दोन पवारांची कर्तबगारी नेमकी किती?

राज्यातील अभूतपूर्व सत्तांतरावर टाकलेला दृष्टीक्षेप: उत्तरार्ध

गेल्या आठवड्यात कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी जन्माला आली आणि राज्याच्या सत्तेवरही आली. त्यासंदर्भात थिंकबँक या युट्यूब चॅनेलवर विनोद शिरसाठ यांची 40 मिनिटांची मुलाखत विनायक पाचलग यांनी घेतली. या मुलाखतीत निवडणूक झाल्यानंतरच्या महाराष्ट्रातल्या राजकारणावर वेगवेगळ्या बाजूंनी सम्यक - सकारात्मक दृष्टिकोनातून दृष्टिक्षेप टाकला आहे, म्हणून या संपूर्ण मुलाखतीचे शब्दांकन करून ती दोन भागांत प्रसिध्द करीत आहोत. त्या मुलाखतीचा हा उत्तरार्ध.

प्रश्न: या निवडणुकीत एका बाजूला देवेंद्र फडणवीस आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार अशी निवडणूक झाल्याचं चित्र उभं राहिलं. विशेषतः सर्व प्रकारच्या मीडियामध्ये जे आलं त्यावरून, गेल्या महिन्याभराच्या संपूर्ण घटनाक्रमात शरद पवार हे केंद्रस्थानी राहिल्याचं दिसून आलं. तर शरद पवारांचा या निवडणुकीतला एकूण परफॉर्मन्स आणि त्यानंतर गेल्या महिन्यात जे राजकीय कसब त्यांनी दाखवलं, त्याबद्दल तुमचं मत काय?

- साधारणतः 1978 नंतर पुढच्या चाळीस वर्षांच्या कालखंडात शरद पवार हे महाराष्ट्रातले निर्विवादपणे सर्वात मोठे आणि सर्वात प्रभावशाली नेते राहिलेले आहेत, याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. त्यांच्या क्षमतांच्याविषयी, व्हिजनविषयी म्हणजेच विकासाची दृष्टी किंवा राजकारणातली मुत्सद्देगिरी यांच्याबद्दल सर्वसाधारणपणे  जे काही बोललं जातं ते बरोबर आहे. मात्र आताच्या सव्वा महिन्यात आणि त्याआधी निवडणूक प्रचाराच्या उत्तरार्धामध्ये, शरद पवार यांच्या एकूण कार्यकर्तृत्वामुळे भारावून गेलेल्या लोकांचं प्रमाण बरेच जास्त आहे. मला हे थोडं अनाकलनीय आणि आश्चर्यकारकही वाटतं. परंतु लोकांची स्मरणशक्ती कमी असते, त्यामुळे हे क्षम्य आहे असं म्हटलं पाहिजे. पण जो नेता पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहतो किंवा जो नेता पंतप्रधानपदासाठी लायक आहे असं आपण म्हणतो त्या नेत्याला  288 पैकी 54 म्हणजे एकूण जागांच्या 20% एवढ्याच जागा जिंकता आल्यात, ही समाधानाची बाब निश्चित असू शकते; पण त्याला शरद पवारांची कर्तबगारी म्हणता येणार नाही. अन्य एखाद्या नेत्याने स्वतःच्या बळावर 54 जागा आणल्या तर मी म्हणेन की, ते त्याचं कर्तृत्व आहे. म्हणजे शरद पवार पंचावन्न वर्षं सार्वजनिक जीवनात आहेत; चाळीस वर्षं महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली नेते आहेत; त्यांना 54 जागा मिळाल्या यात विशेष ते काय? हे खरं की, आता काँग्रेसच्या जागा वाढवण्यामध्ये पवारांचा  मोठा सहभाग होता. पण शिवसेना व भाजपला 157 जागा - पूर्ण बहुमत या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे, हे विसरून कसे चालेल? असं असूनही, शरद पवार ही सगळी निवडणूकच जिंकलेत अशा अविर्भावात त्यांचं जे कौतुक चाललं होतं, त्याचं मला फार आश्चर्य वाटतं. प्रतिकूल राजकीय परिस्थितीमध्ये, वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी संघर्ष केला हेही खरं आहे. पण 12 तास गुणिले 55 वर्षांचं त्यांचं राजकारण, केंद्रीय स्तरावरचं मुरब्बी स्थान, सर्व राजकीय पक्षांशी असलेले संबंध हे लक्षात घेतलं तर  शरद पवारांना स्वतःच्या बळावर, स्वतःच्या पक्षाला 79 पेक्षा अधिक जागा गेल्या वीस वर्षांत कधीही मिळवता आलेल्या नाहीत, ही त्यांच्या ताकदीची मोठीच मर्यादा नाही का? राष्ट्रवादीची स्थापना 1999 ची आहे. पण बहुमताच्या जवळ जाणं सोडाच, शंभराचा आकडाही त्यांना कधीच पार करता आलेला नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यासाठी आताच्या 54 जागा हे कर्तृत्व आहे असं काही मला वाटत नाही. तोच प्रकार अजित पवारांचं बंड त्यांनी मोडून काढलं त्याबाबतीत. मला वाटतं, ते त्यांनी मोडून काढलं नसतं तर शरद पवारांची जास्त नाचक्की झाली असती. 55 वर्षं ते राजकारण करत आहेत, महाराष्ट्राचे जाणते राजे आहेत तर त्यांनी हे बंड मोडून काढायलाच पाहिजे होतं. म्हणजे ते नापास झालेले नाहीत, हा काही त्यांच्या कर्तृत्वाचा निकष असू शकत नाही.

प्रश्न: राज्यामध्ये खऱ्या अर्थाने अजूनही चर्चेत आहेत, ते म्हणजे अजित पवार. राष्ट्रवादी मध्ये असणारा अजित पवारांचा वट आणि एकूणच त्यांचं राजकारण यांच्याकडे तुम्ही कसं बघता?

- या सर्व प्रकरणात मी अजित पवारांना फार दोष देऊ इच्छित नाही. याचं कारण त्यांच्या या वर्तनाला प्रामुख्याने शरद पवार जबाबदार आहेत असं मला वाटतं. कारण, अजित पवारांचं हे वर्तन आत्ताच्या काळातलं नाही. ते राजकारणात आले तेव्हापासूनच ते कसे फटकळ आहेत याची चर्चा होती. आणि आता फारसं म्हटलं जात नसलं तरी, त्यांची तुलना काही अंशी संजय गांधींशी केली जात होती. (आता इंदिरा गांधी आणि संजय गांधी या दोघांचीही नावं फारशी घेतली जात नाहीत!) हे खरं आहे की, अजित पवार राज्याच्या राजकारणात आले तेव्हाच शरद पवार केंद्रीय सत्तेत गेले. परंतु अजित पवारांचे सगळे गुणदोष  माहीत असूनही शरद पवारांनी जर त्यांना बळ दिलेलं असेल, तर आताच्या या सगळ्या परिस्थितीला शरद पवारच जबाबदार आहेत असं म्हटलं पाहिजे. राहिला प्रश्न अजित पवारांचा, तर ते मास लीडर म्हणून कधीही प्रसिद्ध नव्हते. त्यांच्याकडे राज्याच्या राजकारणाचं, विकासाचं काही व्हिजन आहे, असंही कधी दिसलेलं नाही. मुत्सद्देगिरीमध्ये ते एक्सपर्ट आहेत असंही नाही. जसं मी मगाशी म्हणालो की, देवेंद्र फडणवीस त्यांची कर्तबगारी (जी अर्थातच अजित पवार यांच्या तुलनेत जास्त आहे) ही केंद्रीय नेतृत्व, भाजप आणि संघ परिवार यांचा पूर्ण पाठिंबा असतानाच  बजावू शकतात, तसंच अजित पवार ही कर्तबगारी का करू शकले? त्याचं कारण, शरद पवारांचा असलेला पूर्ण पाठिंबा आणि अशा प्रकारच्या फटकळ, सडेतोड, आर या पार व पटकन निर्णय घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचं आकर्षण गावोगावच्या लहान-मोठ्या नेत्यांना पुढाऱ्यांना असतंच. राज्याच्या मोठ्या किंवा राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत जाणं आमदार आणि स्थानिक पातळीवरच्या तत्सम राजकीय पुढाऱ्यांना सहज शक्य नसतं. त्यामुळे अजित पवार यांच्यासारखे नेते त्यांना  जवळचे किंवा प्रिय वाटणं स्वाभाविक असतं.

प्रश्न: आताच्या परिस्थितीत राष्ट्रवादीमध्ये अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सुप्त संघर्ष आहे का ? आणि जे काही घडलं त्याचं मूळ कदाचित या संघर्षात असू शकतं, असं तुम्हाला वाटतं का?

- मला वाटतं, मुळात हा सुप्त संघर्ष अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच आहे. सुप्रिया सुळे हा नंतरचा भाग येईल. परंतु शरद पवार राजकारणात कितीही कोलांटउड्या मारत असतील; गटबाजीचं किंवा उपद्रवमूल्याचं राजकारण करत असतील तरी त्यांच्याकडे काही एक प्रकारचा बेस आहे, व्हिजन आणि समज आहे. तीच अजित पवारांना बऱ्याच वेळेला अडथळ्याची आणि अडचणीची ठरत असावी आणि त्यामुळे त्यांची पहिली नाराजी शरद पवार यांच्याबद्दलचीच असेल. छगन भुजबळ, जयंत पाटील किंवा अन्य ज्येष्ठ नेत्यांना ज्या प्रकारचे महत्त्व शरद पवार देतात ते अजित पवारांना कितपत चालत असेल याविषयीही शंका आहे. किंबहुना आपल्याला शरद पवारांच्यामुळे राज्यात पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही, पाहिजे त्या प्रकारे सत्ता राबवता येत नाही, हे अजित पवारांचं शल्य असू शकेल. काकांनीच त्यांना राजकारणात आणलेलं असलं तरी, जसा प्रत्येक मुलगा बापाशी मतभिन्नता निर्माण झाल्यानंतर  संघर्ष करायला लागतो तसाच प्रकार अजित पवार आणि शरद पवार यांच्या बाबतीत असावा.

प्रश्न: मीडियामध्ये आता अशीही चर्चा सुरू झाली आहे की, ही जी भाजप विरोधकांची एकी किंवा आघाडी राज्यात  झाली आहे, हा पॅटर्न देशभर वाढत जाईल आणि बदलाची नांदी देशात होऊ शकेल. तर तुम्हालाही भाजप विरोधातील विविध मतांच्या पक्षांची एकी होणं हा पॅटर्न देशभरात वाढेल, असं वाटतं का?

- देशाच्या स्तरावर वेगवेगळ्या पक्षांचे खूप नेते एकत्र येतील असं मला वाटत नाही. मात्र साथ किंवा संसर्ग जसे हळूहळू पसरतात, तसा प्रकार काही अंशी होऊ शकतो. म्हणजे महाराष्ट्रातून जेव्हा अशी सत्ता जाईल, तेव्हा अन्य छोट्या मोठ्या राज्यांमध्येही या प्रकारच्या उलाढाली होऊ शकतात. ज्या वेळी वेगवेगळ्या राज्यांतील सत्ता जाते तेव्हा पहिल्यांदा केंद्रीय सत्तेबद्दलची भीती जाते. आणि मग  पक्षाच्या अंतर्गत अस्वस्थतासुद्धा थोडीशी डोकं वर काढू शकते. त्यामुळे आपल्या पक्षाच्या यंत्रणेवरचं मोदी आणि शहा यांचं नियंत्रण थोडंसं कमी होऊ शकतं. त्याच वेळेला दुसरी प्रक्रिया अशी होत राहणार की, केंद्रातील भाजप सरकारला आता पाच वर्षं झालेली आहेत, दुसरी टर्म मिळालेली आहे,  370 रद्द झालेलं आहे, अयोध्येचा निकाल अनुकूल लागलेला आहे; त्यामुळे आता भाजपला रिझल्ट द्यावे लागतील. त्यासाठी स्वाभाविकतः रोजगाराचे प्रश्न, लोकांचे दैनंदिन प्रश्न, अर्थकारण आणि ज्याला आपण रूढ अर्थाने विकास म्हणतो त्याच्याकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. पण भाजपने कितीही लक्ष केंद्रित केले तरी लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. वेगवेगळे समाजघटक अस्वस्थ राहणार. त्या अस्वस्थतेला आउटलेट मिळत असतील आणि बाहेरची राजकीय परिस्थिती अशी असेल, तर भाजपला आणि त्यांच्या नेतृत्वाला हळूहळू विरोध निर्माण होत राहील. मात्र अगदी अचानकच काहीतरी चक्र जुळून येईल आणि केंद्रीय सत्तेला विरोध होईल असं मला दिसत नाही. आर्थिक व्यवस्था जर केंद्रीय नेतृत्वाला नीट सांभाळता आली नाही,  तर मात्र पुढच्या चार-पाच वर्षांमध्ये काँग्रेस किंवा अन्य दोन-चार मोठ्या पक्षांची आघाडी केंद्रीय नेतृत्वाला किंवा भाजप सरकारला पुढच्या वेळी पराभूत करु शकेल.

प्रश्न: हा पॅटर्न पुढे जाण्याची पूर्वअट महाविकासआघाडी टिकणं ही आहे. तर एक संपादक अभ्यासक म्हणून असे कोणते फॅक्टर्स तुम्हाला वाटतात, ज्यांच्यावर महाविकासआघाडीने काम केलं तर ती जास्त काळ टिकू शकेल?

- ही आघाडी इतकी अनैसर्गिक आहे की,  ती टिकण्यासाठी अंगभूत मर्यादा आहेत. उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना अन्य दोन पक्षांशी जुळवून घेणं हीच मुळात अवघड गोष्ट आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुद्धा आपापले मतलब बाजूला ठेवून, भाजप या प्रबळ विरोधी पक्षापासून बचाव करण्यासाठी काही काळ तरी राज्य सरकारला स्वस्थता मिळू दिली तर आघाडीला फायदा होईल. त्यासाठी पहिलं मुख्य काम म्हणजे त्यांनी कमी बोललं पाहिजे. मग राष्ट्रवादीतले भुजबळ किंवा अजित पवार असतील किंवा उद्धव ठाकरे स्वतः आणि संजय राऊत असतील, त्या सर्वांनी कमी बोलणं, काहीवेळा अजिबात न बोलणं किंवा जे बोलायचं ते जबाबदारीने आणि संसदीय व संविधानिक भाषेमध्ये बोलणं असं केलं पाहिजे. यामुळे ही आघाडी जास्त दिवस टिकू शकेल. फक्त नीट 'बोलण्या'मुळेही या आघाडीचे काही महिने वाढतील असं मला दिसतं.

प्रश्न: गेल्या महिनाभरात सामनाचे तेव्हाचे कार्यकारी संपादक आणि आताचे संपादक संजय राऊत चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. रोज सकाळची त्यांची ट्विट्स आणि नंतर पत्रकार परिषद यांमुळे महाराष्ट्रात एक माहोल बनला. तर या सगळ्या घडामोडींमध्ये संजय राऊतांच्या  भूमिकेकडे  तुम्ही एक माध्यमकर्मी म्हणून कसं बघता?

- मागच्या सव्वा महिन्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे व शिवसेना या दोन्हींच्या मधला दुवा संजय राऊत राहिलेले आहेत. आणि काँग्रेस व शिवसेना या दोघांना जोडण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे. ही तिघांची आघाडी जुळवण्यासाठी शरद पवार हा जसा मुख्य दुवा राहिला, त्यांच्या पाठोपाठचा दुसरा महत्त्वाचा दुवा संजय राऊत राहिलेले आहेत. संजय राऊत आणि शरद पवार यांचे संबंध पूर्वीपासूनच चांगले राहिलेले आहेत. दोघेही परस्परांचं फार कौतुक करत आलेले आहेत. आणि पवारांचे ठाकरे घराण्याशीही खूप चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनाही 'सामना' चालवताना थोडा अधिक बॅलन्स साधावा लागेल, मतांना मुरड घालावी लागेल. अन्यथा, या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करण्याचं काम जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने 'सामना'तूनच होऊ शकतं. 

प्रश्न: यादरम्यान खूप लोकांनी सोशल मिडियावर मुख्य प्रवाहातील मीडियावरचं फ्रस्ट्रेशन काढलं. त्यामुळे सोशल मीडियामुळे झालेलं ध्रुवीकरण हा एक वेगळाच चिंतेचा मुद्दा बनला. मागील दोन तीन महिने खूपच माध्यमकेंद्रित होते. तर एकूण राजकारण आणि लोकांचं परसेपशन घडवण्यामधली मीडियाची भूमिका आणि त्याला असलेली गेल्या दोन महिन्यांची पार्श्वभूमी याकडे तुम्ही कसं बघता?

- या दोन महिन्यांतच नाही तर गेली दोन दशकं मीडियाचा हस्तक्षेप चांगल्या वाईट दोन्ही अर्थांनी क्रमाक्रमाने वाढत गेला आहे. चांगल्या अर्थाने तो जास्तच झाला. माध्यमांची भूमिका काय असायला हवी? बाळशास्त्री जांभेकरांनी जे पहिलं मराठी साप्ताहिक-वृत्तपत्र सुरू केलं त्याचं नाव होतं दर्पण आणि मासिकाचं नाव होतं दिग्दर्शन! तर कोणत्याही काळामध्ये माध्यमांची भूमिका काय असायला हवी याचं उत्तर, या दोन शब्दांतूनही देता येईल असं मला वाटतं. गेल्या दोन दशकांमध्ये असं दिसतं की, दर्पणाची भूमिका माध्यमं नको तितकी जास्त निभावत आहेत. समाजाचं चांगलं आणि वाईट रूप म्हणजे कुरुपता आणि सौंदर्य दोन्ही खूप मोठ्या प्रमाणावर माध्यमं दाखवत आहेत; जे त्यांनी करायलाच हवं. परंतु त्याबरोबरीनेच दिग्दर्शनाची भूमिकाही त्यांनी पार पाडायला हवी. मात्र आत्ताची माध्यमं तिथे कमी पडत आहेत असं दिसतं. स्वाभाविक आहे की, परिस्थिती खूप गुंतागुंतीची असते आणि वेगाने बदलत जाते तेव्हा तिचं आकलन होणं, विश्लेषण करणं, अंदाज बांधणं, निष्कर्ष काढणं आणि दिशा दाखवणं किंवा सूचित करणं हे खूपच अवघड असतं. हे अवघड काम करण्यासाठी लागणारी जास्त बौद्धिक कुवती ची व चिकित्सक क्षमतेची माणसं सोशल मीडियामध्ये किंवा टिव्ही मीडियामध्ये कमी कमी  दिसत आहेत. दुय्यम-तिय्यम दर्जाच्या माणसांच्या हातात ही माध्यमं मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे माध्यमं दिग्दर्शनात कमी पडत असल्यामुळे,  हातातोंडाशी असलेली साधी सत्यं लोकांपुढे येत नाहीत. अनेक वेळा गतकाळाचं विस्मरण होतं. उदा. मागच्यावेळी काहीही कारण नसताना, कुणीही मागणी केलेली नसताना शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता आणि शिवसेनेचं खच्चीकरण केलं होतं. आता कोणाचीही मागणी नसताना शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी निकाल लागायच्या आधीच, 'शिवसेनेला सरकार बनवता येऊ शकतं' असं सूचित करणं, हे पाहिलं तर आता त्यांनी भाजपला अपंग करून टाकलं आहे. आता या इतक्या साध्या गोष्टीसुद्धा निवडणुकीच्या काळात किंवा नंतरही लोकांपुढे आलेल्या नाहीत. हे काम खरंतर माध्यमांचं होतं. 

प्रश्न: आत्ताच्या चर्चेत फारसा न आलेला आणि खरंतर गेल्या तीन महिन्यांतही फारसा चर्चेत न आलेला काँग्रेस पक्ष आत्ता सत्तेत आहे. प्रचारातही तो दिसला नाही. पण काँग्रेसचे नाना पटोले आता विधानसभा अध्यक्ष झाले आहेत. दोन मंत्रीपदंही त्यांना मिळालेली आहेत, कदाचित आणखीही काही मंत्री होतील. काँग्रेसची गेल्या तीन महिन्यांतल्या भूमिकेबद्दल काय सांगाल?

- काँग्रेस खरंतर गेल्या तीन महिन्यात निष्क्रियच होती. काँग्रेसचं तीन महिन्यातील जास्तीत जास्त धाडसी पाऊल कोणतं असेल तर, शिवसेनेसोबत सत्तेमध्ये सहभागी होणं. महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा धाडशी हस्तक्षेप त्यांनी कधीही केलेला नव्हता. आपल्याला गतकाळ आठवत असेल तर, काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणं हीसुद्धा मागच्या पाच दहा वर्षांपूर्वी अशक्यप्राय गोष्ट मानली जात होती. आताही असं वाटत होतं की, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार बनेल आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी म्हणून काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल. मात्र थेट सत्तेमध्ये सहभागी होणं हे माझ्यामते काँग्रेसने खूप मोठं पाऊल टाकलं. याचा त्यांना फायदा - नुकसान काय व्हायचं ते होईल. पण प्राप्त परिस्थितीमध्ये आणि भाजपसारखा पक्ष जेव्हा पूर्ण देशभर वर्चस्व गाजवतो आहे, तेव्हा काँग्रेसकडे जी काही तत्त्वं आहेत त्यांना मुरड घालून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला,  ही काँग्रेसच्याच दृष्टीने स्वागतार्ह गोष्ट आहे, असं मला वाटतं.

प्रश्न: राजकारण व त्यावरच्या चर्चा  होतच राहतील. पण या सगळ्यातून सामान्य नागरिकाला काय मिळालं आणि भविष्यात त्यांनी काय अपेक्षा ठेवाव्या?

- सामान्य नागरिकांच्या विशेषतः तरुण पिढीच्या मनात राजकारणाबद्दलचं फ्रस्ट्रेशन, निराशा, अनास्था, 'सगळे पक्ष सारखेच' अशी भावना खूप मोठ्या प्रमाणावर बळावते आहे. यावर माध्यमांनी अशी भूमिका बजावायला हवी (जी साधनेतून काही अंशी आम्ही मांडतो) की, आत्ताची परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे; पण फ्रस्टेट होऊन स्वस्थ बसावं अशी  निश्चितच नाही! अस्वस्थता तरी का आहे? कारण सर्वच समाजघटक क्रमाक्रमाने जागे होतात, आपापला वाटा मागू लागतात, आपापलं उपद्रवमूल्यही वसूल करतात, त्यातूनच सगळा गदारोळ निर्माण होतो. पण अगदी स्वातंत्र्यपूर्ण काळापर्यंत क्रमाक्रमाने मागे जात प्रत्येक दहा वर्षांमधलं राजकारण, अर्थकारण, उद्योग-व्यापार यांतली स्थिती, विकासाच्या अवस्था त्या-त्या काळाच्या संदर्भात तपासल्या तर असं लक्षात येईल की, अशा प्रकारची गुंतागुंत आणि उलाढाली अनेक राज्यांत - केंद्रीय स्तरावर अधूनमधून घडत आलेल्या आहेत. आणि त्यातून वाट काढतच देश पुढे आलेला आहे. साहित्य, संस्कृती, समाजकारण, अर्थकारण या सगळ्याच बाबतीत अधून मधून काहीवेळा पुढे मागे झालं असलं तरीही एकूणात गोळाबेरीज केली तर आपला समाज पुढेच सरकत आला आहे असं दिसतं. त्यामुळे छोट्या तुकड्यांत दिसणारं चित्र अस्वस्थ करणारं असलं तरी त्यामुळे फ्रस्टेट होण्याची गरज नाही.
(शब्दांकन: सुहास पाटील)

या मुलाखतीचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या मुलाखतीचा पूर्वार्ध वाचा: अनैसर्गिक आघाडी किती काळ टिकणार?

Tags: उत्तरार्ध राजकारण शरद पवार अजित पवार Interview Sharad Pawar Ajit Pawar Maharashtra Politics Vinod Shirsath Load More Tags

Comments:

दीपक पाटील

टिळक राजकीय वळणाने तर आगरकर सामाजिक सुधारणेला अग्रक्रम देणारे होते. अलीकडे साधना चा कल/चर्चा या आगरकर मार्ग सोडून टिळक मार्गाने सुरु आहे असे वाटते.

पोपट पगार,कळवण (नासिक)

१)माध्यमाची भूमिका स्वच्छ नाही,राज्यसभेच्या अध्यक्षा सारखी मा ध्मामाची भूमिका आहे. २)फ्रस्टेशन म्हटलं तर ते १९२४ म.गांधीनाही आलेच होते. ३)कर्तबगारी म्हटली तर ती सर्व शरद पवारांचीच आहे.

Add Comment