शेअर मार्केटचा ‘खेळ’!

अदानी प्रकरणाच्या निमित्ताने भारतातील शेअर बाजारात यापूर्वी घडलेल्या काही घोटाळ्यांवर दृष्टीक्षेप

एक मोठा व्यापारी. त्याची कंपनी. 
एकीकडे त्याची व्यवसायावर नजर 
आणि दुसरीकडे 
त्याच्या कंपनीच्या शेअरच्या किमतीवर.
व्यवसाय वाढत होता. 
शेअरच्या किमतीही वाढत होत्या. 
गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत होता. 
कंपनी मोठी होत होती.
नवनवीन क्षेत्रांमध्ये त्यांना घुसायचं होतं.
आपला व्यवसाय वाढवायचा होता.  
18 मार्च 1982. 
अचानक मालकाच्या लक्षात येतं की 
कुणीतरी त्याच्या कंपनीच्या शेअरशी खेळतंय.
मुद्दामहून कुणीतरी शेअरचे भाव कमी करतंय. 
त्याच्या कंपनीचे शेअर मुद्दामहून कमी किमतीत विकतंय.
मालकाला माहीत होतं :
‘हे मार्केट परसेप्शनवर चालत असतं. 
एकदा का जर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली तर 
सगळेच लोक आपापले शेअर्स विकतील,
मागणी कमी होईल अन् पुरवठा जास्त 
आणि शेअरचा भाव कोसळेल. 
अन आपली कंपनी खल्लास होईल.’
पण तो काही साधासुधा मालक नव्हता. 
शून्यातून त्यानं आपलं सगळं साम्राज्य उभं केलं होतं. 
छोटी मोठी कामं करत करत तो मोठा झाला होता. 
त्यानं गरिबी पाहिली होती. 
तो फार शिकलेला नव्हता 
पण धंद्यातले भले बुरे डावपेच त्याला माहीत होते.
अशा सगळ्याच प्रसंगांना तोंड द्यायची तयारी 
त्याने आधीच करून ठेवलेली होती.
त्या काळी आजच्या सारखं सर्व काही‘ऑनलाईन’ होत नव्हतं.
शेअर खरेदी विक्री फोनवर करून 
दुसऱ्या शुक्रवारी विक्रेता ते ‘शेअर्स’ खरेदीदाराला द्यायचा.
काही कारणामुळे जर विक्रेत्याला शेअर्स पुरवता आले नाही तर 
त्याला ‘बदला’ म्हणून काही रक्कम द्यावी लागायची.
जर खरेदीदाराने शेअर्स घ्यायला नकार दिला तर 
त्यालाही असाच दंड द्यावा लागायचा. 
अर्थात हा एक वेगळाच धंदा होता. 
काही ‘ब्रोकर्स’ शुद्ध धंदा म्हणून पैसे कमवण्यासाठी, असं करायचे.
काही ‘ब्रोकर्स’ प्रतिस्पर्धी व्यापाऱ्याकडून सुपारी घेऊन, असं करायचे.

अचानक 131 रुपयाचा शेअर 121 रुपयाला विकत मिळतो, 
हे मालकाने बघितले.
‘आपल्याला धोका होतोय, कुणीतरी आपले शेअर्स मुद्दाम खाली पाडतंय’ 
हे दिसल्या बरोबर त्यांच्या मित्रपरिवारातील ब्रोकर्स कामाला लागले. 
ते दणादण माल विकत घ्यायला लागले. 
त्यामुळे परत शेअरचे भाव वाढायला लागले. ते 125 रुपयावर आले. 
असं बरेच दिवस चाललं. 
त्या शेअर्सना खाली पाडणारे लोकही एकदम पक्के होते. 
मागे हटायला तयार नव्हते. 
नंतर समजलं की ती कोलकात्याची मोठी व्यापारी सिंडीकेट होती.
त्यांनी जवळपास 11 लाख शेअर्स विकले. 
त्यातील बहुतांशी शेअर्स मित्रपरिवारातील ब्रोकर्सनी खरेदी केले.
त्याच्यासाठी लागणाऱ्या पैशाची तजवीज 
त्या शेअर कंपनीचा मालकच करणार होता, असं म्हणतात.          
MRTP Act प्रमाणे अशा पद्धतीने 
स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स विकत घेता येत नाही.
Insider Trading करता येत नाही.
म्हणून अशा ब्रोकर्स बरोबर समझोता करण्यात येतो.
त्यानंतर शेअरचा भाव वाढायला लागतो. 
आता खरेदी केलेले शेअर्स द्यायची वेळ येते.
पण त्या सिंडीकेटकडे शेअर्सच नसतात. 
मालकाने तर ठरवलेलंच असतं की, या सिंडीकेटला धडाच शिकवायचा.
मालक सर्व शेअर्सची डिलिव्हरी मागतो. 
कोलकात्याच्या सिंडीकेटचा नुकासानिशी सामना सुरु होतो.
जास्त पैसे मोजून त्यांना 
आता मार्केटमधून शेअर्स विकत घ्यावे लागणार असतात.
दुसरा पर्याय नसतो.
ते काही वेळ मागतात. 
शेवटी त्यांना शक्य नाही हे दिसल्यावर 
प्रत्येक शेअर मागे 50 रुपये ‘बदला’ रक्कम मागण्यात येते.
त्याकाळी साडेपाच कोटी रुपये फार मोठी रक्कम असते.
गुंता वाढत जातो.
मार्ग निघत नसतो. 
मार्केटमध्ये त्या शेअरची किंमत वाढत जाते. 
गुंता सुटत नसतो. 
त्यासाठी पुढे सलग तीन दिवस मार्केट बंद करावं लागतं. 
ट्रेडिंग बंद करावी लागते.
शेअर मार्केटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत असतं.
भारतीय शेअर मार्केटचा इतिहास बदलतो.
पुढे अनेक लोक त्या कंपनीचे शेअर विकत घेऊ लागतात.
त्या कंपनीला भरपूर कमाई होऊ लागते.
आणि एका मोठ्या उद्योगपतीचा उदय होतो.
त्याचं नाव होतं धीरूभाई अंबानी! 
आणि ती कंपनी होती रिलायंस!

***

शेअर मार्केटचा खेळ खेळणारे खूप खेळाडू असतात.
उद्योगपतींना जास्तीचे भांडवल पाहिजे असते 
म्हणून ते बाजारात शेअर्स आणतात.
त्यातून मिळालेले पैसे आपल्या उद्योगात गुंतवतात 
आणि मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवतात.
काही लोक फक्त शेअर मार्केटमध्ये असलेल्या कंपन्याचा 
चांगला अभ्यास करतात
अन आपली कलाकारी दाखवतात.

एक कापड दुकानदाराचा मुलगा. 
बी कॉम करून सेल्समनची नोकरी करतो.
बोरिवलीतून फास्ट लोकल पकडून 
मुंबईत कुठं कपडे विक, कुठं सिमेंट विक, 
अशी छोटी मोठी कामं करतो.
पुढे एका शेअर्सच्या खरेदी विक्री करणाऱ्या फर्ममध्ये 
कारकून म्हणून काम करतो. 
हळूहळू शेअर मार्केटचा धंदा त्याच्या लक्षात येतो.     
फक्त कंपन्यांचा अभ्यास करून चालणार नाही. 
पैसा जर का कमवायचा असेल तर 
मार्केट आपल्या मुठीत आलं पाहिजे.
आपल्याला शेअर्सची किंमत कमी जास्त करता आली पाहिजे.
प्रचंड प्रमाणावर शेअर्स विकत घेता आले पाहिजे.
एवढं मोठं मार्केट. त्याला किती पैसा लागणार?
त्यासाठी प्रचंड प्रमाणावर पैसा पाहिजे. 
पैश्यानेच पैसा ओढता येतो, असं त्याचं ठाम मत असतं.
त्या काळातील सरकारी कायदे, स्टॉक एक्स्चेंज चे नियम, 
रिझर्व बँकेचे नियम, भारतीय बँक सिस्टीममधल्या त्रुटी, 
गव्हर्मेंट सिक्युरिटी, रिझर्व बँक सिक्युरिटी, बँक रीसिट – 
अशा अनेक बाबींचा सखोल अभ्यास करून 
तो अनेक बँकांचा वापर करून घेतो. 
काही छोट्या बँकांना हाताशी धरून 
त्यांच्या खोट्या बँक रिसीट तयार करून 
मोठ्या बँकाकडून मोठ्या प्रमाणावर पैसे काढू लागतो.
ते पैसे पद्धतशीरपणे शेअर्समध्ये गुंतवून शेअर्सचे भाव वाढवतो. 
परत शेअर्स विकून बँकांचे पैसे परत करतो. 
त्यांना चांगला नफा मिळवून देतो. 
बँकांच्या मनात विश्वास निर्माण होतो. 
इतक्या मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केटमध्ये पैसा येतो म्हटल्यावर 
तत्कालीन सरकारही खुश होते. 
आपल्या आर्थिक नीतीचे हे फलित आहे, असे त्यांना वाटायला लागते.
हे बरेच दिवस चालू असतं. 
मार्केट दोनच महिन्यांत 2000 वरून 4000 वर येते.
मार्केटमध्ये प्रचंड तेजी असते.             
ACC कंपनीचा शेअर 200 रुपयांवरून 9000 रुपयांवर जातो. 
स्टरलाईट, व्हीडीओकॉन, अशा कंपन्या रडारवर येतात.
त्याच्याकडे प्रचंड पैसा जमा होतो.  
भल्याभल्या उद्योगपतींना लाजवेल अशी त्याची लाइफस्टाईल बनते. 
वरळी समुद्र किनाऱ्यावरचं त्याचं अलिशान घर, त्यात असलेला गोल्फ कोर्स, 
अतिशय महागड्या गाड्या – सर्वांनाच अचंबित करतात. 
‘शेअर मार्केटचा अमिताभ बच्चन’ म्हणून त्याला ओळखलं जातं.
शेअर मार्केटला एका झटक्यात 
जमिनीवरून आकाशात घेऊन जाणारा ‘बिग बुल’ 
म्हणून त्याला सरकार दरबारी, उद्योग क्षेत्रात, बँकांच्या जगात 
मान्यता मिळालेली असते.  
पण हा एक फुगा असतो. 
तो कधीतरी फुटणार असतो. 
सुचेता दलाल नावाची पत्रकार हा घोटाळा उघड करते.
1992 मध्ये हा घोटाळा समोर येतो. 
त्याला Scam 1992 म्हणून ओळखलं जातं.
शेअर मार्केट मधला तो सर्वात मोठा घोटाळा, म्हणून ओळखला जातो.

पुढे शेअर मार्केट कोसळतं. हा फुगा फुटतो. 
बँका पैसे मागू लागतात.
अनेक मध्यमवर्गीय लोक देशोधडीला लागतात.
बँका बुडालेल्या असतात. 
त्यात आपल्या ‘बँक ऑफ कराड’चा सुद्धा नंबर लागतो. 
नरसिंहराव यांचं सरकार. जेपीसीची घोषणा.
नेमकं काय झालं, मार्केटमध्ये नेमकं काय होतंय - कुणालाच कळत नाही.

आणि परत सुरु होतो तोच खेळ.
चौकशी. चौकशी. चौकशी. 
पोलीस. सीबीआय. रिझर्व बँकेची समिती. जेपीसी.
कोर्ट कचेरी. हाय कोर्ट. सुप्रीम कोर्ट.
शेवटी त्याला नऊ वर्षांची सजा मिळते. 
चौकशीच्या दरम्यान जेव्हा तो बेलवर बाहेर आलेला असतो 
तेव्हा सर्व वैभव संपलेलं असतं.
त्याच्या भावाच्या ऑपरेशनसाठी 
त्याला तीस हजार रुपयांचं कर्जही लवकर मिळत नाही.
पुढे 47 व्या वर्षी हृदयविकाराने त्याचा मृत्यू होतो. 
त्याचं नाव होतं हर्षद मेहता. 

शेअर मार्केट, भारत सरकार, सेबी, रिजर्व बँक - सर्वांना 
त्याने गदागदा हलवलेलं असतं.
सर्वच जागे होतात. 
नवीन नियम येतात. 
असं भविष्यात होऊ नये, म्हणून काळजी घेतली जाते.

पण तो जाता-जाता म्हणतो, 
‘बस वक्त कि बात है. मेरे जैसा एक और आयेगा!’

***

दुर्दैवाने त्याचं म्हणणं खरं ठरतं.
त्याच्यासोबतच काम केलेला एक चार्टर्ड अकौंटंट 
त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकतो.
काय करावे आणि
काय करू नये – हे सुद्धा.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 
आपलं वैभव, आपला पैसा आणि आपली श्रीमंती दाखवायची नाही.
दुसरी बाब म्हणजे खूप पैसे कमवायचे असतील तर 
खूप पैसे मार्केटमध्ये टाकावे लागतील. म्हणजे त्यासाठी परत बँका, वित्तीय संस्था 
आणि कंपन्यांचे प्रमोटर्स पकडणे आवश्यक.    
तीसरी बाब म्हणजे एकदम शेअरची किंमत वाढवायची नाही. 
कुणाच्याही पटकन लक्षात येईल असं करायचं नाही. 
आणि चवथी बाब म्हणजे मुंबईच्या ऐवजी कोलकाता मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची.
मुख्य धोरण तेच! 
Pump and Dump Policy!
म्हणजे एखाद्या कंपनीचा शेअर 
इतक्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचा 
की त्याची किंमत वाढलीच पाहिजे.
एकदा का किंमत वाढली की 
आपण घेतलेला सर्व माल dump करायचा. 
म्हणजे विकून टाकायचा.
झी, अदानी अशा कंपन्या तो पकडतो. 
आयटीसी, एसीसीमध्ये तो चांगला धंदा करतो.
पण पोखरण अनु चाचणी, रशियाचा बदलता व्यापार यामुळे 
फुगा फुटतो. आणि परत सुरु होतो तोच खेळ.  

वर्ष 2001
अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार. 
प्रमोद महाजन जेपीसीची घोषणा करतात.
चौकशी. चौकशी. चौकशी. 
पोलीस. सीबीआय. जेपीसी.
कोर्ट कचेरी. हाय कोर्ट. सुप्रीम कोर्ट.
त्याला भारतात स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यावर बंदी घालण्यात येते.
त्याचं नाव आहे केतन पारेख! 

***
आता थोडीशी वेगळी कहाणी.

शेतकऱ्याचा एक मुलगा. 
त्याचं स्वप्न असतं, उद्योगपती व्हायचं. 
त्याला हॉटेलचा बिझनेस करायचा असतो. 
रियल इस्टेटचा व्यापार करायचा असतो. 
बीकॉम झाल्यावर तो एमबीए करायला अमेरिकेत जातो. 
परत आल्यावर हॉटेल सुरु करतो. पण चालत नाही. 
‘रियल इस्टेट कंपनी’ सुरु करतो. म्हणावं तसं यश मिळत नाही.
तो हिंमत हरत नाही. भारतात कुठला व्यवसाय चालेल, हे तो ओळखतो. 
पुढचा काळ कम्प्युटर्सचा असेल. आयटीचा असेल. हे त्याला समजतं.
तो आयटी कंपनी सुरु करतो. धंदा जोरात चालू लागतो. 
1992 मध्ये त्याच्या कंपनीचे शेअर्स बाजारात येतात.
पुढे 2001 मध्ये त्याची कंपनी अमेरिकेतील शेअर बाजारात येते.  
पन्नास हजारपेक्षा जास्त लोक त्याच्याकडे काम करायला लागतात. 
ती एक मल्टी नॅशनल कंपनी झालेली असते. 
वर्ल्ड बँकपासून ते ब्रिटीश पेट्रोलिअमपर्यंत 
अनेक जागतिक संस्था त्यांचे ग्राहक बनतात. 
बिल गेटस् पासून बिल क्लिंटनपर्यंत अनेक व्हीआयपी बरोबर 
त्याच्या भेटीगाठी सुरु होतात. 
भारतात तर तो आयटी इंडस्ट्रीचा ‘पोस्टर बॉय’ बनतोच
पण आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा 
मोठा उद्योगपती म्हणून ओळखला जाऊ लागतो.
त्याचे शेअर्स जगभरात विकल्या जाऊ लागतात.
कंपनी प्रचंड नफ्यात असते. शेअरचे भाव वाढलेले असतात. 
सर्व काही व्यवस्थित चालू असतं. 
अचानक त्याला त्याचा जुना शौक सुधरू देत नाही. 
त्याचं स्वप्न त्याला पूर्ण करायचं असतं. 
त्याचं मन ‘रियल इस्टेट’च्या धंद्यात अडकलेलं असतं.
तो हळूहळू आपले शेअर्स विकू लागतो. गहाण ठेवू लागतो. 
आलेले पैसे जमीन खरेदी करण्यात घालवू लागतो. 
हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करू लागतो. 
अनेक शेल कंपन्या स्थापन केल्या जातात. 
त्याच्या नातेवाईकांसोबतच त्याच्याकडे काम करणारे नोकर, माळी, ड्रायव्हर – 
सर्वांच्याच नावावर नवनवीन कंपन्या निर्माण केल्या जातात. 
सर्व पैसे जमिनीत गुंतवले जातात. 
मुख्य धंद्याकडे म्हणावं तेवढं लक्ष दिलं जात नाही. 
मग शेअर्सचे भाव कमी होऊ नये म्हणून- 
खोट्यानाट्या गोष्टी करणे, सुरु होते. 
खोट्यानाट्या कागदपत्रांची निर्मिती होते. 
सेल्सची रक्कम वाढवून दाखवली जाते.
नफा जास्त दाखवला जातो. 
खोटे बँक स्टेटमेंट दाखवून बँकेत खूप पैसे जमा आहेत, असं दाखवलं जातं. 
कंपनी वर असलेले कर्ज दाखवल्या जात नाही. 
कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढवून दर महिन्याला त्यांच्या पगारापोटी 
कोटी कोटी रुपये काढून घेतल्या जातात. 
कंपनी आतल्या आत खलास होत असते. 
सर्व पैसा मातीत म्हणजे जमिनीत घातल्या जातो. 
ही सर्व खोटी कागदपत्रे 
बोर्ड ऑफ डायरेक्टर, गुंतवणूकदार, स्टॉक एक्स्चेंज, इन्कम टॅक्स, वगैरे 
सर्वत्र अनेक वर्षे फिरवली जातात.
इतका हुशार माणूस पण त्याच्या लक्षात येत नाही की आपण कधीतरी पकडले जाऊ. 
आपण जे काही नवीन विश्व निर्माण केलं, ते सर्व नष्ट होईल.
त्याचा जमीन जुमल्याच्या व्यवसायातील रस, 
त्याला अशा बाबींचा विचारच करू देत नाही.
प्रचंड नफा मिळवून आपण जमिनी विकू 
आणि एका झटक्यात सर्व काही सुरळीत होईल, 
ही असते त्याची भोळी आशा !

पण नियतीला हे मान्य नसतं.
2008 च्या शेवटी आलेली जागतिक मंदी त्याची सर्व स्वप्ने चक्काचूर करते. 
जमिनीचे भाव कोसळतात. व्यवसाय कमी कमी होऊ लागतो. 
त्याने गहाण ठेवलेले शेअर्स घेऊन बँका आपले पैसे मागायला येतात. 
काय करावं, त्याला सुचत नाही. 
आपल्या ‘रियल इस्टेट’च्या कंपन्या त्याच्या आयटी कंपनीमध्ये विलीन करून 
तो हा विषय संपवण्याचा प्रयत्न करतो. 
तसा ठराव केला जातो. 
पण गुंतवणूकदारांना हे मान्य होत नाही.
‘आयटी’ आणि ‘रियल इस्टेट’ समीकरण त्यांना पटत नाही. 
शेवटी त्याला कळतं की, आपला ‘गेम’ संपला आहे. 
त्याने जी काही खोटीनाटी कामं केलेली असतात 
जी काही लबाडी केलेली असते 
त्या सर्व गोष्टी तो कबूल करतो. 
कागदावर मांडतो. 
एक पत्र जाहीर करतो. 
सर्व गुंतवणूकदार आणि शेअर होल्डर्सच्या पायाखालची वाळू सरकते. 
आणि सुरु होते शेअर्सची अंदाधुंद विक्री.
प्रत्येकाला ‘सर्व काही संपलं आहे’ याची जाणीव होते.
जे मिळेल ते पदरात पाडून घ्यावं, म्हणून प्रत्येकाची धडपड.         
588 रुपयांचा शेअर 11 रुपयाला विकून लोक डोकं फोडून घेतात.
एका सतत वाढत जाणाऱ्या जबरदस्त कंपनीचा अंत पाहू लागतात.
आपले ‘सुन्हेरे खॉब’ जळताना पाहू लागतात.
यात सगळ्यात जास्त नुकसान होतं ते सामान्य शेअर होल्डर्सचं.

पुढे चौकशी, कोर्ट कचेरी सुरु होते. गुन्हा सिद्ध होतो. 
2015 मध्ये त्याला सात वर्षांची सजा होते.  

त्या उद्योगपतीचं नाव आहे ‘रामलिंगा राजू’. 
आणि ती इतिहासात जमा झालेली कंपनी होती ‘सत्यम’!

पुढे सरकारच्या मध्यस्थीमुळे 
‘टेक महिंद्रा’ या कंपनीमध्ये ‘सत्यम’ विलीन होते. 
‘सत्यम’चे ग्राहक आणि ‘सत्यम’चे कर्मचारी दोघांचेही भले होते! 

***
या वर्षीच आपल्यासमोर आलेली एक नवी कहाणी.
यांची शेअर मार्केटमध्ये पैसा कमावण्याची तऱ्हाच न्यारी.
एकीकडे संशोधन करणे आणि दुसरीकडे सट्टेबाजी!

इस्राइलमध्ये रुग्णवाहिका चालवणारा एक मुलगा अमेरिकेत जातो. 
तेथे शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या एका संस्थेत नोकरी करतो.
2017 मध्ये शेअर मार्केट व कंपन्यांवर रिसर्च करणारी 
‘हिंडनबर्ग’ नावाची संशोधन संस्था स्थापन करतो.   
मोठ्या प्रमाणावर हेरा फेरी करून 
आपल्या शेअर्सचे भाव वाढवणाऱ्या कंपन्यांवर 
त्या संस्थेचे विशेष लक्ष असते.    
अशा कंपन्यांमध्ये होणाऱ्या घोटाळ्याचा अभ्यास करून 
त्यावर ती संस्था एक सविस्तर रिपोर्ट तयार करत असते.
तो रिपोर्ट प्रसिद्ध केल्यानंतर त्या कंपनीचा खरा चेहरा समोर आला  
की त्या कंपनीचे शेअरचे भाव कोसळतात.
पण याच्यात ‘हिंडनबर्ग’चा काय फायदा? 
असा प्रश्न निर्माण होतो.
‘हिंडनबर्ग’ फक्त रिसर्च करून थांबत नाही. 
अशा कंपन्यांच्या शेअर्सचे ‘शॉर्ट सेलिंग’ करतात.
म्हणजे आज पैसे घ्यायचे आणि शेअर्स काही दिवसानंतर द्यायचे.
म्हणजे आपल्याकडे नसलेले शेअर्स ते इतर ‘ब्रोकर’ कडून उधार घेतात. 
किंवा काही दिवसानंतर भाव कमी झाल्यावर विकत घेतात.
याला Future and Option Trading म्हणतात. 
म्हणजे एखाद्या कंपनीचा घोटाळा उघड करणारा रिपोर्ट 
प्रसिद्ध करायच्या आधीच ही संस्था 
त्या कंपनीचे शेअर्स काही दिवसानंतर देऊ या बोलीवर 
मोठ्या प्रमाणावर विकते
आणि घोटाळा उघड झाल्यावर कमी किंमतीत ते शेअर्स विकत घेऊन 
प्रचंड नफा कमावते.
त्यांनी आतापर्यंत तीसपेक्षा जास्त कंपन्यांचे घोटाळे उघड केले आहेत.
साहजिकच ‘हिंडनबर्ग’ने आपल्या कंपनीवर रिसर्च करू नये, 
असं सगळ्याच मालकांना वाटत असते.
तर या कंपनीची नजर पडते भारताच्या ‘अदानी ग्रुप’वर. 
दोन वर्षांचा अभ्यास करून ते एक रिपोर्ट प्रसिद्ध करतात. 
त्या रिपोर्टचं शीर्षकच अतिशय भयानक आहे
जगातल्या कार्पोरेट दुनियेच्या इतिहासात 
सगळ्यात मोठी फसवणूक, 
असं हिंडनबर्गच्या रिपोर्टच्या शीर्षकामधून दिसतं.  
Adani Group: How The World’s 3rd Richest Man 
Is Pulling The Largest Con In Corporate History 
त्यात अदानी ग्रुपवर अनेक आरोप केलेले आहेत. 
करबुडवेगिरी, भ्रष्टाचार, काळ्या पैशाची हेराफेरी, शेल कंपन्यांची निर्मिती, 
शेअर्सच्या किंमतीवर नियंत्रण, कर्जबाजारीपणा, Insider Trading, 
असे अनेक मुद्दे त्यात आहेत.

त्या रिपोर्टमध्ये ‘अदानी ग्रुप’ला 88 प्रश्न विचारलेले आहेत.
हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्याबरोबर कार्पोरेट दुनियेला मोठा हादरा बसतो.
‘अदानी ग्रुप’ त्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करते.  
राष्ट्रभक्ती, भारतावर हल्ला, जालियानवाला बाग असे अनेक विषय चघळत 
अदानी समूह कोर्टात जाईल, असेही सांगतो.     
‘चोरावर मोर’च्या थाटात ‘हिंडनबर्ग’सुद्धा 
‘अमेरिकेतील कोर्टात याच म्हणजे आम्हाला सर्व कागदपत्रे मागता येतील’
असं उत्तर देतं. 
या सगळ्या गोष्टींमुळे सुरु होतो एक नवा खेळ. 
मार्केट त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. 
धडाधड शेअर्सचे भाव कोसळू लागतात.
अदानी ग्रुपची संपत्ती कमी कमी होऊ लागते. 
श्रीमंतीच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या 
उद्योगपतीचे साम्राज्य ढासळायला लागते.  
पत्त्याच्या घराप्रमाणे होतं.
एका आठवड्यातच अदानी ग्रुपची संपत्ती 
दहा लाख कोटी रुपयांनी कमी होते. 
म्हणजे एका प्रश्नाची किंमत 11336 कोटी रुपये.        

आता हा खेळ फक्त शेअर मार्केटपुरता मर्यादित राहत नाही. 
आता हा खेळ फक्त आर्थिक दुनियेपुरता मर्यादित राहिला नाही. 
यात राजकारण येतं. 
विरोधकांच्या हातात अतिसंवेदनशील विषय येतो. 
क्रोनी कॅपिटलीझम येतं. 
श्रीलंका, बांगलादेश, इस्राइल वगैरे देशांकडून मिळालेला धंदा येतो. 
म्हणजे परराष्ट्र मंत्रालय येतं. 
संरक्षण मंत्रालयासाठी काम करणाऱ्या तसेच 
आपल्या देशातील महत्त्वाचे पोर्ट, एअरपोर्ट कंट्रोल करणाऱ्या कंपनीमध्ये   
सायप्रस, मॉरीशस सारख्या देशातून होणारी बेनामी गुंतवणूक येते. 
चीनी गुंतवणूक येते. 
चौकशी, जेपीसी गठीत करण्याची मागणी सुरु होते.
लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभाग्रहांत हंगामा सुरु होतो.
आणि या सर्व गदारोळीत अदानीच्या शेअर्सचे कोसळत जाणारे भाव. 
हा विषय कुठपर्यंत जाईल 
याचा शेवट काय असेल
सांगता येणे अवघड आहे. 
पण प्रवास काटेरी आहे. 

***

अदानी समूहावर यापूर्वीसुद्धा अनेकदा हल्ले झाले.
प्रन्जोय गुहा ठाकुरदासारख्या पत्रकारांना नोकरी सोडावी लागली.
CreditSights नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने पाच-सहा महिन्यांपूर्वी 
या उद्योग समूहाबद्दल खूप काही सांगितलं होतं.
त्यांनी घेतलेलं कर्ज, 
कुठल्याही क्षेत्रात बेधडकपणे व्यवसाय म्हणून शिरण्याची त्यांची वृत्ती, 
अशा बाबींबद्दल चिंता व्यक्त केली होती.
कधीतरी ते अडचणीत येतील, असंही सांगितलं होतं.

असंही बोललं जातं कि त्यांच्या कंपन्यांचे 
72% शेअर्स त्यांच्याकडेच असतात.
20 ते 22% शेअर्स एलआयसी, एसबीआय अशा देशातील 
किंवा इतर परदेशी वित्तीय संस्थांकडे असतात.
त्या संस्था दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात. 
दररोज खरेदीविक्रीसाठी ते शेअर्स उपलब्ध नसतात.
म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांचे
फक्त 6% शेअर्सच ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतात. 
आणि विविध मार्गाने त्या 6% शेअर्सचे भाव वाढवले की 
आपसूकच 100% शेअर्सचे भाव वाढतात.
त्यामुळे प्रमोटर आपल्या मालकीचे शेअर्स गहाण ठेवून कर्ज घेऊ शकतात.
म्हणजे फक्त सहा टक्के हिश्श्यावर नियंत्रण ठेवलं की 
आपसूकच कंपनीचं मूल्य वाढतं. 
बरीच तज्ज्ञ मंडळी असं मत मांडतात.
यात ‘इनसायडर ट्रेडिंग’ सारखी बेकायदेशीर कृती दिसते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 
कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रचंड वेगाने घुसणारा हा एक उद्योग समूह आहे.
एक्स्पोर्ट पासून सुरु झालेला उद्योग, कुठेही जायला तयार.
समुद्रावर नियंत्रण करणारे पोर्ट - मला पाहिजे.  
सर्वदूर पसरलेल्या कोळशाच्या खाणी - मी तयार. 
रस्ते बांधायचे – मी करतो.
वीज निर्माण करायची.  वीज पुरवायची भारतात आणि भारताबाहेरसुद्धा – मी तयार.
एअरपोर्ट चालवायचे - मी तयार. 
डिफेन्समध्ये सुरक्षा साहित्य पुरवायचे - मी तयार.
सिमेंट पाहिजे -  मी  मोठमोठाल्या सिमेंट कंपनी विकत घेतो.
‘ग्रीन एनर्जी’मध्ये काम करायचं - मी तयार.  
शेतीमध्ये काही करायचं – मी तयार.
श्रीलंकेत पावर प्लांट करायचा – तयार. 
बांगलादेशला पावर सप्लाय करायचा – मी करतो. 
इस्राइलमधील बंदर चालवायचं – मी करतो.
इतकंच काय हिमाचल मधील सफरचंद विकायचे – मी करतो.
कुठलाही व्यवसाय करण्यासाठी असलेली आग, 
जिद्द आणि हिंमत त्याच्याकडे आहे.
जगातील कुठलाही व्यवसाय असेल तो चालवण्यासाठी 
अतिशय जोरदारपणे आणि सर्व प्रकारची तंत्रं वापरून 
हवे ते हस्तगत करण्यासाठी एका पायावर उभा असलेला हा समूह.    
मग मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायची. 
त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा पाहिजे. 
म्हणजे मोठ्या प्रमाणावर कर्ज. 
बेसुमार ग्रोथ.
असं बोललं जातं की मागच्या आठ-दहा वर्षांमध्ये 
या समूहाची संपत्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
त्यामुळेच जगातील दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस म्हणून 
त्यांची गणना केली गेली. 
बांगलादेशसाठी पावर सप्लायचा करार कसा झाला.
त्यातून नेमका कुणाचा फायदा होणार आहे. 
प्रदूषण आपल्या देशात, वीज बांगलादेशला आणि नफा या समूहाला      
आपलं काम करण्यासाठी हे कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात, 
असा रिपोर्ट ‘वाशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रसिद्ध झाला होता.
काय खरं, काय खोटं माहीत नाही.  
पण तो नऊ पानांचा रिपोर्ट डोकं सुन्न करतो. 
एकंदर भारतात आणि आशियात प्रमुख स्थान मिळवलेला 
हा उद्योग समूह आता पायाखालची वाळू सरकते त्याप्रमाणे दिसतोय.
आणि याचं तत्कालीन कारण दिसतंय शेअर मार्केट 
आणि ‘हिंडनबर्ग’ ने सुरु केलेला शेअर मार्केट मधील खेळ!  

***

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 
त्यावेळच्या भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतीची मुलाखत टीव्हीवर चालू होती.
त्याच्या वडिलांनी सर्व काही शून्यातून निर्माण केलं होतं.
तो वडिलांप्रमाणेच कर्तृत्ववान निघाला. 
आणि भारतातील नंबर एकचा उद्योगपती झाला.
त्याची प्रगती, त्याची श्रीमंती आणि त्याचा व्यवसाय वाढतच होता.
कापड उद्योग, पेट्रोलिअम, टेलीकम्युनिकेशन, पावर, रिटेल
अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये त्यांचा ग्रुप शिरकाव करत होता.
जेव्हा त्याला उपलब्ध होणाऱ्या नवनवीन संधींबद्दल विचारलं गेलं,
बिजनेस एक्स्टेन्शन/डायवर्सिफिकेशनबद्दल विचारलं गेलं -   
तेव्हा त्याने एक किस्सा सांगितला.     

‘मेरी मां ने मुझे एक बात कही थी. 
उसने कहा था : “बेटा, समंदर मे बहुत पानी होता है, 
मगर एक बात हमेशा याद रखना, तू पुरा पानी कभीभी पी नही सकता.”
मै, ये बात जिंदगीभर नही भूल सकता.’

कदाचित असा सल्ला कुणी यांनाही दिला असता तर!

- दिलीप लाठी, पुणे
diliplathi@hotmail.com 

Tags: trading sebi adani wilmar adani group adani power gautam adani narendra modi dilip lathi hidenburg Load More Tags

Comments: Show All Comments

विजय वडेर

खूप छान लेख. अतिशय कमी शब्दांमध्ये पूर्ण माहिती देणारा.

Chandrahar shinde

Very good

Shilpa Bele

अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेला लेख. आज पर्यंत ज्यांनी कधीही शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाही त्यांनी आवर्जून वाचावा असा लेख. साधारण ७.४ % भारतीय लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात पण अशी प्रकरणे उघडकीस आली की त्याचे परिणाम अप्रत्यक्षरित्या सर्वांनाच भोगावे लागतात.

कर्नल नवीन बेंद्रे (निवृत्त)

अतिशय मार्मिक आणि अभ्यास पुर्वक केलेले लिखाण ! लेखकाचे कौतुक!! सत्य अतिशय छान प्रकारे मांडले आहे.

Hira janardan

किचकट विषय अतिशय सोप्या सरळ शब्दांत मांडण्याची लेखकाची हातोटी पाहून थक्क झाले.

Nitin Kottapalle

शेअर बाजारात झालेल्या घोटाळ्यांची अतिशय कमी शब्दांत परंतु व्यवस्थित माहिती देणारा अप्रतिम लेख. या सगळ्या घोटाळ्यांमध्ये शेवटचा घोटाळा फारच भयानक दिसतोय. त्यात सरकारचाही अतिशय व्यवस्थित वापर करून घेतलेला आहे असे म्हणण्यास खूपच वाव आहे आणि तसे असेल तर ती मोठ्याच विनाशाची चाहूल असू शकते.

Sohil

जबरदस्त लेख

Prasad Morey

Sir nicely Written.. Very Crisp. Covered both past and present event in the share market.

Priyanka Lathi

पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत गुंतवून ठेवणारा लेख..!! कोणाला प्रत्यक्ष आरोप न करता सत्य सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे. थोडक्यात काय तर शहाण्याला शब्दाचा मार..!!

Anup Priolkar

Nice article. Interesting also to recollect all the memories about scam in share and public fund.

Anand Gosavi

SEBI ची काय करते? बहुधा सत्ताधारी पक्ष आणि अदानी समूह ह्यांच्या नात्यामुळे SEBI निष्क्रिय झाली आहे काय?

Niraj

एकदम मस्त लेख, पण यात छोटे गुंतवणूकदार नेहमीच वाऱ्यावर..

Add Comment