'ग्राफिक' विषयावरचे 'अ‍ॅकेडेमिक' नाटक

पॉर्नोग्राफी विरुद्ध कुटुंब, मूल्यं, आणि संवाद - पॉपकॉर्न

भारत पॉर्न वेबसाइट्सचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांपैकी एक आहे. पालकांच्या ईमेल अकाऊंटचा गैरवापर करून पौगंडावस्थेत पॉर्न पाहणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढतं आहे. मोबाईल आणि इंटरनेट सहज उपलब्ध असल्यामुळे पॉर्न आज दहा-बारा वर्षांच्या मुलांच्याही नजरेस फार सहज पडतं. मुलांच्या आजूबाजूची मोठी माणसंही पॉर्न पाहतात, त्याबद्दल उघडपणे विनोद करतात — आणि नकळतपणे लहान मुलांसमोर त्याचं सामान्यीकरण (normalization) होतं.

‘पॉपकॉर्न भारी असतं’ असं जेव्हा एखादं शालेय वयातलं मूल म्हणतं, तेव्हा आपल्याला काय वाटतं? या मुलाला चविष्ट मक्याच्या लाह्या आवडतात, एवढंच आपल्या मनात येत असेल तर एक अर्थाने आजच्या काळातही आपण फार भाबडे राहिलो आहोत! लक्षात घ्या, आजच्या किशोरवयीन आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मुलांच्या भाषेत पॉपकॉर्न हे ‘पॉर्न’ चं चारचौघांत वापरण्यासाठीचं, कानाला न खटकणारं ‘सोफिस्टिकेटेड’ टोपणनाव आहे! आता पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या आसपासचं किंवा तुमचं मूल पॉपकॉर्नचा उल्लेख करेल, तेव्हा ते खरंच मक्याच्या लाह्यांविषयी बोलत असेल तरी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहणार नाही...

महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित आणि लेखक-दिग्दर्शक डॉ. विवेक बेळे यांच्या विचारांतून साकारलेलं दोन अंकी मराठी नाटक ‘पॉपकॉर्न’ हे या अशा अवघड आणि अस्वस्थ जाणिवेला सामोरे जायला लावणारं, करणपॉर्नोग्राफीशी संबंधित वेगवेगळ्या अंगांनी विचार करायला लावणारं, आणि त्याच वेळी प्रेक्षकांना उपदेशाचे डोस न पाजता रंजकतेने खिळवून ठेवणारं आहे. डॉ. विवेक बेळे हे मराठी रंगभूमीवरचे सामाजिक भान जागे असलेले नाटककार म्हणून परिचित आहेत. माकडाच्या हाती शँपेन, काटकोन त्रिकोण, ये जो पब्लिक है, यांसारखी वेगळ्या धाटणीची आणि राजकारण किंवा समाजाचे प्रश्न केंद्रस्थानी असलेली परंतु त्याच वेळी उत्तम रंजनमूल्यही असलेली नाटके त्यांनी लिहिलेली आहेत. सामाजिक प्रश्नांचे भान, डॉक्टर असल्यामुळे उपचार, उपाय शोधण्याची सहज प्रवृत्ती आणि त्याचबरोबर ‘माणसांची गोष्ट’ सांगण्याची प्रभावी शैली आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या विनोदाचा चपखल वापर यांमुळे त्यांची नाटके लोकप्रिय होतात. पॉपकॉर्न हे नाटकसुद्धा असाच एक वेगळा अनुभव देतं.

उच्च मध्यमवर्गीय घरातला करण खाडिलकर नावाचा तरुण त्याच्या एका मित्रासोबत भागीदारीने व्यवसाय करत असतो. हा व्यवसाय असतो पॉर्नोग्राफिक व्हिडिओ बनवून ते इंटेरनेटवर विकण्याचा. करणच्या स्वतःच्या घरी, त्याच्या आईवडिलांच्या खोलीत काही व्हिडिओ त्यांनी शूट केलेले असतात. हे करणच्या वडिलांना एकदा अपघाताने समजतं. ते करणवर प्रचंड चिडतात, पण त्याच्या मित्राच्या शांतपणे समजावण्यामुळे ते करणकडून ‘पुन्हा असले उद्योग करणार नाही’ असा वायदा घेऊन त्याला सुधारायची एक संधी देतात.

काही दिवसांनी एकदा अचानक करणच्या वडिलांविषयी पोलिसांत तक्रार केली जाते, की ते पॉर्नोग्राफीच्या व्यवसायात आहेत. तो धक्का पचवणं त्याच्या आईवडिलांना फार अवघड जातं केवळ भावनिक किंवा सामाजिक दृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिक दृष्ट्यादेखील. कारण त्यांचा व्यवसाय असतो ऑनलाइन वधूवर सूचक केंद्राचा! ‘फॅमिली मॅटर्स’ (कुटुंब महत्त्वाचं आहे) असं त्यांचं ब्रीदवाक्य असतं. सत्य समजल्यावर करणचे वडील त्या ब्रीदवाक्याला जागतात! त्याला फक्त एका माफ करतात. भर तरुण वयात मुलाला कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागू नये म्हणून स्वतःवर झालेला हा गंभीर खोटा आरोप ते आपल्या बायकोलाही कल्पना न देता स्वीकारतात, आणि या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी कामाला लागतात. त्या धक्क्याने आई घरातून निघून जाते. करणचं जिच्याशी लग्न ठरलेलं असतं ती अंजली डॉक्टर असते. ती करणच्या वडिलांना व्यावसायिक सहानुभूती दाखवते, त्यांना ‘उपचाराची’ गरज आहे असं सांगून त्या पद्धतीने वागते, करणला मानसिक आधार देते. तिच्या अशा वागण्याने अपराधी वाटून करण तिला खरं काय ते सांगतो,  त्या दोघांच्या नात्यातला तणाव वाढतो. मागच्या पिढीशी असलेल्या संघर्षापेक्षा हा संघर्ष वेगळ्या स्वरूपाचा अधिक नाजुक पण अधिक मोकळा आहे. मार्ग काढण्याची तयारी असलेला आहे. 

हे सगळं घडत असताना करण आणि त्याचे वडील यांच्यातलं संवाद हरवलेलं तणावपूर्ण नातं केंद्रस्थानी येतं. ज्या दोघांच्या साध्या बोलण्यातही सतत वाद होत असतात, ज्यांना काहीही बोलायचं झालं तरी अनेक वर्षं सतत आईची मध्यस्थी आवश्यक ठरत असते, त्यांना अचानक एकमेकांशिवाय कोणीच ‘आपलं’ असं उरत नाही. तेव्हा त्यांच्यातला संवाद वाढतो, सामंजस्य वाढतं, नातं सुधारतं. पण मूळ प्रश्न सुटत नाही. ही तक्रार कोणी केली, का केली, करण किंवा त्याच्या मित्राची तक्रार न करता करणच्या वडिलांची का केली? हे त्यांना कळत नाही. तो शोध घेत असताना अख्ख्या कुटुंबाचे पोलीस, वकील, राजकीय पुढारी, मीडिया यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध पणाला लागतात, पण दलदलीत अडकल्यासारखी त्यांची अवस्था आणखी आणखी अवघड होत जाते. मीडियामध्ये आणि समाजमाध्यमांवर आरोप, प्रत्यारोप, मीम, विनोद, ट्रोलिंग या संगळ्याचं मोहोळ उठत राहतं. 

पॉर्नोग्राफीचा व्यवसाय, त्यातला पैसा, त्यासंबंधातले कायदे, पॉर्न बघणारे लोक, पॉर्नची निर्मिती करणारे लोक, पॉर्नचं व्यसन, त्यापायी नासणारे नातेसंबंध, लग्नसंस्था, करियर आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांचं तरुणाईतलं वाढतं महत्त्व, त्यामुळे ‘लग्नाचं वय’ याची बदलती संकल्पना, त्यामुळे निर्माण होणारे लैंगिक आणि कौटुंबिक प्रश्न, त्याचा पॉर्न बघण्याशी असलेला संबंध, या समस्येवरचे वैद्यकीय, मानसशास्त्रीय, सामाजिक आणि कायदेशीर उपाय अशा वेगवेगळ्या अंगांनी ही ‘केस’ चर्चेला येते. पॉर्न खासगीपणे बघणं कायद्याला चालतं मात्र ते बनवणं आणि त्यातून नफा कमावणं हा कायद्याने गुन्हा आहे, यातलं विरोधाभासी वास्तव, त्यातून सहज पैसा कमावण्यासाठी नाईलाजाने, मर्जीने किंवा हौसेने त्यात काम करणारे ‘अभिनेते-अभिनेत्री’, आणि लोकांच्या लैंगिक भावनांचा गैरफायदा घेणारे नफेखोर, या सगळ्या परिस्थितीचा विचार मूळापासून करायची गरज अधोरेखित होते.

सगळी पात्रं आपापला गुंता आपापल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, आणि प्रेक्षक त्यात गुंतत जातात. नाटक संपताना शेवटी जेव्हा घटनेचा सगळा उलगडा होतो, तेव्हा प्रश्न सुटल्याची नव्हे तर दलदलीत अडकत चालल्याची भावना प्रबळ होते, कारण या संदर्भातल्या कोणत्याच प्रश्नांची सोपी, भाबडी, ‘पॉलिटिकली करेक्ट’ उत्तरं हे नाटक देत नाही.

विषय पाहून सुरुवातीला ‘प्रौढांसाठी (A)’ असं प्रमाणपत्र या नाटकाला सेन्सॉर बोर्डाने दिलं होतं, पण त्याची मांडणी पाहून आणि विषयाचे महत्त्व ओळखून स्वतः सेन्सॉर बोर्डानेच त्यात बदल केला आणि पालकांसह मुलांनाही पाहता येईल असं प्रमाणपत्र दिलं आहे. हा बदल महत्त्वाचा आणि बोलका आहे. नाटक चांगलं आहे याचीच नव्हे, तर नाटक महत्त्वाचं आहे, याचीही ती पावती आहे.

करण, त्याचा मित्र जतिन आणि करणचे वडील या तीन व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहेत. करण हा गोंधळलेला आणि स्वतःची माणूस म्हणून वाट शोधताना भरकटलेला तरुण आहे. योग्य काय, अयोग्य काय याविषयीच्या त्याच्या समजुती या खरं तर सुशिक्षित, सुसंस्कृत, आणि आर्थिकदृष्ट्या सुस्थिर असलेल्या ब्राह्मण कुटुंबाच्या चौकटीत बसणाऱ्या आहेत, पण चौकटीबाहेर पडायच्या धडपडीत दिशा हरवलेला हा तरुण आहे. अंबर गणपुले या अभिनेत्याने त्या तरुणाची वेगवेगळी तडफड उत्तम रंगवली आहे. आनंद इंगळे यांचा सरंगमंचाचा अवकाश ताब्यात घेणारा वावर त्यांच्या भूमिकेला साजेसा आहे. तरुण मुलाला घरात सतत अवघडल्यासारखं वाटेल असा दरारा आणि दुरावा असलेले वडील, हे त्याला हसत खेळत टोमणे मारणारे आणि त्याच्यासाठी मोठा त्याग करायला तयार असणारे हळवेही असू शकतात हा भावनांचा कॅलिडोस्कोप त्यांनी उत्तम रंगवला आहे. 

जतिन हा करणला आणि त्याच्या वडिलांना ‘भानगडी’तून बाहेर पडण्यासाठी मदत करत असतो. त्याच वेळी तो बाप-लेकांत संवाद घडू शकेल अशी परिस्थितीही निर्माण करत असतो. आणि हे सगळं करत असला तरी तो खऱ्या अर्थाने मुरलेला पॉर्न व्यावसायिक आहे. स्वतःच्या व्यवसायाबाबत त्याला यत्किंचितही अपराधीपणा वाटत नाही, तो स्वतः त्या व्यवसायातून बाहेर पडणार आहे किंवा नाही याबाबत तो स्वतः किंवा नाटकातलं कोणतंच पात्र चर्चा करत नाही. एक अर्थाने ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण शेवटी पॉर्न ही आजच्या आणि उद्याच्याही जगात अनिवार्यपणे अस्तित्वात असलेली गोष्ट आहे, त्यामुळे त्यासह किंवा ते टाळून आपण कसं जगायचं एवढंच ठरवणं आपल्या हातात आहे. योग्य काय, अयोग्य काय, ही ज्याचं त्याने ठरवायचं आहे. श्रीकर पित्रेने ही भूमिका उत्तम वठवली आहे.

सुशिक्षित, सुजाण, आणि समोर आलेल्या प्रश्नाने गोंधळून न जाता, वेळ घेऊन मोकळेपणाने चर्चा करू शकणारी, ‘मिलेनियल’ तरुणींचं प्रतिनिधित्व करणारी, ‘आजचं नॉर्मल’ आणि ‘आपलं नॉर्मल’ यांचा दोन्ही बाजूंनी विचार करू शकणारी अंजली ही व्यक्तिरेखा दीप्ती लेले आणि गौरी देशपांडे या अभिनेत्री आळीपाळीने साकारतात. दीप्तीचा उत्साही ‘चार्म’ लक्षात राहतो. तर गौरी देशपांडेनेसुद्धा ही भूमिका अत्यंत सहजसुंदर अभिनयाने साकारली आहे. तिची भूमिकेचा सखोल विचार करण्याची क्षमता अभिनयात जाणवते. करण आणि अंजली यांचं नातं या घटनेमुळे प्रचंड ताणलं जाऊ शकतं, त्यात अधिक चढउतार येऊ शकतात, त्या दोघांच्या जवळिकीत अवघडलेपण येऊ शकतं, समज-गैरसमज-शंका-संशय-निराकरण असे अनेक कंगोरे त्या तणावाला असू शकतात. परंतु ते मात्र लेखनाच्या पातळीवरच विशेष तपशिलात हाताळलेले नाहीत. या नात्याचा कदाचित अधिक सखोल विचार होऊ शकला असता.
 
आधी मुलगा आणि नवरा यांच्या आणि नंतर योग्य आणि अयोग्य यांच्या कात्रीत सापडलेली, कुटुंबाचा कणा असलेली आई गायत्री देशपांडे या गुणी अभिनेत्रीने रंगवली आहे. करणच्या वडिलांचा मिश्किल स्वभावाचा वकील मित्र (नितीन अग्निहोत्री), या घटनेविषयीच्या बातम्या देणारा पत्रकार (अर्णव वारियर), आणि तक्रार करणारा माणूस (सचिन जोशी) यांच्या व्यक्तिरेखा रंगमंचावर कमी वेळ असल्या तरी महत्त्वाच्या ठरतात. पत्रकार आणि तक्रारदार हे तर कथानकाला अनपेक्षित कलाटणी देतात. प्रत्येक वेळी जेव्हा पत्रकार जाहीर करत असलेल्या बातम्यांमधून कथानकाला नवं वळण मिळतं, तेव्हा विवेक बेळे यांच्याच माकडाच्या हाती शँपेन नाटकाची आठवण होते. त्यातही खरं नाट्य घडत असतं ते टीव्हीवरच्या राजकीय बातम्यांत, असा मामला होता. इथे अगदी तसंच नसलं तरी त्या त्या वेळी टीव्हीवरच्या बातमीतून नाट्य घडत जातं, हेही खरं.

मुख्य म्हणजे या माणसांची गोष्ट सांगताना हे नाटक काही गंभीर मुद्यांकडे लक्ष वेधतं. खाडिलकर कुटुंब श्रीमंत, कोकणस्थ ब्राह्मण असणं, जतिनचं अमराठी असणं, आपल्या व्यवसायातून नफा कमवण्याविषयी स्पष्टपणे विचार करणं, पन्नाशीतल्या एक पुरुष वकिलाने पॉर्नविषयी किरकोळीत विनोद करणं, अनुभव सांगणं, तक्रारदाराचं नाव काटदारे  असणं, काटदरेनी स्वतःच्या घरात निर्माण झालेल्या सामाजिक समस्येचा दोष व्यवस्थेत प्रस्थापित असलेल्या कुणालातरी देता यावा याचा शोध घेत राहणं आणि त्या एका व्यक्तीला शिक्षा झाली की आपला प्रश्न सुटेल अशा नादात प्रयत्न करत राहणं आणि स्वतः प्रस्थापित असलेल्या व्यक्तीने आपल्या मुलाचं आयुष्य वादाच्या भवऱ्यात अडकू नये यासाठी पोलिसांना, कायद्याला खोटं सांगत या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहणं... या सगळ्या गोष्टी आजच्या आपल्या समाजातलं अनेक स्तरांवरचं वास्तव लक्षात आणून देतात. नाटकाच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न जात-वर्ग-भाषा यांच्या पलीकडे जाऊन कसा सर्वव्यापी झाला आहे, हे यातून जाणवून देण्याचा प्रयत्न असावा. परंतु त्या मुद्यांचा मारा प्रेक्षकांवर न करता अत्यंत 'सटल' पद्धतीने, काहीही भाष्य न करता, पण ओघाओघात योग्य तो उल्लेख करून, त्यावर विनोद करून या गोष्टींकडे लेखक निर्देश करतो. आणि म्हणूनच घडणाऱ्या घटनेचा तेवढ्यापुरता विचार न करता, भोवतालच्या समाजाच्या संदर्भातच आपण विचार करतो. डॉ. विवेक बेळेंच्या लेखणीची ही ताकद या नाटकात स्पष्टपणे जाणवते.


हेही वाचा - काळ कठीण आहे, जागतं राहायला हवं - मुक्त चैतन्य


मात्र एक गोष्ट वेगळ्या पद्धतीने, आणि कथानकात थोडं अधिक महत्त्व देऊन आणता आली असती, याची रुखरुख मात्र लागते. पालक आणि मुलं यांच्यातला संवाद हा मुद्दा जरी नाटकात केंद्रस्थानी असला तरी सगळी महत्त्वाची पात्रं ही प्रौढ आहेत आणि त्यांच्या जाणिवा मॅच्युअर आहेत. पण विषयाचा गाभा लक्षात घेतला तर मुलं वयात येण्यापूर्वी आणि वयात येत असताना पालक आणि मुलं यांच्यातल्या लैंगिक विषयांवरच्या संवादाला अधिक महत्त्व देता आलं असतं, असं वाटलं. 

पॉर्नोग्राफी हा अब्जावधी डॉलर्सची वार्षिक उलाढाल असलेला, प्रचंड नफा कमावणारा व्यवसाय आहे. भारत पॉर्न वेबसाइट्सचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांपैकी एक आहे. मोबाईल आणि इंटरनेट सहज उपलब्ध असल्यामुळे पॉर्न आज दहा-बारा वर्षांच्या मुलांच्याही नजरेस सहज पडतं. त्यांच्या आजूबाजूची मोठी माणसंही पॉर्न पाहतात, त्याबद्दल उघडपणे विनोद करतात — आणि नकळतपणे लहान मुलांसमोर त्याचं सामान्यीकरण (normalization) होतं. मात्र प्रत्यक्ष मुलांशी याबाबत मोकळेपणाने संवाद होतोच असं नाही. अनेकदा या वयासाठी अनावश्यक म्हणून तो टाळला जातो किंवा ‘चालायचंच’ म्हणून हलक्यात घेतला जातो. मग मुलं त्यांचं कुतूहल वारंवार चोरून पॉर्न पाहून शमवतात. याचं व्यसन लागू शकतं. मुलांच्या मनात स्वतःच्या लैंगिक ओळखीबाबत गोंधळ, शारीर संबंधांविषयी अपराधभाव किंवा भीती निर्माण होऊ शकते. किंवा प्रमाणाबाहेर अश्लील विनोद, छेडछाड किंवा गंभीर लैंगिक गुन्ह्यांसारखं वर्तनही घडू शकतं. 

हे टाळायचं तर पालक आणि शिक्षकांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी शरीर, लैंगिकता, गोपनीयता, संमती आणि पॉर्न याबद्दल खुलेपणाने आणि योग्य भाषेत संवाद साधायला हवा. या मुद्याकडे प्रेक्षकांचं लक्ष वळवून नाटक थांबतं. प्रेक्षकांना हसवत, रमवत अस्वस्थ करणारं हे नाटक आपल्या मुलांसह, पालकांसह, मित्रांसह नक्की बघायला हवं, आणि संवाद सुरू व्हायला हवा...

- ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com

Tags: विवेक बेळे गौरी देशपांडे आनंद इंगळे अंबर गणपुले साधना डिजिटल नाटक नवे नाटक रंगभूमी लैंगिक शिक्षण पोर्नोग्राफी Load More Tags

Comments:

विष्णू दाते

विवेक बेळेंच नाटक! नक्कीच वेगळं आणि आशयघन असणारं!... तेंव्हा जरूर पहाणार....!!

Add Comment