सनातन धर्माचं राजकारण! 

उदयनिधी जातिव्यवस्थेबद्दल, सामाजिक प्रश्नाबद्दल बोलला यावर कुणी विचारच करत नाही. राजकीय विचार करून हा एक धार्मिक मुद्दा केला जातो!  

मोदीजींसारखा बलाढ्य नेता, 
‘भाजप’सारखा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष, 
‘आरएसएस’सारखं जीव तोडून काम करणारं संघटन, 
हिंदू राष्ट्राचं स्वप्न आणि त्यामुळे होणारं ध्रुवीकरण,   
आणि काही महिन्यांवर येऊन ठेपलेलं ‘इलेक्शन’ 
यामुळे सर्वत्र विखुरलेला, 
एकमेकांविरुद्ध सतत लढणारा विरोधी पक्ष 
अतिशय कमकुवत होताना दिसत असतो. 
‘मोदीजींना हरवणं अवघडच नाही 
तर अशक्य आहे’ 
अशी धारणा होऊ लागते. 
पण अचानक परिस्थिती बदलते. 
‘संविधान वाचवायचे आहे’ म्हणून 
26 विरोधी पक्ष एकत्र येतात. 
‘इंडिया’ नावाची विरोधी पक्षांची 
एक मजबूत आघाडी तयार होते. 
60% पेक्षा जास्त मते मिळवलेले पक्ष जर 
एकत्र आले तर इंडिया आघाडीची 
भीती निर्माण होणे स्वाभाविक असते. 
‘इंडिया’ या नावाबद्दलच 
सध्या जे काही चालू आहे, 
त्यावरून ही भीती किती खोलवर गेलेली आहे, 
हेही लक्षात येतं.  

***

इंडिया आघाडीमध्ये 
सर्व काही व्यवस्थित होत आहे, 
असं वाटू लागतं न लागतं तोच 
इंडिया आघाडीचा भाग असलेल्या 
अतिशय महत्त्वाच्या पक्षाचा एक नेता 
आपल्या जाहीर भाषणात बोलून जातो : 
‘सनातन धर्म हा डास, डेंगू, मलेरिया, 
कोरोना सारखा आहे, 
आपण कुठं डेंगू, मलेरिया, करोना चा विरोध करतो? 
आपल्याला त्याचे निर्मूलनच करावं लागेल.’  

***

इतकं खतरनाक पण 
अतिशय धाडसी विधान करणारा 
हा नेता कोण असेल? 
तो हे कुठं बोलला असेल? 
त्याचा नेमका संदर्भ काय असेल? 
की आय टी सेलच्या या काळात 
संदर्भ वगळून त्याचं वाक्य ‘व्हायरल’ केलं गेलं असेल? 
असे अनेक प्रश्न पडतात. 
उजव्या विचाराचे लोक प्रश्न विचारू लागतात, 
सगळेच पुरोगामी लोक 
इतर धर्माच्या विरोधात का बोलत नाही? 
त्यांना आपणच का दिसतो? 
आम्ही फक्त इस्लामबद्दल बोललो तर आमचे काय हाल झाले? 
त्यांचा रोख नुपूर शर्माबद्दल असतो.   
वगैरे. 

***

सनातन धर्माबद्दल बोलणाऱ्या 
त्या नेत्याबद्दल जाणून घेऊ या. 
तमिळनाडूतील एक युवा नेता, 
ज्याने अनेक सिनेमांत काम केलेलं असतं, 
दिग्दर्शक म्हणून अनेक चांगले चित्रपट 
तयार केलेले असतात. 
त्याला फिल्मफेअर अवॉर्ड, विजय अवॉर्ड 
मिळालेले असतात. 
त्याचा अभिनय, त्याने तयार केलेले चित्रपट 
लोकांना वेड लावतात.    
आजोबापासूनच लिखाणाची, 
सामाजिक बांधिलकीची, 
समाजातील विषमतेविरुद्ध लढण्याची, 
आणि राजकारणाची  
परंपरा त्याच्या घरातच असते. 
द्रविड चळवळीचा वारसा त्याला लाभलेला असतो.  
त्याचे आजोबा लोकप्रिय मुख्यमंत्री बनतात. 
त्याचे वडीलही मुख्यमंत्री होतात. 
तोही राजकारणात येतो. 
निवडणूक लढवतो. 
आणि मंत्री होतो. 
त्याचं त्याचं काम चालू असतं. 
समाजातील भेदाभेद, जातपात, 
सामाजिक व आर्थिक विषमता, 
स्त्री-पुरुष समानता, 
युवक कल्याण, वगैरे 
बाबींवर तो लक्ष केंद्रित करतो.     
सत्ता आणि सरकारी यंत्रणा 
त्याच्या सोबतच असतात. 
असं हे व्यक्तिमत्त्व! 
नाव आहे उदयनिधी स्टॅलिन. 
‘डीएमके’चे युवा नेते. 
तामिळनाडूचे सध्याचे युवक कल्याण मंत्री.  
मुख्यमंत्री स्टॅलिनचे चिरंजीव. 

***

तामिळनाडूमधील काही लेखक, 
सिनेसृष्टीत काम करणारे कलावंत एकत्र येतात. 
समाजासाठी काही तरी करावं म्हणून 
एक संघटना स्थापन करतात. 
बऱ्याच दिवसांपासून त्यांचं काम चालू असतं. 
पण अचानक त्यांनी आयोजित केलेला 
एक कार्यक्रम - एक चर्चासत्र वादग्रस्त होतो. 
आणि त्या संस्थेचं नाव जगभर पसरतं. 
त्या संघटनेचं नाव आहे  
‘द तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशन’. 
या संघटनेच्या उभारणीमध्ये 
रोहिणी नावाच्या 
पुरोगामी चळवळीशी संबंधित व्यक्तीची 
भूमिका महत्त्वाची आहे.  
सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, गीतकार म्हणून 
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांची ओळख आहे. 
राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. 
तर होतं असं की, या संस्थेमार्फत 
एक चर्चासत्र आयोजित केलं जातं. 
विषय असतो ‘सनातन धर्माचं निर्मूलन!’ 
त्यात अनेक विषय असतात. 
अनेक वक्ते असतात. 
राधिका वेमुलासुद्धा (रोहित वेमुलाची आई) असते. 
कम्युनिस्ट पार्टी, लिबरेशन पँथर, 
वगैरेचे प्रतिनिधी असतात. 
एकंदर समाजातील असंतोष, 
समाजातील विद्रोह व्यक्त करणारा 
तो एक कार्यक्रम असतो.   
त्यातील एक वक्ते असतात, 
उदयनिधी स्टॅलिन. 
ते बोलायला लागतात. 
अर्थात सनातन धर्माबद्दल. 
आणि सहजपणे बोलून जातात  
‘आपल्याला सनातन धर्माचे 
निर्मूलनच करावे लागेल!’ 

***

झालं. 
सनातन धर्मच नष्ट करण्याची भाषा! 
इतकं भडक विधान! 
ते सुद्धा मोदी-शहाच्या काळात! 
जेथे छोट्या-मोठ्या कारणांमुळे सुद्धा पोलीसवाले 
जिग्नेश मेवानी सारख्या राजकीय नेत्यांना 
हजारो किलोमीटर दूर आसाममध्ये घेऊन जातात. 
काँग्रेस प्रवक्ता पवन खेराला विमानातून 
खाली उतरवून अटक करून 
आसाममधील एका गावात 
दूर घेऊन जायची योजना असते. 
त्यांना प्रत्येकाला धडा शिकवायचा असतो. 
अशा दहशतीच्या वातावरणात 
असलं बेताल बोलणं!     
शेवटी व्हायचं तेच होतं. 
भारतातील धार्मिक, सामाजिक आणि 
राजकीय वातावरण ढवळून निघतं. 

***

आपले गृहमंत्री मा. अमित शहा 
स्टॅलिनपुत्रावर टीका करतात.  
पण त्यांच्या टार्गेटवर असते काँग्रेस! 
त्यांच्या टार्गेटवर असते इंडिया आघाडी! 
ते काँग्रेसवर टीका करतात. 
ते I.N.D.I.A. वर पण टीका करतात. 
ते असंही म्हणतात - 
‘मतांच्या राजकारणासाठी हे लोक 
आपला धर्म संपवायला निघाले, 
आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा आणि 
आपल्या सनातन धर्माचा अपमान आहे.’ 

समग्र हिंदूंचं ध्रुवीकरण करण्याची 
ही एक अफलातून संधी आहे, 
हे भाजप नेते सहजपणे ओळखतात.  

भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय 
तर खूप पुढे जातात. 
‘यांना 80 टक्के हिंदूंचा नरसंहार करायचा आहे 
त्यांना मारून टाकायचे आहे!’

कहर म्हणजे संत मंडळीसुद्धा 
या प्रकरणात उतरतात. 
मात्र त्यांचा ‘तरिका’ वेगळाच असतो. 
अयोध्याचे महंत तर आवाहन करतात  
‘जो कोणी उदयनिधीचं मुंडकं कापून आणेल 
त्याला दहा कोटी रुपयांचं बक्षीस मिळेल’. 

‘तुम्ही तर संत माणूस, कुठून इतके पैसे देणार?’ 
असा एक खोडकर प्रश्न एका पत्रकाराने विचारल्यावर 
ते उफाळून सांगतात, 
‘माझ्याकडे पाचशे कोटीची मालमत्ता आहे. 
दहा कोटी रुपये काही फार मोठी गोष्ट नाही.’     

काही ठिकाणी गावभर पोस्टर्स लावून  
जो कुणी उदयनिधीच्या थोबाडात मारेल 
त्याच्यासाठी खास 
दहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं जातंय. 

थोडक्यात वणवा पेटतोय.  

अनेक विचारवंत सुप्रीम कोर्टात जातात. 
तामिळनाडू राज्य सरकार अपयशी ठरलं म्हणून 
सर्वोच्च न्यायालयानेच न्याय द्यावा, 
अशी विनंती केली जाते. 

देशभरात ठिकठिकाणी उदयनिधीच्या विरोधात 
गुन्हे दाखल केले जातात.

अनेक मंत्रीसंत्री बोलायला लागतात. 
शेवटी पंतप्रधान मोदीना म्हणावं लागतं की, 
‘आपल्याला विचार करून उत्तर द्यावं लागेल.’ 

आणि खऱ्या अर्थाने राजकारणात धर्म मिसळून 
एक नवं कॉकटेल तयार होऊ लागतं. 


हेही वाचा :डिग्री दिखाव कॅम्पेन!’ -दिलीप लाठी


दक्षिण भारतात आधीपासूनच  
द्रविड चळवळीचा बोलबाला असल्यामुळे 
तामिळनाडूमधील काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम 
आणि कर्नाटकातील प्रियांक खरगे 
उदयनिधीचं समर्थन करतात. 
पण नेमकं काय घडतंय याचा अंदाज 
धर्मनिरपेक्ष काँग्रेस पार्टीला येतो.    
बागेश्वर धाम पासून ते कुठल्याही साधुसंतांसमोर 
सतत नतमस्तक होणारे, 
देव देव करणारे  
मध्यप्रदेशचे काँग्रेसचे नेते कमलनाथ घाबरतात. 
त्यांच्या ‘सॉफ्ट’ हिंदुत्वाला तडा जातो. 
तसेच हाल काँग्रेसच्या इतर नेत्यांचे होतात. 
मग पक्षाला आपली भूमिका जाहीर करावी लागते. 

तसेच हाल जाहीर सभेत 
‘हनुमान चालिसा’ वाचणाऱ्या व 
चलनी नोटांवर देवी-देवतांचे फोटो छापा 
म्हणणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’च्या अरविंद केजरीवालचे होतात. 

देवीचे स्तोत्र निवडणुकीच्या काळात 
व्यासपीठावर जोरजोरात म्हणणाऱ्या 
ममता बॅनर्जीसुद्धा अस्वस्थ होतात. 

उद्धव ठाकरेंची शिवसेना तर कट्टर हिंदुत्ववादी पक्ष. 
त्यांना कसं सहन होणार असं बोललेलं? 
समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव सुद्धा 
उदयनिधीच्या विरोधात बोलतात. 

थोडक्यात काय तर 
उदयनिधी जातिव्यवस्थेबद्दल बोलला, 
सामाजिक प्रश्नाबद्दल बोलला, 
यावर कुणी विचारच करत नाही. 
राजकीय विचार करून 
हा एक धार्मिक मुद्दा केला जातो.    
इंडिया नावाची आघाडी 
मजबूत व्हायच्या आधीच 
नष्ट होते की काय 
अशी स्थिती निर्माण होते. 
उदयने माफी मागून विषय संपवावा, 
असं सगळ्यांनाच वाटतं. 

एकंदर आता 
इंडिया आघाडीचं काही खरं नाही, 
असं वाटू लागतं.  

***

पण उदयनिधी आणि त्यांचा पक्ष 
आपल्या वक्तव्यावर ठाम असतात. 
स्वतः मुख्यमंत्री आणि इतर नेते 
उदयनिधीच्या बाजूने उभे असतात. 
पेरियारचे विचार 
संपूर्ण दक्षिणेत रुळलेले असतात. 
कोणे एके काळी त्यांनी 
देवाचं अस्तित्वच नाकारलेलं असतं. 
देवभोळ्या लोकांना त्यांनी 
मूर्ख, बदमाश आणि रानटी म्हटलेलं असतं. 
त्यांचे विचार आजही प्रभावी ठरत असतात.     
"There is no god, there is no God, 
there is no god at all. 
He who invented God is a fool. 
He who propagates God is a scoundrel. 
He who worships God is a barbarian."- Periyar. 
याचाच परिणाम म्हणून 
उदयनिधी परत सामाजिक विषमता, 
जात, भेदाभेद यावर बोलू लागतो. 
‘हे आजही लागू आहे का?’ असं विचारल्यावर 
तो सरळ सांगतो की, 
‘म. राष्ट्रपतींना संसद उद्घाटनाला बोलावलं नाही.’ 

इरोड वेंकट रामासामी पेरियार (1879 - 1973)

आपण हिंदू धर्माच्या विरोधात नाही. 
ते फेक न्यूज पसरवत आहेत, हेही बोलतो. 
एकाच वेळी तो आणि त्याचा पक्ष 
एनडीए आणि इंडिया या 
दोन्ही आघाड्यांच्या निशाण्यावर येतात.  

***

तामिळनाडूमध्ये 89 टक्के हिंदू आहेत. 
प्रत्येक गावात मठ मंदिरे आहेत. 
जगातील सर्वात पवित्र आणि 
सर्वात सधन अशी मंदिरं 
दक्षिण भारतातच दिसून येतात.  
तरी भाजपचं तिथे अस्तित्व दिसत नाही. 
भाजपने राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, 
उत्तर प्रदेश मध्ये 
जास्तीत जास्त जागा मिळवलेल्या आहेत. 
आता आणखी जागा वाढवण्यासाठी 
त्या राज्यांमध्ये वाव नाही. 
म्हणून ‘मिशन तमिळनाडू’ सुरु करण्यात आले आहे. 
तेथे कमीतकमी सात खासदार निवडून 
आणायची योजना आहे, असं बोललं जातं. 

***

वरवर पाहिलं तर हा संघर्ष सुरु होतो 
80 टक्के विरुद्ध 20 टक्के लोकांचा. 
हिंदू विरुद्ध इतर. 
पण जसजशी चर्चा होऊ लागते 
तसतसे याचे रूप बदलू लागते. 
द्रविड विरुद्ध आर्य. 
येथील मूळ रहिवासी म्हणून द्रविड 
आणि बाहेरून आलेले आर्य. 
त्यांच्याकडून निर्माण झालेली व्यवस्था.  
दक्षिण विरुद्ध उत्तर भारत. 
यात राजकारण शिरू लागतं. 
भाजपचा विचार केला तर 
प्रत्येकाने जातपात विसरून 
हिंदू म्हणून समोर येणं, 
महत्त्वाचं असतं. 
पण जेव्हा लोक सामाजिक विषमतेचा 
विचार करू लागतात, 
सामाजिक भेदभाव, स्त्री-पुरुष भेदभाव, 
जुन्या चालीरीती, जुनाट परंपरा, 
जातिव्यवस्था यांचा विचार करू लागतात 
तेव्हा ‘दलित चेतना’ जागी होते. 
आणि हेच भाजपला नको असतं. 

याची झलक आताच झालेल्या 
पोटनिवडणुकीत दिसते.  
तसं पाहिलं तर 
या वक्तव्याचा सर्वात जास्त परिणाम 
उत्तर प्रदेश वगैरे ‘काऊ बेल्ट’ मध्ये दिसायला पाहिजे. 
हिंदूंनी पेटून उठायला पाहिजे. 
पण तसं होत नाही. 
घोसी पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार 
प्रचंड मतांनी पराभूत होतो. 

याचाच परिणाम म्हणून की काय 
आरएसएसचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत 
जाहीर भाषणात कबूल करतात 
की, दोन हजार वर्षांपासून 
आपण अन्याय करता आलेलो आहोत. 
त्यामुळेच आरक्षण पुढील दोनशे वर्षं द्यावं लागेल.     
नागपूरमध्ये काही अभ्यासू विद्यार्थ्यांसमोर बोलताना 
मा. मोहन भागवत म्हणतात : 
‘अपने देश मे सामाजिक विषमता का इतिहास रहा है... 
हमारे बंधुओ का जिना पशु समान हो गया तो 
हमने चिंता नही कि. 
और ऐसा कमसे कम दो हजार वर्ष चला हि है...’ 
एवढ्यावरच ते थांबत नाहीत. 
पुढे ते एक घटना सांगतात. 
गोष्ट असते काही शाकाहारी स्वयंसेवकांची.  
काही स्वयंसेवक सहभोजनासाठी जातात. 
तेथे त्यांना मांसाहारी जेवण वाढलं जातं.     
त्यात गोमांस आहे असं त्यांना सांगितलं जातं. 
आणि ते स्वयंसेवक काहीच तक्रार करत नाहीत. 
आता अशा गोष्टी अनेक ‘लिंचिंग’च्या घटना घडल्यानंतर 
का सांगितल्या जातात 
याचं कारण शोधणं अवघड आहे. 
संघ बदलत आहे!   
की, सनातन धर्माच्या कुप्रथा 
नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे? 
की 2024च्या राजकीय पटलाची तयारी 
अधिक सावधपणे केली जात आहे? 

सांगणे कठीण आहे. 

‘सनातन धर्माचे’ निर्मूलन करायचे’ 
असं म्हणण्याऐवजी 
‘जातिव्यवस्था, सामाजिक विषमता, 
अशा कुप्रथांचं निर्मूलन करायला पाहिजे’ 
असं जर उदयनिधी बोलला असता तर 
सगळेच त्याच्या पाठीमागे उभे राहिले असते.   

पण इथून तिथून सर्वच राजकीय नेते आहेत. 
शेवटी त्यांना राजकारणच करायचं आहे! 
नाहीतर आपल्याला उदयनिधीचं नावच कळलं नसतं. 

- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com  
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

Tags: सनातन धर्म रा. स्व. संघ मोहन भागवत उदयनिधी स्टालिन राजकारण दक्षिण भारत जातीभेद निवडणूक election narendra modi udaynidhi stalin caw belt dilip lathi RSS mohan bhagwat south india politics INDIA rahul gandhi Load More Tags

Comments: Show All Comments

Niraj Mashru

Best and very informative article Thanks

Tehseen

Good analysis

Prashant dindokar

सर, सैरभैर झालेत आता भाजपा वाले. उदयनिधी आणि गोदी मीडिया वर बहिष्कार मुळे मोदींना जास्त त्रास होतोय.

Shyamal Garud

दिलीपजी खरंय.. आपल्याकडे जातीअंताच्या चळवळीचा मोठा वारसा असताना येथे फुले,शाहू, आंबेडकरांचा जातीअंताचा विचार अन् कार्य डोळ्यासमोर ठेवून 2024 ची निवडणूक लढवावी लागेल.. अर्थात हे काम फक्त राजकीय नाही.. लेखक+कलावंत+चळवळीतील कार्यकर्ते सर्वांनाच एकत्रितपणे हा लढा उभारवा लागेल. केवळ सनातनी धर्म अन् कडव्या मानसिकतेवर बोलून काम भागणार नाही.चातुर्वर्ण्य व्यवस्थाच उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही..पण ते शक्य नाही. कारण त्यात जातीचे प्रिव्हलेज भोगणारे.. जन्मजात आरक्षणावर पोसलेले अडचणीत येतील ना.. पण तुमचा जातीअंताचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पुढच्या विचार मंथनाच्या प्रतिक्षेत.

Prof. Prakash Mahajan

I know a politics is a dirty game and I am not much interested in any party also. But for my future generations' safety from Islamic India, any party does any damn corruption or a game to make I India a Hindu Rashtra at least a time like genocide in in the 90s Or other past or present mayhem from Islam, I totally don't want. So I enjoy politics as a fun when Hinduism is on the peak of its power no matter what injustices or corruption or any person crticizing BJP in the worst manners. If people will call me a mad ; I will say I an double mad!!!

Nitin Mane

2024 च्या निवडणुकीकडे सावधपणे पाऊल टाकले जात आहे.

Arun Dike

मी हे अत्यंत बारकाइने लिहिलेलं पुस्तक वाचलं.नैसर्गिक संसाधनं कमी असुनही दक्षिण भारत शिक्षण आरोग्य सामाजिक जाणमधे उत्तर भारतापेक्षा किती पुढारलेला आहे व केवळ जनसंख्येच्या बळावर राजकीय द्रष्ट्या किती मार खात आहे हे पुस्तक वाचल्यावर कळतं.सनातन धर्म सामाजिक नजरेतुन बघायला हवा धार्मिक नजरेतुन नाहीं.जगभर आतंकवादाने जो धुमाकुळ घातलाा आहे त्याचं खरं कारण धार्मिक नसुन आर्थिक असमानता आहे हेच मोहन भागवत पण क़बूल करतात भारतात कर्म हाच धर्म आहे हे भारताच्या खेड्यांचा सखोल अभ्यास करणारे आदिलाबादचे स्वर्गीय रवीन्द्र शर्मा म्हणतात.तेंव्हा आम्हाला कर्म प्रचारक हवेत धर्म प्रचारक नाहीं आणि मध्य प्रदेश संकट सर्व उत्तर भारतात राम कथा शिव पुराण करणारे व करवणारे भरपूर असताना सनातन धर्माविषयी समज कमी गैरसमजच वाढत आहे हे दुःखद आहे.

Hira janardan

ज्याचा वेद ग्रंथात साधा उल्लेखही नाही तो धर्म मुळात सनातन कसा? RSS ने धर्माला kanvatila बांधून लोकांना पार भ्रमिष्ट करून सोडले आहे.कधी तरी राजकारण dharmaviarhit होईल का? दुसर्‍या बाजूला ती राक्षसी सनातन संस्था नष्ट होण्याऐवजी पुष्ट होत चालली आहे. लेख नेहमीप्रमाणेच सुबोध, परंतु प्रश्नचिन्ह भलेमोठे!

Arun Sonde

अत्यंत क्लिष्ट अश्या विषयाला लेखकाने धाडसाने हात घातला,समाज व्यवस्था,धर्म संस्था,राजकीय वातावरण,सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष,भडकाऊ भाषणे देण्यात धन्यता मानणारे नेते मंडळी अशी गुंतागुंत असणारा विषय लेखकाने आपल्या समोर ठेवून विचार करा असे जणू सूचित केले

Add Comment