चीनचा निरोप घेताना...

साधना प्रकाशनचे आगामी अनुवादित पुस्तक : 'चीन भेटीतील भाषणे'

12 एप्रिल ते 29 मे 1924 हे पन्नास दिवस रवींद्रनाथ टागोर यांनी चीनचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी इंग्रजीतून भाषणे दिली, त्यातील प्रमुख सात भाषणांचे पुस्तक Talks in China या शीर्षकाखाली 1925 मध्ये प्रकाशित झाले. त्यामध्ये, पहिले भाषण आत्मकथनात्मक आहे, दुसरे भाषण आयोजकांना उद्देशून, तिसरे भाषण विद्यार्थीमित्रांना उद्देशून तर चौथे भाषण शिक्षकांना उद्देशून आहे. पाचवे भाषण संस्कृती व प्रगती यांचा परामर्श घेणारे आहे, तर सहावे भाषण सत्य या संकल्पनेवरील आहे. सातवे भाषण चीनचा निरोप घेताना दौऱ्याचा मागोवा घेणारे आहे. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रथमच 'चीन भेटीतील भाषणे' या नावाने साधना प्रकाशनाकडून येत आहे. या अनुवादित पुस्तकात त्या सातही भाषणांचे अनुवाद तर आहेतच, शिवाय तो दौरा आयोजित करणारे लियांग छिछाव यांनी लिहिलेला लेख, दौऱ्याची एकूण आखणी आणि रूपरेषा, दौऱ्याच्या वेळी झालेले वादसंवाद आणि त्या दौऱ्याचे इतर तपशीलही पुस्तकात आहेत. हे सर्व अनुवाद सानिया कर्णिक या युवतीने केले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन 19 जुलै 2026 रोजी पुणे येथे होत आहे. कार्यक्रमपत्रिका आणि निमंत्रण या लेखाखाली आपल्यासाठी दिलेले आहे. त्या निमित्ताने, त्या पुस्तकातील निरोपाचे भाषण येथे प्रसिद्ध करत आहोत.


भाग 1

गेले जवळपास दोन महिने मी ज्या मित्रांसमवेत राहिलो आणि ज्यांनी मला भरभरून प्रेम दिले त्यांचा निरोप घेण्याची आता वेळ आली आहे. या महान देशाचा आणि इथल्या लोकांचा मला परिचय करून देण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. त्यांच्यासोबत असताना मला अगदी घरच्यासारखे वाटले. तरीदेखील काहीतरी अपूर्ण राहिले आहे, ठरवलेले ध्येय पूर्ण झाले नाही अशी खंत मनाला लागून राहिली आहे. त्यासाठी मी स्वतःला दोषी धरत नाही. आजचा काळच त्याला कारणीभूत आहे.

चीनहून निमंत्रण आल्याचे जेव्हा माझ्या देशबांधवांना कळले तेव्हा ते अतिशय आनंदित आणि उल्हासित झाले हे मी तुम्हाला सांगायला हवे. ह्याआधीदेखील मला अनेक पाश्चात्त्य देशांकडून आमंत्रणे आली होती हे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ठाऊक असेल. मात्र या वेळचा आनंद केवळ इंग्लडविषयी माहिती असलेल्या छोट्या वर्तुळापुरता मर्यादित नव्हता. बहुतांश जग पाश्चात्त्य संस्कृतीने मोहून गेलेले असताना, तुम्ही पूर्वेकडील पाहुण्यास आपुलकीने बोलावत आहात याचे सर्वांनाच कौतुक वाटले. प्राचीन आध्यात्मिक संवादाचे मार्ग पुन्हा एकदा खुले होण्याची ही उत्तम संधी आहे असा विश्वास सर्वांना वाटला.

माझ्या देशातील साधे-सरळ लोक जागतिक घडामोडींबद्दल अनभिज्ञ आहेत. राष्ट्रांनी एकत्र येणे त्यांना अगदी सोपे वाटते; उलट शत्रुत्वाचे संबंध निर्माण करणेच अधिक कष्टाचे काम आहे, असा त्यांचा समज आहे. काही लोक त्यांच्या या निर्मळपणावर हसतीलही.

"सर, चीनमधील लोकांना तुम्ही सांगा की प्राचीन काळी त्यांच्याशी जुळलेले अनुबंध आम्ही कधीच विसरणार नाही", अशी विनंती त्यांनी केली. त्यांना असे वाटावे ही कमालीची गोष्ट आहे. मी एकटा संपूर्ण चीनभर 'आम्ही भारतातील लोक तुमच्यावर किती प्रेम करतो आणि तुमच्या प्रेमाची किती आस धरतो', हे सहज पोहोचवू शकेन असे त्यांना वाटले. मात्र काळाने निर्माण केलेल्या अनंत अडचणी त्यांना माहीत नाहीत. मी एकटा दोन देशांची हृदये जोडू शकतो असा भाबडा विश्वास त्यांना वाटला.

आज आपल्याला एकमेकांपर्यंत पोहोचणे खूप सोपे झाले आहे. केवळ काही दिवसांतच आम्ही भारतातून चीनमध्ये आलो. मात्र भेटीगाठीतील ही सुलभताच आपल्याला वस्तुस्थितीपासून दूर ठेवते. आपली भेट म्हणजे निव्वळ एक सहल बनून जाते. आपण समारंभांना जातो, एकमेकांचे मनोरंजन करतो, व्याख्याने ऐकतो, कार्यक्रम पूर्ण करतो आणि मग परत निघून जातो. हे सारेच फार सोपे झाले आहे.

पण मौल्यवान गोष्टींसाठी किंमत मोजावी लागते. प्रचंड कष्ट सोसून आणि अनेक अडचणींचा सामना करून आपल्या पूर्वजांनी दोन देशांमधील लोकांमध्ये आत्मिक नाते जोडले. आपला संदेश पोहोचवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. तरीही, हजार वर्षांपूर्वी ते तुमच्या भाषेत संवाद साधू शकत होते. कारण भाषेतील भिन्नता ओलांडून राष्ट्रांचे एकमेकांशी जवळचे नाते निर्माण करणे हे किती महत्त्वाचे काम आहे, हे त्यांना त्या काळी उमगले होते. हा ऐक्याचा धागाच आजच्या सर्वंकष विनाशाच्या वाढत्या धोक्यापासून मानवजातीचे रक्षण करू शकतो.

इतक्या कठीण अडथळ्यांवर मात करून हे प्रवासी इथवर पोहोचले आणि त्यांनी आपले आध्यात्मिक विचार चिनी भाषेत अनुवादित केले हे किती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे! संस्कृतपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असलेल्या या भाषेमुळे निर्माण झालेल्या अडचणी पर्वतांपेक्षा, वाळवंटांपेक्षा आणि महासागरांपेक्षा अधिक दुर्गम होत्या.

आपल्या पूर्वजांना आपले ध्येय साध्य करण्यासाठी किती अतोनात कष्ट घ्यावे लागले ! मला मात्र काहीच त्रास सहन करावा लागला नाही. माझ्यासाठी

सगळे काही खूपच सोपे आणि आरामदायी केले गेले आहे. मी तुमच्याशी बोललो, काही व्याख्याने दिली, झपाट्याने इच्छितस्थळी पोहोचवणाऱ्या रेल्वेगाड्यांतून प्रवासाचा आनंद घेतला. तरीही मला वाटते की हे सहजपणे घडून आले नाही. मला माझ्या सहप्रवाशांना खऱ्या अर्थाने ओळखण्याची संधीच मिळाली नाही. मी पूर्वीसारखा अनेकांच्या सोबतीने पायी प्रवास केला असता तर खऱ्याखुऱ्या लोकांसोबत प्रवास केल्याचा अनुभव मला मिळाला असता. आत्ता माझ्या समोर बसलेले श्रोते मला आभासी वाटतात. मी त्यांना ओळखतो का? ते मला ओळखतात का? प्रत्येक माणसाची स्वतःची भाषा असते असे म्हणतात. माझे श्रोते माझी भाषा जाणतात का? गेला पाऊण तास मी या दुर्दैवी जिवांवर शब्दांचा भडिमार करतो आहे. पण माणसांपर्यंत पोहोचणे, माणसांना जोडणे या नवीन युगात खरेच सोपे झाले आहे का ?

विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी बोलणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने एकमेकांच्या जवळ यावे लागते, हृदयाशी नाते जोडावे लागते. तुमच्यासोबत जास्त काळ राहण्याची संधी मिळाली असती तर आपण एकमेकांशी अधिक संवाद साधला असता, कल्पनांची देवाणघेवाण केली असती. आपल्या प्रयत्नांना लगेच नव्हे, पण काळाच्या ओघात फळे आली असती. अडचणी नाहीशा झाल्या असत्या, गैरसमजुतींना जागा उरली नसती. आपले नाते एकतर्फी राहिले नसते. आपण एकत्र मिळून काहीतरी काम केले असते. आपले शिक्षक आणि प्राध्यापक मात्र फक्त व्याख्याने देण्याची मागणी करतात. काळाच्या ओघात ही व्याख्याने आठवणींमधून लुप्त होतात. ती केवळ वृत्तपत्रांतील बातम्यांच्या रूपात शिल्लक राहतात, परंतु माणसांच्या हृदयावर खोलवर ठसा उमटवू शकत नाहीत.

मात्र हजारो वर्षांपूर्वी तुमचे प्रवासी भारतात जाताना आणि भारतीय प्रवासी इथे येताना जी मूल्ये घेऊन आले होते ती मूल्ये अजूनही अबाधित आहेत. हजारो वर्षांपूर्वीचे ते विचार आणि शिकवण आजच्या युगात आपण जसेच्या तसे स्वीकारू शकत नाही. त्यात कालानुरूप बदल करावे लागतील असे तुम्हाला वाटणे अगदी साहजिक आहे. कदाचित तेव्हाचे काही विचार आज आपल्याला मुळीच पटणार नाहीत, पण तरीसुद्धा त्याचे पूर्णतः विस्मरण होणे अशक्य आहे, कारण ते विचार नकळत आपल्या जीवनात मिसळले गेले आहेत. आपल्या पूर्वजांनी मोठी किंमत चुकवून घडवून आणलेले हे चांगले-वाईट विचार ऐतिहासिक भेटीचे साक्षीदार म्हणून आजही आपल्यासोबत आहेत.

काय भव्य तीर्थयात्रा होती ती! इतिहासातील किती महान कालखंड होता तो! ते महान वीर आपल्या विचारांसाठी, श्रद्धेसाठी जिवावर उदार झाले, आपले घरदार सोडून आले. त्यातले कित्येक कोणताही मागमूस न ठेवता काळाच्या ओघात अदृश्य झाले. आपली गोष्ट सांगण्यासाठी केवळ काहीच जण तग धरू शकले. त्यांनी मागे ठेवलेल्या गोष्टींसाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे. थोडे ओबडधोबड वाटले तरी मुखवटे धारण न करता नैसर्गिकपणाने केलेल्या त्या लिखाणाचे महत्त्व आपण जाणले पाहिजे.

आधुनिक संस्कृतीने कसलेल्या शिंप्याप्रमाणे सर्व प्रकारचे पडदे शिवून ठेवलेले आहेत. पूर्वग्रहाचा पडदा आपल्याला बाहेरच्यांच्या जवळ येऊ देत नाही. त्या पडद्याआडून आपल्या स्वतःच्या देशबांधवांना खुल्या नजरेने बघणेदेखील अवघड झाले आहे. जेव्हा जीवन साधे सोपे होते तेव्हा माणसे एकमेकांना संशयाने नव्हे, तर आपुलकीने पाहायची. आपली संपत्ती आणि आनंदही एकमेकांत सहज वाटायची. त्यांनी समान ध्येयाकडे घेऊन जाणारा धागा गुंफला होता. त्या काळी किती सोपे होते ते, आणि आज मात्र किती कठीण झाले आहे. आदर्शवादावर विश्वास ठेवणाऱ्या आम्हाला तर ते अधिकच प्रकर्षाने जाणवते.

विविध वंशाच्या माणसांना एकत्र आणणे आणि त्यांना प्रेमाच्या आणि सहकार्याच्या धाग्याने जोडणे यावर आपला सर्वांचा विश्वास आहे. मात्र, आजकालचे जीवन इतके साचेबद्ध आणि कृत्रिम बनले आहे की ते अमलात आणणे फारच अवघड होऊन बसले आहे. कारण तुमच्याकडे दुसऱ्याचे ऐकून घ्यायला मुळी वेळच नाही. समजा, त्या महान विद्वानांपैकी किंवा प्राचीन भिक्खूंपैकी एखादा आज इथे आला असता, तरी त्यांचे बोलणे ऐकण्याची संधी कदाचित तुम्हाला मिळाली नसती. किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल उत्सुकताच वाटली नसती. कारण आपले जीवन केवळ आयुष्यातील पोकळी भरून काढण्याचे काम करणाऱ्या अनावश्यक कामाच्या व्यापांनी भरलेले असते. अशा कामात आपण इतके व्यग्र होऊन जातो की, आपल्याला आपल्या आजूबाजूच्या माणसांशी मोकळेपणाने गप्पा मारायलाही उसंत मिळत नाही.

कल्पना करा, आजच्या घडीला समजा, एखादा थोर प्रवचक तुमच्या डोंगरांच्या पायथ्याशी, तलावाच्या काठावर येऊन बसला, तर तुम्हाला काय बरे वाटेल? कदाचित तुम्ही त्याला वेड्यात काढाल अथवा थेट पोलिसांच्या ताब्यात द्याल. तुमचे राजकीय दूतावास कदाचित त्याची मायदेशी रवानगी करतील किंवा त्याला तुरुंगात डांबतील. तुम्ही त्याच्या जवळ येण्याचे तरी धाडस कराल का? बहुतेक नाहीच, कारण तुमची मनोवृत्ती आणि दृष्टीकोन पूर्णपणे बदललेला आहे.

मी मान्य करतो की माझा उच्च मानवी मूल्यांवर विश्वास आहे. त्याद्वारेच आपण जीवनातील उच्च ध्येयांची खऱ्या अर्थाने पूर्तता करू शकतो असे मला वाटते. हे खरे असले तरी मला फारच काळजीपूर्वक बोलावे लागते. कारण आजच्या काळात मनमोकळेपणे स्वतःचे विचार मांडणे हे काही चांगले लक्षण मानले जात नाही. आजकाल आपण सगळ्यांना पटेल अशा एका साच्यात बसण्याचा आणि दिखाऊ वागण्याचा प्रयत्न करतो. जगभर गैरसमज पसरवणाऱ्या यंत्रणेचे प्रतीक असलेल्या वृत्तपत्रांतील अहवालांवर आपण अवलंबून राहतो. या सर्व अडथळ्यांमधून वाट काढून मानवतेच्या अंतरंगापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण झाले आहे.

तुमच्या हृदयात जागा न मिळण्याविषयीची ही तक्रार आहे, असे कृपया समजू नका. जिवलग मित्रांना भेटून जसा आनंद होतो, तसा आनंद मला तुम्हाला भेटून मिळाला. तुमच्यातील काहींशी तर माझे आयुष्यभराचे नाते जडले आहे. इथला माझा मुक्काम अतिशय आनंददायी ठरला आहे. पण तरीही मी पुरेसे गांभीर्य दाखवले नाही, अशी माझ्या मनाला खंत वाटते. तुम्हाला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबद्दल तुमच्याशी उत्कटपणे आणि संवेदनशीलतेने संवाद साधण्याची संधी मला मिळाली नाही. मी फारच नम्र, सभ्य आणि वरवरचा वागत राहिलो. कदाचित आजच्या काळाच्या रितीने मला असे वागण्यास भाग पाडले. केवळ साहित्यिक आणि काव्यात्मक भाषणे देत न राहता, तुमच्या जगण्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करायला हवा होता.

अशी संधी मला मिळाली नाही, अथवा भी ती गमावली हे खरे आहे. पण तरीदेखील या भेटीतून काहीतरी साध्य झाले आहे असे मला नक्की वाटते. मला वाटते, की एक नवीन वाट खुली झाली आहे. त्या वाटेवरून चालत चालत काही जण भारतातून इथे, तर तुमच्यातील काही जण इथून भारतात जातील.

गेल्या काही वर्षांमध्ये ज्या ध्येयासाठी मी स्वतःला वाहून घेतले आहे, त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहचवू शकलो याचे मला समाधान वाटते. एका महान कार्याचा सेवक म्हणून, हे ध्येय मी स्पष्टपणे आणि ठामपणे तुमच्यासमोर मांडले. माझ्या संस्थेत वेगवेगळ्या देशांतील, विविध भाषिक माणसे एकत्र येऊ शकतील, अशा बंधुत्वाच्या आदर्शाला मी मानतो. माझा मानवाच्या आध्यात्मिक ऐक्यावर, अद्वैतावर विश्वास आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला माझ्या कार्यात सहभागी होण्याची विनंती करतो. "तुमच्या ध्येयावर आमचादेखील पूर्ण विश्वास आहे", असे जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत माझे काम अपुरेच राहील. मी तुमच्याकडे केवळ पाहुणा म्हणून आलेलो नाही,

तर मी तुमचे प्रेम, तुमची करुणा आणि एका महान कार्यावरचा तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी आलो आहे. तुमच्यापैकी एखाद्या व्यक्तीने जरी माझ्या ध्येयाचा स्वीकार केला तरी मला अतिशय आनंद होईल.


 

भाग 2

आजची भेट मला ज्या दिवशी मी चीनमध्ये पहिले पाऊल ठेवले, त्या दिवसाची आठवण करून देत आहे. याच उद्यानात माझ्यासाठी स्वागत समारंभआयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मी फारच नवखा होतो. माझे स्वागत करायला आलेल्यांपैकी फारशा कोणाला मी ओळखतही नव्हतो. चीन चित्रात जसा दिसतो, तसाच प्रत्यक्षात असेल का? मी या देशाच्या अंतरंगापर्यंत पोहोचू शकेन का? माझ्या मनात असंख्य प्रश्न होते. तुम्हाला रहस्यमय भासणाऱ्या प्रदेशातून आलेल्या या पाहुण्याबद्दल तुमच्या मनात प्रचंड अपेक्षा असतील, अशी मला भीती वाटत होती. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून तुम्ही अपेक्षांचे डोंगर उभारले असतील, अशी काळजी वाटत होती. त्यामुळे माझ्या काही मर्यादा आहेत हे तुम्हाला कळावे यासाठी मी केवळ एक सामान्य कवी आहे असा कबुलीजबाब मी आल्या आल्याच देऊन टाकला.

जगभरातील महान व्यक्तींनी, विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी तुमच्या देशाला भेटी दिल्या आहेत आणि मार्गदर्शनपर व्याख्याने दिली आहेत हे ठाऊक असल्याने मला माझ्या भेटीबद्दल फारच संकोच वाटला. खोट्या कीर्तीच्या वलयाआडून तुम्ही माझ्याकडे पाहत आहात, असे वाटून मला लाज वाटली. माझ्या एका नाटकामधील 'चित्रा' नावाच्या पात्राची मला आठवण झाली. चित्राला प्रेमदेवतेकडून सौंदर्याचे वरदान मिळाले होते. या वरदानाचा उपयोग करून तिने आपल्या प्रियकराचे मन जिंकले खरे, पण नंतर तिनेच स्वतःच्या सौंदर्याविरोधात बंड पुकारले. कारण तिचे अंतःकरण ज्या आत्मीयतेच्या अनुभवासाठी आतुर होते, ते या बनावट सौंदर्याच्या मुखवट्यामुळे तिला अनुभवताच येत नव्हते.

मी आता चीनमधील माझ्या मुक्कामाच्या शेवटाला आलो आहे. जर तुम्ही अजूनही मला स्वीकारायला, माझ्यावर प्रेमाने भरलेल्या शब्दांचा वर्षाव करायला तयार असाल, तर मी त्याचा नम्रतेने स्वीकार करतो. या भेटीने माझी कसोटी घेतली आणि मी त्यातून यशस्वीपणे पार पडलो. आज मी पुन्हा एकदा तुमचे प्रेम, करुणा आणि प्रशंसा मिळवण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. तुम्ही माझ्यावर मैत्रीचा वर्षाव करा. मी तुमच्यापासून दूर जाईन तेव्हा माझ्या मुक्कामातली ही संध्याकाळ मला रंगांची उधळण करणाऱ्या विलोभनीय सूर्यास्ताप्रमाणे आठवेल. तरीही, माझ्या मनात काहीशी शंका आहे, कारण इतके दिवस ज्यांनी माझ्यासोबत प्रवास केला, ते त्यांना माझ्याविषयी काय वाटते, या विषयी अजून बोललेले नाहीत.

या सभेतील प्रमुख वक्ते, ज्यांनी माझे इतके कौतुक केले, ते मला भेटले त्या पहिल्या दिवसापासूनच आजारी आहेत. आम्ही फारसे एकत्र न आल्यामुळे त्यांच्या माझ्याविषयीच्या मतात फारसा फरक पडणार नाही. मात्र, इतके दिवस आणि इतका वेळ ज्यांनी माझ्यासाठी काढला आणि ज्यांना माझ्यामुळे त्रास झाला त्या मित्रांचे चार शब्द मला ऐकायचे आहेत.

दरम्यान, मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. माझे चीनमध्ये आगमन झाले, तेव्हा माझ्याही काही अपेक्षा होत्या, चीनविषयी काही धारणा होत्या. लहानपणी 'अरेबियन नाईट्स' वाचल्यावर माझ्या मनात चीनचे अद्भुतरम्य चित्र उभे राहिले होते. जपानमध्ये असतानाही मला चिनी संस्कृतीची झलक दिसली होती. जपानमधील माझ्या यजमानांकडे अप्रतिम चिनी चित्रांचा संग्रह होता. अद्भुत सौंदर्याचा खजिनाच होता तो. ते सहजपणे एक-एक चित्र मला दाखवत आणि भान हरपून मी ती चित्रे बघत राही. जुन्या काळातील महान कलाकारांच्या श्रेष्ठ कलाकृतींच्या आधारावर माझ्या मनातील चीनची प्रतिमा आकार घेत होती. चिनी लोक महान आहेत, त्यांनी सौंदर्याचे स्वतंत्र विश्व निर्माण केले आहे, अशी माझी मनोमन खात्री पटली. तुमचा अपमान आणि शोषण करणाऱ्यांची, तसेच तुमच्या महान संस्कृतीला आणि कलाकृतींना तुच्छ लेखणाऱ्यांची मला चीड वाटे.

अर्थातच, इतिहासातील आणि भूतकाळातील उत्तम कलाकृतींमुळे तयार झालेली तुमची प्रतिमा तुम्हा लोकांच्या प्रत्यक्ष जीवनाचे संपूर्ण दर्शन घडवत नाही, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. तरीही माझा ठाम विश्वास आहे की वास्तवाचे सर्वोत्तम रूप आपल्याला आपल्या सर्वोत्कृष्ट आविष्कारांतून ओळखता येते आणि पूर्ण जीवन हे सर्वोत्तम आणि वास्तव या दोन्हीच्या एकत्र दर्शनांतून उमटते. मला मान्य आहे की, एखाद्या परक्या व्यक्तीला अंतरंगातील खरे सत्य गवसणे अवघड असते. परंतु त्या सत्याची झलक मला पाहायला मिळाली असे मला वाटते.

परदेशी पाहुणेही जिचा नेहमी उल्लेख करतात, ती आत्मीयता मला इथे प्रकर्षाने जाणवली. तुमच्या हृदयाच्या मी समीप येऊन पोहोचलो आहे असे मला वाटते. इथे माझा ज्यांच्याशी जवळून परिचय झाला, त्यांच्याविषयी मला केवळ कौतुक आणि कृतज्ञताच वाटत नाही तर त्यांच्याप्रती भरभरून प्रेम वाटते. असे जिव्हाळ्याचे नाते तयार होणे ही काही सोपी गोष्ट नाही.

काही लोकांकडून मी असे ऐकले आहे, की समोरच्याला जसे आहे तसे स्वीकारण्याची विलक्षण देणगी तुम्हाला लाभली आहे. त्याचे आधीचे कर्तृत्व अथवा त्याच्या इतर कुठल्याही गोष्टींकडे न पाहता, निव्वळ त्याच्या तुमच्यासमोर असण्याला तुम्ही महत्त्व देता, जसा आहे तसा त्याला स्वीकारता. बरेच जण मला एक कवी, तर काही वेडे लोक तत्त्वज्ञ आणि प्रेषितही समजतात. परंतु तुम्ही मात्र कदाचित ह्या क्षमतेमुळेच मला केवळ एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकारले.

इथे काही नवे तरुण मित्र माझ्या खूपच जवळचे झाले आहेत. माझ्या पांढऱ्या दाढीची अथवा कीर्तीची भीडभाड न बाळगता ते मला त्यांच्या वयाचाच समजतात. मला मखरात बसवून माझा वास्तवाशी असलेला संपर्क हिरावून घेणारे आमच्याकडे अनेक लोक आहेत. खरेतर आपल्या जवळच्या माणसांवर दररोज प्रेमाचा वर्षाव करणारे आणि उपासनेसाठी केवळ आठवड्यातून एकदाच मंदिरात जाणारे लोक पाहून देवालाही असूया वाटत असेल. चीनमधील माझ्या तरुण मित्रांनी मात्र अशी चूक न करता मला त्यांचा सहृदय मित्र मानले याचा मला आनंद आहे.

आज तुमचा निरोप घेताना मी तुमच्यावर प्रांजळपणे टीकाटिप्पणी करावी अशी विनंती मला करण्यात आली. त्याला मी सपशेल नकार देतो. तुमच्याकडे आधीच असंख्य टीकाकार आहेत. त्यांच्या रांगेत जाऊन सामील व्हायची माझी मुळीच इच्छा नाही. एक माणूस म्हणून तुमच्यातील दोष माफ करण्याची आणि त्यांच्या पलीकडे जाऊन तुमच्यावर प्रेम करण्याची क्षमता माझ्याकडे आहे. मी कोण आहे टीका करणारा ? आम्हा पूर्वेकडील लोकांमध्येही इतरांना न पटणारी अनेक स्वभाववैशिष्ट्ये आहेत, तर मग आपण फक्त मित्र म्हणून का राहू नये ?

मी तुमच्यावर टीका करणार नाही आणि तुम्हीही कृपा करून माझ्यावर टीका करणे टाळा. माझ्यातील त्रुटींची छाननी करण्याइतके माझे चीनमधील मित्र कठोर हृदयाचे नाहीत असा मला विश्वास वाटतो. मी कधीही स्वतःला एक तत्त्वज्ञ म्हणून पुढे केले नाही, त्यामुळे कृपया मला शांतपणे मी आहे तसा राहू द्या. मी जर स्वतः उंच व्यासपीठावर उभे राहून उपदेश देत राहिलो असतो, तर तुम्ही मला खाली खेचू शकला असता, पाठीत दोन बुक्केही घालू शकला असता. पण मी तुमच्याच पातळीवर उभा राहून तुमच्याशी बोलल्याने मी सुरक्षित आहे असा मला विश्वास वाटतो.

मला जे शक्य होते ते मी केले. मी अनेक मित्र जोडले. मी तुम्हाला खोलवर जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला स्वीकारले. आणि आता निघताना तुमच्या मैत्रीच्या आठवणी माझ्या हृदयात घेऊन मी मायदेशी परतणार आहे. पण मला स्वतःला अवास्तव अपेक्षांच्या भ्रमात ठेवायचे नाही, कारण दुर्भाग्याने माझा इथेही पाठलाग सोडलेला नाही. तुमच्यासोबत असताना मला सतत प्रेमळ सूर्यप्रकाशाचीच साथ लाभली असे म्हणता येणार नाही. अधून मधून दुरून वादळी ढगांची गर्जनाही ऐकू आली.

तुमच्यातील काही देशभक्तांना भीती वाटत होती की, तुमच्या संपत्ती आणि भौतिकवादावरच्या श्रद्धेला माझ्या भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानामुळे काही संसर्गजन्य आजार होईल. अशा सर्व चिंताग्रस्त लोकांना मी खात्री देतो की मी पूर्णपणे निरुपद्रवी आहे. त्यांच्या 'प्रगतीच्या मार्गात' अडथळा आणण्याचे किंवा भर बाजारात त्यांचा फारसा विश्वास नसलेले अध्यात्म विकायला काढण्याचे बळ माझ्यात नाही. मी त्यांना हेही खात्रीपूर्वक सांगू शकतो की मी एकाही साशंक व्यक्तीचे हृदयपरिवर्तन करू शकलो नाही. भौतिक शक्तीपेक्षा नैतिक सौंदर्याचे मूल्य अधिक आहे हे त्यांना पटवून देऊ शकलो नाही. त्यांच्या हे लक्षात येईल तेव्हा ते मला नक्कीच माफ करतील याची मला खात्री आहे.

- रवींद्रनाथ टागोर

(अनुवाद - सानिया कर्णिक)


अनुवादक सानिया कर्णिक हिचे मनोगत साधना साप्ताहिकाच्या 4 जुलै 2026 च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. ते येथे वाचता येईल : टागोरांच्या चीनमधील भाषणांचे अनुवाद करताना...

तसेच मराठी आवृत्तीच्या निर्मितीमागची कल्पना, भूमिका आणि प्रक्रिया विशद करणारे प्रकाशकीय साधना साप्ताहिकाच्या 4 जुलै 2026 च्या अंकाचे संपादकीय म्हणून प्रसिद्ध झाले आहे. ते लवकरच साधना साप्ताहिकाच्या वेबसाईटवर वाचता येईल.




 

Tags: Rabindranath tagore Ravindranath Tagore Tagore Nobel Geetanjali China Talks in china translation Lian Chhichhav गुरुदेव टागोर रवींद्रनाथ टागोर चीन लियांग छिछाव चीन भेट भारतीय संस्कृती भारतीय लोक देशबांधव भाषणे अनुवाद नवे पुस्तक Load More Tags

Add Comment