भूमिका नाटकाची विशेष दखल घेणारा अंक

साधना साप्ताहिकाचा 78 वा वर्धापन विशेषांक
 

कलाकारांनी समाजातल्या महत्त्वाच्या विषयांवर भूमिका घेण्याची गरज, आजच्या अस्थिर काळात असे विषय मांडण्याची गरज, त्यामागची त्यांची तळमळ, या नाटकाची रचना, संवाद, पहिल्या आणि दुसऱ्या अंकाच्या सीमारेषेवर केलेलं ‘नाट्यात्म विधान’, अभिनेत्या कलाकारांची निवड प्रक्रिया, नाटकाचे बिनभिंतींचे सूचक नेपथ्य, प्रकाश, संगीत, तंत्र या गोष्टी कशा आकार घेत गेल्या त्याची वैचारिक आणि तांत्रिक प्रक्रिया अशा सर्व महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकणारा, डोळस दिग्दर्शकीय दृष्टीकोनातून लिहिलेला चंद्रकांत कुलकर्णी यांचा लेख अत्यंत वाचनीय आहे.

स्वातंत्र्यदिन आणि वर्धापनदिन ह्या निमित्ताने एका नाटकावर साधनाचा विशेषांक यावा यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. महत्त्वाच्या सामाजिक-राजकीय विषयांवरच्या परिणामकारक आणि लोकांना मूलगामी विचार करायला लावण्याची क्षमता असलेल्या नाटक-सिनेमांविषयी साधनाने यापूर्वीदेखील विशेषांक काढले आहेत. नाटक-सिनेमा, अन्य कला या माध्यमांतून ठाम विधान करू पाहणाऱ्या, भूमिका घेऊ पाहणाऱ्या, कलेचा वापर समाजाला जागे करण्यासाठी करणाऱ्या अशा सांस्कृतिक प्रयोगांचे विश्लेषण आणि त्यांना प्रोत्साहन यांना साधनेत कायम स्थान राहिले आहे. आणि भूमिका नाटक हे अशाच नाटकांपैकी एक आहे. जात, आरक्षण, समता, बंधुता, मूलभूत हक्क या प्रश्नांची निर्भीडपणे, गांभीर्याने आणि वास्तववादी पद्धतीने दखल घेणारे, त्यावर आजच्या काळाशी सुसंगत, समतोल अशी चर्चा करणारे आणि केवळ चर्चा करून न थांबता स्पष्ट भूमिका घेणारे हे सामाजिक, वैचारिक नाटक आहे.

पुण्यातील एक सुशिक्षित, उच्च-मध्यमवर्गीय सवर्ण कुटुंबाची पार्श्वभूमी लेखकाने निवडली आहे. दूरचित्रवाहिन्यांवर मालिकेत काम करणारा अभिनेता विवेक जयंत, बँकेत नोकरी करणारी त्याची पत्नी उल्का, आणि बारावीत शिकणारी मुलगी कुहू. त्यांच्या घरात अनेक वर्षांपासून काम करणारी आणि घरातल्या सर्वांशी जिव्हाळ्याच्या नात्याने जोडलेली शांताबाई आणि कधीमधी येणारा, थोडासा पुराणमतवादी गुंड्यामामा. अशा पंचकोनापासून कथानकाची सुरुवात होते. 26 जानेवारीच्या दिवशी विवेकला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेची ऑफर मिळते. भूमिकेसाठी तो आंबेडकर, संविधान आणि सामाजिक प्रश्नांवर सखोल वाचन सुरू करतो. त्याच्या विचार प्रक्रियेत होणारे बदल त्याच्या घरातील वर्तनात दिसू लागतात, तसेच मालिकेचा लेखक सोमनाथ, याच्याशी त्याची नाळ घट्ट जुळते. आणि कथेला सहावा आणि महत्त्वाचा कोन प्राप्त होतो. सामाजिक स्तरावर महत्त्वाचे असणारे प्रश्न जेव्हा या कुटुंबाचे रोजचे आयुष्य ढवळून काढतात, तेव्हा त्यांचे विचार, त्यातील बदल, बदल स्वीकारण्याची वृत्ती, आकस, भविष्याचा विचार हे सगळे कसोटीस लागते, आणि त्याचा काय परिणाम होतो, हा या नाटकाचा मुख्य विषय आहे. 

या नाटकाची खासियत म्हणजे यात खलनायक नाही. विवेक, उल्का, गुंड्यामामा — सर्व पात्रे आपल्या ठिकाणी खरी वाटतात. त्यांची मते आग्रही किंवा न पटणारी वाटली तरी ती माणसे खलप्रवृत्तीची नाहीत. मतभेद, अज्ञान, पूर्वग्रह, तसेच बदल स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची वृत्ती — यांतून वाट काढत नाटक महत्त्वाचा प्रश्न विचारतं - समाजाच्या हिताचा खरा मार्ग कोणता? त्याचं उत्तर नाटकात प्रत्येकाला सापडतं. पटतं किंवा पटत नाही, पण मिळतं. 

साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी हा विशेषांक काढण्यामागची भूमिका संपादकीयात स्पष्टपणे मांडली आहे. नाटकाचे अंतरंग उलगडून दाखवणे, प्रेक्षकांनी नाटक पाहावे म्हणून प्रमोशन करणे हा या अंकाचा हेतू नाही, तर लोकांना विचार करायला भाग पाडणाऱ्या या नाटकाच्या लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि सादरीकरण यामागचा विचार आणि प्रक्रिया त्या अंकातून सांगणे आणि त्यातून ‘भूमिका’ करण्यामागची सर्जनशील कलाकारांची भूमिका वाचकांच्या लक्षात आणून देणे, हा या विशेषांकाचा उद्देश आहे. 

लेखक क्षितिज पटवर्धन यांनी हे नाटक स्वानुभवाच्या आधारे लिहिलेले आहे, असे ते सांगतात, आणि तरीही या नाटकाला ते धाडस म्हणतात. सुखवस्तू, सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबाच्या पारंपरिक चौकटीबाहेरच्या जाणिवांचा त्यांचा स्वतःचा परीघ जसजसा वाढत गेला, तसतसं त्यांचं वैचारिक धाडस त्यांच्या लेखनात येत गेलं, आणि या नाटकात ते धाडस जवळजवळ त्यांच्या सुरुवातीच्या आठवणींपेक्षा पूर्ण विरोधी भूमिका घेऊन उभं राहिलं. भूमिका लिहून पूर्ण करणं हे त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘मनानं नवीन जागी पोहोचण्याचं धाडस’ आहे.तो अनुभव, ते अनुभवविश्व आणि ते धाडस फक्त त्यांचं नाही, तर ब्राह्मण किंवा अन्य ‘सवर्ण’ म्हणवणाऱ्या जातींत जन्माला आलेल्या पण संवेदनशील, सुजाण, व्यापक, चिकित्सक दृष्टीने समाजाकडे पाहण्याची  समज आलेल्या प्रत्येकाचं आहे. क्षितिजचा माणूस म्हणून प्रवास कसा होता, आणि त्याची परिणती अपरिहार्यपणे ‘भूमिका’ घडण्यात कशी झाली याचं कथन क्षितिजच्या लेखात दिसतं.

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची विषयाची समज, स्थलांतराचा, स्थित्यंतराचा अनुभव, नाटकाबद्दलची तळमळ आणि आजच्या कालानुरूप नवा आशय करायची अस्वस्थता हे सगळं माहीत असल्यामुळे त्यांनीच दिग्दर्शन करावं अशी लेखकाची इच्छा होतीच, आणि पहिल्या वाचनातच त्यांनाही हे नाटक करणं महत्त्वाचं वाटलं. ‘शाळा-कॉलेजच्या दिवसांपासून 'युक्रांद', 'दलित चळवळ', 'नामांतर आंदोलन', 'यंग डिबेटर्स असोसिएशन' सारख्या प्रागतिक विचारसरणीच्या संस्थांचं मार्गदर्शन, बाबा दळवींसारख्या समाजवादी, बुद्धिप्रामाण्यवादी संपादकाकडे घेतलेले पत्रकारितेचे धडे, तरुण वयात आतून अनुभवलेलं सामाजिक जाणिवेनं भारलेलं साहित्य-नाटक क्षेत्र यातून घडलेल्या प्रवासामुळे माझी वैचारिक स्पष्टता आणि ठोस भूमिका ही तयारच झालेली आहे. त्यामुळे माझ्यापुरतं तरी धाडसापेक्षाही हे नाटक आज सादर करणं आत्यंतिक निकडीचं होतं.’ असं त्यांनी लेखात म्हटलं आहे. "कलाकार भूमिका घेत नाहीत, केवळ प्रतिक्रिया देतात" असा जो आरोप कलाकारांवर होतो, त्याला एका कलाकारांच्या समूहाने कलेच्या माध्यमातून दिलेलं हे उत्तर आहे.

कलाकारांनी समाजातल्या महत्त्वाच्या विषयांवर भूमिका घेण्याची गरज, आजच्या अस्थिर काळात असे विषय मांडण्याची गरज, त्यामागची त्यांची तळमळ, या नाटकाची रचना, संवाद, पहिल्या आणि दुसऱ्या अंकाच्या सीमारेषेवर केलेलं ‘नाट्यात्म विधान’, अभिनेत्या कलाकारांची निवड प्रक्रिया, नाटकाचे बिनभिंतींचे सूचक नेपथ्य, प्रकाश, संगीत, तंत्र या गोष्टी कशा आकार घेत गेल्या त्याची वैचारिक आणि तांत्रिक प्रक्रिया अशा सर्व महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकणारा, डोळस दिग्दर्शकीय दृष्टीकोनातून लिहिलेला चंद्रकांत कुलकर्णी यांचा लेख अत्यंत वाचनीय आहे.

नाटकाच्या नायकाची भूमिका साकारणाऱ्या सचिन खेडेकर यांच्या मुलाखतीत त्यांनी दीर्घ काळानंतर रंगभूमीवर परतण्यासाठी हे नाटक आपल्याला का महत्त्वाचं वाटलं हे सांगितलं आहे. विवेकची भूमिका साकरण्यासाठीची वैचारिक पूर्वतयारी, ती व्यक्तिरेखा ‘सापडण्याचा’ प्रवास याविषयी ते बोलले आहेत. नाटकाच्या तालमीदरम्यानचे अनुभव, सहकलाकारां बरोबरची केमिस्ट्री, त्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक यांच्याशी झालेल्या चर्चा, झोकून देऊन, पूर्ण वेळ आणि लक्ष केंद्रित करून काम करण्याची गरज अशा विविध विषयांना त्यांनी स्पर्श केला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाटकातल्या ‘माणूस म्हणून ज्याचे विचार बदलत जातात अशा’ अभिनेत्याचा विचार ते स्वतः अभिनेता म्हणून कसा करतात, अभिनेत्यांनी सामाजिक घडामोडींवर भूमिका घेण्याच्या आग्रहाविषयी ते कसा विचार करतात हेही या मुलाखतीतून समजते.

समिधा गुरु (उल्का), सुयश झुंजुरके (सोमनाथ), अतुल महाजन (गुंड्या मामा), जाई खांडेकर (कुहू), जयश्री जगताप (शांताबाई) यांनीही ‘क्षितिज-चंदू सर या संवेदनशील लेखक-दिग्दर्शक जोडीसोबत एका महत्त्वाच्या नाटकात काम करण्याची संधी’ इथपासून सुरू झालेला प्रवास हळूहळू त्या त्या भूमिकेच्या, नाटकाच्या, प्रेक्षकांवर आणि स्वतःवर पडणाऱ्या प्रभावाच्या आणि नाटकातून मांडलेल्या आशय-विषयातून आपले विचार अधिक समृद्ध होत जाण्याच्या दिशेने कसा सुरू आहे, नाटकातली आपली भूमिका वठवताना या प्रश्नांवरची स्वतःची भूमिका कशी डोळस होत जाते आहे, समाजातल्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे कलाकार म्हणून बघण्याचा दृष्टीकोन कसा अधिक व्यापक होत आहे, अशी मांडणी केली आहे. जितक्या आत्मीयतेने नाटकातल्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत, तितक्याच आत्मीयतेने हे लेखनही केले आहे.

नाटक, साहित्य आणि पत्रकारिता अशा क्षेत्रांतल्या मान्यवरांच्या निवडक 15 प्रतिक्रियांचाही समावेश अंकात केला आहे. नाटकाची अभिरुची आणि सामाजिक भान या दोन्ही संवेदनांना हे नाटक साद घालते, आणि हे विचार लहान वयापासून योग्य पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, हे या प्रतिक्रियांमधून प्रत्ययास येते. साहित्यिक-सामाजिक विचारवर्तुळांतल्या महत्त्वाच्या ‘ओपिनियन मेकर्स’ (लोकांची मते घडवणारे) ना या नाटकाचे काय महत्त्व वाटते, हे समजून घेण्यासाठी या प्रतिक्रिया मुळातूनच वाचायला हव्यात.

अंकात नाटकातली अनेक महत्त्वाची छायाचित्रे आहेत, त्यातून नाटकाचा अंशतः दृश्यानुभव मिळतो. नाटक ज्यांनी आधी पाहिलेले असेल त्यांच्यासाठी ती छायाचित्रे सूचक ठरतात, तर ज्यांना पहायचे आहे त्यांच्यासाठी ‘आकर्षक’ ठरतात. उत्तम कागद आणि छपाई, ठळकपणे लक्षात राहणारे मुखपृष्ठ आणि सुवाच्य मांडणी असलेला, हा 52 पानी संपूर्ण रंगीत अंक अत्यंत देखणा आणि संग्राह्य झालेला आहे.

नाटक, त्याची वैचारिक मांडणी, अभिनय, दृश्य परिणाम, त्याचा वैचारिक प्रभाव या सर्व गोष्टी प्रेक्षकांनी स्वतः नाटक पाहून अनुभवण्याच्या आहेत. अशा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या कलाकृतीची जडणघडण कशी झाली हा आवर्जून दस्तऐवजीकरण करण्याचा विषय आहे, आणि हे काम साधनाच्या या विशेषांकाने उत्तमरीत्या साधले आहे.

- ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com

Tags: नाटक सामाजिक नाटक सचिन खेडेकर चंद्रकांत कुलकर्णी चंदू कुलकर्णी भूमिका क्षितिज पटवर्धन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर जात जातीवाद आरक्षण संविधान समता ब्राह्मण दलित Load More Tags

Add Comment