इंदिरा संतांचे सुकुमार शब्दशिल्प

13 जुलै : इंदिरा संतांच्या 22व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 

तीव्र दु:खाचा निचरा करण्यासाठी संवेदनशील मन जेव्हा शब्द, सूर, रंग आणि रेषा या माध्यमांचा आधार घेते, तेव्हा सृजनशीलता नवे रूप धारण करते. अशी एकरसात्मक अनुभूती इंदिरा संतांच्या कवितेत आढळते. ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’, ‘चित्कळा’, ‘वंशकुसुम’ आणि ‘निराकार’ या त्यांच्या काव्यप्रवासातून तिच्या पाऊलखुणा आढळतात.

आधुनिक मराठी कवितेच्या कालखंडातील इंदिरा संत या अग्रगण्य कवयित्री. या कालखंडातील स्त्रीजागृतिपर्व हे लक्षणीय पर्व. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समाजधुरिणांनी सांस्कृतिक पुनरुत्थानाला नवी दिशा दाखवली. म्हणूनच तर विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून समाजमानसाचे महत्त्वाचे अंग असलेली स्त्री शिक्षण घेऊ लागली. वाङ्मयाच्या विविधांगांमधून आपले विचार, भावना आणि संवेदना स्वयंप्रज्ञेने व्यक्त करू लागली. आत्मचरित्र, कादंबरी, कथा आणि कविता या प्रमुख माध्यमांतून स्त्री स्वर मुखर झाला. स्त्रियांना नव्याने प्राप्त झालेले हे आत्मभान हा महत्त्वाचा पल्ला ठरला. या सांस्कृतिक-वाङ्मयीन पार्श्‍वभूमीवर इंदिरा संतांच्या भावकवितेचा विचार करणे अगत्याचे ठरेल. उत्कट आत्मनिष्ठा हा या कवितेचा अंत:सूर. निसर्गानुभूती आणि आत्मानुभूती यांचे अद्वैत या कवितेत आढळते. अकाली झालेल्या पतिनिधनामुळे त्यांच्या भावजीवनावर जबरदस्त आघात झाला. ते उद्ध्वस्त झाले. इंदिरा संत आणि ना. मा. संत हे दांपत्य केवळ सुखी संसाराचे स्वप्न रंगवणारे नव्हते. त्यांचा एकत्रितपणे प्रकाशित झालेला ‘सहवास’ हा कवितासंग्रह नव्या जीवनजाणिवेचा आश्‍वासक आत्मस्वर होता.

प्रा. श्री. बा. रानडे आणि मनोरमा रानडे यांची ‘श्री-मनोरमा’ ही नवी मळवाट होती. तेच सजग भान ठेवून संत दांपत्याने पुढचे पाऊल टाकले. पण दुर्दैववशात स्वप्न भंगले. इंदिरा संत मनाने खचल्या. मनाला होरपळून टाकणारे ते दु:ख होते. त्या नि:स्तब्ध झाल्या. पण त्यांची सृजनशील प्रतिभा पुन्हा नव्याने उभी राहिली... ज्वालेचे फूल झाले... चिरविरहाच्या वेदनेचे फूल झाले. ‘शेला’ या कवितासंग्रहापासून ‘निराकार’ या कवितासंग्रहापर्यंतचा त्यांचा पाच दशकांचा समृद्ध , सघन आणि सदभिरुचीसंपन्न काव्यप्रवास याची साक्ष देणारा आहे. काव्यरसिकांनी आणि कवितेतील जाणकार समीक्षकांनी त्यांच्या कवितेविषयी ममत्व बाळगले... सुजाण समीक्षालेखन केले. इंदिरा संतांची ही नवी रूपकळा जीवनसंघर्षाला कणखरपणे तोंड देणारी होती. जीवनाच्या अंगप्रत्यंगावर प्रेम करणारी होती. या अर्थपूर्ण, अभिव्यक्तिसौंदर्याचे लेणे ल्यालेल्या कवितेने लोभसवाणी प्रतिमासृष्टी निर्माण केली. त्यांच्या बाविसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या कवितेचे संक्षेपाने विवेचन करायचे आहे.

इंदिराबाई सात वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारले. त्या एक-दोन वर्षे तवंदीला येऊन राहिल्या. संवेदनक्षम वयातील तेथील वास्तव्याच्या आठवणी सांगताना इंदिराबाई म्हणतात, ‘‘तवंदी हे बेळगाव-कोल्हापूर मार्गावर डोंगरावर वसलेले एक चिमुकले खेडे आहे. एका बाजूला डोंगराची उतरण आणि दुसर्‍या बाजूला सपाट अशी शेतजमीन असे त्याचे स्वरूप आहे. डोंगराच्या एका उतरणीला खोल दरीत गर्द झाडी होती - तीत मोर दिसायचे. क्वचित वाघदेखील असे. त्या दरीला ‘घोळ’ असे नाव होते.’’

(एका पिढीचे आत्मकथन : वा. रा. ढवळे गौरवग्रंथ : संपा. पु. शि. रेगे, वा. ल. कुलकर्णी, रा. भि. जोशी आणि गं. ब. ग्रामोपाध्ये / मुंबई मराठी साहित्य संघ प्रकाशन, मुंबई, 1975, पृ. 317)

तवंदी घाटाचे इंदिराबाईंनी केलेले हे चित्रमय वर्णन. ‘‘कवितांमधून निसर्गाला स्थान मिळाले ते या संस्कारांमुळे. खेड्यांतील जीवनावर मी पुढे कथा लिहिल्या, त्या या खेड्यांवरील माझ्या प्रेमामुळे.’’ हेदेखील त्यांनी नमूद केले आहे. ही संस्मरणे जागवणारी त्यांची ‘माहेराची वाट’ ही कविता :

माहेराची वाट तिच्यावर अंथरलेली
निळी मलमल अशी नाजूक कीं,
पिवळ्या चिमुकल्या पिसोळीने जिच्यावरून
अलगद चालत जावें...
अशी वाट. तरी माहेर किती जवळ
डोळे उघडताच वेशीवरला कडुलिंब पावलांवर
मोहोर ढाळतो. पापण्यांवरून सुगंध फिरवतो.
अशा माहेरीं येतें म्हणताना, जिच्यासाठी माहेर
तीच येते. मन भरून भेटते.
आपल्या चंद्रकोरींतील कुंकू माझ्या कपाळी टेकते
फळाफुलांनी ओटी भरते. आशीर्वादाच्या अक्षता
भांगावर टाकते.
डबडबलेले डोळे सावरीत, हसतमुखशी
नाहीशी होते. मी माहेरी येतें म्हणताना
या उद्गारांतील भावलावण्य पारखून घ्यावे, एवढे ते तोलामोलाचे आहे.
याच धर्तीवर ‘शीळ’ ही उत्कटतेने ओथंबलेली कविता :
जास्वंदीच्या परागाची, कांडी नाजूक सरळ
अशा शीळेनें उमले, माझी सुरेख सकाळ
चांदण्याच्या रांगोळीने, कोन त्रिकोण रेखावे
तसे मंजूळ शिळेनें, संथ लयीत घुमावें
ओघळावा मणिसर, मण्यामागून मण्यांनी
तशी द्रुत लयींतून, शीळ घळावी थेंबांनी
कधीं हळूच ताणावी, फूलपाकळी कोमल
तशी अस्फुटशी शीळ, तार बीनेची विव्हळ
शीळ ऐकतां ऐकतां, शीळ काळजा लागली
आली कशाला शेजाराला, भरल्या दिसांची पांखुली?

‘गुणगुण’ या कवितेतील रंगोत्सव अतीव देखणा, तितकाच भावविभोर!

काळें घनदाट मौन
आज नीरनिळें झालें,
निळ्या शुभ्र लहरींत
डुलू लागली पारुलें

निळें उमले आकाश,
फुले हिरवें लाघव
मधे उल्हासाचा वारा
पद्मगंधाचा उत्सव

उत्सवाची नादवेल
कशी आली बहरून,
पानाफुलांत, उन्हांत
झंकारली गुणगुण

रूप, रंग आणि गंध यांच्या त्रिपुटीने युक्त अशा संवेदनांची लय असलेले ‘आला केशराचा वारा’ या कवितेतील हे एक निसर्गचित्र :

...हेलावत्या तळ्यावर - वारा केशराचा आला

लाटा, लहरी, तरंगांनी उचंबळून झेलला
निळे आभाळ क्षणात - तळ्यामध्ये उतरले
एकाएकी स्तब्ध झाले!

‘चित्कळा’ या कवितासंग्राहातील ‘न कळे’, ‘गुंजेएवढी रास’, ‘ती गाज’ आणि ‘चित्रभावन’ या मोजक्याच कविता घेतल्या तर त्यांच्यामध्ये निसर्गानुभूतीने युक्त असलेल्या प्रतिमा आणि सामावलेली आत्मनिष्ठ वृत्ती उल्लेखनीय वाटते. ‘ती गाज’ या कवितेतील हे एक क्षणचित्र. तिच्यातील भावसंपृक्तता वाखाणण्यासारखी :

...तिचें एक वेगळें विश्‍व :
त्याच्या आकाशनीलिम्याशीं रुमझुमणारा
मुग्ध तन्वीर
तणपाण्याच्या गालिच्यावर एकाच वेळीं
फेर धरून आपापला गुलाल उधळणारा अवघा ऋतुसंहार.
त्यांतच मी
झळाळणारी. शहारणारी. भिजलेली. भांबावलेली. भारलेली -
उत्फुल्ल. त्रिकालमुक्त.

परिणत प्रतिभेचा परमोच्च बिंदू इथे गाठलेला आहे. ‘चित्रभावन’ या कवितेतील निसर्गानुभूती आणि भावानुभूती नितांत रमणीय आहे... अथांग आहे.

... त्या लहरीवरून तरंगत आलेल्या पिंपळपानावरचे
ते चित्रभास...
नीलकांत जरतारी शेला पांघरलेली, फुलोर्‍याच्या
मोतीचुराची ही उत्तुंग तेजस रास!
जन्मोजन्मींच्या अधांतरावरून चढत्या-वाढत्या
सौहार्दवेलीवरचा हा नभसन्मुख महारूपी कळा!
की समोरच्या तसबिरींतील केवळ अप्रत्यक्ष पाहिलेल्या
हिमनगाच्या या झळकत्या लहरत्या
निरंजन भावकळा...

‘फॉसिल’ या कवितेतील आत्मरूपाची विविधता अंतर्मुख करणारी आहे. लौकिकता आणि अलौकिकता यांची अंतर्विरोधी लय या कवितेत आहे. अंत:करणातील अनाम असोशी प्रकट करणारी ही कवयित्री म्हणाली होती :

धगधगतें जीवन हें
धरून असें ओंजळीत
आलें मी हेंच फक्त

या दाहक जााणिवेचे रूपांतर पुढील प्रवासात भावात्मक अनुभूतीत तिने केले. तीव्र दु:खाचा निचरा करण्यासाठी संवेदनशील मन जेव्हा शब्द, सूर, रंग आणि रेषा या माध्यमांचा आधार घेते, तेव्हा सृजनशीलता नवे रूप धारण करते. अशी एकरसात्मक अनुभूती इंदिरा संतांच्या कवितेत आढळते. ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’, ‘चित्कळा’, ‘वंशकुसुम’ आणि ‘निराकार’ या त्यांच्या काव्यप्रवासातून तिच्या पाऊलखुणा आढळतात. ओवी-अभंग या पारंपरिक छंदांद्वारे जीवनातील नव्या अंत:प्रवाहांना आकळणारी त्यांची काव्यशैली पृथगात्म स्वरूपाची आहे. ‘मृण्मयी’ कवितेत सुरुवातीलाच त्या उद्गारतात :

रक्तामध्ये ओढ मातिची
मनास मातीचें ताजेपण
मातींतुन मी आलें वरती,
मातीचें मम अधुरें जीवन

माती आणि मानवी मन यांमधील जैविक नाते त्यांनी किती प्रगल्भतेने अधोरेखित केले आहे! ‘सय’ या कवितेतील अल्पाक्षररमणीयत्व लक्षणीय स्वरूपाचे :

वार्‍यावरून की यावी
आर्त चांदण्याची शीळ
भारणार्‍या गाण्यांतील
यावी काळजाची ओळ

संपलेल्या आयुष्याची
अशी एक व्हावी
तापलेल्या जिवाभावां
धून नादवून जावी.

एकटेपणाची समृद्धीही कशी मन भारून टाकणारी असते! या अनुभूतीला कवयित्रीने प्राप्त करून दिलेली ही प्रसन्न रूपकळा... अंतर्मनाच्या गाभ्यातून आलेली. अतिशय अनोखी. प्रतिमासृष्टीदेखील निराळी. उदासीनतेची किनार असलेली.

तें एकटेंपण. देवाने दिलेलें.
सोनावळीच्या एकाकी फुलासारखें
आभाळाखालीं झुलणारें,
कोवळ्या उन्हाचा शेला पांघरणारें
स्वप्नांची खेळणी मांडून मग्न होणारें...
ते एकटेंपण. कुणीतरी सन्मानानें
काळजाच्या ओंजळीत ओतलेलें...
अवकाशासारखें जिवाभोंवती कोष करून राहिलेलें,
झळंबलेले. नकोसें तरी हवेहवेसें वाटलेलें,
त्याचें म्हणून.
हे एकटेपण. माझें. मीच माझ्या वाटचालींत
जमवलेलें. मनभर. कधीं प्रसन्न मोकळें
दुपट्यातील तान्ह्याच्या खेळण्यासारखें.
कधीं रिकामें. असे रिकामें :
वेड्या माणसाच्या हंसण्यासारखें.

‘प्राजक्त’, ‘स्वानंदमयी’, ‘हृद्गंधा’, ‘गंधमादन’, ‘प्रदक्षिणा’ आणि ‘येतो पश्चिमेचा वारा’ या कवितांत निसर्गानुभूती आणि भावानुभूती यांची एकात्मता जाणवते. त्याचा आस्वाद मुळातूनच घ्यायला हवा. ‘कसें हें सगळें’ मधील चिंतनशीलता अर्थगर्भ आहे. जीवनाच्या संदर्भात प्रश्नोपनिषद निर्माण करणारी ही कविता.

‘एका जन्माची रांगोळी’ या कवितेतील आत्मनिष्ठ वृत्ती मनात गोठवलेला जीवनाचा सारांश सांगणारी. या कवितेत आलेली निसर्गाची लावण्यमय चित्रे, सांस्कृतिक आणि वाङमयीन संदर्भ रसिकमनाला भारावून टाकणारे.

‘कसे आले हे खळीला’ आणि ‘तमोयुग’ या कवितांमधील उदासीनतेची भावना मनात घर करून राहणारी आहे. विशेषत: पुढील ओळींतून मनाला वेढून राहिलेल्या निराशेला कवयित्रीने शब्दरूप दिले आहे :

... माझा जडशीळ देह
माझा मला उचलेना
माझ्या फुलपाखराची
दैना मला सोसवेना

(कसे आले हे खळीला)

आणि

मी कुठे उभी आहे कळत नाही.
पावलांनी जमीन घट्ट धरून ठेवली आहे;
हातांनी मन गच्च दडपून धरले आहे...
आणि या तमोयुगात
संवेदनमुक्त अशी मी कशीबशी उभी आहे

(तमोयुग)

अशा प्रकारे आपल्या आयुष्यातील उन्हापावसाचा खेळ कवयित्री उत्कटतेने व्यक्त करते. ‘निराकार’ या कवितासंग्रहात निरवानिरवीची भाषा असली तरी प्रसन्नतेचे क्षण कवयित्रीने जपून ठेवले आहेत. ते प्रांजळ आणि पारदर्शी शब्दांत व्यक्त करणारी ही कविता :

त्या दिवसाचा उगवता लालिमा
दिवसभर संथ झिरमिरत राहणारा
रानगुलाबाच्या शीतळ पाकळ्यांसारखा...
त्या रात्रीचा उगवता चंद्रमा
रात्रभर जलवाहिनीच्या तरंगावर
हळुवार मुठींनी चांदण्या फेकणारा...
बकुळीच्या फुलासारखा...
त्या दिवसभराचा झुळझुळता हिंदोळा
मनावर हेलावणारा... दरवळणारा
खोल हुरहूर लावणारा...
हा एक सुखद संभ्रम...
याला निरोप धाडावा की हाक घालावी,
याचा धावा करावा की वाट पाहावी
की अचानक यानें समोर यावें?
या जाळीदार धुक्यांतून
पुढे येणारे क्षण कुसुमित होऊन येतात
सुरंगीच्या मधुर मोहक फुलासारखे
घमघमतात...

(बकुळीची फुले)

अशा मनाच्या हेलकाव्यांचे हुबेहूब चित्र रेखाटणारी, जीवनेच्छेच्या सुगंधाने भारलेली इंदिरा संतांची कविता मनाचे प्रतिरूप म्हणजे कविता याचा प्रत्यय आणून देणारी त्यांची समृद्ध शब्दकळा मराठी कवितेत भावलावण्याचे अनुपमेय लेणे घेऊन आलेली आहे.

- सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा
somnathpant@gmail.com

Tags: इंदिरा संत मराठी कविता साहित्य कवितासंग्रह मराठी कवयित्री Load More Tags

Comments:

शंकर सूर्यवंशी

पतीच्या निधनानंतर एकटेपणाचे दुःख त्यांनी मोठ्या धीराने आणि संयमीपणाने सोसले आहे.

नंदकिशोर लेले पुणे

सर नमस्कार, आपल्या वरील लेखात आदरणीय इंदिरा संतांच्या विविध कवितांमधील सौंदर्य स्थळे अतिशय आस्थेने उलगडून दाखवली आहेत. आपण जरी साहित्यिक व समीक्षक असला तरी आपला मूळ पिंड हा कवीचा आहे आणि त्यामुळेच कवितेतील भावसौंदर्य अधिक उत्कटतेने आपण उलगडून दाखवू शकता. लेख वाचून इंदिरा संत यांच्या आपण उल्लेखलेल्या कविता मिळवून वाचण्याची उत्कंठा निर्माण झाली. लेखाचे शीर्षक' इंदिरा संतांचे सुकुमार शब्दशिल्प' खूपच समर्पक आहे. इंदिरा संत यांच्या 'मृद्गंध' या आत्मपर लेखनातही त्यांचे कविमन अनेक वेळा डोकावते. इंदिरा संत गेल्यानंतर दैनिक सकाळ मध्ये आलेला संपादकीय श्रद्धांजलीपर लेख 'व्रतस्थ ज्योत निमाली' याची आठवण झाली. जसा नुकत्याच पडलेल्या प्राजक्त फुलाचा सडा व सुगंध स्मरणात असतो तशीच उत्तम कविता ही काव्यरसिकांच्या हृदयात सदैव विराजमान झालेली असते . हाच अनुभव आपल्या लेखातून आला म्हणून कृतज्ञताभाव व्यक्त करतो.

विष्णू दाते

"सहवास " अखेरचा ठरल्यानंतरही काही काळानंतर पुन्हा सृजनशील प्रतिभेचे दर्जेदार दर्शन घडवणार्या इंदिरा संत! त्यांच्या सगळ्याच कविता छान आहेत!

Add Comment

संबंधित लेख