उगवती नोस्कोव्हा, मावळतीला झुकलेला जोकोविच आणि दरम्यान विम्बल्डन

विम्बल्डन 2026 चा लेखाजोखा

यंदा यानिक सिनरने विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद लागोपाठ दुसऱ्यांदा मिळवले. अंतिम सामन्यात त्याने यंदाचा फ्रेंच ओपनचा विजेता अलेक्झांडर झ्वेरेव याचा चार सेटच्या लढतीत पराभव केला. गेल्या वर्षी सिनरने कार्लोस अल्काराझला हरवून जेतेपद मिळवले होते. 1968 मध्ये विम्बल्डन स्पर्धा व्यावसायिक खेळाडूंसाठी खुली झाली. तेव्हापासून या स्पर्धेत लागोपाठची दोन वर्षे विजेतेपद मिळवणारा तो दहावा खेळाडू आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेतील त्याचे हे पाचवे विजेतेपद आहे. या विजयाने त्याने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत झालेल्या पराभवाची नामुष्की झटकून टाकली. त्याबरोबरच आपण सध्याचा सर्वोत्तम खेळाडू आपणच आहोत हे दाखवून दिले. विम्बल्डनचा अंतिम सामना हा टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा मालिकेतल त्याने जिंकलेला शंभरावा सामना आहे.

सिनर गतसालचा विम्बल्डन विजेता तर झ्वेरेव यंदाचा फ्रेंच खुल्या स्पर्धेचा विजेता. झ्वेरेवने दीर्घ प्रतीक्षेनंतर पहिले वहिले विजेतेपद मिळवल्यामुळे तयाचा आत्मविश्वास आणि खेळ उंचावलेला होता. त्यामुळे या लढतीत चुरस असेल असा अंदाज होता. सामन्याचा अर्ध्याहून अधिक वेळ तो अंदाज खराही ठरला. पहिल्या दोन सेट्समध्ये कुणालाच प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस तोडण्यात यश मिळाले नव्हते. त्यामुळे दोन्ही सेट्समध्ये टायब्रेकरचा अवलंब करावा लागला होता आणि दोघा प्रतिस्पर्थ्यांनी एक एक सेट जिंकला होता. सामना तुल्यबळ खेळाडूंत होत होता. पण दुसरा सेट जिंकल्यानंतर मात्र सिनरने सामन्यावर पकड घेतली. तिसरा सेट तुलनेने सहज जिंकल्यानंतर, चौथ्या सेटमध्ये पहिल्याच मॅच पॉइंटवर त्याने मारलेला फोअरहँड शॉट झ्वेरेव परतवू शकला नाही आणि विजयाच्या आनंदाने सिनर हिरवळीच्या कोर्टवर आडवा झाला.

तिसऱ्या सेटमध्ये जेव्हा दोघांनीही प्रत्येकी तीन गेम जिंकलेले होते, त्यावेळी सिनरला पहिला ब्रेक पॉइंट मिळाला. तेव्हा सामना सुरु होऊन दोन तास बेचाळीस मिनिटे झालेली होती. त्यावेळी सिनरने एक ड्रॉप शॉट अगदी अलगदपणे नेटजवळ मारला. तो परतवण्यासाठी झ्वेरेव धावला. पण बेसलाइनवरून एकदम वळून नेटकडे धावताना त्याचा पाय घसरून तो पडला. त्याच्या उजव्या पायाचा गुडघा दुखावला होता. गुडघा घट्ट पकडून तो बसला होता. सिनरने खिलाडू वृत्ती दाखवत नेटपलीकडे जाऊन झ्वेरेवचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली. झ्वेरेवला उजव्या पायात वेदना जाणवतच होत्या. तरीही त्याने जिद्दीने पुन्हा खेळायला सुरुवात केली. पण त्याला उजव्या पायाची हालचाल करणे थोडे अवघड जात होते. त्याचा परतीचा एक फटका चुकला आणि सिनरने आघाडी घेतली. आठव्या गेममध्ये सिनरने झ्वेरेवची सर्व्हिस भेदून आघाडी घेतली. नंतरच्या गेममध्ये त्याचीच सर्व्हिस होती. तो सर्व्हिस गेम जिंकून सिनरने तिसरा सेटही जिंकला. चौथ्या सेटमध्ये मात्र पुन्हा चार-चार गेम्सची बरोबरी होती. नवव्या गेममध्ये त्याने झ्वेरेवची सर्व्हिस भेदण्यात यश मिळवले आणि नंतर स्वतःची सर्व्हिस गेम जिंकून तो सेट आणि सामनाही जिंकला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच झ्वेरेव आत्मविश्वासाने खेळत होता. त्याची सर्व्हिसही वेगवान होती. साधारण ताशी 200 कि. मी. च्या वेगाने तो सर्व्हिस करत होता. एकदा तर त्यानं 224 कि. मी.ची मजल गाठली होती. सिनरही प्रयत्न करत होता, पण अनेकदा त्याची पहिली सर्व्हिस चुकत होती. असे असले तरी तो अचूकपणे बिनतोड सर्व्हिस करत होता. संपूर्ण सामन्यात त्याच्या 15 तर झ्वेरेवच्या 17 बिनतोड सर्व्हिस होत्या. दोघांनीही दोन वेळा सर्व्हिसची दुहेरी चूक केली. सिनरला पाच ब्रेक पॉइंट मिळाले, त्यातले दोन त्याने जिंकले, झ्वेरेवला फक्त एकदाच ब्रेक पॉइंट मिळाला होता, पण तोही त्याने गमावला, याच बाबतीत सिनर सरस ठरला. 

दीर्घकाळ चाललेल्या या सामन्याने प्रेक्षक मात्र खुश झाले. ते दोघाही खेळाडूंना उत्तेजन देत होते. चांगल्या फटक्यांना दाद देत होते. परंतु दुसऱ्या सेटमध्ये यश मिळाल्यानंतर तिसऱ्या सेटपासून सिनरने वर्चस्व गाजवले, तरी आधीच्या दोन सेटमधील खेळाडूंचा खेळ आणि अटीतटीच्या प्रयत्नांनी प्रेक्षकांना आपण हा सामना पाहत असल्याचे समाधान मिळत होते.

महिलांच्या अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडू चेक प्रजासत्ताकाच्या होत्या. अनुक्रमे नववे आणि दहावे मानांकन असलेल्या लिंडा नोस्कोव्हा आणि मॅरोलीना मुकोव्हा. नोस्कोव्हा 21 वर्षांची तर मुकोव्हा 29 वर्षाची. सामना सुरू झाल्यापासूनच नोस्कोव्हाने पकड घेतली होती. प्रभावी सर्व्हिस, जोरदार आणि अचूक फटके ती कौशल्याने वापरत होती. मुकोव्हाकडून होत असलेल्या चुकांचा पुरेपूर फायदा उठवत होती. तिने पहिला सेट जिंकला. आणि दुसऱ्या सेटमध्येही 5-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र नोस्कोव्हाकडून चुका होऊ लागल्या आणि तिने तीन सेट पॉइंट गमावले. यावेळी मुकोव्हाला सूर सापडला. तिच्या फटक्यांत धार आली. उलट नोस्कोव्हाकडून एकामागोमाग एक चुका होत गेल्या. मुकोव्हाने ओळीने पाच गेम जिंकले आणि सामना बरोबरीत आणला. 

तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण नोस्कोव्हा दुसऱ्या सेटच्या धक्क्यानंतर सावरली होती, तिने आपल्या चुका सुधारून खेळावर ताबा मिळवला. पहिल्या दोन सेटप्रमाणेच या सेटमध्येही तिने झटपट 5-2 अशी आघाडी घेतली होती. पण तेव्हाच मुकोव्हाने एक गेम जिंकला. ती आता दुसऱ्या सेटप्रमाणे पुन्हा खेळावर पकड घेणार असे वाटत होते. पण यावेळी नोस्कोव्हाने तिला रोखले. दुसऱ्या सेटची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. तिच्याकडे तीन मॅच पॉइंट होते त्यातले दोन तिने गमावले तरी एका बिनतोड सर्व्हिच्या जोरावर तिने सेट आणि सामनाही जिंकला.

चेक प्रजासत्ताकाच्या मार्केटा व्हॉन्डुस्कोव्हाने 2023 मध्ये तर बार्बरा क्रेसिकोव्हाने 2024 मध्ये विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. आता नोस्कोव्हा अजिंक्य ठरल्यामुळे गेल्या चार वर्षांत तीन चेक खेळाडू विम्बल्डनविजेत्या ठरल्या आहेत. त्यांपैकी नोस्कोव्हा ही वयाने सर्वात लहान आहे. तिचे ग्रँड स्लॅम मालिकेतील हे पहिलेच विजेतेपद आहे. ती 2022 मध्ये व्यावसायिक खेळाडू बनली. त्याआधी 2020 मध्ये तिने डब्ल्यूटीएच्या स्पर्धेच्या पात्रता फेरीपासून सुरुवात केली होती. 2021 मध्ये तिने खुल्या फ्रेंच स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद मिळवले होते. आणि पुढच्याच वर्षी तिने व्यावसायिक क्रमवारीत 100 च्या आत स्थान मिळवले होते. सर्वात लहान खेळाडू म्हणून कोको गॉफने त्याआधी मान मिळवला होता पण नोस्कोव्हाने तिला मागे टाकले. 2024 मध्ये तिने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. गँड स्लॅम स्पर्धेत पदार्पणाच्या वर्षीच अंतिम फेरी गाठणारी 2020 नंतरची ती चौथी खेळाडू आहे.

अंतिम फेरीत तिची मुकोव्हाबरोबर लढत झाली असली, तरी त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. पॅरिस ऑलिंपिकमध्ये त्या जोडीने दुहेरीत खेळल्या होत्या. त्यांनी उपान्त्य फेरीही गाठली होती. पण त्यावेळी त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

फ्रेंच खुल्या स्पर्धेपाठोपाठ यंदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेतही अनेक मानांकित खेळाडूंना हार पत्करावी लागली, त्यातही विशेष म्हणजे महिलांच्या एकेरीत मानांकित पाच खेळाडूंना उपान्त्यपूर्व फेरीही गाठता आली नाही. आणि ती गाठलेल्या चौथ्या मानांकित पेगुलालाही उपान्त्त्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित कोको गॉफने पराभूत केले. मात्र उपान्त्य फेरीत गॉफलाही दहाव्या मानांकित मुकोव्हाने पराभूत गेले. अंतिम फेरीत नवव्या आणि दहाव्या मानांकित अनुक्रमे नोस्कोव्हा आणि मुकोव्हा या पोहोचल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात मानांकित खेळाडूंची पडझड होण्याची विम्बल्डनमधली ही बहुधा पहिलीच वेळ असावी. पुरुषांच्या एकेरीतही बरेच मानांकित खेळाडू मानांकनाला न्याय देऊ शकले नाहीत. पहिले आणि दुसरे मानांकन मिळालेल्या, सिनर आणि झ्वेरेवने मात्र आपल्या मानांकनाची बूज राखली.

सातव्या मानांकित नोवाक जोकोविचसाठी यंदाची विम्बल्डन स्पर्धा प्रचंड कष्टाची ठरली. उपान्त्य फेरीपर्यंत तो पोहोचला खरा पण पहिल्या फेरीपासूनच सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी त्याला किमान चार सेट खेळून शर्थीचे पयत्न करावे लागले. तिसऱ्या मानांकित ऑगर अलि आसिमविरुद्ध उपान्त्यपूर्व फेरीचा सामना जिंकण्यासाठी तर त्याला तब्बल पावणेसहा तास निकराची झुंज द्यावी लागली. हा सामना विम्बल्डनच्या इतिहासातला सर्वाधिक वेळ चाललेला सामना ठरला. स्पर्धेतल्या अशा खडतर प्रवासामुळे उपान्त्य फेरीच्या सामन्यापर्यंत 39 वर्षांचा जोकोविच पार थकून गेलेला होता. उपान्त्य फेरीत त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभा असलेला सध्याचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू यानिक सिनर केवळ 24 वर्षांचा आहे. त्यांच्या वयसुलभ ताकदीतला फरकही स्पष्टपणे दिसत होता. अखेर सिनरने विनासायास सरळ तीन सेटमध्ये उपान्त्य सामना जिंकून जोकोविचचे आव्हान आणि ग्रँड स्लॅम मालिकेत 25 वे विजेतेपद मिळवण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळवले. निवृत्तीची वेळ जवळ आल्याची जाणीव जोकोविचला कदाचित झाली असेल...

मुलांच्या एकेरीत अमेरिकेचा जॉर्डन ली अजिंक्य ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या कुझ हेविटवर मात केली. पुरुष दुहेरीत भारताचे तिन्ही खेळाडू त्यांच्या जोडीदारांसह पहिल्याच फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडले. युकी भांब्री आणि मायकेल व्हीनसला सरळ दोन सेटमध्ये हार पत्करावी लागली. एन. श्रीराम बालाजी आणि मार्सेलो डेमोलायन यांचीही तीच गत झाली. अनिरुद्ध चंद्रशेखर आणि ताकेरु सुझुकी यांना बुसे आणि मार्को टुंजुलेट्टी यांच्याकडून हार पत्करावी लागली.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)

Tags: wimbledon wimbledon 2026 djokovich sinner jannik sinner noskova muchova Load More Tags

Add Comment