शारिकव हे केवळ एक पात्र नाही; तो संपूर्ण बोल्शेविक सामाजिक प्रयोगाचा विद्रूप परिणाम आहे. शारीक हा दबलेल्या जनतेचा प्रतिनिधी असेल, तर शारिकव हा त्या जनतेच्या नावावर उभं राहून सत्ता हस्तगत करणाऱ्या अनैतिक, असंवेदनशील नेत्यांचा प्रतिनिधी आहे. तो क्रांतीचा नारा देतो, समानतेची भाषणं ठोकतो, पण प्रत्यक्षात इतरांच्या श्रमावर जगणारा, स्वतःच्या लहानसहान सत्तेचा गैरवापर करणारा परजीवी आहे.
मिखाइल बुल्गाकव यांची मूळ रशियन भाषेत लिहिलेली ‘कुत्र्याचं काळीज’ (1925) (रशियन: Собачье сердце (सबाच्ये स्येरत्से), इंग्रजी: The Heart of a Dog) ही लघुकादंबरी वाचताना असं वाटतं, की आपण स्वतःच्याच मनासमोर उभा केलेल्या आरशात पाहत आहोत. हा आरसा माणसाच्या आत लपलेली विकृती, सत्तेची हाव, नैतिक पोकळी आणि माणूसपणाच्या मर्यादा स्पष्टपणे दाखवतो. ही कथा केवळ एका वैज्ञानिक प्रयोगाची कल्पनारम्य गोष्ट नाही. ती माणसाच्या अहंकारावर, सत्तेच्या नशेवर आणि “नवा माणूस” घडवण्याच्या नावाखाली होणाऱ्या नैतिक अधःपतनावर केलेली तीव्र टीका आहे.
आकाराने लहान असली तरी या कादंबरीचा परिणाम खोलवर जाणारा आहे. सुरुवातीपासूनच ती वाचकाला अस्वस्थ करते. विसाव्या शतकातील राजकीय उन्माद, विज्ञानावरचा अति विश्वास आणि मानवी स्वभावात दडलेली हिंसा या सगळ्यांचा वेध ही कथा घेत राहते. म्हणूनच ‘कुत्र्याचं काळीज’ ही केवळ रशियन साहित्यातली नाही, तर जागतिक साहित्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी कलाकृती ठरते.
कादंबरी जेव्हा लिहिली गेली तेव्हा रशिया हा 1917 च्या बोल्शेविक क्रांतीनंतरच्या मोठ्या झंझावातातून सावरायचा प्रयत्न करत होता. जुनी राजेशाही व्यवस्था कोसळली होती; झारचं साम्राज्य राखेत मिळालं होतं. त्या राखेतून उगवणारी नवी बोल्शेविक सत्ता मात्र केवळ राजकीय उलथापालथ करून समाधानी नव्हती; तिला एक “नवा सोव्हिएत माणूस” घडवायचा होता. त्यातूनच जनतेच्या नैसर्गिक प्रवृत्तीला ‘दुरुस्त’ करण्याचे, तिच्या विचारपद्धतीला एका विशिष्ट साच्यात बसवण्याचे प्रयोग सुरू झाले. या पार्श्वभूमीवर बुल्गाकव यांनी लिहिलेली ‘कुत्र्याचं काळीज’ ही केवळ एक विलक्षण कल्पक कथा नसून, त्या काळाच्या राजकीय आणि नैतिक वातावरणावर केलेली धारदार टिप्पणी आहे.
बुल्गाकव स्वतः डॉक्टर होता. रशियन यादवी युद्ध, भूक, रोगराई, मृत्यू, आणि सत्तेची क्रूरता यांचा त्याने प्रत्यक्ष सामना केला होता. सत्तेची नवी व्यवस्था केवळ राजकारण बदलत नाही, तर माणसाचा स्वभाव, त्याची भाषाशैली, त्याची नैतिक चौकट आणि सत्याशी असलेलं त्याचं नातंही बदलण्याचा प्रयत्न करते, हे त्याने जवळून जाणलं. म्हणूनच विज्ञान, सत्ता आणि मानवी प्रवृत्ती यांच्याबद्दल त्यांच्या मनात साचलेल्या अस्वस्थ प्रश्नांमधून ‘कुत्र्याचं काळीज’ ही कादंबरी जन्माला आली.
या कलाकृतीचा राजकीय विस्फोटकपणा सत्तेला फार लवकर लक्षात आला. गुप्तचर यंत्रणेनं बुल्गाकव यांच्या घरावर छापा टाकून हस्तलिखित जप्त केलं; ह्या कादंबरीवर जवळपास सहा दशके अधिकृतपणे बंदी राहिली. 1987 मध्ये, गोर्बाचेव्ह यांच्या ‘ग्लासनोस्त’च्या (पारदर्शकता आणि मोकळेपणाच्या) धोरणानंतर ती पहिल्यांदा अधिकृतपणे प्रकाशित झाली.
कथेची सुरुवात मॉस्कोच्या बर्फाच्छादित, थंड, निर्दय रस्त्यांवर भटकणाऱ्या एका भटक्या, उपाशी कुत्र्यापासून होते– शारीक. रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांच्या लाथा खात जगणारा जखमी शारीक हा केवळ एक प्राणी नाही; तो तत्कालीन रशियातील तळागाळातील, असहाय आणि दडपल्या गेलेल्या जनतेचं प्रतीक आहे–ज्याच्यावर सत्तेचे प्रयोग होतात, पण ज्याला स्वतःच्या आयुष्याबद्दल काहीही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. कादंबरीच्या सुरुवातीस बुल्गाकव शारीकच्या नजरेतून वाचकाला क्रांतीपश्चातचं मॉस्को शहर दाखवतात. शारीकची भाषा विलक्षण जिवंत आहे. त्याच्या डोक्यात येणारे विचार, भीती, भूक, राग, सूड, आणि कधी कधी लहानसहान आनंदाचे क्षण हे सगळं इतकं टोकदार आणि मानवी आहे की वाचकाला नकळत त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण होते. गंमत अशी की, या टप्प्यावर माणसं–विशेषतः नोकरशहा, अधिकारी आणि नवे ‘क्रांतिकारी’–अमानवी वाटू लागतात, आणि कुत्रा जास्त संवेदनशील, जास्त समजूतदार भासतो.
याच अवस्थेत शारीकची भेट होते डॉ. फिलिप फिलिपविच यांच्याशी. हे एक प्रसिद्ध शल्यविशारद; श्रीमंत, प्रतिष्ठित, रुबाबदार, आणि किंचित अहंकारी व्यक्तिमत्व. ते शारीकला रस्त्यावरून उचलतात, आपल्या आलिशान अपार्टमेंटमध्ये आणतात. अचानक शारीकचं आयुष्य बदलल्यासारखं वाटतं. त्याला वाटतं, “देवानेच आपल्याला हात दिला.” पण थोड्याच वेळात स्पष्ट होतं की हा आश्रय करुणेचा नसून, प्रयोगशाळेचा आहे. शारीक आता एका धाडसी वैद्यकीय प्रयोगातील ‘मालमत्ता’ आहे. डॉ. फिलिप फिलिपविच आणि त्यांचे सहाय्यक डॉ. बर्मिंताल अशा एका प्रयोगाला सुरुवात करतात, जो त्या काळातील वैज्ञानिक आणि समाजवैज्ञानिक महत्त्वाकांक्षा याचं प्रतीक ठरतो. मानवी पिट्युटरी ग्रंथी आणि अंडकोष ते शारीकच्या शरीरात प्रत्यारोपित करतात. उद्देश? वृद्धत्वावर मात करणे, मानवी देहाचा कायाकल्प करणे, आणि निसर्गाच्या या अखेरच्या किल्ल्यांवरही विजय मिळवणे.
पण हा महत्त्वकांशी प्रयोग एक वेगळंच वळण घेतो. शारीक हळूहळू माणसात रूपांतरित होऊ लागतो. त्याला बोलता येऊ लागतं, तो उभा चालतो, कपडे घालतो, सिगारेट ओढतो, शिव्या देतो. तो स्वतःचं नाव ठेवतो– शारिकव! पण हा नवा माणूस “नवा माणूस “ठरत नाही. शारीककडे असलेली निरागसता, निष्ठा, साधेपणा नाहीसा होतो; तरी त्याजागी प्रगल्भता, विवेक, नैतिक संवेदनशीलता, जबाबदारी येत नाही. परिणामी आपल्याला मिळतो तो एक हिंसक, उद्धट, मद्यपी, अर्धशिक्षित, पण स्वतःला प्रचंड महत्त्व देणारा शारिकव –जो सतत अधिकारांची भाषा बोलतो, पण कर्तव्यांपासून पळतो.
इथे बुल्गाकव दोन पातळ्यांवर उपहास करतो. एक म्हणजे, त्या काळात युरोपभर गाजत असलेले ‘rejuvenation experiments’ – विशेषतः सर्जन व्होरोनॉफसारख्या डॉक्टरांचे माकडांच्या ग्रंथी वापरून केलेले प्रयोग. दुसरं म्हणजे, रशियातील नवराजवटीची “नवा माणूस” घडवण्याची अति-आत्मविश्वासी घोषणा. निसर्गाच्या शरीरात अवयवांची अदलाबदल करणारा वैज्ञानिक आणि समाजाच्या ‘शरीरात’ वर्ग-संरचना, विचारसरणी, निष्ठा यांची अदलाबदल करणारा पक्ष – दोघांचं ध्येय सारखंच: वेगळा, आदर्श, आपल्या मापात बसणारा माणूस निर्माण करणे.
शारिकव हे केवळ एक पात्र नाही; तो संपूर्ण बोल्शेविक सामाजिक प्रयोगाचा विद्रूप परिणाम आहे. शारीक हा दबलेल्या जनतेचा प्रतिनिधी असेल, तर शारिकव हा त्या जनतेच्या नावावर उभं राहून सत्ता हस्तगत करणाऱ्या अनैतिक, असंवेदनशील नेत्यांचा प्रतिनिधी आहे. तो क्रांतीचा नारा देतो, समानतेची भाषणं ठोकतो, पण प्रत्यक्षात इतरांच्या श्रमावर जगणारा, स्वतःच्या लहानसहान सत्तेचा गैरवापर करणारा परजीवी आहे. तो डॉक्टरांच्या घरात मांजरींचा पाठलाग करतो, नोकरांना त्रास देतो, दारू पिऊन धिंगाणा घालतो, चोरी करतो,आणि शेवटी ज्या डॉक्टरांनी त्याला माणूस केलं, त्यांनाच तुरुंगात पाठवण्याची धमकी देतो. जर समाजरचनेच्या पायातच हिंसा, असहिष्णुता, अज्ञान, आणि रानटी प्रवृत्ती रोवून ठेवल्या, तर वर उगवणारं ‘नवं समाजभवन’ हिंसकच असेल, हा इशारा इथं लेखक सत्ताधाऱ्यांना देताना दिसतो.
विचार पेलण्याची क्षमताच विचारसरणीच्या वाहकांमध्ये निर्माण झाली नाही तर परिणामी समाजात काय अघटित घडू शकतं याचं दर्शन लेखक या लघुकादंबरीतून दाखवून देतो. या सगळ्यांतून बुल्गाकव एका काटेरी निष्कर्षाकडे नेतो – केवळ शरीराला मानवी आकार दिल्याने माणूस तयार होत नाही. माणूस होणं ही केवळ जैविक किंवा तांत्रिक प्रक्रिया नसून, ती संस्कृती, शिक्षण, स्वानुशासन, करुणा आणि नैतिक प्रगल्भतेतून घडणारी दीर्घ प्रक्रिया आहे.
‘कुत्र्याचं काळीज’ची एक मोठी ताकद म्हणजे तिची कथनशैली. सुरुवातीची प्रकरणे एका भटक्या कुत्र्याच्या –शारीकच्या नजरेतून येतात. हा दृष्टिकोन आपल्याला “खालून वर” पाहायला लावतो. ज्यांना सहसा कोणी दाद देत नाही, त्यांच्या दृष्टीतून समाज दिसायला लागतो. जेव्हा शारीक माणूस होऊ लागतो, तेव्हा कथनशैलीही बदलते. आता हळूहळू डॉक्टरांच्या नोंदी, संभाषणं, तिसऱ्या व्यक्ति-वर्णनातून आपण घटनांकडे पाहू लागतो. या बदलातूनच एक भन्नाट परिणाम साधला जातो. ज्याच्याशी आपण आतापर्यंत जोडलेलो होतो, तो भटका कुत्रा आता हळूहळू आपल्याच नजरेतून निसटतो; त्या जागी शारिकव नावाचा असह्य, असभ्य, हिंसक माणूस येतो. सहानुभूती अस्वस्थतेत रूपांतरित होते. आपण हसतोही, कारण शारिकवचे काही प्रसंग अफलातून हास्यास्पद आहेत—पण काही क्षणांतच ते हसू गोठून जातं, कारण त्यामागील क्रूरता, बेफिकिरी आणि हुकूमशाही वृत्ती डोळ्यांत खुपते.
हेही वाचा - व्यक्तिनिष्ठ पंथांचा संक्षिप्त इतिहास (रामचंद्र गुहा)
बुल्गाकवचा उपहास हा मनोरंजनासाठी नाही; तो वाचकाला त्याच्या नैतिक झोपेतून जागं करण्यासाठी आहे. या अर्थाने ही कादंबरी जॉर्ज ऑरवेलच्या ‘Animal Farm’शी नाते सांगते. दोन्हीकडे प्राणी आणि रूपकांचा वापर करून सत्ता, क्रांती, आणि मानवी लोभ यांची उकल केली जाते. मात्र ‘कुत्र्याचं काळीज’ अधिक वैयक्तिक, अधिक शारीरिक आहे. फ्रँकेनस्टाईनप्रमाणे इथेही सर्जक आपल्या निर्मितीवर नियंत्रण ठेवू शकत नाही; पण बुल्गाकव यांचा रोख वैज्ञानिक-देवत्वाच्या कल्पनेइतकाच राजकीय सत्तेच्या “मानव-निर्मिती”च्या कल्पनेवरही आहे.
कथेच्या शेवटी शारिकव इतका हिंस्त्र नि उपद्रवी होतो की डॉक्टरांना त्यांचा प्रयोग उलटवून त्या नवजीवाला त्याच्या नैसर्गिक अवस्थेत आणावं लागतं. हा शेवट वरवर पाहता सगळं पूर्ववत झाल्यासारखा वाटतो. पण खरा प्रश्न तसाच उरतो—खरं क्रूर कोण आहे? कुत्र्याचं काळीज की माणसाचं? एखादा प्रयोग मागे घेता येतो, पण समाजावर केलेला प्रयोग तितक्याच सहजतेने मागे घेता येतो का? शारिकवचं शरीर नाहीसं झालं, पण त्याची मानसिकता आणि त्याचं प्रतीकात्मक अस्तित्व समाजातून नाहीसं झालं का? अशा शारिकवांना पुन्हा साधेपणाकडे, माणुसकीकडे परत नेणं शक्य आहे का? बुल्गाकव याची उत्तरं देत नाहीत; ते वाचकावर सोडतात. म्हणूनच कुत्र्याचं काळीज वाचून संपत नाही; ती कथा मनात रेंगाळत राहते.
आज आपण अशा काळात जगतो आहोत, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव-इंजिनिअरिंग, जीन संपादन (CRISPR) यांसारख्या तंत्रज्ञानांनी माणसाच्या “देव होण्याच्या” आकांक्षेला नव्याने खाद्य पुरवलं आहे. आपण मेंदूची कार्यपद्धती उलगडतो आहोत, जीनोम संपादन करून रोगांवर मात करण्याचे मार्ग शोधतो आहोत, AI च्या मदतीने निर्णयप्रक्रिया अधिक “कार्यक्षम” करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजच्या प्रयोगशाळांमध्ये तयार होणारे आकडे, अल्गोरिदम, आणि जैविक बदल पाहिले की डॉ. फिलीप फिलीपविच यांची छाया त्यांत जाणवते.
आपण सुपर इंटेलिजंट मशीन्स तयार करू शकू, मानवी शरीरातील दोष दुरुस्त करू शकू, कदाचित भविष्यात वृद्धत्वावरही आंशिक मात करू शकू. पण त्या नव्या देहात किंवा नव्या AI मध्ये करुणा, जबाबदारी, समतोल, आणि नैतिकता भरता येईल का? ज्ञानापेक्षा विवेक महत्त्वाचा आहे—हा साधा संदेश तंत्रज्ञानाच्या धडधडीत कधी हरवून जाऊ नये, अशी जाणीव ‘कुत्र्याचं काळीज’ आपल्याला पुन्हा पुन्हा करून देते.
मराठीत ‘कुत्र्याचं काळीज’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इर्शाद वडगांवकर यांनी समर्थपणे केलं आहे. रशियनमधून थेट मराठीत झालेलं हे भाषांतर मराठी साहित्यविश्वात दुर्मीळ आहे. इर्शाद स्वतः रशियन भाषेत आणि साहित्यात संशोधन करत आहेत. रशियन शिव्यांची रूढी, त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि त्यातून व्यक्त होणारा राग किंवा उपरोध मराठीला थेट देणं सोपं नाही. पण इर्शाद यांनी त्या ठिकाणीही मराठी संवेदनेला साजेसे, पण मूळची धार न गमावणारे पर्याय निवडलेत. त्यामुळे बुल्गाकवच्या व्यंग्याची धार मराठी वाचकांपर्यंत जवळजवळ पूर्ण ताकदीने पोहोचते. त्यामुळे त्यांच्या अनुवादात रशियन वास्तव आणि मराठी संवेदना यांचा सुंदर मिलाफ जाणवतो.
‘कुत्र्याचं काळीज’ ही फॅन्टसी नाही, ही भविष्यातली कथाही नाही. ही माणसाच्या आजच्या जगाची, त्याच्या अहंकाराची आणि त्याच्या स्वभावात दडलेल्या हिंसेची गोष्ट आहे. ही कादंबरी आपल्याला स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची हिंमत देते. ही कादंबरी शेवटी आपल्याला एका कठोर जाणिवेकडे नेते की, माणसाला सर्वांत मोठा धोका बाह्य शत्रूपासून नसतो; तो त्याच्या स्वतःच्या काळजातून येतो. विज्ञान, तंत्रज्ञान, क्रांती, समाजसुधारणा – हे सगळं महत्त्वाचं आहे, पण त्यामागचा हेतू आणि त्याला मर्यादा घालणारी नैतिक चौकट यांच्याशिवाय ते विनाशकारी ठरू शकतं.
- अतुल बालाजी मरेवाड
atulbalaji94@gmail.com
Tags: मिखाइल बुल्गाकव राजकीय कादंबरी सामाजिक कादंबरी उपहास भाष्य रशियन इतिहास बोलशेविक क्रांती rejuvination experiments 1920 Load More Tags
Add Comment