सुनील देशमुख यांचे दुःखद निधन

शुक्रवारी, (6 जानेवारी), सायं. 6 ते 8 या वेळेत एस. एम. जोशी सोशलिस्ट फौंडेशन सभागृह, पुणे येथे आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार प्रवर्तक सुनील देशमुख यांचे 4 जानेवारी रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेटमधील मायामी येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 74 वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्याची पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. गेली काही वर्षे त्यांना हृद्यविकाराचा आजार होता. गेल्या वर्षी कर्करोगाचे निदान झाले. पण आपल्या आजाराशी त्यांनी धीराने सामना केला. आजाराबाबत ते कायम विनोदाने बोलायचे आणि हसून विषय बदलायचे. अत्यंत आनंदी, उत्साही, प्रेरक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सहा आठवड्यांपूर्वी त्यांना Guillain – Barre syndrome (GBS) या आजाराने हातापायात तीव्र वेदना होऊ लागल्या. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. हॉस्पिटमध्येच त्यांना स्ट्रोक आला. मेंदूमधील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया असफल झाली आणि ते कोमात गेले. गेले चार दिवस ते कोमात होते. तिथेच त्यांचे पत्नी-मुले आणि अन्य जवळच्या नातेवाइकांच्या सान्निध्यात शांतपणे निधन झाले.   

सुनील देशमुख हे मुळचे सांगलीचे. त्यांचे मामा सेवा दलाचे होते आणि आई सुधारकी विचारांची होती.  साने गुरुजींच्या वाङ्मयाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या संस्कारात ते लहानाचे मोठे झाले. कुमार सप्तर्षी, अनिल अवचट आणि सांगलीचे क्रांती शहा यांचा त्यांच्या जगण्यावर प्रभाव होता. युक्रांदच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. कुमार केतकर हे त्यांचे जवळचे मित्र होते. विद्यार्थीदशेत असताना मुंबईच्या स्टडीग्रुपमध्ये त्यांचा वावर होता..

मॅट्रिकला ते बोर्डात चौथे आले होते. त्यांनी मुंबई UDCT मधून (सध्याच्या ICT Institute of Chemical Technology मधून) केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्यांनी कॉलेजात असताना काही कविता लिहिल्या होत्या. सत्तरच्या दशकात ते अमेरिकेत गेले. त्यावेळी तिथे विद्यार्थी चळवळी जोरात होत्या. ‘स्टुडन्ट फॉर डेमोक्रॅटिक सोसायटी’ (एसडीएस) या चळवळीत प्रामुख्याने होती. जग बदलण्याचे स्वप्न सत्तरच्या दशकात जगभरच्या तरुणांच्या मनात होते. तो त्यांच्यासाठी कायमच भारावलेला कालखंड राहिला. ‘Imagine there is no countries’ सारख्या प्रेरकगीतातला आशय जगभरच्या तरुणांना ‘आपला’ वाटत होता. त्यामुळे भारतातल्या मूल्यभानाला साजेसेच ते वातावरण होते.

पुढे त्यांनी अमेरिकेत ‘लॉ’चे शिक्षण घेतले. एम.बी.ए. केले. वॉलस्ट्रीटवर मोठ्या पगाराची, मोठ्या पदाची नोकरी स्वीकारली. आयुष्यभरची कमाई त्यांनी वॉलस्ट्रीटवर तेलाच्या वायदेबाजारात पाच वर्षांत केली. यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना त्यांनी अधिक पैसा मिळवण्याचा ध्यास न धरता वॉलस्ट्रीट सोडले आणि समाजासाठी, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काही तरी करायचे ठरवले. त्यातून 1994 मध्ये स्वतःच्या एक कोटीच्या निधीतून त्यांनी ही ‘साहित्य पुरस्कार योजना’ सुरू केली.  त्यानंतर दोनच वर्षांनी त्यांनी आणखी एक कोटीची भर घालून सामाजिक कार्य करणाऱ्यांसाठी  ‘समाजकार्य पुरस्कार योजना’ जाहीर केली. स्वतःच्या नावाचा आग्रह न धरता ती अमेरिकेच्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे ती कार्यान्वित केली. महाराष्ट्रात त्यांच्याबरोबर त्यावेळी केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या मृणालताई गोरे होत्या. त्यांचे कार्यकर्ते होते.लोकवाङ्मय गृहाचे प्रकाश विश्वासराव, सतीश काळसेकर ही मंडळी होती. अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. दिगंबर पाध्ये आणि चंद्रकांत केळकर यांचाही या कार्यात सक्रिय सहभाग होता.

महाराष्ट्रातल्या इतर पुरस्कार योजनांपेक्षा पुरस्कारांची रक्कम खूपच जास्त होती. लेखकांच्या मान-सन्मानाला साजेशा शानदार समारंभ पहिल्या वर्षी झाला. काही अभ्यासवृत्तीही देण्यात आल्या. या पुरस्कारांसाठी अर्ज मागवायचे नाहीत, जाणकारांकडून शिफारशी मागवायच्या हे ठरलेलेच होते. पुरस्कारांचे निकष, निवडीची पद्धत ही लोकशाही निकषांवर आधारित आणि निःपक्षपाती अशीच होती.

1996 मध्ये पुरस्काराचे केंद्र मुंबईतून पुण्यात हलवण्यात आले. दहा वर्षे ‘साधना ट्रस्ट’च्या सहयोगाने आणि आता महिला सर्वांगिण उत्कर्ष समिती (‘मासूम’)च्या सहयोगाने या पुरस्कार योजनेची कार्यवाही होते. महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले गुणी साहित्यिक आणि कार्यकर्ते यांचा शोध घेऊन महाराष्ट्र फाउंडेशन त्यांच्यापर्यंत जाते. त्यांचा सन्मान करते. आजवर एकूण 350 ‘साहित्य पुरस्कार’ आणि ‘सामाजिक कार्यकर्ते’ पुरस्कार देण्यात आलेले आहेत.

सुनील देशमुखांनी अमेरिकेत पर्यावरणाच्या क्षेत्रातही अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल् गोर यांच्याबरोबर कार्य केलेले आहे. अमेरिकेतले सर्वात वरचे दहा उद्योगपती घेतले तर त्यांनी आपली 99 टक्के संपत्ती सामाजिक कार्याला दिलेली आहे. वॉरन बफे, बिल गेटस्, जॉर्ज सोरॉस अशांचा आदर्श देशमुखांनी आपल्यासमोर ठेवलेला होता. त्यांचे उदाहरण देऊन ते म्हणायचे, “सामाजिक बांधिलकीची ही जाणीव अमेरिकन उद्योगपतीत दिसते, पण भारतातल्या उद्योगपतींत का दिसत नाही?”  हीच त्यांची खंत होती. महाराष्ट्र फाउंडेशनच्या या पुरस्कार योजनेत उद्योगपतींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे त्यांना वाटे. पण मराठी उद्योजकांनी त्याबाबत कधी फारसा उत्साह दाखवला नाही.

सुनील देशमुख आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे हे कार्य आपण सर्वांनी आपले मानून पुढे नेण्याची जरुर आहे.    


आदरांजली सभा 

महाराष्ट्र फौंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने मागील 28 वर्षांपासून दिल्या जाणाऱ्या 'मराठी साहित्य' व 'महाराष्ट्रातील समाजकार्य' या दोन्ही प्रकारांतील पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे काल 4 जानेवारी 2023 रोजी, अमेरिकेत निधन झाले. त्यांना आदरांजली अर्पण करणारी सभा आयोजित केली आहे. 

वेळ :  शुक्रवार, 6 जानेवारी 2023 रोजी, सायंकाळी 6 ते 8 या वेळेत

स्थळ : एस. एम. जोशी सोशलिस्ट फौंडेशनचे सभागृह, नवी पेठ, पुणे 411030

आयोजक :
महाराष्ट्र फौंडेशन (अमेरिका)
महिला सर्वांगिण उत्कर्ष मंडळ (मासूम)
आणि साधना ट्रस्ट

Tags: महाराष्ट्र फौंडेशन साहित्य व समाजकार्य पुरस्कार श्रद्धांजली सुनील देशमुख Load More Tags

Comments:

रवीन्द्र बागडे

२०१३साली अमेरिकेला जाण्याचे ठरलेले असताना दूतवासाने व्हिजा नामंजूर करून त्याचे उत्तर गुजराथी तथा इंग्रजी भाषेत दिले। याला हरकत घेऊन मी लढा दिला।व मराठी भाषेत त्याना उत्तर देण्यास भाग पाडले।व त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मराठीतूनच दिली।।या संदर्भात लोकसत्ता ,महाराष्ट्र टाइम्स,सकाळ,लोकमत,नवाकाळ आदि दैनिकातून बातम्या प्रकाशित झाल्या व व्हिजा मंजूरीचे पत्र दिले व अमेरिकेचा प्रवास केला।एवढेच नव्हे तर एअर इंडिया विमान प्रवासात मराठी भाषेतून निवेदन सादर केले जावे अशीही मागणी केली। हे केसरीचे मालक केसरी पाटील उर्फ भाऊ यानाही माहिती आहे।सगळ्या जगात मराठी भाषेला ओळखावे हा प्रयास अद्यापही चालू आहे।समाजकार्य व लेखनकार्य हे अखंड राहणार आहे।एप्रील मध्ये ७६वर्षे पूर्ण होतील।पण कार्य चालूच राहणार आहे।

रवीन्द्र बागडे

सुनील देशमुख याःच्याबरोबर बरेच काही बोलावयाचे होते पण ते नियतीला मंजूर नव्हते।मराठी भाषेच्या विकासासाठी तथा साहित्यासाठी बरेच काही सांगायचे राहून गेले।त्यानी मला एक पत्र पाठवले होते ते माझ्या संग्र्ही आहे।नरेंद्र दाभोळकरांसहित अन्य मान्यवरांची पत्रेही आहेत।भारताचे माजी उपराष्ट्रपती तथा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य नायाधिश माननीय हिदायतुल्ला साहेबांनी मला लिहीलेले हस्ताक्षरातील पत्रही संग्रही आहे।ज्या दिवशी त्यानी मला भेटायला मलबार हीलवरील घरी बोलावले होते त्याच दिवशी रूदयविकाराने त्यांचा अंत झाला ही देखील माझ्या आयुष्यातील दुर्दैवी घटना आहे।मी केलेल्या सामाजिक कार्याची व लेखनाची नोंद त्यानी घेतली होती।समाजकार्य व लेखन कार्याबद्दल कैक पुरस्कार मिळाले पण सुनील देशमुख हरवल्याचे फार दु:ख होत आहे।

रवीन्द्र बागडे

मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशक/सुनील मेहता यांचेही काही महिन्यापूर्वी निधन झाले याची ही आठवण झाली

रवीन्द्र बागडे

मराठी प्रेमी समाजकार्यकर्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्यासारखे कार्य कुणीतरी उद्योगपतीने करून महाराष्ट्र फौंडेशनला सहकार्य करावे ही विनम्र प्रार्थना। राष्ट्रदल मध्ये काही काळ कार्य केले। मृणाल गोरे संसदेत असताना काही प्रश्न लोकसभेत मांडावयास लावले।प बा सावंत यानी सहकार्य केले होते।।सकाळ दैनिकाने मृणाल गोरे,शाहीर साबळे काही उद्योगपती तथा आमच्यासहित सत्कार झाला होता।त्याची आठवणही देशमुख स्मृतिप्रित्यर्थ अनवधनाने येत आहे।सुनील देशमुख गेल्याचे फार वाईट वाटत आहे।त्यांच्या कुटुंबियाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत! आपला विनम्र रवीन्द्र बागडे सोवियत देश नेहरू पुरस्कार विजेता साहित्यीक।।।०७\०१\२०२३शनिवार

दिलीप लाठी

विनम्र अभिवादन.

Add Comment

संबंधित लेख