रुपेरी पडद्यावरच्या बहुरंगी आठवणी 

संजीव कुलकर्णी लिखित 'शटरस्पीड' : 1970 ते 2023 या काळातल्या चाळीस हिंदी चित्रपटांची सफर

चित्रपटांच्या संदर्भात त्या काळी 'आर्ट फिल्म्स' विरुद्ध 'कमर्शिअल फिल्म्स' असा एक वाद होता, असे लेखक 'ट्रेलर' या प्रस्तावनेत म्हणतो. हा वाद मला फारसा कळला नाही, असे सांगून तो पुढे म्हणतो, चांगले चित्रपट विरुद्ध वाईट चित्रपट एवढेच कळण्याइतपत माझी धाव गेली. पण असे म्हटले असले, तरी त्याने निवडलेल्या चित्रपटांवरून त्याला वेगळ्या धाटणीचे चित्रपट अधिक भावतात, हे दिसते. त्यामुळे अशा अनेक चित्रपटांचा समावेश त्याने पुस्तकात केला आहे आणि त्यांच्याविषयी मनापासून लिहिले आहे.

आपल्या देशात अनेकांना चित्रपट हा आयुष्याचा अविभाज्य भाग वाटतो. काही जण तर चित्रपट पाहण्यात इतके गुंतलेले असतात की त्याचे जणू व्यसनच लागलेले असते. त्यामुळे ते अनेकदा काही चित्रपट एकाहून अधिक वेळा पाहतात आणि उरलेला वेळ मित्रमंडळींमध्ये त्यांच्याबद्दल बोलण्यात घालवतात. त्यांच्यात घनघोर वाद होतात, भांडणेही होतात. पण ती सारी कपातली वादळे असतात. कारण त्या सगळ्यांची आवड एकच असते, ती म्हणजे चित्रपट पाहणे. प्रत्येकाची आवड वेगळी असल्यामुळे मतभेद होतातच. प्रत्येकजण आपल्याला आवडलेल्या चित्रपटांबद्दल, त्यांतील नायक-नायिकांबद्दल, इतकेच काय, खलनायकांबद्दलही बोलत असतो. काहींना प्रादेशिक भाषांतील चित्रपटांचे, काहींना हिंदीचे, तर मोजक्या जणांना इंग्रजी चित्रपटांचे आकर्षण असते. कुणाला विनोदवीर आवडतात, तर कुणाला नाचगाणी. असे असले, तरी सिनेमा पाहायला जायचे म्हटले की हे सगळे एका पायावर तयार असतात. कारण सिनेमा म्हटले की सर्वांनाच जणू नशा चढते.

डॉ. संजीव कुलकर्णी हे अशांपैकीच. खरे तर त्यांनी दोन पीएचडी मिळवल्या आहेत. पहिली व्यवस्थापन या विषयात, तर दुसरी मराठीत. तिचा विषय होता, 'जी. ए. कुलकर्णी यांचे साहित्य : कन्नड-मराठी सांस्कृतिक अनुबंध'. गंमत म्हणजे, त्याआधी त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात एमएस्सी केले होते. त्यानंतर त्यांचे लेखन सुरू झाले आणि तेही विविध विषयांवर. कथा, विज्ञानकथा, ग्रामीण कथा, मुलांसाठी विज्ञानकथा, ललितलेख असे त्यांचे लेखन आहे. त्यासाठी त्यांना काही पुरस्कारही मिळाले आहेत. आता लहानपणापासून झपाटून टाकणाऱ्या चित्रपटांविषयीचे आस्वादात्मक लेखन 'शटरस्पीड' या पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध झाले आहे.

या पुस्तकात त्यांनी काही परिचित, तर काही अनवट हिंदी चित्रपटांचा धांडोळा घेतला आहे. मुख्य म्हणजे, हे चित्रपटांचे केवळ परीक्षण किंवा समीक्षा नाही, तर त्यात आस्वादाचाही समावेश आहे. चित्रपटांतील सौंदर्यस्थळांची मीमांसा करताना लेखकाने त्यांच्या उणिवांचीही नोंद घेतली आहे. हे लेख वाचताना काही ठिकाणी पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो, तर काही अपरिचित चित्रपटांची ओळखही होते. पुस्तकातील काही चित्रपट अनेकांनी पाहिलेले नसतील; पण वाचल्यावर ते मुद्दाम पाहायला हवेत, असे वाचकांना नक्की वाटेल.

पुस्तकात त्यांनी 1970 ते 2023 या अर्धशतकाहून अधिक काळातील चाळीस चित्रपटांविषयी लिहिले आहे. त्यामुळे त्याआधीच्या चित्रपटांची नोंद अर्थातच यात नाही. चित्रपटांची नावे येथे देत आहे; मात्र त्यांच्या लेखांना दिलेले मथळे वाचकांनी प्रत्यक्ष पुस्तकातच वाचावेत. उदाहरणार्थ, 'नफरत करनेवालोंके' या चित्रपटासाठी 'जॉनी मेरा नाम : रुपेरी पडद्यामागचा चित्रपट', 'गुड्डी : एक हवाहवासा बावर्ची', 'तीन हिरवट म्हाताऱ्यांची कथा : शौकीन', 'दोन देशांत चिरडलेली माणसे : राजी' असे काही मथळे आहेत. त्यांतून त्या चित्रपटांविषयी लेखकाला काय वाटते, याची कल्पना येते. कधी चित्रपटाच्या निमित्ताने लेखक स्मरणरंजनही करतो. हे लेख साधारण चार ते सात पानांचे असल्याने चटकन वाचून होतात.

लेखकाने निवडलेले चित्रपट (प्रदर्शनाच्या वर्षासह) असे : जॉनी मेरा नाम, गुड्डी, बावर्ची, शोर, बेनाम, खुशबू, चश्मे बद्दूर, कलयुग, शौकीन, बेमिसाल, नमकीन, न्यू दिल्ली टाइम्स, एक रुका हुआ फैसला, मैं आजाद हूँ, ब्लॅक, खोसला का घोसला, काबुल एक्स्प्रेस, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., जॉनी गद्दार, वेलकम टू सज्जनपूर, विकी डोनर, कहानी, बेबी, कपूर अँड सन्स, हॅपी भाग जायेगी, बरेली की बर्फी, न्यूटन, मंटो, बधाई हो, कारवाँ, राजी, आर्टिकल १५, रामप्रसाद की तेरहवी, लूडो, चंदीगड करे आशिकी, कटहल आणि सॅम बहादूर.

पहिलाच लेख 'जॉनी मेरा नाम'वर आहे. त्यात देव आनंदबरोबरच विजय आनंदविषयीही बरेच लिहिले आहे. विजय आनंदच्या चित्रपटांत देवने चांगला अभिनय केला. गोल्डी म्हणजेच विजय आनंदच्या दिग्दर्शनाखाली देव आनंद चांगला वठला, असे लेखक मुद्दाम सांगतो. पुढे देव आनंद दिग्दर्शनाकडे वळला आणि सारेच बिनसले, असे त्याला वाटते. विजय आनंद अभिनयाच्या आणि देव आनंद दिग्दर्शनाच्या नादाला लागले नसते तर किती बरे झाले असते, अशी टिप्पणीही तो करतो.

देव आनंद आणि ऐन तारुण्यातील हेमा मालिनी यांचा जोडा अगदी रती-मदनासारखा वाटतो. हेमा मालिनी या चित्रपटात केवळ 'चिकणी' दिसते, तर देव आनंदची भूमिका बाँडच्या भूमिकेसारखी मिश्किल आहे, असे लेखक सांगतो. प्रेमनाथ आणि प्राण यांच्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा वेगळ्या भूमिका यात आहेत. प्राणच्या करड्या आवाजाचा दिग्दर्शकाने छान उपयोग करून घेतला आहे. आय. एस. जोहरकडूनही गोल्डीने धमाल काम करून घेतले आहे. संवाद हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. गाण्यांचे चित्रीकरण ही गोल्डीची खासियत. त्यामुळेच आजही या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना आवडतात. लेखाच्या अखेरीस लेखक म्हणतो, 'असा हा जॉनी मेरा नाम. देव आनंदच्या चाहत्यांसाठी मेजवानीच. ज्यांना देव आनंद आवडत नाही, अशांनाही "नफरत करनेवालोंके सीनेमे प्यार भरदूं" या त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायला लावणारा.'

हृषिकेश मुखर्जीच्या 'गुड्डी'विषयी लिहिताना लेखक प्रथम चित्रपटाची कथा थोडक्यात सांगतो. चित्रपटांची दुनिया खरी नसते, हे गुड्डीला समजावून सांगण्यासाठी तिचे मामा आणि प्रोफेसर गुप्ता साक्षात धर्मेंद्रचीच मदत घेतात. कारण गुड्डीचे त्याच्यावर प्रेम असते. त्याचे आधीच लग्न झाले आहे आणि तो आपल्याला अप्राप्य आहे, हे तिला माहीत असूनही आपले प्रेम मीरेप्रमाणेच पवित्र आहे, असे तिला वाटते.

सिनेसृष्टीत काळ्याचे पांढरे करणाऱ्या हृषिकेश मुखर्जींच्या हातात अशी साधी कथा येते, तेव्हा ते त्यातून काहीतरी वेगळे निर्माण करतात. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील एखाद्या शाळकरी मुलीसारखी दिसणारी, लहान चणीची मुलगी ते नायिका म्हणून निवडतात. हिंदी चित्रपटसृष्टीला अपरिचित असलेल्या एका बंगाली तरुणाला नायक म्हणून उभे करतात. प्रोफेसर गुप्तांच्या भूमिकेसाठीही बंगाली चित्रपटांत प्रसिद्ध असलेल्या एका चरित्र अभिनेत्याची निवड करतात. आणि धर्मेंद्रच्या भूमिकेसाठी साक्षात धर्मेंद्रलाच घेतात.

हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटांची खासियत असलेला नर्मविनोद यातही जागोजागी जाणवतो. व्यावसायिक चित्रपटांची खिल्ली उडवणारे प्रसंगही आहेत. धर्मेंद्रला भेटल्यावर गुप्ताजी सांगतात की गुड्डीसारख्या हजारो मुली त्यांच्या प्रेमात पडल्या आहेत. त्यावर धर्मेंद्र मिश्किलपणे म्हणतो, 'मैं तो आजकल राजेश खन्नाका नाम सुन रहा हूँ!' गुड्डीला चित्रपटांमधला खोटेपणा कळावा म्हणून मामाजी तिला शूटिंग पाहायला नेतात. तिचे गैरसमज दूर करण्यात त्यांना यश मिळते. त्यासाठी धर्मेंद्रचीही मदत होते. अखेर गुड्डीचे गैरसमज दूर होतात आणि तिचे लग्न होते.

जया भादुरीचा हा पहिलाच चित्रपट. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात युवराज सिंगने जे केले, तसेच काहीसे या सामान्य चेहऱ्याच्या, लहानखुऱ्या चणीच्या आणि भावपूर्ण डोळ्यांच्या मुलीने केले आहे. दिलीपकुमारबद्दल बोलताना ती त्याची नक्कल करते, तो एकच प्रसंग तिची पुढची वाटचाल कशी असणार आहे, याचा अंदाज देऊन जातो. हा चित्रपट माणसातल्या चांगुलपणावर पुन्हा विश्वास ठेवावा, असे वाटायला लावणारा आहे, असे लेखक म्हणतो.

'खोसला का घोसला' या आवडत्या चित्रपटावर लिहिताना शेवटी लेखक म्हणतो की इतका चांगला, मजेदार चित्रपट करणाऱ्या लेखक-दिग्दर्शकांना यापेक्षा चांगले नाव सुचू नये, याचे आश्चर्य वाटते. या चित्रपटात काढायचा झाला, तर हाच एक दोष आहे.

'खुशबू'बद्दल लिहिताना गुलजार सामान्य कुवतीच्या अभिनेत्यांकडूनही उत्तम काम करून घेतात, हे सांगताना लेखक म्हणतो की त्यांनी जीतेंद्रला चक्क चांगला अभिनय करायला लावला आहे. फरिदा जलालच्या अभिनयाचेही त्याने कौतुक केले आहे.

'राजी' या चित्रपटात आलिया भटने भारतीय स्त्री-गुप्तहेराची भूमिका केली आहे. लहान चणीची ही मुलगी हेर म्हणून कितपत विश्वासार्ह वाटेल, अशी शंका येऊ शकते; पण आलियाने आपल्या अभिनयकौशल्याने ती दूर केली आहे. मनात नसतानाही ती पाकिस्तानी नवऱ्याच्या प्रेमात पडते. आलियाच्या डोळ्यांतून ही गुंतागुंतीची भावना व्यक्त होते. हेर म्हणून तिची कामगिरी यशस्वी होते; पण युद्धाची भाषा, हा विध्वंस, हा रक्तपात आपल्याला समजत नाही, या जाणिवेने ती विदीर्ण होते. हे आलियाने फार सुरेख दाखवले आहे. 'राजी'ची आलिया भट ही निर्विवाद नायिका आहे.

चित्रपटांच्या संदर्भात त्या काळी 'आर्ट फिल्म्स' विरुद्ध 'कमर्शिअल फिल्म्स' असा एक वाद होता, असे लेखक 'ट्रेलर' या प्रस्तावनेत म्हणतो. हा वाद मला फारसा कळला नाही, असे सांगून तो पुढे म्हणतो, चांगले चित्रपट विरुद्ध वाईट चित्रपट एवढेच कळण्याइतपत माझी धाव गेली. पण असे म्हटले असले, तरी त्याने निवडलेल्या चित्रपटांवरून त्याला वेगळ्या धाटणीचे चित्रपट अधिक भावतात, हे दिसते. त्यामुळे अशा अनेक चित्रपटांचा समावेश त्याने पुस्तकात केला आहे आणि त्यांच्याविषयी मनापासून लिहिले आहे. उदाहरणार्थ, 'वेलकम टू सज्जनपूर', 'विकी डोनर', 'कहानी', 'न्यूटन', 'मंटो', 'बधाई हो', 'राजी', 'आर्टिकल 15', 'कटहल' इत्यादी.

'ब्लॅक' या चित्रपटावरील लेखातील एक परिच्छेद पाहण्यासारखा आहे. लेखक लिहितो, "अल्झायमरची सुरुवात होत असताना आधी माणसाला लहानसहान गोष्टी आठवायला त्रास होतो. नेहमीच्या गोष्टी करतानाही गोंधळ होतो. असाच एक प्रसंग 'ब्लॅक'मध्ये आहे. मिशेलची ब्रेलमधील पुस्तके देण्यासाठी तिच्या कॉलेजचे प्राचार्य देवराजला बोलावतात. पुस्तके घेतल्यानंतर प्राचार्यांकडे बघताना देवराजचा चेहरा कोरा होतो. अगदी ब्लँक. त्याचे डोळे शून्यात जातात. गोंधळलेल्या आवाजात तो प्राचार्यांना विचारतो, 'हाऊ डू आय गो आऊट? मैं बाहर कैसे जाऊं?' हा अमिताभ. हा खरा अमिताभ. हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वात व्यावसायिक, सर्वात पेशावर, सर्वात प्रोफेशनल अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडे का पाहिले जाते, हे 'ब्लॅक' बघून कळते.

राणी मुखर्जीने या चित्रपटात आपला सगळा बॉलीवूडी मेकअप उतरवून ठेवला आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चित्रपटाचा खोलवर आणि तपशीलवार विचार करण्याबाबत ख्याती आहे. या चित्रपटाचा एक विशिष्ट पोत त्यांनी डोळ्यांसमोर ठेवला होता आणि संपूर्ण चित्रपटभर तो सांभाळण्यासाठी मेहनत घेतल्याचे जाणवते. राणीच्या तपकिरी डोळ्यांमुळे हा पोत बिघडू नये म्हणून तिला काळ्या रंगाच्या लेन्सेस देण्यात आल्या. अमिताभ, राणी आणि आयेशा कपूर (लहानपणीची मिशेल) या तिघांनीही आपापल्या भूमिका अधिक प्रभावी व्हाव्यात म्हणून सांकेतिक भाषेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. परिणामी, राणीला तिच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय अभिनय करता आला."

लेखकाने फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील 'सॅम बहादूर' या चित्रपटाबद्दलचे लेखन अगदी मनापासून केले आहे. त्यातील किस्से गमतीशीर आहेत. त्यातला एक असा. एकदा सॅम माणेकशॉ रुबाबात राऊंडवर असतात. एका जवानाला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने एक हजार वेळा सॅल्यूट करण्याची शिक्षा ठोठावलेली असते. कारण त्या जवानाने त्या अधिकाऱ्याला पाहूनही सॅल्यूट केला नव्हता. जवान म्हणतो, 'माझी चूक झाली, साहेब. मी साहेबांना बघितलंच नव्हतं.' त्यावर तो भरघोस मिशांचा माणूस म्हणतो, 'गुड वर्क, ऑफिसर. आर्मीत शिस्त अशीच वाढते. पण आर्मीचा एक नियम आहे. ऑफिसर, प्रत्येक सॅल्यूटचं उत्तर सॅल्यूटनं दिलं पाहिजे. तेव्हा सुरू करा दोघेही. एकमेकांना सॅल्यूट करा. एक हजार वेळा!' तो जवान आणि अधिकारी एकमेकांना सॅल्यूट करायला लागतात आणि तो रुबाबदार, भरघोस मिशांचा माणूस तिथून निघून जातो. तो माणूस म्हणजे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि त्यांची भूमिका करणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. हा किस्सा वाचल्यानंतर विकी कौशलने ही भूमिका किती समरसून केली आहे, हे वेगळे सांगण्याची गरजच उरत नाही. लेखकाची ही लेखनशैली दाद देण्यासारखी आहे.

'ट्रेलर'च्या शेवटी लेखकाने म्हटले आहे की, चित्रपटांनी माझ्या आयुष्यात केलेल्या मूल्यवर्धनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हे लेखन केले आहे. हे लेख वेगवेगळ्या वेळी लिहिलेले असल्यामुळे त्यात तत्कालीन संदर्भ आहेत. कदाचित त्यामुळे काही ठिकाणी रसभंग झाल्यासारखेही वाटू शकेल. मात्र, हे लेखन वाचताना वाचकांच्या चार घटका सुखाच्या गेल्या, त्यांचे थोडे स्मरणरंजन झाले आणि त्यामुळे पुन्हा चार घटका सुखाच्या गेल्या, तर या पुस्तकाचे सार्थक होईल.

हा आगळावेगळा अनुभव घेण्यासाठी तरी हे पुस्तक अवश्य वाचायला हवे.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


शटरस्पीड : काही परिचित, काही अनवट हिंदी चित्रपटांचा लेखाजोखा

लेखक : डॉ. संजीव कुलकर्णी

प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे

पाने: 216

किंमत: 350 रुपये

Tags: book review पुस्तक परिचय संजीव कुलकर्णी चित्रपट सिनेमा 1970 2023 सॅम बहादुर गुड्डी जॉनी मेरा नाम प्रसिद्ध चित्रपट आणवत चित्रपट Load More Tags

Add Comment