संत-महापुरुषांतला बुद्धिमार्गी मानवतावादाचा धागा दाखवणारे पुस्तक

डॉ. महावीर अक्कोळे यांच्या ‘संतांचा तो संग नव्हे भलतैसा...’ या पुस्तकाचा परिचय

पुस्तकातील डॉ. अक्कोळे यांचे मनोगत आवर्जून वाचण्यासारखे आहे. त्यामुळे या लेखांमागचा त्यांचा विचार किती महत्त्वाचा आहे हे कळते. लेखक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा ‘अंनिस’चा कार्यकर्ता. संतांविषयी लिहिल्यानंतर वाचकांनाही ते आवडू लागले. पण मित्रांनी विचारले की, ‘अंनिस’ला सोडचिठ्ठी दिलीस का? त्यांना उत्तर देताना अक्कोळे म्हणाले, “बाबांनो, आज ‘अंनिस’ जे काम करते आहे, ते - समाजातल्या भोंदू साधू, बाबा, बुवांचा पर्दाफाश करून त्यांना उघडे पाडायचे काम - या प्रबोधनकारी सत्शील मंडळींनी पाच-सातशे वर्षांपूर्वी चालू केले होते.”

डॉ. महावीर अक्कोळे यांनी त्यांच्या ‘संतांचा तो संग नव्हे भलतैसा...’ या नव्या पुस्तकात संतांच्या, आणि मानव जातीला महान तत्त्वज्ञान देणाऱ्या महामानवांच्या वचनांबद्दल भावनात्मक आत्मीयता बाजूला ठेवून सहानुभूतीने लिहिले आहे. भावनात्मक आत्मीयतेने केलेले हे लेखन असल्यामुळे त्यात अजिबात रुक्षपणा नाही, त्याचप्रमाणे आध्यात्मिक भाबडेपणाही दिसत नाही. आठ-नऊ वर्षांपूर्वी त्यांनी ‘महापुरुष’ या मासिकासाठी ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या सदरात लिहिलेल्या 27 लेखांचा हा संग्रह आहे.

हे आटोपशीर लेख स्वतंत्रपणे वेगवेगळ्या वेळी लिहिलेले असले, तरीही त्यात एक सलग धागा दिसून येतो. तो भावनाशील परंतु बुद्धिवादी मानवतावादाचा धागा आहे. त्यामुळे मोक्ष, परमार्थ, ईश्वरप्राप्ती या विषयांत हे विवेचन गुंतून पडत नाही. तर ते उदात्त मानवी मूल्यांना घेऊन पुढे जाते. सर्वसाधारणपणे लेखक कोणत्या तरी मार्गाचे अनुयायी असतात. त्यामुळे आपल्या प्रिय पंथाच्या पलिकडील पंथांना ते आपल्या विवेचनात स्थान देत नाहीत. पण इथे लेखक स्वतः पुरोगामी समन्वयवादी परंपरेचा पाईक असल्याने, वारकरी संतांबरोबरच जैन, बौद्ध परंपरेबद्दलही आत्मीयतेने लिहितो. हेच या पुस्तकाचे बलस्थान आहे. लेखकाने पुरुष संतांबरोबरच पाच स्त्री संतांविषयीदेखील लिहिले आहे. अगदी ग्रंथाचे शीर्षकही जनाबाईंच्या ‘संतांचा तो संग | नव्हे भलतैसा | पालटावी दशा | तात्काळिक ||’ या अभंगातूनच घेतले आहे, असे प्रस्तावनेत डॉ. राजेंद्र कुंभार यांनी म्हटले आहे.

जनाबाईंचा तो अभंग पुढीलप्रमाणे : 
संतांचा तो संग | नव्हे भलतैसा | पालटावी दशा | तात्काळिक || 
चंदनाचे संगे | पालटती झाडे । दुर्बळ लाकडे | देवमाथा || 
हे कां ऐसे व्हावें | संगती स्वभावे | आणिके न पालटावे | देहा लागे || 
तैसा निस्संगाचा | संग अग्रगणी | जनी ध्याय मनी | ज्ञानेश्वर ||

या अभंगाचा अर्थ लेखक सांगतो, ‘चंदनाच्या संगतीने इतर सामान्य झाडे-झुडुपेही गंधित होतात, त्याप्रमाणे संतसंगाने आपली सामान्य दशा पालटून जीवन धन्य होते. हे पटवून देताना जनाबाई आपल्यापुढे संतांमध्ये अग्रगण्य असलेल्या संत ज्ञानेश्वरांचे रोल मॉडेल उभे करतात.’ यातही संत जनाबाईंच्या अलौकिक प्रतिभेचा प्रत्यय येतो. पुढे तो म्हणतो की, ‘इतकी अभिजात प्रतिभा आणि इतकी तरल संवेदनशीलता लाभलेल्या संत जनाबाईंची निश्चित जन्मतिथी कोणती, त्या किती जन्मल्या, त्यांचा अंत केव्हा, कोठे, कसा झाला, त्यांना नैसर्गिक मृत्यू आला की त्यांनी समाधी घेतली याविषयी अजूनतरी काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही, हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.’

संतांवरील लेखांबरोबरच फादर स्टीफन्स, सुफी परंपरा, कवयित्री महदंबा, यांच्याबरोबरच पुस्तकातील परिशिष्टात तीन महापुरुषांविषयीचे लेख आहेत. ते महापुरुष संतपरंपरेमध्ये नसले, तरी त्यांचे विचार आणि वचने मानवी कल्याणासाठी महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा बसवण्णांचे (बसवेश्वर यांचे) विचार मांडून लेखकाने केलेले विवरण अत्यंत महत्त्वाचे आहे.

या पुस्तकातील डॉ. अक्कोळे यांचे मनोगत आवर्जून वाचण्यासारखे आहे. त्यामुळे या लेखांमागचा त्यांचा विचार किती महत्त्वाचा आहे हे कळते. लेखक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा ‘अंनिस’चा कार्यकर्ता. संतांविषयी लिहिल्यानंतर वाचकांनाही ते आवडू लागले. पण मित्रांनी विचारले की, ‘अंनिस’ला सोडचिठ्ठी दिलीस का? त्यांना उत्तर देताना अक्कोळे म्हणाले, “बाबांनो, आज ‘अंनिस’ जे काम करते आहे, ते - समाजातल्या भोंदू साधू, बाबा, बुवांचा पर्दाफाश करून त्यांना उघडे पाडायचे काम - या प्रबोधनकारी सत्शील मंडळींनी पाच-सातशे वर्षांपूर्वी चालू केले होते. कारण तेव्हासुद्धा भोळ्याभाबड्या भक्तांना फसवून लुबाडणारे, लुच्चे; साधुसंत म्हणवून घेणारे लुटारू होतेच ना? उलट संतांचेच काम आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

या लेखमालिकेतील लेखांच्या निमित्ताने लेखकाने अनेक ठिकाणांना भेट दिली, त्यामुळे नवी माहिती तर मिळालीच पण त्याबरोबरच त्याला सुफी संतांची ओळखही झाली. त्याला जाणवले की, शहरापेक्षा ग्रामीण भागातील जनतेची नाळ साधु- संतांशी, आध्यात्मिक भक्तिमार्गी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. दुसरे असे की, आदिपुराणात म्हटले आहे की, जीवन जगण्यासाठी असि, मसि, कृषी, विद्या, वाणिज्य आणि शिल्प ही सहा कामे करतच जीविकोपार्जन केले पाहिजे. जो उपदेश केला आहे, त्यात ‘कृषी भुकषणे प्रोक्ता...’ म्हणजे नांगराच्या फाळाने पृथ्वीचे विश्लेषण, म्हणजे नांगरणी, म्हणजे कृषीकर्म हे सांगितले. त्यात बी पेरले की अन्नधान्याची प्राप्ती होईल हे दंडासारखे उभे इक्षु तोडून दाताखाली चावलेत तर भरपूर मधूर आणि जीवनोपयोगी रस मिळेल असेही सांगितले आहे. शेती कशी करायची याचे शिक्षण देऊन त्यांनी एका अर्थाने कृषीसंस्कृतीचा आरंभ केला, म्हणजेच कृषी संस्कृती ऋषी संस्कृती इतकीच प्राचीन आहे. यामुळे संतांच्या अभंगांत येणारे कृषीसंस्कृतीचे उल्लेख त्यांनी या लेखांत अनेक ठिकाणी केले आहेत. शेती आणि शेतकऱ्यांचे जीवनातील महत्त्व किती आहे, हेही अनेक दाखले देऊन दाखवले आहे.

तिरुवल्लुवर यांच्या कुरलकाव्यातील एक वचन देताना अक्कोळे म्हणतात की, ‘हे वाचताना माझ्यासारख्या शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या माणसाला आनंद आणि आश्चर्याने दिङ्मूढ व्हायला होते.’ ते वचन असे : जमीन कसून जे राहतात (म्हणजे शेतकरी) तेच खरोखर जगतात. बाकी सारी दुनिया त्याच्या पाठोपाठ येते नि मिंधेपणाची भाकर खाते या रचनेत माणसाची भूक तहान भागवणाऱ्या शेतकऱ्याची महानता दाखवून दिली आहे. कारण माणूस श्रीमंत, सरदार, दरकदार असला तरी त्याची मूलभूत गरज अन्नपाण्याचीच असते शेतकरी स्वतःच्या कष्टातून पिकवलेली भाकरी खातो. त्यामुळे तो सर्वश्रेष्ठ स्वाभिमानी असतो आणि उच्चासनावर बसून सोन्याच्या ताटातून जे शेतकऱ्याच्या श्रमाततून निर्माण झालेली भाकरी खातात, तेव्हा ते शेतकऱ्यांचे मिंधेच असतात. कुरलकाव्यात या प्रकारे अनेकदा उदाहरणे देऊन शेतकऱ्यांची थोरवी वर्णन केलेली आहे. अगदी कठीण परिस्थितीतही मन कठोर करून कर्तव्य केले पाहिजे, हे सांगताना शेतकऱ्याचा दाखला देऊन तुकाराम महाराज म्हणतात, ‘मढे झाकुनिया | करिति पेरणी | कुणबियाचे वाणी | लवलाहे ||’

‘एखाद्या शेतकऱ्याच्या घरात मृत्यू झाला असेल आणि नेमका त्याच वेळी पाऊस पडून पेरणीसाठी घात आला असेल, तर तो मन घट्ट करून, दुखः गिळून, ते मढे झाकून ठेवून पेरणी करतो. यातून तुकोबारायांनी यातल्या शेतकऱ्याने कर्तव्यपालनाचे अतिशय उच्च अधिष्ठान आपल्यापुढे उभे केले आहे’, असे सांगून लेखक म्हणतो की, ‘या शेतकऱ्याला त्याच्या कर्तव्यकठोरतेसाठी सलामच करावासा वाटतो.’ अन्य संतांनी वर्णन केलेली शेतकऱ्याच्या महानतेची वर्णनेही पुस्तकात आहेत.

ज्ञानदेवाच्या कर्मयोगाच्या तत्त्वज्ञानाची मांडणी जैन तत्त्वातील अकिंचन्य तत्त्वाशी बरीचशी मिळतीजुळती आहे, असे लेखकाला वाटते. ज्ञानेश्वरांनी केवळ तत्कालीन समाजाच्या सर्वांगीण सुखाचा विचार केला नाही, तर त्यांना अखिल मानवजात अभिप्रेत होती. त्यांनी केलेले मराठी भाषेच्या संगोपनाचे, समृद्धीचे, लौकिकाचे कार्य केवळ अजोड आहे. असे सांगणारे डॉ. अक्कोळे तुकोबांबाबत म्हणतात की, ‘त्यांनी आयुष्यभर जे जे अनुभवले ते आपल्या मुखातून प्रकटवले आणि त्या अलौकिक अभंगांमधून ही सारी सूक्ष्म निरीक्षणे प्रभावीपणे मांडली. त्यामुळेच ‘आनंदाचे डोही | आनंद तरंग | आनंदचि अंग | आनंदाचे ||’ हा अभंग वाचताना त्या तृप्तीचा, परिपक्वतेचा, अवीट गोडीचा आणि उत्कटभावाचा अनुभव आपल्यालाही येतो. म्हणूनच संतश्रेष्ठ तुकारामांबद्दल महाराष्ट्र आणि मराठी वाचक कायमचा कृतज्ञ राहील, ऋणी राहील.

नामदेवांचे वर्णन लेखकाने ‘ज्ञानदेवांचे आद्य चरित्रकार, अमृतवाणीची खाण’ असे केले आहे. त्याबरोबरच ते कुशल संघटकही होते. सर्वसामान्यांचे वारकरी होते. वर्षातून एकदा पंढरीला जावे, भजन-कीर्तन करीत विठुरायाला डोळे भरून पहावे, ही वारीच्या वारकऱ्यांची कृतार्थ मानसिकतेची भक्तिप्रथा आहे. ती सोपी, बिनखर्चाची, बिनपूजाअर्चेची आहे. ती केवळ नामदेवांच्या संघटनकौशल्याचे फळ आहे, हे सांगून लेखक म्हणतो की, ‘संत नामदेवांनी तयार केलेले वारकरी हे काही निव्वळ भक्ताळू, श्रद्धाळू नव्हते, तर ते साहसी वीर दिंडीकर होते. ते अन्याय, विषमता, वर्णव्यवस्था यांच्या विरोधात लढणारे लढवय्ये वीर होते. कळीकाळालासुद्धा भिऊन पळून जायला लावणारे नामदेवांचे हे वारकरीसैन्य खरोखरच अभूतपूर्व असेच होते.’


हेही वाचा : तुकोबांशी मुक्त काव्य संवाद (राजेंद्र दास यांच्या 'तुकोबा' या काव्यसंग्रहाचा परिचय) - आ. श्री. केतकर


ज्ञानेश्वरांच्याही आधी तीनशे वर्षांपूर्वीचे लोककल्याणकारी महाकवी पुष्पदंत यांचाही समावेश पुस्तकात केला आहे. मूळचे शैव असलेल्या पुष्पदंत यांनी त्या पंथाचा त्याग करून जैन धर्माचा स्वीकार केला होता. त्यांनी ‘महापुराण’ हे महाकाव्य महाराष्ट्री अपभ्रंश भाषेत लिहिले. या भाषेला राष्ट्रकुटकालीन मराठी असेही म्हटले जाते, असे लेखक सांगतो. त्यांच्या आणि ज्ञानेश्वरांच्या काही रचनांतील साम्यही त्याने दाखवले आहे. उदा. त्यांच्या ‘महापुराणा’तील ‘कवडका’मध्ये म्हणतात, वरिसड मेह-जालु वसुदारहिं | णहि पिच्चड बहु, धण्ण पयारहिं | णंदड देसु सुहिक्खु वियंभड | जणु मिच्छतु दुचितत्त्तु णिसंभऊ ||  म्हणजे, योग्य समयी मेघसमूह आपल्या संपत्तिधारांनी वर्षाव करोत. पृथ्वी विपुल धनधान्यांनी भरून राहो. सर्व देश आनंदी होवो. सर्वत्र सुभिक्षसुकाळ होवो. लोक आपल्या मिथ्यात्वाचा, अज्ञानाचा, वाईट विचाराचा त्याग करोत. त्यांनी व्यक्त केलेली ही लोककल्याणाची भावना तीनशे वर्षांनंतर ज्ञानदेवांनी तितक्याच उत्कटतेने प्रभावी शब्दांत व्यक्त केली आहे. ‘जे खळांची व्यंकटी सांडो | जो जे वांच्छिल तो ते लाहो |’ ही तुलना केवळ साम्य दाखविण्यासाठीच केली आहे.

डॉ. अक्कोळे यांच्या या लेखांच्या शीर्षकांतून त्यांनी त्या त्या संताची, तसेच लेखातील व्यक्तींची महतीच वर्णन केली आहे. सर्वच लेखांवर शब्दमर्यादेत लिहिता येणार नाही. म्हणून केवळ या लेखांची शीर्षके देत आहे, त्यावरून वाचकांना अंदाज करता येईल.

‘प्रखर प्रज्ञावंत प्रतिभासंपन्न महाकवी - संत ज्ञानेश्वर’; ‘श्रमसंस्कृतीचे उदघोषक - संत तुकाराम’, ‘पांडुरंगाच्या प्रति नामयाची अमृतवाणी - संत नामदेव’, ‘आध्यात्मिक अधिकारी स्त्रीत्वाचा तप्त आदिम हुंकार - संत मुक्ताबाई’, ‘संत भानुदासाची समकालीन - संत कान्होपात्रा’; ‘पंढरीची माहेरवाशीण, आद्य दलित कवयित्री - संत जनाबाई’; ‘आद्य दलित वाङ्मयकार - संत चोखामेळा’; ‘व्यसनमुक्तीचे आद्य आंदोलक - संत सेनामहाराज’; ‘परमार्थिक, प्रापंचिक विरक्त विरागी पुरुष - संत गोरा कुंभार’; ‘प्रखर बुद्धिमत्तेचा अलौकिक वाङमयीन आविष्कार - संत सोपानदेव’; ‘मळ्याची केली पंढरी, फुलविला भक्तीचा मळा - संत सावता माळी’; ‘चतुरस्त्र संशोधक संपादक संत - संत एकनाथ महाराज’; ‘ग्रामस्वच्छता तत्त्वांचे पुरस्कर्ते राष्ट्रसंत - तुकडोजी महाराज’; ‘इहलोक परलोक दोन्ही साधून सुखी संसाराचा मंत्र देणारे - महंत रामदास’; ‘अलौकिक शब्दसामर्थ्य नि जिवंत शब्दचित्राचे धनी - संत कवी मुक्तेश्वर’; ‘बहुआयामी, बहुश्रुत, बहुभाषक तत्त्वज्ञ - संत दासोपंत’; ‘नागेश संप्रदायी आद्याचार्य ज्ञानवंत तत्त्वज्ञ - संतकवी अज्ञानसिद्ध’; ‘समतेचा पुरस्कर्ता, समाजसुधारक संत - संत रोहिदास’; ‘कृष्णमूर्तीशी एकरूप चैतन्यप्रेमी - संत मिराबाई’; ‘मार्मिक, आशयघन रचनाकार, निर्भीड स्पष्टवक्ता - संत कबीर’; ‘पाखंड खंडन करणारा प्रभावी पण उपेक्षित कवी - संत मन्मथस्वामी’; ‘मराठीविषयी अपार आदर, महानुभावपंथी ईश्वरावतार - संत चक्रधर स्वामी’; ‘शीघ्रकवित्व, सिद्धवाणीधारक मराठीची आद्य कवयित्री कवयित्री -महदंबा’; ‘सद्वर्तन-परोपकाराचा नितांत सुंदर मिलाफ सुफी संत परंपरा’; ‘मराठी भाषेचा ब्रिटिश सेवक - फादर स्टीफन्स’; ‘लोककल्याणकारी नादमधुर कवडसे - महाकवी पुष्पदंत’; ‘उत्कृष्ट आणि अलौकिक महाकाव्यकार - संत कवी तिररुवल्लुवर’.

याशिवाय आधी सांगितल्याप्रमाणे भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा बसवेश्वर यांच्यावरील लेखही आहेत. नंतर संदर्भसूचीही दिली आहे. एकूण आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

संतांचा तो संग नव्हे भलतैसा
लेखक : डॉ. महावीर अक्कोळे
प्रकाशक : रावसाहेब पुजारी;
तेजस प्रकाशन, कोल्हापूर
पाने : 168 , किंमत : 155 रु.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: संतपरंपरा मानवतावाद सहिष्णू संतवचने ज्ञानेश्वर बसवेश्वर नामदेव जनाबाई कबीर Load More Tags

Comments:

Vasant Patil , Kolhapur

How do I get this book .

Hude Vilas Tulshiram

Where is book is available

Add Comment