बालकवींच्या कवितेतील निसर्ग

बालकवींच्या 132व्या जन्मदिनानिमित्ताने...

आयुष्यभर बालकवींना दाहक वास्तवानुभूती आणि जीवनातील सौंदर्यदृष्टी यांमधील संघर्षाला तोंड द्यावे लागले. या मनस्वी कवीची काव्यनिर्मिती स्वप्न-वास्तवाच्या पार्श्‍वभूमीवर उभी राहिली. निसर्ग हाच त्यांचा सखा... निसर्ग हा त्यांच्या भावजीवनाचा मर्मबंध... त्यांच्या जीवनधारणेचे प्रतिबिंब न्याहाळावे हेदेखील त्यांच्या निसर्गकवितेतच!

आधुनिक मराठी काव्यविश्‍वात भावमधुर कविता लिहिणारा कवी म्हणून बालकवींकडे तर्जनी दाखविली जाते. ‘गीतगोविंद’ हे संस्कृत काव्य लिहिणार्‍या जयदेवांच्या शब्दकळेला ‘कोमलकान्त पदावली’ असे संबोधले जाते. बालकवींच्या भावकोमल शब्दकळेला हीच उपाधी उचित ठरेल. त्यांचे मूळ नाव त्र्यंबक बापूजी ठोमरे. 1907 मध्ये जळगाव येथे भरलेल्या कविसंमेलनात आपल्या प्रभावी काव्यवाचनामुळे सर्वांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. संमेलनाध्यक्ष कर्नल कीर्तिकर यांनी ‘बालकवी’ असे संबोधून त्यांचा गौरव केला. पुढे हेच नाव सर्वत्र रूढ झाले. बालकवींना फक्त 28 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 रोजी झाला. भादली स्टेशनजवळ रेल्वेचे रूळ ओलांडत असताना त्यांना रेल्वे इंजिनाची धडक बसून दुर्दैववशात 5 मे 1918 ला त्यांचा अंत झाला. त्यांना दीर्घायुष्य लाभले असते, तर त्यांच्या विविधरूपिणी कवितेने नवे नवे उन्मेष धारण केले असते. पण लाभलेल्या अल्पायुष्यात जवळजवल 175 कवितांची ओंजळ त्यांनी मराठी काव्यरसिकांसमोर ठेवली. मराठी कवितेतील सौंदर्यवादी धारा सशक्त करण्याचे फार मोठे श्रेय बालकवींना दिले जाते. समकालीन कवींपैकी गोविंदाग्रजांशी त्यांची गाढ मैत्री होती. जळगावचे सुप्रसिद्ध वकील आणि कवी के. म. सोनाळकर यांच्याशी त्यांची मैत्री जुळली. केशवसुतांची सामाजिक आशयाची कविता त्यांना भावली होती. 

शैक्षणिक काळात त्यांना ठिकठिकाणी भ्रमंती करावी लागली. स्वातंत्र्यसंग्रामाच्या धामधुमीत त्यांचे शिक्षण अपुरे राहिले. मात्र रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक या प्रेमळ दांपत्याची छत्रछाया त्यांना लाभली. कवित्वशक्तीचे पोषणही झाले. बालकवींच्या विविधरूपिणी कवितेत निसर्गचित्रणाला प्राधान्य मिळाले. जीवनातील आनंदाचे क्षण उत्फुल्ल मनाने त्यांनी रेखाटले आणि आयुष्यात अनुभवलेल्या मनोभंगाच्या झळा तितक्याच तीव्रतेने व्यक्त केल्या. परिस्थितिवशात निर्माण झालेल्या दारुण निराशेला त्यांनी कवितेद्वारा वाट करून दिली. इथे त्यांच्या शब्दकळेने कमालीचे वृत्तिगांभीर्य स्वीकारले. त्यांच्या होरपळलेल्या मनाचे प्रतिरूप त्यांनी रेखाटले. हा अमूर्त आशय खूप काही सांगून जातो. अंतर्मुख करतो. पण निसर्गाशी हे कविमन तदात्म होते. अनोखी निसर्गचित्रे रेखाटणे हा बालकवींच्या प्रतिभेचा केंद्रबिंदू. त्यातील सौंदर्याची विलसिते रंगविणे हा त्यांचा स्थायी भाव. या दृष्टीने त्यांच्या निसर्गकवितेने प्रकट केलेली रूपकळा न्याहाळायची आहे. त्यांची निसर्गकविता अंगप्रत्यंगांनी फुलत गेली, बहरत गेली. त्यांच्या कवितेतील निसर्ग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे ‘बालरूप’ प्रकट करतो. त्यांची सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून घेणारी तरल प्रतिभा रसिकांच्या चित्तवृत्ती पुलकित करते. त्यांनी रंगविलेली पुष्पकलिका आणि विकसित फूल ‘फुलराणी’ होते. ‘तूं तर चाफेकळी’मधील भाव ‘त्या हृदयीचे गूज या हृदयाला’ सांगतो. असे निजगूज बालकवींनीच रंगवावे असे आहे. नितांतमनोहर शब्दशिल्प बालकवी निर्माण करतात. पार्थिव रूपाकडून परिणत झालेले अपार्थिवतेचे अनन्यसाधारण अक्षरलेणे ते रसिकांसमोर ठेवतात. गो. ग. आगरकरांनी प्रतिपादन केलेला ‘कवी, काव्य आणि काव्यरती’ हा त्रिपुटीसंगम अनुभवावा, तो बालकवींच्या या निसर्गकवितेतच. ‘अरुण’ या कवितेत त्यांच्या प्रतिभेतील सहजभाव प्रकट होतो आणि रसिकमनांत आनंदलहरी निर्माण करतो :

पूर्व दिशा मधु मृदुल हांसते गालींच्या गालीं
हर्षनिर्भरा दिशा डोलती या मंगल कालीं

पुढील ओळी रसिकांचे मनोमालिन्य नाहीसे करतात. संस्कृतप्राचुर्य असूनदेखील काठिण्य घालविणारी आणि अंत:श्रुतींना विलोभनीय वाटणारी शब्दकळा बालकवी योजतात. उदात्ततेकडे घेऊन जातात :

निर्झरमय, काननमय, गायनमय दिव्य जाहला देह,
सृष्टीचेही पुरेना विचराया स्वैर त्याजला गेह,
मग गूढ अमूर्ताची मधुगीते गोड गावया लागे,
आनंदरूप झाली मानवता, मृत्यू राहिला मागें (शारदेस)

निसर्गरूपात सामावून गेलेली संजीवक शक्ती बालकवी समुचित शब्दांत दृष्टिसन्मुख करतात.

‘फुलराणी’ या कवितेत भावभावनांचे मार्दव, वातावरणातील सौंदर्य आणि उत्तुंग कल्पनाविलास यांचा स्वरमेळ साधलेला आहे. काहीशा दीर्घ स्वरूपाच्या या कवितेत काव्यात्मता आणि नाट्यमयता ओतप्रोत भरून राहिलेली आहे. 

या कवितेतील सौंदर्यस्थळे कोणती निवडावीत असा गोड संभ्रम निर्माण होतो. तरीही त्यातील चेतनगुणोक्तीने भरलेले आणि रसिकांना भारावून टाकणारे सृष्टिवर्णन अधोरेखित करावेसे वाटते :

गाउं लागले मंगलपाठ, सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानांवर ताना!
नाचुं लागले भारद्वाज - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर!
लग्न लागतें! सावध सारे! - सावध पक्षी! सावध वारे!
दंवमय हा अंत:पट फिटला - भेटे रविकर फुलराणीला!

या सौंदर्यपटाशी समरस झालेला कवी आनंदोद्गार काढतो :

गुंगतगुंगत कवि त्या ठायीं - स्फूर्तीसह विहराया जाई
त्यानें तर अभिषेक केला - नवगीतांनी फुलराणीला!

‘निर्झरास’, ‘मधुयामिनी’, ‘संध्यारजनी’, ‘मंगलमय प्रेमकवन’, ‘तारकांचे गाणें’, ‘संध्यातारक’, ‘श्रावणमास’, ‘फुलपांखरूं - फुलवेली’, ‘बाल-विहग’, ‘तृणपुष्प’, ‘आनंदी पक्षी’, ‘सुकलेलीं फुलें’, ‘पांखरास’, ‘अप्सरांचे गाणें’, ‘पाऊस’, ‘मेघांचा कापूस’, ‘शुक्रोदय’, ‘औंदुंबर’ आणि ‘चंद्रकलेच्या भंवती भंवती’ इत्यादी निसर्गकवितांचा उल्लेख येथे आवर्जून करावा लागेल.

या सार्‍याच कविता विशुद्ध स्वरूपाच्या निसर्गकविता नसतीलही. पण हा कवी निसर्गाशी आणि त्याच्या विभ्रमांशी तद्रूप झालेला आहे. 

वर्डस्वर्थप्रमाणे बालकवी निसर्गात परिपूर्णता पाहतात. मानवी जीवनातील अपूर्णता व क्षणभंगुरता त्यांना पुरेपूर जाणवलेली आहे. त्यांच्या भावजीवनातही निसर्गाला प्राधान्य आहे. त्यांच्या कवितेला प्रेरणा देणारा निसर्ग हा महत्त्वाचा घटक होय.

निसर्ग आणि मानवी जीवन यांमधील फरक त्यांनी ‘अनंत’ या कवितेत परिणामकारक रीत्या वर्णिलेला आहे. कवी उद्गारतो:

अनंत वसुधा आजवरी हो परी मोजिली कोणी
म्हणोत कोणी आम्ही गणिला हा ग्रह हा हा तारा
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा
अनंत सारें विश्व, जाहलें अनंतांत या लीन
क्षुद्र मानवा सांग कशाचा बाळगिसी अभिमान?

कवीने वैश्‍विक सत्य या आशयातून अधोरेखित केले आहे. जीवनाचे प्रेयस आणि श्रेयस शोधताना बालकवींना प्रत्यय आला तो असा :

काव्यदेविचा प्राण खरा
तूंच निर्झरा । कवीश्वरा ।
या दिव्याच्या धुंदिगुणें
दिव्याला गासी गाणें
मी कवितेचा दास, मला
कवी बोलती जगांतला,
परि न झरे माझ्या गानीं
दिव्यांची असली श्रेणी!
जडतेला खिळूनी राही
हृदयबंध उकलत नाहीं 
दिव्यरसिं विरणें जीव
जीवित हें याचें नांव;
तें जीवित न मिळे मातें
मग कुठुनी असलीं गीतें?  (निर्झरास)

आपल्या उणिवांची जाणीव झाल्यावर निसर्गाचे विभ्रम आणि मानवाच्या भाववृत्ती यांची सांगड घालण्याचे हे कविमन प्रयत्न करते. तेव्हा आगळीवेगळी प्रतिसृष्टी त्याला ‘दिसायला’ लागते :

अरुण चितारी नभ:पटाला रंगवितो काय,
प्रतिभापुरित करी जगाला कीं हा कविराय?
कीं नवयुवती उषासुंदरी दारीं येवोनी
रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनी?
दिवसयामिनी परस्परांचे चुंबन घेतात -
अनुरागाच्या छटा तयांच्या खुलल्या गगनांत! (अरुण)

हा सौंदर्यशोध आणि आनंदबोध कवीला कुठून प्राप्त झाला? तर तो निसर्गशक्तीच्या साक्षात्कारामुळे! या चिंतनात मग्न राहिल्यामुळे बालकवींच्या प्रतिभेला नवे नवे धुमारे फुटू लागले.

कधी कधी जीवनसापेक्ष तत्त्वचिंतनाची जोड दिल्याने त्यांच्या उत्स्फूर्त उद्गाराला अर्थपूर्ण आशयाचे स्वरूप प्राप्त होते.

धवल चंद्रिके! दे आलिंगन दिव्य यामिनीला,
बहिणी-बहिणी तुम्ही सुखाने चंद्राशी खेळा!
कां तारांनो! तुम्ही लाजतां? हा मंगल काल
निर्मत्सर व्हा प्रेमसंगमीं पोहा चिरकाल
ब्रह्मांडाचा गोल धरी या प्रेमाचा फेर,
फुलें शांतिचीं पाहा उधळलीं जगतीं चौफेर!  (संध्यारजनी)

अशा प्रकारची आशयघनता ‘मंगलमय प्रेमकवन’ या कवितेतही आढळते. तिचा रमणीय आविष्कार या शब्दकळेतून झालेला आहे :

... तेज हरपलें तम मालवलें
उन्मनींत मन तन्मय मुरलें;
जागृति नव्हती, स्वप्नही नव्हतें,
भाव मनोज्ञ स्फुरलें तेथें;
सूरहि नव्हते, शब्दहि नव्हते,
गीतच हृदयंगम बनलें तें.

‘संध्यातारक’ या कवितेत भावकोमल शब्दांची मूस, तरल कल्पनाशक्ती आणि लयबद्धता यांचा त्रिवेणी संगम आढळतो. उदा :

दिनरजनीच्या हृदयावरलें
प्रेमसंगमीं उद्भवलेलें
मुग्ध तान्हुलें फूलच पहिलें!
कोमल किरणीं नभ फुलवोनी खेळ खेळतें त्यांत
झोंप कशी पण ती अजुनीही
आज गडे तुज लागत नाहीं
सांग करूं तरि आतां काई.
बघ ना बा रे विश्वच सारे निजले प्रभुहृदयांत

‘फुलपांखरूं-फुलवेली’ या कवितेत फुलपाखराचे वर्णन कवीने हळुवारपणे केले आहे. फुलपाखराच्या हालचालीचे हे चित्रण चित्रमय आणि चित्तवेधक वाटते :

‘स्वच्छंदी     फूलपांखरा! आनंदी
माधविका    पाठविते तुज या लोका,
ये, गाई    चुम्बनमय गाणीं कांहीं;
खेळ इथें    या कोमल कलिकेवरतें;
ही बाला    फूलपांखरा! चुंबि हिला’    

फुलवेलीचे वर्णन करताना कवी उद्गारतो :

फुलें नवीं    मुग्धलतेवरतीं यावीं
त्यापरि ती    प्रेमलता फुलली चित्तीं,
होय! परी    फूलपांखरूं तिचें दुरी!
ना तरि तें    या सुमनीं स्वर्गच बघ!

संध्याकाळच ती! ती गीतामधून कशी वर्णावी? त्या छायांचे अवलोकन करायला कवी आला आहे. त्याने त्या दृश्याचे कौतुक केले खरे, पण त्याच्या तोंडून योग्य शब्द बाहेर पडेनात. मूक होऊन मनात ते तो गुंगत राहतो. ‘गोड भलीं । फूलपांखरू-फुलवेली!’ हेच त्या भावमग्नतेचे सूचक स्वर आहेत.

बालकवी वास्तवातील निसर्गचित्रण करीत नसून कल्पनाशक्तीने निर्माण केलेल्या मनोमय सृष्टीची ती रूपकळा असते. उदा. ‘मधुयामिनी’ या कवितेत चित्ताकर्षक रंगाची पखरण, गंधाची उधळण आणि शीतल स्पर्शाचे संवेदन ते आपल्या शब्दकळेद्वारा निर्माण करतात :

मधुयामिनी नीललता
हो गगनीं कुसुमयुता
धवलित करि पवनपथा
कौमुदि मधुमंगला-
दिव्य शांति चंद्रकरीं
आंदोलित नील सरी
गिरिगिरिवरि, तरुतरुवरि
पसरी नव भूतिला

बालकवींनी कोमल शब्दांद्वारे उभी केलेली ही स्वप्नसृष्टीच म्हणावी लागेल.

‘पांखरास’ या कवितेत पाखराच्या प्रतीकातून कवीने आपल्या मनाची व्यथा प्रकट केली आहे. या कवितेतील पाखराचे जीवन अशांत, अस्वस्थ आहे. त्याला मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण निष्प्रेम मनाला कुठेही सुख नाही. निसर्ग सातत्याने बदलत असतो. पण काटेरी झुडुपात दडून राहिलेल्या पाखराचे केविलवाणे गीत तसेच राहते. कवी आपल्या मनातील दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतो. पण मानवी भावनांचे प्रतिबिंब त्याला त्यात दिसून येते. ते दु:ख पाखराकडे व्यक्त केलेल्या संवादातून येथे जाणवते.

‘श्रावणमास’ आणि ‘औदुंबर’ या बालकवींच्या बहुचर्चित कविता. ‘श्रावणमास’ ही श्रावणातील निसर्गचित्रे समुचित शब्दांत रेखाटणारी अम्लान कविता. उपमा-उत्प्रेक्षांची योजना लयबद्ध शब्दकळेत बालकवींनी तिच्यात केली आहे. श्रावणमासात सांस्कृतिक संचिताचे पालन करणार्‍या जनमानसाचे चित्रणही त्यांनी केलेले आहे. ‘औदुंबर’ ही कविता बालकवींच्या उत्कृष्ट कवितांत आवर्जून निर्देश केली जाणारी. एक विशुद्ध निसर्गचित्रे म्हणून ते उल्लेखता येईल. अनेक जाणकार समीक्षकांनी तिच्यामधून अनेक अन्वयार्थ लावले आहेत. ‘बालकवींची औदुंबर कविता : विविध अर्थध्वनी’ या ग्रंथात त्यावरील समग्र समीक्षेचा चिकित्सक प्रस्तावनेसह प्रा. एस. एस. नाडकर्णी यांनी परामर्श घेतला आहे.

‘औदुंबर’ ही सहजसुलभ भाषेत आणि आठ ओळींत साकार झालेली बालकवींची अम्लान कविता. निरलंकृत. ऐलतटावर आणि पैलतटावर हिरवाळी घेऊन बेटाबेटांतून वाहणारा निळासावळा झरा... पैल टेकडीवर वसलेल्या चार घरांचे चिमुकले गाव... त्याच्यासमोर दाट शेतमळ्यांची असलेली हिरवी गर्दी... त्यामधून वळणावळणांनी जाणारी पांढरी पाऊलवाट... ती काळ्या डोहाकडे जाणारी... पाणी झाकळून टाकणारा तो डोह... त्यामुळे लाटांवर पसरलेला गोड काळिमा आणि पाय टाकून जळात बसलेला तो असला औदुंबर.

बालकवींनी मिताक्षरांतून दृग्गोच्चर केलेला हा नितांतरमणीय परिसर... शेवटच्या चित्रातून मानुषीकरण केलेला ‘असला औदुंबर’... सुरुवातीला रंगविलेल्या चित्रमयतेला वेगळी कलाटणी देणारा... हे एकात्म चित्र नजर खिळवून ठेवते. जीवनचिंतनाला येथे वेगळी मिती लाभते. बालकवी निसर्गातील वस्तुजाताला येथे मानवी रूपकळा प्राप्त करून देतात. रसिकांच्या चिंतनशीलतेला आवाहन करतात.

आयुष्यभर बालकवींना दाहक वास्तवानुभूती आणि जीवनातील सौंदर्यदृष्टी यांमधील संघर्षाला तोंड द्यावे लागले. या मनस्वी कवीची काव्यनिर्मिती स्वप्न-वास्तवाच्या पार्श्‍वभूमीवर उभी राहिली. निसर्ग हाच त्यांचा सखा... निसर्ग हा त्यांच्या भावजीवनाचा मर्मबंध... त्यांच्या जीवनधारणेचे प्रतिबिंब न्याहाळावे हेदेखील त्यांच्या निसर्गकवितेतच!

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com

Tags: समीक्षा बालकवी मराठी साहित्य कविता केशवसुत Load More Tags

Comments:

नरेंद्र महादेव आपटे

बालकवी आणि आमच्या पिढीचे एक अतूट नाते आहे. माझ्या मते डॉ कोमरपंत यांनी ते सुरेखरित्या अधोरेखित केले आहे. धन्यवाद.

श्रीनिवास पांडे

पार्थिव रूपाकडून परिणत झालेले अपार्थिवतेचे अनन्यसाधारण अक्षरलेणे ते रसिकांसमोर ठेवतात,हे बालकवींच्या संदर्भातले विधान अगदी खास आहे.एकूणच लेख अप्रतिम जमला आहे. बालकवींबद्दल आतापर्यंत कितीतरी लोकांनी लिहिले आहे.तरी ते सर्व नित्यनूतनच वाटते.डाॅ.कोमरपंत यांचा हा लेखही असाच अनुभव देतो.धन्यवाद.

Add Comment

संबंधित लेख