कविवर्य प्रा. वसंत बापट : वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व आणि कवित्वशक्ती

वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीवर्षाच्या निमित्ताने...

पाडगावकर, बापट आणि विंदा (छायाचित्र : शेखर गोडबोले)

प्रा. वसंत बापट या श्रेष्ठ प्रतिभावंताची यंदा जन्मशताब्दी. साने गुरुजींच्या ‘धडपडणार्‍या मुलां’पैकी ते एक. साधना परिवाराचे ते महत्त्वाचे घटक. ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांनी आणि प्रा. ग. प्र. प्रधान यांनी उत्तरदायित्व सांभाळले होते. त्या दोघांची आणि यदुनाथ थत्ते यांची जन्मशताब्दी एकाच संवत्सरात यावी हा आनंददायी योग. या सर्वांनीच ‘साधना’ची शुचिता सांभाळली, संवर्धिली. त्यांचे यथार्थ मूल्यमापन नि:पक्षपाती भावी समाज वस्तुनिष्ठपणे करील. तूर्त या तिघांनाही शब्दरूपी फुलांची अंजली वाहतो. त्यांनी अक्षरनिष्ठांची मांदियाळी एकत्र आणून अनेक पिढ्यांची वैचारिक आणि भावनात्मक दृष्ट्या जडणघडण केली. गंगेचे दान गंगेलाच अर्पण करणे हे आपले कर्तव्य आहे.

आधुनिक मराठी कविता लोकाभिमुख करण्यात रविकिरणमंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे. रविकिरण मंडळाने यंदा शतक पूर्ण केले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात याच स्वरूपाचे कार्य तीन कवींनी केले - विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगांवकर. पायांना भिंगरी लावून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात भ्रमंती केली. ‘काव्यदर्शन’ या उपक्रमाद्वारे या तिघांनी स्वत:च्या कवितेचे सादरीकरण केले. रसिकांनी त्यांच्या कवितेला उत्स्फूर्त दाद दिली. तिघांमध्ये वयाचे अंतर होते. विंदा करंदीकर वयाने ज्येष्ठ आणि मंगेश पाडगावकर वसंत बापटांपेक्षा सात वर्षांनी लहान. पण कवितेच्या प्रेमामुळे ते एकत्र आले. त्यांचे मैत्र सदैव अभंग राहिले आणि काव्यहोत्र निरंतर राहिले. तिघांचा मन:पिंड निराळा. व्यक्त होण्याची धारणा निराळी. धाटणी निराळी. पण त्यांच्यामधील साम्य म्हणजे त्यांची बहुपेडी प्रतिभाशक्ती. पुढील कालखंडात त्यांनी ‘ज्ञानेश्‍वर ते मर्ढेकर’ हा महत्त्वाचा काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर केला. यंदा अनेक कवींची, कवयित्रींची आणि साहित्यिकांची जन्मशताब्दी साजरी झाली. बाह्य  परिस्थिती आणि सांस्कृतिक पर्यावरण प्रतिकूल होते. माणसे एकत्र येऊन उत्सव साजरा करणे कठीण होते. अजूनही धोका टळलेला नाही. तरीही मराठी रसिकता अक्षरवाङ्मयाच्या या महान उपासकांना आणि शब्दप्रभूंना विसरली नाही. कारण या सर्वांनी केवळ अक्षरनिर्मिती केली नाही; त्याबरोबर राष्ट्रनिर्मितीचे कार्य केले. समाजाभिमुखतेचे अंत:सूत्र त्यात होते. सामाजिक कृतज्ञता हा माणसाचा मोठाच गुणधर्म आहे. तो अजूनही अक्षय टिकून राहिला आहे.

प्रा. वसंत बापट या श्रेष्ठ प्रतिभावंताची यंदा जन्मशताब्दी. साने गुरुजींच्या ‘धडपडणार्‍या मुलां’पैकी ते एक. साधना परिवाराचे ते महत्त्वाचे घटक. म्हणून त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाला साजेसा सर्वांगसुंदर अंक काढून ‘साधना’ साप्ताहिकाने त्यांना सुरुवातीलाच मानवंदना दिली. ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांनी आणि प्रा. ग. प्र. प्रधान यांनी उत्तरदायित्व सांभाळले होते. त्या दोघांची आणि यदुनाथ थत्ते यांची जन्मशताब्दी एकाच संवत्सरात यावी हा आनंददायी योग. या सर्वांनीच ‘साधना’ची शुचिता सांभाळली. संवर्धिली. त्यांचे यथार्थ मूल्यमापन नि:पक्षपाती भावी समाज वस्तुनिष्ठपणे करील. तूर्त या तिघांनाही शब्दरूपी फुलांची अंजली वाहतो. त्यांनी अक्षरनिष्ठांची मांदियाळी एकत्र आणून अनेक पिढ्यांची वैचारिक आणि भावनात्मक दृष्ट्या जडणघडण केली. गंगेचे दान गंगेलाच अर्पण करणे हे आपले कर्तव्य आहे.

प्रा. वसंत बापटांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व अष्टपैलू स्वरूपाचे. त्यातील प्रत्येक पैलू तेजोमय. त्यातील पैलूंचे अधोरेखन करताना शब्दरूप देणे कठीण त्यांतील कवित्वशक्ती ही उत्तुंग स्वरूपाची. अध्ययन आणि अध्यापन करताना पुणे आणि मुंबई या महाराष्ट्राच्या शक्तीकेंद्रात त्यांनी वास्तव्य केले. पण या दोन्ही शहरांचे महत्त्व जाणूनही कोकणातील आपल्या स्वप्नभूमीला ते कधीही विसरले नाहीत. किंबहुना तेथील नितांत रमणीय निसर्ग हा त्यांच्या कवितेला प्रेरणा देणारा महत्त्वाचा घटक होता. त्यांची प्रतिमासृष्टी निसर्गानूभुतीने ओथंबलेली आहे. संवेदनक्षम वयात पुण्यातील पुण्यसंचित त्यांनी अनुभवले. ‘नूतन मराठी विद्यालया’सारखी दीर्घ शैक्षणिक परंपरा असलेली आणि उच्च मूल्यांचा संस्कार करणारी प्रशाला त्यांना आपल्या उपजत गुणांचा विकास करण्यासाठी लाभली हा त्यांचा भाग्ययोग. या शाळेचे मुख्याध्यापक ना. ग. ऊर्फ नाना नारळकर यांचे स्वभावचित्र रेखाटताना त्यांनी आपले कुमारवयीन जीवन पुन्हा एकदा स्मरणोज्जीवित केले आहे. प्रा. वसंत बापट यांची कविता वज्रनिर्धाराची आणि कुसुमकोमल. हा सारा त्यांच्या असामान्य प्रज्ञेचा आणि प्रतिभेचा परिपाक आहे. राष्ट्रीय महासंग्रामाचे विराट वारे आपल्या अंगावर निर्भरशीलतेने अंगावर झेलणारा आहे. कालाची स्पंदने सूक्ष्मपणे मनात मुरवून त्यांनी आपले शब्दशिल्प घडवले. कविमनावर पूर्वसुरींचे संस्कार घडणे हे अपरिहार्य असते. पु. ल. देशपांडे यांनी आपली तरुणाई कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ नक्षत्रावर जन्मास आली असे उद्गार काढले. ‘विशाखा’चे ऋण अनेक  प्रज्ञावंतांनी / प्रतिभावंतांनी मान्य केले आहे. त्यातील मंत्राक्षरांनी अनेकांची मने घडली, आनंदानुभव प्राप्त झाला. त्यातील कुणाकुणाची नावे घ्यावीत? नानासाहेब गोरे, बॅ. नाथ पै, वसंत बापट, मंगेश पाडगांवकर, कृ. ब. निकुंब आणि प्रभाकर पाध्ये इत्यादी. ही केवळ वानगीदाखल.

प्रा. वसंत बापटांचे महाविद्यालयीन शिक्षण ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालया’त झाले. डॉ. रा. शं. वाळिंबे, डॉ. के. ना. वाटवे अशा विद्वान प्राध्यापकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी उडी घेतली ती असीम राष्ट्रनिष्ठेच्या ऊर्मीमुळे आणि समाजमनस्क वृत्तीमुळे. पुढील आयुष्यात संस्कृत आणि मराठीचे नामवंत प्राध्यापक अशी नाममुद्रा त्यांनी स्वकर्तृत्वाने निर्माण केली. त्यांच्यावर त्यांच्या वडिलांचा झालेला विद्येचा संस्कारही तेवढाच महत्त्वाचा. प्रचंड व्यासंग त्यांनी केला. व्युत्पन्नता, रसज्ञता, अभ्यासनिरंतरता आणि श्रुतयोजनकौशल्य हे गुण त्यांच्या अमोघ वाणीत सामावले होते. तीव्र स्मरणशक्ती त्यांना लाभलेली होती. वृत्तिगांभीर्याबरोबरच त्यांच्या लेखनाला/वक्तृत्वाला नर्मविनोदाची जोड होती. ‘बिजली’ ते ‘रसिया’पर्यंतची त्यांच्या समृद्ध काव्यप्रवासातील वळणे-वाकणे अनुभवताना या बहुमिती लाभलेल्या श्रेष्ठ प्रतिभावंताचे प्रसन्न दर्शन घडते. साने गुरुजींसारख्या तपस्वी महापुरुषाचे सान्निध्य त्यांना लाभले. राष्ट्रसेवादलाचे संस्कार त्यांच्यावर झाले. पुढील काळात या ‘अनौपचारिक’ विद्यापीठाचे ते आधारस्तंभ बनले. त्यांची कविता श्रेष्ठ दर्जाची होती. ‘गद्यं कविनाम् निकषं वदन्ति।’ या उक्तीनुसार त्यांचे गद्यलेखन सकस स्वरूपाचे. त्यांनी साने गुरुजी, रावसाहेब पटवर्धन, कुसुमाग्रज, कुमारगंधर्व आणि एस. एम. जोशी यांची लिहिलेली व्यक्तिचित्रे चिरस्मरणीय आहेत. ‘महाराष्ट्र दर्शन’ आणि ‘गोमंतदर्शन’ यांची संहिता व अदाकारी तर अप्रतिमच! हे क्षितिज व्यापक असल्यामुळे इथेच विराम देणे योग्य ठरेल. ‘बारा गावचं पाणी’ हे भारतदर्शनावर आधारलेले त्यांचे पुस्तक म्हणजे काव्यात्म वृत्ती मुरवून घेतलेले उत्कृष्ट गद्यलेखन होय. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ते अंतरंगदर्शन होय. आपल्या देशाचे संचित, परिसर आणि मानवी स्वभावाचे कंगोरे त्यांनी रंगविले आहेत. त्यांतील अल्पाक्षररमणीयत्व लक्षणीय स्वरूपाचे.

भारतीय स्वातंत्र्याच्या उदयकाली जन्मास आलेल्या ‘बिजली’ या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहातील कवितांनी ‘अंगी अग्निशिखा आणि शिरावर विद्युल्लतेची फुले’ धारण केली. या संग्रहातील बहुतांश कवितांमधून भारताच्या नवनिर्मितीची ऊर्मी उत्कट शब्दांत प्रकट झालेली आहे. श्रमिकांची, शोषितांची आणि पददलितांची आजवर उराशी बाळगलेली स्वप्ने सफल होतील आणि समतायुक्त समाज आता निर्माण होईल असा आशावाद कवीने व्यक्त केला आहे. ‘देशाची हाक’, ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’, ‘अमर विहंगम’, ‘शतकानंतर’, ‘महायान’, ‘चालू दे जयनाद’, ‘जलउषा’, ‘गांधी मंदिर’ आणि ‘झेलमचे अश्रू’ या कवितांमधून राष्ट्रीय हर्षामर्शांचे दर्शन घडते. देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे, पण ज्या अपेक्षा बाळगल्या होत्या, त्या काही फलद्रूप झाल्या नाहीत. लवकरच जनमानसाचा भ्रमनिरास झाला. त्या प्रातिनिधिक दु:खसंवेदनेला कवीने ‘स्वातंत्र्य! कुठे स्वातंत्र्य?’ या कवितेत वाचा फोडली आहे. ‘आईची वेदना’ या कवितेत मातृभूमीच्या हृदयातील शल्य प्रकट होते. ‘पूर्णाहुतीचा तो दिवस’ या कवितेत महात्मा गांधींच्या समर्पित जीवनाला श्रद्धेची अंजली वाहिली आहे. समांतरप्रक्रियेने राष्ट्रीय जीवनातील नैराश्याला कवीने वाचा फोडली आहे. राष्ट्रप्रेमाची ही काव्यधारा वसंत बापटांच्या अंत:करणात निरंतर राहिली. आपल्या देशाच्या उत्तर सीमेवर 20 ऑक्टोबर 1962 रोजी चीनने आक्रमण केले. त्या वेळी त्यांनी जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा प्रकट करणारे ‘उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू’  हे समरगीत लिहिले.

परकीय राजवटीतील जाच भारतीय जनतेने अनुभवला होता. पण स्वातंत्र्यानंतरही लोकशाहीचा संकोच झाला आणि व्यक्तिमात्राच्या मूलभूत हक्कांवर वरवंटा फिरवला गेला. या भयावह कालखंडात केलेल्या कविता वसंत बापटांनी मर्मबंधातील ठेव म्हणून जपून ठेवल्या आणि ‘तेजसी’ या कवितासंग्रहाच्या पूर्वार्धात प्रसिद्ध केल्या. या सार्‍याच कवितांमधून व्यक्तिस्वातंत्र्याची धुनी धगधगती ठेवली.

या मंत्राक्षरांतील संदर्भ केवळ आपल्या देशातील आणीबाणीपुरते सीमित राहत नाहीत. तर ते विश्‍वातील आत्मतत्त्वासाठी झुंजणार्‍या आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी आत्मनिर्भर वृत्ती प्रकट करणार्‍या धीरोदात्त व्यक्तींच्या अंतरंगातील अंगारांना शब्दरूप देतात.

‘धी न्यू ग्रेट इंडियन सर्कस’मधील उपहासगर्भ भाष्य मनाला अंतर्मुख करणारे आहे. पुन्हा एकदा ‘रिपव्हन विकल’, ‘ते जाणो’, ‘बंदिगृहातील मित्र हो’, ‘जेव्हा उत्पात होतो’, ‘बुद्धिवंत’, ‘कशासाठी’, ‘अजूनदेखील’, ‘महाभारत क्रमांक दोन’, ‘एवढाच बोध’, ‘असे वाटले असे वाटले’ आणि ‘पुनश्‍च हरि ॐ’ इत्यादी कवितांतील आशयसूत्रांमधून तत्कालीन राजकीय घटनांमुळे कविमनात निर्माण झालेल्या वैचारिक प्रक्षोभाचे आणि भावनात्मक कल्लोळांचे चित्र पाहावयास मिळते. हा भावनाशय आपणांस विचारसन्मुख करणारा आहे. पुन्हा असा प्रसंग येऊ नये, म्हणून आपणास सतर्क करणारा आहे.

चिरडलेल्या रोपांमधला
एक पिंपळ वरती येईल
तुमचा चिरेबंदी वाडा
एका क्षणात भंगून जाईल
(एक पिंपळ वरती येईल)

या जळजळीत शब्दांतून परिवर्तनाचे संसूचन आणि नवसृजनाचे आगमन सूत्रमय शब्दांत कवीने प्रकट केले आहे.

महाराष्ट्राच्या वाङ्मयीन व सांस्कृतिक संचितास समृद्ध करणात तसेच प्रादेशिक सीमा उल्लंघून व्यापक भूमीतील विविध क्षेत्रांतील प्रज्ञावंतांचा आणि प्रतिभावंतांचा गौरव करण्यात वसंत बापटांची प्रतिभा रमते. विभूतिमत्त्वाचे संकीर्तन करणे हे काव्यनिर्मितीमागचे प्रयोजन नाही. त्या त्या व्यक्तिमत्त्वाच्या कर्तृत्वाचा कलात्मक आलेख अमोघ शब्दांत रेखाटणे आणि मिताक्षरांत ते व्यक्तिमत्त्व आकळणे ही सोपी गोष्ट नव्हे. त्या त्या व्यक्तिमत्त्वाचे जीवितध्येय आणि आंतरिक ध्यास यांचे विलोभनीय दर्शन घडवणे, हा या कवीचा गुणविशेष होय. त्यांच्या विपुल आणि गुणसमृद्ध कवितांमधून अनेक संस्मरणीय व्यक्तिचित्रे साकार झाली आहेत. ‘बाभूळझाड’, ‘हे रवींद्र’, ‘विनोबा’, ‘राजहंस’, ‘राऊसाहेब’, ‘अच्युत’, ‘ज्योतिबा’, ‘का माणूस?’, ‘एस्सेम, तुम्ही आमच्या अंतरंगी’, ‘तो पहाडाएवढा काबुलीवाला’, ‘हरिंद्रनाथ नावाचे बालक’, ‘कुमार’, ‘एका कुमाराची कहाणी’, ‘हे कुसुमाग्रज...’, ‘ज्ञानदेवा’, ‘एक पत्र तुकोबांना’, ‘बापूजी’, ‘हे जयप्रकाश’, ‘प्रकाशयात्री’ व ‘सलीमअली गेले तेव्हा’ या कवितांचे सूक्ष्म अवलोकन रसिकांनी करावे. विशिष्ट पंथ-प्रणालीच्या मर्यादा या पुरुषश्रेष्ठांना नाहीत. कवीच्या श्रद्धास्थानांचे आणि त्याच्या संवेदनस्वभावातून प्रकट झालेल्या मूल्यविवेकाचे येथे दर्शन घडते. विस्तारभयास्तव ही आशयसूत्रे उलगडून दाखवणे शक्य नाही.

‘सकिना’मधील ‘मायकेलँजेलोपनिषद्’ ही कविता अवश्यमात्र अभ्यासावी. एका महान कलावंताच्या निदिध्यासाचे दर्शन येथे घडतेच; शिवाय अस्सल कलाकृतीचा मर्मबिंदू कोणता याचे रहस्य कवीने अधोरेखित केले आहे.

‘अकरावी दिशा’ या कवितासंग्रहापासून वसंत बापटांच्या काव्यात्म वृत्तीला वेगळी कलाटणी मिळाल्याचे जाणवते. उदाहरणार्थ- ‘अकरावी दिशा’ ही त्यातील पहिलीच कविता न्याहाळावी. ‘केशरफुलांच्या पायघड्यांवरून ध्रुवाच्या स्निग्ध प्रकाशाने उजळलेला वारा’ आपल्या मनापर्यंत यावा असे त्यांना वाटते... मरुभूमीच्या लाल पाषाणांवरील ‘शेष केशरिया’... ‘नर्मदेच्या जायपत्री प्रवाहाचा दर्प’... ‘मानसहंसाच्या शुभ्र पंखावर’... ‘गंगासंगाने पुलकित झालेली यमुनेची कृष्ण वाळू’... त्यांच्या मनात रेंगाळत आहे. ‘निळ्या ओढणीखाली लपलेल्या निळ्या जलवंतीचा अभिसार’... ‘सायंकाळच्या रंगपंचमीची उधळमाधळ’... ‘दोना पॉलवरील गिटारीचे सूर’ पिऊन झिंगलेला सुरूच्या मनांतून निघालेला खारा वारा... ‘तीन समुद्रांच्या वेळेवरचा तिरंगी गोफ’ आणि ‘रामेश्‍वरला उमटलेली अभोगी कन्याकुमारीची दीपांकित पावले’ या काव्यप्रतिमांचे सौंदर्य विलोभनीय स्वरूपाचे आहे.


हेही वाचा : माझं कॉपीरायटिंग... - वसंत बापट 


‘लेणे’ या कवितेत निसर्गातील क्षणचित्रांची मालिका, थरथरणारी स्पंदने, निगूढ अंधार आणि या पार्श्‍वभूमीवर उमटणारी नादवलये यांचे प्रत्ययकारी चित्रण कवीने केलेले आहे. भीतिदायकता आसमंतात व्यापून राहिलेली आहे. अनेक संवेदनांना आकळणारे व्यामिश्र चित्र कवीने रेखाटले आहे. हे निसर्गचित्र अनुभवल्यानंतर कविमनात तरल तरंग निर्माण होतात. मूर्तातून अमूर्त आशय साकार होतो. या आत्मभावाची शिल्पित मुद्रा पुढील उद्गारातून उभी राहते :

अदृश्य हातांनी छिन्नभिन्न छिन्नी
हातोडी चालवी कोणी
किती तरी कोरितें लेणी?
पांगळ्या मनात आंधळ्या
क्षणात उमटे लेण्याचे बिंब
जागत्या दुपारी जळत्या बाजारी
घामाने कापळ चिंब
मिटता पापणी आतल्या!
दर्पणी जुळाया लागते माळ
किर्र... किरमिजि... तरुराजी
तळ्यांची... फुटकी पाळ.

‘राजसी’ या कवितासंग्रहात ‘संवत्सर’ या विभागात सृष्टीचे विभ्रम वर्णन करणार्‍या कविता एकत्रित करण्यात आलेल्या आहेत. आश्‍विनाचा पहिला श्‍वास अंतर्मनात ओढून घ्यावा. आश्‍विनाचा रेशिमशेला प्राणांभोवती कवटाळून घ्यावा. पाऊसओल्या डोळ्यांमध्ये नवा सूर्य भरून घ्यावा. जुन्या भिजल्या वाळ्यामध्ये नवे धान ठेवून द्यावे असे, या संवेदनशील कविमनाला वाटते. आश्‍विनवैभवाचे दुसरे चित्र त्याने ‘आश्‍विनाचा साज’ या कवितेत रेखाटले आहे. वर्षाकालीन मेघांचे वर्णन त्याने चित्रमय शैलीत केले आहे. ‘पर्जन्यसूक्त’ या कवितेत पर्जन्यकालीन निसर्ग विभ्रमांचे, गायी-गुरांच्या हालचालींचे वर्णन त्याने केले आहे. ‘आषाढस्य प्रथम दिवसे...’, ‘राजा पर्जन्या!’, ‘श्रावण आला रे’, ‘तृप्ती’ आणि ‘मोरच मोर’ या कवितांमध्ये सृष्टीची रूप-रस-गंध-नाद आणि स्पर्श या पंचसंवेदना निर्माण करणारी आल्हाददायी चित्रे कवीने रेखाटलेली आहेत.

‘शिरीष’ या कवितेत शिरीष वृक्षाशी कवी हृदयसंवाद करीत आहे. एका परीने ही त्याची आत्मशोधाची प्रक्रिया आहे. तिच्यातून कवीच्या जीवनदृष्टीवरही प्रकाश पडतो. अशाच स्वरूपाच्या अभंग आशावादाचे प्रतिबिंब ‘चाहूल’ या कवितेतही आढळते. ‘ऋतुराजांनो’ या कवितेत कवीने ऋतूंना उद्देशून ‘तुम्ही सृष्टीचे भाग्यविधाते आहात. चराचराचे जीवनदाते आहात. तुमच्या नीरव तालावरती धरती आपली गीते गाते. धरित्री ऋतुरंगा विभ्रमांनी नटते’. अशी प्रसन्न क्षणचित्रे कवीने तन्मयतेने टिपलेली आहेत. ऋतूंच्या लावण्यमहोत्सवाच्या साथसंगतीत कवीच्या अंतर्यामी नवसृजनाच्या कळा उमलतात. सृष्टी आणि कवी यांच्यामधील अद्वैताचा साक्षात्कार कविमनाला होतो. कृतज्ञतेने ओथंबून आलेले हे कविमन उद्गारते :

मी तर तुमचे मूल,
वाढलो तुमच्या प्रेमळ अंकावरती
चैतन्याची तुमच्या वीणा
मी व्हावे ही होते नियती

वसंत बापटांच्या विविधांगी कवितांमधून त्यांच्या मनाचा विकास जाणवतो. त्यांच्या काव्यजाणिवांमध्ये जीवनविषयक प्रगल्भ चिंतनाची बैठक दिसून येते. प्रेमाच्या आणि प्रणयाच्या छटा त्यांनी आपल्या कवितांमध्ये रंगविल्या. ‘बिजली’ मध्ये ‘फिरली मर्जी’ व ‘नकळत तुमचे डोळे वळले’ यांसारख्या प्रेमकवितांमधून नवथर प्रीतीचे तरंग उमटले आहेत. ‘सेतू’ या कवितासंग्रहात प्रेमभावना प्रकट करणार्‍या विपुल कविता आहेत. ‘अकरावी दिशा’, ‘सकीना’ आणि ‘राजसी’ मध्येही प्रेमकवितांचा समावेश आहे. ‘मानसी’मधील मालिका कवितांमधून प्रेमभावनेचे विभ्रम हळुवारपणे प्रकट झाले आहेत; समांतरपणे सृजनप्रक्रियेसंबंधी केलेला तो संवादही आहे. तरल अनुभूती व्यक्त करण्यासाठी एका आगळ्या आकृतीबंधाचा प्रयोग या संग्रहात वसंत बापटांनी केला आहे. ‘जपायला शिकली होतीस’ या कवितेत प्रियकराच्या नवथर तारुण्यातील भावतरंग व्यक्त झाले आहेत :

शैशव माझे सरले होते
सरले नव्हते सार काही कळले होते. 
कळले नव्हते.
नुकते होते स्वप्नपर्‍यांना फुटले पंख
अभिलाषेचा जरा कुठे झालेला डंख
केळीवरच्या दवापरी मन हळवे होते
पडायचे प्रतिबिंब त्यामध्ये भलते सलते.

प्रेयसीच्या आठवणीत अजूनही मग्न असलेले मन पुढील शब्दांतून प्रकट होते. निसर्ग आणि प्रेमभावना यांची एकतानता त्यात आढळते. वसंत बापटांच्या काही प्रेमकविता छंदात, काही मुक्तछंदात आहेत. काही कविता लावणीच्या ढंगात त्यांनी लिहिल्या आहेत.

‘प्रवासाच्या कविता’मुळे वसंत बापटांच्या कवितेला नवी मिती प्राप्त झाली आहे. न्यूयॉर्कच्या महाद्वारी स्वातंत्र्यदेवतेच्या हातात असलेली मशाल कविमनाला गत इतिहासाचा धांडोळा घेण्याची प्रेरणा देते. न्यूयॉर्क या महानगराचे ते समुचित शब्दांत चित्र उभे करतात. मोहमयी अमेरिका त्यांच्या मनाला भुलवू शकत नाही. तेथील सृष्टिसौंदर्य, मनुष्यनिर्मित वैभव न्याहाळत असताना त्यांच्या मनात भारतीय संदर्भ जागे होतात. त्यांनी वॉल्ट व्हिटमनला उद्देशून लिहिलेली कविता अंतर्मुख करणारी आहे. ऐहिक सुखाची परमावधी झाल्यावर नेमके काय होते, यावर मर्मस्पर्शी भाष्य करणारी ही कविता आहे.

कालिदासाच्या ‘मेघदूत’ या अभिजात काव्याचे ‘मेघहृदय’ हे रूपांतर वसंत बापटांनी केले आहे. त्यांच्या कविमनाला भावलेल्या या काव्याचा आशय त्यांनी मुक्तपणे आणि रसज्ञतेने मांडलेला आहे. एका परीने त्यांनी केलेले हे अनुसर्जन आहे. ‘मेघदूता’ची सौंदर्यस्थळे उलगडून दाखविणारे लेख त्यांनी वेळोवेळी लिहिले. त्यातून त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनाची आणि मर्मदृष्टीची साक्ष पटते.

याशिवाय ‘शिंग फुंकिले रणी’ व ‘शूर मर्दाचा पोवाडा’ हे राष्ट्रप्रेम जागृत करणारे कवितासंग्रह त्यांनी लिहिले. ‘चंगामंगा’, ‘अबडक तबडक...’, ‘गरगर गिरकी’, ‘फिरकी’ आणि ‘फुलराणीच्या कविता’ हे त्यांचे बालकवितांचे संग्रह. या त्यांच्या काव्यसंपदेतून त्यांची काव्यप्रतिभा अनिरुद्ध संचार करते, हे दिसून येते.

प्रा. वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कवित्वशक्तीचे स्मरण करताना ते कृतार्थ जीवन जगले याचा प्रत्यय येतो. त्यांनी सदैव विधायकतेचा आणि सृजनशीलतेचा मार्ग पत्करला. परिणतप्रज्ञ वयातदेखील आपले संवेदनशील मन त्यांनी ताजे व टवटवीत ठेवले. त्यांचा लौकिक जीवनप्रवासही नव्या पिढ्यांना प्रेरणादायी स्वरूपाचा आहे. परिपूर्ण आणि अभिरुचिसंपन्न जीवन ते जगले. त्यांच्या स्मृतीला विनम्र वंदन!

- सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा
somnathpant@gmail.com


हेही ऐका : 

 

Tags: Vasant Bapat Vinda Karandikar Mangesh Padgaonkar Marathi Poet Marathi Poetry Marathi Literature Load More Tags

Comments:

नंदकिशोर लेले,पुणे

सर नमस्कार कविवर्य प्राध्यापक वसंत बापट यांचेवरील लिहिलेला उपरोक्त लेख सर्वांगसुंदर झालाआहे. त्यांच्या वांग्मयीन कारकिर्दीचा रोचक आढावा आपण घेतला आहे. त्यांच्या उत्तमोत्तम साहित्य कृती बरोबर अर्थगर्भ कविता कोणत्या , त्यातील भाषासौंदर्य रुपकळा आणि काव्य विचार याबाबत लेखातून बरंच काही कळतं. आपल्या या लेखातून आपण त्यांच्या साहित्यकृतींचा किती बारकाईने अभ्यास केला आहे ,आस्वाद घेतला आहे याचे प्रत्यंतर येते. लेखात उल्लेख केलेल्या सर्व कविता मुळातून वाचायला हव्यात अशी जिज्ञासा निर्माण होते. साहित्यिक आणि कवी मंडळी यांनी वेळोवेळी मानवी जीवनातील सत्यम शिवम सुंदरम काय आहे ही वेगवेगळ्या वांग्मयीन कलाकृतीतून सांगितलेले आहे आणि प्रसंगी समाजमनाची मशागत करण्याचे कार्य केलेले आहे . अनेक साहित्यिक यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व याविषयी आपण नियमित लिहीत असता . समर्थ रामदास यांच्या उक्तीनुसार ' उत्तम पदार्थ दुसऱ्यासी द्यावा शब्द निवडून बोलावा असेच हे कार्य आहे. आपला लेख माझ्या मित्रमंडळींनाही पाठवीत आहे. एक साहित्यिक मेजवानी दिल्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करतो.

Rajendra Dattaram Satpute

राष्ट् सेवा दलात असताना सेवा दलाच्या शाखा मधून वसंत बापटांची गाणी तोंड पाठ होती. तुझ्या घामा मधून.... छान लेख आहे.

Add Comment

संबंधित लेख