झुरळांचे अनुकूलन होईल की विनाश?

'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके भारतात येणार - पुढे काय?

तसं पाहिलं तर मराठवाडा हा
आर्थिकदृष्ट्या मागासलेला भाग.
मराठवाड्याची राजधानी म्हणून
ओळखलं जाणारं शहर म्हणजे औरंगाबाद.
आजचे नाव छत्रपती संभाजीनगर.
मोगल आणि निजाम साम्राज्याच्या
खाणाखुणा आजही जपणारं शहर.
याच शहरामध्ये एका नोकरी करणाऱ्या
मध्यमवर्गीय दलित कुटुंबात जन्मलेला मुलगा.
नाव अभिजित दिपके.
===
एकीकडे आर्थिक, धार्मिक आणि सामाजिक
ताणतणाव पाहत समाजासाठी काहीतरी करावं,
अशी इच्छा असणारा तरुण मुलगा आणि दुसरीकडे
आपल्या एकुलत्या एक मुलाने खूप शिकावं,
इंजिनिअर बनावं, नोकरी करावी,
चांगला संसार करावा,
असं टिपिकल मिडलक्लास
स्वप्न पाहणारे आई वडील.  
म्हणजे संघर्ष घरातही.
===
मुलाचं मन इन्जिनिअरिन्गमध्ये लागत नाही.  
त्याला पत्रकारिता करायची असते.
तो समाज बदलण्याचं स्वप्न बाळगत असतो.
पुढे जर्नालिझमचा कोर्स करतो.
त्याचा पारंपारिक राजकीय पक्षांकडून
भ्रमनिरास झालेला असतो.
अण्णांच्या मेहेरबानीने स्थापन झालेल्या
आम आदमी पार्टीकडून नवीन आशा अपेक्षा ठेवून
तो काम करू लागतो.
मीडिया, पब्लिक रिलेशन, डिजिटल प्रमोशन
सर्व काही सुरु करतो.
दोन चार वर्षे आम आदमी पार्टीच्या
कोअर टीमचा भाग बनतो.
पण परत थोडासा भ्रमनिरास.
स्वतःच्या करिअरवर लक्ष.
मग उच्च शिक्षणासाठी बोस्टन युनिव्हर्सिटी अमेरिका.  
===
पण तेथेही त्याला मायदेशातील परिस्थिती
स्वस्थ बसू देत नाही.
युवकांचे प्रश्न, बेकारी, आटत जाणाऱ्या नोकऱ्या,
फुटणारे पेपर्स, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार.
सरकारी संस्थांकडून होणारा निष्काळजीपणा,
आपलं ऐकणारा कुणी नाही,
आपला कुणी वाली नाही,
या युवा पिढीच्या भावना, आक्रोश, राग, वेदना,    
तो सात समुद्रापलीकडे राहून पाहत असतो.
===
आणि अचानक एक विचित्र घटना घडते.
भारताचे सरन्यायाधीश मा. सूर्यकांत साहेब
सहजपणे युवा पिढीबद्दल बोलून जातात.
‘आजची तरुण पिढी 'कॉक्रोचेस' [झुरळ] सारखी आहे.
त्यांना कुठेच नोकरी मिळत नाही.
कुठल्याही प्रोफेशनमध्ये ते टिकू शकत नाहीत.
मग ते सोशल मीडियामध्ये येतात.
आरटीआय कार्यकर्ते होतात.
आणि विनाकारण सर्वांवर हल्ला करतात.
===  
राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांची
न्यायालयीन व्यवस्थेचा सर्वोच्च प्रमुख   
खिल्ली उडवतो हे अभिजित पाहतो.
आपल्या किलकिलत्या डोळ्यांमध्ये
आयुष्यात काहीतरी करण्याचे
स्वप्न पाहणारी युवा पिढी लेझी आहे,
पॅरासाईट आहे, कॉक्रोच आहे हे ऐकून
त्याला एक कल्पना सुचते.
सगळे कॉक्रोचेस एकत्र आले तर !
===
व्यंग म्हणून तो एक पोस्ट
सोशल मिडीयावर टाकतो.   
आपलं काम झालं असा विचार करून
शांत बसतो.
पण तासाभरातच 5000 सदस्य बनतात.
आणि सुरू होतो एक नवा सिलसिला!
अनेक युवा त्याला जॉईन होतात.
एकट्या माणसाने गम्मत जम्मत म्हणून
सुरु केलेली ही ऑनलाईन चळवळ जोर्रात सुरु होते.
नाव दिलं जातं कॉक्रोच जनता पार्टी.
मेम्बर्स वाढू लागतात. आकडा वाढू लागतो.
शेकडोंचे हजार होतात.
हजारांचे लाख.
आणि लाखांचे कोटीमध्ये!
सगळ्यात मोठा धक्का
जगातील सर्वात मोठी पार्टी म्हणून
शेखी मिरवणाऱ्या भाजपला बसतो.
अवघ्या चार पाच दिवसांमध्येच
या फक्त ऑनलाईन असणाऱ्या पार्टीचे
इंस्टा फॉलोवर्स भाजपपेक्षा जास्त होतात.
इतक्या वर्षांची तपस्या,
बारा वर्षांचे केंद्रात सरकार, प्रचंड धन
18600 पोस्ट्स असं सर्व काही असूनही
भाजपचे इंस्टाग्रामवर 94 लाख सदस्य आहेत.
याउलट पंधरा-वीस दिवसांपूर्वी सुरु झालेली
कॉक्रोच जनता पार्टी 2 कोटी 21 लाख फॉलोवर्स
घेऊन बसली आहे. म्हणजे भाजपपेक्षा दुप्पट!
यामुळेच सगळ्यांचे डोळे चमकतात.
हे कसे शक्य आहे? - प्रत्येकाला पडलेला प्रश्न.
===
भाजपचे कार्यकर्ते फ्रस्ट्रेट होऊ लागतात.
बाटलीत झुरळ पकडून त्याला चपलेने मारून
व्हिडिओ व्हायरल करू लागतात.
केंद्रीय मंत्री किरण रीजुजू नेहमीप्रमाणे
पाकिस्तानला जिम्मेदार ठरवू लागतात.
म्हणजे कोट्यावधी फॉलोवर्स मिळवण्याचे
जे काम भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला
जमले नाही ते पाकिस्तान कसे करेल?
परदेशी हात, परदेशी फॉलोवर्स
असंही बोलल्या जाऊ लागलं.
पण इंस्टाग्रामच दाखवून देतं की
94% फॉलोवर्स भारतातलेच आहेत.
थोडक्यात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी
सरकार विरोधी भूमिका घ्यायला
सरकार विरोधात लढायला युवा पिढी तयार आहे,
असं स्पष्टपणे दिसू लागतं. 
तसं पाहिलं तर आताशा लोक घाबरतात,
भव्य दिव्य मंदिराच्या निर्मितीकडे बघून
आपले प्रॉब्लेम्स विसरतात,
केवळ मोदींसाठी हिंदुत्वाच्या नावाने,
500 रुपये लिटरने पेट्रोल घ्यायला तयार होतात
अशा गोष्टी कॉक्रोचेस खोट्या ठरवत आहेत.

===

उद्या हाच अभिजित दिल्लीला पोहोचत आहे.
त्याला जंतर मंतरवर जाऊन आंदोलन करायचे आहे.
हजारो युवा मंडळी तेथे येणार आहेत.
अण्णांनंतर हे दुसरं तसंच आंदोलन होणार आहे.
===
खरी गम्मत इथेच आहे.
सोशल मीडियावर लोकांना एकत्र आणणे सोपे आहे.
पण ग्राउंडवर लोकांना जमवणे सोपे नाही.
===
कुणी म्हणतंय, आम आदमी पार्टीचे लोक
अभिजितला सपोर्ट करत असतील.
परत नवीन आंदोलन सुरू करून
आपल्यासाठी नवी स्पेस बनवत असतील.  
पण मोदी शहा यांच्या भाजप सरकारमध्ये
विरोधकांसाठी आणि विरोधासाठी स्पेसच दिसत नाही.
विरोधी पक्षाचे कंबरडे मोडणे त्यांना चांगलेच जमते.
आंदोलन रोखण्यासाठी सर्व प्रकारचे विघ्न ते आणू शकतात.
किसान आंदोलनाला लागलेले ग्रहण आपण पाहिलेले आहे.  
===
जाणकार आणखी एक शक्यता वर्तवत आहेत.
भाजपचेच किंवा आरएसएसचेच लोक बेमालूमपणे
सर्व कॉक्रोचेसला सपोर्ट करून संपूर्ण आंदोलनच
ताब्यात घेऊ शकतात.
ही शक्यता खरी होऊ शकते.
अण्णाच्या आंदोलनाचे खरे सूत्रधार
शेवटपर्यंत लक्षात आलेले नव्हते.
इथंही तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसं जर का कधी झालं तर
हे आंदोलन अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी होईल.
भाजपचेच गुप्त लोक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करतील.  
खाणे पिणे वगैरे वस्तूंचे व्यवस्थित वाटप होऊन  
आणि भरपूर मीडिया कव्हरेज घेऊन केले जाईल.
विरोधी पक्षाचा एक यशस्वी तारा समोर आणला जाईल.
भाजपविरोधी मतांचा काही भाग त्यांच्याकडे जाईल.
अस्तित्वात असलेले कॉँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष
आणखी कमजोर केले जातील,
‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा अवलंब केला जाईल.
नंतर भविष्यात प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल.
विशेष म्हणजे हे सर्व चालू आहे याची भनकही अभिजित दिपके
किंवा त्यांच्या इतर कॉक्रोचेसना लागणार नाही.
तसेही मेकन्झी या संस्थेने मोदी सरकारसाठी काम केलेले होते.
त्याच संस्थेचा माजी अधिकारी
आता कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता झालेला आहे.  
हे सगळं गुडी गुडी झालं तर कदाचित
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान दुसऱ्या विभागात जातील.
===
यापैकी काहीच झालं नाही तर मात्र
सर्व कॉक्रोचेसना रस्त्यात अडवले जाईल.
घरी परत पाठवले जाईल.
अभिजित दिपकेला एअरपोर्टवरूनच पोलीस घेऊन जातील.
आंदोलन फुसकं होतं असं चित्र मीडिया निर्माण करेल.
===
दिसेलच उद्या काय ते!

- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com 
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्ञानज्योती या नियतकालिकाचे संपादक आहेत.)

Tags: cockroach janta party abhijit dipke कॉक्रोच जनता पार्टी साधना डिजिटल अभिजित दिपके आम आदमी पार्टी अण्णा हजारे सोशल मीडिया instagram इन्स्टाग्राम आंदोलन जंतरमंतर दिल्ली भारतीय जनता पार्टी भाजप सूर्यकांत cji जेन झी युवा झुरळ कॉक्रोच Load More Tags

Comments:

Vivek Tilottamrao Deshmukh

योग्य विश्लेषण, भारतातील जनता फक्त Alternative ची वाट पाहत आहे, काँग्रेस पक्ष सुद्धा या संधीचा फायदा घेऊ शकली असती आणि घेऊ शकते पण स्थानिक गटबाजी हे होऊ देणार नाही आणि म्हणून मोदी सरकारला कुणीही change करत असेल तर मी नक्कीच त्याला मदत करेल.

Add Comment