गुड बाय सानिया!

भारताची महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा 21 फेब्रुवारीला निवृत्त झाली. त्यानिमित्ताने तिच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा.

भारताची आजवरची सर्वात अव्वल महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा 21 फेब्रुवारीला निवृत्त झाली. दुबईतील स्पर्धा ही माझी अखेरची स्पर्धा असेल असे तिने आधीच जाहीर केले होते. पण तेथे पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली. कारकिर्दीतील तो तिचा अखेरचाच सामना ठरला. त्याआधी ‘ग्रँड स्लॅम मालिके’तील यंदाच्या पहिल्याच ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत रोहन बोपण्णाच्या साथीने तिने मिश्र स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. ग्रँड स्लॅम मालिकेतील या स्पर्धेत ती या मालिकेतील आपले सातवे अजिंक्यपद मिळवील असे वाटत होते. पण तसे मात्र घडले नाही. आणि अखेरच्या, दुबई येथील स्पर्धेत तर एम. केजच्या भागीदारीत खेळताना तिला सुरुवातीलाच व्ही. कुदरमेटोव्हा आणि एल. सॅम्सोनोव्हा यांच्याकडून 4 - 6, 0 - 6 असा पराभव पत्करावा लागला. (अखेरच्या सामन्यात अपयशी ठरणारी ती काही पहिलीच खेळाडू नाही, हेही खरेच.) अर्थात त्यामुळे तिच्या मोठेपणावर काही परिणाम होणार नाही.

सानियाने 36 व्या वर्षी हा निवृत्तीचा निर्णय घेतला. आता तिच्या शहरात - हैदराबादला, रविवारी (5 मार्च) प्रदर्शनीय सामन्यात खेळणार आहे, हा निरोपाचा सामना ही तिच्या चाहत्यांना पर्वणीच वाटेल. कारण त्यांना तिला खेळताना प्रत्यक्ष पाहण्याची ती अखेरची संधी असेल. ती सांघिक आणि मिश्र प्रकारातील एकूण दोन सामने खेळेल. दुहेरीतील तिचा जोडीदार रोहन बोपण्णा असेल.

सानियाच्या आधी टेनिसमध्ये भारतातील निरुपमा वसंत मांकड आणि निरुपमा संजीव या दोघीच ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धात मुख्य फेरीत खेळल्या होत्या. मात्र निरुपमा मांकड पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. आणि 1998 मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत दुसरी फेरी गाठणारी निरुपमा संजीव वैद्यनाथन ही पहिली भारतीय महिला खेळाडू होती. पण तिचे क्रमवारीत स्थान 147 होते. त्यावेळी अर्थातच महिला टेनिस हा प्रकार फारसा कुणी मनावर घेत नव्हते आणि त्याची लोकप्रियताही फार नव्हती. सानियाने मात्र या दोघींच्या पुढचा मोठा टप्पा गाठला. सानियाने एकेरीच्या क्रमवारीत 27 वे स्थान मिळवले होते नंतर कुणाही भारतीय महिला खेळाडूला त्याच्या जवळपासही जाता आलेले नाही. आणि दुहेरीत तर ती दीर्घकाळ पहिल्या क्रमांकावर होती.

दोन निरुपमांनंतर मात्र थोड्याच काळात हे चित्र पालटले. एका 13 वर्षांच्या मुलीमुळे! आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या आयटीएफच्या ज्युनियर मालिकेतील स्पर्धेतील पाकिस्तान ज्युनियर स्पर्धेत सानियाने उपविजेतेपद मिळवले (1999) आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याच मालिकेत पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईतील स्पर्धेत तिने पहिले विजेतेपद पटकावले. 2001 मध्ये तिने चंडीगड येथे ‘आयटीएफ’च्या सीनियर गटात पदार्पण केले. ‘विम्बल्डन ज्युनियर स्पर्धे’त तिला दुहेरीत पहिल्याच तर एकेरीत दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. 2002 मध्ये ‘बुसान आशियाई क्रीडा स्पर्धे’त तिने लिअँडर पेसच्या भागीदारीत मिश्र स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवले. त्याच वर्षी आशियाई स्पर्धेत ज्युनियर एकेरीत विजेती बनली. आता तिची दखल घेतली जाऊ लागली होती.

पुढच्याच वर्षी विम्बल्डन स्पर्धेत तिने अलिसा क्लेबानोवाच्या साथीने दुहेरीत ज्युनियर अजिंक्यपद मिळवले. ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेतील हे तिचे पहिले विजेतेपद त्याच वर्षी ती व्यावसायिक खेळाडू बनली. त्यावर्षी तिने जागतिक टेनिस असोसिएशन- ‘डब्ल्यूटीए’चे दुहेरीतील विजेतेपद अमेरिकेच्या लिझेल ह्यूबरच्या साथीने मिळवले. असे यश मिळवणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू. विम्बल्डन खुल्या स्पर्धेत मात्र ती दुहेरीच्या पात्रता स्पर्धेतच गारद झाली. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धेत तिने मुख्य स्पर्धेत स्थान मिळवले इतकेच नाही, तर पहिल्या दोन फेऱ्या जिंकल्या. तिसऱ्या फेरीत सेरेना विल्यम्सकडून ती हरली. नंतर अमेरिकन खुल्या स्पर्धेत ती चौथ्या फेरीत पोहोचली. मात्र तिला मारिया शारापोव्हाकडून पराभव पत्करावा लागला. पण या कामगिरीमुळे तिने क्रमवारीत वर्षाअखेर 31 वे स्थान मिळवले. पहिल्या 50 मध्ये दाखल झालेली ती आजवरची एकमेव भारतीय महिला आहे. तिला त्यावर्षीची सर्वोत्तम नवोदित खेळाडू हा मान मिळाला.

दोहा येथील 2006 आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने लिअँडर पेसच्या साथीने मिश्र स्पर्धेचे सुवर्णपदक मिळवले आणि एकेरी तसेच सांघिक स्पर्धेत रौप्यपदक. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. पण एकेरीत तिने क्रमवारीत 27 वे स्थान मिळवले. अमेरिकन खुल्या स्पर्धेत ती क्रमवारीतील 27 व्या क्रमांकाची खेळाडू म्हणून सामील झाली. पण दुसऱ्या फेरीतच तिचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर तिला उजव्या मनगटाला दुखापत झाली आणि नंतर पोटाच्या स्नायूंवरही ताण आला. 2008 मध्ये महेश भूपतीच्या साथीने तिने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेत तिने महेश भूपतीच्या साथीत प्रथमच ग्रँड स्लॅम मालिकेत प्रथमच अंतिम फेरी गाठली पण नेनाद झिमयिक आणि टिआन टिआन सुन यांच्याकडून हरल्याने या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र त्या वर्षी तिची एकूण बक्षिस रकमेची कमाई 10 लाख डॉलर्स झाली. अर्थातच हा टप्पा गाठणारी ती पहिली भारतीय ठरली. दुहेरीमध्येही 2011 मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेत तिने एलेना व्हेसनीनाच्या जोडीने अंतिम फेरी गाठली होती. पण तिथेही तिला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले, एकेरीमध्ये सानियाला मोठे यश मिळाले नाही, पण त्याची भरपाई तिने दुहेरी आणि मिश्र स्पर्धेत ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांत प्रत्येकी तीन विजेतीपदे मिळवून भरून काढली. 2012 नंतर तिने आपल्याला एकेरीत फारशी संधी नसल्याचे ओळखून दुहेरीवरच लक्ष केंद्रित केले. तिचा हा निर्णय खूपच फायदेशीर ठरला. 2015 मध्ये दुहेरीत तिने सुरुवातीला असलेल्या पाचव्या स्थानावरून पहिले स्थान मिळवले आणि ते 91 आठवडे टिकवले. कोणत्याही भारतीय खेळाडूपेक्षा हे यश मोठे होते. या काळात तिची प्रमुख साथीदार माजी जगज्जेती मार्टिना हिंगिस ही होती आणि या दोघींनी अनेक स्पर्धाचे जेतेपद मिळवले. त्यातील 14 विजेतीपदे तर त्यांनी सलग मिळवली होती. क्रमवारीत पहिले स्थान हे प्रत्येकाचेच लहान वयातील स्वप्न असते आणि ते मिळाल्याने माझे स्वप्न साकार झाले, असे ती म्हणाली होती. त्या वर्षी हिंगिसच्या साथीने तिने विम्बल्डन आणि अमेरिकेच विजेतेपद मिळवले आणि नंतर डब्ल्यूटीए फायनल्समध्येही ही जोडी अजिंक्य ठरली. 2016 च्या ऑगस्टमध्ये मात्र बऱ्याच स्पर्धांत अपयश आल्यानंतर या दोघींनी सहमतीने वेगवेगळ्या जोडीदारांबरोबर खेळण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा : पेले : त्याच्यासारखा केवळ तोच! - आ. श्री. केतकर


नंतरच्या वर्षी तिची कामगिरी लक्षणीय नव्हती आणि 2018 च्या सुरुवातीलाच जखमी झाल्याने ती स्पर्धात उतरली नाही आणि एप्रिलमध्ये तिने आपण आता लवकरच आई बनणार असल्याचे जाहीर केले. (2010 मध्येच तिने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलीकबरोबर विवाह केला होता.) ऑक्टोबरमध्ये तिला मुलगा झाला. २०२० मध्ये तिने पुनरागमन केले. ऑलिंपिकमध्ये दुहेरीत अंकिता रायनाबरोबर ती खेळली पण पहिल्याच फेरीत या भारतीय जोडीला युक्रेनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. यानंतरची एकमेव उल्लेखनीय बाब म्हणजे तिने दुहेरीत पुन्हा पहिल्या 25 मध्ये स्थान मिळवले. यंदा तिने ज्या मेलबोर्नमध्ये आपण व्यावसायिक खेळाडू म्हणून प्रारंभ केला तेथेच ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. बोपण्णाच्या साथीने तिने अंतिम फेरीही गाठल्याने कारकिर्दीची अखेर ती विजेतेपदानेच करणार अशी आशा निर्माण झाली होती. पण तसे व्हायचे नव्हते. ही जोडी पराभूत झाली. आणि नंतर सानियाने दुबईतील स्पर्धा ही आपल्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असेल असे जाहीर केले. आणि तिथे तर तिला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. मात्र त्यामुळे तिची कारकीर्द झाकोळली जाणार नाही हे नक्की.

भारतीय टेनिसमध्ये मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होत आहे, याचे श्रेय सानियालाच द्यावे लागेल. दुर्दैवाने अजूनपर्यंत तरी तिच्या दर्जाची कामगिरी त्यापैकी कुणीही केलेली नाही. दुसरे असे की, त्यांचे सध्याचे वय विचारात घेतले तर ही बाब जवळपास अशक्यच वाटते. इतर काही खेळातील कुस्तीगीर विनेश फोगटपासून स्मृती मांधानापर्यंतच्या अनेक अव्वल महिला खेळाडूंचे प्रेरणास्थानही सानियाच आहे. अनेक जाहिरातींमध्ये ती चमकली आहे आणि त्यात तिने चांगली कमाईही केली आहे.

सानियाचा खेळ आक्रमक होता आणि ती बऱ्याचदा कोर्टच्या मागील सीमेजवळून बेसलाइनवरूनच खेळाचे नियंत्रण करत असे. तिच्या फटक्यांचा वेग तिच्या आक्रमणाला धार आणायचा. तिची मोठी ताकद म्हणजे तिचा फोरहँड आणि त्याला दिलेली व्हॉलीजमधील कौशल्याची जोड. काहीजण तिच्या या खेळाची रुमानियाचा प्रख्यात खेळाडू इली नस्तासेशी करत. तिच्या खेळाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे परतीच्या फटक्यांतील तिचे कौशल्य आणि अचूकता. त्यामुळे ती प्रतिस्पर्ध्यांना निरुत्तर करत असे. अर्थातच तिला आणि तिच्या जोडीदाराला यामुळे खूप फायदा होत असे. तिच्या या परतीच्या प्रभावी फटक्यांमुळे मिश्र सामन्यातही ती पुरुष खेळाडूंची सर्व्हिस प्रभावहीन करत असे. ही कुवत असलेल्या महिला खेळाडू फारशा नाहीत. आपल्या खेळाबाबत बोलताना तिने सांगितले होते की, माझा फोरहँड आणि बॅकहँड कोणत्याही अव्वल खेळाडूची बरोबरी करू शकेल असा आहे. मी त्या फटक्यांची पेरणी ज्या प्रकारे करते तेही तितकेच महत्त्वाचे आहे. दर वेळी ती आपला फटका गुण मिळवून देणाराच असावा यासाठी प्रयत्न करायची आणि त्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना अवघड होईल अशा जागी फटके पेरायची. जास्तीत जास्त ताकद लावून ती फटके मारत असे.

याचे कारण सांगताना ती म्हणाली होती की, मी काही खूप चपळ नाही तो माझा एक दोषच आहे. त्यामुळे मी कोर्टवर सहजपणे सर्वत्र संचार करू शकत नाही. नेटजवळ आणि तेथून पुन्हा मागे येताना मला खूप अवघडल्यासारखे वाटते. या दोषाप्रमाणे तिची दुसरी सर्व्हिस हादेखील एक कच्चा दुवा होता. ती फारशी प्रभावी नसल्याने सहज परतवली जात असे. याबरोबरच 2012 नंतर तिला अनेकदा दुखापतींचा सामनादेखील करावा लागत होता. त्यामुळे तिला एकेरीवर लक्ष केंद्रित करणे शक्य झाले नाही. तरीही तिने दुहेरीत जो पराक्रम केला त्याचे कौतुकच करायला हवे. तिने सहजी हार कधीच मानली नाही. (दुखापतींपुढे मात्र तिला शरणागती पत्करावी लागली होती आणि एकेरीचा ध्यास सोडून द्यावा लागला होता.) एखादा गेम वा सेट गमावला तरीही हार न मानता, चिकाटीने प्रयत्न करत राहणे ही तिची वृत्ती अनेकदा तिला उपयोगी पडली होती.

सानियाला अनेक सन्मान मिळाले आहेत. 2004 मध्ये अर्जुन पारितोषक, 2005 मध्ये सर्वोत्तम नवोदित खेळाडू म्हणून डब्ल्यूटीएचे बक्षिस, 2006 मध्ये पद्मश्री किताब, 2015 मध्ये मेजर ध्यानचंद खेल रत्न पारितोषक, 2015 मध्येच बीबीसीच्या स्फूर्ती देणाऱ्या 100 महिलांच्या यादीत समावेश, 2016 मध्ये पद्मभूषण किताब तसेच वर्षातील सर्वोत्तम अनिवासी भारतीय हा पुरस्कार 2014 मध्ये तेलंगणा सरकारने तिला नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या या राज्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. टाइम नियतकालिकाच्या 1916 मधील जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत तिला स्थान मिळाले होते. 2014 मध्ये सानियाने हैदराबाद येथे टेनिस अ‍ॅकॅडमीची स्थापना केली. ग्रँड स्लॅम मलिकेतील स्पर्धात अनेक विजेतीपदे मिळवणाऱ्या मार्टिना नवरातिलोवा आणि कारा ब्लॅक यांनी या अ‍ॅकॅडमीला वेगवेगळया प्रसंगी भेट दिली आहे. संयुक्त राष्ट्रांनी तिला दक्षिण आशियासाठी गुडविल अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. अशा प्रकारे नियुक्ती होणारी ती पहिलीच दक्षिण आशियाई महिला आहे. 

तिच्या कारकिदीतील प्रमुख विजेतीपदे : 

महिला दुहेरी : 2015: विम्बल्डन मार्टिना हिंगीसच्या साथीने उकाटेरिना माकारोवा आणि एलेना व्हेसनीन यांना 5-7, 7-8, 7-5 असे हरवले. अमेरिकन खुली स्पर्धा: मार्टिना हिंगिसच्या साथीने केसी डेलाक्वा आणि यारोस्लावा वेडोका यांना 6-3, 6-3 असे पराभूत केले. 2016 ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा: मार्टिना हिंगिसच्या साथीने आंद्रिया हलावाक्कोवा आणि ल्यूसी हडफक्का यांच्यावर 7-6, 6-3 अशी मात केली...

मिश्र स्पर्धा 5 वेळा उपविजेतेपद आणि तीन वेळा विजेतेपद, उपविजेतेपद 2008 खुली ऑस्ट्रेलियन स्पर्धा : महेश भूपती बरोबर 2014 खुली ऑस्ट्रेलियन स्पर्धा होरिआ टेकों बरोबर फ्रेंच खुली स्पर्धा 2016, इवान डॉडिग बरोबर 2017: खुली ऑस्ट्रेलियन स्पर्धा इवान डोडिंग बरोबर 2023 खुली ऑस्ट्रेलियन स्पर्धा : रोहन बोपण्णा बरोबर.. विजेतीपदे: 2009 खुली ऑस्ट्रेलियन स्पर्धा महेश भूपती बरोबर नताली डेची आणि अ‍ॅन्डी राम यांना 6-3, 6-1 असे हरवले. 2012: फ्रेंच खुली स्पर्धा महेश भूपती बरोबर क्लॉडिआ यॅन्स इग्नासिक आणि सैंटियागो गोन्झालेस वर 7-6, 6-1 असा विजय. 2014: अमेरिकन खुली स्पर्धा ब्रूनो सोरेस बरोबर अबिगेल स्पिअर्स आणि सैंटियागो गोन्झालेस वर मात.

दोन दशकांहून जास्त वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीनंतर, निवृत्त झाल्यावर मुंबईमध्ये तिला ‘स्पोर्टसस्टार एसेस इन्पिरेशनल अ‍ॅवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले त्यावेळी ती म्हणाली की, निवृत्तीनंतरच्या जीवनाच्या या टप्प्याची सुरुवात यापेक्षा काय चांगली असणार!

अनेक परदेशी खेळाडू निवृत्त झाल्यावर त्यांच्याबाबत बरेच काही लिहिले जाते. मात्र काही इंग्रजी वृत्तपत्रांचा अपवाद वगळता भाषिक वृत्तपत्रांनीही सानियाच्या निवृत्तीची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. म्हणूनच हा छोटासा प्रयत्न.

(सानियाने मात्र या दोघींच्या पुढचा मोठा टप्पा गाठला. सानियाने एकेरीच्या क्रमवारीत 27 वे स्थान मिळवले होते नंतर कुणाही भारतीय महिला खेळाडूला त्याच्या जवळपासही जाता आलेले नाही. आणि दुहेरीत तर ती दीर्घकाळ पहिल्या क्रमांकावर होती.)

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: टेनिस क्रीडा सानिया मिर्झा शोएब अख्तर भारतीय महिला टेनिसपटू Load More Tags

Add Comment