जीवनाच्या समग्रतेला भिडू पाहणारे चिंतनशील प्रज्ञावंत...

11 सप्टेंबर : विनोबा भावे यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त...

आचार्य विनोबा भावे हे आधुनिक भारतातले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होय. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कितीतरी पैलू होते. ते कृतिशील विचारवंत होते. महात्मा गांधींचा वैचारिक वारसा त्यांनी आपल्या कृतीतून आणि विचारदर्शनातून पुढे चालवला. भारतीय जीवनसंचिताची अंतःस्थ धारा त्यांच्या विचारांतून प्रकट झाली. साधनशुचितेचा मार्ग त्यांनी आपल्या जीवनप्रवासात अखंडितपणे अंगीकारला. त्यांची ज्ञाननिष्ठा अतुलनीय स्वरूपाची. वाणी आणि लेखणी या माध्यमांद्वारे त्यांनी भारतीय जीवनमूल्यांचा प्रसार सातत्याने केला. ‘उपनिषदे’, ‘भगवद्‌‌गीता’, ‘ब्रह्मसूत्रे’, ‘शांकरभाष्य’, ‘मनुस्मृती’, ‘पातंजलयोगदर्शन’, ‘न्यायसूत्र’, ‘वैशेषिक सूत्र’ आणि ‘याज्ञवल्क्यस्मृती’ हे प्राचीन ग्रंथ त्यांनी अभ्यासले. संतवाङ्‌मयाचे डोळसपणे परिशीलन केले. त्यांनी आपल्या व्यासंगातून आणि चिंतनशील वृत्तीमुळे लहानमोठी दोनशे पुस्तके लिहिली. बावीस भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या. 

बौद्धिक क्षमता त्यांच्याकडे होतीच. त्यांची स्मरणशक्तीही तल्लख होती. विविध विचारसरणींचा अभ्यास केल्यामुळे विवेकबुद्धीने आणि समतोल दृष्टिकोणातून विवेचन करण्याची पद्धती त्यांनी अंगीकारली होती. त्यांच्या पारमार्थिक विचारदर्शनाला बुद्धिप्रामाण्यवादाची जोड मिळाली होती ही अत्यंत दुर्मीळ बाब होती. आपल्याला अभिप्रेत असलेल्या जीवनधारणेला व्यक्त करताना त्यांना कष्ट पडले नाहीत. भाषेला सजवावे लागले नाही. ‘अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी ।’ अशी त्यांची अभिव्यक्ती होती... शिवाय ‘चंदनाचे हात पायही चंदन ।’ अशा आत्मबलाची जोड त्या शब्दांना होती... त्यामुळे त्यांच्या उद्‌गारांना मंत्राक्षरांची महती प्राप्त झाली. 

विनोबाजींच्या परिणतप्रज्ञ व्यक्तिमत्त्वाचा स्पर्श आणि ऋजू अंतःकरणाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात आढळते. या क्रांतदर्शी प्रज्ञावंताच्या समर्थ अभिव्यक्तीमुळे ज्ञानाचे क्षितिज उजळून निघाले. व्युत्पन्नता, सूक्ष्म अवलोकनशक्ती आणि श्रुतयोजनकौशल्य या त्रयीचा संगम त्यांच्या विचारांत आहे. आजही त्यांचे विचार ताजे, टवटवीत वाटतात.

विनोबाजींचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या गागोदे या गावी 11 सप्टेंबर 1895 रोजी झाला. नागपूरच्या पवनार आश्रमात 15 नोव्हेंबर 1982 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी प्रायोपवेशन केले. सत्त्याऐंशी वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. आज त्यांची 125वी जयंती. 

विनोबांच्या जीवनकार्याचे अनेक टप्पे आहेत. 1913मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1916मध्ये त्यांनी विद्याध्ययनासाठी काशी विद्यापीठात प्रयाण केले. तिथल्या दीक्षान्त समारंभात महात्मा गांधींनी केलेल्या भाषणाचा प्रभाव विनोबाजींवर पडला. 7 जून 1916 रोजी गांधीजींच्या कोचरब आश्रमात त्यांनी प्रवेश केला. त्यांच्या अनुमतीने विनोबाजी अध्ययनासाठी स्वामी केवलानंदांच्या सान्निध्यात राहिले. 1921मध्ये साबरमती इथल्या सत्याग्रह आश्रमाच्या शाखेच्या संचालकपदाची जबाबदारी; 1940मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी केलेल्या सत्याग्रहातले पहिले सत्याग्रही म्हणून सहभाग; ‘चले जाव’ चळवळीत महत्त्वाचा सहभाग; सर्वोदयचा प्रारंभ; भूमिक्रांतीचे प्रयोग आणि त्यातून साकार झालेली भूदान यज्ञाची संकल्पना; तिला वाहिलेले जीवन; अस्पृश्यता निवारणासाठी बिहारमधल्या वैद्यनाथ मंदिरात, पुरीच्या जगन्नाथ मंदिरात आणि पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेशासाठी केलेले प्रयत्न आणि चंबळेच्या खोऱ्यातल्या डाकूंचे हृदयपरिवर्तन व्हावे म्हणून त्यांनी केलेला प्रयत्न अशा विविध घटनाप्रसंगांनी विनोबाजींचे जीवनचरित्र व्यापलेले आहे. तो सारा प्रवास समग्रतेने सांगण्याची आवश्यकता इथे नाही. एका बाबीचे अधोरेखन करायला हवे. विनोबाजींच्या सेवापर्वावर, रचनात्मक कार्यावर आणि परिव्राजक वृत्तीवर गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा फार मोठा प्रभाव आहे. 

गीता हा त्यांच्या जीवनाचा मर्मबंध. आईविषयी त्यांना विशेष ममत्व वाटे. गीतेचे अंतरंग समजून घेण्यासाठी विनोबाजींनी आईच्या इच्छेनुसार ‘गीताई’ रचली. गीताप्रवचने धुळ्याच्या तुरुंगवासात 21 फेब्रुवारी 1922 ते 19 जून 1932 या काळात दर रविवारी दिली. योगायोग असा की, ती शब्दशः लिहून घेणारा साने गुरुजींसारखा समानधर्मा त्यांना तुरुंगातच भेटला हे मराठीचे सद्‌भाग्य होय. ही दोन पुस्तके महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचली आहेत. सात्त्विक वृत्तीच्या दोन माणसांचे हे मनोमीलन आल्हाददायी वाटते. संतत्वाचा स्पर्श हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य.

विनोबाजींची मराठी भाषा अत्यंत सुलभ, प्रवाही, अलंकारांचा बडेजाव नसलेली. आणखीही एक आठवण सांगावीशी वाटते. आचार्य अत्रेंच्या निधनानंतर विजय तेंडुलकरांनी ‘माणूस’ साप्ताहिकाकरता लिहिलेल्या ‘प्रचंड’ या लेखात मराठीतून मराठी लिहिणाऱ्या लेखकांत आचार्य अत्रे, दत्तो वामन पोतदार आणि विनोबा भावे यांचा उल्लेख आवर्जून केला होता.

निरूपणात्मक शैली हा विनोबाजींच्या वैचारिक लेखनातला गुणविशेष आहे. कर्मयोगाची संकल्पना त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केली आहे. परमार्थी माणूस आणि प्रापंचिक माणूस यांच्या प्रवृत्तींतला अंतर्विरोध त्यांनी नेमकेपणाने सांगितला आहे... ‘कर्म तेच परंतु भावनाभेदामुळे अंतर पडते. परमार्थी मनुष्याचे कर्म आत्मविकासक होते. संसारी मनुष्याचे कर्म आत्मबंधक होते.’ 

भगवद्‌गीताप्रणीत तत्त्वज्ञान सामान्य माणसाला समजावून सांगण्याची हातोटी विनोबाजींकडे होती. आपल्याकडे परमार्थाच्या वेडगळ कल्पना आहेत. कर्मयोगी परमेश्वरी संतांनी उभा केला आहे. ‘ईश्वरार्पणयोग’ या लेखातल्या आस्तिक्य बुद्धीने विनोबाजींनी केलेले विवेचन मननीय आहे. निराकार ईश्वर सगुण मूर्तीत प्रकट होतो... पण लौकिक दृष्टीला अज्ञान पटल्यामुळे त्याचे आकलन होत नाही. 

ते प्रसन्न आणि प्रवाही शैलीत लिहितात, ‘ही अपार सृष्टी म्हणजे ईश्वराचे पुस्तक आहे. डोळ्यांवर जाड पडदे आले म्हणजे हे पुस्तक आपणास बंद झाल्यासारखे वाटते. या सृष्टीच्या पुस्तकात सुंदर अक्षरांनी परमेश्वर सर्वत्र लिहिलेला आहे परंतु तो आपणास दिसत नाही. ईश्वराचे दर्शन होण्यात एक मोठे विघ्न आहे. ते हे की, साधे जवळचे ईश्वरस्वरूप मनुष्यास पटत नाही व दूरचे प्रखर रूप पचत नाही. मातेच्या ठिकाणी ईश्वर पाहा असे म्हटले तर तो म्हणतो... ईश्वर का इतका साधा व सोपा? परंतु प्रखर परमात्मा प्रकट झाला तर तो झेपेल का?’

ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतपुरुषांविषयी विनोबाजींनी केलेले विवेचन त्या-त्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारे आहे. ज्ञान, योग आणि भक्ती यांचा संगम ज्ञानदेवांच्या जीवनात दिसत असला तरी कोणत्याही चुकीच्या समजुतीला किंवा संकुचित भावनेला त्यांनी थारा दिलेला नाही. त्यांच्या विवेचनात कुठेही कटुतेचा लवलेश नाही असे विनोबाजींना वाटते. 

एकनाथांची ज्ञानदेवांशी एवढी एकरूपता आहे की, ज्ञानदेवांना वगळून त्यांची पृथक्‌ कल्पना करता येत नाही. ज्ञानदेवांची ज्ञानोत्तर भक्तीची परंपरा नाथांनी पुढे चालवली. त्यांनी भक्तीचे स्वरूप सुलभ करून सामान्य माणसांच्या आटोक्यात आणून सोडले. शंकराचार्य आणि ज्ञानदेव, एकनाथ यांमधले अनुबंधही त्यांनी उलगडून दाखवले आहेत.

रामदासांच्या जीवितकार्याचा परामर्श घेताना अभ्यास-वैराग्य किंवा विवेक-वैराग्य या दोन पंखांच्या साहाय्याने संसाराच्या घरट्यातला जीव परमार्थाच्या आकाशात उडू शकतो हे रामदासप्रणीत जीवनविषयक तत्त्वज्ञान असल्याचे विनोबाजींनी सांगितले आहे.

इतिहासाचार्य राजवाडे यांनी कीर्तीचा मोह टाळून परिश्रमपूर्वक आणि बुद्धिसामर्थ्याने प्रचंड साहित्यनिर्मिती केवळ मराठी भाषेतून केली. राजवाड्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मातृभाषेविषयीची उदासीनता अथवा तुच्छताबुद्धी आपण सोडून दिली पाहिजे असे विनोबाजी सांगतात. त्यांच्या जीवनदृष्टीचे मर्म सांगताना ते पुढे म्हणतात, ‘राजवाडे आपल्या पूर्वसंस्कृतीचे अभिमानी होते... पण त्याहून ते सत्याचे अधिक अभिमानी होते... त्यामुळे आपल्या संस्कृतीत त्यांना जे-जे दोष दिसले ते त्यांनी सहजपणे मांडले आहेत. आमचे सगळेच चांगले होते म्हटले म्हणजे आमची गुलामगिरी कशी आली याची काहीच उपपत्ती लागत नाही... म्हणून आमचे कुठे तरी चुकले होते हे ओळखणे जरूर आहे.’ 

विनोबाजींची ही वस्तुनिष्ठ दृष्टी लक्षात घेण्यासारखी आहे. विनोबाजींनी आपल्याला अभिप्रेत असलेल्या मानवधर्माची संकल्पना पुढील शब्दांत मांडली आहे, ‘यापुढे धर्मस्थापनेसाठी भगवंताला जास्त तकलीफ द्यायची नाही. विज्ञान आणि आत्मज्ञान या दोन साधनांनी सर्वांचे प्रेम आणि सहकार्य साधून आपल्याला धर्मस्थापना करायची आहे... आता आम्हाला मानवप्रेमाचा धर्म स्थापन करायचा आहे. त्यात पूजाअर्चा राहणार नसून मानवसेवा येईल. भक्तीचे सेवेत रूपांतर करणाऱ्या मानवसेवा धर्माची स्थापना आपल्याला करायची आहे.’ ‘मातृशक्तीचे महत्त्व’ या लेखात विनोबाजी म्हणतात, ‘भारतात धर्मरक्षणाचे कार्य स्त्रियांनी अधिक केले आहे. जगातला सदाचारही स्त्रियांनीच जिवंत राखला आहे... म्हणूनच मुलांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.’

सहजतेने येणाऱ्या लालित्याची रूपकळा विनोबाजींच्या विचारदर्शनात कशी आढळते हे ‘कवीचे गुण’ या लेखात पाहायला मिळते. ‘कवीने सर्व सृष्टीला आत्मिक प्रेमाचे पांघरूण घातले पाहिजे. तसेच सृष्टीच्या वैभवाने त्याला आत्मा नटवता आला पाहिजे. ‘वृक्षवल्ली वनचरे’ ह्यात त्याला आत्मदर्शन झाले पाहिजे. त्याबरोबर ‘वृक्षवल्ली वनचरे’ अनुभवता आली पाहिजेत. विश्व आत्मरूप आहे. इतकेच काय... पण आत्मा विश्वरूप आहे असे कवीला दिसले पाहिजे... पण पौर्णिमेच्या अभावी त्याच्या हृदयाला ओहोटी लागता कामा नये. अमावास्येच्या गाढ अंधारात, आकाश ढगांनी भरलेले असतानाही चंद्रदर्शनाचा आनंद त्याला लाभला पाहिजे. ज्याचा आनंद बाहेरच्या जगात गुंतला आहे तो कवी नाही. कवी आत्मनिष्ठ. कवी स्वयंभू. पामर दुनिया विषयसुखावर झुलत असते, कवी आत्मानंदात डोलत असतो.’ विनोबांची ही अंतर्दृष्टी किती महत्त्वाची!

‘साक्षित्व’ या लेखात विनोबाजींनी केवढा मूलगामी विचार मांडला आहे... ते पाहण्यासारखे आहे. ‘माझ्या मनाची अशी भूक आहे की, विचार पचवावा, जिरवावा, आत्मसात करावा. जशी वाफ असते. तिची शक्ती लोकांच्या तोवर लक्षात आली नाही, जोवर तिला कोंडून ठेवले नव्हते... परंतु वाफेला कोंडण्याचे लक्षात आले, तेव्हा वाफेची शक्ती लक्षात आली. तशी विचारांची शक्तीसुद्धा कोंडण्याने प्रकट होते. विचार कोंडावाच लागतो म्हणजे साहित्यनिर्मितीसाठी मौनाची आवश्यकता लागते.’

साहित्यावर विनोबाजींची निस्सीम निष्ठा आहे... पण आपण साहित्यिक नसून जीवनाचे सेवक आहोत, शोधक आहोत अशी विनम्रतेची भूमिका त्यांनी वेळोवेळी स्वीकारली आहे... पण अंतरात्म्याला जगवण्याची शक्ती विनोबाजींच्या लेखणीत आहे. साहित्य हे सहित चालणारे आहे. समाजाच्या हिताशी ते जोडलेले असते याची प्रचिती त्यांना आलेली होती. या संदर्भात ते म्हणतात, ‘वाणी विज्ञानाच्या पुढे जाऊन सरळ हृदयावरच प्रहार करते आणि तिथपर्यंत थेट जाऊन भिडते. आत्मज्ञान अंतःकरणात प्रकाश पाडते. विज्ञान हृदयाबाहेर आणि आत्मज्ञान आत असते आणि या दोघांना जोडणारा पूल वाणी तयार करते. दोन्ही बाजूंना जोडते आणि या दोन्ही बाजूंवर प्रकाश टाकते. सुचवायचे पण डिवचायचे नाही अशी मध्यस्थ लिहिण्याची करणी अहिंसेत मुरलेले सरस्वतिपुत्र करत असतात.’ असे उभय मर्यादा सांभाळून अवतरणारे ते ‘विदग्ध वाङ्‌मय’ अशी विदग्ध वाङ्‌मयाची व्याख्या त्यांनी केली आहे.

‘जीवन आणि शिक्षण’ या लेखात मुलांच्या जीवनविकासासाठी आवश्यक शिक्षणासंबंधी विचार मांडताना विनोबाजी म्हणतात, ‘शिक्षण हे कर्तव्यकर्माचे आनुषंगिक फळ आहे. जो-जो कर्तव्यकर्म करतो त्याला ते कळत-नकळत मिळते. मुलांनाही ते तसेच मिळाले पाहिजे. इतरांना ते ठेचा खात-खात मिळते. लहान मुलास अजून तितकी शक्ती आलेली नसल्यामुळे फारशा ठेचा खाव्या लागणार नाहीत असे वातावरण त्यांच्या आसपास उभे करावे आणि ती हळूहळू स्वावलंबी होतील अशी अपेक्षा आणि योजना असावी. शिक्षण हे फळ आहे आणि ‘मां फलेषु कदाचन’ ही मर्यादा ह्याही फळाला लागू आहे.’

‘ज्ञाननिष्ठा व श्रमनिष्ठा’ या लेखात विनोबाजींनी जीवनामध्ये या दोन्ही शक्तींचा उत्तम समन्वय आणि सुसंवाद साधण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे.

‘मातृमुखेन शिक्षणम्‌’ या लेखात शिक्षणाविषयीचा मूलगामी विचार विनोबाजींनी मांडलेला आहे, ‘...‘मातृहस्तेन भोजनम्‌’ आणि ‘मातृमुखेन शिक्षणम्‌’ झाले की हिंदुस्थानची प्रभा एकदम फाकेल. जगाला आपण शिकवू शकू. चारी बाजूला ज्ञान पसरवू शकू... दरेक गावात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ असले पाहिजे. आजच्यासारखे सहा-सहा तास शिक्षण देणे बेकार आहे. तासभर सुंदर शिकावे आणि साऱ्या जन्मभर शिकावे... पण ही सर्वांना शिकण्याची सोय मिळायची कशी? त्यासाठी ग्रामदान हवे कारण सर्वांनी शिकायचे तर प्रथम सर्वांना पोटभर खायला मिळाले पाहिजे. शिक्षणाची चांगली योजना ग्रामदानी गावातच होऊ शकते.’

भौगोलिक दृष्ट्या इंद्रायणी नदी आकाराने लहान असेल... पण महाराष्ट्रभूमीच्या संचिताच्या दृष्टीने तिचे पुण्यवैभव किती मोठे आहे हे सांगताना विनोबाजी भावपूर्ण शब्दांत सांगतात, ‘...‘ग्यानबा-तुकाराम’ हा भाविक मनाला मुग्ध करणारा महामंत्र इंद्रायणीच्या पवित्र पाण्यातून निर्माण झाला. देहू आणि आळंदी इंद्रायणीच्याच काठांवर एकमेकांच्या पंचक्रोशीत वसली आहेत. ज्ञानोबाच्या आळंदीने ज्ञानाचा पाया रचला आणि तुकोबाच्या देहूने भक्तीचा कळस चढवला. एकाच पंचक्रोशीत इतक्या उंचीचे दोन महापुरुष गाजले... असे उदाहरण क्वचितच आढळते. नदीच्या आसपासचा प्रदेश बहुधा सुपीक असतो... पण इंद्रायणीच्या काठच्या जमिनीने सुपीकपणाची कमाल केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाचा कस काढणारेच होऊन गेले आणि तुकोबा तर मूर्तिमंत भक्तीचा रस. इतका कस आणि इतका रस ज्या पाण्यात साठवला होता त्या पाण्याची योग्यता अपूर्वच म्हटली पाहिजे.’ (महाराष्ट्राची सरस्वती) या विवेचनात या दोन महापुरुषांचे संक्षेपाने केलेले यथार्थ मूल्यमापन तर आहेच... शिवाय विनोबाजींच्या शैलीगुणांचा परमोच्च बिंदू इथे गाठला गेला आहे.

विनोबाजींचे विचारक्षेत्र महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. साने गुरुजी ज्याप्रमाणे आंतरभारतीचे स्वप्न बघत होते; त्याचप्रमाणे विनोबाजी भाषाभगिनींच्या संसाराकडे कुतूहलाने पाहत होते. एकतर ते राष्ट्रीय चळवळीत होते. बहुभाषाकोविद होते. 

या संदर्भात आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणतात, ‘हिंदुस्थानातल्या सर्व भाषांशी माझा प्रेम-परिचय व्हावा असा मी प्रयत्न केला आहे. ज्ञान-परिचय व्हायला पुष्कळ वेळ पाहिजे. इतका वेळ माझ्यासारख्या व्यक्तीला कोठून मिळणार? परंतु मी प्रेम-परिचय करून घेतला आहे. दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील जवळजवळ सर्व भाषा मला समजतात.’ (अंतःप्रेरणा)

राष्ट्रीय क्षितिजावरच्या बंगाली साहित्याची समृद्ध परंपरा पाहून विनोबाजी प्रशंसोद्‌गार काढतात. बंकिमचंद्र, रवींद्रनाथ आणि शरच्चंद्र यांचा विशेषत्वाने गौरव करतात. त्यांच्याच शब्दांतून हा आलोक समजून घ्यावासा वाटतो.

‘येथील साहित्यिकांची अनेक नावे तुम्ही घ्याल, ती सगळी हिंदुस्थानच्या परिचयाची नाहीत... परंतु बंकिमचंद्र, रवींद्रनाथ आणि शरच्चंद्र यांची ओळख नसलेले शिक्षित लोक हिंदुस्थानात कुठेच नसतील. बंगालमधल्या इतर मोठ्या लोकांची नावेही हिंदुस्थानात प्रसिद्ध आहेत परंतु त्यांचा उल्लेख मी इथे करत नाही... कारण ते अन्य क्षेत्रांतील ज्ञानी होते. साहित्याच्या क्षेत्रात ही तीन नावे अजरामर झाली आहेत. त्यातही कालिदासानंतर भारतीय संस्कृतीचे समग्र रूप पाहणारा आणि सम्यक रूपात ते व्यक्त करणारा रवींद्रनाथांहून श्रेष्ठ साहित्यिक क्वचितच झाला असेल. उत्तर प्रदेशचे महाकवी तुलसीदास, महाराष्ट्राचे ज्ञानदेव, दक्षिण भारताचे कंबन आदी दुसरे अनेक महाकवी होऊन गेले... परंतु त्यांची योग्यता वेगळ्या कोटीची होती. ते धर्मपुरुष होते परंतु साहित्यिक या नात्याने ज्यांनी भारतीय संस्कृतीचे, केवळ धर्मदृष्ट्याच नव्हे तर समग्र जीवनदृष्ट्या सर्व पैलूंचे दर्शन घेतले असे एक रवीबाबूच होते.’ (तत्रैव) त्यांच्या या विचारांशी प्रत्येक जण सहमत होईल.

विनोबाजींच्या चिंतनशील प्रतिभेला धर्मचिंतन, अध्यात्मविचार हे विषय वर्ज्य नव्हते... पण त्यांविषयीचे विवेचन इथे केलेले नाही. विनोबाजींच्या लेखनाचे अवलोकन करताना... जीवनाच्या समग्रतेला ते भिडू पाहत होते असे दिसून येते. भारतातल्या श्रेष्ठ प्रज्ञावंतांपैकी ते एक आहेत आणि ‘माणूस’ हे त्यांच्या चिंतनाचे केंद्र आहे याचा प्रत्यय पदोपदी येतो. त्यांच्या साऱ्या प्रेरणा-धारणा-संकल्पना विश्वमानवाच्या कल्याणाभोवती गुंफलेल्या होत्या. 

त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन!

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com

Tags: व्यक्तिवेध सोमनाथ कोमरपंत विनोबा भावे Somnath Komarpant Vinoba Bhave Load More Tags

Comments:

वंदना करंबेळकर

विनोबा हा माझ्या प्रेम,भक्ती आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्या जगण्याचं सार एका या वाक्यात नेमकेपणाने मांडून ( त्यांच्या साऱ्या.....विश्वमानवाच्या कल्याणाभोवती गुंफलेल्या होत्या.)या लेखाचा शेवट अतिशय समर्पक झाला आहे. छोट्या छोट्या वाक्यात विषयाची अर्थपूर्ण मांडणी केल्याने वाचताना त्यात आनंदाने गुंतून रहायला झालं. अभिनंदन शुभेच्छा.

मुकेश कुलकर्णी

खूपच माहितीपुर्ण लेख... आचार्य विनोबा भावे यांना 125 जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! डॉ. सोमनाथ सर आपले आभार....

दशरथ का. परब.

आचार्य विनोबा भावेंच्या १२५ व्या जयंती निमित्त डॉ. कोमारपंंत सरांनी लिहिलेला लेख वाचला. विनोबांचे विचार आजही आम्हाला दिशादर्शक आहेत. डॉ. कोमारपंत सरांचे अभिनंदन.

नरेंद्र महादेव आपटे

आचार्य विनोबा भावे यांच्याबद्दल डॉ सोमनाथ कोमरपंत यांनी आत्मीयतेने लिहिले आहे. माझ्या मते अशाच प्रकारची आत्मीयता विनोबांचा वारसा पुढे नेण्यासाठी लागेल. विनोबा आणि महात्मा गांधींचा वैचारिक वारसा त्यांच्या शिक्षणविषयक विचारातून दिसतो. ते विचार आणि सद्य स्थिती यांची सांगड कशी घालायची हा मोठाच प्रश्न आहे. आणि त्याचे सुलभ उत्तर कोणाकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. विनोबांना अभिवादन करताना विनोबा-महात्मा गांधींचे विचार, आजच्या पिढीचे अनेक प्रश्न आणि सध्याचे आर्थिक-सामाजिक धोरण यांचा एकत्रित विचार कसा करता येईल ते पाहणे उद्बोधक ठरेल. 

पी ए थोरात

आचार्य विनोबा भावे यांच्या विषयी अभ्यासपूर्ण लेख व जयंती निमित्त त्यांना सार्थ अभिवादन. गीता प्रवचने तर नित्य वाचनात अनेकांच्या आहेतच पण साप्ताहिक पाठ गीताईचा करणारे अनेक जण आहेत. धुळे तुरुंगात विनोंबाची खोली आणि जिथे प्रवचने झाली ती खुली जागा याना भेट दिली की कृतार्थाची भावना दाटून येते.

Add Comment