संस्कृत साहित्याच्या अंतरंगाचा शोध

चित्रा वाघ लिखित 'प्रतिभेचे चांदणे' या पुस्तकाचा परिचय

प्रतिभावान नाटककार म्हणून भासाचे आणि त्याच्या नाटकचक्राचे उल्लेख संस्कृत साहित्यात कायमच येत होते, परंतु प्रत्यक्षात त्याची नाटके उपलब्ध नव्हती. 1909 मध्ये महामहोपाध्याय टी. गणपती शास्त्री यांना केरळमध्ये तेरा नाटकांच्या हस्तलिखितांचा शोध लागला, ती सर्व भासाची नाटके होती. भास हा अत्यंत वेगळ्या प्रकृतीचा आणि स्वतंत्र आणि काहीशी बंडखोर भूमिका घेणारा नाटककार आहे. जनमानसात ज्यांची खलनायक अशी प्रतिमा आहे त्यांना आपल्या नाटकांमधून प्रमुख पात्राच्या भूमिकेत स्थान देण्यावरून, नायकापेक्षा अधिक महत्त्व नायिकेला देण्यावरून भासामधल्या बंडखोर नाटककाराचा प्रत्यय येतो. भासाचं सृजनशील मन ठराविक चौकटीच्या बाहेर जाऊन मूळ कथावस्तुचा, त्यातील पात्रांच्या मानसिकतेचा विचार करतं-त्यासाठी महाभारतासारख्या मूलभूत मूलभूत ग्रंथामधील घटनांचे तपशील बदलण्याचं स्वातंत्र्यही त्याने वेळोवेळी घेतलं आहे. 

चित्रा वाघ यांचे संस्कृत वाङ्मयाचा रसास्वाद घेणारे ‘प्रतिभेचे चांदणे’ हे सर्वांगसुंदर आणि आल्हाददायी पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. चित्रा वाघ या प्रथितयश लेखिका आहेत. ललित लेखन, कथा व मुलाखती या वाङ्मयप्रकारांत त्यांनी मौलिक भर टाकलेली आहे. नियतकालिकांचे संपादन करण्याचा त्यांना अनुभव आहे. प्राचीन संस्कृत नाटकांचे सौंदर्य उलगडणारे कार्यक्रम त्या सादर करतात. उत्फुल्ल मनाने, उत्कट संवेदनशीलतेने आणि रसिकतेने संस्कृतसारख्या समृद्ध भाषेतील अक्षरवाङ्मयाचा सखोल अभ्यास करून त्यांनी ‘प्रतिभेचे चांदणे’ हा अपूर्व आनंद देणारा ग्रंथ लिहिला आहे. गीर्वाणभारतीच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना गाढ व्यासंगाची आणि तरल संवेदनशीलतेची आवश्यकता असते; चित्रा वाघ यांच्याकडे ती आहे. त्यांचे वडील प्रख्यात ललितनिबंधकार आणि व्यासंगी साहित्यिक रवींद्र पिंगे यांचा वाङ्मयाच्या अभ्यासाचा वारसा त्यांनी समर्थतने पुढे चालविला आहे. रूप, रस, गंध, नाद आणि स्पर्श या संवेद‌नांचे महत्त्व जाणणाऱ्या भाषाप्रभू आणि वाङ्मयीन कृतींचे समरसून रसग्रहण करणाऱ्या लेखिका म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.

संस्कृत वाङ्मयाच्या निर्मितीचा वारसा चार-पाच सहस्त्र वर्षाचा आहे. व्यास-वाल्मीकि या थोर कवींचे वाङमय आपण ‘आर्ष’ म्हणून संबोधतो. त्यानंतर अडीच ते तीन हजार वर्षांमध्ये निर्माण झालेल्या वाङ्मयाला ‘विदग्ध’ अथवा ‘अभिजात वाङ्मय म्हणून संबोधतो. गीर्वाणभारतीचे हे अनुपमेय लावण्यरत्नभांडार चित्रा वाघ यांनी सखोलतेने आणि गांभीर्याने खुले केले आहे. त्याची प्रशंसा कोणत्या शब्दांत करावी बरे!

संस्कृत वाङ्मयाचा विशाल पट पाहताना रसिकांचे मन मोहून जाते. त्यातील सौंदर्यशाली रसतीर्थाचा शोध घेताना बुद्धी, भावना आणि संवेदना यांची शक्ती आवश्यक असते. निखळ सौंद‌र्याची कारंजी असलेल्या या उपवनातील अंतरंगाचा शोध घेताना काय घ्यावे, किती घ्यावे आणि कसे वर्णावे या विचारांनी मन दिङ्मूढ होते. पण मनोमुकुर स्वच्छ ठेवून विनीत वृत्तीने या अक्षर साहित्याचा मनःपूत मागोवा घेतला तर उच्च प्रतीचा आनंद मिळतो. एका आगळ्या-वेगळ्या विश्वात आपण प्रवेश करतो. आर्ष आणि विदग्ध वाङ्मयाचे आलोडन करून लेखिकेचे मन स्तब्ध राहत नाही. गर्भश्रीमंतीचा तलम पोत असलेल्या वैदिक साहित्याच्या दिंडी-दरवाज्याच्या आतील सौंदर्य एकाग्रतेने न्याहाळावेसे लेखिकेला वाटते.

भासनाटकचक्र
प्रतिभावान नाटककार म्हणून भासाचे आणि त्याच्या नाटकचक्राचे उल्लेख संस्कृत साहित्यात कायमच येत होते, परंतु प्रत्यक्षात त्याची नाटके उपलब्ध नव्हती. 1909 मध्ये महामहोपाध्याय टी. गणपती शास्त्री यांना केरळमध्ये तेरा नाटकांच्या हस्तलिखितांचा शोध लागला, ती सर्व भासाची नाटके होती. भास हा अत्यंत वेगळ्या प्रकृतीचा आणि स्वतंत्र आणि काहीशी बंडखोर भूमिका घेणारा नाटककार आहे. जनमानसात ज्यांची खलनायक अशी प्रतिमा आहे त्यांना आपल्या नाटकांमधून प्रमुख पात्राच्या भूमिकेत स्थान देण्यावरून, नायकापेक्षा अधिक महत्त्व नायिकेला देण्यावरून भासामधल्या बंडखोर नाटककाराचा प्रत्यय येतो. भासाचं सृजनशील मन ठराविक चौकटीच्या बाहेर जाऊन मूळ कथावस्तुचा, त्यातील पात्रांच्या मानसिकतेचा विचार करतं-त्यासाठी महाभारतासारख्या मूलभूत मूलभूत ग्रंथामधील घटनांचे तपशील बदलण्याचं स्वातंत्र्यही त्याने वेळोवेळी घेतलं आहे. नाटकाचं कथानक कलात्मक पद्धतीने मांडताना नाट्य छलितांचा वापर करणं हे भासाचं आगळं वैशिष्य मानलं जातं. तत्कालीन विद्वानांनी त्याच्या नाटकांच्या संहिता आगीत जाळून टाकल्या अशी दंतकथा आहे. त्याच्या मुळाशी कदाचित त्याची ही बंडखोर वृत्तीच असू शकेल. भासाचा  काळ इसवीसन पूर्व पहिलं शतक मानला जातो. दोन हजार वर्षांपूर्वी भासासारखा अनेक अर्थांनी प्रयोगशील प्रतिभावंत नाटककार लाभणं हे इथल्या भूमीचं आणि पर्यायानं आपल्या सर्वांचं फार मोठं भाग्य आहे. 

‘प्रतिमा’ या नाटकाला लेखिकेने रामकथेचा नवीन आविष्कार म्हटलेले आहे. भासाचे ‘प्रतिज्ञायौगंधरायणम्’, हे उदयनकथेवर आधारलेले प्रभावी नाटक आहे. ‘स्वप्नवासवदत्तम्’ ही सर्वांगसुंदर नाट्यकृती याच नाटकाचा पुढचा भाग आहे. या ‘द्विदला‘मध्ये रचनाकौशल्य आहे. “भासाने वास्तवाला कल्पनेची जोड देत अत्यंत कौशल्याने हे सहा अंकी स्त्रीप्रधान नाट्य फुलवलं आहे. स्वप्नवासवदत्तम’ नाटकात “केवळ उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि मोजक्या शब्दांतली स्वगतं पेरत वासवदत्तेच्या मनाच्या सूक्ष्म संवदेना आणि वेदनांचे हळवे पदर भास उलगडताना दिसतो.” असे लेखिका म्हणते.

एकांकिका हे भासाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. संस्कृत साहित्यात एकांकिका लिहिणारा हा एकमेव नाटककार आहे. महाभारताच्या शेवटच्या युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या पाच एकांकिका त्याने लिहिल्या. त्यातल्याही दुर्योधनाविषयीची ‘ऊरुभंगम्’ आणि कर्णाविषयीची ‘कर्णभारम्’ या विशेष लक्षणीय आहेत. कारण त्या दुर्योधन आणि कर्ण या खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्तिरेखांचे चांगुलपण आणि माणूसपण दाखवतात. तसेच नाटकाची परंपरा मोडून शोकांत दाखवतात. त्या काळात आणि त्याच्या काहीशा आधीच्या काळात ग्रीक शोकांतिका प्रसिद्ध होत्या, त्यांचा परिचय भासाला कदाचित प्रवासी व्यापाऱ्यांच्या / सैनिकांच्या माध्यमातून झाला असावा आणि त्या प्रभावातून या एकांकिका त्याने लिहिल्या असाव्यात असेही मानले जाते. प्राचीन साहित्य आणि नाटकांतील ऐतिहासिक संदर्भांचा कालनिश्चितीसाठी कसा उपयोग केला जातो, हेदेखील यातून लक्षात येईल. 

युद्धाच्या शेवटी भीमाने दुर्योधनाची मांडी फोडल्यापासून ते दुर्योधनाने अखेरचा श्वास घेईपर्यंतच्या काळात दुर्योधनाच्या मनात होणारी आंदोलनं आणि त्याच्या जवळच्या माणसांशी असलेल्या ऋणानुबंधाचं चित्रण करताना भासाने आपली प्रतिभा पणाला लावलेली दिसतो. महाभारतामधील दुर्योधनाची रूढ प्रतिमा आणि भासांने रेखाटलेली व्याक्तिरेखा यांतील फरक पुढील निवेद‌नातून उमजतो : दुर्योधन धर्मयुद्धाचे नियम अतिशय कटाक्षाने पाळणारा आहे त्यामुळे भीम जमिनीवर पडलेला असताना परत प्रहार करणं सहज शक्य असूनही तो भीमाने उठून पुन्हा युद्धाला सुरुवात करण्याची वाट पाहत आहे. धरणीवर कोसळलेल्या भीमाला तो उपहासाने सांगतो, “भिऊ नकोस! दीनदुबळ्यांवर खरा योद्धा शस्त्र चालवत नाही.” या एकांकिकेचा शेवट नाट्यपूर्ण प्रसंगाने झालेला आहे दुर्योधन उद्‌गारतो, “आयुष्यभर मी स्वाभिमानाने जगलो आणि युद्धात प्राणपणाने लढून वीरमरण पत्करत आहे, तेव्हा तुम्ही कोणीही माझ्या मृत्यूचा शोक करू नका.” दुर्योधनाच्या मानी स्वभावावर येथे प्रकाश टाकला आहे. 

‘कर्णभारम्’ मध्ये द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर कर्ण कौरव सेनेचा सेनापती होतो. तो कुंतीचा पुत्र आहे हे त्याला कळते, आणि 'ऐन वेळी तुझी अस्त्रविद्या आणि शिकलेले मंत्र तुला आठवणार नाहीत' असा शाप त्याला पूर्वी परशुरामाने दिलेला असतो, या सर्वा घटनांमुळे कर्णाला जाणीव होते की, त्याचा मृत्यू आता जवळ आला आहे. तशातच कर्णाच्या दानशूरतेचा फायदा घेऊन इंद्र त्याची नैसर्गिक संरक्षक कवचकुंडले मागून घेतो. कर्णाचा युद्धात मृत्यू व्हावा, आणि अर्जुनाचा विजय व्हावा या हेतूने जाणून बुजून इन्द्र हे कपट खेळतो. ते कर्णाच्या लक्षात येत, आणि अर्जुनाच्या हातून आज आपला मृत्यू अटळ आहे हे स्पष्ट दिसत असूनही कर्ण ते दान देतो, आणि रथ अर्जुनासमोर नेतो असे या एकांकिकेचे कथानक आहे. कर्णाच्या व्यक्तिमत्त्वात अनोखे रंग भरण्याची कामगिरी भासाने अवघ्या पंचवीस श्लोकांच्या आणि मोजक्या संवादांच्या वापरातून साधलेली आहे हे महत्त्वाचं! असे लेखिका म्हणते.

काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुंतला
सर्व साहित्यप्रकारांत नाटक हा प्रकार सर्वात जास्त विलोभनीय मानला जातो आणि त्यातही सर्वोत्कृष्ट ठरतं ते कालिदासाचं ‘अभिज्ञानशाकुंतलम्’. कालिदासाच्या प्रतिभचा गौरव भारतीयांनी ‘कविकुलगुरु’ या नामाभिधानाने केलेला आहे. कालिदास प्रतिभेविषयी वाटणाऱ्या ममत्वातून ‘शब्दलावण्याचं उपनिषद अभिज्ञान शाकुंतलम्’, अद्भुतरम्य प्रेमकहाणी विक्रमोर्वशीयम्’, ‘मेघमोहिनीचे कटाक्ष : मेघदूत’ आणि ‘रघुवंशामधील वसिष्ठोपदेश’ हे लेख लेखिकेने लिहिले आहेत. या वाङ्मयकृतींतील सौंदर्यस्थळे लेखिकेने रसमय शैलीने रेखाटली आहेत. कालिदासाने अभिज्ञानशा‌कुंतलम् मध्ये विलोभनीय पात्रनिर्मिती केली आहे 

अभिज्ञानशाकुंतलाविषयीचे ‘पुरुष असाही असतो’ आणि ‘प्रियंवदा समजून घेताना’ हे दोन लेख विशेष आहेत. शकुंतला, अनसूया आणि प्रियंवदा या जिवलग सख्या. वसंत बापटांसारखा एखादा प्रतिभावंत कवी आपल्या कल्पनेतून त्यातील प्रियंवदेच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक नितांतसुंदर कविता कागदावर उतरते. अशा काव्यात्म अनुभूतीच्या लावण्यमय शैलीत लोखका लिहिते, तेव्हा ते प्रचितीचे उद्‌गार ठरतात. ‘पुरुष असाही असतो’ या लेखात लेखिका म्हणते, “दुष्यन्ताच्या रूपाने एक परिपूर्ण, धीरोदात्त नायक कालिदासाने अगदी काळजीपूर्वक साकारता आहे. दोन राण्या असलेल्या विवाहित प्रौढ राजाच्या व्यक्तिमत्वातच शकुंतलेच्या निष्ठावान प्रेमिकाचे हळवे रंग भरण्याचे चातुर्य त्याने दाखवले आहे, हे विशेष!” नातिनियम आणि धर्माचरणाविषयी दुष्यंत एवढा काटेकोर आहे, की शकुंतलेविषयी आपल्याला जर अभिलाषा वाटत असेल तर ते योग्यच असेल, त्यात चुकीचे काहीच नसणार, असा आत्मविश्वास तो बाळगू शकतो. शारीरिक आकर्षणापासून सुरू झालेल्या प्रेमाचा उदात्ततेकडे जाणारा शाश्वत प्रवास यातून दिसतो.

महत्त्वाची संस्कृत नाटके आणि अन्य साहित्यकृती
‘रामायणाची सुखान्तिका - उत्तररामचरितम्’ हा भवभूतीच्या उत्तररामचरितम’ वरील लेख सरसरमणीय झालेला आहे. ‘मृच्छकटिकम्’- एक कॉलिडोस्कोप’ या सविस्तरपणे लिहिलेल्या लेखात गुंतागुताचे कथानक उलगडून दाखविले आहे. समाजाच्या सर्व स्तरांवरून, वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून आलेच्या तब्बल सत्तावीस व्यक्तिरेखा या नाटकाद्वारे रंगमंचावर एकत्र आणलेल्या आहेत. मृच्छकटिक नाटकाचं कथानक काल्पनिक आहे. यातील चारुदत्त–वसंतसेनेची प्रेमकहाणी महाकवी भासाच्या ‘चारुदत्त’ या अपूर्ण नाटकावरून घेतली आहे-त्यात अनेक सुधारणा, बदल करत, आर्यकाने केलेल्या राज्यक्रांतीची आणि उपनायकाच्या प्रेमकथेची जोड देत कथानकाचा तिहेरी गोफ शूद्रकाने अत्यंत कौशल्याने विणलेला आहे. राजनीतीच्या प्रांगणात शिरून मुद्राराक्षसाचा आस्वाद घेणे, तत्वज्ञानाचं नाट्यरूप सामावलेल्या ‘प्रबोधचंद्रोदयाचे’ दर्शन घेणे, ‘विक्रमोर्वशीयम्’ आणि ‘रघुवंशा’ तील वसिष्ठोपदेशाचे आकलन करून घेणे, बाणभट्टाच्या ‘हर्षचरितम्’ मधील चरित्राचा आणि चारित्र्याचा शोध घेणे, ‘वेणीसंहारम्’ मधील नवरसांच्या नाट्याविष्काराचे आकलन प्रज्ञा-प्रतिभेच्या सहाय्याने करून घेणे आणि श्रीहर्षाचा नागानंद’मधील प्रतिभाविष्काराची सौंदर्यस्थळे शोधणे, हे कठीण कार्य आहे. पण हे शिवधनुष्य चित्रा वाघ यांनी बुद्धिसामर्थ्याने लीलया पेलले आहे.

चित्रा वाघ यांनी अभिजात संस्कृत साहित्यकृती आणि नाटकांचा सौंदर्यास्वाद घेताना नेमकेपणाने त्या त्या साहित्यकृतीतील सौंदर्यस्थळे अधोरेखित केली आहेत. संविधानक, व्यक्तिरेखा, रसपरिपोष, नाट्यमय संघर्ष, संवाद, शैली आणि जीवननिष्ठा या मूल्यांचा गुणसंगम घडवून आणला आहे. त्यांची गुणग्राहकता अव्वल दर्जाची आहे. लेखिकेचे भाषासौष्ठव, सौंदर्यशोध आणि आनंद‌बोध घेण्याची विचक्षण वृत्ती आणि साहित्य-कृतीशी त्यांनी साधलेले तादात्म्य याचाही उल्लेख आवर्जून करायला हवा. या पुस्तकामुळे मूळ साहित्यकृतींचा आस्वाद घ्यावासा वाटेल.

प्रतिभेचे चांदणे 
लेखिका : चित्रा वाघ
प्रकाशक : उन्मेष प्रकाशन, पुणे 
पृष्ठसंख्या : 178 
मूल्य : 300 रुपये 

- सोमनाथ कोमरपंत

somnathpant@gmail.com 
(लेखक गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्याचे प्राध्यापक आहेत.)

Tags: संस्कृत] संस्कृत साहित्य संस्कृत नाटक भास कालिदास भासनाटकचक्र शाकुंतल एकांकिका Load More Tags

Add Comment