भारताच्या इतिहासातील 'टिळकपर्वा'चे मनोज्ञ दर्शन

टिळकांच्या जीवनातील 1914 ते 1920 या कालखंडाचा आढावा अरविंद व्यं. गोखले यांनी 'टिळकपर्व' या पुस्तकात घेतला आहे, त्याचा हा परिचय..

टिळकांवर आजही ब्राह्मणी पक्षपाताची टीका करणारे अनेक जण सापडतात. प्रत्यक्षात त्यांनी 1 जून 1920 ला कॉंग्रेस लोकशाही पक्षाचे जे उमेदवार जाहीर केले आहेत, त्यांवर नजर टाकल्यास त्या यादीत, जमनादास मेथा, राजाराम तुकाराम सावे (मराठा राखीव), दौलतराव अप्पासाहेब मोहिते, वामन सीताराम मुकादम, वासुदेव बापू अकूत, शेठ हिरालाल रामलाल नाईक अशी नावे आहेत. त्यांचा कटाक्ष हा नक्कीच होता की, विधिमंडळासाठी जो उमेदवार उभा केला जाईल, तो किमानपक्षी शिक्षित असावा. त्यामुळेच या यादीत डॉक्टर, वकील अशी नावे जास्त दिसतात. त्यांचे एक वाक्य आजही ऐकवले जाते, ‘विधिमंडळात शिंपी जाऊन काय कपडे शिवणार काय, कोष्टी कापड विणणार काय? होय, ते तसे म्हणालेही, पण त्याआधी त्यांनी ‘ब्राह्मण विधिमंडळात जाऊन काय घंटा वाजवणार की पूजाअर्चा करणार?’ असेही म्हटले होते.

अलीकडच्या काळात महत्त्वाच्या पुस्तकांकडे दुर्लक्ष होत आहे का? की ते जाणूनबुजून केले जात आहे? की यामागे काही एक हेतू आहे? असे प्रश्न कधी कधी पडतात. ‘शोध... गांधी नेहरू पर्वाचा’ या पुस्तकाबाबत आपण यापूर्वी पाहिले आहे. तितकेच महत्त्वाचे पुस्तक त्यानंतर सहाच महिन्यांनी, मार्च 2022 मध्ये प्रकाशित झाले आणि त्याच्याही दोन आवृत्त्या आजवर निघाल्या असून, तिसरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ते पुस्तक म्हणजे संपादक, लेखक अरविंद व्यं. गोखले यांनी लिहिलेले ‘टिळकपर्व’.

लोकमान्यांची मंडालेहून सुटका झाली त्यानंतरच्या जीवनातल्या, म्हणजे 1914 ते 1920 मध्ये त्यांचे देहावसान झाले तेव्हांपर्यंतच्या, आठ वर्षांच्या कालखंडाचे चित्रण करून गोखले यांनी त्याला ‘टिळकपर्व’ हे नाव दिले. याआधी टिळकांच्या जीवनातील 1908 ते 1914 या आधीच्या आठ वर्षांच्या कालखंडाचा आढावा त्यांनी ‘मंडालेचा राजबंदी' या पारितोषिकपात्र पुस्तकात घेतला होता. त्यामुळे लोकमान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या अखेरच्या केवळ त्यांच्याच नाही, तर देशाच्याही दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा कालखंडाबाबत लिहिण्याची ओढ त्यांना लागली. सहा वर्षांच्या श्रमपूर्वक संशोधन, आणि कठोर मेहनतीनंतर त्यांनी आवश्यक सामुग्री जमवून हा ग्रंथ पूर्ण केला आहे.

ग्रंथाच्या नावाबद्दल सदानंद मोरे म्हणतात, “टिळकांच्या मंडालेतील कारावासाच्या काळातील भारताच्या इतिहासाला (गोपाळराव) ‘गोखलेपर्व’ म्हणावे एवढे कर्तृत्व गोखल्यांचे होते, यात संशय नाही... ...1914 ते 1920 या काळातील इतिहास ‘टिळकपर्व’ तर आहेच, परंतु ते ठसठशीतपणे डोळ्यात भरावे असेही आहे. त्यामुळे अरविंद गोखले यांचे हे नामकरण यथार्थच आहे. ते पुढे म्हणतात, “या कालखंडातील टिळकांचा कॉंग्रेसप्रवेश होण्यापूर्वीचा काही काळ सोडला, तर टिळक हे तेव्हाच्या भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे सेनापतीच होते, असे कोणतीही अतिशयोक्ती न करता म्हणता येते आणि त्यांच्या काँग्रेसप्रवेश करण्याच्या धडपडीच्या काळातसुद्धा साऱ्या देशाचे लक्ष टिळक आता काय करणार, याकडेच लागले होते, त्यामुळे त्याही काळाचा समावेश टिळकपर्वात करता येतो. प्रस्तावनेनंतर ‘सूर्याय नमः’ हे लेखकाचे मनोगत आहे.

‘टिळकपर्व’ची तेरा प्रकरणे आहेत. नंतर संदर्भग्रंथ सूची आणि शेवटी शब्द सूची. प्रकरणांची छोटी नावेही अर्थपूर्ण आहेत. पुरुषसिंह, दिव्यत्वाची प्रचिती, द्वंद्व समास : टिळक आणि गोखले, रहस्य गीतेचे, तिसरा राजद्रोह, लखनौचा भाग्योदय, स्वराज्याचा रथ, असंतोषाचे जनक, चिरोल खटला, विलायतेत टिळक, मायदेशी आगमन, संन्याशाचा खेळ नाही आणि शेवटच्या प्रकरणाला देव देवाघरी गेला, असे नाव आहे.

लेखकाने मनोगताला ‘सूर्याय नमः’ असे नाव दिले, यावरून त्याचा टिळकांप्रतीचा आदरभाव दिसतो. यात ग्रंथ कशा प्रकारे सिद्ध झाला ते सविस्तर सांगितले आहे. शोधमोहिमेतील काही अनुभवांचे वर्णनही आहे. तसेच आधीच्या टिळकचरित्राच्या लेखकांच्या, म्हणजे अगदी न. चिं. केळकर, धनंजय कीर इत्यादींच्याही टिळकचरित्रांतील काही गफलती सप्रमाण दाखवून दिल्या आहेत, हे महत्त्वाचे.

लेखन संशोधनाबाबत ते किती खबरदारी घेतात ते एका प्रसंगावरून कळते. ते लिहितात : ‘हैदराबाद (सिंध) येथे टिळकांचे नाव असलेला एक भाग आहे. त्याला ‘टिळक इन्क्लाइन’ असे म्हणतात. ते वाचल्यावर दिलीप माजगावकर म्हणाले, “तुम्ही सांगताय की, टिळक शंभर वर्षापूर्वी सिंध हैदराबादमध्ये जेथे गेले होते, त्या भागाला टिळक इन्क्लाइन म्हणतात. हे बरोबर आहे. पण त्याचा पुरावा आपल्याकडे विचारला जाऊ शकतो”. मी म्हटले, “अगदी बरोबर आहे”. मग मी त्या भागाच्या ताज्या छायाचित्राच्या मागे लागलो. माझे स्नेही आणि साहित्याला वाहिलेल्या ‘आज’ या कराचीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकाचे संपादक अजमल कमाल यांच्याकडे ई-मेलने विचारणा केली. त्यांनी स्वतः हैदराबादेत जाऊन त्या भागातल्या दुकानांच्या पाट्यांवर ‘टिळक इन्क्लाइन’ असे जिथे लिहिले आहे, त्याची अस्सल छायाचित्रे पाठवून दिली. अजमल यांची कमाल अशी की, त्यांनी हैदराबादेत जाऊन त्या भागाचे मूळ नाव काय हेही शोधून काढले. त्याला आधीच्या काळात म्हणजे 1920 च्या पूर्वी ‘टपाल इन्क्लाइन’ असे म्हणत. त्या जागेच्या शेजारीच हैदराबाद टपाल कार्यालय (पोस्ट) होते. तेव्हा आता आणखी काही आरसा दाखवायची गरज आहे, असे वाटत नाही.’

‘ॐ सूर्याय नमः’ या मनोगतात लेखक पुढे सांगतो: ‘आणखी एक बाब म्हणजे टिळकांवर आजही ब्राह्मणी पक्षपाताची टीका करणारे अनेक जण सापडतात. प्रत्यक्षात त्यांनी 1 जून 1920 ला कॉंग्रेस लोकशाही पक्षाचे जे उमेदवार जाहीर केले आहेत, त्यांवर नजर टाकल्यास त्या यादीत, जमनादास मेथा, राजाराम तुकाराम सावे (मराठा राखीव), दौलतराव अप्पासाहेब मोहिते, वामन सीताराम मुकादम, वासुदेव बापू अकूत, शेठ हिरालाल रामलाल नाईक अशी नावे आहेत. त्यांचा कटाक्ष हा नक्कीच होता की, विधिमंडळासाठी जो उमेदवार उभा केला जाईल, तो किमानपक्षी शिक्षित असावा. त्यामुळेच या यादीत डॉक्टर, वकील अशी नावे जास्त दिसतात. त्यांचे एक वाक्य आजही ऐकवले जाते, ‘विधिमंडळात शिंपी जाऊन काय कपडे शिवणार काय, कोष्टी कापड विणणार काय? होय, ते तसे म्हणालेही, पण त्याआधी त्यांनी ‘ब्राह्मण विधिमंडळात जाऊन काय घंटा वाजवणार की पूजाअर्चा करणार?’ असेही म्हटले होते.

सध्या सोयीचेच राजकारण चालू असल्याने प्रत्येक जण टिळक हा विषयसुद्धा जातीजमातीच्या भिंती उभ्या करण्यासाठीच वापरतो आहे. त्यांनी खिलाफतीच्या संदर्भात लिहिलेल्या एका स्फुट सूचनेत म्हटले होते की, नव्या कायदे कौन्सिलच्या जागा ठरविताना शिया-सुन्नी हा मुसलमानांतील भेद प्रत्येकाला निराळ्या जागा राखून ठेवून दृढ करण्यात आला नाही, याबद्दल काही मुत्सद्द्यांना हळहळ वाटत आहे. याकडे लक्ष दिले म्हणजे सध्याचा हा बुद्धिभेद मुद्दाम वाईट हेतूने कसा आणि कोणाकडून केला जात आहे, हे सहज सर्वाच्या लक्षात येईल.’ या संदर्भात लेखकाने दिलेले धोंडीराम कासीराम सगट यांचे पत्र आवर्जून बघायला हवे.


हेही वाचा : लोकमान्य टिळक: जीवननिष्ठा आणि लेखनशैली - सोमनाथ कोमरपंत


याशिवाय लेखकाने ‘केसरी’च्या जुन्या अंकांतील अग्रलेख, बातम्या इ.चा सढळ वापरही केला आहे. टिळकांना ‘लोकमान्य’ कधी आणि कोणी म्हटले याबाबत तो म्हणतो, “1905 मध्ये विजयादशमीला एका कार्यक्रमात दुर्गाबाई जोशी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्यावेळी महादेवशास्त्री ओक यांनी संस्कृत श्लोक वाटले, त्यात ‘इति साध्यक्ष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मुदिश्य’ असा उल्लेख आहे. कदाचित तो अण्णासाहेब पटवर्धन यांच्या पाहण्यात आला असावा आणि त्यांनी ‘लोकमान्य’ असा उल्लेख टिळकांच्या वाढदिवशी केला असावा, असेही मानतात. ‘भाला’कार भोपटकर (जे स्वतःला टिळकांचा घट्ट, लठ्ठ, आणि मठ्ठ शिष्य म्हणत) यांनीही एका लेखात त्यांचा उल्लेख ‘लोकमान्य’ असा केला. तेव्हापासून त्यांना असे ओळखण्यात येऊ लागले, असेही म्हणतात. पण हिरा हा हिरा असतो. त्याला तसे सर्वप्रथम कोणी म्हटले याला जसा काही अर्थ नाही, तसेच काहीसे हेही आहे” प्रस्तावना व लेखकाचे मनोगत हे ग्रंथाला पूर्णत्व देणारे आहे. त्यामुळे ते वाचायलाच हवे.

‘पुरुषसिंह’ हे प्रकरण काहीसे पूर्वावलोकनाचे. त्यात 1908 ते 1914 या कालखंडातील टिळक आणि देशातीलही महत्त्वाच्या घटनांचा समावेश आहे. ही ग्रंथाची पूर्वपीठिकाच. कारण ती वाचल्यानेच पुढील भाग वाचताना अडखळल्यासारखे वाटत नाही. टिळकांना मंडालेच्या तुरुंगातच आणखी काही काळ ठेवण्याची गरज आहे, असे सिद्ध करण्याची खटपट इंग्रजांनी चालवली होती. नवा राजा गादीवर बसण्याच्या वेळी त्यांच्या सुटकेचा मुहूर्त निघत होता. पण तो हुकला. टिळकांची सुटका होऊ नये यासाठी तेव्हाचा मुंबईचा गव्हर्नर सिडनहॅम यांने प्रयत्नांची शिकस्त केली. मराठी मुलखातल्या काही संस्थानिक, राजकीय पुढाऱ्यांना त्याने हाताशी धरले होते. शेवटी टिळक मंडालेच्या अतिदुर्धर अशा गुहेतून बाहेर पडलेले पुरुषसिंह होते. सुटकेनंतर भारतात त्यांचे प्रचंड स्वागत झाले, त्यांना पाहण्यासाठी गायकवाडवाड्यासमोर मोठमोठ्या रांगा लागल्या. जनतेचे हे प्रेम पाहिल्यामुळे टिळकांना वाटले, आणखी काय हवे? सारा समाज आपल्यासमवेत असेल, तर भीती कशाची? आता आयुष्याच्या अखेरपर्यंत मी लढतच राहीन, ही त्यांची जिद्द होती.

नंतरच्या प्रकरणात पहिल्या महायुद्धाच्या काळातील टिळकांची मते आणि कृती याबाबत विवेचन आहे. याच काळात टिळकांनी ‘हिंदी स्वराज्य संघा’ची स्थापना केली आणि त्याचा पहिला वाढदिवस नाशिक येथे 17 व 18 मे रोजी प्रांतिक परिषदेच्या मांडवात पार पडला. त्याच बैठकीत चिटणिसांनी संघाच्या कामाचा अहवाल सादर केला. तोपर्यंत सभासदांची संख्या 14 हजार 218 होती. त्यात 42 टक्के ब्राह्मण, 43 टक्के ब्राह्मणेतर होते. मुसलमान 309 तर पारशी 11 व 67 महिला होत्या. टिळकांना एकाच जातीचे पुढारी ठरवणाऱ्यांनी यापासून काही बोध घेतला पाहिजे, असे लेखक म्हणतो. तिसरे प्रकरण टिळक आणि गोखले यांच्यातील मतभेदाबाबत आहे. या दोघांमधील वाद टोकाला जाऊन पोहोचला, तरी गोखले यांच्याकडून चांगले काम झाल्यानंतर टिळक त्यांचा गौरवच करत. पण गोखले मात्र टिळकांच्या कर्तृत्वाला क्वचितच मान देत. असे का याला बरीच कारणे आहेत, पण यामुळेच टिळक आणि गोखले हा महाराष्ट्रात ‘द्वंद्व समास’ बनला असे लेखक म्हणतो.

राजकीय उन्नतीसाठी गोखल्यांनी ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया’ सोसायटी स्थापन केली, पण ते राजकीय कारणासाठी, औद्योगिक बहिष्काराचे शस्त्र हाती घ्या, असे सांगताना कचरत. उलट आपल्या स्वदेशीच्या धोरणाला पूरक म्हणून टिळकांनी मनमोहनदास रामजी आणि जमशेदजी टाटा यांच्या सहकार्याने या देशाच्या इतिहासातला पहिला स्वदेश फुटकळ (रिटेल) व्यापार सुरू केला, हे विसरून चालणार नाही. औरंगाबाद तुरुंगात लिहिलेल्या दैनंदिनीत जवाहरलाल नेहरू यांनी टिळकांबाबत म्हटले आहे की, ‘त्यांच्याकडे आकर्षित करून घेता येण्याजोगे असामान्य असे व्यक्तिमत्त्व आहे. जाणूनबुजून केलेल्या गोष्टीचे ओझे ते कधीही बाळगत नाहीत. गोखल्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहताना टिळक म्हणाले, “त्यांच्यासारखे होण्याचा आपण अखंड प्रयत्न करत राहू, तर त्यांना परलोकांत खात्रीनेच आनंद वाटेल.” आणि नंतर त्यांनी लिहिलेला मृत्युलेख अगदी गोखलेप्रेमींनीही वाचला, त्या सर्वानी टिळकांच्या माणुसकीचा आणि त्यांच्या दुसऱ्याच्या मोठेपणाला दाद द्यायच्या वृत्तीचा यथार्थ गौरव केला.

‘रहस्य गीतेचे’ हे पुढील प्रकरण ‘गीतारहस्य’ या महान ग्रंथाच्या जन्मकथेपासून, त्याच्यावरील टीका, आक्षेप आणि त्याची थोरवी सांगणारे आहे. टिळक मंडालेहून परतले, तेव्हा तेथे त्यांनी शिसपेन्सिलीने लिहिलेल्या या ग्रंथाच्या वह्या ब्रिटिशांनी ठेवून घेतल्या होत्या. तात्यासाहेब केळकरांनी त्यांना विचारले, “तुमच्या वह्या त्यांनी परत केल्याच नाहीत तर काय?” त्यावर टिळक म्हणाले होते, “सरकारने समजा नाही वह्या दिल्या, तर मी सिंहगडावर जाऊन एक महिनाभर राहीन आणि सगळे गीतारहस्य परत लिहून काढीन.” लेखक म्हणतो, ‘हा आत्मविश्वास लोकमान्यांचा होता.’ मंडालेतच 2 नोव्हेंबर 1910 रोजी या ग्रंथाच्या लेखनाला सुरुवात करून त्यांनी तो 30 मार्च 1911 रोजी पूर्ण करून सविस्तर प्रस्तावना लिहिली आणि अनुक्रमणिका, समर्पण हेही त्याबरोबरच पुरे केले. कोणत्या मजकुरापुढे कोणता मजकूर घ्यायचा हेही त्यांनी लिहिले होते. लेखक म्हणतो, याचा अर्थ त्यांना आपण तुरुंगातून जिवंत बाहेर पडू की नाही, याची खात्री नव्हती.

मात्र, या ग्रंथात सरकारविरोधी काहीही लिखाण नाही, या ‘ओरिएन्टल ट्रान्स्लेटर’कडून आलेल्या नोंदीनंतर टिळकांना त्यांच्या हस्तलिखित वह्या परत मिळाल्या. हस्तलिखितात कोणताही दोष राहू नये म्हणून त्यांनी ते कृ. प्र. खाडिलकर आणि रघुनाथ हरी भागवत यांच्याकडून तपासून घेतले. आवश्यक प्रक्रियेनंतर ग्रंथाची छपाई सुरू झाली. नंतर ‘विक्रीस तयार.. विक्रीस तयार’ अशा मथळ्याने त्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडाली. गोविंदाग्रजांनी या ग्रंथाची महती ‘श्रीमहाराष्ट्रगीता’त सांगितली आहे. ते म्हणतात,
‘देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ 
तिथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ’

‘लोकसंग्रह’ ही संज्ञा गीतेत तिसऱ्या अध्यायात आली आहे. टिळकांनी तिचा उल्लेख करून ती ओळ दिली आहे. ‘लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि।।’ या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, लोकांचा संग्रह करणे म्हणजे त्यांस एकत्र संबद्ध करून त्यांच्या परस्पर अनुकूल्याने जे सामर्थ्य प्राप्त होते ते त्यांच्या अंगी येईल. अशा रीतीने त्यांचे पालनपोषण किंवा नियमन करणे आणि तद्वारा त्यांची सुस्थिती कायम ठेवून पुढे त्यांस श्रेयप्राप्तीच्या मार्गास लावणे. आपली कर्मे त्यांनी निष्काम बुद्धीने कशी करावीत याचा लोकांना प्रत्यक्ष धडा घालून देणे, असा ‘लोकसंग्रह’ या गीतेतील पदाचा अर्थ सांगितला आहे. याच वृत्तीतून त्यांना स्वराज्याचा वन्ही चेतवला आणि व्यक्तिशः स्वतःवर आलेल्या कोणत्याही संकटाचा बाऊ न करता, उलट त्याचा अधिकाधिक फायदा घेत जी धडाडी दाखवली, ती अपूर्वच होती असेही लेखक म्हणतो.

यानंतर टिळकांवर पुन्हा एकदा राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. बेळगाव, अहमदनगर येथील भाषणे ‘124 अ’ या कलमाखाली राजद्रोहाच्या खटल्यास पात्र आहेत असा निष्कर्ष सरकारी पातळीवर काढण्यात आला.

टिळकांच्या साठीच्या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हादंडाधिकाऱ्याची नोटीस घेऊन डेप्युटी इन्स्पेक्टर गायडर हे कार्यक्रमस्थळी, गायकवाड वाड्यात हजर झाले. वाढदिवसाचे कार्यक्रम लवकर आटोपण्याची टिळकांची आज्ञा होती. पोलीस अधिकारी नोटीस घेऊन आल्याचे सांगण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “या शुभदिनी सरकारने ही भेट पाठवावी, याचा मला आनंद आहे. सरकारचाही काहीतरी आहेर हवाच होता. ‘नवे वर्ष नवे संकट’ हेच खरे.”

टिळकांना खरे तर 29 जुलैला न्यायालयात हजर राहायचे होते. हा अधिकारी पाच दिवस थांबू शकला असता. पण इंग्रजांना तेवढी कदर नव्हती. टिळकांना मात्र याची कल्पना गायडरच्या मुलीनेच पत्र लिहून दिली होती.

या खटल्यासाठी आपल्यातर्फे बॅ. जीना यांना उभे करण्याआधी टिळकांनी जीनांना सूचना केली, ‘माझा बचाव करताना कायद्याच्या ओढाताणीकडे दुर्लक्ष करा असे मी सांगत नाही, पण हा खटला टिळकांवर आहे आणि त्यात मॅजिस्ट्रेट हे खरे न्यायाधीश नसून माझे देशबांधव हे खरे न्यायाधीश आहेत, हे लक्षात घ्या. मला त्यांची खात्री पटवायची आहे. मॅजिस्ट्रेटची नाही. खटल्यापासून लोकांना शिक्षण मिळून चार-दोन पावले राष्ट्रीय प्रगती झाली, तरच या खटल्याचे चीज आहे, अन्यथा नाही. यावरून टिळकांची संकटातूनही लाभ मिळवण्याचा प्रयत्न करण्याची वृत्ती जाणवते. या तिसऱ्या राजद्रोहाच्या खटल्यातून टिळक दोषमुक्त झाले. देशात आनंदाची लाट पसरली.


हेही वाचा : टिळकांचा शेवटचा वाढदिवस आणि अखेरचं आजारपण -  अ. के. भागवत, ग. प्र. प्रधान


नंतरचे प्रकरण ‘लखनौचा भाग्योदय’. मुंबईच्या उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर यामुळे त्यांची पुढली वाटचाल अधिक सुकर झाली. लवकरच येणाऱ्या लखनौ काँग्रेससाठी टिळकांना मनुष्यबळ हवे होते, ते त्यांनी कर्नाटक या त्यांच्या बालेकिल्ल्यातील गदग, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. ठिकाणी जाऊन साध्य केले. बेळगावला दौऱ्यातील शेवटचे भाषण करून ते पुण्याला परतले. सर्व ठिकाणी त्यांनी महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्या. लखनौ काँग्रेस त्यांच्या दृष्टीने स्वराज्यासाठी निकराचा लढा उभारण्याची अपूर्व संधी होती. कर्नाटकातल्या स्वपक्षीयांना त्यांनी प्रतिनिधी म्हणून निवडून येण्याची सूचना केली. टिळक महाराष्ट्राबाहेर लोकमान्यच नव्हे, तर भगवान टिळक, महात्मा टिळक म्हणून ओळखले जात. ते देशाचे अनभिषिक्त सम्राट बनले होते. जाताना खास आगगाडी ‘होमरूल स्पेशल’ नावाने निघाली. तिला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद लाभला. लोक टिळकांच्या दर्शनासाठी, त्यांचे बोल ऐकण्यासाठी आतुरले होते. लखनौला त्यांचे स्वागत कसे झाले ते मुळातूनच वाचायला हवे. या काँग्रेसमध्ये गांधींना प्रथमच विषय नियामक समितीत प्रवेश मिळाला. या अधिवेशनापाठोपाठ लखनौमध्येच हिंदू महासभा आणि मुस्लीम लीगचेही अधिवेशन झाले. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच’, ही प्रसिद्ध घोषणा टिळकांनी प्रथम लखनौलाच केली. या प्रकरणात टिळकांच्या लखनौ भेटीची जी हकीकत देण्यात आली आहे, ती पाहता त्याचे नामकरण किती योग्य आहे, हे उमगते.

इंग्रजांनी टाकलेले जाळे त्यांच्याच दिशेने उलटवून त्यांची कोंडी करण्याचे अप्रतिम आणि वादातीत कौशल्य टिळकांकडे होते. गांधीजींनी चले जाव चळवळ 1942 मध्ये सुरू केली असली, तरी त्याची सुरुवात टिळकांनी लखनौमध्ये 29 डिसेंबर 1916 रोजी ‘जनसामान्यांच्या हाती सत्ता सोपवून तुम्ही चालते व्हा’ या घोषणेने केली, हे लेखक दाखवून देतो.

टिळकांच्या त्या सिंहगर्जनेने इंग्रजांच्या मनात धडकी भरली. कारण संपूर्ण स्वराज्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार त्यातून प्रकट झाला होता. ब्रिटिशांच्या अव्यापारेषु व्यापाराला दिलेले हे चोख उत्तर होते. लखनौनंतरच्या त्यांच्या दौऱ्यात पाहावे तिकडे मानवी पूरच होता. कानपूरला सारे वातावरण टिळकमय होते. लखनौ कराराद्वारे मुस्लीम लीगला मुस्लिमांचा अधिकृत प्रवक्ता ही मान्यता मिळवून दिल्याने टिळकांवर टीका झाली. पण ‘अ‍ॅडव्होकेट’ या वृत्तपत्राचे संपादक सी. एस. रंगा अय्यर यांनी याबाबत म्हटले, “कोणाची काहीही टीका होवो, टिळक अगदी ठाम होते. केवळ या एकाच तडाखेबंद कारवाईने त्यांनी मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात खेचून आणले. हा दणका इतका तीव्र होता की, ब्रिटिश सत्ताधारी सैरभैर झाले होते. त्यांच्या ‘फोडा आणि झोडा’ धोरणाचे डोके लखनौच्या वेशीवर फुटले होते. स्वाभाविकच ‘असेल नशिबात तर आताच’ (लक नाऊ इन लखनौ) या दृढनिश्चयाने टिळकांनी पुढल्या दमदार पावलांची आखणी केली.” या कराराने मुस्लिमांना 33 टक्के आरक्षण मिळाले त्यामुळे तो समाज खुश होता. प्रत्येक मुस्लिमाच्या तोंडी ‘वंदे मातरम’चा घोष होता. लीगने जे दिले नाही, ते टिळकांनी मिळवून दिले, हे मुस्लिमांना स्पष्ट उमगले होते. त्यांच्या मनात स्वराज्यासाठी एकत्रित संघर्ष करण्याचा विचार खोलवर रुजला, अर्थात यात जीनांचाही हातभार होता. मुसलमानांसारख्या मोठ्या समाजाला दूर ठेवल्याने, स्वातंत्र्य दारात असताना त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत आणि त्यातून देश दुभंगण्याचा धोका आहे, हे टिळकांनी ओळखले होते. समाजाची फाळणी म्हणज देशाची फाळणी असे ते मानत. म्हणूनच थोडे झुकते माप देऊन त्यांनी मुस्लिमांना आपलेसे केले आणि लखनौ करार घडवून आणला. त्यामुळे हिंदू-मुस्लीम यांच्या ऐक्याने आपल्या साम्राज्याला धोका निर्माण होण्याची भीती ब्रिटिशांना वाटू लागली होती.

याच काळात टिळकांनी पंजाब भेटीचा निर्णय घेतला. पण त्यांना दिल्ली आणि पंजाबमध्येही प्रवेश करण्याची बंदी जारी करण्यात आली. माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर 9 जुलै 1918 च्या केसरीच्या अंकात टिळकांनी ‘उजाडले पण सूर्य कोठे आहे?’ हा त्या सुधारणांची चिरफाड करणारा अग्रलेख लिहिला. इंग्रजांच्या बेछुट कारवाया सुरू होत्या तशी टिळकांच्या लेखणी भट्टीत तापलेल्या सळईप्रमाणे ठिणग्या उधळत होती.. त्यापूर्वी स्वराज्याचा आवाज विलायतेत बुलंद केल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा निश्चय करून टिळक एप्रिल महिन्यातच विलायतेला जायला निघाले. प्रथम मद्रासहून कोलंबोला ते गेले पण त्यांना पासपोर्ट रद्द करण्यात आल्याने तेथूनच परतावे लागले. त्यांना लंडनला पोहोचू देणे धोक्याचे वाटल्याने त्यांचा पासपोर्ट रद्द केला गेला. पण त्यामुळे टिळकांच्या धोरणात बदल झाला नाही, उलट त्यांनी अधिक जोमाने आक्रमक अग्रलेख लिहिले. अखेर ते 19 सप्टेंबर 1918 ला विलायतेला रवाना झाले, आणि 30 ऑक्टोबरला लंडनला पोहोचले.

पुढचे प्रकरण ‘असंतोषाचे जनक’ हे आहे. खरे तर ‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’ लिहून बदनामी करणाऱ्या व्हॅलेंटाइन चिरोलवर खटला दाखल करण्यासाठी ते लंडनला गेले होते. मात्र लोकांना हे बिरूद गौरवणारे म्हणून अभिमानाचे वाटले. तेच लोकमान्यांची ओळख बनले. चिरोलच्या बदमाशीचे वर्णन लेखकाने प्रभावी केले आहे. टिळकांवर अनेक अटी लादण्यात आल्या. त्या केवळ मान्य या शब्दात टिळकांनी स्वीकारल्या. चिरोल प्रकरणाची सुनावणी 29 जानेवारी 1919 रोजी रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसच्या किंग्ज बेंचपुढे चालणार होती.

या साऱ्याचे वर्णन ‘चिरोल खटला’ या प्रकरणात सविस्तर केले आहे. त्यातील प्रश्नोत्तरे मुळातूनच वाचण्यासारखी. टिळकांचे बुद्धिचातुर्य त्यात दिसते. मात्र 11 दिवस चाललेल्या खटल्याचा निकाल टिळकांविरुद्धच गेला. निकाल काहीही लागला तरी आपण आपले काम चिकाटीने पुढे चालू ठेवायचे, हे त्यांनी अगोदरच ठरवले होते. ब्रिटिश न्याय आपल्याला महाग पडल्याचे त्यांनी खापर्डे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले. पण नंतर खापर्डे यांनाच ‘हा निकाल तुम्ही एवढा मनाला लावून घेऊ नये’ असे सांगितले आहे. याच पत्रात ते पुढे म्हणतात, ‘एखाद्या व्यक्तीचे खासगी आयुष्य आणि त्याचे राजकीय विचार या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, हे ब्रिटिश न्यायाधीश आणि ज्यूरी यांना समजू शकलेले नाही.’ ‘थांबला तो संपला’ हे तत्त्व ओळखल्याने थांबून चालणार नाही हे त्यांना पटले होते. म्हणूनच या खटल्याच्या विरोधात अपील न करण्याचा निर्णय घेतला.

चिरोल खटला हे निमित्त होते. त्यानंतर काही काळ टिळक विलायतेतच राहिले. त्यांनी तेथे अगदी सामान्य माणसालाही भारत कोठे आहे, ब्रिटिशांनी त्याला कसे लुटले हे समजावून दिले. भारताबाबत आस्था बाळगणाऱ्या संपादकांपुढे मायदेशातील परिस्थितीचे विदारक पण खरेखुरे चित्र ठेवले. मात्र पॅरिसमधील परिषदेला उपस्थित राहण्याची परवानगी ब्रिटिशांनी नाकारली. इंग्लंडमधल्या सर्व राजकीय नेत्यांशी त्यांनी समन्वय साधला. लिबरल आणि लेबर नेत्यांना कम्युनिस्टांच्या सभेत बसायला भाग पाडले, तेथे मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या या प्रयत्नांना महत्त्व आले. त्यांनी होमरूलच्या मागणीची अनेक पत्रके प्रसिद्ध केली. सभांतून वाटली. वृत्तपत्रांच्या कचेऱ्यांत पोहोचवली.

चौदा महिन्यांनंतर नोव्हेंबर 1919 ला त्यांचे मायदेशी आगमन झाले. त्यानंतर त्यांनी झपाटल्यासारखे काम सुरू केले. केसरीसाठीही त्यांनी बरेच प्रयत्न केले. देवनागरी टाइप सुधारणेच्या खटाटोपात निर्णयसागर, भाऊशास्त्री लेले आणि द. कृ. देवधर यांचे नाव घेतले जात असे. त्यात टिळकांचेही नाव जोडले गेले. त्या काळात त्यांना अमृतसरच्या काँग्रेसचे वेध लागले होते. बंदी हुकूम असूनही ते तेथे गेले. तेथे ‘ब्रिटिशांकडून मिळेल ते स्वीकारा आणि जास्तीसाठी प्रयत्न करा’ असे त्यांनी सांगितले. त्यांना मुंबईतून इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित करायचे होते. तशी जाहिरातही त्यांनी प्रसिद्ध केली होती. पश्चिम आणि मध्य भारत खंडात सायंकाळी निघणारे एक दैनिक आवश्यक आहे, असे वाटल्याने आपण हा उपक्रम हाती घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्य म्हणजे त्यात दर शुक्रवारी मुस्लिमांसाठी जादा पत्रक काढण्याची त्यांची योजना होती. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही योजना साकार झाली नाही. त्यांनी 1920 च्या जून महिन्यात म्हटले होते, “वृद्धावस्थेमुळे माझ्या सर्व शक्ती क्षीण होत चालल्या आहेत. आता कोणतेही नवे काम अंगावर घ्यायचे की नाही, हे जनतेने माझ्यावर सोपवावे हे उत्तम.” अनेक अडचणी आल्यावरही त्यांनी असे उद्गार कधी काढले नव्हते. मग आता ते का काढले असावे, असा प्रश्न लेखकाला पडतो. अगदी शेवटच्या काळात तर ते 1818 मध्ये काय घडले आणि 1918 मध्ये असे घडले अशी इतिहासाची मांडणी करत होते. इतिहासाच्या शंभर वर्षांमध्ये आपली गुलामगिरी काही हटली नाही, हेच त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यांना स्वराज्याच्या ध्यासाने पछाडले होते. आपल्याला जोपर्यंत स्वराज्य मिळत नाही, तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती होणार नाही, असेही ते आपल्या शेवटच्या श्वासाबरोबर म्हणत होते.

‘देव देवाघरी गेला’ या अखेरच्या प्रकरणात टिळकांच्या शेवटच्या दिवसांचे वर्णन आहे. आणि ते लेखकाने वाचकाला गलबलून यावे, अस्वस्थ वाटावे एवढे परिणामकारक केले आहे. या ग्रंथात संदर्भग्रंथ आणि सूचीप्रमाणे सनावली दिली असती तर अधिकच चांगले झाले असते.

लोकमान्य टिळक म्हटलं की लोकांना आठवतं त्यांचं प्रसिद्ध प्रचलित असलेलं वचन ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच.’ पण यात थोडी गफलत आहे. खरं म्हणजे ते वाक्य असं आहे, ‘स्वराज्य हे माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच.’ (असंच महाभारतातलं दुर्योधनाचं वाक्यही प्रचलित आहे. तो पांडवांना सांगतो की, ‘सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनही मी देणार नाही.’ खरं तर ते आहे, ‘सुईचं अग्र राहील एवढीही जमीन मी तुम्हाला देणार नाही.’) म्हणून ‘टिळकपर्व’मध्ये लेखक अरविंद गोखले यांनी म्हटलंय की, ‘टिळकांकडे हक्क होताच, (म्हणजेच तो मागण्याची त्यांना आवश्यकता नव्हती.) त्यांना हवं होतं स्वराज्य!’ अगदी सहजपणे त्यांनी चूक दाखवून दिली आहे. अशा या ग्रंथाकडे दुर्लक्ष का केले जात असावे, असा विचार केला की वाटते, हा दोन वेगळ्या मतांच्या वा विचारांच्या गटांमुळे झालेला प्रकार असावा. लोकमान्य टिळक यांनी हिंदूंचे गणपती उत्सव, शिवजयंती उत्सव असे उत्सव सुरू केले. त्यामुळे आणि गणपती, शिवजयंती अशा उत्सवांत त्यांनी वाद्ये वाजवण्यास आणि मोठ्या मिरवणुका काढण्यास सांगितले. (त्या काळात टिळकांनी अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या त्या काळात अतिशय धाडसाने केल्या होत्या. शिवजयंती उत्सवच काय पण कोणी मागणी केल्यास सम्राट अकबराचाही जन्मोत्सव साजरा करता येईल, असे त्यांनी म्हटले होते.) महाराष्ट्राबाहेरही या उत्सवाचा प्रसार करण्यावर भर दिला. त्यामुळे हिंदूंची एकजूट होण्यास मदत झाली असे काहींना वाटते. पण ते विसरतात की, त्याच वेळी टिळकांनी पोलीस अधिकाऱ्यापुढे दिलेल्या साक्षीत हिंदूंना मुसलमानांच्या मिरवणुकीतल्या वाद्यवादनाला किंवा मुसलमानांना हिंदूंच्या वाद्यांना आक्षेप घेता येणार नाही, असे स्पष्ट केले होते.

दुसऱ्या बाजूला तर काही जणांचे ठाम मत असे आहे की टिळकांनी मुस्लिमांचा अनुनय केला. यासाठी ते लखनौ कराराकडे बोट दाखवतात. पण त्यावेळी ते विसरतात की, या कराराच्या टिळकांनी केलेल्या समर्थनामुळे महमद अली जीना यांचा टिळकांविषयीचा आदर वाढला होता. त्यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात टिळकांनी म्हटले होते, “या करारामुळे मुसलमानांचे समाधान होऊन ते जर काँग्रेस पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागतच केले पाहिजे. या करारामुळे मुसलमानांचा हिंदुस्थानबाह्य ओढा कमी होईल, मग अशा स्थितीत त्यांचे उदार अंतःकरणाने स्वागत करायचे नाही तर काय करायचे?”

विशेष हे की लखनौमध्ये हे अधिवेशन होते त्याच तारखांना त्याच लखनौमध्ये मुस्लीम लीगचे आणि हिंदू महासभेचे अधिवेशन झाले. त्यात जीना यांनी जहाल, मवाळ नेमस्त, मध्यममार्गी असे कोणतेही गट उरले नसल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याच अधिवेशनात काँग्रेस पक्षाबरोबर झालेल्या कराराला अंतिम मान्यता देण्यात आली. लखनौ करारानंतर देशातील वातावरण इतके बदलले होते की, हिंदू आणि मुस्लीम यांचे दंगे थांबले. त्याआधीच्या काळात गायी पळवून नेण्यात येत आणि जमल्यास त्यांच्या घरासमोर गाय कापण्यात येई. पण या करारानंतर असे प्रकारही थांबले होते.

असे हे पुस्तक, वैयक्तिक मते काहीही असली तरी प्रत्येक मराठी माणसाने वाचावयासच हवे. तसे केल्यास टिळक म्हणजे काय प्रकारचे व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांना ‘टिळक महाराज’ असे का म्हटले जाई, ते नक्कीच उमगेल! 

टिळकपर्व : 1914-1920.
अरविंद व्यं. गोखले
राजहंस प्रकाशन आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
पाने : 465 ; किंमत : 500 रुपये.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


साधना प्रकाशनाचे 'लोकमान्य टिळक' हे पुस्तक साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

 

Tags: अरविंद गोखले लोकमान्य टिळक गीतारहस्य टिळक पर्व मराठी चरित्र टिळक चरित्र लोकमान्य टिळक मराठी साहित्य मराठी वाङ्मय Load More Tags

Comments:

Mohan Divekar

आपण केलेले पुस्तक परीक्षण वाचून पुस्तक मुळातून वाचण्याची उत्सुकता लागली आहे. अरविंद काकांच्या टिळक प्रेमाबद्दल मी काय सांगावे? तो त्याचा ध्यास आणि श्वास आहे. या वयातही त्याचा लिखाणाचा धडाका पाहिला की खरोखरच आश्चर्य वाटते. असंच सकस लिखाण त्यांच्याकडून लिहून व्हावे ही प्रार्थना!!!

Add Comment