भारताच्या युवा शक्तीचे यश!

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत 18 वर्षांचा रमेशबाबू प्रज्ञानंद उपविजेता ठरला, तर नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवले.

नीरजने आता भालाफेकीच्या सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. 2016 मध्ये तो जागतिक कुमार विजेता होता. 2017 मध्ये आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तो विजयी झाला होता. आणि 2018 मध्ये एशियाड आशियाई क्रीडा स्पर्धा, त्याच वर्षी राष्ट्रकुल स्पर्धांतही त्याने सुवर्ण पदक मिळवले होते. शिवाय डायमंड लीगमध्ये 2022 आणि 2023 मध्ये त्याने प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत, तर गेल्या वर्षी डायमंड लीगची चॅम्पियन्स ट्रॉफीही त्याने मिळवली होती. आता सर्वांची नजर तो पॅरिस ऑलिंपिकमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे लागून राहील.

भारताच्या क्रीडापटुंसाठी गेला आठवडा हा संस्मरणीय होता. कारण, सुरुवातीला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत रमेशबाबू प्रज्ञानंद उपविजेता ठरला. विश्वनाथन आनंदनंतर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो पहिलाच भारतीय. केवळ 18 व्या वर्षी ही कामगिरी त्याने केली. त्यापाठोपाठ नीरज चोप्राने ऑलिंपिकप्रमाणे जागतिक स्पर्धेतही भालाफेकीत सुवर्णपदक मिळवले.

नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले. ते काही प्रमाणात अपेक्षितच होते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर किशोर जेना आणि डी. पी. मनु यांनीही अनुक्रमे पाचवा आणि सहावा क्रमांक मिळवला. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताने सुवर्णपदक मिळविण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याचप्रमाणे एकाच स्पर्धा प्रकारात तीन भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचीही..

नीरजने दोनच वर्षांपूर्वी ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवले होते. त्यावेळी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अभिनव बिंद्रानंतरचा तो पहिलाच खेळाडू ठरला होता. आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून त्याने पुन्हा एकदा अभिनवप्रमाणेच या दोन्ही स्पर्धांत सुवर्णपदक मिळवण्याची अभिमानास्पद कामगिरी केली. गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेत त्याने रौप्य पदक मिळवले होते आणि अंजू बॉबी जॉर्जनंतर या स्पर्धेत पदक मिळवणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला होता. अंजूने 2003 मध्ये लांब उडीत ब्राँझ पदक मिळवले होते. ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धा विजेता असणारा तो तिसराच खेळाडू आहे. याआधी चेक रिपब्लिकचा अद्वितीय यान जेलेइनी (तीन वेळा) आणि नॉर्वेचा आंद्रिआस थोरकिल्डसन यांनी असा पराक्रम केला होता.

अंतिम फेरी गाठताना प्राथमिक फेरीत त्याने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर दूरवर भाला फेकला होता आणि ती कामगिरी त्याला अंतिम फेरीत नेण्यास पुरेशी होती. त्यामुळे त्याने नंतर प्रयत्न केलेच नाहीत. दुसरे म्हणजे या फेकीने त्याने पुढील वर्षीच्या पॅरिस ऑलिंपिकमध्येही आपली जागा पक्की केली. अंतिम फेरीत त्याचा पहिला प्रयत्न अवैध ठरला. पण नंतरच्या प्रयत्नात त्याने 88.17 मी. दूरवर फेक केली आणि त्या फेकीनेच त्याला सुवर्णपदक मिळवून दिले. कारण नंतरच्या प्रयत्नांमध्ये तो प्राथमिक फेरीपेक्षा अधिक दूरवर फेक करू शकला नाही. तराही बाकी स्पर्धकांपैकी कोणीही 88 मी. ची मजलही गाठू शकला नाही. अर्थातच नीरज विजेता ठरला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.62 मी. दूरवर फेक करून दुसरा क्रमांक मिळवला. 

किशोर जेना आणि डी. पी. मनु यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीसाठी किमान फेकीची मर्यादा असताना केवळ नीरज आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांनीच ती पार केली होती. त्यामुळे क्रमवारीतील अन्य सहा जणांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आले होते. या दोघांनी पात्रता फेरीत जेमतेम 79 मी. ची मर्यादा पार केली होती. मात्र अंतिम फेरीत मात्र दोघांनीही कामगिरी खूपच सुधारली आणि अनुक्रमे 84.70 मी. आणि 84.14 मी. दूरवर फेक ही त्यांची सर्वोच्च कामगिरी होती.

नीरजने आता भालाफेकीच्या सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. 2016 मध्ये तो जागतिक कुमार विजेता होता. 2017 मध्ये आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तो विजयी झाला होता. आणि 2018 मध्ये एशियाड आशियाई क्रीडा स्पर्धा, त्याच वर्षी राष्ट्रकुल स्पर्धांतही त्याने सुवर्ण पदक मिळवले होते. शिवाय डायमंड लीगमध्ये 2022 आणि 2023 मध्ये त्याने प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत, तर गेल्या वर्षी डायमंड लीगची चॅम्पियन्स ट्रॉफीही त्याने मिळवली होती. आता सर्वांची नजर तो पॅरिस ऑलिंपिकमध्ये कशी कामगिरी करतो, 10 मी. चा टप्पा पार करतो का याकडे लागून राहील.

नीरज चोप्रा

प्रज्ञानंदचे मोठे यश

कोविड महामारीच्या काळात भारतातील युवा खेळाडूंनी बुद्धिबळात आपले अस्तित्व मोठ्या प्रमाणात दाखवायला सुरुवात केली. पण त्यातही प्रज्ञानंद याच्याकडेच भारताचे आशास्थान म्हणून पाहिले जात होते. लहान वयातच आपल्या कौशल्याने त्याने सर्वांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या. त्याच्याबरोबरच डी. गुकेश, अर्जुन इरिगेसी आणि निहाल सरिन यांनीही त्याच्याच पावलावर पाऊल टाकत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. या चौघांनीही जागतिक स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता. ही कामगिरी आश्चर्यकारक म्हणावी अशीच होती. कारण यापैकी कोणीही अद्याप विशी ओलांडलेली नाही. त्यामुळेच आता भारताकडे बुद्धिबळातील एक शक्ती म्हणून आता पाहिले जात आहे.

उपान्त्यपूर्व फेरीत प्रज्ञानंदने भारताच्याच अर्जुन इरिगेसीचा टायब्रेकरमध्ये पराभव करून उपान्त्य फेरी गाठली होती. उपान्त्य फेरीत त्याची गाठ सध्याचा अमेरिकन विजेता फॅबिआनो कारुआना याच्याशी होती आणि त्यात कारुआना सहज विजयी होईल असा अंदाज जाणकारांकडून केला गेला होता. परंतु त्या सर्वांचा अंदाज प्रज्ञानंदने चुकवला. या लढतीतदेखील दोघांची बरोबरी झाल्याने टायब्रेकरचा वापर करावा लागला आणि त्यात प्रज्ञानानंद विजयी झाला. अंतिम फेरीत त्याची गाठ महान खेळाडू, जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन याच्याबरोबर होती. त्यातही प्रज्ञानंदने पारंपरिक आणि जलदगती अशा दोन्ही प्रकारांत कार्लसनशी बरोबरी करून सर्वांची वाहवा मिळवली. मात्र टायब्रेकरमध्ये मात्र त्याला यश आले नाही. पहिला डाव तो हरला आणि दुसऱ्यात त्याला कार्लसनला केवळ बरोबरीत रोखता आले. त्यामुळे त्याला 00.5-1.5 गुणांनी हार पत्करावी लागली. मात्र कार्लसनला अशी कडवी झुंज दिल्याने सर्वांनी त्याचे कौतुकच केले.

कोविड-19 महामारीमध्ये प्रत्यक्ष स्पर्धा घेणे शक्य नव्हते. परंतु त्याआधीच प्रज्ञानंदची ओळख भारताचा उगवता तारा, अशी झाली होती. वयाच्या केवळ दहाव्या वर्षी त्याने ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ हा किताब मिळवला होता. असा मान मिळवणारा जगातला तो सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला होता. आणि नंतर 12व्या वर्षी, 2018 मध्ये त्याने ग्रँडमास्टर किताबही मिळवला. त्यावेळी बॉबी फिशरनंतरचा लहान वयात हा किताब मिळवणारा तो दुसराच खेळाडू होता. त्याच वर्षी सरिन आणि इरिगेसीही ग्रँडमास्टर बनले आणि नंतरच्याच वर्षी डी. गुकेशदेखील त्यांच्या मालिकेत जाऊन बसला. चौदाव्या वर्षी प्रज्ञानंदचे इलो रेटिंग 2600 (मान्यताप्राप्त स्पर्धांतील कामगिरीबद्दल दिले जाणारे गुण म्हणजे ‘इलो रेटिंग’) होते आणि तोही त्यावेळचा जागतिक विक्रम होता.

कोविड महामारीमुळे दीड वर्ष वाया गेले. परंतु त्याकाळात प्रज्ञानंदने जगातील सर्व अव्वल खेळाडूंबरोबर ऑनलाइन सामने खेळून चांगली प्रगती केली. चांगला अनुभव मिळवला. परंतु या काळात जागतिक संघटनेची (‘फिडे’ची) मान्यता असलेल्या स्पर्धाच झाल्या नाहीत. त्यामुळे इलो गुणपद्धतीत मिळणारे गुण खेळाडूंना मिळवता आले नाहीत, असे प्रज्ञानंदचे शिक्षक आर. बी. रमेश (जे 2010 मध्ये ग्रँडमास्टर बनले होते. पण थोड्याच काळात त्यांनी प्रशिक्षक बनणे पसंत केले) सांगतात. गेल्या वर्षी तो अशा सामन्यांत केवळ 60 वेळा खेळला. मात्र त्याची खेळातली कामगिरी तितकीच प्रभावी होती.

यानंतर तो जलदगती स्पर्धात खेळला. पारंपरिक सामन्यात न खेळल्याने त्याला रेटिंगमध्ये फारशी प्रगती करता आली नाही. तरी मिळालेला अनुभव अमोल होता. त्या जलदगती ऑनलाइन सामन्यांत त्याने कार्लसनलाही हरवले होते.. गेल्या काही महिन्यांत त्याने आणखी एक मान मिळवला. जुलै महिन्यात गुण पार करणारा तो सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला. आणि त्याने विश्वनाथन आनंदलाही इलो रेटिंगमध्ये मागे टाकले. आधीच्या फेऱ्यांत कार्लसनने एकदा त्याला बरोबरीचा प्रस्ताव दिला होता पण तो नाकारून प्रज्ञानंद पुढे खेळला. तो डाव प्रज्ञानानंद हरला. मात्र त्याच्या लढाऊ वृत्तीचे कार्लसनने कौतुक केले होते. या कामगिरीमुळे त्याला आता कॅनडात होणाऱ्या कँडिडेट स्पर्धेतही प्रवेश मिळाला आहे.

या युवा बुद्धिबळपटुंकडे पाहता आता भारतीय बुद्धिबळ मोठे यश मिळवण्याच्या मार्गावर आहे, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. आनंदने रुजवलेला हा वृक्ष आता चांगलाच बहरू लागला आहे!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक, ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: neeraj chopra praggnanandhaa chess world cup FIDE a s ketkar vishwanathan anand sports क्रीडा बुद्धिबळ नीरज चोप्रा प्रज्ञानानंद विश्वचषक विश्वनाथन आनंद प्रज्ञानंद Load More Tags

Add Comment