टेनिसमध्ये युवा पिढीची फ्रेंच क्रांती!

नव्या खेळाडूंनी 2026 ची फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा गाजवली

महिलांमध्ये पहिल्या सात सीडेड खेळाडू उपांत्य फेरीआधीच स्पर्धेबाहेर गेल्या. आठवे मानांकन असलेल्या मिरा आंद्रीवाने अजिंक्यपद मिळवले आणि मानांकनाची बूज राखली. पुरुष एकेरीतही काही फार वेगळे चित्र नव्हते. पहिल्या दहा मानांकित खेळाडूंमधील फक्त दुसरे मानांकन असलेला झ्वेरेव्ह आणि दहावे मानांकन मिळालेला कोबोली हे दोघेच उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचू शकले. अंतिम सामना त्यांच्यातच झाला आणि झ्वेरेवने बाजी मारली.

अलेक्झांडर झ्वेरेवने यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले, तर महिलांच्या एकेरीत हा मान मिरा आंद्रीवाने मिळवला. अंतिम फेरीत झ्वेरेवने फ्लाविओ कोबोलीचा तर आंद्रीवाने माया च्वालिन्स्काचा पराभव केला. या विजेत्यांतील साम्य म्हणजे या दोघांनी प्रथमच ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. तरीही त्यात थोडा फरक आहे. कारण मिरा आंद्रीवाने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले, तर अलेक्झांडर झ्वेरेवला चौथ्या प्रयत्नात यश मिळाले.

जगातील अव्वल खेळाडूंमध्ये गणला जाणारा, व्यावसायिक टेनिसपटूंच्या मास्टर्स (एटीपी मास्टर्स) स्पर्धेत दोनदा विजेतेपद मिळवणारा, सात ‘मास्टर्स 1000’ स्पर्धा जिंकणारा आणि टोकियो ऑलिंपिक 2021 मध्ये खाचानोवला पराभूत करून सुवर्णपदक मिळवणारा हा खेळाडू आजवर ग्रँड स्लॅम स्पर्धेत मात्र अपयशी ठरत होता. मात्र आता हा बट्टा त्याने पुसून टाकला आहे. विजयानंतर तो म्हणाला, “आता काहीही झाले तरीही मी ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेता म्हणून ओळखला जाईन. माझ्या दृष्टीने रोलाँ गॅराँ येथे मी आयुष्यातील अनेक सुंदर क्षण अनुभवले आहेत.

कोबोलीला इटलीच्याच पानाटा (1976) आणि सिनर (2023) नंतर येथे विजेता बनण्याची संधी होती. पानाटाच्या विजेतेपदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून यावेळी त्याच्या हस्ते विजेत्याला चषक देण्यात आला. पण तो घेण्याचा मान कोबोलीऐवजी झ्वेरेवला मिळाला. झ्वेरेव आणि कोबोली यांच्या वयात नऊ वर्षांचे अंतर आहे. झ्वेरेव 29 तर कोबोली 20 वर्षाचा आहे. अर्थातच झ्वेरेवला खूपच जास्त अनुभव आहे. कारण तो याआधी ग्राँ प्री स्पर्धांच्या अंतिम फेरीत तीन वेळा पोहोचला होता. उलट कोबोलीने प्रथमच स्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. आणि अंतिम सामन्यात त्यांच्यातील हा फरक वारंवार दिसून येत होता. कोबोलीवर मोठ्या सामन्याचे दडपण जाणवत होते. उलट झ्वेरेव शांतपणे खेळत होता.

कोबोलीची पहिली सर्व्हिस बऱ्याचदा चुकत होती. आणि त्या मानाने दुबळी दुसरी सर्व्हिस झ्वेरेव सहज परतवू शकत होता. त्यामुळे त्याला सर्व्हिसचा पुरेपूर फायदा घेता येत नव्हता. बिनतोड सर्व्हिस (एस) करण्यात मात्र दोघेही बरोबरीत (प्रत्येकी 6 वेळा) होते. सर्व्हिसची दुहेरी चूक झ्वेरेवने नऊ वेळा तर कोबोलीने फक्त तीनदा केली. पण झ्वेरेवच्या या चुकांचा फायदा कोबोलीला घेता आला नाही. त्याने अनेकदा गुण मिळवण्याची संधी गमावली. कोबोलीकडून विनाकारण अनेक चुका (‘अनफोर्स्ड एरर्स) झाल्या. या चुका त्याला चांगल्याच महागात पडल्या.

झ्वेरेवने मारलेला परतीचा फटका उंचावरून येई, तेव्हा स्मॅश करण्याच्या प्रयत्नात कोबोलीचा फटका नेटमध्ये जात होता, नाहीतर कोर्टबाहेर. उलट अशाच मोक्याच्या वेळी झ्वेरेव जोरदार फटके किंवा अगदी अलगद ड्रॉपच्या मदतीने पुरेपूर गुण वसूल करत होता. पहिला सेट इवेरेवने 6-1 असा जिंकला. गुणसंख्या अशी अगदी एकतर्फी दिसत असली तरी हा विजय त्याला सहजी मिळाला नव्हता. प्रत्येक गुणासाठी कोबोली निकराची झुंज देत होता. दुसरा सेट कोबोलीने 6-4 जिंकला. तोही लढूनच. तिसरा सेट झ्वेरेवने 6-4 असा जिंकला आणि 2-1 अशी आघाडी मिळवली. चौथा सेट कोबोलीने टायब्रेकरवर जिंकला आणि सामना 2-2 अशा बरोबरीत आणला. निर्णायक पाचव्या सेटमध्ये मात्र कोबोली गडबडला. तो प्रत्येक पॉइंट झुंजवत होता पण ऐनवेळी चूक करून गेम गमावत होता. अंतिम फेरीचा दबाव त्याला पेलत नव्हता. उलट आपल्या दीर्घकाळच्या अनुभवाच्या जोरावर झ्वेरेव त्याचा खेळ उंचावत होता आणि त्यामुळेच त्याने सेट आणि सामना जिंकला. अखेर त्याचे अजिंक्यपदाचे स्वप्न साकार झाले. जवळपास सामनाभर एकेका पॉइंटसाठी दोघेही खेळाडू जोरदार रॅली करत होते, अटीतटीने झुंजत होते. ही तुल्यबळ खेळाडूंतली लढत अतिशय चुरशीची झाली. प्रेक्षकांच्या दृष्टीने मेजवानीच ठरली.

महिलांच्या एकेरीत दोन्ही खेळाडू प्रथमच मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. 19 वर्षाच्या आंद्रीवाला आठवे मानांकन होते. च्वालिन्स्का मात्र पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत दाखल झाली होती. ग्रँड स्लॅम स्पर्धा व्यावसायिकांसाठी खुल्या झाल्यानंतर पात्रता फेरीतून निवड झाल्या झाल्या पहिल्याच वर्षी अंतिम फेरी गाठणारी ती पहिलीच खेळाडू. विशेष म्हणजे स्पर्धेच्या उपान्त्य फेरीपर्यंत तिने एकही सेट गमावला नव्हता. पण अंतिम सामन्यात मात्र तिला आधीच्या नऊ सामन्यांप्रमाणे चांगला खेळ करता आला नाही.

तिचा टच आणि फटक्यांतील वैविध्य अंतिम सामन्यात दिसले नाही. ती एकाच प्रकारचे फटके मारत राहिली आणि त्याने आंद्रीवाचे काम सोपे झाले. दोघीही वारंवार एकमेकीची सर्व्हिस भेदत होत्या. आंद्रीवा सर्व्हिसच्या दुहेरी चुका करत होती तर च्वालिन्स्काचे फोरहँडचे फटके चुकत होते. अनेकदा चांगली संधी मिळूनही तिचे परतीचे फटके नेटमध्ये जात होते. आणि त्यामुळेच आंद्रीवाची सामन्यावरील पकड घट्ट होत गेली. पहिला सेट तिने 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये च्वालिन्स्का पुरती खचलेली वाटत होती. हाही सेट आंद्रीवाने 6-2 असा जिंकला आणि विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. ती कोको गॉफ (18) आणि किम क्लिस्टर्स (19) यांच्यानंतरची अंतिम फेरी गाठणारी सर्वात लहान वयाची खेळाडू झाली. गेल्या वर्षी तिने या स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली होती. पण पुढे जाण्यात ती अपयशी ठरली होती. पराभूत झालेल्या च्वालिन्स्काचे क्रमवारीतील स्थान 114 वरून आता 21 वर आले आहे.

पुरुष एकेरीतही अनेक मानांकित खेळाडू सुरुवातीलाच गारद झाले. त्यांत मेदवेदेव, सिनर आणि जोकोविच यांचाही समावेश होता. पहिल्याच दिवशी अमेरिकेच्या निशेश बसवरेड्डीने सातवे मानांकन असलेल्या त्याच्याच देशाच्या टेलर फ्रिट्झला चुरशीच्या सामन्यात हरवले, मात्र दुसऱ्या फेरीत तो अमेरिकेच्याच मिशेल्सेनकडून तो हरला आणि स्पर्धेबाहेर गेला. याच फेरीत माजी विजेत्या मेदवेदेवला वॉल्टनने पराभूत केले. तर दुसऱ्या फेरीत कॅलिग्नॉनने पाचव्या मानांकित शेल्टनचा सरळ सेटमध्ये फडशा पाडला. तर जोआओ सेरुंडेलोने अग्रमानांकित आणि माजी विजेत्या यानिक सिनरला कडव्या लढतीत नमवले. खरे तर सिनर पहिले दोन सेट जिंकून तिसऱ्या सेटमध्येही आघाडीवर होता. पण नंतर मात्र त्याचा खेळ एकदम खालावला. त्याचा फायदा घेत सेरुंडेलोने सगळी पिछाडी भरून काढली आणि तो सेट जिंकला. त्यानंतर सिनरची सगळी तकडच गेल्यासारखा त्याचा खेळ झाला. त्यामुळे नंतरचे दोन सेट सेरुंडेलोने सहज जिंकले आणि स्पर्धेतला सगळ्यांत मोठा धक्कादायक विजय मिळवला.

तिसऱ्या फेरीत यासारखाच मोठा धक्का ब्राझीलच्या जोआओ फोन्सेकाने दिला. अल्काराझची अनुपस्थिती आणि सिनरचा दुसऱ्या फेरीत पराभव यामुळे जोकोविचला कारकीर्दीतले 25 वे स्लॅम विजेतेपद मिळवण्याची संधी होती. पण फोन्सेकाने त्याचे स्वप्न साकार होऊ दिले नाही. पहिले दोन सेट गमावल्यानंतरही त्याने आशा सोडली नाही आणि नेटाने बलाढ्य जोकोविचला झुंज दिली. तिसऱ्या सेटपासूनच जोकोविचच्या खेळाची लय बिघडलेली दिसली. अखेर त्याच्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. विक्रमी 25 वे जेतेपद त्याच्यापासून खूपच दूर गेल्यासारखे दिसत आहे. याच फेरीत आठव्या मानांकित डी मिनॉरवर जेकब मेन्सिकने विजय मिळवला. पुढच्याच फेरीत मेन्सिकने अकरावे मानांकन असलेल्या रुब्लेववरही पाच सेटच्या अटीतटीच्या लढतीत मात केली. तर याच फेरीत बेरेट्टिनीने सेरुंडेलोवर सरळ विजय मिळवला. पण उपान्त्यपूर्व फेरीत मात्र अर्नाल्डोविरुद्ध पिछाडीवर असताना बेरेट्टीनीने सामना सोडला. उपान्त्यपूर्व फेरीतच चौथ्या मानांकित ऑगर अलिआसिमला फ्लाविओ कोबोलीने पराभूत केले होते.


हेही वाचा : गुड बाय सानिया! (भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या कारकीर्दीचा मागोवा) - आ. श्री. केतकर


यंदाची फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा सनसनाटीच म्हणावी लागेल. याचे कारण असे की, या स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरी विभागात सुरुवातीपासूनच मोठी पडझड होत राहिली. म्हणजे प्रथितयश आणि या वर्षी उत्तम सीडिंग मिळालेले अनेक खेळाडू पहिल्या काही फेऱ्यांतच गारद झाले. तेही नावाजलेल्या नव्हे, तर नवोदित खेळाडूंकडून. पहिले मानांकन असलेले खेळाडू सिनर आणि सबालेंका उपांत्य फेरीही गाठू शकले नाहीत. महिलांमध्ये तर पहिल्या सात सीडेड खेळाडू उपांत्य फेरीआधीच स्पर्धेबाहेर गेल्या. आठवे मानांकन असलेल्या मिरा आंद्रीवाने अजिंक्यपद मिळवले आणि मानांकनाची बूज राखली. पुरुष एकेरीतही काही फार वेगळे चित्र नव्हते. पहिल्या दहा मानांकित खेळाडूंमधील फक्त दुसरे मानांकन असलेला झ्वेरेव्ह आणि दहावे मानांकन मिळालेला कोबोली हे दोघेच उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचू शकले. अंतिम सामना त्यांच्यातच झाला आणि झ्वेरेवने बाजी मारली.

महिलांच्या एकेरी स्पर्धेचा पहिला मोठा धक्का अनास्तेशिया पोटापोवाने चौथ्या मानांकित कोको गॉफला हरवून दिला, तर तिसऱ्याच फेरीत जिल टिचमानने दहाव्या सीडेड कॅरोलिना मुचोवावर विजय मिळवला. डायना पेरीने सहाव्या मानांकित अमांडा अनिसिमोवाला असे पराभूत केले. असेच धक्के पुढेही मिळत गेले. चौथ्या फेरीत तिसऱ्या मानांकित इगा स्विआटेकला मार्टा कोस्त्युकने सरळ सेटमध्ये नामोहरम केले, तर डायना श्नायडरने मॅडिसन मात केली. उपान्त्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित श्नायडरने पहिल्या मानांकित अरीना सबालेंकावर सनसनाटी मात केली, हा मोठाच धक्का होता, पण उपान्त्य फेरीत श्नायडरला मानांकन नसलेल्या माया च्वालिन्स्काने सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आणि आठव्या सीडेड मिरा अॅन्ड्रीवाने कोत्स्युकावर सरशी मिळवली.

एक लक्षणीय बाब अशी की यावेळी उपान्त्य फेरीत झ्वेरेवचा अपवाद सोडला तर एकही खेळाडू पंचवीसहून जास्त वयाचा नव्हता. महिलांमध्येही तीच परिस्थिती होती. म्हणजे युवा शक्तीचा प्रभाव आता प्रकर्षाने जाणवू लागला आहे.

महिला दुहेरी मध्ये कॅटरीना सिनिआकोवा आणि टी. टाउनसेंड या जोडीने अजिंक्यपद मिळवले तर पुरुष दुहेरीमध्ये मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरेंशिओ झेबालोस या गेल्या वर्षीच्या विजेत्या जोडीने या वर्षीही ही स्पर्धा जिंकली. मिश्र दुहेरीमध्ये सारा एरानी आणि आन्द्रेआ वारासोरी यांना विजेतेपद मिळाले. 18 वर्षांखालील एकेरीत मुलग्यांच्या गटात गुटो मिगुएल विजयी झाला. रशियन खेळाडूंवर सध्या असलेल्या क्रीडा निर्बंधांमुळे तटस्थ खेळाडू म्हणून खेळत असलेली अलिसा ओक्टियाब्रेवा मुलींच्या एकेरीत जिंकली.

पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांब्री आणि त्याचा साथीदार न्यूझीलंडचा मायकल व्हीनस ही जोडी पहिल्याच फेरीत गारद झाली होते तर भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनेर या जोडीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. करमन कौर थंडी या युवा खेळाडूकडून भारताला महिला एकेरीत आशा होत्या, परंतु ती पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात हरली. 18 वर्षांखालील खेळाडूंच्या एकेरी स्पर्धेत अर्णव पापरकर तिसऱ्या फेरीपर्यंत तर माया राजेश्वरन रेवती दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचू शकले.

या प्रकारे प्रथमच या स्पर्धेला नवे विजेते देऊन 2026 ची फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा समाप्त झाली. आता तीन आठवड्यांनंतर येणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत काय होते ते पाहायचे.

 

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)

Tags: French Open Grand Slam Roland Garros French Open 2026 Maja ­Chwalinska Mirra Andreeva Alexander Zverev Flavio Cobolli N. Sriram Balaji Yuki Bhambri फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा 2026 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा फ्रेंच ओपन अलेक्झांडर झ्वेरेव माया च्वालिन्स्का च्वालिन्स्का फ्लाविओ कोबोली मिरा आंद्रीवा युकी भांब्री एन श्रीराम बालाजी Load More Tags

Add Comment