उत्कट संवेदनांचे अमूर्त शब्दशिल्प साकारणारा कवी

ग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त...

फोटो: कर्तव्य साधना

10 मे हा ग्रेस यांचा जन्मदिन. ते आज हयात असते, तर त्र्याऐंशी वर्षांचे झाले असते. साहित्यनिर्मितीच्या प्रदेशात सदैव मग्न असणाऱ्या या अवलिया सृजनशील साहित्यिकाने परिणतावस्थेत आजही अप्रतिम शब्दशिल्प निर्माण केले असते. पण क्षणभंगुर मानवी जीवनात जर- तर या शब्दावलीला तसा काही अर्थ नसतो. त्या सृजनात्म्याला जे काही द्यायचे होते, ते देऊन झालेले आहे. 1960 नंतरच्या मराठी कवितेला नवा चेहरा प्राप्त झाला. नवी सतेजता आली. नवे प्रतिमाविश्व उदयाला आले. मराठी कवितेतील संवेदनशीलतेला या सर्वच घटकांमध्ये नवेपण प्राप्त करून देणाऱ्या कवींमध्ये ग्रेस यांचा क्रमांक वरचा लागतो.

‘पॉप्युलर प्रकाशन’च्या ‘नवे कवी... नवी कविता’ या मालेत कवी ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा नवा कोरा कवितासंग्रह 1967 मध्ये नव्या स्वरूपात प्रकाशित झाला, तेव्हा रसिकांचे नेत्र विस्फारले गेले. कविनामापासून कवितासंग्रहाच्या शीर्षकापर्यंत, सर्वांचेच कुतूहल जागृत केले होते. अर्पणपत्रिकेपासून प्रत्येक बाबतीत वैशिष्ट्यपूर्णता होती. हा कवितासंग्रह इन्ग्रिड बर्गमनला अर्पण करण्यात आला होता. सोबत सॉमरसेट मॉमच्या, 
        ‘इज इज नॉट अ ट्रॅजेडी दॅट मेन बीकम
         ॲन्ह ऑर डाइ बट्‌ सीज्‌ टू लव्ह...’ 
या ओळी उद्‌धृत करण्यात आल्या होत्या. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दगडी शिळेवर सुंदर शब्दशिल्प कोरावे, त्याप्रमाणे ग्रेस यांच्या हस्ताक्षरातील कविता होती...
        
        क्षितिज जसें दिसतें,
        तशी म्हणावीं गाणी
        देहावरची त्वचा आंधळी
        छिलून घ्यावी कोणी.

तेव्हाची ती तेजस्वी ग्रेसमुद्रा मनात मुरवून आजवर ग्रेस यांची कविता आणि त्यांचे सृजनशीलतेचे प्रदेशांचा धांडोळा घेणारे ललितबंध मी वाचत आलेलो आहे. ग्रेस स्वत:ला ‘द्वैती’ म्हणवून घेत असत. पण त्यांची कविता आणि त्यांचे ललितबंध यांमध्ये अद्वैतच आढळते. तन्मयता हा या मनाचा धर्म आहे. साहित्याची आणि अन्य कलांची निरपेक्ष साधना हा या मनाचा स्थायिभाव आहे.

कविता ही आपल्याला सहजसुलभतेने आकळावी असा रसिकाने आग्रह का धरावा? कविमानसाबरोबर त्याने आपल्या मनाचे क्षितिज व्यापक का करू नये? अथांगतेचा शोध का घेता येऊ नये? कवीने प्रतिभाधर्माचे असाधारणत्व निष्ठेने जोपासावे, अभिरुचीचा लघुत्तम साधारण विभाज्य काढून रसिकमनाचा अनुनय करू नये, असे ग्रेस यांना नेहमी वाटत असे. ‘‘माझ्या कवितेच्या नाकात दुर्बोधतेची बेसरबिंदी जन्मापासून टोचलेली आहे.’’ असे ते म्हणत असत.

ग्रेस यांची अक्षरसाधना अथक स्वरूपाची. 1958 पासून त्यांनी कवितालेखनास प्रारंभ केला. ‘छंद’, ‘सत्यकथा’ यांसारख्या वाङ्‌मयीन नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. 26 मार्च 2012 रोजी शेवटचा श्वास घेईपर्यंत कविता त्यांच्या अस्तित्वाचा भाग बनून राहिली होती. उण्यापुऱ्या चोपन्न वर्षांची ही काव्यसाधना. ग्रेस यांनी केवळ शब्दशिल्पच निर्माण केले का? त्यांनी उत्कट संवेदनांचे अमूर्त स्वरूपाचे शिल्प निर्माण केले. हे ‘मृगजळाचे बांधकाम’ मराठीच्या साहित्यविश्वाला अनुभूतींची समृद्धी प्राप्त करून देणारे; जाणिवा-नेणिवांच्या तळठाव घ्यायला लावणारे; पुराणकथा, पुरातत्त्वशोध, मिथके, लोकपरंपरा आणि आदिमता यांमधून मानवी संस्कृतिशोध घ्यायला लावणारे; तसेच अभिरुचीच्या कक्षा वाढविणारे आहे.

ग्रेस यांचा कवितेतील आत्मशोध आणि ललितबंधातील सृजनशीलतेच्या मुळांचा शोध यांत अनामिक स्वरूपाचे दृढ नाते आहे. दोहोंमधील मूलबंध काव्य हाच आहे. फक्त अभिव्यक्त होण्याचा मार्ग भिन्न आहे.

1967 पासून 2012 पर्यंत कविता आणि ललितबंध यांमधून ग्रेस गुणसमृद्ध निर्मिती करीत राहिले. ‘संध्याकाळच्या कविता’ या कवितासंग्रहानंतर त्यांचे ‘राजपुत्र आणि डार्लिंग’, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’, ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’ आणि ‘सांजभयाच्या साजणी’ हे संग्रह प्रसिद्ध झाले.

‘क्रिएटिव्हिटी इज माय लाइफ, अँड इटस कन्व्हिक्शन इज माय कॅरेक्टर’ असे म्हणणाऱ्या ग्रेस यांचा सौंदर्यशोध त्यांच्या विविधांगी रूपकळेच्या ललितबंधांतून निरंतर चालू राहिला. या प्रकृतीचे त्यांचे पहिले लेखन ‘चर्चबेल’ हे 1974 मध्ये प्रसिद्ध झाले. या नव्या रूपबंधाला त्यांनीच ‘ललितबंध’ हे नाव दिले. पुढे मराठी साहित्यविश्वात ते रूढ झाले.

‘मितवा’, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’, ‘कावळे उडाले स्वामी’ आणि ‘ओल्या वाळूची बासरी’ हे त्यांचे त्यानंतरचे ललितबंध. साहित्यकलेचा जीवनातील अन्य कलांशी असलेला अनुबंध ग्रेस शोधत राहिले. मानवी जीवनातील अंगप्रत्यंगांना स्पर्श करणारी सर्जक प्रतिभा त्यांच्याकडे होती. त्यांच्या या लेखनातून त्याचा पदोपदी प्रत्यय येतो.

ग्रेस यांच्या प्रतिभाधर्माचा पोत न्याहाळताना प्रश्न पडतो की, ते नेमके कोण होते? कवी, जीवनभाष्यकार, विचारवंत की गोष्टीवेल्हाळ माणूस? त्यांना लोकान्त प्रिय होता की वाङ्‌मयीन निर्मितीशीलतेला अनुकूल अन्‌ आवश्यक असलेला एकान्त? मनुष्यसहवास त्यांनी हेतुत: टाळलेला होता; पण माणूसघाणेपणा त्यांच्यात अजिबात नव्हता. माणूस त्यांना प्रिय होता. ‘माणूस’ हे त्यांचे चिंतनाचे केंद्र होते. सृजनाचे केंद्र होते. मानवी भावस्थितीचे चित्रण करताना निसर्गानुभूती ही अविभाज्य अंग बनून त्यांच्या अभिव्यक्तीत येत होती. सर्वांपासून ‘स्व’ला अलिप्त ठेवणारी संध्याकाळ त्यांना प्रिय होती.

आई ही ग्रेस यांच्या कवितेतील महत्त्वपूर्ण संकल्पना. ग्रेस यांच्या मनस्वी वृत्तीचा केंद्रबिंदू शोधताना ही आई आणि तिची करुणा शोधावी लागेल... तो त्यांच्या कवितेतून पाझरत राहणारा जीवनरस आहे. पारंपरिक रुढिकल्पनांहून ग्रेस यांची आई निराळी आहे. ‘‘मी पळत नसतानाही माझा सतत पाठलाग करणारी, ही एवढीच व्यक्ती माझ्या चिमूटभर आयुष्यात आली.’’ ही कृतज्ञतेची भावना ग्रेस यांच्या अंत:करणात आहे. म्हणूनच तर त्यांनी ‘‘शी स्टॅंड्‌स इन माय पोएट्री एज अ सुप्रिम सिम्बॉल ऑफ एन्टायर वुमनहुड’’ असे म्हटले आहे.

दु:खासारखी संपूर्ण अव्यभिचारी निष्ठा जगात इतरत्र भेटणे कुठेही शक्य नाही, हा ग्रेस यांच्या काव्यानुभूतीचा कंद आहे. या दु:खानुभूतीची कळ एकदा समजली तर ग्रेस यांच्या काव्यानुभूतीचा गाभा आकळायला वेळ लागत नाही. ग्रेस यांनी हे दु:खोपनिषद उत्कटतेच्या पातळीवर नेले.

        वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रंग सावळा
        या फुलांत या सुरांत चंद्र घालतो गळा
        पावले अशी सलील नादती कुठून नाद?
        मी क्षितिज वाहतों जरी जुळे न शब्द, गीत,
        दु:ख एक पांगळे जशी तरूंत सावली
        या उरांत पेटलीस, कां उन्हात काहिली?
        असें कसें सुनें सुनें मला उदास वाटतें
        जशी उडून पांखरें नभांत चाललीं कुठें
                  (नाद/ संध्याकाळच्या कविता)

‘भूल’ या कवितेत कवी उद्‌गारतो :

        दु:खाच्या तंद्रीतून जैसें अमृत ठिबकत निळें...
        माझ्या हातून मुठभर माती अवकाशावर पडे
        घराघरांना मरणफुलांची गंधित भूल जडे...
                             (संध्याकाळच्या कविता)

‘गाणे’ या कवितेत उत्कट दु:खानुभूतीचे चित्र येते :

        सशिल्प दु:ख मंदिरी धुळींत रेखतां तुला
        उभ्या निजेत जागणे दिसे न गांव आपुला
                             (संध्याकाळच्या कविता)

अशा वेळी दु:ख आणि जगण्याची शैली या एकाच नाण्याच्या बाजू होतात. या अनाकलनीय दु:खाची अंतर्धून व्यक्त होते, ती पुढील शब्दांत:

        शब्दांच्या करुणेमधुनी
        गळतात निनावी पाने
        हातात तुझ्या जे फूल
        ते नसेल माझे गाणे
        जे दुरून दिसते शिल्प
        तो पूल उभा खचलेला
        पत्रात वाळवीलाही
        हुंदका कशाने फुटला
        (पत्र/सांध्यपर्वातील वैष्णवी)

कवितेइतकाच अर्थगर्भ आणि जीवनाचा मर्मबंध प्रकट करणारा आशय ग्रेस सातत्याने ललितबंधांमधून लिहीत राहिले. हा ललितबंध रसिकाच्या दृष्टिकोनातून हृदयबंध होतो. शब्दांच्या पलीकडे जाऊन तो जीवनाची खोली दाखवून देतो. पाच ललितबंधसंग्रहातून अशी मोजकीच जीवनसूक्ते शोधणे म्हणजे सागरकिनाऱ्यावर हरवलेली सुई शोधण्यासारखे आहे. पण ‘हरपलेल्या श्रेया’च्या शोधासाठी ते करावे लागते. शिवाय ग्रेस यांच्या कवितेकडे जाणाऱ्या पाऊलवाटा या ललितबंधांमध्ये गवसतात.

ज्ञानदेव-तुकाराम यांची महत्ता ग्रेस यांनी नेमकेपणाने टिपलेली आहे. ‘‘ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची केवळ पुनर्घटनाच केली नाही. व्यक्तिगंधाचे संगीत आणि शब्दबंधांची लय यांच्या संमीलनातून काव्यनिष्ठ संगीताचे एक अत्यंत वेगळे दर्शन व परिमाण दोन्ही मराठीला उपलब्ध करून दिले. तुकारामाने याच मराठीला अनुभूतीचे करुणामूल्य दिले. श्रीज्ञानेश्वरांच्या काव्यातील कोवळीक व उदात्तता ही केवळ वाङ्‌मयापुरतीच मर्यादित बाब नाही. यात मराठी संस्कृतीचा जन्मप्रारंभ आहे. तुकारामाच्या काव्यातील प्रत्येक शब्दाला अनुभूतीच्या करुणामूल्याचे वरदान लाभले आहे. शब्दाच्या मागे व पुढे तुकारामाच्या व्यक्तित्वाचा आकान्त उभा आहे.’’ (आकान्ताचे देणे/चर्चबेल)

‘पल्लवीचे पक्षी’ या ललितबंधांत ग्रेस यांनी आठवणींचे जग कसे सजग केले आहे, ते पाहण्यासारखे आहे. या शैलीचे रूप वेगळे आहे :
‘‘आठवणी साध्या असतात. आठवणी निर्मळ असतात. आठवणी प्रसन्न असतात. आठवणी हृदयंगम असतात. आणि आठवणी हळव्या असतात. आठवणी रडव्याही असतात. आठवणी प्राचीन असतात, अर्वाचीन असतात. आठवणी जन्माच्या असतात. आठवणी गतजन्माच्या आणि पुनर्जन्माच्या असतात. कोट्यवधी क्षणांची कधीही न संपणारी साखळी म्हणजे आठवणी.

एवढी लांबलचक साखळी काय करायची? साखळीचा उपयोग अलंकरणासाठी करावयाचा असेल, तर मग लहान लहान साखळ्या हव्यात! देहाला पुरतील एवढ्या; गळ्याला कोरतील एवढ्या! फक्त साखळ्या हव्यात. त्यांतील कड्या कोणत्याही चालतील, जुन्या, नव्या, जन्मजन्मांतराच्या, चंद्रचंद्रान्तराच्या, स्पर्शस्पर्शान्तराच्या, सूर्योदयाच्या आणि चंद्रास्ताच्या...’’ (चर्चबेल)

यात कवितेतील अल्पाक्षररमणीयत्व आहे. गद्यातील अनुभूतीचा जोरकसपणा आहे. प्रवाहित्व आहे. ग्रेस यांची साहित्यातील निर्मितिप्रक्रिया, अनुभवप्रक्रिया आणि जीवनप्रक्रिया यांची तिपेडी गुंफण या पुस्तकात आहे. सर्जनशील लेखक, कवी आणि माणूस म्हणून जगताना जे आत्मभान ठेवून एखाद्या व्यक्तीला जगावे लागते, ते तर या पुस्तकात आहे. शिवाय उच्च दर्जाची अभिरुचिसंपन्नता, अनुभवसंपृक्तता आणि संवेदनशीलता या पुस्तकातून प्रत्ययास येते. ही त्रिमिती रसिकमनाला आल्हाद देते. हे पुस्तक म्हणजे एका परीने न लिहिलेले आगळे-वेगळे आत्मचरित्रच वाटते.

‘नदी: सारंगाचे देणे’ या ललितबंधात लेखक उद्‌गारतो: ‘‘जंगलझाडी, घाटमाथे. तीर्थप्रभावळी आरि पहाडकपारी या सर्वांच्या भावबंधातून वाहतानाही नदीचा आदिबंध थोडासाही खरचटत नाही. ती समग्र जीवनप्रदेश न्हाऊन काढते. पण आपल्या कोणत्याही अवयवाला, साधा आत्मलोभाचा स्पर्श होऊ देत नाही. म्हणूनच मी तिला एकाकिनी म्हणतोय. नदीचे हे एकान्तभोर प्रस्तर आणि तिच्या विषण्ण प्रवरांची गुणगुण लॉर्काने हुबेहूब पकडली आहे.’’ (संध्यामग्न पुरुषाची लक्षणे)

निर्मितिप्रक्रियेच्या संदर्भात ग्रेस म्हणतात: ‘‘निर्मितीच्या प्राचीन सभ्यतेच्या जवळ, जीवनाच्या पुनर्निर्माणाची कुठलीही नैतिक संहिता मांडून ठेवलेली नसते. त्यामुळे कलावंत प्रथम सर्वार्थाने ननैतिक होतो. ॲण्ड फ्रॉम धिस पॉइन्ट ही रेज्‌स ऑल हिज इथिकल क्रायस टू द स्काय. भीमक राजय्या भिल्लाने, प्रतारणा केलेल्या आपल्या साजणीला अमृताने जगविले नाही आणि विषाने मारले नाही. तो तिला मोहफुलाची दारू पाजत राहिला. त्याची ही भिल्लीण स्वामिनी, आपल्या शरीरदानाने हे रहस्य आपल्या भिल्ल स्वामीला माहीतच नाही, या अज्ञात गुपिताला, मोहफुलांचा शृंगार करीत राहिली.’’

ग्रेस यांचे हे भाषाशैलीचे वैभव आणि संदर्भबहुलत्व रसिक मनाला आल्हाद देणारे आहे. त्यांची दु:खसंवेदनेची कविता अंतर्मुखतेचा प्रवास करायला लावणारी अन प्रसन्न, प्रवाही शैलीतील ललितबंध त्यांच्या निर्मितिप्रक्रियेचा वेध घेणारे. अर्थात हे क्षितिज अथांग आहे. 

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com

Tags: सोमनाथ कोमरपंत कवी ग्रेस संध्याकाळच्या कविता साहित्य कविता व्यक्तिवेध चंद्रमाधवीचे प्रदेश सांध्यपर्वातील वैष्णवी Somnath Komarpant Grace Poems Profile Load More Tags

Comments:

सुनील कुमार लवटे

ग्रेस समजण्यासाठी उपयुक्त लेख.पण ग्रेस कळणे याची मूळ कसोटी असते ज्याचा त्याचा वकूब.

ओंकार कुंभार

ग्रेस यांना समजून घेणे ही सोपी गोष्ट नाही. कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी हातात घेतलेली वाळू जशी बरीचशी निसटते. तसे होते.

वासुदेव भंडिवाड

अनामिक गुढतेचे अलौकिक लेणे/देणे. मराठी साहित्याचे लावण्य!

Add Comment