न पाहिलेले स्वप्न...!

न पाहिलेले स्वप्न...!

क्रिकेट विश्वचषकातल्या भारतीय महिला संघाच्या पहिल्या विजयानिमित्त...

लहानपणापासूनच मुलामुलींना खेळांचं प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यांनी या खेळांमध्ये प्रगतीची शिखरं गाठावीत यासाठी योग्य संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यासाठी निधी उभा केला जात आहे. आता स्पोर्ट्स ॲकॅडमीज या शाळा आणि खेळांची मैदानं यांना सांधणारा दुवा बनत आहेत. अनेक गुणी खेळाडूंना या ॲकॅडमींततर्फे खेळण्याची संधी मिळत आहे. खेळांमध्ये काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणाऱ्या अशा मुलींना आता योग्य दिशा मिळू शकते आहे, याचं समाधान आहे. कोचिंग, ट्रेनिंग सगळ्या गोष्टी एकदम फोकसने होताहेत. ही चांगलीच गोष्ट आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक मिळवला. महिला क्रिकेटचं अनेक दशकांपासूनचं अपुरं स्वप्न पूर्ण केलं. आता या विजयामुळे महिला क्रिकेटची व्यावसायिक गणितं बदलतील, महिला क्रिकेटला एक नवी दिशा मिळेल. आपल्या संघातील सर्वच खेळाडूंची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.

आता तुम्ही म्हणाल, ‘सगळं जग हेच सांगतंय. नवीन काय सांगताय...तेच तेच काय वाचायचं सारखं. यात तुम्ही काय भर घालताय?’ पण हे सामने सुरू झाल्यापासून आत खोलवर काहीतरी घडत होतं, कळत होतं पण वळत नव्हतं. आपला महिला संघ याआधी विश्वचषक खेळला नाही, अटीतटीचे सामने खेळला नाही, असंही काही नव्हतं. पण यावेळेस बातच काही और होती. इतकी वर्षं उपेक्षा सोसलेल्या या संघावर अचानक संपूर्ण देशाच्या अपेक्षांचं ओझं लादलं गेलं आणि या पोरींनीही त्या अपेक्षा पुऱ्या केल्या, आपल्या प्रतिस्पर्धी संघांना त्या पुरून उरल्या. मैदानांवर अत्यंत संयतपणे, पद्धतशीरपणे डाव आखून खेळणाऱ्या या मुलींनी सामना जिंकल्यावर तितक्याच खुल्या दिलानं रडून विजयही साजरा केला. त्यांच्या खेळाला मिळालेल्या ग्लॅमरचं शिवधनुष्य पेलण्याची ताकदही त्यांच्यात आहे, हे त्यांनी त्यांच्या विजयोत्सवातून दाखवून दिलं.

हा विजयोत्सव पाहताना एखादं न सुटणारं गणित अचानक सुटावं तसं इतके दिवस काय खुपत होतं ते उमजून गेलं. क्रिकेटमधलं करिअर वगैरे गोष्टी खिजगणतीतही नसलेल्या आणि आयुष्यभर पुरुषांच्या क्रिकेटचे सामने पाहून त्यातच खूश होणाऱ्या आमच्यासारख्या बायकांना... किंबहुना... एके काळी जीव तोडून क्रिकेट खेळणाऱ्या आणि आता बायका कॅटेगरीत मोडणाऱ्या आम्हा मुलींना या सामन्यांनी एक अनामिक समाधान दिलंय.

संध्याकाळी शाळेतून आल्यावर, सुट्टीच्या दिवशी, सोलापूरच्या मे महिन्याच्या दुपारी रणरणत्या उन्हात आमच्या बिल्डिंगमधलं टोळकं खाली जमायचं. टीम पाडल्या जायच्या आणि आमच्या राजेश काकांच्या “और ... ने अपना खाता खोला!!!” या वाक्याने आमची मॅच सुरू व्हायची आणि मग पुढे काय घडायचं कळायचंच नाही. रोज नव्यानं कळणारे नियम, बॉल इकडे गेला की फोर, अमुक एका भिंतीच्या पुढे गेला की २ रन वगैरे नियम जगन्मान्य आहेत, असंच तेव्हा वाटायचं. या मॅचवर आपलं अख्खं आयुष्य अवलंबून आहे, अशा पोटतिडकीनं, दातओठ खात मॅच खेळली जायची. भांडणं, रडारड, चिडाचिड सगळं व्हायचं. मॅच कधी अर्ध्यातच संपायची, कधी कुणी जिंकायचं तर कधी कुणी हरायचं. पण काहीही झालं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे तिथं हजर व्हायचे. 

तेव्हा आम्ही मुलं-मुली एकत्र खेळायचो. सुदैवानं आमच्या घरात किंवा आसपासच्या कुटुंबांमध्ये तरी मुलींना ‘काय करायचंय क्रिकेट वगैरे खेळून,’ असलं काही ऐकावं लागलं नाही, कारण ‘जास्ती की मेजॉरिटी’ मुलींचीच होती. जरी क्रिकेटच्या बाबतीत जास्त प्रोत्साहन वगैरे दिलं गेलं नाही, तरी कधी कुणी आडकाठीही केली नाही. त्यामुळे मनसोक्त खेळायला मिळालं. खेळताना कळत गेलं की मुलगी म्हणून बॉलिंग करताना, बॅटिंग करताना आपला जोर कमी पडतो, मग ती उणीव भरून काढायची एक चटक लागली. आऊट व्हायचं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि हे सगळं करताना शिकवणारे होते राजेश काका! आमचं आराध्य दैवत. आमच्यासाठी ते म्हणतील ती गोष्ट प्रमाण असायची. त्यांनीच आम्हाला रोज शाळेतून आल्यावर नियमित व्यायाम करावा लागेल, हे सांगितलं. आमच्या कंपूमध्ये हरतऱ्हेचे नमुने होते. अतिशय हुशारीनं ते प्रत्येकासाठी वेगळा नियम बनवत. आमच्या घडणीच्या वर्षांमध्ये त्यांनी आम्हाला खूप काही दिलं. खरं तर त्यांना आमच्यासारख्या शाळकरी पोरांमध्ये रमण्याचं काही कारण नव्हतं, पण असतात अशी काही माणसं जी आपल्या आयुष्यावर खूप मोठी छाप पाडून जातात. 

तर कालचा महिलांच्या विश्वचषकाचा अंतिम सामना पाहिल्यावर क्रिकेटचा आमचा हा छोटासा प्रवास माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्या काळी छोट्या शहरांमध्ये मुलीच काय मुलांनीही क्रिकेटमध्ये करिअर करणं हे स्वप्नवतच वाटत होतं. पण आज भारतीय संघानं मिळवलेला हा विजय अशा छोट्या-छोट्या शहरांमधून आलेल्या मुलींनीच मिळवलेला आहे. अशा लहानमोठ्या गल्ल्यांमध्ये खेळणाऱ्या कितीतरी मुलींना ‘आपण हे स्वप्न पाहू शकतो’, याची जाणीवही नव्हती. पण तरीही त्या मुलांइतक्याच त्वेषाने हा खेळ खेळत असत. फक्त या खेळाच्या प्रेमापोटी.  

पण ही परिस्थिती फक्त क्रिकेटचीच होती का? आता मागे वळून पाहताना वाटतं, नाही, जवळपास सगळ्याच खेळांची हीच स्थिती होती. शालेय पातळीवर हॉकी, कबड्डी, खो-खो, लंगडी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल अशा खेळांना थोडातरी मान होता. आपल्या राष्ट्रीय खेळाचा शालेय पातळीवर अजूनही फारसा प्रसार होतच नाही. तेव्हाही नव्हता. फुटबॉल तर खूपच दूर की बात होती. पण शाळा सोडल्यानंतर राज्यस्तरावर, राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या या महिला खेळाडू या हळूहळू शैक्षणिक कामगिरीच्या, करिअरच्या आणि मग संसारचक्राच्या भाऊगर्दीत हरवून जात आणि ‘आम्ही शाळेत होता ना तेव्हा...,’ ही एक हळहळ आणि तेव्हाची त्यांच्या डोळ्यांसमोर तरळणारी उल्लेखनीय कामगिरी काय ती मागे उरत असे.

पण आता परिस्थिती बदलली आहे. खेळांकडे आता वेगळ्या नजरेतून पाहिलं जात आहे. खेळांना व्यावसायिक आयाम देण्याचे प्रयत्न होत आहेत. शासनाकडून त्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत आणि मुख्य म्हणजे लोकापर्यंत ते पोहोचत आहेत. लहानपणापासूनच मुलामुलींना खेळांचं प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यांनी या खेळांमध्ये प्रगतीची शिखरं गाठावीत यासाठी योग्य संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यासाठी निधी उभा केला जात आहे. आता स्पोर्ट्स ॲकॅडमीज या शाळा आणि खेळांची मैदानं यांना सांधणारा दुवा बनत आहेत. अनेक गुणी खेळाडूंना या ॲकॅडमींततर्फे खेळण्याची संधी मिळत आहे. खेळांमध्ये काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणाऱ्या अशा मुलींना आता योग्य दिशा मिळू शकते आहे, याचं समाधान आहे. कोचिंग, ट्रेनिंग सगळ्या गोष्टी एकदम फोकसने होताहेत. ही चांगलीच गोष्ट आहे.

परवाच्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये महिला संघाला पुरुषांनीही हिरीरीने पाठिंबा दिला. सामना संपल्यानंतर अनेकांनी महिला संघाला दिलेला पाठिंबा, त्यांच्या कोचने त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट, संघाला संधी मिळावी म्हणून केलेले निःस्वार्थ प्रयत्न यांच्या अनेक स्टोरीज वाचायला मिळत आहेत. हीच गोष्ट इतर खेळांनाही लागू होते. त्या संघासाठीही प्रयत्न करणारे असेच अनेक जण असतील. आणि या सामन्याने आता भारतालाच नाही, तर अवघ्या विश्वाला मुलींच्या संघाकडे - फक्त क्रिकेटच्याच नाही, तर सर्वच क्रीडासंघांकडे - पाहण्याची एक नवी दृष्टी दिली आहे. यामुळे कदाचित जिथे खेळांच्या बाबतीत मुलामुलींमध्ये भेदभाव केला जायचा तो कमी होईल. महिला क्रिकेटचेच नाही, तर सर्वच खेळांचे ‘अच्छे दिन’ आता खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि आधीच्या संघांच्या तपश्चर्येनंतर सुरू होतील. 

हे सगळं ग्लॅमर फक्त क्रिकेटलाच का? बाकीच्या खेळांचं काय, हा प्रश्न तूर्तास तरी बाजूला ठेवूया. काहीही झालं तरी या खेळात आपल्या देशाला बांधून ठेवण्याचं सामर्थ्य आहे, हे मान्य करावचं लागेल. मॅच संपल्यावर आमच्यात बोलणं झालं त्यानुसार, “या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नसांनसांतून क्रिकेट वाहतंय - मग ती स्त्री असो किंवा पुरुष!” परवाच्या सामन्यानंतर स्टेडियममध्ये, संपूर्ण भारतात झालेल्या जल्लोषाने क्रिकेटसाठी भारतीयांची मनं कायमच, “दिल मांगे मोअर!” म्हणतात हेच सिद्ध झालंय. 

या निमित्तानं आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे एकदा का आपण शाळेतून बाहेर पडलो की आपल्यासारख्यांच्या आयुष्यातून खेळही हद्दपार होतात. खेळांमुळे अंगी बाणली जाणारी मेहनतीची सवय, खिलाडू वृत्ती या काही फक्त शाळेतच उपयोगी ठरतात असं नाही. आयुष्याच्या मैदानावरही या गोष्टींची आपल्याला तेवढीच गरज असते. जर हे खेळ छोट्यांप्रमाणेच मोठ्यांच्या आयुष्याचाही अविभाज्य भाग झाले, तर टीमवर्क, दुसऱ्यांचे गुण वाखाणणे, अपयश योग्य रीतीने पचवता येणे अशा सॉफ्ट स्किल्ससाठी वेगळे कोर्सेस करण्याची, ताण व्यवस्थापनासाठी वेगळा वेळ आणि अमाप पैसा खर्च करण्याची गरज उरणार नाही. घराघरांतून सुरुवात केली गेली, तर हा बदल मोठ्या पातळीवरही दिसेल.


हेही वाचा - स्त्रियांच्या राष्ट्रीय खेळांचे सामने (डॉ. नरेंद्र दाभोलकर)


विश्वविजेत्या महिला संघाचं मनापासून अभिनंदन. त्यांनी त्यांच्या विश्वविजेत्या बनण्याच्या स्वप्नाबरोबरच अनेक मुलींच हे ‘न पाहिलेलं स्वप्नही’ पूर्ण केलं आहे. महिला संघाचं हे यश अंतिम सामन्यातील विजयानंतर अधिक देदीप्यमान झालं. अंतिम सामन्यानंतर त्यांची प्रशंसा करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी अनेक सेलिब्रिटीज, ख्यातनाम व्यक्ती सामोऱ्या आल्या. त्यापूर्वीच्या सामन्यांमध्येही त्यांनी आणि गेल्या चाळीस वर्षांत त्यांच्या आधीच्या संघांनीही तितकीच मेहनत घेतली होती, हेसुद्धा तितकंच खरं आहे. तेव्हाही या व्यक्तींकडून त्यांना असाच पाठिंबा मिळाला असता, तर जास्त बरं झालं असतं असंही उगीच वाटून गेलं. पण चाळीस वर्षांनी का होईना, परिणाम स्पष्ट दिसायला लागले आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या या जगात आपला हा क्रीडासूर्य कधीही मावळू नये आणि त्यांनी मेहनतीनं तयार केलेला हा विजयमार्ग फक्त क्रिकेटच नाही, तर सर्व खेळांसाठी प्रेरणादायी ठरावा, हीच आशा आहे.

- तृप्ती कुलकर्णी
kulkarnitrupti3@gmail.com
(अनुवादक, संपादक, डिजिटल माध्यमासाठी भाषा विशेषज्ञ म्हणून कार्यरत)

Tags: icc women's world cup महिला विश्वचषक महिला खेळाडू क्रीडा करियर क्रीडाविश्व विश्वचषक 2025 Load More Tags

Comments:

Shashikant Kulkarni

Very True & Excellent

Vishwas Kulkarni

मस्त खुप सुंदर

Add Comment