चितमपल्लींचं अनुभवसंचित : ‘शब्दांचं धन’

मारुती चितमपल्ली यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रेरणास्थानांचा वेध

निसर्गजीवनाशी समरस होऊन ललित निबंधलेखन करणाऱ्या सर्जनशील साहित्यिकांमध्ये मारुती चितमपल्ली यांनी पृथगात्म स्थान प्राप्त केले आहे. वीसांहून अधिक पुस्तके लिहून अरण्यवाचनाचा आणि पक्षीनिरीक्षणाचा नवा वस्तुपाठ त्यांनी साहित्यरसिकांसमोर ठेवला आहे. आपण ज्या आसमंतात वावरतो त्याविषयीची सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचे कार्य त्यांच्या या साहित्याने केले आहे. आजच्या युगमानसात अधिवासात्मक अभ्यासाची शाखा विकसित होत असताना त्यांनी ज्या प्रकारचे लेखन केले आहे, त्यामुळे ते क्षितिज संपन्न आणि समृद्ध झाले आहे. पण एवढ्यापुरतेच त्यांचे यश मर्यादित नाही. छोट्या-छोट्या वाक्यांमधून आणि लालित्यपूर्ण शैलीत आशय मांडण्याची हातोटी त्यांना प्राप्त झालेली आहे. रसप्रसन्न आणि चिररुचिर शब्दकळेने विनटलेले हे लेखन रसिकमनाला आल्हाद देते.

हिरव्या वाटांचा धांडोळा घेण्याचा ध्यास या लेखकाच्या मनाला लागलेला आहे - सूक्ष्म निरीक्षण, अफाट वाचन, चिंतन आणि मनन करण्याचे त्यांचे सामर्थ्य पाहून विस्मय वाटतो. कष्टपूर्वक आणि प्रज्ञा-प्रतिभेच्या बळावर त्यांनी हे स्वानंदाचे जिव्हार निर्माण केले आहे. रसिकांनाही ते उत्कट आनंदानुभव देणारे ठरले आहे. आगळ्या-वेगळ्या निसर्गानुभूतीचे दर्शन घडविणाऱ्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली, त्यांना लेखनाची प्रेरणा कुठून मिळाली, कोणाचा प्रभाव त्यांच्यावर पडला, याचे मनोज्ञ दर्शन ‘शब्दांचं धन’ या पुस्तकात पाहायला मिळते. वनविभागात काम करणाऱ्या त्यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे चाकोरीतले जीवन अक्षरसृष्टीमुळे सुगंधित झाले, याबद्दल त्यांना कृतकृत्यता तर वाटतेच. शिवाय ज्यांच्या सहवासामुळे आणि अमोल मार्गदर्शनामुळे हा लेखनप्रवास घडला, त्यांच्याविषयीचा कृतज्ञताभावही त्यांच्या लेखनात दिसतो. 

त्यांचे ‘पक्षी जाय दिगंतरा’ हे पुस्तक 1983 मध्ये प्रकाशित झाले. त्यांचा पुढचा प्रवास निरंतर सुरू झाला. पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली, प्रा. नरहर कुरुंदकर, चित्रकार आलमेलकर, व्यंकटेश माडगूळकर, जी. ए. कुलकर्णी आणि गो. नी. दांडेकर ही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी त्यांना भेटली. येथून तेथून प्रेरणा घेण्याचा वसा त्यांनी स्वीकारला. अशा मुलखावेगळ्या व्यक्तींना जगाचे नागरिकत्व स्वीकारावे लागते, तेव्हा कुठे सिद्धी प्राप्त होते.

मारुती चितमपल्लींना पक्षिशास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटल सापडला. जॉय अ‍ॅडमसनच्या विपुल ग्रंथसंपदेची गुहा त्यांना सापडली. सुमंतभाई शहा हे सुहृदरूपात भेटले. बनगरवाडी, सी. शॉनगॉनचे पिलोबुक, ‘हंसदेवाचे मृगपक्षिशास्त्र’ आणि जे. कृष्णमूर्तींच्या रोजनिशी मिळाल्या. त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घडविणारी माणसे भेटली. त्या सर्वांविषयी त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने लिहिले आहे. या सर्व मंडळींचा मोठेपणा आणि चितमपल्लींची गुणग्राहकता यांचे दर्शन घडवणारे पंधरा लेख ‘शब्दांचं धन’ या पुस्तकात आहेत. आपल्या अभ्यासाच्या आणि लेखनाच्या अनुषंगाने अवघ्या अनुभवसंचिताचा मागोवा लेखकाने सरस-रमणीय शैलीतून घेतला आहे. तो अतिशय वाचनीय झाला आहे.

रानकुत्र्यांच्या अभ्यासासाठी चितमपल्ली नागझिऱ्याच्या जंगलात तीन महिने राहिले होते. सुरुवातीचे दोन महिने त्यांनी एकट्याने काढले. मे महिन्यात व्यंकटेश माडगूळकरही त्यांच्यासोबत होते. त्यांच्या सहवासात फुलून आलेल्या दिवसांबद्दल चितमपल्लींनी समरसतेने लिहिले आहे. माडगूळकर एकदा त्यांना म्हणाले, “चितमपल्ली, तुमच्या शास्त्रीय ज्ञानाला माणसांचा संदर्भ मिळाला तर किती चांगलं होईल...” ही त्यांनी दिलेली नवी दृष्टी होती. नवी संथा होती. त्यांच्या सहवासात चितमपल्लींना त्यांच्या सर्जन प्रक्रियेचे रहस्य उमगले. कोणते पाश्चात्य आणि पौर्वात्य लेखक वाचावेत याविषयीदेखील माडगूळकरांनी चितमपल्लींना मार्गदर्शन केले. “चितमपल्ली, खूप वाचा. अन् लिहा. लिहीत जा म्हणजे लिहायला येईल,” हा माडगूळकरांचा उद्गार चितमपल्लीच्या जीवनातील गुरुमंत्र ठरला.

माडगूळकरांचा मूळ पिंड तसा चित्रकाराचा. त्या चित्रकलेला पूरक माध्यम मिळावे म्हणून ते साहित्याकडे वळले. त्यांनी उभी केलेली शब्दचित्रे एखाद्या रेखाटनासारखी व त्यांनी रेखाटलेली मिस्किल वानरांची रेखाचित्रे तशीच बोलकी. छायाचित्रात एक प्रकारचा जिवंतपणाचा अभाव असतो, तो त्यांच्या रेखाटनात मुळीच आला नाही, असे चितमपल्लींना वाटते. माडगूळकरांच्या सल्ल्यानुसार चितमपल्लींनी टिपलेले नागझिऱ्याच्या जंगलाचे निसर्गविशेष चित्तवेधक आहेत. “कुसुंब व आंब्याला तांबडी पानं फुटत होती. धावड्याच्या पोपटी रंगाच्या कोवळ्या पालवीनं सारं जंगल सुंदर दिसू लागलं. पिवळ्याधमक फुलांनी अमलताश फुलला. पोवळ्या रंगाची पांगाऱ्याची फुलं आभाळाच्या पार्श्वभूमीवर गोंदल्यासारखी वाटत. पळसपापडी वाऱ्यानं खुळखुळू लागली. सावरीच्या फळाची बोंडं फुटून त्यांतल्या म्हाताऱ्या सर्व रानभर उडू लागल्या. प्रत्यक्ष फळानं लदलेली पाखड हरोळी पक्ष्यांच्या थव्यांनी जागी झाली. मोहाच्या फुलांचा दर्प जाणवू लागला.” संवेदनाविश्व जागविणाऱ्या चित्रमय शैलीत सारा आसमंत येथे लेखकाने उभा केला आहे. त्या लेखनावर माडगूळकरांच्या रंगमय-चित्रमय शैलीचा प्रभाव जाणवतो.

चालता-बोलता ज्ञानकोश असलेल्या प्राचार्य नरहर कुरुंदकरांनी अकाली लौकिक जगाचा निरोप घेतला, ही चितमपल्लींच्या भावजीवनातली एक खूप क्लेशदायी घटना होती. कारण त्यांच्याशी झालेल्या साहित्यचर्चेतून अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती चितमपल्लींनी वेळोवेळी घेतलेली होती. निसर्गानुभूतीच्या आधारे हा कृतज्ञताभाव जागवताना ते म्हणतात, “सरांची आठवण अशी लख्ख आकाशगंगेसारखी मनात भरून आहे.” पुढचा हृद्य तपशील मुळातूनच वाचायला हवा. ‘तुम्हीच लाविले जी झाड!’ हा ज्ञानदेवीच्या ओवीतील अत्यंत समर्पक अंश लेखकाने शीर्षक म्हणून स्वीकारला आहे.

‘डॉ. सलीम अलींच्या सहवासात’ हा लेख म्हणजे आनंदमय क्षणांची मैफलच. या लेखातल्या आठवणी म्हणजे पक्ष्यांच्या आठवणी! सलीम अलींनी सारे जीवन पक्षिनिरीक्षणासाठीच वाहिलेले होते. त्यातून त्यांच्या अभ्यासाची शिस्त निर्माण झाली होती; तीच त्यांची जीवनधारणा होती. ते म्हणायचे, “पक्षिशास्त्र हे अनेक शास्त्रांचं शास्त्र आहे. पक्षितज्ज्ञांना वनस्पतिशास्त्र, कीटकशास्त्र, वनं, वनांचे प्रकार, यांचे चांगले ज्ञान हवे, भूगोलाचा अभ्यास हवा. रसायन आणि भौतिकशास्त्राचा परिचय पाहिजे. गणिताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतर शास्त्रांप्रमाणं पक्षिशास्त्रालादेखील अंत नाही. ते नित्यनूतन आहे.” डॉ. सलीम अलींच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करताना चितमपल्ली म्हणतात, “...पक्षितीर्थाची यात्रा करणारा हा युगपुरुष ह्या धरतीचा नव्हताच. त्यांचं नातं पक्ष्यांप्रमाणे आभाळाशी होतं.”


हेही वाचा : सोमनाथ कोमरपंत यांनी लिहिलेले साहित्यिकांविषयीचे लेख आणि पुस्तकांची रसग्रहणे


मराठी कथाविश्वात ‘जीए’ या नावाभोवती तेजस्वी वलय आहे. जी. ए. कुलकर्णी यांच्याविषयीच्या लेखाला त्यांनी ‘जीए’ हेच शीर्षक दिले आहे. जीएंशी झालेल्या पत्रव्यवहारामधून चितमपल्लींनी त्यांचे अंतरंगदर्शन घडविले आहे. त्यांचे प्रगाढ वाचन, त्यांची अभिरुचिसंपन्नता, निसर्गाविषयीची त्यांची अपार ओढ, त्यांचे सृष्टिनिरीक्षण, मानवी जीवनाविषयीची त्यांची निरीक्षणे आणि वाङ्‌मयीन संदर्भ हे गुणविशेष या पत्रांतून प्रकट होतात.

‘देवदूताची पावलं’ हा ‘शब्दांचं धन’ मधील लक्षणीय लेख. चितमपल्लींची शब्दशैली आणि आलमेलकरांची चित्रशैली यांची गळामिठी पडल्यामुळे चितमपल्लींच्या वाङ्‌मयीन सौंदर्याला नवी मिती प्राप्त झाली आहे. अभिव्यक्तीला जिवंतपणा आलेला आहे. आलमेलकरांच्या निकट सहवासात वेचलेले समृद्ध क्षण या लेखात अधोरेखित झाले आहेत. चित्रकलेतील या तपस्वी व्यक्तिमत्त्वाचे आल्हाददायी चित्रण या लेखात आढळते.

अ‍ॅरिस्टॉटल हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु त्याचा एक तुलनेने कमी ज्ञात असलेला पैलू चितमपल्लींनी ‘पक्षिशास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटल’ या लेखात उलगडून दाखविला आहे. ‘नॅचरलिस हिस्टोरिया’ (निसर्गाचा इतिहास) नावाचा कोशग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात ग्रीसमध्ये प्लिनी द एल्डर याने संकलित केला, आणि स्वतः त्यात बरेचसे लेखनही केले. त्या ग्रंथात पक्ष्यांच्या हालचालींविषयी, स्थलांतराविषयी अ‍ॅरिस्टॉटलने केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या नोंदी समाविष्ट आहेत. त्यांची ओळख चितमपल्लींनी या लेखात करून दिली आहे.

‘चैतन्याच्या शोधात असलेली जॉय अ‍ॅडमसन’, ‘रजनीगंधा’, ‘सी. शॉनगॉनचं पिलोबुक’, ‘हंसदेवाचं मृगपक्षिशास्त्र’, ‘जे कृष्णमूर्तींच्या रोजनिशी’, ‘बनगरवाडीतील निसर्ग’ आणि ‘बुद्धाज कोकोनट’ हे लेख वाचकांना आनंद देणारे आणि त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करणारे आहेत.

‘लेखक येती घरा’ या लेखात अनेक व्यक्तिरेखा आहेत. चितमपल्ली वनखात्यात कार्यरत असताना त्यांचे वास्तव्य नवेगाव जलाशयाच्या सान्निध्यात होते. अनेक नामवंत लेखक-कवी तिथे येऊन गेले; अनंत गोपाळ शेवडे, यमुनाताई शेवडे, रा. भि. जोशी, सुधा जोशी, जयवंत दळवी, उमाकांत ठोमरे, रमेश मंत्री, सुभाष भेंडे, बाळ सामंत, ज्ञानेश्वर नाडकर्णी इत्यादी साहित्यिकांचे उल्लेख या लेखात आढळतात.

‘माझा ग्रंथखजिना’ या लेखात चितमपल्लींनी आपला ग्रंथसंग्रह निगुतीने कसा वाढविला याविषयी आत्मकथन केले आहे. मराठीबरोबर संस्कृत भाषाही त्यांनी आत्मसात केली. बंगाली भाषा शिकून घेण्याचा प्रयत्न केला. बंगाली साहित्यही वाचले. महाराष्ट्राबाहेर त्यांनी भ्रमंती केली. ते बहुभाषाकोविद झाले. त्यांच्या लेखन-वाचनाची प्रक्रिया निरंतर चालूच राहिली. त्यांनी विश्वसाहित्यातील निवडक आणि उत्तम ग्रंथ गोळा केले. ते अभिरुचिसंपन्न झाले, चिंतनशील झाले. त्यांच्या लेखनाला नित्य नवे धुमारे फुटत राहिले.

- सोमनाथ कोमरपंत
somnathpant@gmail.com 
(लेखक गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्याचे प्राध्यापक आहेत.)

Tags: शब्दांचं धन व्यंकटेश माडगूळकर aristotle डॉ सलीम अली पक्षी निसर्गवाचन निसर्ग नेचर historia naturalis जीए जी ए कुलकर्णी सोमनाथ कोमरपंत Load More Tags

Add Comment