पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींनी X वरअर्ध्या मिनिटाचा एक व्हिडिओ पोस्ट केला
आणि सगळा मीडिया कामाला लागला.
त्यांच्या या कृतीचे चित्रविचित्र अर्थ काढले जाऊ लागले.
वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण केले जाऊ लागले.
‘संविधान’ वगैरेच्या गोष्टी सुरु झाल्या.
‘सवाल-जबाब’ चालू झाले.
मागे घडलेल्या घटना समोर आणल्या जाऊ लागल्या.
मनमोहन सिंग यांनी काय केले, वगैरे वगैरे.
‘भक्त’ आणि ‘लिब्रांडू’ मंडळींमध्ये
सोशल मीडीयावर तुंबळ युद्धच सुरु झाले.
===
तसं पाहिलं तर गोष्ट एकदम साधी सरळ सोपी होती.
भारताचे सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या घरी श्रीगणेशाचे आगमन झाले.
नरेंद्रभाई तेथे गेले. श्रीगणेशाचे दर्शन घेतले. आरती केली.
त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ प्रदर्शित केले.
देशाच्या पंतप्रधानांनी जर सरन्यायाधीशाच्या घरी जाऊन
देवाचे दर्शन घेतले, आरती केली तर त्यात गैर काय?
त्यात वादंग माजण्यासारखं काय?
त्याबद्दल कुणालाही आक्षेप असण्याचा प्रश्नच येत नाही.
पण वादविवाद निर्माण झाला.
चर्चा तर इथपर्यंत सुरु झाली की खरंच यांना बोलावले होते
की, ते स्वतःच गेलेत?
कारण कुठल्याही प्रकारचे संकेत पाळण्याचा त्यांचा स्वभाव नाही.
ते सरळ पाकिस्तानमध्ये विमान उतरवतात,
आणि नवाझ शरीफ यांना भेटतात.
किंवा परदेश धोरणाची ‘ऐसी तैसी’ करून ते सरळ अमेरिकेत जातात
आणि ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’ अशा घोषणा देऊन
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणूक प्रचारही करतात.
===
पण इथं विषय थोडा गंभीर झाला.
कारण टायमिंग!
सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड साहेब निवृत्त होण्यासाठी
आता काही महिनेच बाकी आहेत.
आणि आतापर्यंत निवृत्तीनंतर अशा व्यक्ती कधी राज्यसभेत दिसतात,
किंवा पार्टीच्या सेवेत इतर ठिकाणी दिसतात.
सरकारला हवे तसे निर्णय त्यांच्या काळात लागलेले होते,
असं लोक सर्रास बोलतात.
परंतु सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड साहेबांनी आजपर्यंत दिलेल्या निकालामुळे
लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढला होता.
त्यांच्या प्रतिमेला धक्का लागेल असं काहीही घडलेलं नव्हतं.
मग अचानक सर्वच संकेतांचा भंग करून हे कसं काय झालं असेल?
मोन्तेस्क्यूने आपल्या ‘द स्पिरीट ऑफ द लॉज’ मध्ये म्हंटल्याप्रमाणे
कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तीनही संस्था
जर पूर्णपणे वेगळ्या आणि स्वतंत्र असल्या तरच लोकशाहीसाठी चांगले असते.
आपल्या देशात कायदेमंडळ [आमदार/खासदार] आणि कार्यकारी मंडळ [मंत्रीमंडळ]
जरी एकत्र असले तरी न्यायालये पूर्णपणे स्वतंत्र आहेत.
किमान त्यामुळे लोकशाही सशक्त आहे.
सत्ताधाऱ्यांवर वचक आहे.
म्हणूनच कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाचा प्रमुख
आणि न्यायपालिकेचा प्रमुख यांनी काही संकेत पाळणे आवश्यक असतात.
न्या. चंद्रचूड यांच्या काळात अनेक धाडसी निर्णय घेतल्या गेलेत.
त्यांचा आणि मोदी सरकारचा सुप्त संघर्ष ही आपण पाहिला.
निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेता
आणि सरन्यायाधीश यांची समिती स्थापन करावी,
असा निर्णय त्यांनी दिला होता.
पुढे मोदी सरकारने त्वरित कायदा करून
त्या समितीतून सरन्यायाधीशांनाच वगळले.
अरविंद केजरीवाल विरुद्ध एलजी [केंद्रसरकार] हा संघर्ष सुरु होता,
खरे अधिकार लोकनियुक्त सरकारलाच,
असा निर्णय त्यांनी दिला होता.
पण मोदी सरकारने कायदा बदलून तो निर्णयही बदलला.
महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीशांची भूमिका कडक होती.
त्यांनी राज्यपाल आणि सभापतीवर ताशेरे ओढले होते.
सत्तांतर चुकीच्या मार्गाने झाले, हे सांगितले होते.
ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांना परत मुख्यमंत्री केलं असतं,
असंही सांगितलं होतं.
ठाकरे-पवार दोघांचेही पक्ष गेले. चिन्ह गेलं.
तरीही महाराष्ट्राच्या जनतेचा कोर्टावर भरोसा फार!
बलाढ्य नेता, बलाढ्य सरकार आणि बलाढ्य पक्ष,
यांना न जुमानता न्याय मिळेल ही अपेक्षा.
‘आज निकाल येईल...उद्या निकाल येईल’ म्हणत म्हणत
आता निवडणुका येऊ लागल्यात.
तरीही लोक आशावादी.
पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमात तर पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या समोरच
सरळ ‘सेक्युलर सिव्हिल कोड’ बद्दल बोलले.
सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेवर त्यांनी ‘कम्युनल’ म्हणून टीका केली.
त्यामुळे लोकांच्या मनात सीजेआय – पीएम हा संघर्ष दिसत होता.
===
आणि आता अचानक समोर आलेला व्हिडीओ!
पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी.
आरती चालू. सरन्यायाधीशांच्या सुरात सूर मिसळत आहेत.
गणपतीची आरती म्हणत आहेत.
मराठी लोकांची वेशभूषा. डोक्यावर टोपी.
आणि X वर केलेली पोस्ट सुद्धा मराठीमध्ये.
===
बाकी काहीही असले तरी नरेंद्रभाई
कुठलीही कृती विनाकारण करत नाहीत.
त्यांचा प्रत्येक निर्णय असतो एक मास्टरस्ट्रोक!
एकाचवेळी ते अनेक गोष्टी साध्य करत असतात.
महाराष्ट्रात लवकरच निवडणुका आहेत.
मराठी माणसाच्या मनाला त्यांनी हात घातला.
हिंदुहृदयसम्राट तर ते आहेतच!
त्यामुळे आपली हिंदुत्ववादी भूमिका परत स्पष्ट केली.
यूपीए सरकारच्या काळात अहमद पटेल यांचा कॉंग्रेसमध्ये प्रचंड दबदबा होता.
ते सोनिया गांधीचे सल्लागार होते.
त्यांच्याबद्दल ‘अहमदमिया हमारे दोस्त है’ वगैरे बोलून
कॉंग्रेसमध्येच त्यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण करून टाकले.
तसेच काहीसे गुलाम नबी आझाद यांचेही झाले.
त्यांनी उचललेले प्रत्येक पाऊल अतिशय मोठा कार्यक्रम करण्यासाठी असते.
हे आतापर्यंत खूपवेळा सिद्ध झालेले आहे.
आता नेमके काय कारण आहे, हे लवकरच समोर येईल.
पण सरन्यायाधीशांवर पुढील काही महिने
निकाल देत असताना प्रचंड दबाव राहील, हे नक्की.
सरकारच्या भूमिकेच्या विरोधात अनेक खटले सुनावणीसाठी आहेत.
त्याचे निकाल देताना तारेवरची कसरत असेल.
काही कारण असो वा नसो प्रत्येक बाब लोक तपासून बघतील.
टीका-टिपण्णी होईल.
===
नरेंद्रभाईंच्या मनात काय आहे, हे कुणालाही सांगता येणार नाही.
पण हा ‘एपिसोड’ सुरु झाल्यापासून
मीडियामध्ये फुल फॉर्ममध्ये दिसणारा राहुल
गांधी मात्र गायब झालेला आहे.
‘हेडलाईन’ मॅनेज करणे, अवघड काम असते!
- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्ञानज्योती या नियतकालिकाचे संपादक आहेत.)
Tags: cji pm modi chandrachood arti ganpati Load More Tags
Add Comment