28 फेब्रुवारी 2026 ला इस्रायल व अमेरिकेने इराणवर पुन्हा हल्ला केला. तेव्हापासून हवाई हल्ले, क्षेपणास्त्र प्रहार, ड्रोन युद्ध आणि सायबर कारवायांच्या स्वरूपात हे युद्ध सरू आहे. अमेरिकेने आपल्या हल्ल्यांना ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (प्रचंड क्रोधाने केलेला हल्ला) असं नाव दिलं आहे, तर इस्रायलने आपल्या कारवाईला ‘ऑपरेशन लायन्स रोअर’ (सिंहगर्जना) असं नाव दिलं आहे. आणि या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून इराणने जी रणनीती अवलंबली आहे, तिला त्यांनी ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4’ (चौथं प्रामाणिक वचन) म्हटलेलं आहे. या नावांतून तीन्ही देशांची रणनीती आणि हेतूही स्पष्ट होतात. ही रणनीती नेमकी काय आहे? त्यांनी वापरलेली युद्धतंत्रे कोणती आहेत, याचा वेध घेणारा हा लेख आहे.
इस्रायल व अमेरिकेने अपेक्षेनुसार इराणविरुद्ध पुन्हा युद्ध सुरू केले आहे आणि या युद्धाला आता दोन आठवडे झाले आहेत. हे युद्ध “अपेक्षेनुसार” सुरू झाले आहे असे म्हणण्याचे कारण असे की, गेल्या वर्षी जूनमध्ये या देशांमध्ये झालेल्या 14 दिवसांच्या युद्धानंतर जुलैमध्ये कर्तव्य साधनामध्ये लिहिलेल्या अमेरिकी हल्ल्यानंतरही इराणचे आव्हान कायम या लेखात मी स्पष्टपणे नमूद केले होते की, त्या युद्धानंतरही इराणचे आव्हान संपलेले नाही. ते पूर्णपणे संपवायचे असेल तर अमेरिकेला इराणमध्ये सत्तांतर घडवून आणावे लागेल.
आता 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे नवे युद्ध पाहता अमेरिका व इस्रायलने नेमका तोच मार्ग स्वीकारल्याचे दिसते. या युद्धाचे उद्दिष्ट इराणमध्ये सत्तांतर घडवून आणणे हेच असल्याचे दोन्ही देशांनी उघडपणे जाहीर केले आहे. त्यामुळे या युद्धाकडे केवळ प्रादेशिक संघर्ष म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. हा संघर्ष पश्चिम आशियातील सत्तासंतुलन बदलण्याचा प्रयत्न आहे. मात्र या सर्वांपेक्षा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, या युद्धातून खरोखरच इराणमध्ये सत्तांतर घडेल का?
गेल्या जूनमध्ये झालेल्या 12 दिवसांच्या युद्धानंतर अमेरिका व इस्रायल पुन्हा हल्ला करतील हे इराणने ओळखले होते. त्यामुळे त्या युद्धाचा शेवट होताच इराणने पुढील संघर्षासाठी तयारी सुरू केली. या तयारीसाठी त्यांना जवळपास आठ महिने मिळाले.
या नव्या युद्धाचे स्वरूप काय असेल याचाही इराणने अंदाज बांधला होता. अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष सैन्य उतरविण्याच्या स्थितीत नाहीत—किमान युद्धाच्या प्रारंभीच्या टप्प्यात तरी नाहीत. त्यामुळे हे युद्ध मुख्यतः क्षेपणास्त्रे, ड्रोन, सायबर हल्ले आणि गुप्त कारवाया यांच्या माध्यमातून लढले जाईल हे इराणला माहीत होते.
या काळात इराणने मोठ्या प्रमाणावर विविध पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन तयार केले. लष्करी तज्ज्ञांच्या अंदाजानुसार युद्ध सुरू होण्यापूर्वी इराणकडे पाच ते दहा हजार विविध प्रकारची क्षेपणास्त्रे आणि जवळपास ऐंशी हजार शाहिद कामिकाझे ड्रोन असावेत. गेल्या आठवड्यातील युद्धाचा वेग पाहता हा अंदाज अवास्तव वाटत नाही.
सध्या सुरू असलेल्या युद्धाचा आढावा घेतला तर इराणने एक स्पष्ट आणि विचारपूर्वक रणनीती आखल्याचे दिसते. हे युद्ध पूर्णपणे असममित (asymmetric) स्वरूपाचे आहे. लष्करी शक्तीत मोठा फरक असताना तुलनेने कमकुवत पक्षाने वेगळ्या पद्धतीने लढणे हीच असममित युद्धाची मूलभूत कल्पना आहे.
इराणला अमेरिकेवर थेट हल्ला करणे शक्य नाही. भूमध्य समुद्रात आणि अरबी समुद्रात अमेरिकेच्या प्रबळ युद्धनौका तैनात आहेत. त्यांच्यावर थेट हल्ला करणे म्हणजे आत्मघातकी पाऊल ठरेल. त्यामुळे इराणने वेगळी रणनीती स्वीकारली आहे.
त्यांच्या रणनीतीचा पहिला भाग म्हणजे आपल्या माऱ्याच्या टप्प्यात येतील अशी लक्ष्ये निवडणे. इराणने इस्रायलसोबतच पश्चिम आशियातील अमेरिकेचे मित्र देश - बहरीन, कतार, जॉर्डन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया आणि कुवेत - यांना लक्ष्य केले आहे. या देशांमध्ये अमेरिकेचे महत्त्वाचे लष्करी तळ आहेत. त्यामुळे या तळांवर हल्ले करून अमेरिकेच्या युद्ध यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दुसरा भाग म्हणजे क्षेपणास्त्रांचा सतत मारा. युद्धाच्या पहिल्या आठवड्यात इराणने दररोज जवळपास शंभर क्षेपणास्त्रे आणि दोनशे ड्रोन वापरले, असे दिसते. त्यातील निम्मे इस्रायलवर आणि उर्वरित अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर सोडले गेले. ही पद्धत “सॅच्युरेशन अटॅक” म्हणून ओळखली जाते—म्हणजे शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेला थकविणे.
तिसरा भाग म्हणजे प्रगत शस्त्रांचा वापर. सुरुवातीच्या काही दिवसांत इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. त्यामुळे इस्रायलचे मोठे नुकसान टळले. परंतु आठवडा उलटून गेल्यानंतर या संरक्षण यंत्रणांवर ताण वाढलेला दिसत आहे. त्यातच इराणने आता फतह-२ सारखी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे वापरण्यास सुरुवात केली आहे. अशा क्षेपणास्त्रांना पारंपरिक हवाई संरक्षण यंत्रणांनी अडवणे अत्यंत कठीण असते.
दुसरीकडे अमेरिका व इस्रायलची रणनीतीही स्पष्ट दिसते. त्यांचे उद्दिष्ट केवळ इराणी हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे नाही, तर इराणची लष्करी क्षमता आणि राजकीय स्थैर्य दोन्ही मोडून काढणे हे आहे. त्यासाठी त्यांनी बहुस्तरीय रणनीती स्वीकारली आहे.
पहिला स्तर म्हणजे अचूक हवाई हल्ले. इस्रायलचे हवाई दल आणि अमेरिकेची लांब पल्ल्याची बॉम्बफेकी विमाने इराणमधील क्षेपणास्त्र साठे, ड्रोन कारखाने, रडार केंद्रे आणि लष्करी तळांवर अचूक हल्ले करत आहेत. यामुळे इराणची युद्धसामग्री तयार करण्याची क्षमता कमी करण्याचा प्रयत्न आहे.
दुसरा स्तर म्हणजे सायबर युद्ध. इराणची वीजयंत्रणा, दळणवळण व्यवस्था आणि आर्थिक केंद्रांवर सायबर हल्ले होत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा हल्ल्यांचा उद्देश देशांतर्गत अस्थिरता निर्माण करणे हा असतो.
तिसरा स्तर म्हणजे अंतर्गत असंतोषाला चालना देणे. इराणमध्ये आधीपासूनच आर्थिक संकट आणि सामाजिक असंतोष आहे. या असंतोषाला चालना देऊन शासनाविरुद्ध आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
चौथा स्तर म्हणजे प्रादेशिक दबाव. लेबनॉनमधील हेजबुल्ला, इराकमधील शिया मिलिशिया आणि येमेनमधील हूथी यांसारख्या इराणसमर्थक संघटनांवर दबाव आणणे हा या रणनीतीचा भाग आहे.
आतापर्यंतच्या घडामोडी पाहता हे युद्ध अमेरिका व इस्रायलच्या प्रारंभीच्या अपेक्षेपेक्षा अधिक लांबू शकते. कारण इराणने युद्धाची तयारी व्यवस्थित केली आहे. इराणचे भौगोलिक आकारमान मोठे आहे, लोकसंख्या प्रचंड आहे आणि त्यांची लष्करी व्यवस्था पूर्णपणे विखुरलेली आहे. त्यामुळे केवळ हवाई हल्ल्यांनी त्यांची युद्धक्षमता संपवणे अत्यंत कठीण आहे. इतिहास पाहिला तर अमेरिकेला अशा प्रकारच्या युद्धांत अनेकदा अडचणी आल्या आहेत. इराक आणि अफगाणिस्तान ही त्याची ताजी उदाहरणे आहेत.
या युद्धातून इराणमध्ये सत्तांतर घडेल का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सत्तांतर घडण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात—लष्करी पराभव, अर्थव्यवस्था कोसळणे आणि जनतेचे मोठ्या प्रमाणावर बंड. सध्या या तिन्ही गोष्टींची स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत. याउलट बाहेरील हल्ल्यांमुळे अनेकदा देशांतर्गत राष्ट्रवाद वाढतो. त्यामुळे सत्ताधारी शासनाला जनतेचा अधिक पाठिंबा मिळतो. अमेरिकेने कुर्द बंडखोरांना हाताशी धरून इराणमध्ये सत्तांतर शक्य आहे का याची चाचपणी केली, पण त्यात यश येताना दिसत नाही. मग अमेरिकेचे पुढचे पाऊल काय असू शकेल? या युद्धाचे भवितव्य काय? तर पुढील काही टप्पे असू शकतात.
पहिला टप्पा म्हणजे दीर्घकालीन क्षेपणास्त्र युद्ध. काही महिने दोन्ही बाजूंनी ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ले सुरू राहू शकतात.
दुसरा टप्पा म्हणजे प्रादेशिक विस्तार. लेबनॉन, सीरिया, इराक किंवा येमेनमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
तिसरा टप्पा म्हणजे राजनैतिक तोडगा. मोठ्या शक्तींच्या दबावामुळे काही महिन्यांनंतर युद्धविराम होऊ शकतो.
हे युद्ध फक्त पश्चिम आशियापुरते मर्यादित राहणार नाही. त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होतील. पर्शियन आखातातील अस्थिरतेमुळे तेलाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.
जागतिक राजकारणातही नवे ध्रुवीकरण दिसू शकते. एका बाजूला अमेरिका व तिचे सहयोगी आणि दुसऱ्या बाजूला रशिया-चीन-इराण असा गट अधिक स्पष्ट होऊ शकतो.
या युद्धातून आणखी एक महत्त्वाचा धडा मिळेल—भविष्यातील युद्धे अधिकाधिक ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून लढली जातील.
इस्रायल आणि अमेरिकेने सुरू केलेले हे युद्ध इराणमध्ये सत्तांतर घडवून आणण्याच्या उद्देशाने आहे. मात्र आतापर्यंतच्या घडामोडी पाहता हे उद्दिष्ट साध्य करणे सोपे दिसत नाही. इराणने दीर्घकालीन क्षेपणास्त्र युद्धाची तयारी केली आहे आणि त्यांची रणनीती अमेरिका व इस्रायलसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे हे युद्ध अपेक्षेपेक्षा अधिक लांबणारे आणि अधिक विध्वंसक ठरू शकते. या संघर्षाचा शेवट कसा होईल हे आज सांगणे कठीण आहे. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे—या युद्धानंतर पश्चिम आशियाचे आणि कदाचित संपूर्ण जगाचे राजकारण बदललेले असेल.
- दिवाकर देशपांडे, नवी मुंबई
diwakardeshpande@gmail.com
(आंतरराष्ट्रीय घडमोडींचे अभ्यासक)
Tags: रणनीती युद्धतंत्र शस्त्रास्त्रे क्षेपणास्त्रे हायपरसॉनिक इराण अमेरिका इस्रायल युद्ध Load More Tags
Add Comment