पर्यायी मिडिया!

आलोक जोशींचा ‘अलोक अड्डा’, आशुतोषचा ‘सत्य हिंदी’, ‘वायर’, ‘फोर पीएम’ असे कितीतरी युट्यूब चॅनल बातम्या देत आहेत. लोकशाहीला मजबूत करण्याची जबाबदारी यांनी घेतलीय.

आरफा खानम शेरवानी, अजित अंजुम, अभिसार शर्मा, पुण्यप्रसून वाजपयी

‘इंडिया टुडे’वर 
आपल्या देशातील सर्वात श्रीमंत माणसाची मुलाखत पाहत होतो. 
श्रीमंतीच्या बाबतीत त्याने अंबानी वगैरे तर सोडाच पण
जगातील एकापेक्षा एक अशा भारी लोकांना मागे टाकले. 
आणि पैसा, पाणी, दौलत, मालमत्ता, उद्योग या सगळ्याच बाबतीत 
तो बनला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस.
त्यांचं नाव आहे श्री गौतम अदानी.
एनडीटीव्ही विकत घेतल्यावर 
एका हिंदी दैनिकातसुद्धा त्यांची पानभर मुलाखत छापून आली होती.
विशेष म्हणजे मुलाखत कुणी घेतली ते जाहीर केलं नव्हतं.
कदाचित छुपी जाहिरात असेल.
त्यांना ‘एनडीटीव्ही’ला ‘अल जजिरा’ सारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचं 
‘मिडिया हाउस’ बनवायचं आहे. 
प्रचंड पैसा असल्यामुळे अशा प्रकारचं नेटवर्क उभारणं, शक्य आहे. 

तेवढ्यात एक मित्र आला आणि बोलायला लागला.
त्याचा राग रविशकुमारवर होता. एनडीटीव्हीवर होता. 
मोदीजींवरील त्याचं प्रेम, श्रद्धा, निष्ठा स्पष्ट दिसत होती.

‘म्हणलं होतं ना तुला, सोडावी लागली न नोकरी! 
सतत सरकारवर टिका करायची. 
चांगलं दिसतंच नव्हतं काही त्याला! कधी म्हणायचा टीव्ही बघू नका. 
कधी म्हणायचा ‘गोदी मिडिया’.
आता म्हणतो ‘गोदी सेठ’. काहीतरीच! 
स्वतःचं चॅनल सोडून बाकी सगळे ‘गोदी मिडिया’!
शेवटी चॅनलच विकत घ्यावं लागलं... मग करणार काय?
बस आता बोंबलत. कोणताच चॅनलवाला घेणार नाही. 
अरे चॅनलचं जाऊ दे, साधा पेपरवालासुद्धा त्याचा लेखपण छापणार नाही...’

तो बराच वेळ बोलत होता. 
त्याच्या मनातला रविशबद्दल असलेला द्वेष स्पष्टपणे दिसत होता. 

‘एखादा माणूस वेगळी वाट पकडतोय, काय अडचण आहे?
आपल्यासाठी 
आमिष देवगण, अर्नब गोस्वामी, अमन चोपडा, सुधीर चौधरी, रजत शर्मा-
असे कितीतरी टीव्हीवाले आहेत ना! 
आपल्या विचारांना मोठे करणारे. गोदी मिडियावाले.’

माझे शेवटचे दोन शब्द त्याला बऱ्यापैकी झोंबले. 
‘मी एक गोष्ट सांगतो. 
तू म्हणतो तसं ‘सो कॉल्ड’ गोदी मिडिया आहे, असं मानू. 
पण ते काही आमचे विचार किंवा आमच्या नेत्याला मोठं करत नाही.
आमच्या नेत्याला सपोर्ट करून ते ‘सो कॉल्ड’ गोदी मिडियावाले 
स्वतःच मोठे होत असतात. 
आमच्या नेत्याच्या लोकप्रियतेचा त्यांना फायदा होतो. 
त्यांचे चॅनल्स मोठे होतात. त्यांचा टीआरपी वाढतो. 
त्यांचे बिझनेस वाढतात. 
आमच्या नेत्याला सपोर्ट केलं की, 
या देशातील 130 कोटी लोकांचं समर्थन त्यांना आपोआप मिळतं. 
आता मला सांग अर्नब, सुधीर, अमिश यांच्यामुळे मोदीसाहेब मोठे होतील 
का मोदी साहेबांना सपोर्ट केल्यामुळे त्यांचे चॅनल्स मोठे झाले असतील?
अन् काय बोलतो तू एनडीटीव्हीबद्दल. राधिका रॉय, प्रणब रॉय बद्दल. 
मलाही आवडायचे त्यांचे कार्यक्रम. ‘वर्ल्ड धिस वीक’ बघतच मोठा झालो न मी.
त्यांचे निवडणुकीचे विश्लेषण- एक नंबर.
पण पत्रकारिता करणं वेगळं आणि धंदा करणं वेगळं. 
आता त्यांनी मस्त केलं. खऱ्या अर्थाने धंदा केला. इमोशनल झाले नाही. 
एनडीटीव्हीच्या लोगोमध्ये दिसणारी राधिका रॉयची बिंदी, 
वगैरे बाबतीत जास्त विचार केला नाही. 
चुपचाप आपली कंपनी विकली. लोचे लफडे मिटवले. 
पैसे घेऊन करतील काहीतरी नवीन.
भारतात किंवा भारताबाहेर.
एका जत्रेनं देव म्हातारा होत नसतो.
त्यांच्यात खरंच धमक असेल तर करतील काहीतरी.’

त्याच्या बोलण्यात एक वेगळाच विश्वास होता.
तो जे काही बोलत होता, त्यातल्या काही गोष्टी खऱ्या वाटायला लागल्या. 
अचानक नवीन टीव्ही चॅनल सुरु करून अतिशय कमी वेळेत 
हजारो कोटी रुपयांचे मिडिया साम्राज्य उभारणारा एक पत्रकार समोर आला.

तरीसुद्धा त्याला हटकलं :
‘त्यात काय एवढं? सरकार सोबत असलं तर  
टीव्ही चॅनलवाले, मिडीयावाले आपसूकच मोठे होतात.
जाहिराती मिळतात. उद्योगपती साथ देतात.’

‘बरं. मला सांग, ‘नॅशनल हेराल्ड’ कॉंग्रेस पार्टीचा पेपर होता ना? 
कुणाच्या काळात बंद पडला? 
कुणाचं सरकार होतं? कॉंग्रेसचंच राज्य होतं ना? 
मनमोहन सिंग होते ना, पंतप्रधान? तरी सुद्धा बंद पडला. का?
काही पण बोलायचं?’

तो ऐकायला तयार नव्हता. 
जणू काही आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे त्याच्याकडे होती.
त्याच्याशी वाद घालायची इच्छा नव्हती. पण डोक्यात सुरु झालं विचारांचे काहूर. 

मिडिया आणि राज्यकर्ते, मिडिया आणि उद्योगपती, मिडिया आणि लोकशाही, 
मिडिया आणि पैसा आणि मिडियाचे बदलते रूप- 
असे अनेक विषय डोक्यात घोळू लागले. 

चोवीस तास चालणाऱ्या, सतत ब्रेकिंग न्यूज देणाऱ्या टीव्ही चॅनल्सची 
आपल्याला सवय केव्हा लागली कळलंच नाही.
लोकशाही चा महत्त्वाचा स्तंभ म्हणून यांची भूमिका महत्त्वाची, 
असं आपलं प्रामाणिक मत.
मिडियाने सरकारवर अंकुश ठेवावा. 
सतत विरोधी पक्षाची भूमिका अदा करावी. 
लोकशाहीला मजबूत करावं,
असं आपल्याला नेहमी वाटायचं. आताही वाटतं.
खरं सांगायचं झालं तर जगातील सर्वच राज्यकर्ते 
मिडियाची ताकद ओळखून असतात. 
मिडियाबद्दल आदर, भीती बाळगून असतात.
मिडियाचा वापर आपल्या हितासाठी कसा करता येईल,
हेसुद्धा पाहत असतात.
पण मिडियाच्या नादी लागत नाही.
मागे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या शक्तिशाली व्यक्तीने 
मिडियाबरोबर भांडण सुरु केलं होतं. 
पण त्यांनाही माघार घ्यावी लागली होती.
परत एकदा मिडियाची ताकद सगळ्यांच्याच लक्षात आली.  

***

पण आपल्या देशात खरंच असं होतंय का? 
एका महाशक्तिमान नेत्याच्या विरोधात गेलं तर 
खरंच मिडिया संपायला लागतो का? 
मित्र जे बोलत होता त्यात काही तथ्य असेल का? 

काही गोष्टी आठवायला लागल्या. 

इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलेला एक पत्रकार.     
वडील भारतीय सेनेचे जनरल. गांधी कुटुंबाच्या जवळचे.
मुलगा भारतात येतो. मुक्त, बिनधास्त पत्रकारिता सुरु करतो. 
त्याचे नाव आहे करण थापर.
विविध मान्यवर मंडळींच्या त्याने घेतलेल्या मुलाखती प्रचंड गाजतात.
‘Devil’s Advocate’ या कार्यक्रमामध्ये भल्याभल्यांना घाम फुटेल, 
असे प्रश्न तो विचारायचा.
यावेळी अनेक नेत्यांबरोबर त्याची बाचाबाची झालेली होती. 
तामिळनाडूच्या तेव्हाच्या मुख्यमंत्री जयललिता त्याच्यावर नाराज झाल्या होत्या. 
अडवाणीजींबरोबर त्यांचे अतिशय चांगले संबंध होते, 
पण टीव्हीवर प्रसारित झालेल्या एका मुलाखतीमुळे तेही दुखावले गेले होते.  
असं असलं तरी कुणीही मनात काही ठेवलं नव्हतं. 
परत सर्व काही व्यवस्थित झालं होतं.   
एक दिवस तो गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांची मुलाखत घ्यायला 
अहमदाबादला जातो.
मुलाखतीची वेळ दुपारी चारची.
हा अहमदाबाद एअर पोर्टवर लवकर पोहोचतो.
मोदीजी त्याला फोन करून बोलावून घेतात.
दोन तीन तास इकडच्या तिकडच्या गप्पा होतात. 
आणि चार वाजता कॅमेरा सुरु होतो.
कार्यक्रमाचं नाव ‘Devil’s Advocate’.
पहिलाच प्रश्न : 2002 च्या गुजरात दंग्यांबद्दल. 
एकीकडे गुजरात सरकारचं चांगलं काम आणि दंग्यांमुळे बिघडलेली प्रतिमा, याबद्दल.  
खेद व्यक्त करण्याची विनंती. सुप्रीम कोर्टच्या जजने तोंडी नोंदवलेलं निरीक्षण. 
या सर्वच बाबी करणच्या बोलण्यात. 
अचानक मोदीजी मुलाखत थांबवतात. ‘कॉलर माईक’ काढतात.   

‘आय विल हव टू रेस्ट... पानी चाहिये... अपनी दोस्ती बनी रहे... दोस्ती बनी रहे...’
एवढंच बोलतात. मुलाखत संपते. 
त्यानंतर बराच वेळ ते एकत्र असतात. 
करण थापर समजावून सांगायचा प्रयत्न करतो. गयावया करतो. 
‘या कार्यक्रमाचे नाव आहे Devil’s Advocate! 
त्यामुळे असेच प्रश्न असतात. आपण पुन्हा मुलाखत सुरु करू. 
आपण मुलाखत दिली नाही तर CNN IBN वाले ही क्लीप पुन्हा पुन्हा चालवतील.’

या सर्व बाबींना मोदीजींचे एकच उत्तर : ‘अब मूड नही.’

शेवटी नाराज होऊन करण दिल्लीला परततो. 
नेमकं काय झालं हे त्याला कळत नाही. 
आपल्या बोलण्यात ‘अ‍ॅग्रेशन’ नव्हतं. 
आपण तर, स्पष्टीकरण दिलं गेलं तर ‘इमेज’ चांगली होईल, 
या हेतूने प्रश्न विचारत होतो. असं तो बोलतो.
दुसऱ्या दिवशी चॅनलवाले ती क्लीप पुन्हा पुन्हा चालवतात.
करणची शंका खरी ठरते.
लगेच मोदीजी फोन करतात : 
‘करण ब्रदर, आय लव यू. दिल्ली आऊंगा तब साथमे खाना खायेंगे.’
त्यानंतर मात्र मोदीजी त्याला कधीच भेटत नाहीत. 
भाजपचे कुठलेही प्रवक्ते, मंत्री नेते त्याच्या कार्यक्रमात येत नाहीत.
आणि एक मोठा पत्रकार टीव्ही चॅनलच्या स्क्रीनवरून 
हळूहळू गायब होतो.   

***

करणचं ठीक आहे. तो एकेकाळी गांधी कुटुंबाच्या खूप जवळचा होता.
राजीव गांधींचा मित्र होता. 
पण मला एका राष्ट्रीय स्तरावरच्या दुसऱ्या सुप्रसिद्ध पत्रकाराची आठवण झाली.
‘एनडीटीव्ही’पासून ते ‘न्यूज नेशन’पर्यंत अनेक टीव्ही चॅनल्समध्ये
संपादक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवलेली आहे.
अतिशय अभ्यासू राजकीय विश्लेषक म्हणून तो प्रसिद्ध आहे.
आपली वैचारिक ठेवण त्याने जाणीवपूर्वक ठरवलेली आहे.
त्याचाच परिपाक म्हणून त्याच्याकडे सुरुवातीपासून
आरएसएस, बीजेपी हे बीट देण्यात आलेले आहे.
अटल बिहारी वाजपेयींपासून ते राजनाथ सिंग, गडकरीजींपर्यंत
आणि
मोदीजींपासून योगीजी आणि अमित शहांपर्यंत
प्रत्येक राजकीय नेत्यांबरोबर अत्यंत जवळचे संबंध असलेल्या या पत्रकाराने
अतिशय महत्त्वाचे लिखाण केलेले आहे.
‘हार नहीं मानूँगा’ (एक अटल जीवन गाथा) या पुस्तकातून
त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे चरित्र रेखाटले आहे.‘बीजेपी कल, आज और कल’ या पुस्तकातून
भारतीय जनता पार्टीचा इतिहास नोंदवला आहे.
‘संघम शरणम गच्छामि’मध्ये
1925 पासून सुरु झालेल्या आरएसएसच्या प्रवासातील खाच-खळगे,
यश-अपयश, बरे-वाईट दिवस
यांचं अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केलं आहे.
आरएसएसबद्दल एक महत्त्वाचे दस्त तयार केले आहे.
एवढंच नाही तर ‘यदा यदा हि योगी’ या पुस्तकातून
बीजेपीचे भविष्य असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल लिहिलं आहे.
थोडक्यात सांगायचं म्हणजे,
हा विचारवंत पत्रकार ‘परिवाराच्या’ जवळचा आहे.
तर झालं असं त्यावेळी मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते.
त्यांची मुलाखत घेण्यासाठी हा पत्रकार अहमदाबादला जातो.
मुख्यमंत्री कार्यालयातून ‘प्रोग्राम’ नक्की झालेला असतो.
त्यानुसार मोदीजी गुजरातमधील खेड्यापाड्यात सभा घेणार असतात.
त्यांच्याबरोबर हेलीकॉप्टरमध्ये प्रवास करतच ‘मुलाखत’ घ्यायची ठरते.
त्याच हेलीकॉप्टरने तो पत्रकार व त्याचा कॅमेरामन
रात्री अहमदाबादला पोचणार असतात.
पत्रकार मोदीजींना ते दिल्लीत प्रचारक होते तेव्हापासून तो ओळखत असतो.
साहजिकच त्यांचे खूप जवळचे संबंध असतात.
अनेकदा त्यांच्या गाठीभेटी झालेल्या असतात.
अनेकदा त्याने मोदीजीची मुलाखत घेतलेली असते.
वातावरण खेळीमेळीचं असतं.
तो पत्रकार मुलाखतीच्या सुरुवातीलाच एक अवघड प्रश्न विचारतो :
‘दिल्ली शीख दंगोके बारेमे कॉंग्रेस ने माफी मांगी है.
गुजरात दंगोके लिये क्या आपभी या आपकी पार्टी माफी मांगेगे?’
झालं.
‘इस बारे मे मै बहुत इंटरव्यू दे चुका हु.’
मोदीजींच्या वाक्याचा अर्थ त्याला कळत नाही.
तो पत्रकार परत गुजरात दंग्यांच्या एसआयटीच्या रिपोर्टबद्दल बोलतो.
मग मात्र मोदीजी पाण्याचा ग्लास हातात घेतात.
पाणी प्यायला सुरुवात करतात.
नंतर समोर असलेली फाईल उलगडायला सुरुवात करतात.
नंतर खिडकीतून बाहेर पाहायला लागतात.
शेवटी कॅमेरा बंद केला जातो.
बिचारा पत्रकार शांत बसतो.
त्याला नेमकं काय झालं, याचा अंदाज येत नाही.
नंतर ते हेलीकॉप्टर अहमदाबादपासून
अडीचशे-तीनशे किलोमीटर दूर असलेल्या एका गावी उतरते.
मोदीजी सभा घेण्यासाठी स्टेजकडे निघतात.
तो पत्रकार आणि कॅमेरामन
एका गाडीत बसून हेलीपॅडपासून सभेच्या ठिकाणापर्यंत जातात.
त्या जाहीर सभेचे रिपोर्टिंग करण्यासाठी लोकांमध्ये मिसळतात.
कदाचित त्याला वाटले असेल की,
सभा झाल्यानंतर आपण फ्रेश मनाने परत मोदीजींची मुलाखत घ्यायला सुरुवात करू.
बरेचसे प्रश्न असतात.
‘व्हायब्रंट गुजरात’, ‘गुंतवणूक’, ‘विकासाचं गुजरात मॉडेल’, ‘लोकांचं प्रेम’, ‘लोकांची गर्दी’, वगैरे.
सभा संपल्यावर ते परत गाडीत बसून हेलीपॅडकडे येतात..
हेलीकॉप्टरमध्ये बसल्यावर आता वेगळे प्रश्न विचारू, असा विचार करतात.
पण कसलं हेलीकॉप्टर, कसली मुलाखत अन् कसलं काय?
मोदीजी हेलीकॉप्टरमध्ये बसतात.
त्या पत्रकारासाठी निरोप ठेवलेला असतो
की, सरकारी गाडीने ते अहमदाबादला जाऊ शकतात.
पण त्या पत्रकाराला सरकारी गाडी घ्यावीशी वाटत नाही.
सभा संपल्यावर जी गडबड उडते त्यामुळे वाहन मिळणं मुश्कील असतं.
ट्रॅक्टरमध्ये बसून काही अंतर पूर्ण केल्यावर कसेतरी ते बसने अहमदाबादला पोहोचतात.
असा धक्का बसल्यावरही तो पत्रकार तेथून रिपोर्टिंग करताना म्हणतो :
‘शुक्रिया मोदीजीका,
इतनी नाराजगी के बावजुद मुझे हेलीकॉप्टरमेसे बीच अस्मान मे नही उतारा.’
त्या पत्रकाराचे नाव आहे विजय त्रिवेदी.
आजकाल विजय त्रिवेदीसुद्धा टीव्ही चॅनलच्या स्क्रीनवर जास्त दिसत नाही. 

***

टीव्ही गाजवलेले अनेक चेहरे समोर येतात.

अजित अंजुम, अभिसार शर्मा, पुण्यप्रसून वाजपयी, अलोक जोशी,
साक्षी जोशी, आशुतोष, आरफा खानम शेरवानी, मुकेश कुमार,
दीपक शर्मा, संजय शर्मा...
बरेच चेहरे आहेत. बरीच नावं आहेत.
अशा कितीतरी पत्रकारांनी टीव्ही पत्रकारिता जवळजवळ सोडली.

पुण्यप्रसून वाजपयीने तर रामदेव बाबांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले.
सर्वात जास्त जाहिराती देणारा उद्योगपती बाबा नाराज होणं,
टीव्ही चॅनलला परवडणारं नव्हतं.
एकदा मा. पंतप्रधान मोदीजी विविध शेतकऱ्यांबरोबर
ऑनलाईन मिटिंग घेऊन बोलत असतात.
ती गरीब शेतमजूर महिला तिचे उत्पन्न दुप्पट झाले म्हणून सांगते.
घटना तशी मोठी आहे.
लगेच आपले रिपोर्टर पाठवून त्या महिलेची मुलाखत घेऊन
तो रिपोर्ट पुण्यप्रसून सादर करतो.
त्या महिलेला दिल्लीहून आलेले अधिकारी खोटं सांगायला लावतात,
हे सिद्ध करतो.
एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न बाळगणारे पंतप्रधान
आणि ते स्वप्न पूर्ण झाले असे दाखवणारे अधिकारी
आणि त्यांना बिनधास्तपणे उघडे पाडणारा पत्रकार.
तो कार्यक्रम तुफान गाजतो.
पण नंतर पुण्यप्रसून वाजपयी टीव्हीच्या दुनियेतून गायब होतात.

तसंच काहीसं अभिसार शर्माचं झालंय.    

अजित अंजुम हा असाच एक महत्त्वाचा पत्रकार.
आजतक, न्यूज 24,  इंडिया टीव्ही, भारतवर्ष असे अनेक टीव्ही चॅनल्स गाजवलेला.
त्याने बिहारमध्ये पूरस्थितीवर केलेल्या रिपोर्टिंगमुळे खऱ्या अर्थाने लोकांना मदत मिळाली.
असंख्य लोकांचे प्राण वाचले.
एक दिवस टीव्ही पत्रकारितेची दुनिया सोडतो.
आणि बेकार झालेल्या टीव्ही पत्रकारांच्या यादीत आणखी एक नाव वाढते.

टीव्ही चॅनल्स सुरु करणे, ते चालवणे, ते लोकांपर्यंत पोहोचवणे
ही काही साधीसुधी गोष्ट नाही.
त्याला लागणारा पैसा, नेटवर्क, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ हे निर्माण करणे
हे मोठ्या शक्तीचे पाठबळ नसेल तर केवळ अशक्य आहे.
त्यामुळे प्रचंड टॅलेंट असूनही अनेक पत्रकार चुपचाप घरी बसले.
अजित अंजुमचेही तसेच झाले. पण हाडाचा पत्रकार स्वस्थ कसा बसणार?
सकाळी ते घराबाहेर पडले.
दिवस रोगराईचे होते. दिवस करोनाचे होते. भीतीचे होते. लॉकडाऊनचे होते. 
त्यांना असंख्य मजूर पायीपायी रस्त्याने जाताना दिसले.
त्यांच्यातला पत्रकार जागा झाला.
ते असंख्य मजूर भीतीपोटी, कामधंदे नष्ट झाल्यामुळे
हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपापल्या गावाला जायला
पायी, सायकलने, रिक्षाने किंवा मिळेल ते वाहन घेऊन जात होते.
आपल्या मोबाईल फोनचा वापर करून अजित अंजुम यांनी त्या लोकांच्या मुलाखती घेतल्या.
आणि ट्विटर व इतर सोशल मिडियाचा वापर करून टाकल्या.
पलायन करणाऱ्या मजुरांचे ते दुःख होते.
ते दुःख, त्या वेदना एका संवेदनशील संपादकाने पकडल्या होत्या. 
ती एक आंतरराष्ट्रीय बातमी झाली होती.
त्यांच्या समस्या सरकारला समजल्या होत्या.
एका पत्रकाराचा विजय झाला होता.

पुढे त्यांनी आपले युट्यूब चॅनल सुरु केले.
वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांचे विश्लेषण सुरु केले.
‘क्या छपा, क्या छुपा’ यावर चर्चा सुरु झाली.
युट्यूब वरील कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होऊ लागले.
नव्या युगाचे नवे तंत्रज्ञान समोर आले.
मेन टीव्ही मिडियाला स्पर्धा निर्माण झाली.
पर्यायी मिडिया समोर आला.
सामान्य लोकांना तो मिडिया जास्त विश्वसनीय वाटू लागला.
तीस लाखांपेक्षा जास्त सबस्क्राइबर झाले.
कोट्यावधी लोक त्यांचे कार्यक्रम पाहत आहेत.
युपी निवडणुकीच्या वेळी अजित अंजुमने एका वृद्ध जोडप्याची
मुलाखत घेतली.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात
त्या मुलाखतीचे तपशीलवार वर्णन केले होते. तो संदर्भ दिला होता.
अर्थात हीच पर्यायी मीडियाची ताकद आहे.

हा नवा रस्ता आता या सर्वच पत्रकारांनी पकडलाय.
आलोक जोशींचा ‘अलोक अड्डा’, आशुतोषचा ‘सत्य हिंदी’, ‘वायर’, ‘फोर पीएम’
असे कितीतरी युट्यूब चॅनल बातम्या देत आहेत.
लोकशाहीला मजबूत करण्याची जबाबदारी यांनी घेतलीय.

विशेष म्हणजे रविश कुमार यांनीही आपली नोकरी गमावल्यानंतर
‘Ravish Kumar Official’ नावाचे युट्यूब चॅनल सुरु केले.
काही दिवसांमध्येच 34.40 लाख सबस्क्राइबर झालेले आहेत.
अजून रविशने ते चॅनल पूर्णपणे सुरुही केलेले नाही.
तरीही इतका प्रतिसाद!  
आता नवीन वर्ष सुरु होत आहे.
नव्या वर्षात आणखी खूप काही होईल.

अंधार नष्ट होईल.
मेन स्ट्रीम मीडियाची मक्तेदारी नष्ट होईल.
लोकांसमोर खरीखुरी माहिती येईल.
चांगली स्पर्धा राहील.

मित्राला हे सांगत होतो.

तो म्हणाला, थांब जरा : ‘युट्यूबच विकत घेतील आमचे लोक. मग काय करणार?’

दिलीप लाठी, पुणे
diliplathi@hotmail.com 

Tags: alternative media ravish kymar punyaprasun bajpayi journalism arnab goswami ndtv Load More Tags

Comments: Show All Comments

Niraj Mashru

एकदम मस्त, यु ट्युब खतरे मे है...

Ishwar Bhikaji Ubale

Real fact.

Nitin S Tekale

अप्रतिम लेख

Priyanka Lathi

Amazing. Very engaging. I really liked the storytelling style and also the reflection of coming future..!!

Prof. Bhagwat Shinde

काव्यात्मम शैलीतला खूप सुंदर, अप्रतिम लेख. किती पत्रकारांना निर्भीड पत्रकारिते पायी आपले करिअर उध्वस्त होताना पाहावे लागले? याची विषन्न जाणीव सलत राहते. युट्युब चॅनेल चा पर्याय उत्तम आहे. पण तेही खरंच विकत घेतलं तर करायचं काय? प्रश्न मोठा गंभीर आहे. लेखक व कर्तव्य साधनाचे मनःपूर्वक अभिनंदन!

भास्करराव बळखंडे

अतिशय अप्रतीम लेख आहे भाऊ

Add Comment

संबंधित लेख