‘ग्रँड स्लॅम’चा नवा तरुण मानकरी : यानिक सिनर

दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या (पुरुष एकेरी) विजेतेपदावर फेडरर, नदाल आणि योकोविचशिवाय अन्य खेळाडूचं नाव कोरलं गेलं आहे!

भारताच्या रोहन बोपण्णानंही या स्पर्धेत कमाल केली. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेनच्या साथीनं त्यानं पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद मिळवलं. दुसरे सीडिंग मिळालेल्या या जोडीनं सिमॉन बोलेल्ली आणि आन्द्रे वावास्सोरी या इटालियन जोडीचा एक तास 39 मिनिटांत सरळ सेटमध्ये 7-6, 7-5 असा पराभव केला. लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यानंतर ग्रँड स्लॅम मालिकेतील दुहेरीचं विजेतेपद मिळवणारा भारताचा तो तिसरा खेळाडू ठरला.

रॉजर फेडरर नाही, राफा नदाल नाही आणि नोवाक योकोविचही नाही. नवा तारा कार्लोस अल्काराझ, आणि याआधी या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी दोनदा आणि यंदाही पुन्हा तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणारा, आणि त्या सामन्यात पहिले दोन सेट सहज जिंकणारा डानिल मेदवेदेवही नाही! अन्य सीडेड खेळाडूंचा तर विचारच नको. सर्वांचे अंदाज चुकवून इटलीचा यानिक सिनर हा यंदाचा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा पुरुष एकेरीचा विजेता बनला आहे.

तसं पाहिलं तर यानिक सिनर चांगला खेळाडू आहेच. क्रमवारीत पहिल्या दहांत स्थान असणारा. तरीही तो विजेता होईल असं मात्र कुणालाच वाटलं नव्हतं. कारण त्याच्या गटात कॅचाकोव, रुब्लेव आणि ही स्पर्धा दहादा जिंकणारा, गतसालचा विजेता सार्वकालिक महान असा लौकिक मिळवणारा नोवाक योकोविच यांचा समावेश होता. सिनरनं उपान्त्य फेरी गाठताना जोंग, बाएझ, कॅचाकोव आणि रुब्लेवला पराभूत करताना एकही सेट गमावला नव्हता. उपान्त्य फेरीत त्याची गाठ योकोविचशी पडली. ही त्याची खरी कसोटी होती...

आणि त्या कसोटीत त्यानं आश्चर्यकारक यश मिळवलं. या स्पर्धेत अकराव्यांदा विजेतेपद मिळवून ग्रँड स्लॅम मालिकेतील विजेतीपदे मिळवण्याचा विक्रम उंचावून तो 25 वर न्यायचे त्याचे मनसुबे सिनरने धुळीला मिळवले. त्यामुळंच कधी नाही इतका योकोविच निराश झाला. खरं तर 36 व्या वर्षीही तो चांगलाच खेळत होता. पण कोणत्याही चांगल्या गोष्टीची अखेर होतेच. अत्युच्च पद गाठणं खूपच अवघड आणि ते टिकवणं त्याहूनही अवघड असं म्हणतात. आणि असं का म्हटलं जातं हे योकोविचलाही आता उमगलं असेल. त्याचा सामना 22 वर्षांच्या सिनरबरोबर होता. पण या लढतीत सिनरनं त्याला निष्प्रभ केलं, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. या सामन्याची सुरुवातच सिनरनं धडाक्यात केली.

पहिल्या सेटमध्ये सुरुवातीपासूनच त्यानं वर्चस्व गाजवलं. त्या पहिल्या सेटमध्ये योकोविचला केवळ एक गेम जिंकता आला. सिनरनं योकोविचची सहजपणं भेदली एकदा नाही तर तीनदा. आणि तो सेट 6-1 असा जिंकला. प्रेक्षकांचं सोडा, पण खुद्द योकोविचनंही असं काही होईल अशी कल्पना केली नसेल. केवळ 35 मिनिटांत हा सेट संपला. दुसऱ्या सेटमध्ये याचीच पुनरावृत्ती झाली, फरक इतकाच की यावेळी योकोविचनं दोन गेम जिंकले आणि सेट 38 मिनिटं म्हणजे तीन मिनिटं जास्त चालला.

योकोविचनं थोडाफार प्रतिकार करून तिसऱ्या सेटमध्ये चांगली लढत दिली. तरीही त्याला सिनरची सर्व्हिस भेदता आली नाही आणि गेम टाय-ब्रेकरवर गेला. तोही चुरशीच्या झुंजीनंतर योकोविचनं 8-6 असा जिंकला. या संपूर्ण स्पर्धेत सिनरनं प्रथमच सेट गमावला होता. आता योकोविच नेहमीप्रमाणं सामना फिरवणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. कारण याआधी अनेकदा त्यानं तशी करामत केली होती. पण तसं काही घडलं नाही. सिनर चिवटपणे खेळत होता आणि योकोविचचे दुबळे दुवे त्याच्या ध्यानात आधीच आले होते आणि नेमका त्यांवरच हल्ला करून त्यानं चौथा सेट 6-3 असा जिंकून ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेत प्रथमच विजेतेपद मिळवलं, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं.

क्रमवारी आणि सीडिंगमध्येही पहिल्या क्रमांकावर असलेल्या नोवाक योकोविचला नदाल, फेडरर असे प्रतिस्पर्धी नसल्यानं तो ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांत आणखीही काही विजेतीपदे मिळवणार, असं अनेकांना वाटत होतं. कारण गतसालच्या विम्बल्डनमधील अल्काराझकडून झालेल्या पराभवानंतर, वर्षअखेरच्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत तो सहज विजेता ठरला होता. याही स्पर्धेतून नदालनं माघार घेतली होती आणि फेडरर तर निवृत्तच झालाय. पण सिनरनं याआधी एटीपीच्या स्पर्धांत त्याच्याविरुद्धचे तीन सामने जिंकले होते तर चार सामन्यांत योकोविच विजयी झाला होता. म्हणजे सिनरला योकोविचचा खेळ चांगला माहीत असणार. त्यानं आपण कोणत्या प्रकारे त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करायचा याचा त्याने नीट अभ्यास केला असावा. प्रतिस्पर्ध्याच्या परतीच्या फटक्याचा अंदाज घेऊन योकोविच त्या दिशेला धावतो हे सिनरला चांगलेच माहीत असणार. त्यामुळेच तो अनेकदा योकोविचचा अंदाज फोल ठरवत होता. योकोविच जात असेल त्याच्या विरुद्ध बाजूलाच जोरदार फटका लगावत होता. त्याचबरोबर योकोविचच्या परतीच्या फटक्यांचा अचूक अंदाज घेऊन तो ते परतवत होता. त्यामुळं योकोविचला त्यानं सामन्यात वर्चस्व मिळवण्याची संधीच दिली नाही. जोडीला बिनतोड सर्व्हिस हे हत्यार त्यानं मोक्याच्या वेळी परिणामकारकरीत्या वापरलं. त्याच्या अनेक जोरदार परतीच्या फटक्यांचा अंदाज योकोविचला येत नव्हता. ते त्याच्या बाजूनेच जात होते. तो दिवस योकोविचचा नव्हताच. आणि आता त्यानं याची सवय करायला हवी असा इशाराच सिनरनं त्याला दिला आहे.

अंतिम फेरी गाठताना डानिल मेदवेदेवनं चार वेळा पाच सेट चाललेल्या लढती जिंकल्या होत्या. त्यातील महत्त्वाची होती उपान्त्यपूर्व फेरीची. अल्काराझ विरुद्धची. 20 वर्षांच्या अल्काराझबद्दल मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अनाठायी नाहीत कारण त्यानं ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांत दोन जेतेपदं मिळवली आहेत. त्याचा खेळ वेगवान आणि काहीसा मॅकेन्रो, बेकर आणि काहीवेळा पीट सँप्रस यांच्या खेळाची आठवण करून देणारा. पण उपान्त्य सामन्यात मेदवेदेवनं त्याला तीन तास अठरा मिनिटं रंगलेल्या लढतीत निष्प्रभ केलं. अल्काराझला केवळ एक सेट जिंकता आला, तोही टाय-ब्रेकरवर, मेदवेदेवनं त्याला 6-1, 6-3, 6-7 (2-7) आणि 6-4 असं हरवून अंतिम फेरी गाठली होती.

अंतिम सामन्याची सुरुवातही त्यानं त्याच धडाक्यात केली आणि सुरुवातीचे दोन सेट 6-3, 6-3 असे जिंकले. पण मग सिनर सावरला. त्याला मेदवेदेवच्या खेळाचा अंदाज आला असणार. आणि या सामन्यातही त्यानं योकोविच विरुद्ध जी हत्यारं वापरली होती त्यांचाच प्रभावीपणे उपयोग केला. सामना जिंकण्यासाठी मेदवेदेवला एकच सेट जिंकायचा होता. पण ती संधीच सिनरनं त्याला दिली नाही. मेदवेदेवनं जसे पहिले दोन सेट जिंकले होते, तितक्याच शिताफीनं सिनरनं नंतरचे दोन सेट 6-4, 6-4 असे जिंकले. महत्त्वाची बाब अशी की, दोन दोन अशी बरोबरी साधल्यानंतरही त्यानं जोर कायम राखला आणि निर्णायक पाचवा सेटही 6-3 असा जिंकून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना तब्बल तीन तास सेहेचाळीस मिनिटं चालला. दीर्घकाळानंतर इटलीला ग्रँड स्लॅम मालिकेतील एकेरी स्पर्धेत विजेतेपद मिळालं. दहा वर्षांनंतर या स्पर्धेच्या विजेतेपदावर फेडरर, नदाल आणि योकोविचशिवाय अन्य नाव कोरलं गेलं. यामुळेच येणारा काळ 20-22 वयाच्या अल्काराझ, सिनरचा तसेच पंचविशीतल्या मेदवेदेव, इवेरेवचा असू शकतो असेच आतातरी म्हणता येईल.

पुरुष एकेरीत यंदा अनेक खेळाडू पहिल्या तीन-चार फेऱ्यांतच पराभूत झाले होते. त्यांत रुन, रुड, शेल्टन, दिमित्रॉव पॉल, मिनॉर आणि त्सित्सिपासचा समावेश होता. उपान्त्यपूर्व फेरीत रुब्लेव, फ्रिट्झ, हुरकाक्झ आणि अल्काराझ यांचा समावेश होता. परंतु यापेक्षाही जोरदार धक्के महिला एकेरीत अव्वल खेळाडूंना बसले. प्रथम सीडेड स्विआटेकला तिसऱ्या फेरीमध्येच हरवून नोस्कोवानं चांगलीच खळबळ माजवली होती. ओन्स जेब्युरला तर दुसऱ्या फेरीतच अ‍ॅन्ड्रीवानं पराभूत केलं होतं. विनासायास अंतिम फेरी गाठणाऱ्या, गतसालच्या विजेत्या 25 वर्षांच्या अरीना सबालेंकाला अंतिम फेरीत क्विन वेनशी लढायचं होतं. उपान्त्यपूर्व फेरीत तिनं क्रेयाचिकोवाला तर उपान्त्य सामन्यात कोको गॉफला नमवलं होतं. क्विन वेननं अंतिम फेरी अगदी आरामात गाठली होती. तिला एकाही सीडेड खेळाडूविरुद्ध खेळावं लागलं नव्हतं.


हेही वाचा : लोकशाहीचे अवमूल्यन ही देशाची खरी बदनामी नव्हे काय? - आ. श्री. केतकर


अंतिम फेरीत मात्र सबालेंकानं तिला सपशेल हरवलं. जराशीही संधी तिनं वेनला दिली नाही. आणि सर्वांगीण खेळाच्या जोरावर सामना 6-3, 6-2 जिंकला. तिचं वर्चस्व एवढं होतं की, संपूर्ण स्पर्धेत तिची सर्व्हिस भेदणं कुणालाही जमलं नाही. अंतिम फेरीत वेनलाही. दोघींनीही सामन्यात सहा बिनतोड सर्व्हिस केल्या पण वेननं सर्व्हिस करताना सहा वेळा डबलफॉल्ट म्हणजे दुहेरी चूक केली. पण सबालेंकानं एकदाही तशी चूक केली नाही. केव्हाही तिनं वेनला वर्चस्व मिळू दिलं नाही. सेरेना विल्यम्सनं 2007 मध्ये अशी कामगिरी केली होती. आणि त्या बरोबरच विजेतेपद राखताना सबालेंकानं अराझेंकानं 2013 मध्ये केलेल्या कामगिरीची बरोबरी केली.

रोहन बोपण्णा

भारताच्या रोहन बोपण्णानंही या स्पर्धेत कमाल केली. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेनच्या साथीनं त्यानं पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद मिळवलं. दुसरे सीडिंग मिळालेल्या या जोडीनं सिमॉन बोलेल्ली आणि आन्द्रे वावास्सोरी या इटालियन जोडीचा एक तास 39 मिनिटांत सरळ सेटमध्ये 7-6, 7-5 असा पराभव केला. लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यानंतर ग्रँड स्लॅम मालिकेतील दुहेरीचं विजेतेपद मिळवणारा भारताचा तो तिसरा खेळाडू ठरला. ग्रँड स्लॅम मालिकेतील त्याचं हे दुसरं विजेतेपद. याआधी 20017 मध्ये फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत त्यानं गॅब्रिएला डाब्रोवस्कीच्या साथीनं मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपद मिळवलं होतं. पण यावेळी त्यानं आणखीही एक विक्रम केला. 43 व्या वर्षी त्यानं हे यश मिळवलं. ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांत विजेतेपद मिळवणारा तो सर्वाधिक वयाचा खेळाडू आहे.

एकेरीत पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत स्थान मिळवणाऱ्या भारताच्याच सुमित नागलनं पहिली फेरीही पार केली. 26 वर्षांच्या सुमितनं अलेक्झांडर बुब्लिकचा 6-4, 6-2, 7-6 (7-5) असा पराभव करून कारकिर्दीतील सर्वात चांगली कामगिरी नोंदवली. पण त्याची आगेकूच तेवढ्यावरच थांबली. दुसऱ्या फेरीत त्याला जुन चेंग राँगकडून 6-2, 3-6, 5-7, आणि 4-6 अशी हार पत्करावी लागली. सुमितनं 2015 मध्ये बिम्बल्डन स्पर्धेत ज्युनियर गटात दुहेरीचं जेतेपद मिळवलं होतं. पण नंतर त्याला फारसं यश मिळालं नव्हतं. पण या स्पर्धेतील कामगिरीनं त्याचा आत्मविश्वास वाढला असेल व तो आगामी स्पर्धांत चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा करायची.

महिलांच्या दुहेरीच्या अंतिम सामन्यात हसिए सुवेई आणि एलिस मेर्टेस यांनी एइलेना ओस्टापेंको आणि लुडमिला किचेनॉव या जोडीला 6-1, 7-5 असे हरवले. आणि मिश्र दुहेरीत अजिंक्यपद मिळवताना सु वेई आणि यान झिएलिन्सकी या जोडीनं डिझायरे कॅवॅकझिक आणि नील स्कुपस्की यांना 6-7, 6-4, 11-9 असे पराभूत केले.

आता यंदाच्या आगामी फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन स्पर्धात कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता टेनिस चाहत्यांना असेल कारण आता स्पर्धा तीन-चार खेळाडूंपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्या खरोखरच खुल्या झाल्या आहेत आणि त्यामुळंच त्यांची आतुरतेनं वाट पाहतील.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: क्रीडा टेनिस यानिक सिनर ऑस्ट्रेलियन ओपन मेन्स सिंगल्स jannik sinner australian open sports a s ketkar Load More Tags

Add Comment