गांधीजींचे संपूर्ण जीवन सलगपणे मांडणारे एकमेव चरित्र

लुई फिशर लिखित ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाची प्रस्तावना 

लुई फिशर लिखित ‘Mahatma Gandhi : His Life and Times’ या महत्त्वाच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ साधना प्रकाशन घेऊन येत आहे. 1 सप्टेंबर 2019 रोजी पुण्यात कुमार केतकर आणि रावसाहेब कसबे यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकासाठी नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना.

लुई फिशर (Louis Fischer) हे अमेरिकन पत्रकार दुसऱ्या महायुद्धकाळातील त्यांच्या वार्तापत्रांमुळे आणि त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांमुळे इंग्रजी वाचकांना सुपरिचित आहेत. 1942 साली ते सुमारे दोन महिने भारतात राहिले. जून महिन्याचा वर्ध्यातला कडक उन्हाळा सहन करीत त्यांनी गांधीजींच्या आश्रमातच एक आठवडा घालवला. महात्मा गांधींच्या सहवासातल्या त्या एक आठवड्याबद्दल त्यांनी लिहिलेल्या आठवणी मराठीत भाषांतरित झाल्या आहेत. म.गांधींचे त्यांनी लिहिलेले इंग्रजी चरित्र जगभर वाचले जाते. भारतातही त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. तथापि या संपूर्ण गांधी -चरित्राचे मराठी भाषांतर उपलब्ध नव्हते; ते वि.रा.जोगळेकर यांनी परिश्रमपूर्वक केले आणि आता ते प्रसिद्ध होत आहे.

लुई फिशर यांना 1921 च्या सुमाराला ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने जर्मनीस पाठवले. त्यानंतर बरीच वर्षे ते रशियातही होते. ‘नेशन’ या नियतकालिकाचे नियमित प्रतिनिधी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. त्यांची वार्तापत्रे स्वतंत्र मते मांडणारी असत. सत्य जाणून घेण्याची आणि ते निर्भेळ स्वरूपात वाचकांना सादर करण्याची पत्रकाराची निष्ठा त्यांनी आयुष्यभर सांभाळली. त्यांनी लिहिलेल्या गांधी चरित्रात एक तटस्थ दृष्टिकोन आढळतो. चरित्र लेखक अनेकदा भक्त तरी असतात, अनुयायी तरी असतात किंवा कट्टर विरोधक तरी असतात. गांधी-चरित्रकार लुई यांच्याबद्दल असे काही म्हणता येणार नाही.

म.गांधींबद्दल जगातल्या इतर भाषांप्रमाणेच मराठीतही भरपूर लिहिले गेले आहे. म.गांधींचे समग्र लेखन -अगदी छोट्या चिठ्ठ्यांसह, मराठीत प्रसिद्ध झाले आहे. त्यांची छोटी छोटी चरित्रे त्यांच्याविषयीच्या आठवणी विपुल प्रमाणात आहेत. म.गांधींचे जे सहकारी होते, त्यांच्या आठवणींतही गांधींबद्दल पुष्कळ लिहून येणे स्वाभाविकच आहे. चरित्र म्हटल्यानंतर, कालानुक्रमे महत्त्वाच्या घटनांचा आणि चरित्र नायकाच्या मानसिक परिवर्तनांचा आलेख मांडणारे पुस्तक, अशी कल्पना असते. गांधीजींचे संपूर्ण जीवन सलगपणे मांडणारे असे चरित्र दुर्दैवाने मराठीत उपलब्ध नव्हते.

मात्र काही पुस्तकांचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. 1919 साली प्रसिद्ध झालेले, अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेले ‘म. गांधी’ हे पहिलेच महत्त्वाचे मराठी गांधीचरित्र. ते गांधीजींच्या कर्तव्य-काळाच्या प्रारंभीच लिहिलेले आहे; पुढचा काळ त्यात येणे शक्य नव्हते. अवंतिकाबाईंच्या या चरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेचे महत्त्व, ती लोकमान्यांनी लिहिली आहे एवढेच नाही! म.गांधी सांगत असलेला नि:शस्त्र प्रतिकाराचा आणि आत्मक्लेश भोगण्याची तयारी ठेवणारा सत्याग्रहाचा मार्ग, त्यावेळच्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना फारसा मान्य नव्हता; लोकमान्यांनी या नव्या मार्गाचे महत्त्व ओळखले. श्रेष्ठ आत्मबल असलेल्या व्यक्तींनी हा नि:शस्त्र प्रतिकाराचा मार्ग चोखाळला तर ते यशस्वी होऊ शकतात हेही त्यांनी सांगितले. गांधींचे मोठेपण ओळखणारे, आणि कोणताही पूर्वग्रह मनात ठेवता त्याची भलावण करणारे मोठे मन लोकमान्यांजवळ खचितच होते.

अवंतिकाबाईंचे हे पुस्तक वगळले तर, गांधीजींच्या लेखनातली वचने शोधून काढून गांधींजींचे आत्मचरित्र सिद्ध करण्याचा प्रयत्न ‘म.गांधींचे बृहद् आत्मचरित्र’ या नावाने शंकरराव देवांनी केला; पण फक्त त्याचा पहिला भाग प्रसिद्ध होऊ शकला. नंतरचे लेखन झालेच नाही. स्वत: गांधींनी लिहिलेले ‘आत्मकथा अर्थात सत्याचे प्रयोग’ हे आत्मचरित्र इतर भाषांप्रमाणे मराठीतही उपलब्ध आहे, पण तटस्थपणे गांधीजींच्या जीवनाकडे पाहू शकणारे चरित्र मात्र मराठीत आढळत नाही. लुई फिशर यांनी लिहिलेल्या गांधी चरित्राच्या भाषांतराने जोगळेकरांनी ही उणीव काहीशी भरून काढली आहे; याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

म.गांधींच्या जन्माला आता दीडशे वर्षे झाली. त्यांचा खून करण्यात आला, त्यालाही आता एकाहत्तर वर्षे उलटून गेली -तरीही गांधीजींबद्दलचे जगभरातले कुतुहल कमी झालेले नाही. दरवर्षी म.गांधींच्या जीवनातल्या एखाद्या अंगाबद्दल, त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल, त्यांच्या विचारांच्या सद्य:कालीन प्रस्तुततेबद्दल नवी नवी पुस्तके प्रसिद्ध होत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही हिंसेने, द्वेषाने आगडोंब माजवला अगर क्रौर्याच्या परिसीमेने मानवताच कोलमडून पडण्याची वेळ आली तर अनेकांना म. गांधींचीच आठवण होते. ज्यांना गांधी समजले नव्हते त्यांना ते नकोसे झाले होते. ज्यांना ते समजले होते किंवा आजही ज्यांना ते समजतात त्यांना गांधी हवेहवेसे वाटतात. आज गांधी असते तर ते उपयुक्त ठरले असते का, या विषयावर पुष्कळदा गैरलागू चर्चा होते. गांधी आणि त्यांचे विचार हा एखादा अपरिवर्तनीय ठोकळा नव्हता. जीवनाच्या प्रत्येक क्षणी उद्भवणाऱ्या नव्या नव्या प्रश्नासाठी नवे नवे उत्तर शोधू पाहणारा तो एक विनम्र यात्रिक होता. गांधी एकदा जे म्हणाले ते जसेच्या तसे सर्वकाळ उपयोगी पडेल असे समजणे निखालस चुकीचे असते. गांधींचे विचार म्हणजे पूर्णपणे अपरिवर्तनीय असलेला एखादा धर्मग्रंथ नव्हे. आपले नित्यनूतनत्व कायम राखणारा हा एक सेंद्रिय ठेवा असतो. जग जसे बदलते तसे जगासमोरचे प्रश्नही बदलतात. गांधींनी सांगितलेली मूलभूत तत्त्वे मनाला भावली म्हणजे मग गांधींचे नाव घेताही मार्ग सापडतात. स्वत: लुई फिशर यांनी गांधीजींचे वेगळेपण याच चरित्रग्रंथात अतिशय नेमक्या शब्दांत सांगितले आहे-

‘जगाच्या इतिहासात ज्या मोठमोठ्या व्यक्ती होऊन गेल्या, त्यांच्या पाठीशी सरकारची शक्ती उभी होती. चर्चिल, रुझवेल्ट, लॉईड जॉर्ज, स्टॅलिन, लेनिन, हिटलर, वुडरो विल्सन, कैसर, लिंकन, नेपोलियन, मेटरविच आणि टेलीरँड ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. त्यांच्याशी तुलना करता, अधिकारावर नसलेल्या आणखी एका व्यक्तीचे नाव मनात येते ते म्हणजे कार्ल मार्क्स. परंतु त्यांनी केवळ सरकारी यंत्रणेची व्यवस्था कशी असावी याची निश्चित तत्त्वप्रणाली मांडली. गांधींच्याप्रमाणे माणसांच्या सदसद्विवेकबुद्धीला ज्यांनी आवाहन केले, अशा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आपल्याला कित्येक शतके मागे जावे लागेल. धर्मप्रामाण्य मानणाऱ्या इतिहासाचा तो एक कालखंड होता. येशू ख्रिस्त, रोमन चर्चमधील काही धर्मोपदेशक, बुद्ध, ईश्वराचे हिब्रू प्रेषित आणि ग्रीक संत इत्यादी धर्मवेत्त्यांनी माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीला हिरिरीने आवाहन केले होते, पण ते सगळे धर्मप्रचारक होते. गांधी या सर्वांपासून निराळे होते. त्यांनी ईश्वर किंवा धर्माचा प्रचार केला नाही. ते जणू जागते वागते प्रवचनकार होते. त्यांनी असे दाखवून दिले की, आधुनिक काळात आणि या काळातील राजकारणातही त्या सर्वांची तत्त्वे लागू करता येतील. सत्ता, संपत्ती आणि अहंकारातून माणसाला गिळंकृत करणाऱ्या आधुनिक जगात गांधींच्यासारखा एखादा चांगला माणूस निर्माण होणे, हे अतर्क्य होते.’

1915 साली गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून परत आले आणि पुढील चार-पाच वर्षांत वेगवेगळ्या प्रश्नांचे जे लढे त्यांनी संघटित केले आणि पीडितांना जो आत्मविश्वास दिला, त्यामुळे त्यांचे नेतृत्त्व लोकमानसात सिद्ध झाले. 1920 पासून तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे सर्वश्रेष्ठ नेते म्हणूनच त्यांना ओळखले जाऊ लागले. भारताच्या भवितव्याविषयी जर वाटाघाटी करायच्या असतील तर गांधीजींशीच त्या कराव्या लागतील हे ब्रिटिश सरकारनेही गृहीत धरलेले होते. स्वातंत्र्याचा लढा चालवणारी काँग्रेस संघटना ही गांधीजींच्याच मार्गदर्शनाखाली काम करत होती. काही अपवादात्मक प्रसंगी गांधीजींचे मत संघटनेने मान्य केले नाही असे दिसत असले तरी, अंतिमत: लढा सुरू करण्याची अगर परत घेण्याची वेळ आणि त्याचे स्वरूप याबाबत म. गांधींचे मतच काँग्रेस संघटनेने मानलेले दिसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधीजींची लोकमान्यता काँग्रेस संघटनेपेक्षा अधिक व्यापक होती. इतर पक्षांतले अनेक लोकही त्यांच्याबद्दल आदर बाळगीत; कित्येक वेळा त्यांचे मार्गदर्शनही घेत. सशस्त्र बंडाचा आणि त्यातही जपान्यांसारख्या फॅसिस्ट शक्तींचा पाठिंबा घेण्याचा मार्ग काँग्रेसला मान्य नव्हता; म्हणून काँग्रेसपासून वेगळे झालेले सुभाषचंद्र बोस यांनाही म.गांधी हेच भारताचे राष्ट्रपिता आहेत असे वाटत होते. आज जगभर भारताची ओळखच मुळी ‘म. गांधींचा भारत’ अशी आहे. गांधीजींच्या नेतृत्वगुणात असे काय होते की मतभेद असतानाही सर्वांनी त्यांना आदर द्यावा आणि त्यांचे नेतेपणही मान्य करावे?

केवळ भारतासाठीच नव्हे, तर साम्राज्यशाहीच्या जोखडातून, वंशभेदाच्या क्रौर्यातून मुक्तता मिळवण्यासाठी झगडणाऱ्या सर्व माणसांना, म. गांधी हे आपले आदर्श का वाटत होते? गांधीजींच्या व्यक्तित्वात असे कोणते अलौकिक गुण होते की त्यामुळे त्यांना जगभर मान्यता मिळाली? - ही कारणे समजून घेण्याला तशी फार अवघड नाहीत. गांधीचरित्र निर्लेप मनाने वाचले आणि त्या संपूर्ण काळात आजूबाजूला असलेली परिस्थिती लक्षात घेतली, की गांधीजींच्या मोठेपणाचे रहस्य उलगडू शकते.

वकिलीच्या व्यवसायासाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेला एक गुजराती बॅरिस्टर - त्याला मिळालेल्या वागणुकीमुळे - त्या देशातील बहुसंख्य जनतेला भोगाव्या लागणाऱ्या अमानवी वर्णद्वेषाशी परिचित होतो, आणि हे अपमान अन्याय मूकपणे सहन करण्याऐवजी त्याविरुद्ध लढा देण्याचे ठरवतो; त्यांना आपल्या हक्कांची आणि माणूस म्हणून निसर्गदत्त असलेल्या सन्मानाची जाणीवच नव्हती, अशा माणसांचा आत्मविश्वास जागृत करतो. हे सगळे करीत असताना, अन्याय करणारा माणूस आपला शत्रू नसतो -तर त्याचे धोरण असते! म्हणून माणसाचा द्वेष करू नका असेही हा बॅरिस्टर सांगतो; हे जगासाठी नवीन होते. गांधीजींनी हे पथ्य स्वत:ही आयुष्यभर पाळले. दक्षिण आफ्रिकेत जनरल स्मट्स यांच्याबरोबर वाटाघाटी केल्या, सत्याग्रहही केले. लढा संपला तेव्हा गांधींच्या सगळ्याच मागण्या स्मट्सने मान्य केलेल्या नव्हत्या; पण जे पदरात पडले ते महत्त्वाचे होते. तथापि स्मट्स आयुष्यभर गांधींच्या विषयीचा स्नेह मनात बाळगत होता, आणि द.आफ्रिकेतून परत जाताना गांधीजींनी प्रेमाने स्वत: हाताने तयार करून दिलेली पादत्राणे स्मट्स वापरत होता.

सर्व माणसे समान आहेत सर्वांना सारखेच अधिकार आहेत, हे मान्य केले म्हणजे सहज मागोमाग येणारे बंधुत्वाचे मूल्यही स्वीकारावे लागते. सगळेच आपले भाऊबंद असतील तर हिंसेचा मार्ग आपोआपच त्याज्य ठरतो. गांधीजींच्या तत्वज्ञानाचे हे सोपे सूत्र होते. अन्याय दूर करण्यासाठी हिंसेचा मार्ग वापरायचा असे ठरले तर, अधिक हिंसा करण्याची ताकद अन्याय करणाऱ्यांकडेच असते. लोकशाही व्यवस्थेत माणसामाणसांचा संवाद कायम राखत, परस्परांना समजून घेत जीवन जगता येते असे गांधीजी सांगत होते. शेकडो वर्षांपासून अनेक धर्मीय लोक भारतात राहतात, ते याहीपुढे राहणार आहेत हे लक्षात घेऊन, प्रशासनापासून धर्म अलग राखण्याचा आणि सहजीवनाचा गांधीजींचा प्रयत्न होता. म्हणूनच देशाची फाळणी होऊ नये यासाठी ते आग्रही होते. फाळणी टाळण्याच्या नावाखाली ब्रिटिश मुत्सद्यांनी पंजाबमधले लक्षावधी हिंदू आणि शीख, व बंगालमधले लक्षावधी हिंदू यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने ढकलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गांधीजींनी या दोन प्रांतांच्या फाळणीला संमती दिली. भारताची फाळणी ही मुख्यत: या दोन प्रांतांचीच फाळणी होती. गांधीजी आणि इतर नेत्यांनी ताणून धरूनही, शेवटी फाळणीला दिलेल्या मान्यतेमुळेच आज पूर्व पंजाब, हरियाणा पश्चिम बंगाल भारतात आहे.

गांधीजींचा यंत्रांना आणि शस्त्रांना असलेला विरोध हासुद्धा नीट समजून घेतला जात नाही. गांधीजींच्या याबद्दलच्या भूमिका अपरिवर्तनीय ठोकळेबाज नव्हत्या. गांधीजींनी रोजगार कमी करणाऱ्या यंत्रांना मान्यता दिलेली होती आणि काश्मीरवरचे आक्रमण थोपवण्यासाठी भारताने सैन्य पाठवले पाहिजे, असेही सांगितले होते. गांधीजींची अहिंसा हा व्यक्तिजीवनातला आदर्श होता. राज्य किंवा सरकार हे सर्वकाळ अहिंसेने बांधले जाऊ शकत नाही, हे त्यांनाही माहीत होते. ज्या पद्धतीने देशाची फाळणी झाली त्यामुळे हिंसाचाराचा डोंब उसळेल असा अंदाज ब्रिटिश सरकारप्रमाणेच गांधीजींना होता. म्हणून ती टाळण्याचा गांधीजीही प्रारंभापासून प्रयत्न करत होते.

गांधीजी हे ईश्वरावर नितांत श्रद्धा असलेले, व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात नैतिकतेचा आग्रह धरणारे, आपले व्यक्तिगत जीवन संपूर्णपणे उघडे आणि खुले असणारे नेते होते. जनमानसावर आणि राजकारणावर एवढी जबरदस्त पकड असतानाही त्यांनी कोणतीही व्यक्तिगत वा राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. ईश्वराचे प्रत्येकाच्या अंतर्यामी असलेले स्वरूप जाणून घेऊन, ते कधी उपासनेच्या कर्मकांडात गुंतले नाहीत; तरीही त्यांच्याइतका धर्मनिष्ठ राजकारणी दाखवता येणार नाही. राजकीय फायद्यासाठी वापरावयाची ही दिखाऊ धर्मनिष्ठा नव्हती; तो हृदयस्थ संवाद होता.

गांधीजींच्या या व्यक्तिवैशिष्ट्यांचे स्मरण ठेवून हे चरित्र वाचले म्हणजे गांधीजींचे एक सलग चित्र उभे राहते. लुई फिशर हे गांधीजींचे अनुयायी नव्हेत; पण ज्या काळात गांधीजी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करीत होते त्याच काळात एक पत्रकार म्हणून जगाच्या वेगवेगळ्या भागांत राहण्याची जागतिक घडामोडींचा अभ्यास करण्याची, अनेक सरकारांतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची संधी त्यांना मिळाली. शिवाय सामान्य माणसांची मतेही त्यांना जाणून घेता आली. अशा अनुभवांमुळे जी एक प्रकारची तटस्थता प्राप्त होते ती चरित्र-लेखनाला उपयोगी पडते. लुई फिशर यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी चरित्राचे भाषांतर मराठी वाचकांना खरे म्हणजे यापूर्वीच उपलब्ध व्हावयास हवे होते. पण काळ कदाचित जोगळेकरांसारख्या साक्षेपी अनुवादकाची वाट पाहात असावा. आज हे चरित्र मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे, याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि वि.रा.जोगळेकर यांचे या अनुवादाबद्दल अभिनंदन करतो.

- नरेन्द्र चपळगावकर


(लुई फिशर लिखित ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ हे पुस्तक Paperback आणि Hardbound स्वरुपात Amazon वर सवलतीत उपलब्ध.)  

Tags: लुई फिशर चरित्र साधना प्रकाशन वि रा जोगळेकर नरेंद्र चपळगावकर लेख प्रस्तावना Mahatma Gandhi Louis Fischer Load More Tags

Comments:

Hira janardan

साक्षेपी अनुवादक... खरे आहे.

Kadeer

Nice,...

shirish patil

मन जेव्हा उदास असेल. मनात हलकळ्ळोल असेल तेव्हा शांतपणे हे पुस्तक वाचावे. असा माणूस होणे नियतीची मेहरबानी. जग साॅक्रेटीसला विसरलं का? गाधीनाही जग कधीच विसरणार नाही. मग कोणी कितीही प्रयत्न करो.

श्रेया

Nice

Sakshi

Nice

Add Comment