मधु मंगेश कर्णिक: चतुरस्र प्रतिभेचे साहित्यिक

सव्यसाची साहित्यिकाच्या 87व्या वाढदिवसानिमित्त...

फोटो सौजन्य: Rucha Communication

28 एप्रिल, 2020 रोजी मराठीतील सव्यसाची साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आपल्या वयाची सत्याऐंशी वर्षे पूर्ण करीत आहेत. आजही त्यांचा हात लिहिता राहिलेला आहे. त्यांचे कसदार लेखन वाचणे, हा एक आनंदानुभव आहे. गेली साठ-पासष्ट वर्षे कर्णिक सातत्याने लेखन करताहेत. लेखन हे त्यांच्या आयुष्याचे व्रत आहे आणि ते त्यांनी आनंदाने स्वीकारले आहे. ‘मातीचें मार्दव सांगे। कोंभाची लवलव ।।’ या ज्ञानदेवांच्या उक्तीनुसार कर्णिक आपल्या मातीशी प्रामाण्य राखून लिहीत आहेत. 

आपल्या अवतीभोवतीचा परिसर आणि माणसे, साऱ्या स्पंदनांसह गोचर करणारी अनुभवसिद्ध शब्दकळा, तशीच प्रसन्न शैली कर्णिकांना लाभलेली आहे. कथा, कादंबरी आणि ललित निबंध हे मूलबंध हाताळताना, आपल्या भूमीशी असलेली नाळ त्यांनी कधी तोडली नाही. त्यांनी एकतानतेने हे सारे लेखन केले. 

कर्णिक यांनी संवेदनक्षम वयात कवितेने लेखनारंभ केला. परिणतप्रज्ञ वयात पुन्हा एकदा कविता त्यांच्या भेटीस आली. मधल्या दीर्घकाळात काव्यात्म वृत्तीचा मूलस्रोत त्यांच्या लेखनप्रकृतीत कायम राहिला. पण वास्तवाशी असलेले आपले नाते त्यांनी घट्ट ठेवले. कलावंतांच्या कुंडलीत ही किमया कशी काय साधत असेल? 

भाववृत्तींतील जिव्हाळा, ओथंबलेपण आणि माणसांविषयी वाटणारे ममत्व, कर्णिकांच्या समर्थ शब्दकळेतून प्रकट होते. संवेदनक्षम वयातच त्यांनी आपल्या कथालेखनास प्रारंभ केला. 1954 मध्ये त्यांची ‘पवित्र पातक’ ही कथा प्रसिद्ध झाली. व्यंकटेश माडगूळकरांनी रंगवलेली ‘माणदेशी माणसे’ वाचून त्या धर्तीवर आपण आपल्या मुलुखातील माणसे का रंगवू नयेत, असे त्यांना वाटायला लागले. ‘कोकणी गऽ वस्ती’ या कथासंग्रहातील रसरशीत जीवनानुभवाच्या प्रत्ययकारी चित्रणामुळे मधु मंगेश कर्णिक यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. 

1958 मध्ये मालवण येथे कवी अनिल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ते आणि त्यांचे लेखकमित्र चिं. त्र्यं. खानोलकर ‘कोकणी गऽ वस्ती’च्या प्रती घेऊन फिरत होते. पुढे 1990 मध्ये मधु मंगेश कर्णिक रत्नागिरी येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, हा एक आनंदयोग. ‘कोकणी गऽ वस्ती’ या कथासंग्रहाच्या यशानंतर कर्णिकांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या लेखनाची कमान उंचावतच राहिली. त्यानंतरच्या प्रदीर्घ कालखंडात मराठी कथा-कादंबरीच्या क्षेत्रांत कर्णिकांनी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण नाममुद्रा उमटविलेली आहे. 

कर्णिकांच्या निर्मितिशीलतेचा झपाटा फार मोठा आहे. त्यांच्या अनुभवविश्वात वैविध्य आहे. जीवनातील कडू-गोड अनुभवांनी त्यांची जीवनदृष्टी प्रगल्भ झालेली आहे. हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या डोंगरदऱ्या, नित्य-निरंतर ऐकू येणारी सागरगाज, वृक्ष-झऱ्यांचे कूजन ऐकू येणारे रूप-रस-गंध-स्पर्श-नाद इत्यादी संवेदनांना जाग आणणारे कोकण आणि सह्याद्रीचा पायथा कर्णिकांना अतिशय प्रिय आहे. 

गोवा, मुंबई ही कर्णिकांची काही काळ कर्मभूमी होती. आजही मुंबईत त्यांचे कायमचे वास्तव्य आहे. करूळच्या भूमीशी असलेले अनुबंध अजूनही कायम आहेत. त्यांचा जीव खऱ्या अर्थाने रमतो, तो कोकणच्या लाल मातीत. या मातीत साहित्याच्या निर्मितीचे मूलबीज आहे. येथे माणसांच्या सहवासात प्रतिभेला नित्य नवे धुमारे फुटतात, अशी त्यांची धारणा आहे. 

कोकणातील या भावसंचिताने कर्णिकांना समर्थ साहित्यिक बनविले. ‘करूळचा पोर’ कसा वाढता राहिला, याचा त्यांनी मराठी साहित्यविश्वाला प्रत्यय आणून दिला. त्यांच्या लेखनात कोकणभूमीविषयीची ही कृतज्ञतेची जाणीव सातत्याने प्रकट झालेली दिसून येते. त्यात माणुसकीचा ओलावा ठायी-ठायी दिसून येतो. कोकण त्यांनी सहृदयतेने, सजगतेने आणि उत्कटतेने पाहिले, अनुभवले. अस्सल कलावंतांच्या अनुभूतीने ते टिपले. म्हणूनच कोकणची भूमी हा कर्णिकांच्या सृजनशीलतेचा मर्मबंध आहे. पण या प्रदेशाच्या चित्रणापुरती त्यांची प्रतिभा सीमित राहिली नाही. कलावंताच्या विकासक्रमाच्या पाऊलखुणा त्यांच्या लेखनप्रवासात दिसतात. सामाजिक स्थित्यंतरांच्या सूक्ष्म अवलोकनामुळे आणि वाढत्या अनुभवविश्वामुळे त्यांचे लेखनक्षितिज विस्तीर्ण होत गेले. हा समृद्ध लेखनप्रवास एका मनस्वी कलावंताचा आणि समाजसन्मुख माणसाचा आहे, हे सहज ध्यानात येते.

28 एप्रिल, 1933 रोजी कणकवली तालुक्यातील करूळ या गावात मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म झाला. पहिली वीस वर्षे त्यांनी आपल्या या जन्मभूमीत काढली. त्यांच्या जीवनाचा प्रवास तसा खडतरच झाला. त्यांच्या बालपणी त्यांचे वडील निर्वतले. नंतर आई दिवंगत झाली. आप्तस्वकीयांचे मृत्यू त्यांना पाहावे लागले. थोरल्या बहिणीने भावंडांचा सांभाळ केला. कर्णिकांचे प्राथमिक शिक्षण करूळला व माध्यमिक शिक्षण कणकवलीला झाले. 

कणकवलीला शालेय वयातच अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. मालवणच्या ‘बालसन्मित्र’ मासिकात ती प्रसिद्ध झाली. 1951 मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षण घेता आले नाही. उपजीविकेसाठी नोकरी करणे भाग पडले. एस. टी.च्या विजयदुर्ग भांडारात लिपिक म्हणून त्यांची नेमणूक झाली. सुरुवातीपासून साहित्यनिर्मितीची ऊर्मी त्यांच्या मनात होतीच. ती त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी कथालेखनास जोमाने सुरुवात केली. तेथील वास्तव्यात व्रतस्थ कथाकार श्रीपाद काळे यांच्याशी त्यांची गाठभेट झाली.

विजयदुर्गहून मधु मंगेश कर्णिक कोल्हापूरास गेले. संगीत व नाटक या कलांचे निस्सीम उपासक तसेच संवादिनीपटू गोविंदराव टेंबे यांच्या चाळीत ते राहत असत. टेंबे यांच्या सहवासात झालेला काव्य-शास्त्र-विनोद त्यांच्या साहित्यनिर्मितीच्या दृष्टीने पोषक ठरला. टेंबे यांनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले. ‘‘तुम्ही राहता त्या खोलीत कवी माधव जूलियनांचं बिऱ्हाड होतं. तुम्ही त्यांच्यासारखं भाग्य उजळा’’, असे उद्‌गार टेंबे यांनी एकदा काढले होते. 

मधु मंगेश कर्णिक यांचे संवेदनशील मन त्यामुळे मोहरले. हा संस्कार त्यांना पुढच्या वाटचालीस प्रेरक ठरला. शिवाय पु. ल. देशपांडे, गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे या प्रथितयश साहित्यिकांच्या आशीर्वादाचा हात त्यांना सातत्याने लाभला. प्रोत्साहित मनाने कर्णिकांनी साहित्याच्या विविध दालनांत आत्मविश्वासाने पदार्पण केले. यश संपादन केले.

मधु मंगेश कर्णिक ज्या काळात कथालेखन करीत, तो नवकथेच्या बहराचा काळ होता. प्रा. गंगाधर गाडगीळ, प्रा. अरविंद गोखले, पु. भा. भावे आणि व्यंकटेश माडगूळकर या त्यांच्या अगोदरच्या पिढीतील समर्थ कथाकारांनी मराठी कथाविश्वात चैतन्य आणले होते. वास्तव जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली होती. त्यांचे जीवनाचे आकलन प्रगल्भ होते. कर्णिकांनी या नवकथाकारांची कथा समरसून वाचली. एक प्रकारचे मंत्रभारलेपण त्यांनी अनुभवले. या सर्व लेखकांनी त्यांना लेखनविषयक नवे भान दिले. 

माडगूळकरांची लेखनप्रकृती ही आपल्या लेखनप्रकृतीला जवळची आहे, असे त्यांना वाटले. सृजनशील लेखकाला योग्य वेळी असा आत्मशोध लागणे आवश्यक ठरते. कर्णिकांच्या आयुष्यातील तो सुवर्णक्षण ठरला. कोकणातील तळागाळातील श्रम करणारी माणसे, कुळवाडी व दशावतारातील काम करणारे कलावंत इत्यादींच्या दारिद्र्याचा गाभा, जीवनशैली व्यंकटेश माडगूळकरांनी रेखाटलेल्या माणसांच्या सुख-दु:खासारखीच होती. 

कर्णिकांच्या ‘कोकणी गऽ वस्ती’ मधील व्यक्तिचित्रे चं. वि. बावडेकरांच्या ‘आलमगीर’ या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. ‘मालवणी मुलुखातील माणसं’ हे त्याचं पहिलं नाव होतं. कोकणच्या भूमीतील चैतन्यदर्शन कर्णिकांनी या व्यक्तिचित्रांद्वारे वाचकांना घडविले. त्यानंतर ‘तोरण’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. 

कर्णिकांचे आजवर तिसांहून अधिक कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ‘वेचक मधु मंगेश कर्णिक’ हा त्यांच्या निवडक कथांचा संग्रहही प्रसिद्ध झाला. निसर्गाच्या विभ्रमांशी समरस होणे, त्यातील नाट्य अनुभवणे आणि माणसांच्या भावजीवनाचे रंग अंगप्रत्यंगांसह टिपणे, हा कर्णिकांच्या कथालेखनाचा गुणविशेष होय. कोकणच्या मातीतील ऊब आणि थरथर यांचा प्रत्यय त्यांच्या कथालेखनातून येतो.

कथालेखनाप्रमाणे कादंबरी हा वाङ्‌मयप्रकारही मधु मंगेश कर्णिकांनी यशस्वीरीत्या हाताळला आहे. ‘देवकी’ ही त्यांची पहिली कादंबरी. बाबीकाका आणि भावीण देवकी यांची ही प्रेमकहाणी. त्यांचे भावविश्व हळुवारपणे रंगविण्यात कर्णिकांनी कमालीचे यश मिळवले आहे. या कादंबरीचा शोकात्म शेवट चटका लावणारा आहे. ‘देवकी’पासून ‘संधिकाल’पर्यंतचा कर्णिकांच्या कादंबरी लेखनाचा प्रवास न्याहाळताना कल्पनाविश्वात रममाण होणे, हा त्यांच्या प्रतिभेचा स्थायीभाव नाही, हे लक्षात येते. प्रारंभीच्या काळात त्यांनी छोटा अवकाश असलेल्या कादंबऱ्या लिहिल्या. परिणतावस्थेत ते विस्तीर्ण जीवनपटाकडे वळले. ‘संधिकाल’ हे त्याचे उत्तम उदाहरण. 

‘माहीमची खाडी’मध्ये कर्णिकांनी परिघाबाहेरचे जग रंगविले आहे. मुंबईसारख्या महानगराला लगटून असलेल्या माहीमच्या खाडीतील झोपडपट्टीचे वास्तववादी चित्रण त्यांनी केलेले आहे. त्यातील तपशील माणुसकीचा अंतरंग शोध घ्यायला लावणारे आहेत. अंतर्मुख करणारे आहेत. महानगरीय जीवनातले व्यामिश्रतेचे विश्व कर्णिकांनी समर्थपणे उलगडून दाखवले आहे. येथील विरुपतेचे दर्शन कर्णिकांनी जवळून घेतले होते. ‘सूर्यफूल’ हा एरव्ही एका कथेचा विषय आहे. पण पांगळा विशू कर्णिकांच्या संवेदनशील मनाला अनेक रंगांनी जाणवायला लागला. त्याची भावकथा कर्णिकांनी सहृदयतेने साकार केली आहे. 

‘कातळ’ ही नव्या उत्साहाने कोकणात परतलेल्या दिगंबर व अवधूत यांच्या प्रयत्नांची कहाणी आहे. मूळ भूमीपासून तुटल्या गेलेल्या बंधूंची ही कहाणी मनाला चटका लावते. अंधश्रद्धा, निष्क्रियता आणि परदु:ख यांचा कातळ फोडण्याचा प्रयत्न अवधूत करतो. ‘इथला माणूस हे इथल्या दारिद्र्याचं खरं कारण आहे’, असं म्हणणाऱ्या अवधूतच्या सामाजिक जाणिवेचे दर्शन या कादंबरीतून घडते; शिवाय या भूमीतील माणसांच्या दु:खाचे पापुद्रे उलगडले जातात. समाजात सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींची माणसे कशी वावरतात, याचे वास्तववादी चित्रण कर्णिकांनी या कादंबरीत केले आहे. 

कोकणातील दलित समाजातील धर्मांतराचे दर्शन कर्णिकांनी ‘भाकरी आणि फूल’ या कादंबरीत घडविले आहे. दलितांविषयीची अपार कणव या कादंबरीतून प्रकट झाली आहे. ‘जुईली’ची भावकथा हृदयस्पर्शी आहे. जुईली या मनस्विनी तरुणीच्या जीवनावर आधारलेली ही कादंबरी. या कादंबरीचे कथानक कोकणात आणि मुंबईत घडते. जुईलीची जन्मभूमी, संस्कारभूमी कोकण आणि स्थलांतरानंतरचे वेगळे विश्व मुंबई. या दोहोंची सांधेजोड कादंबरीकाराने आपल्या निवेदनकौशल्याने आणि वातावरणनिर्मितीने केलेली आहे. प्रादेशिक वातावरण आणि महानगरीय जीवन यांच्यामधील दुवा त्यामुळे साधला आहे. 

‘वारूळ’ या कादंबरीत उद्योजक जगताचे प्रातिनिधिक चित्रण कर्णिकांनी केले आहे. या क्षेत्रात वैयक्तिक कर्तबगारीला आणि महत्त्वाकांक्षेला वाव असतो. पण त्याचबरोबर राजकीय क्षेत्राप्रमाणे डावपेच, स्पर्धा आणि हेवेदावे यांची रेलचेल असते. या दाहकतेचे चित्रण कादंबरीकाराने यशस्वी रीत्या केले आहे.

‘संधिकाल’ ही मधु मंगेश कर्णिकांची महत्त्वाची कादंबरी. भिकोबा आरस यांच्या सारस्वत घराण्याच्या तीन पिढ्यांचा इतिहास असलेली ही बृहद्‌कादंबरी. या कादंबरीत स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून 1993 पर्यंतच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटनांचा पट गुंफण्यात आला आहे. एका कुटुंबाचे चित्रण करण्यापुरते तिचे भावविश्व कर्णिकांनी सीमित ठेवले आहे.

‘तारकर्ली’ या कर्णिकांच्या अलीकडच्या कादंबरीत आधुनिकतेमुळे जुन्या संस्कृतीवर झालेला आघात, मानवी संबंधांमध्ये होत गेलेला बदल, माणसाच्या हव्यासापायी निसर्गावर झालेला आघात आणि त्यांचे परस्परांवर होणारे परिणाम यांचे प्रभावी चित्रण यात आहे.

ललितनिबंध लेखन हाही मधु मंगेश कर्णिकांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वपूर्ण पैलू आहे. ‘लागेबांधे’ हे त्यांचे आत्मकथनात्मक पुस्तक. आई, वडील. भावंडे, घर आणि गाव या गोतावळ्यासंबंधीची हृद्य आणि नितांत रमणीय संस्मरणे असलेली ‘चेहरा असलेली झाडे’ ही मालिका त्यांनी ‘सत्यकथा’ मासिकात लिहिली होती. त्यातूनच ‘सोबत’ हे सृष्टीविषयीचा जिव्हाळा व्यक्त करणारे पुस्तक साकार झाले. अशीच नितांत मधुर क्षणचित्रे ‘नैर्ऋत्येकडला वारा’ या पुस्तकात आढळतात.

‘जिवाभावाचा गोवा’, ‘अबीर गुलाल’ आणि ‘स्मृतिजागर’ मधील व्यक्तिचित्रे म्हणजे ‘मैत्र’ भावाचा स्मरणोज्जीवित आनंदानुभव. तो स्वतंत्र अभ्यासाचाही विषय ठरू शकतो. ‘माझा गाव माझा मुलूख’ ही एकीकडे भौगोलिक, सुंदर परिसराची आणि वाङ्‌मयीन सहवासाची परिक्रमा आहे... न लिहिलेले हे आत्मचरित्रदेखील आहे.

असा हा ‘नैर्ऋत्येकडला वारा’ परिणतप्रत वयातदेखील भरारत आहे... बहरतो आहे आणि इतरांच्या जीवनात दरवळ निर्माण करतो आहे... तो असाच निरंतर राहो, ही शुभेच्छा.

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com

Tags: सोमनाथ कोमरपंत साहित्यिक व्यक्तिवेध कोकण कादंबरी Load More Tags

Comments:

दत्ताराम जाधव.

श्री म. मं. कर्णिक यांच्या" माहिमची खाडी " या कांदबरी नंतर त्यांच्या इतर साहित्याचे वाचन नाहीं करता आले कारण ते आमच्यापर्यंत पोहचले नाहीं आणि आम्ही शोधायचा प्रयत्नही केला केला याची खंत वाटते.

श्रध्दा कळंबटे

मा मधुभाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

म. ना. गोगटे , पुणे फोन 020-24537574

कर्णिक यांवर उत्तम लेख. पूर्वी त्यांना अनेकदा भेटलो. काही महिन्यापूर्वी मराठी विज्ञान परिषद (मी एक संस्थापक) तर्फे कोकणात वार्षिक अधिवेशन त्याचे ते उद्घाटक. तब्बेत (माझे वय 88) मी जाऊ शकलो नाही. त्यांचा ईमेलपत्ता फोन ??

Add Comment