हेचि काय फळ मम तपाला?

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतरचे एक राजकीय स्वगत

ntnews.com

काही महिन्यांतच एक नाही, तर चार राज्यांमध्ये निवडणुका आहेत. केवळ या स्मरणानंच आमच्यात नवचैतन्य येतंय. रक्त सळसळून वाहू लागलंय. त्यामुळं आता खचून न जाता त्या राज्यांत कोणते नवे सापळे लावायचे, डावपेच कोणत्या प्रकारचे करायचे, याबाबत पितृसंस्थेचं मार्गदर्शन आणि आदेश घ्यायला हवेत!

आम्ही अगदी निराश आहोत, उदास आहोत, खिन्न आहोत, निराश आहोत, रागावलो आहोत का सुन्न आहोत? काही म्हणजे काहीच कळत नाहीय. असं कसं व्हावं, का व्हावं असे विचार सतत छळत आहेत आणि उत्तरं मिळत नसल्यानं आमच्या नैराश्यात भरच पडतेय.

खरं तर यावेळी, या राज्याच्या निवडणुकीसाठी आम्ही नेहमीपेक्षा अधिक जोमानं, अधिक परिश्रम घेऊन आणि नेहमीप्रमाणेच मनापासून सारं काही केलं होतं. ज्या भागांमध्ये आमचा मागमूसही नाही, त्या दक्षिण देशात प्रवेश करण्यासाठी या निवडणुकीतील विजयानं आम्हाला संधी मिळेल या आशेवर आम्ही होतो. सर्वांनाही तसंच वाटत होतं. पाच वर्षांपूर्वी अमाप परिश्रम आणि पैसा खर्च करून आम्ही येथे बस्तान बसवलं होतं. त्यामुळेच सगळ्यांमध्येच मोठा उत्साह होता. आमचे सरसेनापती, सरदार, दरकदार आणि सैनिक यांच्याबरोबरच बाजारबुणग्यांचाही उत्साह प्रचंड होता. सर्वांची भावना अशी की आमचा विजय निश्चित आहे आणि निवडणूक हा केवळ उपचार आहे. काय होणार ते आधीच कळून चुकलं आहे. त्यावर शिक्कामोर्तब होण्याचंच बाकी आहे.

आणि असं वाटणं काही नवीन नव्हतं. गेली काही वर्षं हाच प्रकार चालला होता. आम्ही आणि निवडणुकीतील विजय हे समीकरण ठरल्यासारखंच झालं होतं. कारण निवडणूक, मग ती कुठलीही का असेना, निवडणूक म्हटलं की आम्हाला प्रचंड स्फुरण येतं. जणू आमचा जन्मच निवडणूक प्रचारासाठी झाला असावा असं वाटतं. त्यामुळे निवडणूक म्हटली की आम्हाला बाकी काही सुचेनासं होतं. निवडणूक तेवढं सत्य आणि बाकी सारं मिथ्या असंच वाटत राहतं. त्यामुळंच प्रचार, फक्त प्रचार, (अप) प्रचार आणि (अप) प्रचारच, हाच आमचा बाणा बनून राहतो. (काही दुष्ट लोक त्यामुळंच आम्हाला निवडणूकजीवी म्हणतात!) आमचे भक्तही अगदी वानरसेनेप्रमाणं (खरं म्हणजे त्या दोघांमध्येही काही फरक नाहीय.) काही म्हणजे अगदी काहीही करायला तयार असतात. पण तरीही नेहमीचं यश मात्र यावेळी आम्हाला सोडून गेलं याची हळहळ काही कमी होत नाहीय. तसं वाईट वाटतंय ते आमच्या अपयशामुळं नाही, तर आम्हाला सोडून यशश्री त्या पप्पूच्या मागं गेली याची टोचणीच जास्त लागून राहिलीय. अगदी जिव्हारी म्हणतात तशी जखमच झालीय म्हणा ना!

या यशश्रीसाठी आम्ही काय केलं नाही, ते विचारा. सारं काही केलं म्हणण्यापेक्षा काहीही करणं बाकी ठेवलं नव्हतं. अर्थात निवडणूक म्हटली की आमचं असंच होतं. बाकी काही सुचतच नाही. म्हणून आम्ही शक्य तेवढे जास्तीत जास्त दिवस या राज्यात काढले. अनेक कारणांनी अनेक दौरे (जवळजवळ सर्वच) सरकारी खर्चानं केले. उद्घाटनं, मेळावे, चर्चा, कोनशीला, पायाभरणी, प्रकल्पाचं लोकार्पण अशी ती कारणं अर्थातच अधिकृत दौऱ्यासाठी पुरेशी पण काही मिनिटांच्या त्या कामांसाठी करोडो रुपये खर्च झाले अशी टीका करणारे आहेतच. पण ते हे लक्षात घेत नाहीत की त्याच दौऱ्यात आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, शोभायात्रा काढल्या. त्यामुळं कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होत होता. याचं काहीच मोल नाही का? त्यांना त्यामुळे आणखीच चेव येत होता. ते मग वेगवेगळ्या कारणांनी ठराविक लोकांना त्रास देत होते, त्यांच्यावर नियम अटी लादत होते याला संबंधित अधिकारी, व्यवस्थापकांची साथ होतीच. कारण ती दिली नाही, तर आपली काही धडगत नाही हे त्यांना मनोमन ठाऊक होते. त्यामुळे ते निमूटपणं आमच्या इच्छेनुसार वागत होते. मुलींनी कोणता पोषाख करावा याचेही फतवे काढले जात होते, त्यामुळं आम्ही एकाच जमातीला छळतो असा आरोप नको हा हेतू होता पण महिलांना स्वातंत्र्य नको ही आमची विचारसरणी आहे, हेही आम्हाला पटवून द्यायचं होतं. जोडीला लहानसहान कुरबुरी केल्या जातच होत्या. गो-हत्या, ‘लव्ह जिहाद’च्या जोडीला आता ‘लँड जिहाद’चीही फोडणी देण्यात आली होती...

निवडणुका जाहीर होण्यापूर्वी अशा प्रकारं जबरदस्त वातावरणनिर्मिती करण्यात येत होती. पण नेमकं तेव्हा त्या पप्पूची यात्रा तिथं आली. नफरत की दुकान की जगह हम प्यार की दुकान खोल रहे है। हे तो सांगत होता आणि त्या वेड्या लोकांना हे पटत होतं. आवडत होतं. आम्ही आणि आमच्या ई-फौजेनं त्याची टिंगल करण्याचा नेहमीप्रमाणं प्रयत्न केला, पण त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. यात्रेतील गर्दी वाढतच होती आणि नाही म्हटलं तरी आम्हाला काळजी वाटायला लागली होती. तेव्हाच निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आणि आम्ही अर्थातच सवयीप्रमाणं अ‍ॅक्शन मोडमध्ये आलो. उत्तर प्रदेशातील हिंसाचार (जो सरकारी देखरेखीखाली करण्यात येत होता) आणि बुलडोझरची जालीम मात्रा यांना प्रसिद्धी दिली जाऊ लागली. कार्यकर्त्यांमध्ये जोम आला. आता आमच्या त्या राज्याच्या भेटी वाढणार हे सर्वांनाच ठाऊक होतं. 

ते काही खोटं नव्हतं. कारण तो आमचा फॉर्म्युला आता सर्वज्ञात झाला आहे. आमच्या अंगात निवडणूक संचारते आणि आम्ही बेभान होतो. काहीही बोलू लागतो. (इतरांप्रमाणं आम्हाला निवडणूक आयोगाची भीती नसते, हे काही वेगळं सांगायला नको.) आम्हाला लोक किती नावं ठेवतात हे आम्ही अश्रूभऱ्या डोळ्यांनी सभेत सांगितलं. सारे गहिवरून गेले. पण शत्रूला ते कसं कळावं? त्यांनी आम्ही त्यांच्या नेत्यांबाबत काय काय बोललो याची जंत्रीच तयार केली. आमच्या आरोपातली हवाच त्यामुळं निघून गेली. त्यांनी ‘40 टक्के कमिशन की सरकार’ असा दुष्ट प्रचार चालवला होता. तेव्हा आम्ही त्यांच्या नेत्यानंच रुपयातले केवळ 15 पैसेच लोकांपर्यंत जातात असं म्हटल्याचा दाखला दिला. पण 85 पैसे कुणाकडं जातात ते मात्र आम्ही सांगितलं नाही कारण त्यात आमचे पाठिराखे अधिकारीच मोठ्या संख्येनं असल्याचं सांगावं लागलं असतं. मग हाही मुद्दा फसला. काश्मिरमध्ये काही जवानांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली, नक्षलवाद्यांनी काही जणांना ठार केलं अशा घटनाही घडल्या. त्यामुळं आम्ही देशभक्तीची भाषा करू लागलो. पण अहो, तुमच्या नोटबंदीनंतर तर दहशतवादी आणि नक्षलवादी यांची रसद बंद होणार होती. त्यांच्या कारवायाही अस्तंगत होणार होत्या, तेव्हा हे कसं शक्य आहे, असे नाठाळ प्रश्न केले जाऊ लागले. मग तोही मुद्दा दूर.

मग आम्ही रामबाण, नाही, श्रीरामबाण उपाय केला. एक जुनं प्रकरण उकरून काढलं. कोर्टाला वेठीला धरण्याची जरूरच नव्हती. आम्ही सांगू ते केलं जाईल याची खात्रीच होती. त्यामुळं त्या प्रकरणात पप्पूनं मानहानी केल्याचं कोर्टानं मान्य केलं आणि नियमानुसार आम्ही त्याची खासदारकी रद्द केली. आम्ही सारं नियमानुसारच करत नाही का! आता ते वठणीवर येतील असं वाटत होतं. सेनापतीच पडल्यावर फौजा काय करणार, असं वाटत होतं. पण झालं उलटंच. आमच्या या निर्णयामुळं त्याला जणू संजीवनीच मिळाली. लोकांनाही त्याच्यावर जाणून बुजून कारवाई करण्यात आलीय याची कल्पना एव्हाना आलीच होती. त्यामुळं आम्ही आमच्या (?) साऱ्या जमातीचीच ही बदनामी आहे, असा कांगावा केला. पण काही जाणकारांनी आमचं आडनाव हे मुस्लिम, पारशी व अन्य काही जातींमध्येही आहे असं दाखवून दिलं. पुन्हा अपयश. पुन्हा श्रीरामबाण वाया! त्या कुठल्या गाण्याप्रमाणं आम्हालाही आज का, खरं तर, यावेळी ‘का निष्फळ होती बाण?’ असंच आम्हाला वाटू लागलं.

आम्ही काय केलं नाही? सारं लक्ष या निवडणुकीकडं दिलं. विजय हेच नेहमीप्रमाणं लक्ष्य ठेवलं. आपलं पद विसरून, जबाबदाऱ्या बाजूला सारून केवळ या राज्यावरच भर दिला. आम्ही किती कल्याणकारी योजना दिल्या, लोकांचा त्यामुळं किती फायदा झाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण तोही बाण वायाच गेला. त्या लोकांनी आम्हालाच महागाई, बेरोजगारी अशा प्रश्नांच्या फासात अडकवलं आणि ज्यांच्यावर आमची मदार त्या महिलांनी तर ‘तुमचा गॅस 1200 रुपयांवर गेला, आमची चूल कशी पेटवायची?’ असा रोखठोक सवाल केला. नतद्रष्ट कुठल्या. आम्ही त्यांच्यासाठी उज्ज्वला योजना आणली, त्याबाबत ‘हेचि काय फळ मम तपाला?’ असं विचारण्याची वेळ आली.

परकीयांनी सीमाभागात बस्तान पक्कं करायचे प्रयत्न सुरू केले, कोणकोणत्या भागावर आपलाच हक्क सांगायला सुरुवात केली, पण आम्ही तिकडं दुर्लक्ष केलं. अडचणीच्या वेळी काही राज्यांना भेट दिली नाही, लोकांची विचारपूस केली नाही याचं आम्हाला काहीच वाटत नव्हतं. आता आम्ही या राज्यात निवडणुकीसाठी तळच ठोकला. आमच्या लोकांनी मोठ्या प्रयासानं शोभायात्रांना गर्दी जमवली, आमच्यावर पुष्पवृष्टी केली, आम्हाला मुकुट घातल्याची छायाचित्रही झळकावली त्यामुळं आता यश आमचंच (अर्थात आमच्या पक्षाचं आणि पितृसंस्थेचंच) असं आम्हालाही वाटायला लागलं. त्या दुष्ट टिपू सुलतानाला दोन गौडांनी कसं मारलं याचीही सुरस आणि काल्पनिक कथा प्रसृत केली. पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही.

तिकडं ज्या ईशान्येकडील राज्यांवर आमचं खूप प्रेम असल्याचं आम्ही वारंवार सांगतो, तेथीलच एका राज्यात दोन जमातींत प्रचंड हिंसाचार झाला. सारं राज्य पेटलं. खरं तर ही वेळ चुकली. पण तिकडं जायलाच काय पण त्याबाबत काही बोलायलाही आम्हाला सवड नव्हती. किंबहुना गप्प बसणं हेच धोरण अशा बाबतींत योग्य असतं असा अनुभव. कारण लोकांची स्मरणशक्ती मोठी नसते. खरं म्हणजे तेथील हिंदूबहुल जमातीसाठीच अन्यधर्मीयांना ठेचायचंच नियोजन होतं. जाऊ तेथील जनतेत फाटाफूट करायची हे धोरण आता सर्वांनाच, म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना ठाऊक झालंय. कोणतीही गोष्ट धड ठेवायची नाही, मग राज्य असो, जमात असो, धर्म असो, धडाचा विध्वंस हेच आमचं धोरण. जनतेत जेवढी फाटाफूट तेवढं आमच्या फायद्याचं, असा साधा हिशेब आहे. तरीही आम्ही विरोधकांना ‘टुकडे टुकडे गँग’ म्हणून हिणवणार. असं आधीच इतरांना बोललं की, आपण स्वतः तसं करायला मोकळे. आपल्याला कोण तसं म्हणणार कारण आपणच आधी त्यांना बदनाम करून ठेवलेलं! हेच आमचं धोरण. पण यावेळी वेळ चुकली हेच खरं...

तिकडं राजधानीत वेगळंच प्रकरण घडत होतं. आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांत मोठं यश मिळवून देणाऱ्या काही कुस्तीगीर मुलींनी आमच्याच एका खासदारावर (जो त्यांच्या संघटनेचा मुख्य आहे) लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. त्याची चौकशी आणि हकालपट्टी झालीच पाहिजे अशी त्यांची मागणी किंवा तक्रार जानेवारीतच आली होती पण आमच्या क्रीडामंत्र्यानं तिची दखल घेतली नाही. त्या खासदाराविरुद्ध काही करणं म्हणजे त्याच्या राज्यातील अनेक जागा गमावण्याची वेळ हे आम्हाला ठाऊक होतं. त्यामुळंच आम्ही साऱ्याकडं दुर्लक्ष केलं आणि शेवटी या मुलींना खरोखरच रस्त्यावर उतरावं लागलं. ‘जंतर मंतर’वर त्यांनी आपला सत्याग्रह सुरू केला. अर्थात आम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही. आम्ही तर त्यांच्याबरोबर फोटो काढून ते सर्वत्र झळकावले नव्हते का! पण आता त्याचीच आठवण देऊन लोक आम्हाला नावं ठेवत आहेत. आम्ही जे काही करतो ते केवळ स्वतःसाठी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठीच, हे इतक्या वर्षांत यांना कळू नये, याचंच वाईट वाटतं.

विरोधकांना उचकवण्यासाठी, अर्थात जाळ्यात पकडण्यासाठी आम्ही अनेक गोष्टी उकरून काढल्या. याला ते अनेकदा बळी पडले होते. पण यावेळी त्यांना कुठून शहाणपण आलं कोण जाणे. त्यांच्या जाहीरनाम्यात, बजरंग दलावर बंदीचा मूळ खत नसलेला उल्लेख आला आणि आता आम्हाला निर्णयक मुद्दा मिळाल्याचा आनंद झाला. त्यांनी बजरंग बलीलाच नावं ठेवल्याचा आक्रोश आम्ही केला. (आमच्या लोकांना मतदान करताना जय बजरंग बली अशी गर्जना करूनच मत द्या असं सांगितलं. तसं केलं तर ते अयोग्य आहे, याचं भानही आम्हाला राहिलं नाही. कारण निवडणूक आयोग आमच्या लोकांवर काहीही कारवाई करणार नाही अशी आमची खात्रीच होती.)

पण आमच्या या सापळ्याकडं त्या विरोधकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि लोकांच्या हालअपेष्टांबाबत बोला, महागाई, बेरोजगारीबाबत बोला असं बोलून त्यांनी आम्हालाच खिंडीत गाठलं. नियोजनानुसार त्याच वेळी ‘केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यालाही प्रचारकी म्हणून नावं ठेवली गेली. पण तो न पाहताच आम्ही त्याची भरघोस शिफारस केली. तरीही त्याला त्यांनी महत्त्वच दिलं नाही. (आमच्या नियमांनी खेळायचं त्यांनी सपशेल नाकारलं. त्यामुळं आमच्यामागून येत त्यांची फरफट झाली नाही.) पण अजूनही अशा गोष्टींची आम्हाला किंमत नसते हेही त्यांना कसं कळत नाही?

आम्हाला फक्त निवडणुकीतील यश हवं असतं आणि ते मिळवण्याकरता आम्ही साम (पण आमचेच लोक नाराजीनं दुसरीकडे गेले), दाम (आमच्याच आमदाराच्या मुलाकडं करोडो रुपयांची रक्कम मिळाली), दंड (त्याला आता हे लोक भीत नाहीत), भेद (आमचेच लोक फुटताना भेद कुणाचा करणार) असे सारे उपाय योजतो. पण यावेळी त्यांनाही यश आलं नाही. दैवच आमच्या विरोधात गेलं म्हणायचं. ते भव्यदिव्य श्री रामजन्मभूमी मंदिर आम्ही पुरं करत आणलंय याची त्या श्रीरामालाही काही फिकीर नाही की काय?

आता निवडणूक निकालांनंतर तर आम्हाला ‘हेचि काय फळ मम परिश्रमांना’ असं वाटायला लागलंय. त्या श्रीरामानंच दुर्लक्ष केल्यानं आमचं पुण्यच सरल्याची भावना झाली आहे. बाहूंमधलेच काय शरीरातीलच त्राण गेल्यागत वाटतंय.

पण नाही! लगेच आठवतं. काही महिन्यांतच एक नाही, तर चार राज्यांमध्ये निवडणुका आहेत. केवळ या स्मरणानंच आमच्यात नवचैतन्य येतंय. रक्त सळसळून वाहू लागलंय. त्यामुळं आता खचून न जाता त्या राज्यांत कोणते नवे सापळे लावायचे, डावपेच कोणत्या प्रकारचे करायचे, याबाबत पितृसंस्थेचं मार्गदर्शन आणि आदेश घ्यायला हवेत!

जय श्रीराम!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: कर्नाटक विधानसभा निवडणूक भाजप भारत जोडो हिंदुत्ववाद नरेंद्र मोदी राहुल गांधी राममंदिर Load More Tags

Comments:

सतीश लळीत

अलीकडे उपरोधिक, उपहासात्मक लेखन क्वचितच वाचायला मिळते. ज्येष्ठ स्नेही 'आश्री' यांनी ही मोठी उणीव आज भरुन काढली. प्रश्न एवढाच आहे की, चुकूनमाकून हा लेख जर भक्तमंडळींच्या हाती लागला, तर त्यांना त्यातला उपहास कळेल की .....? आश्री लिहित रहा, आम्ही वाचत राहू...

Sushama Mirashi

उपहासाने ठासून भरलेला सुंदर लेख. पण हे असं फक्त काही मोजकेच लोकं वाचणार. बाकी आहेच whats app uni चे अंधभक्तांचे लेख.

Anil Khandekar

आम्ही लटके नाक बोलू....या लेखा पाठोपाठ " हेचि काय मम तपाला " ... श्री आ.श्री. केतकर यांना धन्यवाद. मर्मभेदक राजकीय स्वगत आहे.

Add Comment