शोध पत्रकारितेचा वस्तुपाठ मांडणारे पुस्तक 

'शोधा खोदा लिहा - भाग दोन' या पुस्तकाचा परिचय 

साधारण तीन दशकांपूर्वी मराठीमध्ये प्रथमच फीचर सर्व्हिसचा एक आगळावेगळा उपक्रम सुरू झाला. फीचर सर्व्हिस म्हणजे विविध विषयांवरील लेखांचा पुरवठा करणारी संस्था. ज्या काळात मोबाइल, इंटरनेट, व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी साधने नव्हती, इतकेच नाही- तर प्रवासाच्या सुविधादेखील आजप्रमाणे सहज उपलब्ध नव्हत्या; त्या काळात उमेदीच्या काही उत्साही पत्रकारांनी हा आगळा उपक्रम सुरू केला. मराठीतला हा पहिलाच प्रयत्न असल्याने त्याचे नामकरण ‘युनिक फीचर्स’ असे केले गेले.

या उपक्रमामागील विचार अगदी साधा होता. लहान आणि मध्यम वृत्तपत्रांना खूपच मर्यादा असतात. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना आपले प्रतिनिधी वा वार्ताहर नेमणे शक्य नसते. त्यामुळे एखाद्या घटनास्थळी प्रतिनिधी गेले तरी तिथली संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पुरेसा वेळ देणे वृत्तपत्रांना परवडणारे नसते. त्यामुळे राज्यातील विविध भागांत घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांविषयी संबंधितांच्या मुलाखती वगैरे घेऊन, सांगोपांग चर्चा करून मिळवलेली विश्वसनीय माहिती लेखांद्वारे आणि तीही परवडणार्‍या दरात मिळाली तर माध्यमांना अशी सखोल माहिती मिळवण्यासाठी हवीच होती.

ही माहिती पुरवणाऱ्यांनाही वेगवेगळ्या भागांतील वृत्तपत्रांना ती पुरवता येत होती, कारण तशी त्यांची अटच त्यांनी सेवा देताना मान्य करून घेतलेली असे. शिवाय त्या त्या वृत्तपत्राच्या वितरणाच्या मुख्य क्षेत्रातील दुसर्‍या वृत्तपत्राला तो लेख देणार नाही, ही ग्राहकांची अट सेवा देणाऱ्यांनीही मान्य केलेली असे. यामुळे त्यांचे आर्थिक गणितही जमत होते. कारण मोठ्या वृत्तपत्रांतील लेख आपल्याकडेही येणार, आणि तेदेखील आपल्याला परवडणार्‍या दरात... लहान वृत्तपत्रांनाही ही बाब हवीहवीशीच होती.

या साधारण पंचवीस वर्षांच्या काळात ‘युनिक फीचर्स’ने वेगवेगळ्या विषयांवरील हजारो लेख तयार केले होते. त्यांतीलच काही निवडक महत्त्वाच्या लेखांचे संकलन तीन वर्षांपूर्वी ‘शोधा खोदा लिहा’ या पुस्तकातून प्रसिद्ध झाले. सुहास कुलकर्णी यांनी त्या पुस्तकाचे संपादन केले होते. युनिक फीचर्समधील पत्रकार मित्रांनी अनोख्या पद्धतीने लिहिलेल्या लेखांचा संग्रह संदर्भ म्हणून हाताशी असावा हा त्या पुस्तकाचा हेतू होता.

‘शोधा खोदा लिहा’ या पुस्तकाचा दुसरा भाग आता त्याच नावाने प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाचे संपादनही सुहास कुलकर्णी यांनीच केले आहे. ‘नमन’ असे शीर्षक असलेल्या प्रास्ताविकात या वाटचालीबाबत ते म्हणतात, ‘‘काळाच्या ओघात आम्ही मित्रांनी लिहिलेले लेख गडप होऊ नयेत आणि ते वाचकांच्या व पत्रकारांच्या पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध असावेत, अशी यामागची भूमिका होती. वाचकांच्या जुन्या-नव्या पिढीकडून पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला. तरुण पिढी 2000 सालानंतर वाचू लागली, त्यातील बहुतेकांनी ते लेख वाचले नव्हते. त्यामुळे तरुण वाचकही या अनोख्या लेखांकडे ओढला गेला. तरुण पत्रकार आणि पत्रकारितेचं शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना तर हे पुस्तक खासच मार्गदर्शक ठरेल, असं कित्येकांनी आवर्जून सांगितलं. हा अनुभव आम्हाला अनपेक्षित होता. या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे ‘शोधा खोदा लिहा’चा दुसरा भाग प्रकाशित करण्याची ऊर्जा आम्हाला मिळाली. पहिल्या भागात समाविष्ट हाऊ न शकलेले लेख आणि आणखी काही महत्त्वाचे लेख गोळा करून त्यांतील निवडक लेखांतून प्रस्तुत पुस्तक तयार झाले.’’

पुस्तकात एकूण बारा लेख असून त्यांचे चार विभाग केले आहेत. त्यांत चार शोधलेख, चार रिपोर्ताज, तीन सर्वेक्षण, तर उठवळ संस्कृतीचे करायचं काय?  हा एकच लेख गप्पालेख विभागात आहे. हे लेख 1994 ते 2011 या काळातील आहेत. जास्त लांबीचे दिवाळी अंक, मासिके, नियतकालिके, साप्ताहिकांत आणि साधारण लांबीचे वृत्तपत्रांत  प्रकाशित झाले होते. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक लेखाच्या विचारविनिमयात, माहिती संकलनात, लेखनात व संपादनात सहभागी झलेल्यांचे उल्लेख त्या त्या लेखाच्या शेवटी करण्यात आले आहेत. तत्कालीन संदर्भदेखील तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्या वेळचा विचार करूनच हे लेख वाचायचे आहेत आणि ते वाचताना अनेक बाबतींत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बाबींत किती बदल झाला आहे, याचेही भान येते. काहींमुळे समाधान होते तर काहींत घसरण होत असल्याचे पाहून वाईटही वाटते.

पुस्तकात काय वाचायला मिळेल हे सांगताना संपादकांनी त्यांतील काही लेखांबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘‘मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा त्या वेळी ज्वलंत बनलेला विषय, त्या वेळची परिस्थिती, एकूण वातावरण, त्यांतील राजकारणाचे संदर्भ, बहुतेक पक्षांच्या संदिग्ध भूमिका, दलितांवरील अत्याचारांबद्दलच्या वास्तवाचा गावोगावी जाऊन प्रत्यक्ष शोध घेऊन तक्रारींच्या खरेखोटेपणाचे वास्तव लिहून काढले. तो लेख महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला. त्या काळी माणसे ऊठसूट कोर्टात जात नसत. त्यामुळे घुश्श्यात का असेना पण या विषयावर शांतपणे चर्चा होऊ शकली. या लेखामुळे अनेक जण नाराज झाले खरे, पण दलित चळवळीतील तळागाळातील कार्यकर्त्यांचा दुवा आम्हाला मिळाला, हेही तितकंच खरं.’’

याच प्रकारे मुंबईतील बांगला घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने हाती घेतलेल्या मोहिमेचा वादग्रस्त विषय हाताळत वास्तवाचा शोध घेण्यासाठी बांगलादेशींसाठी बदनाम झालेल्या कंगाल वस्त्यांतील भटकंतीविषयीही यात लेख आहे. अलीकडे वृत्तवाहिन्यांवर ज्याप्रकारे दृक-श्राव्य रिपोर्ताज सादर करतात त्याचीच झलक वाटावी असा हा लेख. ‘सरकारी मोहिमेवर त्याचा काही परिणाम होण्याचा प्रश्‍नच नव्हता, पण तेव्हा होणारी मानवी हक्कांची पायमल्ली आमच्यामुळे किमान नोंदवली तरी गेली.’
हेही ते नोंदवतात.

‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ हा लेख वारकरी संतांच्या शिकवणुकीचे आपण काय करतो हे तपासणारा. भागवत संप्रदायातील संतांच्या थोर परंपरेने आपल्याला सामाजिक विषमता, अंधश्रद्धा आणि रूढी-दास्य यांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग सांगितला. भक्तिसंप्रदायाचा झेंडा खांद्यावर घेणारी वारकरी मंडळी तरी या मार्गावरून चालतात का, हे तपासण्यासाठी एक छोटेसे सर्वेक्षण करण्यात आले आणि एकूण समाजाच्या भोंगळपणाचे प्रतिबिंब त्या अभ्यासात दिसले.

ज्या प्रागतिक विचारांचा झेंडा घेऊन आपण निघालो आहोत त्यातील क्रांतिकारी विचार आपल्यात रुजत का नाहीत, हा समाजसुधारकांना कायमच पडणारा प्रश्न. संतविचारांचे अभ्यासक सदानंद मोरे आणि वारकरी दिंड्यांतील जातिप्रपंचावर आसूड ओढणारे बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून हा लेख प्रकाशित झाला. ‘धाव रे विठ्ठला मायबापा’ हा लेख देहू, आळंदी, नेवासा आणि पैठण या चार क्षेत्रांना भेटी देऊन समोर आलेले वास्तव मांडणारा आहे. महाराष्ट्रातल्या भक्तिसंप्रदायाचे आदिपीठ असलेल्या पंढरपूरसह वारकरी संप्रदायातील सर्वच तीर्थक्षेत्रांवर नागरी सुविधांचा ताण असतो. येथे येणार्‍या भाविकांची अत्यंत अपुर्‍या व्यवस्थांमुळे मोठीच गैरसोय होते, त्या बाबतची माहिती या छोटेखानी लेखात आहे.

‘सांस्कृतिक राजधानीचं गौडबंगाल’ हा लेख इतरांच्या तुलनेत खूपच मोठा असला तरी वाचनीय आहे. सोबतच तो अनेक प्रश्‍न उपस्थित करणाराही आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहराचे कालपरत्वे झालेल्या बदलांमुळे रूपच बदलून गेले. ‘हेच का ते पुणे?’ असा प्रश्‍न 1990च्या दशकात पडू लागला, तेव्हा पुण्याची जुनी वैशिष्ट्ये तरी शिल्लक राहणार का, या बदलात या शहराच्या सांस्कृतिक नेतृत्वाचे काय झाले, पुण्याच्या सांस्कृतिकतेचे काय झाले, अशा प्रश्नांवर या लेखात चर्चा करण्यात आली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीलाच पुण्यात सांस्कृतिक परंपरंची सुरुवात कशी झाली हे मांडून लेखाची सुरुवात केली आहे. त्यानंतर पुणेरी वैभवाचा काळ वर्णन केला आहे. त्यात विविध कलांची या शहरात भरभराट कशा प्रकारे होत गेली, याचा मागोवा घेतला आहे.

पुण्याच्या सांस्कृतिकतेविषयी अर्थातच मत-मतांतरे आहेत. त्यांचीही दखल घेण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील विविध भागांतील जाणकारांची मते नोंदण्यात आली आहेत. त्यात मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक दुवा असल्याचे नागपूरचे एलकुंचवार आणि कोल्हापूरचे भुतालिया यांचे मत बहुतेकांना, (लेख प्रकाशित झाला तेव्हा, म्हणजे 2010 मध्ये) मान्य होण्यासारखेच होते. आज काय परिस्थिती आहे, याचा शोधही घ्यायला हवा असे वाटते. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे हे पुण्याचेच. पण ‘‘माझं पुणं आता मलाच ओळखता येत नाही’’, असे ते सांगतात, तर विक्रम गोखले म्हणतात, ‘‘सध्याची माझी परिस्थिती पुण्यातच उपर्‍यासारखी झाली आहे.’’ हे सारे सांस्कृतिक परिवर्तन मुळातूनच वाचायला हवे.

आता पुणे हे शहर राहिले नसून त्याचे महानगरीकरण झाले आहे. तेथे आता जे काही कार्यक्रम होतात त्यांना कुणी सांस्कृतिक जिवंतपणा म्हणणार असेल तर म्हणोत बापडे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. चंगळवाद वाढत आहे, पुस्तकांबाबत मात्र हात आखडता होत आहे. पुण्याच्या सीमांवर प्रचंड लोकसंख्या वाढ झाली आणि पुण्याचा चेहराच पालटून गेला. आता या विस्ताराला कवेत घेणे अवघड होऊन बसले आहे.

आता सांस्कतिक सतर्कता आणि नव्या सर्जनाची कुणाला गरजच वाटत नाही. पूर्वस्मृतींमध्ये डुंबावे आणि अंग पुसून नैराश्याच्या मागे धावावे हा संस्कृतीचा आधारस्तंभ असलेल्या मध्यम वर्गाचा जीवनमंत्र झाला आहे. पण अशा अळीचे फुलपाखरात रूपांतर होणे शक्य नाही, याचे दुःख कुणालाच नाही. पुणेकरांच्या आनंदाच्या, मनःशांतीच्या, मनोरंजनाच्या कल्पना जगण्याच्या रेट्यात बदलून गेल्या आहेत. त्यामुळेच संपूर्ण पुणे ही महाराष्ट्राची राजधानी उरली आहे का? या अवघड प्रश्‍नाने लेखाचा शेवट केला आहे. तो प्रश्‍न अद्यापही कायम आहे.

‘त्यांच्या पाठीवरून शहरं धावतात...’ हा लेख अप्रकाशित असला, तरी महत्त्वाचा आहे. त्यात मांडलेले वास्तव आता अधिकच ठळकपणे जाणवत आहे. कष्टकर्‍यांच्या मदतीने आपली शहरे उभी राहतात. हे कष्टकरी स्वतः श्रम करून इतरांचे जगणे सुकर करतात आणि त्यायोगे आपल्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना समाजाची सहानुभूती तर नाहीच; पण सुरक्षा देईल असे कायद्याचे भक्कम संरक्षणही नाही, हे जळजळीत वास्तव आज, म्हणजे करोना आणि नंतरच्या काळात, तर अधिकच प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळेच त्यांच्याबरोबर बोलून, त्यांच्या संघटना बांधणार्‍या कार्यकर्त्यांशी बोलून, मुख्यतः हमाल, मोलकरणी, कचरा वेचक, बांधकाम कामगार आणि रिक्षावाले या घटकांच्या जगण्यामधून, त्यांच्या प्रश्‍नांमधून या बाबतची तीव्रता जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखात केला गेला आहे.

‘असंघटित क्षेत्रातील कष्टकर्‍यांच्या कल्याणासाठी सरकार व समाज या दोघांनीही कूर्म गतीने वाटचाल करण्याचे ठरवलेले दिसते (आज तर ती गतीही ठप्प झाल्याची परिस्थिती आहे!) शहरांत काम करणार्‍या कोट्यवधी लोकांना चांगले जगण्याची शाश्‍वतीच उरलेली नाही. दुसरीकडे शेतकरी, शेतमजूर व शेतीवर अवलंबून असणारे आता जगण्यासाठी शहराकडे धाव घेत आहेत. पण वाढत्या यांत्रिकीकरणाने (आणि आता संगणक प्रणालीच्या वाढत्या वापराने) रोजगार कमी होत आहेत. ही गंभीर स्थिती आहे. त्यामुळे मजुरीचे दर कमी होणे आणि सुविधा-हक्क यांच्या मागण्या मागे पडत आहेत. या सार्‍यात या माणसांना कदाचित काही स्थानही उरणार नाही. त्यामुळे येत्या काळात असंघटितांच्या प्रश्‍नांची तीव्रता अधिकच भीषण होण्याची शक्यता आहे,’ असे प्रतिपादन या लेखात करण्यात आले आहे. लेखातून व्यक्त केलेली ही भीती तर आज वास्तवातच आली आहे. मात्र हा लेख अप्रकाशित का राहावा, हा प्रश्‍न पडतो. मात्र आता या पुस्तकात समाविष्ट झाल्याने त्याला काहीसा न्याय मिळू शकेल.

पुढचा लेख आहे ‘नाखवा गावलाय जाळ्यात...’ हा लेख मच्छीमारीवर अवलंबून असलेल्या लक्षावधी लोकांबाबत आहे. सातशे किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा सागरी किनारा लाभलेल्या भागात औद्योगिक प्रदूषण, औष्णिक आणि आण्विक ऊर्जाप्रकल्पांचे तोटे, विविध कारणांनी निर्माण झालेले मत्स्यदुष्काळ या समस्यांमुळे मच्छीमारांची झालेली बिकट अवस्था यांचा त्या भागात फिरून घेतलेला आढावा म्हणजे हा दीर्घ लेख. सागर किनार्‍यावर आणि आजूबाजूला परिस्थिती बिकट आहे. मच्छीमारीसाठी उपयोगात येणार्‍या ट्रॉलर्सची संख्या वाढत असल्यामुळे फिश स्टॉकच धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र सरकार आणि बडे मच्छीमार याकडे दुर्लक्ष करत आहेत.

दुसरीकडे मच्छीमारांमध्ये संघटन आणि सहकाराचा अभाव असल्याने त्यांची परिस्थिती सुधारण्याची शक्यताही कमीच आहे. महाकाय बोटींमुळे छोट्या होड्यांतून मासेमारी करायला जाणेही धोकादायक बनले अहे आणि त्या बोटींच्या प्रचंड आवाजामुळे माशांचे कळपही दूर जाऊ लागले आहेत. त्यामुळे खाडीत मासळी येणेच बंद झाले आहे. औद्योगिकीकरणातून झालेल्या सागरी प्रदूषणामुळे निर्माण झालेले प्रश्‍नही आहेत. इतक्या समस्या असूनही शासनाने काहीच प्रतिबंधात्मक हालचाल का केली नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.

मत्स्यव्यवसायाला लागलेले ग्रहण आजही सुटलेले नाही. (2011 मध्ये लेख प्रसिद्ध झाल्यानंतर दहा वर्षांनीही असेच म्हणावे लागेल, कारण हे ग्रहण अधिकच गडद होत आहे, ही दुःखदायक बाब आहे.) आतापर्यंत मासेमारीसाठी जाळे फेकणारे कोळीबांधव आता स्वतःच समस्यांच्या जाळ्यात गुरफटले आहेत. त्यातील काही धागे सरकारी अनास्थेचे, काही लोकप्रतिनिधींच्या राजकारणाचे, काही आपल्याच समाजबांधवांच्या एककल्ली वृत्तीचे, तर काही परप्रांतीयांच्या आक्रमक प्रवृत्तीचे आहेत. ‘दिवसेंदिवस हे जाळे इतके घट्ट होत चाललंय की त्यातून स्वतःची सुटका करणं कोळीबांधवांसाठी अवघड बनलंय’, या वाक्याने लेखाचा अस्वस्थ शेवट केला आहे.

साखर कारखानदारी गर्तेत सापडलेली असतानाही उत्तम कामगिरी करणार्‍या साखर कारखान्यांच्या यशामागील गुपित समजून घेण्याचा प्रयत्न 1998 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘या गोड साखरेच्या गोड कहाण्या’  या लेखात करण्यात आला आहे. शेतकरी सभासदांना चांगला भाव देणारे, त्यांना व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणारे, गाळप जास्त व्हावे यासाठी धडपड करणारे, साखरेचा उतारा अधिक मिळावा म्हणून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारू पाहणारे, उधळपट्टीवर नियंत्रण मिळवू पाहणारे काही कारखाने महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी गर्तेत सापडलेली असताना उत्तम कामगिरी करणार्‍या कारखान्यांच्या यशामागील गुपित समजून घेण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे. हुतात्मा, मांजरा आणि विघ्नहर अशा कारखान्यांची प्रातिनिधिक उदाहरणेही  त्यात देण्यात आली आहेत.

आपल्या समाजाने लैंगिकता, कामजीवन आणि आनुषंगिक प्रश्‍न इत्यादी विषय दडपून टाकलेले आहेत. त्याचा दुष्परिणाम आजही आपल्या तरुण पिढीवर होत आहे. या प्रश्नांच्या कोंडीतून बाहेर कसे यायचे याबद्दल या विषयातील तज्ज्ञ, अभ्यासक आणि कार्यकर्ते यांच्याशी बोलून ‘माग कामकोंडीचा’ हा लेख तयार करण्यात आला आहे. आपल्या समाजात मोकळेपणा येण्यासाठी हा विषय कसा मांडता येईल याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. हा विषय लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत, शाळाकॉलेजातील नवयुवकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी विचारी लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. उपदेश केला जातो तो फक्त मुली, युवती तरुणींना. आपल्या मुलाला त्याने कसे वागावे वा मुलांवरील जबाबदारी काय आहे, याची चर्चा क्वचितच होते. खरे तर अशा चर्चेला जास्त महत्त्व द्यायला हवे असे वाटते.

‘शोध ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा’ हा लेख बाळ ठाकरे लोकप्रियतेच्या शिखरावर असताना लिहिलेला आहे. कदाचित तो काहीसा कालबाह्य वाटेलही, पण एखादा नेता कसाही वागत असला तरी अनेक कारणांनी लोकप्रिय का होतो हे समजून घ्यायचे असेल तर हा लेख वाचयला हवा. या देशात हिंदू-विचार व्यूहवादी बरीच मंडळी सध्या संघ समूहाच्या भोवती आहेत. म्हणजे ठाकरे यांना मिळालेली लोकप्रियता उद्या त्यांनाही मिळू शकते. या देशात हिंदू विचारव्यूहाचा फॅसिझम अवतरण्याबाबत काही विचारवंत जी काळजीयुक्त मते व्यक्त करत असतात तिला या निष्कर्षांतून पुष्टीच मिळत आहे.

लोकांचे प्रश्‍न नेत्याला कळतात का नाही हा प्रश्‍न दुय्यम झाला आहे, असेही या लेखात म्हटले आहे. (सध्याच्या जगदगुरू नेत्याच्या बाबतीत तर हे भाकीत सत्यच ठरले आहे. कारण ‘नेता म्हणेल ते धोरण आणि बांधेल ते तोरण’ म्हणणारे अनुयायी या नेत्यामागे प्रचंड संख्येने आहेत.)

यानंतर पुढचाच लेख आहे, ‘गांधीजींबाबत लोकांच्या मनात काय आहे?’ हाही आजच्या वास्तवात महत्त्वाचा ठरणारा आहे. या लेखात विविध लोकांनी मते व्यक्त केली आहेत. त्यातील विरोधी विचार व्यक्त करणाऱ्यांमध्ये तरुणही आहेत. सत्याकडे दुर्लक्ष करण्याची ही सवय काही नवी नाही. कारण हेच 1997 मधील तरुण आज मध्यमवयीन झाल्यावरही आपल्या बुरसटलेल्या विचारांचीच तळी उचलत आहेत.

लेखात शेवटी उपस्थित करण्यात आलेला प्रश्‍न विचार करायला भाग पडणारा आहे. ‘लोकांची गांधीजींवर श्रद्धा दिसते, प्रेम दिसते, पण त्यांचा या गांधीजींच्या मार्गावर विश्‍वास दिसत नाही. असं का?’

शेवटचा ‘गप्पा’ लेख हा वेगळ्या प्रकारचा, काहीसा नाटकाच्या जवळ जाणारा आहे. ‘उठवळ संस्कृतीचं करायचं काय?’ हा या चर्चेचा विषय आहे. चर्चेत अनेक अंगांनी या प्रश्‍नाचा विचार करण्यात आला आहे. अर्थातच त्यामुळे तो सहजच वाचला जातो आणि विचार करायला लावतो.

‘शोधा खोदा लिहा - भाग दोन’ हे पुस्तक पत्रकारितेचे शिक्षण घेणार्‍यांसाठी मार्गदर्शक आहे. शिवाय बातमी व लेख कोणत्या प्रकारे लिहिले जायला हवेत, याचा वस्तुपाठ मांडणारे आहे. प्रत्यक्ष पत्रकारिता करणार्‍यांनाही या पुस्तकातून शिकण्यासारखे बरेच आहे. शिवाय लेखाचे संपादन कसे करावे हेही यातून कळते. सर्वसाधारण वाचक वर्तमानपत्रेही वाचतो. त्याच्या मनातही पत्रकारितेविषयी कुतूहल असते. माहिती कशी गोळा केली जाते, तिच्यापासूनच लेख कसे बनवले जातात वगैरे. त्यांचे कुतूहलही या पुस्तकातून शमवले जाईल. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार केले आहे. तीन भिंगांच्या चश्म्याचे हे मुखपृष्ठही पुस्तकाप्रमाणेच कल्पक आणि विचार करायला लावणारे आहे. तसेच पुस्तकाचे स्वरूप सांगणारेही.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


शोधा खोदा लिहा - भाग दोन
‘यु्निक फीचर्स’चे निवडक, महत्त्वाचे लेख
संपादक : सुहास कुलकर्णी
प्रकाशक : आनंद अवधानी, सुहास कुलकर्णी
पाने : 166  किंमत : 200 रुपये.

Tags: पुस्तक नवे पुस्तक पत्रकारिता शोध पत्रकारिता आ श्री केतकर युनिक फीचर्स शोधा खोदा लिहा - भाग दोन सुहास कुलकर्णी Marathi Book New Book Journalism Reportage A S Ketkar Unique Features Suhas Kulkarni Load More Tags

Comments:

sharmishtha Kher

आता पुणे हे शहर राहिले नसून त्याचे "महानगरीकरण" झाले आहे. ... इतकं सतत इंग्रजी पद्धतीने सगळ्या क्रियांचा नाम (noun, nominalisation) का करून टाकायचं? पुणंं आता महानगर झालं आहे, किंवा फार तर पुण्याचं आता महानगर झालं आहे इतकी साधी रचना करणंं शक्य आहे आणि ते मराठीत रूढ आहे. डोक्यात इंग्लिश रचना ठेवून मराठीत लिहिण्याची वेळ आली का ? मराठीची धाटणी, वळण काय हे पत्रकारांनी प्रथम ध्यानात घ्यावंं. त्यांचा वाचून वाचून सर्वसाधारण जनता तशाच हेंंगाड्या रचना करायला लागते. मुलांचं लसीकरण ? की मुलांना लास देणे/ टोचणे ? माध्यमांचंं मनोरंजनीकरण ? अशी अनेक चुकीची उदाहरणं दाखवता येतील.

Add Comment