परिवर्तनशीलता हा जीवनाचा स्थायीभाव

मराठी साहित्यातील अभिव्यक्तीच्या परिवर्तनशीलतेवर टाकलेला दृष्टिक्षेप

मराठी साहित्य आणि संस्कृती यांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिला जाणारा व सर्वाधिक दखल घेतला जाणारा उत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उल्लेख करावा लागतो. 95 वे साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर या तालुक्याच्या गावी 22 ते 24 एप्रिल 2022 असे तीन दिवस होत आहे. त्यानिमित्ताने मराठी साहित्यातील अभिव्यक्तीच्या परिवर्तनशीलतेवर टाकलेला हा दृष्टिक्षेप... 

परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तो समाजजीवनालाही लागू पडतो. अपूर्णतेवर मात करण्यासाठी, जीवन समृद्ध करण्यासाठी जुन्या समाजव्यवस्थेत परिवर्तन घडणे आवश्यक असते. जुन्या रुढीपरंपरांची बदलत्या युगमानसानुसार चिकित्सा करून त्यांचा नव्याने विचार झाला तरच नवनिर्मिती होऊ शकते. कालानुरूप बदल घडणे ही अपरिहार्य बाब असते. अशा वेळी जुने जे काही होते ते चांगले होते, अशी भूमिका घेणे रास्त नसते. नव्या जीवनप्रवाहानुसार नव्या गोष्टी स्वीकारण्याची, स्वागतशील वृत्तीची आवश्यकता निर्माण होते. सृजनशील व्यक्तीकडे स्वत:चे वेगळे जग निर्माण करण्याची क्षमता असते. आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवून आपल्या अनुभूतीने अभिनव रचना तो करू शकतो. माणसांमधील ही सृजनशीलता त्याच्या ‘स्व’विषयक जाणिवेत अंतर्भूत असते. आपण निर्माण केलेल्या भावविश्‍वात तो रममाण होतो. त्याची चिंतनप्रक्रिया निरंतर चालू असते. त्याची धडपड सुरू असते. या दोहींच्या गुणसंगमातून सृजन आकारास येते.

माणसाकडे असलेली विवेकशक्ती हा तर मोठाच गुण आहे. या विवेकशक्तीमधून मूल्यनिर्मिती होते. तिच्यामुळे क्रांतदर्शी माणसाची पावले पुढे पडतात. भविष्यकालीन स्वप्ने तो अगोदरच पाहत असतो. मानवी प्रयत्नांमुळे संस्कृतीच्या पाऊलखुणा उमटत असतात.

मराठी जनमानस आणि त्याने निर्माण केलेले यांचे अवलोकन केले असता एक समृद्ध पट आपल्या दृष्टिक्षेपात येतो. काही चढ-उतार असतातच. राजकीय घटिते, सामाजिक अभिसरणप्रक्रिया आणि प्रभावी विचारसरणी, त्यानुसार होणार्‍या सांस्कृतिक बदलांमुळे वाङ्मयनिर्मितीतही बदल घडत असतो. ज्ञानदेवांनी आपल्या प्रज्ञा आणि संकेत झुगारून त्यांनी जे क्रांतिकारी पाऊल टाकले ते आदिकालात मराठी भाषेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेच; शिवाय या नवनिर्मितीच्या रूपाने त्यांनी मानदंड दृष्टीसमोर ठेवला. तुकारामांनी लिहिलेले अभंग हे मराठीच्या आत्मशक्तीचे तेजोमय आणि लोभसवाणे लेणे आहे. एकनाथांचे केलेले विविधांगी वाङ्मयीन कार्य तर सर्वश्रुत आहे. रामदासांचा धीटपाठ हा तत्कालीन कवितेत वेगळेपणाने झळकणारा कवित्वशक्तीचा प्रभावशाली आविष्कार होय.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीपासून उच्चविद्याविभूषित तरुणांनी समष्टीच्या अभ्युदयासाठी आपापल्या जीवननिष्ठेनुसार भिन्न भिन्न मार्ग पत्करला; पण त्यांच्या अंतर्यामी असलेली सामाजिक संवेदनशीलता कुणीही नाकारू शकणार नाही. या प्रबोधनयुगात बाळशास्त्री जांभेकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व नामदार गोपाळकृष्ण गोखले आदी प्रज्ञावंतांनी प्रकट केलेले क्रांतदर्शित्व प्रशंसनीय स्वरूपाचे आहे. कालचक्राला गती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्यासारख्या कृतिशील विचारवंतांकडून घडले. त्यांच्या विचारांच्या मंथनप्रक्रियेतून सृजनशील साहित्याचा नवा मनू निर्माण झाला. नवी मळवाट तयार झाली.

या संदर्भात प्रथम स्मरण होते, ते केशवसुतांसारख्या युगप्रवर्तक कवीचे. त्यांनी पूर्वकालीन मराठी कवितेचे सारे संकेत मोडून शब्दांची केलेली नवी जुळणी, आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही घटकांत घडवून आणलेला बदल लक्षणीय स्वरूपाचा. अलक्षित क्षितिजांना स्पर्श करणारी त्यांची प्रतिभा हे क्रांतिकारी पाऊल ठरले.

केशवसुतांचे क्रांतदर्शित्व कशात आहे? ते आहे आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही घटकांत त्यांनी घडवून आणलेल्या परिवर्तनात. गतिमान होऊ पाहणार्‍या कालखंडात द्रष्टेपणाने व्यक्त केलेल्या सामाजिक आशयात. जीर्ण रूढीप्रियतेच्या शृंखलांतून सोडवून बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून समाजाला विचारसन्मुख करणार्‍या त्यांच्या अंत:प्रेरणेत. निसर्गात सौंदर्य आणि परिपूर्णता शोधणार्‍या त्यांच्या रसडोळस वृत्तीत. काव्यसाधना ही जीवनसाधना मानणार्‍या त्यांच्या जीवननिष्ठेत. व्यक्तिस्वातंत्र्यातील मूल्यभाव जाणणार्‍या त्यांच्या आत्मपर कवितेत. श्रुतिसुभग आणि संकेतनिष्ठ शब्दांचा मोह टाळून अर्थवाही शब्दांची योजना करणार्‍या त्यांच्या कल्पकतेत.

काळाची पावले ओळखणार्‍या सृजनशील प्रतिभावंताला अशा परिवर्तनशीलतेची आवश्यकता भासते. असा बदल घडवून आणणार्‍या अंत:प्रेरणेतून इतिहासाच्या प्रवाहात कर्तृत्ववान माणसे निर्माण होतात.

या संदर्भात कवी यशवंतांच्या कवितेतील ओळी आठवतात :

 तुझ्या रुचीची लावुनि झापड

 नाविन्याची दडपुनि आवड

 तीच तीच का वाहू कावड?

 का ध्येय तुझे हे खरोखरी?

अनिलांच्या काव्यनिर्मितिप्रक्रियेत नेमके हेच घडते. वॉल्ट व्हिटमन आणि त्याच्या ‘लिव्हस ऑफ ग्रास’संबंधी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रा. वा. ब. पटवर्धन यांच्याकडून त्यांना खूप काही ऐकता आले. ‘‘असे काही अभिव्यक्तीचे वाहन मिळाल्याशिवाय मनातला साराच काव्याशय रिता होऊ शकत नाही.’’ अशी प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण झाली. (एका पिढीचे आत्मकथन : वा. रा. ढवळे गौरवग्रंथ / संपा. पु. शि. रेगे आणि अन्य / मुंबई मराठी साहित्य संघ प्रकाशन, मुंबई /1975/पृ.48)

अनुभूतीच्या प्रकटीकरणाच्या अपरिहार्यतेतून अनिलांनी मुक्तछंदाची वाट पकडली. परिश्रमपूर्वक त्यांनी छंद:शास्त्र अभ्यासले. सुरुवातीची ‘फुलवात’ त्यांना छंदात स्फुरली. ‘भग्नमूर्ती’तील संस्कृतिभाष्य त्यांना मुक्तछंदात मांडावेसे वाटले. यासंबंधीचे त्यांचे विचार अभ्यासनीय आहेत.

सृजनशील साहित्यिकाच्या साहित्यप्रवासात तितिक्षेला खूप महत्त्व असते. मराठी साहित्याच्या क्षेत्रात प्रगतिशील किंवा पुरोगामी विचारांच्या उत्थानाचा तो काल होता. पहिल्या महायुद्धानंतर इंग्रजी वाङ्मयात नवीन विचारप्रवाह आणि नवे वाङ्मयप्रकार उदयास आले. अर्थात हे लोण आपल्या देशात पसरायला लागले. युद्धसमाप्तीनंतर लिहिले गेलेले पाश्‍चात्त्य वाङ्मय उपलब्ध होऊ लागले. जीवनाकडे आणि साहित्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. साम्यवादाच्या प्रभावामुळे समाज आणि साहित्य यांच्यातील परस्परसंबंधांची जोरदार चर्चा वाङ्मयीन नियतकालिकांमधून व्हायला लागली. लालजी पेंडसे यांच्या विचारमंथनातून, अनंत काणेकरांच्या कवितेतून, भा. वि. ऊर्फ मामा वरेरकर यांच्या नाटकांतून या विचारसरणीचे प्रतिबिंब आढळते. अशाने साहित्यक्षेत्राला सामाजिक चिंतनाची मिती मिळाली. आणखी एक लक्षणीय टप्पा म्हणजे विभावरी वाङ्मय. विभावरी शिरूरकर (मालतीबाई बेडेकर) यांनी आपल्या कथा-कादंबर्‍यांमधून स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडली. वैचारिक क्षेत्रातही स्त्री-पुरुष समान हक्कांच्या अभिव्यक्तीची ती नांदी होती. आंतरराष्ट्रीय क्षितिजावर उदय पावलेल्या नवमतवादाची ती परिणती होती. पारंपरिक मूल्ये आणि परिवर्तनशीलता यांमध्ये सतत संघर्ष चाललेला असतो, त्यातील एक महत्त्वाचा बिंदू म्हणून विभावरी वाङ्मयाकडे अंगुलिनिर्देश करता येईल.


हेही वाचा : मराठीच्या अभिजात दर्जाचं काय झालं? - हरी नरके


1939 ते 1945 हा द्वितीय महायुद्धाचा काळ. या काळात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झाली. मानवसंहार तर झालाच; पण मानवी मूल्यविवेकालाही फार मोठ्या प्रमाणात तडे गेले. या उद्ध्वस्त मनोविश्‍वाचे चित्रण करण्याची अंत:प्रेरणा सार्‍या जगातील साहित्यिकांमध्ये निर्माण झाली. साहित्यक्षेत्रात जी मंथनप्रक्रिया झाली; तिच्यामुळे पाश्‍चात्य विचारधारा आणि पौर्वात्य विचारधारा यांत आदान-प्रदानप्रक्रिया घडली. आदर्शवादाची जागा वास्तववादाने घेतली. भावनासंकुलतेचे विश्‍व लयाला जाऊन जटील समस्यांनी व्यापलेले व्यामिश्र विश्‍व अस्तित्वात आले. संवेदनशील कवी, लेखक आणि चित्रकार यांना हे अनुभूतिविश्‍व आकळताना नवी भाषा, नव्या प्रतिमा आणि प्रयोगशीलता स्वीकारणे हे अटळ होऊन बसले. साहित्याचे क्षिजित विस्तारताना साहित्याला आणि निर्माणकर्त्या साहित्यिकांना अन्य कलांशी अनुबंध निर्माण करणे अपरिहार्य होऊन बसले.

या पार्श्‍वभूमीवर मराठी साहित्याचे अवलोकन करताना बडोद्याहून पुरुषोत्तम आत्माराम चित्रे आणि विमलाबाई पुरुषोत्तम चित्रे यांच्या संपादकत्वाखाली निघणार्‍या ‘अभिरुची’ व प्रा. श्री. पु. भागवत यांच्या संपादकत्वाखाली नवी रूपकळा धारण करणार्‍या ‘सत्यकथा’ या वाङ्मयीन नियतकालिकांचे कार्य फार मोठे आहे. नव्या वाङ्मयीन आकृतिबंधांना सुदृढता आली. आत्मभान निर्माण झाले. सकस आशय प्रकट झाला. अभिव्यक्तीच्या नव्या नव्या वाटांचा स्वीकार केला गेला.

मासिक ‘मनोरंजन’, ‘विविध ज्ञान विस्तार’, ‘करमणूक’, ‘रत्नाकर’, ‘पारिजात’, ‘ध्रुव’, ‘साहित्य’, ‘यशवन्त’, ‘युगवाणी’, ‘विहंगम’, ‘प्रतिभा’, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’, ‘सह्याद्री’, आणि ‘नवभारत’ या विविध प्रकारच्या नियतकालिकांनी जोपासलेल्या वैचारिक परंपरा, सृजनशीलतेचे सातत्याने अन् मनोभावे केलेले पोषण व परंपरा आणि नवता यांमध्ये निर्माण केलेला सेतू यांचे ऐतिहासिक मूल्य नाकारता येणार नाही.

‘सत्यकथा’ आणि ‘अभिरुची’ या वाङ्मयीन नियतकालिकांनी नव्या परिप्रेक्ष्यात साहित्याकडे पाहण्याची मर्मदृष्टी दिली. परिवर्तनाच्या उंबरठ्यावर माती आणि माणूस यांमधील नाते अधोरेखित केले. गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा-कादंबर्‍यांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. परिवर्तनाच्या या चळवळीत मुंबई शहराचा महत्त्वाचा वाटा आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील घटिते, चढ-उतार आणि स्पंदने यांचा साक्षीभाव या शहराने जोपासला. नव्या विचारांचे आणि वाङ्मयीन प्रवाहांचे, अंत:प्रवाहांचे ते महाद्वार. गंगाधर गाडगीळ यांनी प्रगल्भ मनाने ‘प्रारंभ’ या कादंबरीत या स्पंदनकेंद्राचा कलात्म वेध घेतला आहे. एका श्रेष्ठ सृजनशील साहित्यिकाने स्थल, काल आणि संचित या त्रिपुटीचा मर्मदृष्टीने घेतलेला हा मागोवा आहे.

या महानगरातील कठोर वास्तवतेने सृजनशील कवी / लेखकांना नवे भान दिले. ‘शिशिरागम’मध्ये ‘पादाकुलक’ वृत्तात आपले भावविश्‍व रंगविणार्‍या मर्ढेकरांची कविता ‘काही कविता’ आणि ‘आणखी काही कविता’मध्ये आशयदृष्ट्या व अभिव्यक्तीदृष्ट्या पूर्णत: बदलली. याच काळात गंगाधर गाडगीळ यांनी नवकथा लिहिली. मर्ढेकरांनी या कथेची बलस्थाने अधोरेखित केली; ‘उद्याचा समर्थ कथाकार’ अशी ग्वाही दिली.

1960 नंतर मराठी साहित्यविश्‍वात नवी संवेदनशीलता प्रकट झाली. तिचे रसिकवर्गाने मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. सुजाण वाचकांच्या डोळ्यांसमोर हा पट आहे. या परिवर्तनशीलतेच्या उंबरठ्यावर दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या ‘कविता’ हा संग्रह प्रसिद्ध झाला. ‘पॉप्युलर प्रकाशन’तर्फे ‘नवे कवी... नव्या कविता’ या मालेत नव्या दमाच्या कवींच्या कविता रसिकांसमोर आल्या. समांतरपणे वसंत आबाजी डहाके, नारायण सुर्वे यांची पृथगात्म कविता प्रसिद्ध झाली. दबल्या गेलेल्या श्रमिकांचे श्‍वास-निश्‍वास सुर्वे यांनी आत्मविश्‍वासयुक्त वाणीत प्रकट केले :

         एकटाच आलो नाही

         युगाचीही साथ आहे

         सावध असा तुफानाची

         हीच सुरुवात आहे

     ...आज माझ्या कोरड्या या

         शब्दांत आग येत आहे

         आणि नव्या सृजनाचे

         क्षितिज रुंद होत आहे.

पुढील कालखंडात वेदना आणि विद्रोह घेऊन दलित कवितेचा आत्मस्तर प्रकट झाला. आजवरच्या शोषितांचे, दलितांचे मुके स्वर मुखर झाले. या कवितेतील आशय-अभिव्यक्तीला साहित्यशास्त्राच्या अभ्यासाची पार्श्‍वभूमी नव्हती. जीवनाच्या कुरुक्षेत्रावर तिची बीजाक्षरे गिरवली गेली. या कवितेच्या आणि प्रखर अनुभूतीदर्शन घडविणार्‍या आत्मकथनांनी भल्याभल्यांची झोप उडवली. या आत्मप्रत्ययशील वाणीने मराठी कवितेला बदलत्या युगमानसातील नवी मिती प्राप्त झाली. दु:खाचे पापुद्रे उलगडून दाखविणार्‍या या कवितेने जीवनवास्तवाचा सोलीव गाभा वाचकांसमोर ठेवून अंतर्मुखतेचा अनुभव दिला. प्रयोगशीलतेच्या नावाखाली, अभिव्यक्तिवादाच्या अतिरिक्त हव्यासापायी मध्यंतरीच्या काळात साक्षात जीवनदर्शनाकडे दुर्लक्ष झाले होते.

दलित कवितेने या बिंदूशी जीवन आणि साहित्य यांच्या अद्वैताचा प्रत्यय आणून दिला. आजची स्त्री ज्या तडफदारपणे जीवनानुभूतीचे दर्शन अनेक रूपबंधांतून प्रकट करीत आहे, ते पाहता कोश फोडून ती आता मोकळा श्‍वास घेत असल्याची जाणीव होते.

नव्या युगाच्या परिवर्तनाची ही पहाट होती. साहित्याच्या अभिव्यक्तीसाठी निर्माण झालेली ती नवी मळवाट होती.

- सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा
somnathpant@gmail.com

Tags: मराठी साहित्य समीक्षा साहित्य संमेलन मराठी उदगीर Load More Tags

Comments:

Shankar Komarpant

Chaan Shabdh nahi varnan karayas.

Add Comment

संबंधित लेख