेला परकेपणा आणि अनावर पण पोकळ आशा यांविषयी कमालीच्या साधेपणाने त्यांनी लिहिले. त्यांच्या गझलेत उच्चभ्रू ऊर्दू-फारसी परंपरेचे-प्रतीकांचे ओझे नाही, तसाच कुठल्या पांडित्याचा आवही नाही. शाब्दिक क्लृप्त्या तर अजिबात नाहीत. त्यांनी हिंदी आणि ऊर्दू गझलेमधील अंतर मिटवण्यात मोलाचा वाटा उचलला. आणि 'गंगा-जमुनी तहजीब' म्हणजे इथल्या संमिश्र आणि सर्वसमावेशक संस्कृतीचा जाणीवपूर्वक स्वीकार केला.

त्यांची भाषा हिंदुस्थानी होती. बनारसच्या गल्लीत आणि भोपाळच्या चहाच्या टपरीवर सगळ्यांना ती भाषा समजतेच, पण कोलकात्यापासून मुंबईपर्यंतच्या बिगर हिंदी भाषिकांनाही परकी वाटत नाही. खेड्यापाड्यात किंवा शहरात सगळीकडे, त्यांचे शेर ओठावर खेळणारी कोणत्याही धर्मांची माणसं सापडतात. त्यांना भारताचा शायर, जनसामान्यांचा शायर अशी बिरुदं प्राप्त झाली आहेत, ती याचसाठी. डॉ. बशीर बद्र हे खऱ्या अर्थाने साधेपणाचा चेहरा होते. त्यांच्यातला उठून दिसणारा मोठा गुण म्हणजे नेमस्तपणा.

अलीगढ मुस्लीम विद्यापीठात शिकत असताना त्यांची एक तोंडी परीक्षा झाली. परीक्षकाने एक शेर सादर केला (अब हम मिलेंगे तो कई लोग बिछड़ जाएंगे, इंतज़ार और करो अगले जनम तक मेरा) आणि त्याचा अर्थ विचारला. खरं तर तो शेर स्वतः बशीर बद्र यांनीच लिहिलेला होता. पण परीक्षकाला ते माहीत नव्हते. बशीर साहेबांनी तो शेर आपणच लिहिला आहे हे न सांगता त्याचा मूळ अर्थ समजावून सांगितला. पण परीक्षकाला त्यांचे स्पष्टीकरण अजिबात मान्य नव्हते. म्हणून त्या परीक्षकाने त्यांना त्या परीक्षेत चक्क नापास केले. बद्र यांनी वाद घातला नाही किंवा 'मीच तो कवी आहे' असा टेंभाही मिरवला नाही. एका सच्च्या कलाकाराला आपल्या कलेवर किती अढळ विश्वास असू शकतो, दुसऱ्याच्या मताचा तो किती आदर करू शकतो, आणि विद्यार्थी म्हणून परीक्षकाचा मान राखू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. अहंकार / आढ्यता दाखवून स्वतःची योग्यता सिद्ध करण्यापेक्षा त्यांनी शांत राहणे पसंत केले. ही दुर्बलता नाही, हा नेमस्तपणा आहे जो फार थोड्या माणसांकडे असतो. हा प्रसंगसुद्धा त्यांच्या कुणा स्वकीयाने त्यांच्या निधनानंतर सांगितला. बशीर साहेबांनी हयातीत स्वतः याचा कधी बाऊ केला नाही.

एखाद्या व्यक्तीचे आपल्या देशावर आणि मातीवर किती प्रेम आहे, हे वैयक्तिक संकटाच्या वेळी सिद्ध होते. 1987 च्या मेरठ दंगलीत बशीर साहेबांचे घर आणि आयुष्यभराचे साहित्य जाळले गेले, तेव्हा त्यांच्या जागी दुसरा कोणीही असता तर त्याच्या मनात व्यवस्थेबद्दल किंवा समाजातील एका वर्गाबद्दल कायमस्वरूपी द्वेष निर्माण झाला असता. मात्र, बशीर साहेबांनी कधीही आपली भारतीयत्वाची आणि इथल्या सहिष्णुतेची नाळ तुटू दिली नाही. त्यांच्या वेदनेत खोल दुःख होते, पण दुहीची किंवा फुटीरतेची भाषा नव्हती. सात संदूकों में भर कर दफ़्न कर दो नफ़रतें, आज इन्सां को मोहब्बत की ज़रूरत है बहुत। हे त्यांचे विचार सहिष्णुतेची ग्वाही देतात.

घर जळाले, अप्रकाशित हस्तलिखिते नष्ट झाली, आणि ते खोल नैराश्यात गेले. काही काळ त्यांनी लेखनही सोडले. या संकटाचे ते सार्वजनिक भांडवल करू शकले असते. 'अल्पसंख्याक कवीवर झालेला अन्याय' या आवेशात ते देशभर मुशायरे गाजवू शकले असते, राजकीय व्यासपीठांवर दिसू शकले असते. त्यांनी ते केले नाही. उलट ते एकांतात गेले, भोपाळला स्थायिक झाले, आणि दुःखाचा आवेग सरल्यावर पुन्हा लिहू लागले. लोग टूट जाते हैं घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में। यासारख्या शेरांमधून त्यांच्या वेदनेला कवितेचे रूप मिळाले, पण त्यात रोष नव्हे तर करुणा होती. हा फरक सूक्ष्म आहे पण खूप महत्वाचा आहे. हे क्षमाशीलतेचे प्रदर्शन नव्हते, खरोखरचा समजूतदारपणा होता. 

त्यांची अशी ठाम धारणा होती की, हिंसा हे कोणत्याही एका समाजाचे नाही, तर मानवी दुर्बलतेचे लक्षण आहे. आपल्या देशात जात-धर्म या मुद्यांवरून दंगली होणं ही नित्याची बाब आहे. प्रत्येक दंगलींनंतर लोक विरुद्ध समूहाचा तिरस्कारच करतात, त्यातून पुन्हापुन्हा दंगली होतात. पिढ्या न् पिढ्या होत राहतात. या पार्श्वभूमीवर बशीर बद्र यांचा हा संयमी आवाज उठून दिसतो.

या अतुलनीय कवीच्या सर्वच अप्रकाशित कविता आगीत नष्ट झाल्या. पण भारतात वाईटाबरोबर चांगल्या गोष्टीही तितक्याच विस्मयकारकपणे घडतात. हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकार-संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले विशाल भारद्वाज यांना आपल्या या गुरूचे जवळजवळ सर्व शेर तोंडपाठ होते. त्यांनी केवळ स्मरणशक्तीच्या बळावर सुमारे 90 टक्के शेर आणि गझलांचे पुनरुज्जीवन केले. एका विद्यार्थ्याने गुरूची कविता अंतर्मनात अशी साठवली की ती आगीतूनही वाचली. महाराष्ट्रातील संत तुकाराम आणि जगनाडे महाराज या गुरु-शिष्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

बद्र यांच्या कवितेत खोल वैयक्तिक दुःख होते, पण ते कधी सवंग सार्वजनिक प्रदर्शनाचे साधन बनले नाही. उलट त्या वैयक्तिक आशयाला त्यांनी समाजाभिमुखता दिली. हे त्यांना जमले, कारण नेमस्तपणा हा त्यांचा मूळ स्वभाव होता, बाहेरून लावलेला मुखवटा नव्हता. नेमस्तपणा हा गुण आता जवळजवळ कालबाह्य झालेला आहे. आत्मप्रौढी, आत्मप्रसिद्धी आणि आत्मप्रचार यांना कर्तृत्व मानणाऱ्या आणि दुसऱ्यावर येन केन प्रकारेण मात करून स्वतः पुढे जाण्याला प्रगती समजणाऱ्या आजच्या युगात, शांतपणे काम करत राहणे, कुठल्याही वादात आपल्या कोणत्याही अस्मितेची ढाल न करणे हे दुर्मीळ आहे. बशीर बद्र या पद्धतीने नव्वद वर्षांपेक्षा जास्त काळ जगले. खुदा हमको ऐसी खुदाई न दे कि अपने सिवा कुछ दिखाई न दे असे मागणे मागणारी त्यांची नेमस्त कविता साधी वाटायची, जवळजवळ संभाषणात्मक. पण त्या साधेपणाखाली गहन तात्विक बैठक आणि भावनिक प्रगल्भता होती. हे त्यांच्या स्वभावाचेच प्रतिबिंब आहे.

त्यांना अल्झायमर-डिमेन्शियाने ग्रासलेले होते. आपल्याला स्मृतिभ्रंश होतो आहे ही गोष्ट लक्षात आल्याबरोबर कुठल्याही मुशायऱ्यात सहभागी न होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अशा अवस्थेतही ते सार्वजनिक व्यासपीठावर गेले असते तर त्यांना कदाचित जास्त सहानुभूती आणि प्रसिद्धी मिळाली असती. पण बद्र यांचे आत्मभान जागृत होते. ते थांबले. अखेरच्या वर्षांत त्यांची स्मृती हळूहळू नाहीशी होत गेली. ते स्वतःचे शेरही विसरले. पण त्यांचे वाचक विसरले नाहीत. सोशल मीडियावर, वर्तमानपत्रांत, राजकीय भाषणांत, खाजगी संभाषणांत त्यांचे शेर फिरतच राहिले. जेव्हा शायर स्वतःच विसरला तेव्हा जनतेने त्याची कविता लक्षात ठेवली. बशीर साहेबांचाच एक शेर आहे, उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए! त्यांना त्यांच्या जीवनाच्या संध्याकाळी काय आणि किती आठवत होते, माहीत नाही, पण चाहत्यांच्या आठवणींत मात्र बशीर साहेबांची तेजस्वी कविता कायम राहील. 

- गौरव बिरारीस
gauravbiraris@live.com
(लेखक इतिहासाचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.)

Tags: bashir badr urdu shayri gajhal गझल gazal ऊर्दू शायरी शायर शायर शायरी बशीर बद्र नेमस्त करुणा Load More Tags

Add Comment