'25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य' या पुस्तकाची पार्श्वभूमी

येत्या 15 ऑगस्टला 'साधना'च्या 75व्या वर्षारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष संपत असताना 15 ऑगस्ट 1972 चा साधना साप्ताहिकाचा अंक ‘25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ या विषयावर काढला होता. त्या अंकाचे संपादन अनिल अवचट यांनी केले होते. त्या अंकातील राजा ढाले यांचा लेख वादग्रस्त ठरला, त्यातील केवळ तीन-चार वाक्यांमुळे बरेच वादसंवाद झाले. त्याचा परिणाम, त्या लेखातील व एकूणच त्या अंकातील आशयाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. तो अंक निघाला त्या घटनेला आता 50 वर्षे पूर्ण होत आहेत आणि देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हे निमित्त साधून तो संपूर्ण अंक आणि त्यावरील सर्व वादसंवाद यांचे संकलन असलेले हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून येत आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी साधना साप्ताहिक अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने सायंकाळी साडेपाच वाजता एस. एम. जोशी सोशलिस्ट फौंडेशनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्या पुस्तकाला लिहिलेले हे प्रास्ताविक.

मागील अर्धशतकात सर्वाधिक गाजलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या मराठी लेखांची यादी करायची ठरवली तर पहिल्या दहांमध्ये समावेश करावा लागेल असा एक लेख साधना साप्ताहिकात बरोबर 50 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. राजा ढाले यांचा 'काळा स्वातंत्र्यदिन' हाच तो लेख. 15 ऑगस्ट 1972 च्या साधना अंकात तो प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाने साधनाच्या आत आणि बाहेर प्रचंड गदारोळ माजवला होता. इतका की, त्या एका लेखामुळेच केवळ राजा ढाले हे नाव अनेकांना माहीत झाले होते आणि साधना साप्ताहिकाचे नावही त्या एका लेखामुळे अनेक नव्या वाचकांना माहीत झाले होते. त्याआधी आणि त्यानंतरही राजा ढाले यांचे लेखन साधनात प्रसिद्ध झालेले नाही. 'तो लेख वाचायला मिळेल का, त्यात वादग्रस्त काय होते, त्यावेळी नेमके काय व कसे घडले, त्याचे परिणाम काय झाले' हे व या प्रकारचे प्रश्न तेव्हापासून आतापर्यंत इतक्या वेळा व इतक्या विविध स्तरांतील लोकांकडून विचारले गेले आहेत, की त्यांची गणतीच करता येणार नाही. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी राजा ढाले यांचे निधन झाले तेव्हा, त्यांच्यावर जे काही मृत्युलेख विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाले, त्यातील बहुतेकांमध्ये त्या लेखाचा उल्लेख होताच.

परिणामी, साधनाकडे पुन्हा एकदा चहुबाजूंनी मागणी / विचारणा सुरू झाली - 'तो लेख वाचायला मिळेल का, तो लेख पुनर्मुद्रित कराल का?' त्याचे आम्ही दिलेले उत्तर होते, दोनच पर्याय आहेत : तो लेख अंशतः संपादित करून (तीन - चार विधाने वगळून) प्रसिद्ध केला जाऊ शकतो किंवा अजिबात प्रसिद्ध केला जाऊ शकत नाही. म्हणजे त्यावेळी प्रसिद्ध झालेला लेख जसाच्या तसा आता पुनर्मुद्रित करणे हा पर्याय असूच शकत नाही! याचे कारण तो लेख उत्कृष्ट असला, भेदक असला आणि समाजाच्या मर्मावर घाव घालणारा असला तरी, त्यातील तीन चार विधाने अशी आहेत की, त्यांच्यामुळेच केवळ साधनाचे त्यावेळचे संपादक यदुनाथ थत्ते, कार्यकारी संपादक अनिल अवचट आणि साधनाचे त्यावेळचे कार्यकारी विश्वस्त एस. एम. जोशी या तिघांनीही जाहीर माफी मागितली होती. एवढेच नव्हे तर, साधनातून ते माफीनामे प्रसिद्ध केले होते; संपादक व कार्यकारी संपादक यांनी तर राजीनामे दिले होते, ती सविस्तर लिहिलेली राजीनामा पत्रे नंतरच्या साधना अंकातून प्रसिद्धही झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना (आज तो मूळ लेख किती वादग्रस्त वाटेल हा भाग बाजूला ठेवला तरी), तो लेख जसाच्या तसा पुनर्मुद्रित करताच येणार नाही.

तर खूपच कमी लोकांना माहीत असलेली त्या प्रकरणातील वस्तुस्थिती नीट लक्षात घ्यायला हवी; ती थोडक्यात पण नेमकेपणाने सांगण्याचा प्रयत्न इथे करीत आहे. भारतीय स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण होणे आणि साधना साप्ताहिकाने 25 व्या वर्षात पदार्पण करणे, असे दुहेरी औचित्य साधून 'स्वतंत्र भारतातील दलितांची 25 वर्षे' या विषयावरील तो विशेषांक होता. त्यावेळी यदुनाथजी वयाच्या पन्नाशीत होते आणि साधनाचे संपादक म्हणून दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. सतत भ्रमंती करणारा संपादक, नवे विषय व नवे लेखक शोधणारा संपादक आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांना निर्भयपणे वाचा फोडणारा संपादक, अशी त्यांची ओळख गांभीर्याने वाचन-लेखन करणाऱ्या मराठी भाषकांना होती. त्यांच्याभोवती जे काही तडफदार तरुण वावरत होते, त्यातील एक अनिल अवचट. 1967 ते 72 या पाच वर्षांत या तरुणाने साधनात सातत्याने लिहिले होते आणि तळागाळातल्या / उपेक्षित-शोषित समूहांचे जगणे मरणे मोठ्या ताकदीने मांडले होते.

यदुनाथ हे तसेही तरुणांवर विश्वास टाकणारेच होते आणि अनिल अवचट यांच्यावर तर त्यांचा जास्तच विश्वास होता. त्यामुळे “शिक्षित दलित तरुणांशी बोलून, त्यांना लिहिते करून, ‘पाव शतकातील स्वातंत्र्याने त्यांना काय दिले’ या विषयावर विशेषांक करण्याची अवचटांची कल्पना यदुनाथजींनी उचलून धरली. अवचटांनी यासाठी सिद्धार्थ कॉलेज (मुंबई) आणि मिलिंद कॉलेज (औरंगाबाद) इथे बऱ्याच फेऱ्या मारल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' या मंत्राने मोहित झालेले तरुण तिथे मोठ्या प्रमाणात होते. तेथील वसतिगृहात राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या तरुणांशी रात्र रात्र संवाद साधून, राज्यभरात दलित समाजाची काय स्थिती आहे हे अवचटांनी जाणून घेतले होते.. त्यातून, ;पाव शतकानंतरही स्वातंत्र्य त्यांच्या दाराशी आलेले नाही, त्यांची गुलामी संपलेली नाही, पदोपदी होणारी अवहेलना थांबलेली नाही’ हा निष्कर्ष निघाला होता. शिवाय, त्याआधीच्या काही महिन्यांत, महाराष्ट्राच्या विविध भागांत दलितांवर होणाऱ्या भयानक अत्याचाराच्या बातम्यांनी कहर माजवला होता. संपूर्ण गावाने दलितांवर बहिष्कार टाकणे, त्यांना अमानुष मारहाण करणे, ते वापरत असलेल्या विहिरीत विष्ठा टाकणे, त्यांच्या आया-बहिणींची नग्न धिंड काढणे, असे एक ना अनेक लाजीरवाणे प्रकार घडत होते. अस्पृश्यतेचे चटके तर सर्वत्र नित्याचेच होते. (त्याचदरम्यान दलित पँथरची स्थापना झाली होती.) आणि म्हणून त्यांची कैफियत, त्यांच्या वाट्याला आलेली अवहेलना त्यांच्याच शब्दांत आग ओकणाऱ्या अभिव्यक्तीसह प्रसिद्ध करावी, असे त्यावेळी 27 वर्षांच्या कार्यकारी संपादकाला वाटणे साहजिक होते. शिवाय, त्यातील काही अधिक बंडखोर तरुणांनी 'आमच्या व्यथा वेदना आम्ही लिहू तशा छापण्याची तुमची हिम्मत आहे का' अशी चेतावणीही अवचटांना दिली होती.

या सर्व प्रक्रियेतून 52 पानांचा विशेषांक आकाराला आला. त्या अंकाचा प्रारंभ पाच महाविद्यालयीन तरुणांच्या आयुष्यातील अस्पृश्यतेच्या एकेका प्रसंगाने व दोन छोट्या कविता यांनी केला होता. त्यानंतर 'बलुतं' या आत्मकथनामुळे प्रसिद्धीला आलेल्या दया पवार यांचा अस्पृश्यतेचेच अनुभव सांगणारा तीन हजार शब्दांचा 'विटाळ' हा लेख होता. मग जगदीश करंजगावकर यांचा 'वास्तवाला सामोरे जायला हवे' हा राजकीय लेख होता. (हा लेख अर्जुन डांगळे यांनी त्या टोपणनावाने लिहिला होता.) आणि त्र्यंबक सपकाळे यांच्या तीन कविता होत्या. मग राजा ढाले यांचा 'काळा स्वातंत्र्यदिन' हा लेख होता. त्यानंतर अनुक्रमे लहान बहिणीचे उपकार कसे फेडू (भीमराव चिकटे), रूढींच्या निर्मूलनाचे नवे जंग (ल. बा. रायमाने), स्वतंत्र भारतातील माझी फरफट (वसंत नारायण जाधव), खेड्यातील हुरडा (विद्यासागर कांबळे), दलितांमधीलही आम्ही दलित (विजया पगारे), अस्पृश्यता आणि स्वातंत्र्य (दत्ता भगत), हे घ्या पुरावे ( प्रल्हाद चेंदवणकर), माझे अनुभव (धनंजय गुडदे) हे आठ लेख होते. अंकातील मधल्या पानांवर काही छोटे अनुभव व कविता होत्या. मग बांडगुळे तोडणारे अंकुर (लैला महाजन) ही कथा होती. आणि समारोपाला पुरुषार्थी लोकमानस ही आजची गरज (एस. एम. जोशी) व बावडा आघाडीवरील सामसूम (बाबा आढाव) या दोन ज्येष्ठांचे लेख होते. अंकाच्या दीर्घ संपादकीय लेखामध्ये यदुनाथांनी साधनाच्या 24 वर्षांच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकून, साने गुरुजींचा वारसा व वसा अधोरेखित केला होता. आणि अवचटांनी अंक काढण्यामागील भूमिका सांगणारे छोटे टिपण लिहिले होते.

हा विशेषांक जोडअंक होता. त्यानंतर आलेल्या 26 ऑगस्टच्या अंकात द. तु. दिघे व यशवंत भोसले या दोन वाचकांची पत्रे आहेत. 'ग्राम्य भाषा व हलकट टीका' या शीर्षकाच्या त्या पत्रात, राजा ढाले यांच्या लेखातील काही विधानांबद्दल तीव्र नापसंती आहे. त्यानंतर आलेल्या 2 सप्टेंबरच्या अंकात दुर्गा भागवत यांचे एस.एम. जोशी यांना पत्र आणि त्याच्या शेजारी एस. एम. यांचे पत्र आहे. 'एस. एम. यांनी त्या लेखाचा जाहीर निषेध करावा किंवा कार्यकारी विश्वस्तपदाचा राजीनामा द्यावा' असे दुर्गाबाई म्हणतात. तर "त्या लेखातील 'त्या' विधानांचा निषेध, ती छापली गेली यासाठी माफी आणि तरीही आवश्यकता असेल तर राजीनाम्याची तयारी" असे एस. एम. यांचे पत्र आहे. याशिवाय ग. प्र. प्रधान, भार्गव, सरोजिनी वैद्य, र. ग. पंडित, मुमताज रहिमतपुरे, भालचंद्र कोतकर यांची पत्रे आहेत. ढालेंच्या लेखावरच ही पत्रे आहेत. संपादकांनी राजीनामा द्यावा असे पत्र ग. प्र. प्रधान यांचे, तर झालेल्या चुकीवर कठोर टीका इतर पत्रांमध्ये आहे. याच अंकात यदुनाथ व अवचट यांची राजीनामा पत्रे आहेत..

त्यानंतर आलेल्या 9 सप्टेंबरच्या अंकात 22 पत्रे आहेत, त्यामध्ये मृणालिनी देसाई, अ. के. भागवत, शांतीलाल शाह इत्यादी मान्यवरांची पत्रे आहेत. त्यातील एक पत्र सात जणांच्या नावाने आहे. पत्रलेखकांमधील बहुतेकांनी तो विशेषांक उत्तम झाला आहे याबद्दल संपादकांचे अभिनंदन केले आहे, त्या लेखातील ती विधाने कमालीची निषेधार्ह असून संपादकांनी ती छापायला नको होती असे म्हटले आहे, मात्र संपादकांचे राजीनामे स्वीकारले जाऊ नयेत असेही म्हटले आहे. याच अंकात 'तेजोभंगाचे पाप आम्ही करणार नाही!' हा एस. एम. यांचा लेख आहे. वैचारिक स्पष्टता, प्रामाणिकता, पारदर्शकता आणि तर्कनिष्ठ व विवेकी भूमिका यांचा (ऑल टाईम ग्रेट) अप्रतिम नमुना म्हणून या लेखाचा उल्लेख करावा लागेल. याच अंकात 'साने गुरुजींची साधना' हा अनिल अवचट यांचा ब्लॅक ह्यूमर प्रकारातील लेख आहे, त्या लेखात दरम्यानच्या दोन आठवड्यांत साधनाच्या आवारात आलेल्या दोन मोर्चांची हकीगत चित्रमय व नाट्यमय शैलीत आली आहे. उपहास, उपरोध, निर्भयता, तेजस्विता व कारुण्य इतके सारे या लेखातून अनुभवता येते.

त्यानंतर आलेल्या 16 सप्टेंबरच्या अंकात एकूण 24 पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यात वसंत पळशीकर व दि. के. बेडेकर यांच्या प्रतिक्रिया स्वतंत्र लेख म्हणाव्यात इतक्या सविस्तर आहेत. न्यायप्रेमी या टोपणनावाने एक लेख आहे, तो कोणाचा आहे कळलेले नाही. दत्तो वामन पोतदार, किशोर पवार, नरहर कुरुंदकर, पन्नालाल सुराणा, हुसेन जमादार यांच्यासह अन्य पत्रलेखकही नामवंत म्हणावेत असे आहेत. एक पत्र 41 मान्यवरांच्या नावांसह आले आहे. लीलाधर हेगडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पाठवलेले पत्रही यात आहे. झाल्या प्रकाराबद्दल लेखक व संपादक यांच्यावर सरकार खटले दाखल करणार असल्याचे ऐकून, 'तसे करणे का योग्य नाही' हे सांगणारे ते पत्र आहे. आणि याच अंकात 'ही चर्चा / वाद आता थांबवीत आहोत,' असे संपादकीय निवेदन आहे. या सर्व वाद विवादात तीन-चार अपवाद वगळता कोणीही राजा ढाले यांच्या 'त्या' लेखातील त्या विधानांचे समर्थन केलेले नाही आणि दोन-तीन अपवाद वगळता कोणीही 'संपादकांचे राजीनामे स्वीकारावेतच' असे म्हटलेले नाही.

त्यावेळी महिनाभर चाललेले ते जाहीर वादविवाद हे साधनाच्या इतिहासातील 'तीक्ष्ण काटे आणि त्यावर असलेली फुले' असे प्रकरण होते. एस.एम., यदुनाथ व अवचट या तिघांनीही त्या प्रकरणात दाखवलेले धैर्य आणि ध्येयाप्रति राखलेली निष्ठा अशी अधोरेखित होते की, 'आपण या परंपरेचे पाईक आहोत' याचा प्रस्तुत संपादकाला अभिमान वाटतो. या प्रकरणात यदुनाथांच्या वाट्याला स्वकीयांकडून आणि परक्यांकडून जी अवहेलना आली आणि ती त्यांनी कर्तव्यनिष्ठेचा भाग मानली, यासाठी साधना साप्ताहिक त्यांचे कायम ऋणी राहील. या प्रकरणातून धडा मिळतो तो हाच की, कोणत्याही शोषित समूहांची अभिव्यक्ती जहरी असणे स्वाभाविक, म्हणून त्याबद्दल आम जनतेने अधिक सहनशील व सहिष्णू होत जायला हवे आणि त्याचवेळी सामाजिक परिवर्तनासाठी लढणारांनी आपली अभिव्यक्ती करताना जबाबदारीचे भान ठेवायला हवे, तोल जाणार नाही याची काळजी घायला हवी.

2

अशी पार्श्वभूमी असलेला तो अंक आणि त्यातील वादसंवाद मागील 50 वर्षे साधनाच्या अर्काइव्हमध्ये पडून होते. त्या अंकातील 'विटाळ' या लेखाचा विस्तार करून नंतर दया पवार यांनी छोटे पुस्तक लिहिले. एस. एम. जोशी यांचा 'तेजोभंगाचे पाप आम्ही करणार नाही,' हा लेख 2007 मध्ये ‘निवडक साधना ग्रंथसंच’मध्ये समाविष्ट करण्यात आला. अर्जुन डांगळे यांनी त्यांच्या एका पुस्तकात स्वतःचा लेख घेतला आहे. त्या अंकातील एक कथा व कविता त्या त्या लेखकांच्या संग्रहात पुढे आल्या की नाही हे माहीत नाही. पण अंकातील अन्य कोणतेही लेखन व वाद-संवाद नंतर कुठेही प्रसिद्ध झाल्याचे दिसत नाही. तीन वर्षांपूर्वी राजा ढाले यांचे निधन झाले तेव्हा, साधनाने 3 ऑगस्ट 2019 चा संपूर्ण अंक त्यांच्यावर काढला होता. त्या अंकात राजा ढाले यांचा तो संपूर्ण लेख (अर्थातच त्यातील तीन-चार विधाने वगळून) प्रसिद्ध केला होता, एस.एम. व अवचट यांचे लेख आणि अवचट व यदुनाथ यांची राजीनामापत्रेही त्या अंकात पुनर्मुद्रित केली होती.

त्याचवेळी असे वाटले की, 15 ऑगस्ट 1972 चा तो संपूर्ण अंक इतका उत्तम आहे की त्याची छोटी पुस्तिका प्रसिद्ध करायला हवी. ती पुस्तिका करायची आणि अनिल अवचट यांची प्रस्तावना घ्यायची असा विचार होता. आणि तसे बोलणे अनिल अवचट यांच्याशी झाले होते. मात्र त्यानंतर जगभर कोरोनाचे संकट उद्भवले आणि 27 जानेवारी 2022 रोजी अनिल अवचट यांचे निधन झाले. तेव्हा अनिल अवचट यांच्यावरील विशेष अंक करण्यासाठी साधना अर्काइव्हचे उत्खनन केले, त्यावेळी राजा ढाले प्रकरणावरील सर्व वाद-संवाद काळजीपूर्वक पाहिला. तेव्हा असेही वाटले की, तो संपूर्ण अंक आणि त्यावरील वादसंवाद एकत्रित करावे आणि त्याचे पुस्तक 15 ऑगस्ट 2022 रोजी प्रकाशित करावे. (अर्थातच संपादन अनिल अवचट असे म्हणावे) तो निर्णय पक्का करण्यासाठी चार औचित्यं जुळून आली : त्या अंकाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत, दलित पॅंथरच्या स्थापनेला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि साधना साप्ताहिक 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

मग तो संपूर्ण अंक आणि त्यावरील वादसंवाद यांची अक्षरजुळणी करून घेतली, प्रूफ तपासून घेतले आणि अंतिम वाचनासाठी ते पुस्तक हातात घेतले तेव्हा अवघ्या एका दिवसात 145 पानांचा मजकूर वाचून व तपासून झाला. त्यातील कथा आता थोडी पसरट वाटते आहे आणि एक लेख थोडासा पाल्हाळीक आहे. बाकी सर्व मजकूर कमालीचा वाचनीय (हायली रिडेबल) म्हणता येईल असा आहे. त्याच वेळी पुस्तकाची अंतर्गत पुनर्रचना मनात आकार घेऊ लागली. त्यानुसार चार विभाग केले आहेत.

पहिल्या विभागात तो संपूर्ण अंक घेतला आहे. अर्थातच राजा ढाले यांच्या लेखातील ती तीन-चार विधाने वगळली आहेत. ती वगळायला नको होती, असे अनेकांना वाटणे साहजिक आहे. मात्र राष्ट्रध्वज, दुर्गा भागवत आणि टिळक-आगरकर यांच्या संदर्भातील ती शेरेबाजी वगळल्याने आशयात काहीही फरक पडत नाही. दुसरे असे की, ज्या तीन-चार विधानांसाठी साधनाचे त्यावेळचे संपादक व कार्यकारी संपादक यांनी राजीनामे दिले होते, आणि ती विधाने अंकात राहिली यासाठी त्या दोघांसह कार्यकारी विश्वस्तांनीही माफी मागितली होती, ती विधाने आता साधना अंकात किंवा पुस्तकात समाविष्ट करण्याचा नैतिक अधिकार साधनाच्या विद्यमान संपादकाला असू शकत नाही. शिवाय, ती तीन-चार विधाने नसल्याने या पुस्तकातील वाद-संवाद समजून घेण्यात काहीही अडथळा येत नाही.

त्या अंकातील उर्वरित सर्व मजकूर जसाच्या तसा या पुस्तकात घेतला आहे, क्रम मात्र वाचकांच्या सोयीसाठी बदलला आहे. म्हणजे सर्व कविता एकत्र घेतल्या आहेत, सर्व अनुभव एका मागोमाग घेतले आहेत, आणि कोणत्या क्रमाने लेख वाचणे योग्य ठरेल त्याचा विचार करून तसे ते लावले आहेत. त्या अंकात '1959 मधील गोष्ट' ही सहा ओळीची बातमी, पानपुरकासारखी वापरली होती. मात्र या पुस्तकाच्या पहिल्या विभागाच्या शेवटी ती जाणीवपूर्वक घेतली आहे. याचे कारण, ती इतकी महत्त्वाची आहे की, ती थीम घेऊन स्वतंत्र विशेषांक होऊ शकतो किंवा 'दलितांचे स्वातंत्र्य' या विषयाचा उत्तरार्ध होऊ शकतो. कारण दलित समाजाच्या अंतर्गत असलेल्या अज्ञान अंधश्रद्धा, रूढी परंपरा, प्रथा चालीरीती, जातपंचायती यामुळे होणारे दलित समाजाचे अंतर्गत शोषण हा स्वतंत्र व त्रासदायक म्हणता येईल असा विषय आहे. अर्थातच प्रत्येक (श्रेष्ठ असो वा कनिष्ठ) जातीच्या व धर्माच्या अंतर्गत होत असलेल्या अशा प्रकारच्या शोषणांवर व आवश्यक सुधारणांवर स्वतंत्र अंक होऊ शकतो.

दुसऱ्या विभागात साधनाचे संपादक व कार्यकारी संपादक यांची राजीनामापत्रे, एस. एम. जोशी यांचा तो तेजस्वी लेख आणि साधनाच्या कार्यालयावर आलेल्या दोन मोर्चाची कहाणी सांगणारा अनिल अवचट यांचा लेख हा मजकूर आहे. त्यातून साधनाची भूमिका अत्यंत नेमकेपणाने स्पष्ट होते आहे.

तिसऱ्या विभागात दोन्ही बाजूंनी आलेल्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. त्या विशेषाकानंतरच्या पाच अंकामध्ये त्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यातील बहुतांश प्रतिक्रियांना शीर्षके दिलेली नव्हती, या पुस्तकात त्या प्रतिक्रिया समाविष्ट करताना सर्वांना शीर्षके दिलेली आहेत. आणि चौथ्या विभागात मात्र 'राजा ढाले यांच्या त्या तीन-चार विधानांवर इतका गहजब न माजवता, मूळ विषयाकडे लक्ष वेधले पाहिजे आणि मूळ प्रश्नांना व समस्यांना हात घातला पाहिजे,' अशी सविस्तर भूमिका मांडणारे सहा लेख आहेत.

असे हे संकलन, संपादन असलेले 200 पानांचे पुस्तक प्रकाशित करण्यामागे 50 वर्षांपूर्वीचे एक प्रकरण उलगडून दाखवण्यासाठी संपूर्ण दस्तऐवज आज उद्याच्या पिढ्यासमोर ठेवणे हा एक उद्देश तर आहेच. मात्र स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत असताना देशातील दलितांच्या स्थितीत किती फरक पडला आहे, याचीही चर्चा-चिकित्सा या निमित्ताने होऊ शकते. अर्थातच पूर्वीच्या तुलनेत खूप फरक पडला आहे असे दिसेल. मात्र डोळे नीट उघडे ठेवून सभोवताली पाहिले तर, अद्याप पायाखाली काय व किती जळते आहे हे दिसेल. ते चित्र धक्कादायक वाटू शकेल, सुन्न करणारे ठरू शकेल.

आणि म्हणूनच हे पुस्तक प्रकाशित होत असताना, साधना साप्ताहिकाचा 75 वा वर्षारंभ विशेषांक (15 ऑगस्ट 2022) “कालचे स्वातंत्र्य आमच्या दारात आलेच नाही” ही थीम घेऊन काढला आहे. त्यात दलित बहुजन, भटके विमुक्त, मुस्लिम आणि आदिवासी या चार समाजघटकांच्या संदर्भात गेल्या 75 वर्षांत नेमके किती बदल झालेत याची झलक दाखवली आहे. त्यासाठी अनुक्रमे कांचा इलाया शेफर्ड, बाळकृष्ण रेणके, नूर जहीर आणि किशोरचंद्र देव या (राष्ट्रीय स्तराचा आवाका असलेल्या) चार अभ्यासक कार्यकर्त्यांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. आज राजा ढाले नाहीत, एस. एम. नाहीत, यदुनाथ नाहीत आणि अनिल अवचटही नाहीत. मात्र हे पुस्तक आणि तो अंक प्रकाशित करीत असताना त्या चौघांचे स्मरण होणे साहजिक आहे, म्हणून 15 ऑगस्ट 2022 चा साधना अंक त्या चौघांना अर्पण केला आहे.

- विनोद शिरसाठ
संपादक, साधना (साप्ताहिक व प्रकाशन)
weeklysadhana@gmail.com


Tags: साहित्य आंबेडकरी चळवळ राजा ढाले साधना अर्काइव्ह दलित पुरोगामी साधना विशेषांक Load More Tags

Comments:

Mayur

2019 साली हा लेख वाचनात आलेला. लेखकाच्या मनातील भावनांचा उद्रेक व त्या काळातील भयानक वास्तव या दोन्हींची दाहकता लेखातून तेव्हा जाणवलेली. त्या काळातील व आजची परिस्थिती यात काही फरक पडलाय का? की सद्यस्थितीला आपली एका पावलाने आणखी पिछेहाट झाली आहे? हे व असे आनेक प्रश्न मला नेहमीच पडत आले आहेत. त्यामुळे पुस्तकात काय असेल याची उत्सुकता आहे.

Add Comment